Wednesday, June 17, 2026

संस्कृततज्ज्ञ एव्हर्ट श्नायडर यांच्याशी गप्पाटप्पा

२०१९मध्ये नेदरलँड्समध्ये आलो होतो तेव्हा १५ ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात कालिदासाच्या मेघदूताचे डच भाषेमध्ये अनुवाद करणाऱ्या एव्हर्ट श्नायडर (Evert Schneider) यांची अनपेक्षित भेट, त्यानंतर मी घेतलेली त्यांची ऑनलाईन मुलाखत आणि त्यावर मी दिवाळी अंकात लिहिलेला लेख, याबद्दल या पूर्वी इथे सांगितलंच होतं. पुन्हा नेदरलँड्सला आल्यावर त्यांची भेट घ्यायची हे ठरवलंच होतं. पण त्यांच्या संपर्क करायचा आळस केल्यामुळे अनेक महिने भेट झालीच नाही. मार्च महिन्यात मात्र आळस झटकून त्यांना ई-मेल करून भेटायची इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्याकडून २०मार्च २०२६ रोजी भेटीसाठी घरीच येण्याचे आमंत्रण मिळाले. इतके महिने नेदरलँड्समध्ये राहूनही डच व्यक्तीच्या घरी जायचा प्रसंग प्रथमच आला. त्यांच्या घरी पोचलो तेव्हा त्यांच्या सौंनी दार उघडून स्वागत केलं आणि बसायला सांगितलं. वरच्या मजल्यावरून सावकाश चालत एव्हर्ट दिवाणखान्यात आले तेव्हा लक्षात आलं की, ते आता प्रचंड थकले आहेत.. नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्यांनी मला पहिली वार्ता दिली तीच उत्साह वाढवणारी होती. 'साप्ताहिक सकाळ'मधला माझा लेख वाचून बेल्जिअमच्या एका मराठी कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क साधला होता, एवढंच नाही तर त्यांच्या घरी येऊन त्यांची व्हिडिओ सेटप वगैरे करून मुलाखतही घेतली होती! आपण काहीतरी लिहितो त्याचा कधी, कुठे, कसा प्रभाव पडू शकतो याचा अंदाज करणं खरंच अशक्य असतं.. या वार्तेच्या ओघाने ज्या गप्पा सुरू झाल्या त्या चांगल्याच रंगल्या. विषय अर्थातच संस्कृत आणि त्या अनुषंगाने संस्कृतचा भारताबाहेरचा प्रवास, इतिहास. बोलण्याच्या ओघात अनेक गोष्टी कळत गेल्या; काही मी त्यांना सांगितल्या. इंग्रजांनी केलेला संस्कृतचा अभ्यास आणि संस्कृत अभ्यासक/प्रसारक म्हणून जगासमोर असणारी इंग्रजांची (त्यातही विल्यम जोन्सची) प्रतिमा याबद्दलची एव्हर्ट यांची मतं झणझणीत आहेत 😃. गप्पांच्या ओघात एव्हर्ट यांनी टेनिसच्या निमित्ताने (ते स्वतः डेव्हिस चषक आणि अमेरिकन ओपन खेळलेले आहेत) त्यांच्या स्वतःच्या दिल्ली भेटीच्या आणि नंतर मेघदूताच्या मेघाचा मागोवा घेण्यानिमित्ताने झालेल्या हिमालय भेटीच्या आठवणी निघाल्या. आल्प्स् अगदी सविस्तर पाहिलेला हा माणूस भारतभेटीत मात्र हिमालय पाहून भारावून गेला होता! गप्पा जेव्हा खेळ आणि भारताकडे सरकल्या तेव्हा क्रिकेटचा विषय निघाला आणि कळलं की, त्यांची नात Phebe Molkenboer ही Netherlands टीमची ओपनिंग बॅटर आहे!! ते म्हणाले "तिला पुढेही क्रिकेटच खेळायचं आहे. पण आमच्या देशात हा खेळ खूप छोटा आहे." मी म्हणालो, "छोटा असला तरी तुमची पुरुष क्रिकेट टीम गेली काही वर्षं खूप चांगली कामगिरी करत आहे, महिला क्रिकेट संघाने यावर्षी T20 विश्वचषकातही प्रवेश मिळवला आहे आणि आता भारतात WPL सुरू झालं आहे, इंग्लंडमध्ये The Hundred सुरू झालं आहे. अशा लीग्जमुळे