Total Pageviews

Sunday, November 23, 2014

हैदर : टू से ऑर नॉट .....





चांगला चित्रपट कोणता हे ठरवण्याची अनेक परिमाणे आहेत. चित्रपट जर गंभीर प्रकृतीचा असेल तर त्या चित्रपटाने आपल्यात निर्माण केलेली अस्वस्थता आणि त्या अनुषंगाने आपल्यासमोर उपस्थित केलेले प्रश्न हे  तो चित्रपट किती चांगला आहे याचे परिमाण नक्कीच ठरू शकते.  त्या परिमाणाचा विचार करता हैदर हा चांगलाच चित्रपट आहे. मी शेक्सपीअरची कोणतीही कलाकृती वाचलेली नाही पण त्याच्याविषयी किंवा त्याच्या नाटकांविषयी जे काही वाचले आहे त्यावरून हे जाणवते की तो कालातीत लेखक आहे आणि त्याच्या कित्येक नाट्यकृतींचा जगभरातल्या साहित्य/नाटक/चित्रपटावर आजतागायत प्रभाव टिकून आहे. त्यामुळे त्याच्या नाटकाचा आशय पचवणे आणि त्याचे संपूर्णपणे वेगळ्या अशा स्थल-कालसापेक्ष कथानकात रुपांतर करणे म्हणजे गोवर्धन उचलण्याइतकेच कठीण आहे हे निश्चित आणि हा गोवर्धन विशाल भारद्वाजने इतक्या कुशलतेने पेललेला आहे की त्याला कुर्निसात करायला पाहिजे. 

हैदर ९० च्या दशकातल्या काश्मीर मध्ये घडतो आहे. काश्मीर प्रचंड धगधगते आहे. काश्मिरी जनांचा अभिमान आणि त्याचवेळी वेदना ठरलेली ‘काश्मिरियत’, त्याला त्यांच्या ‘मुस्लीम’ असण्याची भक्कम पार्श्वभूमी, सैन्याच्या इशाऱ्यावर चालणारे/रोखले जाणारे/वाचवले जाणारे/उध्वस्त होणारे जीवन यामुळे काश्मीर खोरे अगदी कुंद कुंद होऊन गेले आहे. या सगळ्या परिस्थितीमधेच अलिगढ विद्यापीठातून काव्यशास्त्र शिकून नुकताच परततलेल्या हैदरच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेम, निराशा, वैफल्य, द्विधा मनस्थिती यांचा असा काही गुंता झाला आहे की एकापासून दुसरा पदर वेगळा करणे अशक्य आहे. 

हैदर (Hamlet) च्या डॉक्टर वडिलांनी एका अतिरेक्याचे ऑपरेशन करून त्याला बरे होईपर्यंत स्वतःच्याच घरात ठेवल्याने लष्कराने अतिरेक्यांकट घर उद्ध्वस्त केले आहे आणि वडिलांना ताब्यात घेतले आहे. अधिक चौकशी केल्यावर हैदरचे वडील ‘हरवले’ आहेत एवढे एकच उत्तर हैदर आणि कुटुंबियांना पोलिसांकडून मिळत आहे. हैदर बापाच्या शोधात आहे आणि त्याचवेळी त्याला आई ग़ज़ाला (Gertrude - तब्बू) आणि काका खुर्रम (Claudius – के.के.मेनन) यांच्यात ‘काहीतरी’ आहे याचे संकेत मिळतात आणि आणि हैदर अधिकच ढासळतो. काकाशी असणारे नाते, आईवर असणारे प्रेम (मुलगा या angle ने आणि सूक्ष्मपणे सूचित केल्या गेलेल्या ‘इडीपस कॉम्प्लेक्स’च्या angleनेही) यांना तडे जातात आणि मग कोण कुठला गूढ रूहज़ार (एकमेवाद्वितीय इरफान खान) येतो, व्यथित हैदरच्या मनात सूडाचे बी पेरतो आणि हैदरच्या अंतःकरणात लढाई सुरु होते भावनेची आणि बुद्धीची, जगावे की मरावे प्रश्नांची आणि शेवटी दफनभूमीत होते खरीखुरी बंदुकीची लढाई आणि ती संपता संपता जीव घ्यावा की जीवदान द्यावे या यक्षप्रश्नांची.... 

