Total Pageviews
Friday, January 14, 2011
कुंपणांचे जग
छोट्याश्या मुठी एवढे जग , आणि मी त्यात एखादी असीम - अनिर्बंध गोष्ट अस्तित्वात आहे का याचा शोध घेतोय. किती वेडा आहे मी !! माझे जग, माझी पृथ्वी सीमेने घेरलेली तर चीज आहे . सगळीकडे मर्यादा .. देशाला 'बॉर्डर'ची , गावाला वेशीची तर समाजाला रूढी - परंपरांची लक्ष्मणरेषा .. आणि प्रत्येक व्यक्तीला शिष्टाचाराच्या दिखाऊ सामाजुतींनी अभेद्य बनलेल्या मनाच्या भक्कम भिंती ... सगळ्या व्यक्ती , चीजवस्तू, संकल्पना - एका वर्तुळाच्या घेऱ्याच्या आत ... एका वर्तुळात असंख्य वर्तुळे ...
एवढे मोठ्ठे असीम आकाश, पण माझ्या घरावरून बघितलं तेव्हा त्याला क्षितिजाचं कुंपण दिसलं. आकाश मर्यादित असल्याचा भ्रम झाला . सहज म्हणून चालत दूर गेलो, तेव्हा आकाशातल्या पोकळीमधले माझ्या घरावरून न दिसणारे तारे दिसू लागले. मला आनंद झाला. "म्हणजे आकाश सीमित नाही तर !!! मग मगाशी भ्रम का झाला?" थोड्या वेळ विचार केल्यावर लक्षात आलं की हा आपल्या भोवतीच्या वर्तुळाचा परिणाम . आम्हाला सवयच लागली आहे - सीमारेषांची, बंधनांची.... त्यामुळे विचारांनाही झापडे लागली आहेत. जगात मर्यादा, सीमा यांना एवढे महत्व का आले आहे ? भौतिक सीमा हे तर याचे सर्वात मोठे उदाहरण. कालपर्यंत एकाच आईच्या अंग-खांद्यावर खेळणारी मुलं दुसऱ्या दिवशी आईचं शरीर अर्धं-अर्धं वाटून घेतात. त्यांच्यासाठी ती बोर्डर असते , पण आईसाठी ती चारत जाणारी जखम असते. ४७ साली माझ्या आईच्या शरीरावर किती मोठा ओरखडा ओढला गेला आणि एका दिवसात मधली यःकश्चित रेषा दोन्ही बाजूंची मनं दुभंगून गेली. खरच, सीमारेषेत एवढी पाशवी ताकद असते मला माहीतच नव्हतं !!!
भौतिक सीमा परवडल्या एकवेळ, इतक्या असंख्य सीमा माझ्या समाजात आहेत. खोट्या रुढींच्या, फसव्या परंपरांच्या, भोंगळ जातीपातीच्या आणि शेवाळलेल्या विचारांच्या .... असल्या सीमा ओलांडायला सुद्धा दसऱ्याची वाट बघायची ? अशाने सीमोल्लंघन कधी व्हायचेच नाही. फार कशाला , स्त्री जेव्हा पुरुषाच्या पावलात पाउल मिसळून चालू पाहते तेव्हा 'मर्यादा' या शब्दाची आठवण पुरुष जातीला फार प्रकर्षाने होते. 'संयम , शालीनता , शील हीच स्त्रीची मर्यादा ' वगैरे वाक्ये बरी पडतात तोंडावर फेकायला ...
या सीमेला एक लहान भावंड आहे. 'कुंपण' त्याचे नाव. सगळ्यात पीडादायक ! मनाच्या सीमा आकसल्या की ते झालं 'कुंपण'. एकवेळ सीमेच्या आत सद्गुण, परोपकार औषधाला तरी असतात, पण कुंपणाआड असतो फक्त स्वार्थ आणि अल्पसंतुष्टता. कुंपणाचं फार मोठं पीक आलंय आजकालच्या राजकारणात. असली जागा आसनासाठी फार सोईची. शेताच्या आतली आणि बाहेरची, दोन्ही जागा नजरेच्या टप्प्यात राहतात. वाऱ्याच्या दिशेने टोपी फिरवणारे नेते लोक यातले तज्ञ. फायद्याच्या कुरणात पटकन उडी मारून जाता येतं. 'सलाम' कविता संग्रहात पाडगावकरांनी 'कुंपण-प्रशस्ती' गायली आहे.
"शहाणे कुंपणावर बसतात, पण आपली माणसे पेरून ठेवतात शेतात |
आणि काही शेताबाहेर . माणसे हेरूनही ठेवतात कुंपणावर बसून |
शहाणे, कुंपण आणि परमेश्वर यांचा थांग लागत नाही ||"
खरंच ! आजच्या तथाकथित शहाण्यांची धाव सरड्यासारखी कुंपणा पर्यंतच आहे. अशी कुंपणे, ज्यांनी शेतच नाही तर अक्खा समाज गिळला आहे. ती मला तोडायची आहेत. सीमांच्या पलीकडे जायचे आहे. असीमता अनुभवायची आहे - मनाची, विचारांची. पण आहे का हे शक्य? अख्ख्या पृथ्वीला गिळू पाहणारा समुद्र - पण त्याला सुद्धा किनाऱ्याने बंदिवान करून टाकले आहे. असीमातेच्या शोधासाठी मग मी बाहेरच पडलो पृथ्वी वरून. विश्वाचा एक तुकडा - जो माझ्या अस्तित्वाच्या कणाकणात आहे तो - सुद्धा धुंडाळला, पण व्यर्थ !
शेवटी मी पृथ्वी कडे वळलो. जवळ येऊन बघतो तर काय ! 'असीम' ' अमर्याद' अशा कित्येक गोष्टींनी मला पृथ्वी चमचमताना दिसली... काय काय होते हे असीमतेला कवटाळणारे ? पृथ्वीवर होते आईचे पिल्लांवरचे प्रेम - कोणत्याही बंधनापुरते मर्यादित नसणारे, पृथ्वीवर होती माझ्या बांधवांची परमेश्वरावरची अपार भक्ती, पृथ्वीवर होती सैनिकांची आणि देशभक्तांची मातृभूवरची गाढ निष्ठा, पृथ्वीवर होती समाजसेवकांची संपूर्ण समर्पणाची भावना ..... आणखीही खूप काही... या सर्वांची तुलना करणारा तराजू कुठे आहे? या सर्वांना अडवणारी तटबंदी कुठे आहे? या सर्वांनी झुगारली आहेत सीमांची बंधने, मर्यादेच्या बेड्या. माझे जग कुंपणाचे आहे खरे, पण मला आज समाधान वाटत आहे कि त्याचा एक छोटासा का होईना, पण असा एकतरी कोपरा जिवंत आहे, ज्याला आभाळा शिवाय कशाचीच सीमा नाही....!!!
Subscribe to:
Posts (Atom)