Total Pageviews

Wednesday, December 2, 2015

कट्यार : एक समर्थ माध्यमांतर !


'कला श्रेष्ठ की घराणे', 'बांध घालून अडवून ठेवलेले स्वर महत्वाचे की पाण्याप्रमाणे जिथे जाईल त्याचे रंग रूप घेणारे नितळ स्वर श्रेष्ठ' या पुरातन वादावर भाष्य करणारे 'कट्यार काळजात घुसली हे दारव्हेकर मास्तरांचे नाटक जितके वसंतराव आणि अभिषेकीबुवांमुळे नावाजले गेले तितकेच त्यातल्या संगीतविचारांमुळेही  !!! संगीताला कसलेही बंधन नसते. त्यांना कसले बंधन असलेच तर ते असते सात स्वरांचे, हे ठामपणे सांगणारे हे नाटक. नायक-नायिका, कौटुंबिक आव्हाने अशा नेहमीच्याच विषयापेक्षा वेगळे काही सांगणाऱ्या चित्रपटांची मी नेहमीच उत्सुकतेणे वाट बघतो. शिवाय नाटकाचे माध्यमांतर हा विषय जितका औत्सुक्याचा तितकाच नाजूक ! त्यामुळे रुपेरी पडद्यावरच्या कट्यारीची मी वाट पाहिली नसती तरच नवल !

मूळ नाटकाच्या गाभ्याशी हा चित्रपट पूर्णपणे प्रामाणिक आहे तरीही काही गोष्टींची मांडणी पूर्ण वेगळी आहे. खांसाहेब ही नाटकात नकारात्मक छटा असणारी परंतु पंडितजींचा प्रचंड आदर करणारी व्यक्तिरेखा इथे संपूर्णपणे नकारात्मक होऊन आलेली आहे त्याउलट नाटकात पंडितजी हे पात्र फक्त लोकांच्या बोलण्यातून उभे राहणारे होते ते इथे मूर्त स्वरुपात - आणि मूर्तिमंत सज्जन स्वरूपात घेण्याचा निर्णय सुबोधने इथे घेतलाय. त्यामुळे पंडितजी विरुद्ध खांसाहेब असा दोन व्यक्तींमधले, वृत्तींमधले, घराण्यांमधले नाट्य अधिक मोठ्या scale वर उभा राहिले आहे. कविराज ही नाटकाच्या 'गद्य' विभागात  बराचसा भाव खाऊन जाणारी भूमिका इथे मर्यादित लांबीची झालेली तर नाटकात भाबडी असणारी सदाशिवची भूमिका इथे अधिक धीट, हिकमती (आणि एका प्रसंगात अतिउत्साहाच्या आणि भावनेच्या भरात स्वतःला संकटात टाकणारी) केली आहे. काही महत्वाची पदे कायम ठेवली आहेत (घेई छंद, लागी करेजवा कटार) तर कव्वाली, सूर निरागस हो ही गाणी नव्याने वाढवलेली आहेत. 'या भवनातील' हे गाणे वगळले आहे आणि त्या ऐवजी त्याच situation मध्ये वेगळे गीत घालण्याची कल्पकता दाखवली आहे.

यातल्या काही वाढवलेल्या गोष्टी खूपच प्रभावी झाल्या आहेत. 'मनमंदिरा' हे गाणे त्यातली परमोच्च गायकी आणि मशालीभोवतीचे तेजःपुंज काजवे यामुळे एका विलक्षण उंचीवर पोचते. आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे दरबारातल्या प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी इंग्रज अधिकाऱ्याचे तिथे उपस्थित असणे. खांसाहेब आणि पंडितजी यांच्या मध्ये पध्दतशीरपणे वितुष्ट आणून 'फोडा आणि झोडा' हे धोरण राबवणे, राजाचे स्वतःचे संस्थान असले तरीही अंतिम नियंत्रण साहेबाचेच या गोष्टी सूचकपणे फार छान आल्या आहेत. कट्यारीवरचे सात स्वर आणि त्याबद्दलचे सुरुवातीचे कट्यारीचे मनोगत ही गोष्ट सुद्धा चित्रपट संगीताकडे, स्वरांकडे किती गांभीर्याने बघतोय याचीच साक्ष देणारी.

चित्रपटामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळाच्या बदलत्या पावलांची दखल घेतली आहे हे मला फार आवडले. विज्ञानाच्या प्रगतीमुळे गायकीच्या, संगीताच्या रेकॉर्ड्स निघणे.. असे काही अस्तित्वात असते याचीच कल्पना नसलेल्या सदाशिवने हरखून जात त्या ऐकत ऐकतच एकलव्याप्रमाणे दुरूनच पंडितजींच्या आवाजाचा अभ्यास करणे आणि शेवटाकडे येताना पंडितजींच्या आवाजातल्या रेकॉर्ड्स पायाखाली चिरडून खांसाहेबांनी सदशिवच्या भावनांचा आणि अप्रत्यक्षपणे पंडितजींचाच अपमान करत अधिकच छोटे होत जाणे या गोष्टींचे प्रयोजन अगदी चपखल ! शिवाय रेकॉर्ड ऐकून 'आपण अगदी पंडितजींच्या स्वरातच गात  आहोत' हे कळल्यावर 'हुबेहूब पंडितजी होणे हे गौरवास्पद नाही कारण ती फक्त एक नक्कल झाली. अशाने त्या सुरांचे स्वतःच्या चिंतनातून प्रकटन करण्यात आपण अपयशी पडत आहोत' याची जाणीव सदाशिवला होणे हा चित्रपटातून मांडला गेलेला अतिशय महत्वाचा संगीतविचार !

मूळ नाटकात बरीच मोठी भर घालून हा सिनेमा साकारलेला असला तरी कुठेही 'पाणी घालून' वाढवल्याची भावना मला आली नाही. त्यामुळेच अजिबातच कंटाळवाणा झाला नाही. उलट इतके काही दाखवूनसुद्धा अजून काही गोष्टी दाखवायला हव्या होत्या असेच वाटले. 'कट्यार' १५ मिनिटे जास्त (आणि मुंपुमु-२ १५ मिनिटे कमी !! ) असता तर बरे झाले असते असे मला वाटत राहिले.