मूळचा Hamlet एका शाही घराण्यातल्या उलथापालथीबद्दल आणि सूडाच्या नाट्याबद्दल आहे. त्यातली सर्व महत्वाची पात्रे (Hamlet चा मित्र वगळता) हैदरमध्ये यात आलेली आहेत. आणि विशेष म्हणजे “काकाचा सूड घे” असे सतत Hamlet ला सांगणारे Hamletच्या बापाचे भूत इथे थेट येत नाही पण “सूड घे” संदेश घेऊन रूहज़ार येतो आणि हैदरला तसाच पेटवून बरोब्बर परिणाम साधतो. हैदर मधले दोन धमाल बावळट सलमान आणि थडगी खोदणारे इसम हे सुद्धा Hamlet मधूनच आलेले आहेत. (थडगी खोदणाऱ्यांचे गाणे आणि त्यांचे मरणाऱ्या माणसाविषयीचे तत्वज्ञान हा प्रकार मात्र माझ्या डोक्यावरूनच गेला. तोपर्यंत अगदी व्यवस्थित चाललेला चित्रपट त्या प्रसंगापुरता अचानक आर्ट फिल्म होऊन जातो आणि झेपेनासा होतो. अगदी इंटरनेटवर वेगवेगळ्या ठिकाणी शोधून/वाचूनही मला त्याचे मूळ Hamlet मधले प्रयोजनच कळले नाही. असो.) 

Hamlet मधला सर्वात गाजलेला भाग आहे तो ‘टू बी ऑर नॉट टू बी’ आणि हा प्रश्न विशाल भारद्वाजने कवी मनाच्या हैदरच्या तोंडून इतक्या अप्रतिम काव्यमय संवादामधून मांडला आहे की त्याला सलाम करावासा वाटतो. फक्त त्या संवादापूर्वी आलेले प्रेमगीत हा ‘हैदर’ मधला सगळ्यात डोक्यात गेलेला प्रकार. एक तर ते अत्यंत ठिगळासारखे बसवलेले आहे, ते चित्रपटाचा वेग कमी करते आणि त्यातली गरमागरम दृष्ये ‘असले काही दाखवले नाही तर चित्रपट खपणार नाही’ या विचारातून आल्यासारखी वाटतात. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ चे द्वंद्व संवादातून दाखवायचे असेल तर त्यापूर्वी आंबटचिंबट काहीतरी दाखवणे गरजेचे आहे असा काही कलात्मक विचार त्यामागे असेल तर तो माझ्या आकलनापलीकडचा आणि अभिरुचीपलीकडचा आहे.

