Total Pageviews
Wednesday, June 17, 2026
संस्कृततज्ज्ञ एव्हर्ट श्नायडर यांच्याशी गप्पाटप्पा
२०१९मध्ये नेदरलँड्समध्ये आलो होतो तेव्हा १५ ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात कालिदासाच्या मेघदूताचे डच भाषेमध्ये अनुवाद करणाऱ्या एव्हर्ट श्नायडर (Evert Schneider) यांची अनपेक्षित भेट, त्यानंतर मी घेतलेली त्यांची ऑनलाईन मुलाखत आणि त्यावर मी दिवाळी अंकात लिहिलेला लेख, याबद्दल या पूर्वी इथे सांगितलंच होतं.
पुन्हा नेदरलँड्सला आल्यावर त्यांची भेट घ्यायची हे ठरवलंच होतं. पण त्यांच्या संपर्क करायचा आळस केल्यामुळे अनेक महिने भेट झालीच नाही. मार्च महिन्यात मात्र आळस झटकून त्यांना ई-मेल करून भेटायची इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्याकडून २०मार्च २०२६ रोजी भेटीसाठी घरीच येण्याचे आमंत्रण मिळाले.
इतके महिने नेदरलँड्समध्ये राहूनही डच व्यक्तीच्या घरी जायचा प्रसंग प्रथमच आला. त्यांच्या घरी पोचलो तेव्हा त्यांच्या सौंनी दार उघडून स्वागत केलं आणि बसायला सांगितलं. वरच्या मजल्यावरून सावकाश चालत एव्हर्ट दिवाणखान्यात आले तेव्हा लक्षात आलं की, ते आता प्रचंड थकले आहेत..
नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्यांनी मला पहिली वार्ता दिली तीच उत्साह वाढवणारी होती. 'साप्ताहिक सकाळ'मधला माझा लेख वाचून बेल्जिअमच्या एका मराठी कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क साधला होता, एवढंच नाही तर त्यांच्या घरी येऊन त्यांची व्हिडिओ सेटप वगैरे करून मुलाखतही घेतली होती! आपण काहीतरी लिहितो त्याचा कधी, कुठे, कसा प्रभाव पडू शकतो याचा अंदाज करणं खरंच अशक्य असतं..
या वार्तेच्या ओघाने ज्या गप्पा सुरू झाल्या त्या चांगल्याच रंगल्या. विषय अर्थातच संस्कृत आणि त्या अनुषंगाने संस्कृतचा भारताबाहेरचा प्रवास, इतिहास. बोलण्याच्या ओघात अनेक गोष्टी कळत गेल्या; काही मी त्यांना सांगितल्या. इंग्रजांनी केलेला संस्कृतचा अभ्यास आणि संस्कृत अभ्यासक/प्रसारक म्हणून जगासमोर असणारी इंग्रजांची (त्यातही विल्यम जोन्सची) प्रतिमा याबद्दलची एव्हर्ट यांची मतं झणझणीत आहेत 😃.
गप्पांच्या ओघात एव्हर्ट यांनी टेनिसच्या निमित्ताने (ते स्वतः डेव्हिस चषक आणि अमेरिकन ओपन खेळलेले आहेत) त्यांच्या स्वतःच्या दिल्ली भेटीच्या आणि नंतर मेघदूताच्या मेघाचा मागोवा घेण्यानिमित्ताने झालेल्या हिमालय भेटीच्या आठवणी निघाल्या. आल्प्स् अगदी सविस्तर पाहिलेला हा माणूस भारतभेटीत मात्र हिमालय पाहून भारावून गेला होता!