अर्थातच चित्रपटात बऱ्याच गोष्टी खटकल्यादेखील. मुळात नाटकातली आवडलेली गोष्ट म्हणजे खांसाहेब या पात्राच्या 'ग्रे शेड्स'. त्यांच्या मनामध्ये मध्ये एक अहंभाव असला, पंडितजींच्या प्रती एक ईर्ष्या असली तरी त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल आणि गायकीबद्दल अतिशय आदर देखील आहे. उस्मान आणि चांद जेव्हा पंडितजींच्या कृष्णाच्या मूर्तीचा अपमान करू पाहतात तेव्हा ते त्यांचे कान उपटतात, तसेच वेळोवेळी पंडितजींच्या सुरांबद्द्ल आदरही व्यक्त करतात. इथे चित्रपटात खांसाहेब पूर्णपणे खलपुरूष झाले आहेत. (पंडितजीविरुद्ध कारस्थान केल्याबद्दल बायकोला तलाक देतात तोच त्यातल्यात्यात त्यांना उजळ करणारा भाग). अर्थात ते तसे का आहेत याचे सुबोधने मुलाखतीत स्पष्टीकरण देखील दिले होते. त्याच्या मते "मूळ नाटकात खांसाहेब ग्रे शेड मधले आणि सदाशिव सच्चा आणि भाबडा असा थोडा विचित्र सामना होता पण इथे पंडितजी पूर्णपणे धवल, खांसाहेब पूर्णपाणे खल आणि त्यांच्या मधोमध सदाशिव सच्चा असला तरी भाबडा नाही , उलट थोडा उतावीळच ... अशा प्रकारचा संपूर्ण रेंज मधला संघर्ष दाखवायचा होता". सुबोधच्या बाजूने स्पष्टीकरण चोख असले तरी मला मनापासून वाटते की खांसाहेब ग्रे शेड मध्ये दाखवल्याने कथानकाला जास्त खोली आली असती. खांसाहेबांच्या व्यक्तिमत्वातली द्वेषभावना फारच प्रकर्षाने आणि सदोदित दाखवत राहिल्यामुळे त्यांचे सुरांवर असणारे प्रेम, घराण्याच्या गायकीशी असणारी बांधिलकी दाखवण्यात चित्रपट कमी पडला आहे असे वाटले. (अधूनमधून खांसाहेब आपल्या घराण्याच्या गायकीची महत्ता संवादातून सांगतात खरे पण तेवढे अपुरे आहे ). पंडितजींच्या घरी जाताना बुरख्यात जाणारी झरीना सदाशिव समोर येताना बिनधास्त बुरखा - परदा वगैरे प्रकार न करता येते हेही न पचणारे... याशिवाय केवळ बायकांच्याच लक्षात येऊ शकते अशी चूक बायकोनेच दाखवल्यामुळे लक्षात आली. संपूर्ण चित्रपट मराठी वातावरणात घडत असताना पंडितजींची मुलगीच फक्त गुजराती साडीत  दिसते काय माहित.

चित्रपटात पंडितजींची पूर्वपीठिका विस्ताराने दाखवल्यामुळे काही tracks, पात्रे यांच्यावर फारच अन्याय झालाय. (अर्थात कुठेतरी कात्री लागणे अटळ होते हे अगदी मान्य). कविराजाचे पात्र नाटकात काही महत्वाचे भाष्य करते. त्यातले 'कला आणि विद्या यातला फरक' हे भाष्य वगळता चित्रपटात काहीच येत नसल्यामुळे हे पात्र किती हुशार आणि विचारी आहे हे समोर येत नाही आणि त्यामुळे उलट 'कला आणि विद्या' वरचे भाष्य करतानाचा संवाद हा चपखलपणे बसल्यासारखा किंवा 'फ्लो'मध्ये आल्यासारखा वाटत नाही. असो. मूळ नाटकात  चांद आणि उस्मान यांची उठ्वळासारखी संगीत साधना त्यामुळे 'आपल्याच घरात संगीतसाधनेला दुय्यम महत्व मिळते आहे, त्यावर मेहनत अजिबात घेतली जात नाही' याची खांसाहेबांना असणारी वेदना - जी त्यांची अढळ संगीतश्रद्धा दाखवते - चित्रपटात येऊ शकलेली नाही. चित्रपटात झालेल्या कथानकविस्ताराचा सर्वात मोठा तोटा जाणवला तो म्हणजे चित्रपटात अगदीच गैरहजर असलेला 'ठहराव' - pauses. अडीच तासात बरेच काही सांगायचे असल्यामुळे चित्रकर्त्यांना यावर विचार करणे शक्य झाले नसावे. पण सगळे काही पूर्वी ठरल्यासारखे घडत आहे असा फील येऊ द्यायचा नसेल तर हा ठहराव/ स्तब्धता / pause कोणत्याही नाटकात  संवादांमधून आणि चित्रपटात कॅमेऱ्याच्या किंचितश्या विसाव्यामधून यायला हवा. किमान अशा संगीतविचाराच्या कलाकृतीमधून तर यायला'च' हवा. (ही उणीव खूप वेळेला मला जाणवते. अवांतर सांगायचे तर मध्यंतरी पाहिलेल्या मिस्टर and मिसेस या चांगल्या नाटकात देखील ती अतिशय प्रकर्षाने जाणवली होती).

चित्रपटाचे संगीत आणि अभिनय हे एका स्वतंत्र लेखाचे विषय ठरावेत. मुळात कट्यारच्या संगीतासाठी  शंकरला घेणे हाच एक मोठा सिक्सर आहे.खऱ्या अर्थाने 'musical' ही संकल्पना इथे चपखल बसेल ! आपले ९९% चित्रपट कथानकात काडीची गरज नसताना अत्यंत अनावश्यकपणे गाणी घुसवून बनवलेले असतात. आपल्या इथली संगीत नाटकेही लोकांना गाणी ऐकायला मिळवीत अशा हेतूने त्यांच्याभोवती कृत्रिम संवाद आणि फारशी पटापट पुढे न सरकणारी कथा यांचे वेष्टण गुंडाळून दिलेली असत. पण कट्यार मध्ये एकही गाणे अनावश्यक नाही आणि एकही गाणे पाल्हाळ लावणारे नाही. चित्रपट बांधून ठेवतो त्याचे सर्वात मुख्य कारण माझ्यामते हे आहे. 'कट्यार' मध्ये नव्या जुन्याचे उत्तम मिश्रण आहेच पण वसंतरावांच्या स्वरांमधले मूळ गाणे ('लागी करेजवा कटार' की 'घेई छंद' हे आत्ता नक्की आठवत नाहीये) चित्रपटात पार्श्वभूमीवर ऐकू येणे या कल्पनेचे कौतुक करायला हवे.  मला अत्यंत आवडलेले गाणे म्हणजे 'मनमंदिरा' या गाण्याच्या दोन्हीही आवृत्या - शंकरच्या गाण्यावर त्याच्या मुलाने गायलेले गाणे म्हणजे श्रीखंडाच्या जेवणानंतर खाल्लेले मघई मसाला पानच जणू. कव्वालीसुद्धा मस्तच.