एखाद्या छोट्या देशाच्या क्रिकेटपटूलाही संधी मिळू शकते.. IPL मध्ये नेपाळसारख्या क्रिकेटच्या दृष्टीने छोट्या देशातल्या खेळाडूलाही संधी मिळाली आहे. तुमची नात मन लावून खेळून चांगली कामगिरी करत राहिली तर तिलाही अशा लीग्जमध्ये संधी मिळू शकते" बोलण्याच्या ओघात महाराष्ट्र आणि भारतातील डच हा विषय निघालं तेव्हा त्यांना निखिल बेल्लरकर हा तरुण अभ्यासक मराठा-डच संबंधांवर संशोधन करत आहे, असं सांगितलं तेव्हा ते म्हणाले, "मला मराठे आवडतात, कारण त्यांनी इंग्रजांना हारवलं". हा (चुकीचा) संदर्भ त्यांनी कशावरून दिला कळलं नाही, पण एकुणात त्यांचं इंग्रजांवरच्या विशेष प्रेमाचा पुन्हा प्रत्यय आला😅 एव्हर्ट यांच्या भेटीला येण्यापूर्वीच त्यांना काय भेट द्यावी याचा विचार करत होतो. राजीव मल्होत्रा यांची संस्कृतवरची दोन्ही पुस्तकं त्यांनी वाचली आहेत आणि ती त्यांना आवडली आहेत हे मला माहित होतं. त्यामुळे तो पर्याय बाद होता. मग त्यांना भारताबद्दलच आणखी माहिती देणारं आणि संस्कृतशी संबंध असणारं 'Imperishable Seed' हे पुस्तक अगदी योग्य ठरेल असं वाटलं (हिंदू गणिताचा इतिहास सांगणारं हे पुस्तक संस्कृत भाषेतील गणिती सूत्रांनी संपृक्त आहे). योगायोगाने याच सुमारास नेदरलँड्सला येऊ घातलेल्या निखिल या संशोधक मित्राला हे पुस्तक घेऊन यायला सांगितलं. पण ट्रम्प तात्याने मध्येच गोंधळ घालून ठेवल्याने त्याचा प्रवास रद्द झाला आणि पुस्तक मिळवण्याचा प्रश्न निर्माण झाला. सुदैवाने काही दिवसांपूर्वीच Imperishable Seed चे बर्लीनस्थित लेखक भास्कर कांबळे यांच्याशी फोनवर ओळख आणि बोलणं झालं होतं. त्यांच्याशी पुन्हा संपर्क केला. त्यांनी लगोलग मला त्यांचं पुस्तक पाठवलं. एव्हर्ट यांना ते भेट दिलं तेव्हा मिश्किलपणे म्हणाले, "मला हे कळेल का?" बोलण्याच्या नादात सव्वा - दीड तास कसा गेला कळलं नाही. निघताना ते मला सोडायला बाहेरपर्यंत आले. मी सायकलवरून आलोय हे कळल्यावर खूप खुश झाले.. निघताना त्यांना म्हणालो, "तुमचं मेघदूतावरचं पुस्तक मी आणायला विसरलो. त्यावर तुमची स्वाक्षरी घ्यायची होती." ते म्हणाले आता "हरकत नाही, त्यानिमित्ताने पुढच्या वेळी पुन्हा ये." अंगण ओलांडून ते मला सोडायला फुटपाथ पर्यंत येत होते पण तेवढं चालणंही नीट जमत नव्हतं. त्यांचं वय पंच्याऐंशीच्या जवळ आहे. या वयातही त्यांचा संस्कृत संदर्भातच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन संशोधन आणि लेखन चालू आहे. त्यांना तब्येतीची साथ मिळो आणि त्यांचं नवं पुस्तक आपल्याला वाचायला मिळो अशी मनोमन प्रार्थना केली.
निरोप घेताना त्यांना म्हटलं "आता अजून पुढे फुटपाथपर्यंत यायचे कष्ट घेऊ नका" आणि त्यांना आणि त्यांच्या सौंना अच्छा करून निघालो. परतीच्या वाटेवर असताना अचानक लक्षात आलं की, मगाशी त्यांच्या "कुठला नवीन लेख लिहिलास का?" या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देताना "मी आख्खं पुस्तक लिहिलंय" हे सांगायचं विसरूनच गेलो आहोत! आपण कितीही बोललो तरी काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या राहूनच जातात!