गप्पा जेव्हा खेळ आणि भारताकडे सरकल्या तेव्हा क्रिकेटचा विषय निघाला आणि कळलं की, त्यांची नात Phebe Molkenboer ही Netherlands टीमची ओपनिंग बॅटर आहे!! ते म्हणाले "तिला पुढेही क्रिकेटच खेळायचं आहे. पण आमच्या देशात हा खेळ खूप छोटा आहे." मी म्हणालो, "छोटा असला तरी तुमची पुरुष क्रिकेट टीम गेली काही वर्षं खूप चांगली कामगिरी करत आहे, महिला क्रिकेट संघाने यावर्षी T20 विश्वचषकातही प्रवेश मिळवला आहे आणि आता भारतात WPL सुरू झालं आहे, इंग्लंडमध्ये The Hundred सुरू झालं आहे. अशा लीग्जमुळे एखाद्या छोट्या देशाच्या क्रिकेटपटूलाही संधी मिळू शकते.. IPL मध्ये नेपाळसारख्या क्रिकेटच्या दृष्टीने छोट्या देशातल्या खेळाडूलाही संधी मिळाली आहे. तुमची नात मन लावून खेळून चांगली कामगिरी करत राहिली तर तिलाही अशा लीग्जमध्ये संधी मिळू शकते"
बोलण्याच्या ओघात महाराष्ट्र आणि भारतातील डच हा विषय निघालं तेव्हा त्यांना निखिल बेल्लरकर हा तरुण अभ्यासक
मराठा-डच संबंधांवर संशोधन करत आहे, असं सांगितलं तेव्हा ते म्हणाले, "मला मराठे आवडतात, कारण त्यांनी इंग्रजांना हारवलं". हा (चुकीचा) संदर्भ त्यांनी कशावरून दिला कळलं नाही, पण एकुणात त्यांचं इंग्रजांवरच्या विशेष प्रेमाचा पुन्हा प्रत्यय आला😅
एव्हर्ट यांच्या भेटीला येण्यापूर्वीच त्यांना काय भेट द्यावी याचा विचार करत होतो. राजीव मल्होत्रा यांची संस्कृतवरची दोन्ही पुस्तकं त्यांनी वाचली आहेत आणि ती त्यांना आवडली आहेत हे मला माहित होतं. त्यामुळे तो पर्याय बाद होता. मग त्यांना भारताबद्दलच आणखी माहिती देणारं आणि संस्कृतशी संबंध असणारं 'Imperishable Seed' हे पुस्तक अगदी योग्य ठरेल असं वाटलं (हिंदू गणिताचा इतिहास सांगणारं हे पुस्तक संस्कृत भाषेतील गणिती सूत्रांनी संपृक्त आहे). योगायोगाने याच सुमारास नेदरलँड्सला येऊ घातलेल्या निखिल या संशोधक मित्राला हे पुस्तक घेऊन यायला सांगितलं. पण ट्रम्प तात्याने मध्येच गोंधळ घालून ठेवल्याने त्याचा प्रवास रद्द झाला आणि पुस्तक मिळवण्याचा प्रश्न निर्माण झाला. सुदैवाने काही दिवसांपूर्वीच Imperishable Seed चे बर्लीनस्थित लेखक भास्कर कांबळे यांच्याशी फोनवर ओळख आणि बोलणं झालं होतं. त्यांच्याशी पुन्हा संपर्क केला. त्यांनी लगोलग मला त्यांचं पुस्तक पाठवलं. एव्हर्ट यांना ते भेट दिलं तेव्हा मिश्किलपणे म्हणाले, "मला हे कळेल का?"
बोलण्याच्या नादात सव्वा - दीड तास कसा गेला कळलं नाही. निघताना ते मला सोडायला बाहेरपर्यंत आले. मी सायकलवरून आलोय हे कळल्यावर खूप खुश झाले.. निघताना त्यांना म्हणालो, "तुमचं मेघदूतावरचं पुस्तक मी आणायला विसरलो. त्यावर तुमची स्वाक्षरी घ्यायची होती." ते म्हणाले आता "हरकत नाही, त्यानिमित्ताने पुढच्या वेळी पुन्हा ये."
अंगण ओलांडून ते मला सोडायला फुटपाथ पर्यंत येत होते पण
तेवढं चालणंही नीट जमत नव्हतं. त्यांचं वय पंच्याऐंशीच्या जवळ आहे. या वयातही त्यांचा संस्कृत संदर्भातच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन संशोधन आणि लेखन चालू आहे. त्यांना तब्येतीची साथ मिळो आणि त्यांचं नवं पुस्तक आपल्याला वाचायला मिळो अशी मनोमन प्रार्थना केली.