हैदर मध्ये उल्लेखनीय म्हणावेत असे प्रसंग बरेच आहेत पण काही विशेष आवडलेले इथे सांगतो.
पहिला : ‘वेड लागलेल्या’ हैदरचा. सैन्य आणि काश्मीरविषयी एका चौकातला उपहासात्मक एकपात्री performance करणारा या प्रसंगातला शाहीद अभूतपूर्व आहे. खरेतर कमीने मधल्या चार्लीचा अपवाद वगळता मला मनापासून कधीही न आवडलेला हा नट. पण इथे त्याने चेहऱ्यावरच्या झरझर बदलणाऱ्या भावांनी अक्षरशः कमाल केली आहे...
दुसरा : मृतदेहांनी भरलेल्या लॉरी मध्ये आपले वडील आहेत का हे हैदर शोधत असताना अचानक समोरच्या मुडद्यान्मधून एक तरुण स्प्रिंग लावल्यासारखा ताडकन उठतो आणि आपण अजून जिवंत आहोत यावर विश्वास बसत नसल्यासारखा वेड्यासारखा बडबडत पळून जातो... अगदी गोठवणारा प्रसंग !
आणि तिसरा म्हणजे क्लायमॅक्स: थंडीतल्या काश्मिरात आग ओकत झालेल्या लढाईनंतर पांढऱ्याशुभ्र बर्फाळ गालिचावर उरणारे लालभडक रक्ताचे बुट्टे दाखवणाऱ्या अक्षरशः त्या जीवघेण्या फ्रेम्स !!! आणि त्यात सगळ्या लाल चिखलात खुर्रमवर पिस्तुल रोखलेला बंबाळ हैदर.... ‘दो आंखो के बीच गोली मारना’ म्हणणारा बाप आणि ‘हिंसेने हिंसाच वाढते, सूडाने सूडच फैलावत जातो’ म्हणणाऱ्या सासऱ्याचे विचार हैदरच्या गळी उतरवू पाहणारी ग़ज़ाला अशा दोन टोकांमध्ये आंदोलित होणारा हैदर ... शेवटी प्रचंड आक्रोश करतो आणि .... खुर्रमला सोडून देतो. काकाला मारणाऱ्या Hamlet सह सर्वच जण मृत्यमुखी पडतात असा शेवट असणाऱ्या मूळ नाटकापेक्षा हैदर इथे वेगळी वाट पकडतो आणि त्यातून विशाल भारद्वाज खूप महत्वाचा संदेश देऊन जातो... गांधी जयंतीला इतका हिंस्त्र चित्रपट प्रदर्शित करणे आणि अंतिमतः गांधींचाच संदेश ध्वनित करणे हे हेतुपूर्वक असेल तर तो खरंच मास्टरस्ट्रोक म्हणावा लागेल ... 
अशी ही हैदरची कहाणी अनेकरंगी, अनेकपदरी ... अगदी Hamlet पेक्षाही जास्त पदर असणारी. याचे मुख्य कारण म्हणजे त्या कथानकाला देण्यात आलेली काश्मीरची चौकट. मूळ पाश्चात्य पार्श्वभूमीवरचे असणारे नाटक हे त्यातले नाट्य तसेच राखून अधिक कालसुसंगत बनवून काश्मीरच्या मातीतलेच वाटावे इतके बेमालूमपणे आपल्यासमोर आणण्याचे विशाल भारद्वाजला सुचलेच कसे असेल याचा मी राहून राहून विचार करतोय. अर्थात या कामी त्याला बशरत पीर या काश्मिरी पत्रकाराचे मोलाचे सहाय्य झाले आहे. (विशालसोबतच तोही हैदरचा पटकथाकार आहे.) आपण अनेकदा काश्मीर प्रश्नाकडे ठराविक चष्म्यातून पाहतो आणि आपापल्या वकुबाप्रमाणे ‘हा मुस्लीम प्रश्न आहे’ किंवा ‘काश्मिरी जनतेला 'identity crisis’ आहे किंवा ‘एवढे आपल्या सैन्याच्या जीवावर जगतात आणि मग त्यांचाच खुशाल निषेध कसा काय करतात’ इ. असे प्रश्न विचारतो किंवा मते बनवतो. हे सगळे प्रश्न/मते योग्य आहेतच. पण त्यापुढे जाऊन काश्मीरप्रश्नामध्ये आणखीही काही छटा आहेतच आणि त्याच छटा हैदर पडद्यावर आणतो. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यातले भारतीय लष्कराचे करण्यात आकेले गेलेले चित्रण. यावर अपेक्षेप्रमाणेच गदारोळ देखील झाला . “असल्या द्रोही चित्रपटावर बंदी घाला" वगैरे ओरडून झाले. नेमक्या याच विषयाच्या अनुषंगानेच मी सुरुवातीला उल्लेखलेली अस्वस्थता अनुभवायला लागलो आणि माझ्या डोक्यात प्रश्नांचे काहूर उठायला लागले. खरंच हा चित्रपट लष्कराचे नकारात्मक चित्रण करतो का, असा प्रश्न विचारल्यास प्रथमतः माझ्यालेखी याचे उत्तर ‘हो’ असे आहे. पण म्हणून ही सैन्याची खूप अंधारी अस्तित्वातच नाही असे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करण्यासारखे आहे. अगदी सुरुवातीला डॉक्टरचे घर उध्वस्त करण्यापासून ते गुप्त छावण्यांमध्ये ठेवलेल्यांवर केल्या जाणाऱ्या अमानुष अत्याचारांपर्यंत खूप नावडत्या आणि नकारात्मक गोष्टी यात विस्तृतपणे दाखवल्या आहेत .... आणि इथेच खरी प्रश्नांची गोची व्हायला लागली. विशाल भारद्वाजने असे का केले असेल ? तो चांगली बाजू दाखवू शकला नसता का ? सैन्याची इतकी मदत होते ते त्याने का दाखवले नाही ? आता आली का पंचाईत !!! खरंच सर्जनशील व्यक्तीला “तू अमकेच का मांडतोस ? तमकेच का मांडत नाहीस असे विचारता येते ? बंधन घालता येते ??" असे विचारता येते ? मला कुणी विचारले तू ‘वावटळ आणि हैदर वर का लिहितोस ? ‘मै हू ना’  किंवा ‘दिल तो पागल’ है वर लिहायला काय झाले तर मी ऐकून घेईन ?? मग मला विशाल भारद्वाजला हा सल्ला द्यायचा अधिकार आहे ?