आडवाटेवरचा अवलिया

बऱ्याचदा असं होतं की, एखादी गोष्ट करायची आहे असं नुसतं मनाशी म्हणत राहतो; पण प्रत्यक्षात ती करतच नाही. 'आपल्या व्यग्रतेमुळे ती करणं आपल्याला जमत नाहीये', अशी आपण स्वतःची समजूत घालत राहतो. परंतु एखादा दिवस असा उजाडतो, जो 'आपण ती गोष्ट केली नाही' याची कायमची हुरहूर लावून जातो. २२ मे २०२६ रोजी प्रवीण कारखानीस नावाचा विलक्षण भ्रमंतीकार सर्वात मोठ्या प्रवासाला निघून गेल्याची बातमी कळली आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट राहून घेल्याची कायमची सल मनाला देऊन गेली. बहुतां देशां हिंडावे। नाना कळा शिकत जावें ।। बहुश्रुतपणें विवरावें । बरे वाईट ।। हे समर्थवचन प्रवीण कारखानीस शब्दश: जगले. हमरस्ता सोडून आडवाटा तुडवण्यामध्ये ज्यांना विलक्षण थ्रिल वाटत असावं. त्यांची पुस्तकं, लेख, फेसबुक पोस्ट्समधून माझ्या मनात तयार झालेली प्रतिमा म्हणजे एक धाडसी दुचाकीवीर, एक चौकस माणूस, एक मनस्वी रसिक, एक उत्तम लेखक अशा अनेक छोट्या 'स्नॅपशॉट्स'चं कोलाजच आहे. कारखानीसांच्या साहसांशी प्रथम परिचय झाला तो त्यांच्या 'अष्टचक्री रोमायण' या पुस्तकातून. मोटरसायकलवरून मुंबई ते रोम असा सलग प्रवास करणाऱ्या आठ वेड्या पीरांपैकी एक असणाऱ्या कारखानीसांनी लिहिलेलं हे पुस्तक बराच काळ बाजारात उपलब्ध नव्हतं. सुदैवाने त्या पुस्तकाची नवी आवृत्ती आल्याचं सोशल मीडियाच्या कृपेने कळलं. फेसबुकवर सक्रीय असलेल्या कारखानीसांशीच संपर्क करून पुस्तक मिळवलं. वाचताना वाटलं 'आज वेगवान सोशल मीडियामुळे इतक्या सहजतेने मिळालेलं हे पुस्तक प्रत्यक्षात ज्या प्रवासाची कथा सांगतं, तो पन्नास वर्षांपूर्वीचा प्रवास मात्र अतिशय मर्यादित संपर्क साधनांमुळे केवढा आव्हानात्मक होता!' अपरिचित प्रदेश, प्रतिकूल हवामान, खराब रस्ते, अनुभवाचा अभाव अशा परिस्थितीमध्ये आठ तरुण आपल्या चार मोटरसायकल्स वरून २२ मे १९७७ रोजी 'गेटवे ऑफ इंडिया' वरून निघाले आणि तब्बल साडेबावीस हजार कि.मी.चं अंतर कापून दीडशे दिवसांनी २९ जुलै रोजी रोमला पोहोचले. अपरिचित मुलुखात सहकाऱ्यांशी झालेली चुकामूक, इस्तंबूलकडे जात असताना लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी हे दुचाकीस्वार राज कपूरच्या भारतातून आलेले आहेत हे कळल्यावर त्यांच्यासोबत राज कपूरची गाणी गाऊन सेलिब्रेशन करणे, मराठी माणसाला अपरिचित असलेल्या देशांमधले समाजजीवन अशा अनुभवांमुळे हे प्रवासवर्णन वाचनीय झालं आहे. इस्लामिक क्रांती होण्यापूर्वीच्या अत्यंत खुल्या, आधुनिक वातावरणातल्या इराणचं - आज अगदी अविश्वसनीय वाटणारं - मराठी प्रवाशाने केलेलं वर्णन हे तर मराठी साहित्यातलं एकमेव उदाहरण असावं (या पुस्तकावर मी ‘महाएमटीबी’साठी लिहिलेला लेख या दुव्यावर वाचता येईल : https://www.mahamtb.com/Encyc/2018/5/5/Book-review-of-Ashtchakri-Romayan-by-Prasad-phatak-.html). कारखानीसांनी बँकेची नोकरी सांभाळून आपल्या लाडक्या 'येझदी' बाईकसह अफाट भटकंती केली. ज्यांचा विचारही सर्वसामान्य प्रवासी करणार नाही अशा केनिया, युगांडा, रवांडा, बुरुंडी, टांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे, मोझांबिक, मालावी या देशांचा साडेचौदाहजार कि.मी.चा प्रदेश मोटरसायकलवरून पालथा घातला. झिम्बाब्वेमध्ये रस्त्याने प्रवेश करणारे ते पहिले भारतीय आहेत, अशी नोंद त्या देशाच्या सरहद्दीवर करण्यात आली. 'भटकंती-देश विदेशांची' या पुस्तकामध्ये हे अनुभव वाचता येतात. १९८१ मध्ये कारखानीसांची बदली 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या कलकत्ता शाखेमध्ये झाली, तेव्हा ते तिथे रुजू होण्यासाठी चक्क मोटरसायकलवरून गेले कलकत्त्यातली पाच वर्षं त्यांनी बंगाली खानपान, साहित्य, चित्रपट हे सगळं जाणून जाणून घेतलं. संधी मिळतातच बांगलादेशही पाहून घेतला. वंगदेशीच्या अनुभवांवर आधारित लेखांचं पुढे ‘हावडा-ब्रिजवरून’ हे पुस्तक झालं. बंगालमध्ये १९३४ सालापासून असलेलं 'महाराष्ट्र निवास' आणि कलकत्त्याचे रहिवासी असलेल्या मराठी मान्यवरांची शब्दचित्रं, हा या पुस्तकामधला