निरोप घेताना त्यांना म्हटलं "आता अजून पुढे फुटपाथपर्यंत यायचे कष्ट घेऊ नका" आणि त्यांना आणि त्यांच्या सौंना अच्छा करून निघालो. परतीच्या वाटेवर असताना अचानक लक्षात आलं की, मगाशी त्यांच्या "कुठला नवीन लेख लिहिलास का?" या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देताना "मी आख्खं पुस्तक लिहिलंय" हे सांगायचं विसरूनच गेलो आहोत!
आपण कितीही बोललो तरी काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या राहूनच जातात!
आडवाटेवरचा अवलिया
बऱ्याचदा असं होतं की, एखादी गोष्ट करायची आहे असं नुसतं मनाशी म्हणत राहतो; पण
प्रत्यक्षात ती करतच नाही. 'आपल्या व्यग्रतेमुळे ती करणं आपल्याला जमत नाहीये', अशी
आपण स्वतःची समजूत घालत राहतो. परंतु एखादा दिवस असा उजाडतो, जो 'आपण ती गोष्ट केली
नाही' याची कायमची हुरहूर लावून जातो. २२ मे २०२६ रोजी प्रवीण कारखानीस नावाचा
विलक्षण भ्रमंतीकार सर्वात मोठ्या प्रवासाला निघून गेल्याची बातमी कळली आणि
त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट राहून घेल्याची कायमची सल मनाला देऊन गेली. बहुतां देशां
हिंडावे। नाना कळा शिकत जावें ।। बहुश्रुतपणें विवरावें । बरे वाईट ।। हे समर्थवचन
प्रवीण कारखानीस शब्दश: जगले. हमरस्ता सोडून आडवाटा तुडवण्यामध्ये ज्यांना विलक्षण
थ्रिल वाटत असावं. त्यांची पुस्तकं, लेख, फेसबुक पोस्ट्समधून माझ्या मनात तयार
झालेली प्रतिमा म्हणजे एक धाडसी दुचाकीवीर, एक चौकस माणूस, एक मनस्वी रसिक, एक
उत्तम लेखक अशा अनेक छोट्या 'स्नॅपशॉट्स'चं कोलाजच आहे. कारखानीसांच्या साहसांशी
प्रथम परिचय झाला तो त्यांच्या 'अष्टचक्री रोमायण' या पुस्तकातून. मोटरसायकलवरून
मुंबई ते रोम असा सलग प्रवास करणाऱ्या आठ वेड्या पीरांपैकी एक असणाऱ्या
कारखानीसांनी लिहिलेलं हे पुस्तक बराच काळ बाजारात उपलब्ध नव्हतं. सुदैवाने त्या
पुस्तकाची नवी आवृत्ती आल्याचं सोशल मीडियाच्या कृपेने कळलं. फेसबुकवर सक्रीय
असलेल्या कारखानीसांशीच संपर्क करून पुस्तक मिळवलं. वाचताना वाटलं 'आज वेगवान सोशल
मीडियामुळे इतक्या सहजतेने मिळालेलं हे पुस्तक प्रत्यक्षात ज्या प्रवासाची कथा
सांगतं, तो पन्नास वर्षांपूर्वीचा प्रवास मात्र अतिशय मर्यादित संपर्क साधनांमुळे
केवढा आव्हानात्मक होता!' अपरिचित प्रदेश, प्रतिकूल हवामान, खराब रस्ते, अनुभवाचा
अभाव अशा परिस्थितीमध्ये आठ तरुण आपल्या चार मोटरसायकल्स वरून २२ मे १९७७ रोजी
'गेटवे ऑफ इंडिया' वरून निघाले आणि तब्बल साडेबावीस हजार कि.मी.चं अंतर कापून दीडशे
दिवसांनी २९ जुलै रोजी रोमला पोहोचले. अपरिचित मुलुखात सहकाऱ्यांशी झालेली चुकामूक,
इस्तंबूलकडे जात असताना लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी हे दुचाकीस्वार राज
कपूरच्या भारतातून आलेले आहेत हे कळल्यावर त्यांच्यासोबत राज कपूरची गाणी गाऊन
सेलिब्रेशन करणे, मराठी माणसाला अपरिचित असलेल्या देशांमधले समाजजीवन अशा
अनुभवांमुळे हे प्रवासवर्णन वाचनीय झालं आहे. इस्लामिक क्रांती होण्यापूर्वीच्या
अत्यंत खुल्या, आधुनिक वातावरणातल्या इराणचं - आज अगदी अविश्वसनीय वाटणारं - मराठी
प्रवाशाने केलेलं वर्णन हे तर मराठी साहित्यातलं एकमेव उदाहरण असावं (या पुस्तकावर
मी ‘महाएमटीबी’साठी लिहिलेला लेख या दुव्यावर वाचता येईल :
https://www.mahamtb.com/Encyc/2018/5/5/Book-review-of-Ashtchakri-Romayan-by-Prasad-phatak-.html).