खरेतर या ‘एका बाजूच्या’ आग्रहाच्या पोटात दुसरे एक वास्तव लपलेले असते. ते म्हणजे ‘दुसरी बाजू’ ऐकण्यातली (मान्य करणे फार लांबची गोष्ट आहे) आपली असहिष्णुता. आणि त्यातही ते अप्रिय सत्य असेल तर मग आपण तिकडे काणाडोळाच करतो. एकूण सैन्याच्या संशयाच्या नजरेमुळे खरंच काश्मिरींना जगणे दुष्कर होत नसेलच का ? ठाम ‘नाही’ म्हणायला जीभ रेटत नाही माझी. याच संदर्भात एक क्रूर विनोद हैदर मध्ये येतो. एक माणूस (हा cameo स्वतः बशरत पीरने केलाय) स्वतःच्या घराबाहेर घुटमळत असतो, बायको आत बोलवत असते पण पठ्ठ्या जातच नसतो. तितक्यात
रूहज़ार तिकडे येतो, त्याला दरडावून झडती घ्यायच्या आविर्भावात त्याच्याकडचे ओळखपत्र दाखवायला सांगतो. ते दाखवल्यावर मग कुठे तो मनुष्य स्वतःच्या घरात जातो. रूहज़ार टोला मारतो "लोकांना संशय आणि झड्तीची इतकी सवय झालीये की त्याशिवाय ते पुढे सरकतच नाहीत”. अख्ख्या थेटरमध्ये हशा पिकला ... मला जमलेच नाही..

ज्यांचे नवरे ‘बेपत्ता’ आहेत अशा काश्मिरातल्या अनेक स्त्रियांच्या नशिबी हाफ-विडो हा स्थानिकांच्या संकल्पनेतला स्टेटस असतो. अश्या बायका आणि अन्य कुटुंबीय वेळोवेळी मोर्चे काढतात, पोलिसांकडे चकरा मारतात पण हाती फारसे काही लागत नाही. एका प्रसंगात एका लष्करी अधिकाऱ्याला पत्रकार प्रश्न विचारताना ‘बेपत्ता’ नागरिकांचा आकडा अमुक अमुक आहे असे म्हणतो तेव्हा त्या अधिकाऱ्याचे उत्तर असे येते “बेपत्ता नागरिकांचा हा आकडा खरा नाही कारण विस्थापित हिंदू पंडितांचा आकडा ‘बेपत्ता’ यादीमध्ये गणला तर तो काही लाख येईल! ” पडद्यावरचे ते वाक्य ऐकले आणि तोपर्यंत माझ्या हिंदू मनामध्ये कुठेतरी बऱ्याच वेळापूर्वी निर्माण झालेला तरंग अगदी पृष्ठभागावर आला – या आणि आजपर्यंतच्या इतरही विस्कटलेल्या रांगोळीत काश्मिरी पंडितांचे रंग मला कुठेच का दिसत नाहीत ? की काश्मिरी जनतेला सोसावे लागणाऱ्या सगळ्या वेदना फक्त तिथल्या मुस्लीमांच्याच नशिबी आहेत ? असतीलही – कारण तिकडे वेदना अनुभवण्याइतका हिंदू शिल्लक कुठे राहिलाय ! कुणाला यावर चित्रपट काढावासा नाही वाटत नसेल? अधिकाऱ्याच्या तोंडून विशाल भारद्वाज बोलतोय असे म्हटले, तर मग मी विशाल भारद्वाजला हा प्रश्न विचारू का ? पण शिंचा तो सर्जनशीलतेचा आणि सक्तीचा प्रश्न पुन्हा पुढ्यात आहेच ...  साक्षात सैन्याची नकारात्मक बाजू दाखवणारा चित्रपटसुद्धा आला, मग विस्थापित काश्मिरी हिंदूंवर, त्यांना हाकलून देणे / मारणे / बाटवणे आदी योजनाबद्ध षड्यंत्रावर आधारित चित्रपट काढण्याचे धाडस खरंच एखादा चांगला आणि प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक दाखवेल का ? (मी ‘प्रसिद्ध’ म्हणतोय कारण या विषयावर यापूर्वी अशोक पंडित नावाच्या दिग्दर्शकाचा ‘शीन’ नावाचा चित्रपट दहा वर्षापूर्वी आला होता आणि कुत्ते की मौत मेला होता.) 
एकूण काय हैदरने माझ्या मनात प्रश्नांचे मोहोळ उठवले. एक रुपांतर म्हणून हैदर श्रेष्ठ आहेच पण त्याच सोबत ‘अप्रिय पण सत्य असणाऱ्या घटनांकडे आपण धाडसाने पाहू शकतो का ?’ यासंदर्भातले प्रश्न त्याने – निदान माझ्यापुरते तरी - उपस्थित केले असल्यामुळेही मला तो चांगला चित्रपट वाटतो... पण त्याचवेळी माझे दुसरे मन (हिंदू मन ?) सैन्याबद्दल काहीच चांगले न दाखवल्याबद्दल, त्यातली एका गटापुरतीच असणारी ‘काश्मिरियत’ याबद्दल तक्रार करत राहते आणि ते सांगावे/विचारावे की  सर्जकाला असे प्रश्न विचारणे फिजूल आहे असे स्वतःला समजावून चांगल्या बाजूंचे कौतुक करून गप्प बसावे, असा प्रश्न मलाच छळत राहतो...  ‘टू से ऑर नॉट....’ हे द्वंद्व हे असे आहे ....