खरेतर शंकरला महत्वाच्या भूमिकेत पाहून मला थोडी शंकाच वाटली होती. पण त्याने खटकणार नाही इतपत प्रामाणिक अभिनय केलाय याचे श्रेय नक्कीच सुबोधला जाते. पुष्कर श्रोत्री मला ट्रेलरमध्ये त्याची अशक्य वाईट मिशी आणि अकबराच्या दरबारातल्या काविसारखी वेशभूषा तेव्हापासूनच हास्यास्पद वाटला होता ... त्यात पुन्हा पटकथेमध्ये त्याला अगदी कमी वाव ! त्यामुळे त्याचा प्रभाव शून्य !! मृण्मयी देशपांडेचा  'पुरुषोत्तम'च्या 'पोपटी चौकट'मधला अभिनय (आणि दिग्दर्शन !) आणि टीव्हीवरच्या पहिल्याच भूमिकेतला (अग्निहोत्र) तिचा कॉन्फिडन्स पाहिला होता तेव्हाच तिचे नाणे किती खणखणीत आहे याची जाणीव झाली होती. ते नाणे इथल्या मर्यादित वाव असणाऱ्या भूमिकेत चांगले वाजले आहे. सुखद धक्का आहे तो अमृता खानविलकरचा !! यापूर्वीच्या भूमिकांमध्ये ती बर्यापैकी सहजपणे वावरली असली तरी ती काही वीणा जामकर किंवा स्मिता तांबेसारखी ताकदीची अभिनेत्री कधीच नव्हती ! झरीना ही तिच्या कारकिर्दीतली निःसंशय सर्वात महत्वाची भूमिका आहे आणि ती तिने भूमिकेचा आब राखून फारच छान उभी केलेली आहे. सुबोध भावेचा अभिनय नेहमीच जबरदस्त असतो त्यामुळे त्याबद्दल अधिक काहीच लिहित नाही. आता राहता राहिले महागुरू ! त्याबद्दल मी माझ्या फेसबुक पोस्ट वर आधी लिहिलेच होते - तेच पुन्हा लिहितो. हजारो साशंकांच्या काळज्या दूर सारत सचिनने खांसाहेबांच्या मनातला द्वेष, घालमेल, तुसडेपणा अतिशय समर्थपणे प्रकट केला आहे. शेवटच्या प्रसंगातले त्याचे हावभाव खरंच बघण्यासारखे आहे. इथले खांसाहेब नाटकापेक्षा 'लाऊड' नक्कीच आहेत. पण ती भूमिका लिहिलीच तशी गेलेली असल्यामुळे सचिनचे 'लाऊड' हालचालीदेखील फारसे खटकत नाहीत. फक्त गातानाचे त्याचे हातवारे हे शास्त्रीय गायकापेक्षा प्रेक्षकांच्या टाळ्यांकडे एक डोळा असणाऱ्या एका परफॉर्मरचे जास्त वाटतात. उलट सुबोधने कव्वालीध्ये केलेले हातवारे (त्यातले बरेचसे राहुल देशपांडेचे अचूक निरीक्षण करून तसेच वठवलेले असल्यामुळे असतील) मला अगदी एखाद्या पट्टीच्या गायकासारखे वाटले.

बरेचसे चांगले चित्रपट opening sequence मध्येच तुम्हाला बांधून घेतात, तुमचे लक्ष वेधून घेतात. कट्यारमध्ये तर पहिल्या प्रसंगाची/गीताची सुरुवात होण्याअगोदरच दोन-तीन गोष्टी विशेष लक्ष वेधून गेल्या. पहिली : बऱ्याचशा मराठी चित्रपटांची सुरुवात (त्यातून तो शहरी चित्रपट असेलच तर अगदी नेहमीच) इंग्लिश टायटल्सनीच सुरु करण्याची संतापजनक प्रथा आता पडलेली असताना इथे साधी स्वच्छ देवनागरीतली टायटल्स दिसू लागतात. दुसरी : इथे मूळ कट्यारशी संबंधित यच्चयावत कलावंत, लेखक, संगीतकार इत्यादी मंडळींची केवळ श्रेयनामावलीच दिसत नाही तर त्या सर्वांना अभिवादन देखील केलेले आहे. तिसरी गोष्ट : टायटल्स संपताना  येणारी अक्षरे - दिग्दर्शक : सुबोध भावे... (दिग्दर्शनातली पहिली इनिंग असूनही) कुठल्याही  चमकोगिरी  करत पडद्यावर मोठ्या font मध्ये आदळत नाहीत. सहजगत्या उमटून जातात. ही  दुसरी आणि तिसरी गोष्ट अगदी या चित्रपटाबद्दलची सुबोधची 'इदं न मम' वृत्ती दाखवणारीच. ती होती म्हणूनच चित्रपट जमून आलाय आणि प्रचंड उत्साहात प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतलाय !

Saturday, April 11, 2015

Long Shot : राजू परुळेकर

कोणत्याही व्यक्तीबाबत वाटणाऱ्या आदराची जी एकके असतात त्यापैकी 'पुस्तक' हे माझ्यासाठी फार महत्वाचे एकक अहे. म्हणजे असे की एका क्ष व्यक्तीकडे अमुक हजार पुस्तके - आणि तीही विविध विषयांवरची - आहेत असे ऐकले की त्या व्यक्तीबद्दलचा मला वाटणारा आदर एकदम दुणावतो- मग ती व्यक्ती कोणत्याही विचारसरणीची का असेना. तिचे विचार निदान अर्धवट ऐकलेल्या गोष्टींवरून तरी पोसलेले नाही याची खात्री वाटते.  राजू परुळेकरबद्दल तसेच झाले. खरेतर त्याच्याबद्दल आधीही कुतूहल बरेच होते. कारण ई-टीव्ही वर दररोज - अगदी रविवारीही - सकाळी ८ वाजता 'संवाद' या कार्यक्रमातून तो मान्यवरांची मुलाखत घ्यायचा. तो खरोखरच संवाद असायचा. बोलण्यात मार्दव असायचे. समोरच्याला कचाकचा चावत सुटायचा त्याचा खाक्या नसायचा. सुधीर गाडगीळ यांच्या इतका दिलखुलास नसेलही पण समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलते करण्याचा प्रयत्न दिसून यायचा. कार्यक्रमात आलेले मान्यवर खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले असायचे. साहित्य, कला, राजकारण, क्रीडा, समाजसेवा, आरोग्य… अगदी सग्गळ्या क्षेत्रातले. बर येणारे सगळे त्या-त्या क्षेत्रातले दिग्गज असले तरी त्यातले अनेक जण प्रकाशझोताबाहेर असल्यामुळे आपल्याला माहीतही नसायचे.  अश्या सगळ्यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने राजू परुळेकर सर्वांसमक्ष घेऊन यायचा. आता एवढा मोठा आवाका असणाऱ्या कार्यक्रमाच्या संवादकाचे वाचन आणि विषयाची तयारी केवढी प्रचंड असेल ! ! त्यामुळे साहजिकच आदरमिश्रित कुतूहल तेव्हापासूनच होते.


यादरम्यानच 'सामना' च्या रविवारच्या पुरवणीमध्ये पुस्तकप्रेमी मान्यवरांवरच्या एका सदरामध्ये राजू परुळेकरकडच्या पुस्तकांची संख्या 5 आकडी नमूद केल्याचे आठवते. तेव्हापासून त्याच्याबद्दलचा आदर प्रचंडच वाढला. त्यानंतरही 'संवाद' काही वर्षे सुरु होता. हजारेक भाग तर नक्की पूर्ण झाले असतील. त्यासोबतच 'सामना' मध्ये त्याचे 'क्लोज शॉट' नावाचे सदर सुरु झाले होते, ज्यात प्रख्यात व्यक्तींची शब्दचित्रे रेखाटलेली असायची. (मला आठवते की त्याने पहिल्याच दिवशी 'आपण सदराचे नाव 'क्लोज अप' न ठेवता 'क्लोज शॉट' का ठेवले' याबद्दलही तांत्रिक फरकासह कीस पडला होता). सदर वाचताना लक्षात आले की यातल्या बहुतेकांशी याची वैयक्तिक ओळख आहे.  त्याच्या लिखाणात येणाऱ्या संदर्भावरून त्याच्या वयाचा अंदाज बांधला तर पस्तिशीच्या अलीकडच्या वयामध्ये त्याचे इतक्या मोठमोठ्या व्यक्तींशी ओळख असणे हे अचंबित करणारे होते.  वाचताना त्याची ठाम मतेही लक्षात यायची. काहीवेळा एखाद्याबद्दल काढलेले उद्गार अजिबातच आवडायचे नाहीत - कारण ते विनाकारण ओढून ताणून आणलेले असायचे (त्याची ही सवय पुढेही चालू राहिली)  उदा. लतादीदींवरच्या लेखाचा शेवट साधारण अश्या अर्थाचा होता "लतादीदी प्रत्यक्ष भेटल्या तर मी त्यांना विचारणार आहे - वाजपेयींच्या कविता तुम्ही गाव्यात अश्या (योग्यतेच्या?) नाहीत हे तुमच्या लक्षात कसे नाही आले" (संदर्भ : तेव्हा नुकताच लतादीदींनी गायलेला वाजपेयींच्या कवितांचा यश चोप्रा प्रस्तुत एक अल्बम आला होता - ज्याच्या व्हिडीओ मध्ये शाहरुख होता). मला कळेचना की त्याचे हे असे मत का बनले होते आणि दुसरे असे की एवढ्या शेकडो गोष्टी विचारण्यासारख्या असताना इतका आचरट प्रश्न विचारण्याची त्याला इच्छा का होती ? वाजपेयींवरच्या क्लोज शॉट मध्येही त्याने त्यांच्या बद्दल फार बरे लिहिल्याचे स्मरत नाही. 

राजू परुळेकरचे सामना व्यतिरिक्त कुठेही लिहिल्याचे मला वाचनात आले नव्हते मग पत्रकार म्हणून हा एवढा प्रसिद्ध आणि अनेकांच्या बैठकीतला कसा याही बद्दल कुतूहल होते. पुढे हे सदर चालू असतानाच ई-टीव्हीचा 'महानेता' हा पुरस्कार बाळासाहेबांना जाहीर झाल्यावरचे 'क्लोज शॉट' वाचून मी थोडासा नाराजच झालो होतो.  त्याने फक्त 'बाळासाहेब किती भारी' अश्या प्रकारचेच लिहिले होते .  आत्तापर्यंतचे त्याचे लिखाण पाहता सारखे वाटत होते की याने वस्तुनिष्ठ मूल्यमापन केलेले नाही. सामनामध्ये लिहित असल्यामुळे अर्थातच त्याच्या लिखाणावर मर्यादा (दबाव?) असणार. माझा हा अंदाज खरा ठरला. पुढे लोकसत्तामध्ये कुठल्याश्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्याने शिवसेनेबद्दल परखड मते व्यक्त केली होती.