कारखानीसांनी बँकेची नोकरी सांभाळून आपल्या लाडक्या 'येझदी' बाईकसह अफाट भटकंती
केली. ज्यांचा विचारही सर्वसामान्य प्रवासी करणार नाही अशा केनिया, युगांडा,
रवांडा, बुरुंडी, टांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे, मोझांबिक, मालावी या देशांचा
साडेचौदाहजार कि.मी.चा प्रदेश मोटरसायकलवरून पालथा घातला. झिम्बाब्वेमध्ये
रस्त्याने प्रवेश करणारे ते पहिले भारतीय आहेत, अशी नोंद त्या देशाच्या सरहद्दीवर
करण्यात आली. 'भटकंती-देश विदेशांची' या पुस्तकामध्ये हे अनुभव वाचता येतात. १९८१
मध्ये कारखानीसांची बदली 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या कलकत्ता शाखेमध्ये झाली, तेव्हा
ते तिथे रुजू होण्यासाठी चक्क मोटरसायकलवरून गेले कलकत्त्यातली पाच वर्षं त्यांनी
बंगाली खानपान, साहित्य, चित्रपट हे सगळं जाणून जाणून घेतलं. संधी मिळतातच
बांगलादेशही पाहून घेतला. वंगदेशीच्या अनुभवांवर आधारित लेखांचं पुढे
‘हावडा-ब्रिजवरून’ हे पुस्तक झालं. बंगालमध्ये १९३४ सालापासून असलेलं 'महाराष्ट्र
निवास' आणि कलकत्त्याचे रहिवासी असलेल्या मराठी मान्यवरांची शब्दचित्रं, हा या
पुस्तकामधला सर्वात वेधक भाग आहे. ओठावर हसू, चौकस नजर आणि शिस्त या शिदोरीच्या
बळावर ते मनाची पाटी कोरी ठेवून मनसोक्त हिंडले. मनुष्याच्या चांगुलपणावर विश्वास
आणि सहज संवाद साधण्याच्या हातोटीमुळे आपल्या अनेक जण जोडले. प्रवासातल्या ओळखी,
कमीत कमी गरजा यांमुळे त्यांच्या सफरी विश्वास बसणार नाही इतक्या कमी खर्चात पार
पडत. १९०८०च्या दशकात त्यांनी संपूर्ण श्रीलंका अवघ्या ३२० रुपयांमध्ये पालथा घातला
होता! २००४ साली भारतीय क्रिकेट टीमच्या पाकिस्तान दौऱ्याच्या वेळी मोजक्याच त्या
देशाने भारतीयांसाठी 'विशेष क्रिकेट व्हिसा' देऊ केला होता. रोमपर्यंतच्या
प्रवासाच्या वेळी पाकिस्तानचा व्हिसा न मिळाल्याने तो देश पाहण्याची हुकलेली संधी
कारखानीसांना मिळाली, तेव्हा पाकिस्तानी वकिलातीतील रणधुमाळीनंतर त्यांनी व्हिसा
पदरात पाडून घेतला. या प्रवासात पाकिस्तानी मुस्लिमांकडून झालेले प्रेमळ आदरातिथ्य
एकीकडे आणि मानसिकरित्या दबलेला, अगतिक पाकिस्तानी हिंदूंचे दर्शन दुसरीकडे असे दोन
टोकांचे अनुभव त्यांना आले. भगतसिंह-सुखदेव-राजगुरू जिथे ताठ मानेने फासावर चढले,
अशा ठिकाणाची धूळ मस्तकी लावण्याचे भाग्य २३ मार्च या स्मृतिदिनीच कारखानीस यांना
लाभले. अखंड कुतूहलातून जन्मणारे साहस माणसाला कसे अकल्पनीय अनुभव देऊ शकते, याची
प्रचिती कारखानीसांचं 'मंज़िल-ए-मक्सूद पाकिस्तान' हे पुस्तक वाचताना येते. याच
अखंड कुतुहूलातून कारखानीसांनी अनेक दिग्गजांच्या आवर्जून भेटी घेतल्या. सालीम