सर्वात वेधक भाग आहे. ओठावर हसू, चौकस नजर आणि शिस्त या शिदोरीच्या बळावर ते मनाची पाटी कोरी ठेवून मनसोक्त हिंडले. मनुष्याच्या चांगुलपणावर विश्वास आणि सहज संवाद साधण्याच्या हातोटीमुळे आपल्या अनेक जण जोडले. प्रवासातल्या ओळखी, कमीत कमी गरजा यांमुळे त्यांच्या सफरी विश्वास बसणार नाही इतक्या कमी खर्चात पार पडत. १९०८०च्या दशकात त्यांनी संपूर्ण श्रीलंका अवघ्या ३२० रुपयांमध्ये पालथा घातला होता! २००४ साली भारतीय क्रिकेट टीमच्या पाकिस्तान दौऱ्याच्या वेळी मोजक्याच त्या देशाने भारतीयांसाठी 'विशेष क्रिकेट व्हिसा' देऊ केला होता. रोमपर्यंतच्या प्रवासाच्या वेळी पाकिस्तानचा व्हिसा न मिळाल्याने तो देश पाहण्याची हुकलेली संधी कारखानीसांना मिळाली, तेव्हा पाकिस्तानी वकिलातीतील रणधुमाळीनंतर त्यांनी व्हिसा पदरात पाडून घेतला. या प्रवासात पाकिस्तानी मुस्लिमांकडून झालेले प्रेमळ आदरातिथ्य एकीकडे आणि मानसिकरित्या दबलेला, अगतिक पाकिस्तानी हिंदूंचे दर्शन दुसरीकडे असे दोन टोकांचे अनुभव त्यांना आले. भगतसिंह-सुखदेव-राजगुरू जिथे ताठ मानेने फासावर चढले, अशा ठिकाणाची धूळ मस्तकी लावण्याचे भाग्य २३ मार्च या स्मृतिदिनीच कारखानीस यांना लाभले. अखंड कुतूहलातून जन्मणारे साहस माणसाला कसे अकल्पनीय अनुभव देऊ शकते, याची प्रचिती कारखानीसांचं 'मंज़िल-ए-मक्सूद पाकिस्तान' हे पुस्तक वाचताना येते. याच अखंड कुतुहूलातून कारखानीसांनी अनेक दिग्गजांच्या आवर्जून भेटी घेतल्या. सालीम अलींपासून जनरल अरुणकुमार वैद्यांपर्यंत अनेकांशी त्यांची ओळख झाली. ज्यांच्याशी प्रत्यक्ष परिचय नव्हता अशांबद्दलही त्यांनी माहिती घेऊन लिखाण केलं. 'गाथा गुणीजनांची', 'ज्योतीने तेजाची आरती', 'तेथे कर माझे जुळती' अशा पुस्तकांमधून त्यांनी परिचित-अपरिचित शंभरेक व्यक्तींची शब्दचित्रं लिहिली. इतकं सगळं पुस्तकरूपाने प्रसिद्ध करूनही कारखानीसांकडे भरपूर खजिना शिल्लक होता. तो ते फेसबुवर नियमितपणे रिता करत. उतारवयातही नव्या माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा त्यांचा गुण त्यांच्या चिरतारुण्याची साक्ष देणारा होता. त्यांच्या फेसबुकवरील निवडक लिखाणाचंही एक पुस्तक झालं! एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला पुरस्कार मिळाला, अथवा तिचं निधन झालं की, त्यावर कारखानीसांची एखादी तरी फेसबुक पोस्ट हमखास येई. अनेकदा त्या व्यक्तीसोबत स्वतःची भेट कधी झाली याच्या आठवणी आणि त्यांच्यासोबतचं छायाचित्रही असे. त्यांचं वर्तुळ नक्की किती मोठं आहे, याचा मला कायमच अचंबा वाटे. त्यांच्या पुस्तकांबद्दल त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढणाऱ्यांमध्ये गो. नी. दांडेकर, विद्याधर गोखले, अरुण टिकेकर इ. अनेक दिग्गजांचा समावेश आहे. हावडा-ब्रिजवरून या पुस्तकाचं प्रकाशन तर बंगालचे माजी मुखमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांच्या हस्ते झालं होतं! को.म.सा.प.चा ‘उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार’, ठाण्याचा 'वा. अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कार' मिळालेल्या कारखानीसांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावारही प्रेम होतं. त्यांनी तब्बल ५०पेक्षा अधिक संमेलनांना लावलेली उपस्थिती हा बहुदा विक्रमच असावा. प्रवीण कारखानीसांचा जन्म ६ नोव्हेंबर १९४६ चा; परंतु त्यांची कार्यप्रवणता पाहता त्यांचं या वयात जाणंसुद्धा अकाली आहे अशीच भावना होत आहे. असा अखंड उत्साहाचा धबधबा आटतो तेव्हा त्याचं जाणं अधिक रितेपणा देऊन जातं. दरवेळी त्यांचं नवीन लिखाण वाचलं की, अंबरनाथला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर मुलाखत घेण्याची योजना माझ्या मनात आकार घेऊ लागे. पण ती अर्धवटच राही. आळस करत राहिलो तर वेळ निघून जाईल, ही शक्यता मी ध्यानातच घेतली नाही. आपण आळस झटकायला हवा, हे तरी आपण कार्यमग्न कारखानीसांकडून ते हयात असतानाच शिकायला हवं होतं, याची बोचरी जाणीव आता प्रकर्षाने होत आहे.
(पूर्व प्रसिद्धी : मुंबई तरुण भारत, ७ जून २०२६)