नारायण राणे शिवसेनेबाहेर पडल्यानंतरची सिंधूदुर्ग जिल्ह्यातली निडणूक राणे आणि शिवसेना दोघांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. ती सगळी 'सामना' साठी राजू परुळेकर cover करत होता. तो 'पत्रकार' आहे, केवळ संवादक आणि सदरलेखक नाही हे दाखवून देणारा माझ्यासाठीचा पहिला पुरावा. निव्वळ एक पत्रकार म्हणून नव्हे तर 'मातोश्री' च्या अगदी जवळचा विश्वासू म्हणून ही निडणूक त्याने cover केली होती. (तो ठाकरे कुटुंबाच्या अगदी जवळचा माणूस म्हणून त्याने दिलेले सगळ्यात मोठे contribution म्हणजे 'बाळासाहेब ठाकरे - A photobiography' या देखण्या पुस्तकाचे राज ठाकरेच्या खांद्याला खांदा लावून केलेले संपादन). या निवडणुकीदरम्यानच काही फासे विपरीत पडायला सुरुवात झाली. 'पाठदुखी'मुळे राजचे प्रचार दौरा चुकवणे आणि मग एकूणच शिवसेनानेतृत्वाबद्दलची नाराजी सर्वांसमोर यायला लागली. पहिल्यापासूनच राजच्या जवळच्या असणाऱ्या राजूचा कल या सर्व प्रकारात हळूहळू मराठीबद्दल ठाम असणाऱ्या राजकडे झुकत चालला होता.  दिल्लीदरबारी मराठीला असणारी वागणूक वगैरे मराठीच्या संदर्भाने येणारी मते राजूने मनसेच्या स्थापनेपूर्वी बरीच आधी आपल्या लिखाणातून मांडली होती. त्यामुळे दोघांना जोडणारा हाही एक धागा असावा.

एकीकडे राजकडे झुकत चालल्यामुळे दुसरीकडे बाळासाहेब, उद्धव यांच्याशी संबंध ताणले जाऊ लागले होते तरीही अगदी संपले किंवा तुटले नव्हते. संजय राऊतसोबतची जुनी दोस्ती मात्र टिकून होती.  राजची नाराजी अधिकाधिक तीव्र होऊ लागली त्याच सुमारास शिवसेनेतल्या राजसमर्थकांनी संजय राऊत यांच्या गाडीवर हल्ला केला होता आणि प्रचंड शिवीगाळ आणि घोषणाबाजी केली होती. राजू परुळेकरचे घर घेण्यामध्ये संजय राऊतकडून मित्रत्वाच्या नात्याने खूप मदत झाली होती आणि तेच काम करून येत असताना हा राडा झाला होता. ती अतिशय महत्वाची घटना घडत असताना त्या कारमध्ये राजू परुळेकर उपस्थित होता. पुढे पुढे त्याच्याच लिखाणातून लक्षात येत गेले की अनेक महत्वाच्या घटना,  समेट, सेटिंग घडत असताना राजू परुळेकर तिथे - साक्षीदार या नात्याने म्हणा, मध्यस्थ या नात्याने म्हणा - उपस्थित होता. या सगळ्या संदर्भांमुळे राजू परुळेकरबद्दल वाटणारे माझे कुतूहल वाढतच गेले. अर्थात या गाळलेल्या अनेक जागा नंतर नंतर त्याच्याच लिखाणातून भारत गेल्या. प्रत्यक्षात त्या घडत असताना अर्थातच त्या मला माहित नव्हत्या. माझे लक्ष त्याच्या लिखाणावर होते. त्याची काही मते डाचायची. स्वतःला सर्वज्ञानी समजण्याचा सूर जाणवायचा. पण ओव्हरऑल आदर मात्र तितकाच होता.

पुढे सामनामधले लिखाण थांबले आणि नंतर मध्ये बराच काळ त्याचे काहीच वाचनात आले नाही. आणि मग लोकप्रभामध्ये त्याचे लिखाण सुरु झाले. सदराचे नाव बहुदा अल्केमिस्ट्री असावे. तेव्हापासून मात्र राजू परुळेकरबद्दल असणारी माझी मते बदलायला सुरुवात झाली. 'सचिन तेंडुलकर हे जनतेचे लक्ष महत्वाच्या गोष्टींकडून divert  व्हावे म्हणून सत्ताधार्यांनी दिलेले इंजक्शन आहे' अशा अर्थाचे काही लिहिले होते. तेही त्याचे मत म्हणून मी स्वीकारले असते पण खेळाडू म्हणूनही त्याने सचिनला क्रेडिट दिल्याचेही आठवत नाही. त्याची विशिष्ट आणि ठाम मते आधीपासून जाणवायचीच पण ती आता जास्त दुराग्रही वाटायला लागली. एकीकडे दिवाळी अंकातल्या लेखातून तो स्वतःबद्दलचे तपशील मोकळेपणाने देत होता पण त्याच बरोबर "मी असत्याला फाट्यावर मारतो" वगैरेसुद्धा तो लिहायचा. इतक्या लोकांच्या आतल्या गोटात असणारा, मध्यस्थी करणारा, अनेकांची गुपिते बाहेर न आणणारा पत्रकार सत्यवादी कसा हे मला कळेना.   "मी चमत्कार करतो किंवा मी देवाचा अवतार आहे" असे स्वतःच म्हणणारा बुवा-बाबा आणि "मी कसा कधीही सत्याची कास न सोडणारा आहे" असे स्वतःहूनच ढोल पिटणारा पत्रकार हे मला एकाच लेव्हलचे वाटतात. राजू परुळेकरच्या लिखाणात हा सूर जाणवायचा. त्याची मते बेछूट व्हायला लागली.  हळूहळू त्याच्याबद्दलचा आदर कमी व्हायला लागला.  यापेक्षा अधिक धोकादायक प्रकार म्हणजे 'मला इतरांपेक्षा कसे जास्त कळते' हे लिखाणातून जाणवून देणे.….  तशीही मुळातच पत्रकारांमध्ये आत्मविश्वास आणि माज यांच्यातली सीमारेषा पुसटच असते. राजू परुळेकरच्या लोकप्रभामधल्या नंतरनंतरच्या लिखाणात ती नाहीशीच झाल्यासारखी वाटायला लागली. याचे उत्कृष्ट (खरेतर निकृष्ट) उदाहरण कुणाला पहायचे असेल तर ते म्हणजे जैतापूर प्रकल्पावरचा लेख. राजू परुळेकरचे मत प्रकल्पाविरोधातले होते. अगदी मान्य ! लोकशाही आहे, त्याचा अधिकार आहे.  स्थानिकांच्या विरोधाची बाजू  मांडतोय.… हरकत नाही ! तो प्रकल्पातल्या तृटी दाखवतो आहे … स्वागत आहे !!  पण कुठे थांबावे हे याला कळले नाही… हा त्याच्या पुढे गेला. 'प्रकल्प व्हावा' या बाजूने असणाऱ्या अणुऊर्जा तज्ञ अनिल काकोडकर यांची त्याने अशी काही अक्कल काढली की कोणाही सुज्ञ माणसाचे डोकेच सटकेल. म्हणजे काहीही पार्श्वभूमी माहित नसणाऱ्याने जर लेख वाचला तर त्याला वाटेल की राजू परुळेकर हा अणुउर्जेवरचा जागतिक तज्ञ आहे आणि काकोडकर म्हणजे guides वाचून काठावर पास झालेला विद्यार्थी आहे.  दुर्दैवाने मला लेख केव्हाचा होता एव्हढेच काय त्या सदराचे नाव काय होते हेही आठवत नाही. पण एव्हढे नक्की आठवते की त्या लेखाला पुढच्या अंकात एक खरमरीत उत्तर आले होते.  असो. थोडक्यात काय तर राजू परुळेकरचा तो लेख म्हणजे माझ्यासाठी कडेलोट होता. या माणसाला सिरिअसली घेण्यात अर्थ नाही हे मला कळून चुकले.