Friday, October 4, 2013

मस्त पड म्हणा

सकाळी साखरझोपेतून उठून कामावर जायचे जीवावर आलेला माझा मित्र विवेक कुलकर्णी कुसुमाग्रजांच्या 'फक्त लढ म्हणा'च्या चालीवर म्हणाला - 'डोक्यावरती पांघरूण घेऊन फक्त झोप म्हणा'. मग मी विचार केला की याचा पूर्ण विस्तार करूया … आणि दुपार पर्यंत विडंबन तयार सुद्धा झाले !

(आधी विडंबन-कविता आणि खाली कुसुमाग्रजांची मूळ कविता देखील संदर्भासाठी दिली आहे)
विडंबन - मस्त पड म्हणा

पार्श्वभूमी : गणपती मिरवणुकीत अचकट विचकट नाचणे हा प्रकार फार वाढलाय, त्यात परवाच्या विसर्जनाला मरणाचा पाऊस पडला. कल्पना करा अशी एक मिरवणूक संपवून एका मोठ्या मंडळाचा एक छोटा कार्यकर्ता मंडळाच्या अध्याक्षाकडे आलाय
‘ओळखलत का भाऊ मला?’ - पावसात आला कोणी,
बापडा होता फार दमलेला, केसांवरती पाणी
दम खात बसला कसनुसा हसला बोलला वरती पाहून
'गणपती बाप्पा पाहुणे आले, गेले मांडवात राहून
डी जे वरती पोरं आपली चारचौघात नाचली
मोकळ्या तोंडी जातील कशी, खैनी सुद्धा पोचली
भिंत रचली, गाणी वाजली, नाचून सारे मेले
उस्ताद तुम्ही हातावरती चिंचोके हो ठेवले
पोरांना या घेऊन संगे काढता पाय घेतो आहे
भरल्या चपला पुसतो आहे चिखलगाळ काढतो आहे’  
पिशवीकडे हात जाताच हसत हसत उठला       
‘ 'चपटी' नको भाऊ मला जरा थकवा वाटला
झाला काटा ढिला तरी पडला नाही फणा
"डोक्यावरती पांघरूण घेऊन मस्त पड" म्हणा’ 

मूळ कविता : फक्त लढ म्हणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर
बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण
पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या
हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला
घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी
भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे
हात जाताच हसत हसत उठला
‘
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती
हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

Tuesday, September 24, 2013

इन्व्हेस्टमेंट : आपण आपल्या मुलांना नक्की काय देत आहोत ?

जो साहित्यिक, कलाकार, दिग्दर्शक जितका सातत्याने काळासोबत बदलत राहतो आणि कालसुसंगत कलाकृती घडवत राहतो (मागणी तसा पुरवठा नव्हे)  तो कधीच शिळा किंवा कालबाह्य होत नाही आणि खऱ्या अर्थाने काळाच्या कसोटीवर उतरतो. रत्नाकर मतकरी हे याचे ठळक उदाहरण. त्यांच्या कथा,नाटके कायमच वैविध्यपूर्ण आणि कालसुसंगत राहिलेली आहेत.  त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा देखील अगदी आजचा विषय मांडतो आणि त्यामुळेच एक अस्वथ करणारा अनुभव देतो.
 