Wednesday, May 13, 2026

खऱ्याखुऱ्या धुरंधरची गोष्ट




धुरंधरच्या दोन्ही भागांनी सर्वत्र एकच धमाल उडवून दिलेली आहे. भारताच्या हेरांच्या नव्याजुन्या छुप्या कामगिऱ्यांची उजळणी पोस्ट्स आणि पॉडकास्ट्समधून उजळणी होत आहे. ते वाचून मला मी करोना काळात ऐकलेल्या एका पुस्तकाची प्रकर्षाने आठवण येत आहे. 


'मैं पाकिस्तान मैं भारत का जासूस था' ही आहे एक सत्यकथा. ही कथा पाकिस्तानातली आहे, भारतीय हेराचीही आहे पण ती हेरगिरीची नाही! यात कोणतेही रहस्य नाही, छुपे कॅमेरे नाहीत, वेषांतर नाही, शत्रूला ठार करणे नाही, की जेलरच्या हातावर तुरी देऊन निसटणे नाही... ही गोष्ट आहे हेरगिरी होऊन गेल्यानंतरची. त्यानंतरच्या प्रचंड खडतर आणि अनिश्चित आयुष्याची.. निनावी राहून मातृभूमीची सेवा करणाऱ्या एका वीराची, त्याच्या आशानिराशेची, संतापाची.. 


ही कथा नवीनही नाही. ही आहे 1970च्या दशकातली गोष्ट. कथेचे नायक आहेत मोहनलाल भास्कर. त्यांना पाकिस्तानात केलेल्या अणुऊर्जा केंद्रातून फाईल मिळवण्याच्या आरोपाखाली अटक होते या घटनेपासूनच पुस्तकाची सुरुवात होते आणि कोणत्याही गुप्तहेरी चातुर्याची उदाहरणे नसूनही शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. मुळात मोहनलाल नक्की कोणत्या कामगिरीवर पाकिस्तानात गेले होते, त्यांनी कोणती माहिती गोळा करून भारतापर्यंत कशी पोहोचवली याबद्दल पुस्तकात अवाक्षरही नाही. मुळात 'आपण हेर होतो' याचा शीर्षक आणि काही ओझरते उल्लेख वगळता फारसा कुठे उल्लेखही नाहीये! .


अमरिकसिंह नावाच्या एका डबल क्रॉस माणसामुळे मोहनलाल पकडले गेले आणि पुढे अमरिकसिंहला सुद्धा संशयावरून तुरुंगात टाकले गेले! तुरुंगात मोहनलाल यांचा प्रचंड छळ झाला. पुस्तकात लाहोर, रावळपिंडी, कोट लखपत इथल्या तरुंगांचे, तुरुंगात भेटलेले सहृदय अधिकारी, कर्मचारी यांचे वर्णन आहे.


विशेष गोष्ट अशी की, एक तुरुंगाधिकारी मोहनलाल यांच्या पोलीस खात्यातील वडिलांचा फाळणीपूर्वीचा पोलिस खात्यातील सहकारी निघाला! त्याने माहिती काढून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले असले तरी त्याच्यामुळे मोहनलाल यांचे हाल कमी झाले.


एका अधिकाऱ्याची आपल्या हिंदू पूर्वजांबद्दलची भावना आपल्यालाही विचार करायला भाग पाडते. आपण काही पिढ्यांपूर्वी केवळ हिंदूच नव्हे तर ब्राह्मण असल्याची त्याला जाणीव होती. मुस्लिमांमधल्या कुप्रथा, त्यांनी जबरदस्तीने केले गेलेले पूर्वजांचे धर्मांतर याचीही जाणीव. परंतु त्याचे मुसलमान झालेले पूर्वज हिंदूंकडे मदत मागायला गेले तेव्हा आणि नंतर स्वधर्मात परत येण्याची इच्छा दाखवली तेव्हा कुणीही मदत केली नाही याची चीड आता काही पिढ्या उलटून गेल्यावरही त्याच्या मनात धगघत होती... ब्राह्मणांवर विशेष राग होता.त्या अनुषंगाने मोहन यांच्याशी अनेकदा चर्चाही केली!


शत्रूराष्ट्र पाकिस्तानात हेरगिरी साठी गेलेला देशभक्त असूनही त्यांनी पाकिस्तान म्हणजे सगळेच वाईट अशी त्यानी कुठेही सूर लावलेला नाही. उलट तशा सार्वत्रिक समजुतीला तडा देणारी अनेक उदाहरणं पुस्तकात आहेत 


पुस्तकात लेखकाने झुल्फिकार अली भुट्टो यांच्याबद्दल आत्मीयतेने लिहिलं आहे. याचं कारण बरंचसं वैयक्तिक आहे. याह्याखानने भुट्टो यांना तुरुंगात टाकलं होतं. तेव्हा तुरुंगातील कैद्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता होती. भुट्टो मोहन यांच्यासोबतच्या कैद्यांनाही भेटले आणि आपल्याला सत्ता मिळल्यास आपण तुमची सुटका करू असे आश्वासन दिले आणि ते खरोखरच पाळले. १९७२च्या सिमला कराराअंतर्गत दोन्ही देशांनी कैदी सोडले. 