त्यानंतर त्याचे लिखाण मी अपवादानेच वाचले. तरीही अधून मधून काही काही गोष्टी कानावर पडायच्या. बरेच फासे उलटे पडत गेले असावेत.  अण्णांच्या आंदोलनाच्याआसपास तो त्यांचा ब्लॉग लिहायचा. त्यावरूनही मतभेद झाल्याने त्याचे त्यांच्याशी संबंध दुरावले. तपशील माहित नाही पण राजशीही पूर्वीसारखे संबंध राहिले नाहीत. उद्धवशी तर राजने मनसे काढली तेव्हाच फाटले होते. बरेच लोक दुरावले. कदाचित राजू परुळेकर स्वतःच म्हणायचा त्याप्रमाणे त्याला खरोखरच सत्याची किंमत मोजावी लागली असेल. मधल्या काळात तो प्रचंड नैराश्यात होता असेही ऐकले होते. खरे असेल किंवा नसेलही. मला वाईट वाटायला हवे होते. पण काहीच नाही वाटले. एकेक फेज असते काही वाटण्याची. आधी खूप आदर होता. नंतर मतभेद जाणवले. मग संताप संताप झाला. मग काहीच न वाटण्याची फेज आली. 'Who cares ?' mode... बस्स !

पण मग असे असताना मला त्याच्यावर लिहावेसे का वाटले ? माहित नाही. खरेतर हा लेख लिहिताना माझे मला आश्चर्य वाटते आहे. त्याच्याबद्दल एवढा तपशील माझ्या लक्षात कसा आहे? काय माहित. माझ्याकडे उत्तर नाही. माझ्याही नकळत मी त्याला फार तपशीलाने फॉलो केले आहे हे नक्की आणि त्यातूनच (प्रामुख्याने त्याने स्वतःवर केलेल्या लिखाणाच्या आधारे) हे सगळे माझ्या बोटांमधून उतरले आहे.

सध्या त्याच्या आयुष्यात तो लिहित असलेल्या ब्लॉग व्यतिरिक्त काय चालले आहे कल्पना नाही आणि तो ब्लॉग वाचण्याची मी तसदीही घेत नाही. त्याच्याच लिखाणातल्या अहंमन्य सुरामुळे त्याने त्याचा चाहता गमावला आहे. अर्थात माझ्या या लेखालादेखील त्याच्याच क्लोज शॉट या संकल्पनेशी संबंधित 'लॉंग शॉट' हे नाव द्यायचे डोक्यात आले हेही खरेच. कधिकाळी त्याच्याबद्दल वाटणाऱ्या आदरालाच नकळत दिलेला हा ट्रिब्यूट असेल का ?

Saturday, March 21, 2015

खिडकीतून भेटलेले आनंद मोडक


आपल्या बहुतांश आवडीच्या गोष्टी या सुरुवातीला कुठल्याही लेबलशिवाय असतात. म्हणजे अमक्या प्रकारचा पदार्थ, अमक्या प्रकारचे कपडे वगैरे हे आधी आपल्याला नुसतेच आवडायला लागतात पण नंतर त्या आवडत्या गोष्टींमध्ये काहीतरी सामना धागा गवसतो आणि मग आपण त्या धाग्याला धरून कुतूहलाने पुढे शोध घ्यायला सुरुवात करतो. संगीतकार किंवा गायकाचे बहुतांश वेळेस असेच होते. आनंद मोडकांच्या बाबतीत माझे असेच झाले. आधी काही गाणी आवडत गेली. मग लक्षात आले की ‘अरे ! ही तर आनंद मोडक यांची गाणी’. मग लक्ष देऊन त्यांचे नाव शोधायला लागलो. कळत गेले की ९० च्या दशकातल्या (प्रामुख्याने नव्वदीचा उत्तरार्धातल्या) मराठी चित्रपटांमधल्या अंधःकारामध्ये काही थोडके कवडसे होते त्यातला एक कवडसा म्हणजे आनंद मोडक.

त्यांच्याबदल एकुणातच माहिती फार कमी होती. कधी पडद्यावरदेखील दिसायचे नाहीत. त्यांच्या  सुंदर चालींमधून भेटत राहायचे तेवढेच. छोटे शब्द किती मोठे असू शकतात आणि साधी चाल किती साजिरी असू शकते ते कळायचे ‘एक झोका....’ गाण्यामधून ! चालीलाही सुगंध असतो हे जाणवायचे ‘जाई जुईचा गंध मातीला...’ मधून. हळूहळू मिळतील तश्या CDs, गाणी जमवत गेलो. मुक्ता, सरकारनामा, जुन्या कवयित्रींच्या रचनांवर त्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाची ‘शेवंतीचे बन’ पासून ते अलीकडच्या समांतर, मसाला पर्यंत...  इकडे तिकडे मिळणाऱ्या माहितीचे कण टिपत राहिलो. मग कधीतरी काहीतरी ‘Trivia’ गवसल्याचा आनंद मिळायचा. उदा. ए. आर. रेहमान पासून ते कोक स्टुडीओपर्यंत हजेरी लावणारा Clinton Cerejo आनंद मोडकांकडे १५-२० वर्षापूर्वीच गायलाय – मुक्ता मधल्या आफ्रिकन तरुणाच्या तोंडून ! अजय अतुल कोणीही नव्हते तेव्हापासून त्यांना त्यांची क्षमता माहिती होती. विशेषतः गायक म्हणून अजयच्या गळ्याच्या क्षमतेचा त्यांनी आवर्जून उपयोग करून घेतला आहे. तो त्यांच्याकडे फार पूर्वीपासून गात आलाय – अगदी १५-२० वर्षापूर्वीच्या ‘राजू’ पासून ते कालपरवाच्या ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ पर्यंत....

