सागरप्रवास हा माणसाच्या स्थलांतराच्या
इतिहासातला खूप महत्वाचा टप्पा. मध्ययुगीन कालखंडात सत्तेच्या, पैशाच्या महत्वाकांक्षेतून आणि साहसाच्या खुमखुमीतून युरोपियन देशांमध्ये
आरमार उभे करून सातासमुद्रापार जायची आणि नवनवे प्रदेश पादाक्रांत करायची स्पर्धाच
लागली होती. शिडाची नाव/जहाज हा अशा प्रवासांचा
कणा असे. वेळ, दिवस, ऋतू यानुसार रंग बदलणाऱ्या वाऱ्यांच्या साहाय्याने प्रतिकूल हवामानाला
तोंड देत या दर्यावर्द्यांनी अत्यंत बेभरवशाचे सागरप्रवास पार पाडले. पुढे
दळणवळणाची, संपर्काची साधनं प्रगत होत गेली आणि सागरप्रवास सुकर होत
गेला, तरीही शिडाच्या नावेतून सागरप्रवास करण्याचं
आकर्षण काही कमी झालं नाही. अशा नावेतून थेट पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचं धाडस ही
त्याचीच परिणती. फर्डिनांड मॅगेलन आणि ख्रिस्तोफर कोलंबसच्या काळच्या आणि आजच्या
शिडाच्या नावांमध्ये प्रचंड फरक असला तरी आजही समुद्र तोच आहे, हवामान तितकंच बेभरवशाचं आहे. तुमच्या हाताशी नानाविध साधनं असली तरी
उधाणलेल्या समुद्रावर स्वार होऊन पुढे जाण्यासाठी आजही तितकंच कौशल्य आवश्यक आहे.
यामुळेच एकविसाव्या शतकातही असं धाडस कुणी करायला गेलं तर त्याचं जगाला अप्रूप
वाटतंच. दिलीप दोंदे यांनी हे धाडस केलं आणि शिडाच्या नावेतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिलेच भारतीय ठरले!
त्यांच्या कामगिरीची रोचक कहाणी
म्हणजे म्हणजेच त्यांनी लिहिलेलं पुस्तक 'The First Indian'.
या विलक्षण कामगिरीची
सुरुवात होण्यामागे प्रेरणा होती ती व्हाईस ॲडमिरल मनोहर आवटी यांची. 'भारतीय व्यक्तीची शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा' हे त्यांनी उराशी बाळगलेलं स्वप्न होतं, ते भारतीय
नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी साकार केलं. दिलीप दोंदे यांना आपल्या कामाचा भाग म्हणून नौदलाच्या
बोटीवर काम करण्याचा अनुभव होता, परंतु याट (Yacht) मधून
नौकाविहार करण्याचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता, तरीही त्यांनी आव्हान स्वीकारलं.
मोहिमेचे तीन टप्पे
या प्रकल्पासाठी दोंदे
यांना नौदलाच्या
परवानगीपासून अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागली आणि भारतीय नोकरशाही काय
चीज आहे याची खऱ्या अर्थाने जाणीव होऊ लागली. समुद्रातल्या दिव्यातून पार
पडण्यापूर्वी लालफितीच्या दिव्यातून पार पाडण्यासाठी काय काय करावे लागले याचे
तपशील पुस्तकाच्या पूर्वार्धात विस्ताराने मांडले आहेत. पुस्तकाचा हा भाग अतिशय
उत्तम प्रकारे जमून आलेला आहे.
'आपल्या देशातच बनलेली नौका या प्रवासासाठी वापरली जावी' असा नौदलाचा आग्रह होता. पृथ्वीप्रदक्षिणेच्या या मोहिमेत एक खूप मोठं
आव्हान होतं ते म्हणजे नौकाबांधणीचं. भारतात हौशी नौकानयन हा प्रकार मुळातच इतका
कमी आहे, की स्वाभाविकपणे त्यासाठी लागणाऱ्या
नौकेच्या बांधणीबद्दलही अतिशय थोडी माहिती भारतातल्या कंपन्यांना आहे. अशा
परिस्थितीत गोव्याच्या नौकाबांधणी कंपनीचे प्रमुख श्री. रत्नाकर यांनी स्वतःदेखील
नौकाबांधणीच्या या संधीकडे एक आव्हान म्हणून पाहिलं. देशविदेशांतून कच्चा माल मिळवणं, त्यामध्ये ऐनवेळी काही समस्या असल्याचे निदर्शनास आल्यावर आपले संपूर्ण
व्यावसायिक ज्ञान, अनुभव यांचा वापर करून चट्कन दुसरे पर्याय शोधणं, 'डेडलाईन्स'चे संपूर्ण भान राखत सर्व अडचणींवर मात करत दिलीप दोंदे आणि रत्नाकर यांच्या समन्वयातून आकाराला येत
जाणारी बोट आणि अखेर
ती बोट सज्ज होऊन समुद्रात उतरणं हा प्रवास मुख्य सागरप्रवासाइतकाच खिळवून ठेवणारा
आहे.