१९७१मध्ये शेर-ए-बंगाल मुजीब-उर-रहमान देखील त्या तुरुंगात कैदेत होते परंतु मुजीबची फाशी ४ वेळा टळली. मोहनलाल यांना त्यांना बघायची/भेटायची संधी मिळाली नाही.


मोहनलाल यांचा भावनिक कल्लोळ प्रकट होतो तो भाग आहे तो १९७१च्या युद्धाच्या वेळचा. याचं कारण असं आहे की, गुजरांवाला तुरुंगामागेच असणाऱ्या पाकिस्तानी वायुदलाच्या विमानतळावर १९७१च्या युद्धात भारतीय वायुदलाचने बॉम्बिंग केलं होतं.. चुकून बॉम्ब तिकडचा इकडे पडला असता तरी निभाव लागणं कठीण होतं. पण जेव्हा बॉम्बिंग व्हायचं तेव्हा पाकिस्तानी कैदी, तुरुंगाधिकारी लपून बसत आणि अगदी जीवाची तमा न बाळगता तुरुंगातले भारतीय कैदी विमानाचा आवाज आला की मोकळ्या जागेत येऊन बेभान नाचत! डोक्यावरच्या घिरट्या मृत्यूच्या असल्या तरी त्याची त्यांना फिकीर नव्हती, कारण त्याच घिरट्या त्यांच्या स्वातंत्र्याच्याही होत्या!


तुरुंगातल्या कैद्यांच्या मनस्थितीचे, आपसातल्या नात्यांचे तपशिलाने वर्णन, हा देखील भावनिक रोलर कोस्टरचं दर्शन घडवतो. पाकिस्तानातले भारतीय कैदी हा प्रकार फारच करूण असतो. त्यात कमालीची अनिश्चिती आहे. हेरगिरी, चुकून हद्दीत घुसणे, व्हिसा संपल्यावरही तिथेच राहणे, मासेमारांचे समुद्रात भरकटून हद्दीत शिरणे अशा अनेक कारणांनी अनेक भारतीय माणसं पाकिस्तानी तुरुंगात खितपत. बाहेर भारत-पाकिस्तान संबंध बिघडले (उदा. ७१चं युद्ध) की, तुरुंगात भारतीय कैद्यांचा जास्तच दुस्वास आणि छळ होऊ लागतो. इथलं जीवन किती अस्थिर असतं हे सांगणारी अनेक उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत. शिक्षा संपली तरी परत कधी जाऊ याची शाश्वती नाही.  मोहनलाल यांनाही सोडायचे ठरल्यावरही कोर्ट लखपत तुरुंगातून लाहोरला आणले पण तिथे पुन्हा वर्षभर वर्षभर ठेवले! आधी याद्या exchange होतात. मग भारतीय अधिकारी हे कैदी भारतीय आहेत की नाहीत याचा शोध घेतात आणि नंतरच गाडी पुढे सरकते. सुटका होणार असं कळल्यावरही सगळ्य लालफितीच्या कारभारात वर्षभर काढणे किती असह्य असेल यांची कल्पनाच केलेली बरी.. 


तुरुंगात एक विलक्षण घटनाही घडली.. तुरुंग फोडून जायचा प्रयत्न ऐनवेळी उघडकीला आला म्हणून तुरुंगात सैन्य घुसवून शंभरहून अधिक कैद्यांची हत्या करण्यात आली, अनेकांचे हातपाय तोडले गेले. परंतु आश्चर्य म्हणजे त्यामध्ये भारतीय कैद्यांना काही त्रास दिला गेला नाही. अधिकाऱ्याचं म्हणणं होतं "हे सगळे भारतीय कैदी चांगले आहेत. पाकिस्तानी कैदीच आगाऊ आहेत." 


तुरुंगत व्यसन लागणं अपरिहार्य. सिगरेटच्या थोटकासाठीही जीव पाखडतात. अनेक गोष्टी सर्रास तुरुंगत पोचतात. कैदी त्या आयुष्यालाही सरावतात. काही इतके धीट बनतात की अधिकाऱ्यांना तोंडावर शिव्या देतात. तिथला आणखीन एक कैदीही भारतीय हेर होता. त्याने तर जवळजवळ प्राणांतिक मार खाल्लेला आणि त्यातूनच तो कोडगा झाला होता... त्याला बडवून उपयोग नाही आणि ठारही मारता येत नाही म्हणून तुरुंगाधिकारीही वैतागले होते आणि तो सरळ आईबहिणीचा उद्धार करायचा. हे वाचायला खूप विचित्र वाटतं. जणू ही एकप्रकराची निर्वाणस्थितीच आहे मनाची. नंतरनंतर तर मोहनलालही त्याच मनस्थितीत गेले होते..