अशातच एके दिवशी कळले की ते फेसबुक वर आहेत. मग लगेच त्यांना add केले. हेतू हाच की त्यांच्या कडून जास्तीत जास्त माहिती मिळवावी. कुतूहल खूप होते, प्रश्न खूप होते ... संवाद साधायची इच्छा होती... बऱ्याचदा ते छान छान गाणी शेअर करायचे. जुन्या हिंदी गाण्यापासून अगदी Papon च्या कोक स्टुडिओ मधल्या कालपरवाच्या गाण्यापर्यंत. एवढेच काय ABBA या इंग्लिश band सह अनेक इंग्रजी गाणी ते आवर्जून शेअर करायचे. काहीतरी विचारले की त्याला अधून अधून प्रतिसाद यायचा.

असाच एक दिवस माझ्यासाठी कायमचाच संस्मरणीय बनला आहे. सहज म्हणून केलेल्या फेसबुक वरच्या pingला त्यांचे उत्तर आले आणि मग त्यांच्याशी गप्पा भरपूर रंगल्या. त्यांच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध असल्याचे मी त्यांना म्हणालो.  तेव्हा त्यांच्याकडून कळले की एका नव्याने येऊ घातलेल्या TV channel वर त्यांच्या गप्पांचा कार्यक्रम असणार आहे आणि त्यातून माझे बरेचसे कुतूहल शमेल. माझी उत्सुकता वाढायला लागली. मग गप्पा मारता मारता मी माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळलो - ते म्हणजे अजय-अतुल !! त्यांचे आनंद मोडक यांच्याशी जुने संबंध. त्यांचा प्रवास, संघर्ष मोडक यांनी जवळून पाहिलेला होता. अजय-अतुलच्या प्रवासाबद्दल ते फारच खूष होते. नुकताच 'अग्निपथ' प्रदर्शित झाला होता आणि त्यातल्या 'शाह का रूतबा' या कव्वालीवर ते निहायत खूष होते. “काय सुंदर गाणे केले आहे दोघांनी” म्हणाले. माझ्यासाठी तर तो क्षण शब्दातीत होता. जीवापाड आवडणाऱ्या एका संगीतकार जोडीबद्दल अतिशय आवडणारा दुसरा संगीतकार भरभरून  दिलखुलासपणे बोलतोय याहून सुखाचा सुंदर क्षण दुसरा कोणता असू शकतो ! २०१३चा माझा २६ जानेवारी अगदीच सार्थक झाला होता !!

या गप्पांशिवाय मी आणखी एका गोष्टीसाठी त्यांच्या मागे लागलो होतो.... कध्धीपासूनच !! जेव्हापासून मी उरूस चित्रपटातले ‘सुगीचा सुटलाय अवखळ वारा’ हे गाणे ऐकले होते मी ठार पागल झालो होतो ... मधुर चालीची अप्रतिम लावणी आणि गायला आशाताई... विषयच संपला !!! मला काहीही करून ते गाणे हवे होते. तेच काय त्यातली सगळीच गाणी सुरेख होती (अजयचेसुद्धा एक गाणे होते) ...चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये म्युझिक रिलीज झाल्याची बातमी वाचल्याचेही आठवत होते. रेड एफ एम सुरु होण्याआधी ९३.५ वर 'एस. एफ. एम' लागायचे तेव्हा लागणाऱ्या निवडक मराठी गाण्यांमध्ये ‘सुटलाय अवखळ वारा...’ ऐकल्याचे लख्ख आठवत होते. पण एवढे असूनही ते गाणे कुठेही उपलब्ध नव्हते. खुद्द आनंद मोडकांचेही म्हणणे होते की ते गाणे रिलीज झालेले नाही. पण मी त्यांना अधून मधून आठवण करून देत होतो. CD कुठे उपलब्ध आहे विचारून झाले. अगदी ‘उरूस’चे दिग्दर्शक शेखर नाईक यांनाही फेसबुक वर गाठायचा प्रयत्न केला. पण प्रतिसाद आला नाही. पुन्हा मोडककाकांना  “तुमच्याकडे असेल तर प्लीज मला द्याल का” विचारले (एव्हाना मी त्यांना काका बनवून टाकले होते)... त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले “त्या गाण्याचे हक्क माझ्याकडे नाहीत. कॉपीराईटचा भंग होऊ शकत असल्याने मी तुला ती देऊ शकत नाही...” चित्रपटाचा निर्माता किंवा तसलेच काहीसे असणारा ‘बाबा शेख ‘ नावाच्या माणसाकडे हक्क असल्याचे सांगितले... माझी चिडचिड झाली. 'काय हरकत आहे द्यायला' असे वाटले. ज्या चित्रपटाविषयीच फार कमी लोकांना माहिती आहे त्यातले एक रत्न बाहेर पडल्याने शेखबाबांचे काय नुकसान होणार होते खुदाच जाणे. पण गाणे बाहेर न आल्याने मोठी उणीव मात्र राहील हे मात्र नक्की...  पण त्याच वेळी मोडक काकांबद्दल कौतुकपण वाटले. जे गाणे बाहेर पडल्यामुळे झाला तर त्यांचा फायदाच होणार होता ते गाणे त्यांनी कायद्याचा मान राखून मला देण्याचे नाकारले होते. मला या गाण्यासोबतच ‘कळत न कळत’ची गाणी पण हवी होती.... अमोल पालेकरांच्या ‘धूसर’मधले अगदी कातर करणारे ‘एक सांज पक्षी...’ (गायक : स्वप्नील बांदोडकर) हे अमेझिंग गाणेसुद्धा हवे होते... गरीबाच्या मागण्या फारच वाढल्या होत्या. मग एके दिवशी त्यांनी मला सांगितले “अमोल पालेकर परदेश दौऱ्यावरून आल्यावर कदाचित म्युझिक रिलीज करतील”. मी आशा सोडली. चित्रपट ऑलरेडी रिलीज झाला होता. इतक्या उशिराने पालेकर जागे व्हायची शक्यता शून्य होती. पण मोडक काकांचे पुढचे म्हणणे असे होते “कळत न कळत रिलीज होऊन २० पेक्षा अधिक वर्षे झाल्यामुळे कॉपी राईटचा प्रश्न येणार नाही. मी तुला ती गाणी देऊ शकतो आणि माझ्याकडे आलास तर येऊन ‘उरूस’ ची गाणी ऐकू शकतोस.” वाः !! देव देतो दोन !!!. ‘उरूस’ची गाणी घेऊन जायला मिळाली नाहीत तरी किमान ७-८ वर्षांच्या gap नंतर पुन्हा ऐकायला मिळत आहेत - तेही त्यांच्या घरी जाऊन - हेही नसे थोडके. ते म्हणाले “आत्ता मी बिझी आहे पण पुढच्या महिन्यात - १० तारखे नंतर तू माझ्याकडे येऊ शकतोस”. ठरलंच तर !! बार उडणार !!