Sailing म्हणजेच नौकानयन ही अशी गोष्ट आहे की 'थियरी' कितीही व्यवस्थित असली तरी प्रत्यक्ष 'प्रॅक्टिकल' कसं पार पडेल, कुठली आव्हानं उभी राहतील याबद्दल
खात्रीशीरपणे काही सांगणं अशक्य असतं. दिलीप दोंदे यांना समुद्रप्रवासातही अकल्पित
संकटांचा सामना करावा लागला. कधी शिडाच्या डोलकाठीला तडा जाणे, कधी शीड फाटणे, कधी जनरेटर बंद पडणे, कधी महत्वाचा
भाग तुटणे अशा गोष्टींचा त्यांना भर समुद्रात सामना करावा लागला. कधी आपल्या पूर्वानुभवांच्या, आपल्या अंतर्मनाच्या कौलाच्या जोरावर त्यांनी पटापट
निर्णय घेत त्या समस्यांवर ज्या प्रकारे मात केली ते वाचून दिलीप दोंदे यांच्या
कौशल्याला आणि समयसूचकतेला दाद द्यावीशी वाटते.
खुसखुशीत निवेदनशैली
दिलीप दोंदे यांचे
अनुभव अनोखे असले तरी पुस्तक अतिशय वाचनीय बनवण्यास कारणीभूत ठरली आहे ती त्यांची
निवेदनशैली! उपहास, कोपरखळ्या, मिश्किलपणा यांचे मिश्रण असलेली दोंदे यांची
लेखनशैली पुस्तकाला कमालीचे प्रवाही बनवते. त्यांच्या सागरपरिक्रमेचे अनुभव
वाचण्यासाठी उत्सुक असलेल्या वाचकाला मोहिमेच्या पूर्वतयारीला वाहिलेल्या पुस्तकाच्या
पूर्वार्धात कुठेही कंटाळा येऊ न देणे हे लेखक म्हणून दोंदेंचे यश आहे. भारतासाठी
पहिल्यावाहिल्या असणाऱ्या या मोहिमेसाठी परवानग्या मिळवण्यासाठी, फाईल्स पुढे सरकवण्यासाठी नौदलाचे protocol पाळत, कोरड्या आणि अज्ञानमूलक सरकारी प्रश्नांना उत्तरं देत एकट्याने धावपळ करणं; त्याचवेळी एकीकडे शिडाच्या बोटीच्या निर्मितीवर जातीने लक्ष ठेवणं आणि या
सगळ्यांतून वेळ काढून शिडाची बोट चालवण्याचा सराव करणं या सगळ्या गोष्टी मोहीम
सुरु होण्याआधीच थकवणाऱ्या ठरल्या. पण त्या सगळ्या रगाड्याततही दोंदे यांची
विनोदबुद्धी शाबूत राहिली आणि त्यांनी आपल्या बोचऱ्या अनुभवांना खुसखुशीतपणाचे
वेष्टन चढवलं ही गोष्ट विशेष म्हटली पाहिजे.
दिलीप दोंदे यांचं
अनुभवकथन हसरं, खेळकर असलं तरी त्याला भावनेचं अस्तरही आहे.
सागरपरिक्रमेत अचानक एक सागरी पक्षी काही दिवसांपुरता बोटीवरचा वास्तव्याला येतो तेव्हा
दोंदे यांच्या बोटीवरच्या वावरामध्ये नकळत झालेले बदल, समुद्रावरच्या
त्या अफाट एकांतात एका छोट्या पक्ष्याची सोबतही हवीहवीशी वाटणं, त्या
पक्ष्याची काळजी घेणं हा आपल्यासाठीही
हृद्य अनुभव ठरतो. दोंदे यांचं आपल्या 'म्हादेई' या बोटीशी
असणारं नातं पुस्तकात मोजक्याच शब्दांत फार छान उलगडलं आहे. दोंदे यांचं मोहिमेवर
निघण्यापूर्वीपासून एकांतात 'म्हादेई'शी संवाद करणं, स्वतः मोहिमेवर एकटेच निघालेले असूनही "We entered the port", "We sailed
safely" अशा उल्लेखांमधून 'म्हादेई'ला जणू एक सजीव व्यक्तिमत्व बहाल करणं या गोष्टी 'म्हादेई'चं त्यांच्या मोहिमेतलंच नव्हे तर आयुष्यातलं स्थानही
अकृत्रिमपणे अधोरेखित करतं. मोहिमेतला एक
महत्वाचा टप्पा ओलांडल्यामुळे अफाट कष्टांचे चीज झाल्याच्या जाणीवेने भावनांचा
बांध फुटण्याच्या प्रसंगाचं दोंदे मोजक्या शब्दांत केलेलं वर्णन आपल्यालाही भावूक
करून जातं.
पहिले
सागरपरिक्रमावासी भारतीय म्हणून दिलीप दोंदे यांच्या अनुभवकथनाला महत्व आहेच, पण त्यांचा एकूण दृष्टिकोन आणि निवदेनशैली या पुस्तकाला अधिक उंचीवर
नेऊन ठेवतात.
*******
पुस्तक : The First Indian
लेखक : दिलीप दोंदे
प्रकाशक : Fernhurst Books Limited
पृष्ठसंख्या : ३०४
किंमत : ४९९
'साप्ताहिक सकाळ'च्या १ मे २०२१ अंकात प्रकाशित :
http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-prasad-phatak-marathi-article-5330