शेवटचा काळ मात्र तुरुंगात मजेत गेला असं मोहनलाल म्हणतात. मुख्य कारण म्हणजे तपासादरम्यान झालेले तसे टॉर्चर परत कधी झाले नाही.


मोहनलाल परत आल्यानंतरचा पुस्तकातला कथाभाग सर्वात त्रासदायक आहे.. परतल्यावर त्यांची परिस्थिती खडतर झाली. भारतीय हेर बनून मोहनलाल पाकिस्तानात अडकले, शिक्षा भोगत राहिले तेव्हा त्यांच्या कुटुंबाची स्थिती हलाखीची झाली होती, हे वाचून क्लेश होतात. कुटुंबासाठी सरकारने काहीच का केले नसेल  हा प्रश्न आपल्याला सतावतो. 


भारतात परतल्यावर काही वर्षांनी मोहनलाल पंतप्रधान मोरारजींना भेटले आणि "पाकिस्तानात भारतासाठी काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची योग्य पावती मिळायला हवी" असं ते म्हणाले. खरंतर त्या दोघांचा आधीपासून परिचय होता,  तरीही मोरारजी निर्दयीपणे म्हणाले "पाकिस्तानच्या कृत्याची शिक्षा आम्ही का भोगू? पाकिस्तानने वीस वर्षं तुरुंगात ठेवलं तर आम्ही तुम्हाला वीस वर्षं नुकसानभरपाई देऊ का?" 


मोहनलाल कडवटपणे वाचकासमोर प्रश्न उपस्थित करतात वि "ज्या माणसाला हाजी मस्तान सारख्याचा पाहुणचार करायला वेळ आहे, त्याला देशासाठी जीव धोक्यात घातलेल्यांसाठी बोलायला वेळ का नाही? माझ्या हातात पिस्तूल असतं तर मी त्यांना तिथेच गोळ्या घातल्या असत्या.."


देशासाठी जीवावर उदार होऊन लढणाऱ्या माणसाला असं वागवलं जातं, तेव्हा आपल्या priorities किती चुकल्या आहेत याची पुन्हा एकदा जाणीव होते. 


(पुस्तक स्टोरीटेलवर उपलब्ध आहे. रोहन प्रकाशनातर्फे मराठीमध्ये त्याचा अनुवादही प्रसिद्ध झाला आहे.)


Monday, May 11, 2026

सोमनाथचा संघर्ष : एक तेजस्वी पर्व




(चित्रसौजन्य : जेमिनी)

सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हा भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ११ मे १९५१ रोजी पार पडलेल्या सोमनाथ प्रतिष्ठापना सोहळ्याचा आज अमृतमहोत्सव आहे. त्या निमित्ताने सोमनाथ मंदिरासाठी झालेला संघर्ष जाणून घेणे सयुक्तिक ठरेल.

गुजरातमधील प्रभासपाटण येथील सोमनाथ हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून त्याचा उल्लेख पुराणांपासून महाभारतापर्यंत अनेक ग्रंथांमध्ये आढळतो. पौराणिक कथेनुसार, चंद्रदेवाने दक्षाच्या शापातून मुक्त होण्यासाठी येथे भगवान शिवाची उपासना केली. त्यामुळे हे स्थान सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती देणारे म्हणून प्रसिद्ध झाले.

इतिहासात सोमनाथ मंदिर इस्लामी आक्रमकांकडून अनेकदा उद्ध्वस्त झाले. पहिल्यांदा इ.स. १०२६ मध्ये गझनीच्या महमूदाने सोमनाथवर हल्ला करून त्याचा विध्वंस केला. कत्तल, लुटालूट झाली. महमूदाचा दरबारी इतिहासकार अल् बेरुनी लिहितो, "महमूदाने या देशाचे वैभव उद्ध्वस्त केले आणि त्याने अशा कारवाया केल्या की, धूळदाण होऊन हिंदू चौफेर विखुरले आणि इतिहासजमा झालेली दंतकथा म्हणून उरले. त्यांच्या विखुरलेल्या अवशेषांमध्ये मुस्लिमांबद्दलचा तीव्र तिरस्कार टिकून आहे."

राजा भीमदेव चालुक्याने आनंदपाल आणि भोज राजा यांच्या सहाय्याने सोमनाथाचे मंदिर पुन्हा उभे केले. पुढे जेव्हा जेव्हा मंदिर उद्ध्वस्त झाले तेव्हा तेव्हा श्रद्धावान हिंदूंनी ते पुन्हा पुन्हा उभे केले. अल्लाउद्दीन खिलजीचा भाऊ उलुघ खान (इ.स. १२९८), सुलतान अहमदशाह (इ.स. १४१७), अहमदशाहचा नातू महमूद बेगडा (इ.स. १४६९) औरंगजेब (इ.स. १६६९) यांनीही सोमनाथाचा विध्वंस केला.