अलींपासून जनरल अरुणकुमार वैद्यांपर्यंत अनेकांशी त्यांची ओळख झाली. ज्यांच्याशी
प्रत्यक्ष परिचय नव्हता अशांबद्दलही त्यांनी माहिती घेऊन लिखाण केलं. 'गाथा
गुणीजनांची', 'ज्योतीने तेजाची आरती', 'तेथे कर माझे जुळती' अशा पुस्तकांमधून
त्यांनी परिचित-अपरिचित शंभरेक व्यक्तींची शब्दचित्रं लिहिली. इतकं सगळं
पुस्तकरूपाने प्रसिद्ध करूनही कारखानीसांकडे भरपूर खजिना शिल्लक होता. तो ते
फेसबुवर नियमितपणे रिता करत. उतारवयातही नव्या माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचा
त्यांचा गुण त्यांच्या चिरतारुण्याची साक्ष देणारा होता. त्यांच्या फेसबुकवरील
निवडक लिखाणाचंही एक पुस्तक झालं! एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला पुरस्कार मिळाला,
अथवा तिचं निधन झालं की, त्यावर कारखानीसांची एखादी तरी फेसबुक पोस्ट हमखास येई.
अनेकदा त्या व्यक्तीसोबत स्वतःची भेट कधी झाली याच्या आठवणी आणि त्यांच्यासोबतचं
छायाचित्रही असे. त्यांचं वर्तुळ नक्की किती मोठं आहे, याचा मला कायमच अचंबा वाटे.
त्यांच्या पुस्तकांबद्दल त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढणाऱ्यांमध्ये गो. नी.
दांडेकर, विद्याधर गोखले, अरुण टिकेकर इ. अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
हावडा-ब्रिजवरून या पुस्तकाचं प्रकाशन तर बंगालचे माजी मुखमंत्री सिद्धार्थ शंकर रे
यांच्या हस्ते झालं होतं! को.म.सा.प.चा ‘उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार’,
ठाण्याचा 'वा. अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कार' मिळालेल्या कारखानीसांचं अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनावारही प्रेम होतं. त्यांनी तब्बल ५०पेक्षा अधिक संमेलनांना
लावलेली उपस्थिती हा बहुदा विक्रमच असावा. प्रवीण कारखानीसांचा जन्म ६ नोव्हेंबर
१९४६ चा; परंतु त्यांची कार्यप्रवणता पाहता त्यांचं या वयात जाणंसुद्धा अकाली आहे
अशीच भावना होत आहे. असा अखंड उत्साहाचा धबधबा आटतो तेव्हा त्याचं जाणं अधिक
रितेपणा देऊन जातं. दरवेळी त्यांचं नवीन लिखाण वाचलं की, अंबरनाथला जाऊन त्यांची
प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर मुलाखत घेण्याची योजना माझ्या मनात आकार घेऊ लागे. पण
ती अर्धवटच राही. आळस करत राहिलो तर वेळ निघून जाईल, ही शक्यता मी ध्यानातच घेतली
नाही. आपण आळस झटकायला हवा, हे तरी आपण कार्यमग्न कारखानीसांकडून ते हयात असतानाच
शिकायला हवं होतं, याची बोचरी जाणीव आता प्रकर्षाने होत आहे.
(पूर्व प्रसिद्धी : मुंबई तरुण भारत, ७ जून २०२६)
Subscribe to:
Posts (Atom)