पण वाटले तितके हे सहज घडणार नव्हते. दरम्यानच्या काळात माझ्या लग्नाचा बार आधी उडणार हे निश्चित झाले. साखरपुड्याची गडबड, मग खरेदीची गडबड या कारणांमुळे गाण्यांच्या प्रोग्रॅमला प्राधान्य कमीच मिळाले. त्यात बरेच दिवस लोटले. जरा गडबड आटोपल्यावर मी त्यांच्याशी पुन्हा संपर्क केला. दोन तीनदा ... पण प्रतिसाद आला नाही. दरम्यानच्या काळात एक फार चांगली गोष्ट झाली, ती म्हणजे त्यांचे ‘लोकरंग’ पुरवणी मधले सदर - ‘स्मरणस्वर’. त्यांनी मध्यंतरी सांगितलेला TV प्रोग्रॅम काही उगवला नव्हता पण या सदरामुळे त्यांच्याबद्दल बरेच काही कळू लागले. अगदी पुलंचे ‘तीन पैशाचा तमाशा’, तेंडुलकरांचे  ‘घाशीराम’ यांच्यापासून ते खूप वेगळ्या धाटणीच्या नाटकांशी, संगीताशी जोडलेले राहिले. बेगम बर्वे, महानिर्वाण, पडघम सारख्या नाटकांमधून प्रायोगिकतेशी जुळलेले राहिले. तेव्हा लक्षात आले की हा प्रवासी मळलेल्या वाटेवरचा नाही. त्याची जुन्याशी नाळ जुळलेली आहे पण नव्याचे विलक्षण कौतुक आहे ! हा माणूस आपल्या सदरातून हिंदी चित्रपट संगीतातल्या सुवर्णकाळाच्या आठवणी ताज्या करत होता आणि त्याच पुरवणीतल्या पाश्चिमात्य संगीताची ओळख करून देणाऱ्या आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्चिमा’ सदराला आवर्जून दाद देत होता.  

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये वयाच्या साठाव्या वर्षीपर्यंत नोकरी करणारे आनंद मोडक ते काम सांभाळून अतिशय मोजके पण वेधक संगीत देत राहिले. सर्वसामान्य माणूस साठीनंतर निगुतीने आयुष्य जगू पाहतो. पण आनंद मोडक मात्र सेवानिवृत्त होताच आपल्या आवडत्या उद्योगात प्रचंड बिझी झाले !! त्यांनी संगीत दिलेले चित्रपट डॅम्बिस, मसाला, म्हैस, जय शंकर इ. अगदी एका पाठोपाठ एक धडकू लागले. आता मात्र त्यांची गाठ घेणे आवश्यक होते पण मुहूर्त लागत नव्हता. तशातच कवी सुधीर मोघे गेल्याची बातमी आली. मोडककाका नक्कीच आतून हलले असणार. त्यांची मागे थांबण्याची फारशी तयारी नसावी. अक्षरशः २ महिन्यातच - २३ मे २०१४ ला - ती अशुभ बातमी आली. आदल्या दिवशीचे रवींद्र साठेंसोबतचे ध्वनिमुद्रण आणि त्या दिवशीचा चंद्रकांत काळेंसोबतचा प्रस्तावित जाहीर कार्यक्रम यामधल्या काळात आनंद मोडक रंगल्या मैफलीतून निघून गेले... सुहृद सुधीर मोघेंना भेटायला !! सुन्न व्हायला झाले. ‘सुगीचा अवखळ वारा...’ मिळवण्याची - किमानपक्षी पुन्हा ऐकण्याची - आता सुतराम शक्यता उरली नव्हती. भविष्यात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या सुंदर चालींशी भेट होण्याची शक्यता कोमेजून गेली होती. chat window मधून भेटणारे, 'स्मरण-स्वर'च्या छोट्या खिडकीतून दिसणारे आनंद मोडक प्रत्यक्षात भेटण्यापूर्वीच पलीकडूनच निघून गेले होते.... पुरवणी मधल्या सदरातून केलेले लिखाण ताजे असतानाच सुधीर मोघेसुद्धा असेच निघून गेले होते आणि जगदीश खेबुडकर तर सदर चालू असतानाच भरल्या ताटावरूनच उठून गेले होते. आपण कितीही योजना आखत बसलो तरी ‘तो’ येऊन रांगोळी कधी फिस्कटून टाकेल याचा नेम नसतो हेच खरे ......  

कट टू - ४-५ महिन्यानंतरचा एक शनिवार
‘रमा-माधव’ बघायला ‘प्रभात’ला गेलो होतो.... देखण्या चित्रचौकटी लक्ष वेधून घेत होत्या आणि त्यातूनच काही अक्षरे पडद्यावर एकापाठोपाठ एक उमटली – अगदी अटळपणे ... गीत : सुधीर मोघे, संगीत : आनंद मोडक