दीर्घकाळ सोमनाथ मंदिराचे अवशेष दुर्लक्षित अवस्थेतच राहिले. पुढे अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराजवळ एक नवीन मंदिर उभारून पूजाअर्चा सुरू केली. ब्रिटिशांच्या काळामध्येही जुनागड नवाबाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या मूळ भग्न मंदिराची उपेक्षाच झाली.

स्वातंत्र्यानंतर जुनागड संस्थानाच्या भारतात विलिनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान सरदार पटेल आणि काकासाहेब गाडगीळ जुनागडला गेले असताना काकासाहेबांनी 'भारत सरकारने सोमनाथाचे मंदिर पुन्हा उभारायलाच हवे' अशी इच्छा व्यक्त केली आणि सरदारांनी या विनंतीला त्वरित अनुमोदन दिले. मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी एक न्यास स्थापन केला गेला. सरदारांचे विश्वासू सहकारी, लेखक, विधिज्ञ, इतिहाससंशोधक कन्हैयालाल मुन्शी यांच्याकडे न्यासाचा कायदेशीर मसुदा लिहिण्याची जबाबदारी आली. तरुणपणी सोमनाथाच्या भग्न अवशेषांना भेट दिल्यापासून मुन्शींच्या मनात वेदना खदखदत होती आणि त्यातूनच त्यांनी 'जय सोमनाथ' नावाची कादंबरीदेखील लिहिली होती. सोमनाथाच्या पुनर्निर्माणाची संधी चालून येताच त्यांनी त्या कार्यात स्वतःला झोकून दिले.

मुन्शी सोमनाथ न्यास विश्वस्त मंडळाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी पुरातत्त्व विभागातर्फे मंदिर परिसरामध्ये उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. उत्खननातून लक्षात आले की, ते अवशेष मंदिर पुन्हा उभे करण्याच्या दृष्टीने उपयोगाचे नाहीत. त्यामुळे संपूर्ण मंदिर नव्याने उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार या कार्यासाठी जनतेकडून निधी उभारला गेला. सोमपुरा समुदायातील कुशल शिल्पकारांची मंदिरनिर्मितीसाठी निवड करण्यात आली. सोमनाथ हे केवळ मंदिर नसून राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक होते, त्यामुळे फक्त मंदिर उभे न करता पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीची पताका डौलाने फडकू लागेल अशी गोष्ट यानिमित्ताने सुरू व्हावी, अशी मुन्शींची इच्छा होती. म्हणूनच एक मोठी गोशाळा मंदिराशी संलग्न असावी, संपूर्ण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा अशी संकल्पना त्यांनी मांडली. पूर्वी मंदिरे केवळ पूजा-अर्चा करण्याचे स्थान नसून ज्ञानाप्रसाराची केंद्रेही असत, त्यामुळेच नवे सोमनाथ पूजेपुरते मर्यादित न राहता त्यासोबतच संस्कृत भाषेचे शिक्षण देणारे एक विद्यापीठ नव्याने स्थापन करावे असा प्रस्तावही त्यांनी मांडला.

सोमनाथ पुनर्निर्माणाला विरोधही झाला. सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन खर्च करण्याबाबत पंतप्रधान नेहरूंनी नाराजी व्यक्त केली. परंतु सरकारतर्फे मशिदी आणि दर्गे यांनाही अनुदान दिले जात असल्याचे काकासाहेबांनी निदर्शनास आणून दिले. पुनर्निर्माणाला नेहरूंनी 'हिंदू पुनरुत्थानवाद' असे संबोधले. मुन्शींनी नेहरूंना सविस्तर पत्र लिहून पुनर्निर्माणामागची राष्ट्रीय भावना आग्रहाने मांडली आणि मंदिराचा भार सरकारी तिजोरीवर पडणार नाही यासाठी कोणती काळजी घेण्यात येत आहे, हेही विशद केले.


राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या मंदिरामध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठापना व्हावी ही मुन्शींची विनंती राजेंद्र प्रसाद यांनी स्वीकारली. पंडित नेहरूंनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्याच हस्ते नूतन सोमनाथ मंदिरात ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली. या मंगलकार्याचे पौरोहित्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी केले. दुर्दैवाने हा सोहळा पाहण्यास सरदार पटेल हयात नव्हते. परंतु त्यांच्या पश्चात गाडगीळ आणि मुन्शी यांनी हे महान कार्य समर्थपणे तडीस नेले होते.

सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हे केवळ एका मंदिराचे पुनरुज्जीवन नव्हते. ती शतकानुशतकांच्या वेदनांवर घातलेली फुंकर होती. तो असीम श्रद्धेच्या अविरत लढ्याचा विजय होता. या कार्यामुळे भारतीय समाजात आत्मविश्वास आणि सांस्कृतिक अभिमान पुन्हा जागृत झाला.

 

--- प्रसाद फाटक