'इन्व्हेस्टमेंट' या मतकरींच्याच कथेवर आधारित हा सिनेमा आहे.  आत्तापर्यंत मराठी सिनेमातून दिसत आलेल्या कुटुंबांपेक्षा एक फार वेगळे कुटुंब याच्या केंद्रस्थानी आहे. बारा-तेरा वर्षाचा सोहेल हा आशिष आणि प्राची यांचे एकुलते एक अपत्य. आई वडील दोघेही भरघोस उत्पन्न असणारे, त्यामुळे मुलाला काही कमी न पडू देण्याकडे त्यांचे सदोदित लक्ष. विशेषतः आईला मुलाचा कोणताही हट्ट पूर्ण केलाच पाहिजे असे ठामपणे वाटते. तिच्या मते आत्ता मुलाचे पुरवलेले हट्ट आणि त्यासाठी केलेला खर्च ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, जी तिला काही वर्षांनी कैक पटींनी 'रिटर्न्स' देईल. या 'रिटर्न्स' च्या लोभामुळेच काहीही करून मुलाला राजकारणी बनवायचेच या विचाराने ती पछाडलेली आहे.  आशिषची आई त्याच्या घरी राहत नसली तरी जवळच राहते आणि अधून मधून ती घरी येते तेव्हा नातवाला तिच्या पद्धतीने वळण लावायचा प्रयत्न करत असते, पण नातवाला आजीविषयी माया नाहीये उलट 'काय शिंची कटकट आहे' अशीच त्याची भावना आहे. हे सगळे कुटुंब पाहून सुरुवातीपासूनच जाणवायला लागते की हे सर्वार्थाने आजच्या काळातले नागरी कुटुंब आहे. एवढेच नव्हे तर आजी - नातवाच्या आजतागायत दाखवल्या गेलेल्या प्रेमळ नात्याला इथे संपूर्ण फाटा देण्यात आलेला आहे.

   
घरच्यांकडून लाडावलेला सोहेल अत्यंत बेफिकीर बनलेला आहे. शिवाय 'जे हवे आहे ते काहीही करून मिळवायचेच'  या आईच्या शिकवणी पासून त्याने नको त्या अर्थाने प्रेरणा घेतली आहे. या अशा पार्श्वभूमीवर त्याच्याकडून आगळीक घडते आणि 'किस' द्यायला नकार दिलेल्या मैत्रिणीचा - दीपा गांगण हिचा - संतापाच्या भरात त्याच्याकडून जीव घेतला जातो.  यातून पुढे अनेक धक्कादायक गोष्टी घडत जातात. मुलाच्या प्रेमाने अंध झालेल्या पालकांकडून - विशेषतः आईकडून - मुलाची पाठराखण तर होतेच पण त्याहून वाईट म्हणजे त्याच्या कडून काही विशेष घडले ते गंभीर आहे मान्य करायला देखील ती तयार नसते. पुढे अनेक अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी घडत जातात आणि आपल्याला खिन्न करूनच सिनेमा संपतो ….

     
चित्रपट अनेक गोष्टींना कळत नकळत स्पर्श करतो. अनेक बाबतीत तो खूप वेगळा आहे. पैशाच्या लालसेने आंधळे झालेल्या पालकांकडून मुलांकडे कोणता वारसा हस्तांतरित केला जातोय याचे गडद चित्र अक्ख्या सिनेमा मध्ये दिसते. साधारणपणे आई प्रेमळ, संस्कारी आणि वडील कडक अशा पारंपारिक पात्ररचनेला सिनेमा धक्का देतो. आत्तापर्यंत बहुधा कधीही न दिसलेली, 'आणखी खूप मोट्ठे' होण्याच्या विचारांनी पछाडलेली आई इथे आहे. मूल्याबिल्यांची चिंता न करता ती मुलाला पदोपदी डिफेंड करते आणि त्यासाठी हतबुद्ध करणारे स्पष्टीकरण देत राहते. दुसरीकडे थोडीशी सद्सदविवेकबुद्धी शाबूत असणारे, बायकोचे विचार फारसे पटत नसणारे पण अंतिमतः छोट्या फायद्यासाठी तिकडे कानाडोळा करणारे वडील यात आहेत.  छोट्या छोट्या प्रसंगातून ऐहिक सुखसोयींभोवती फिरणारे भावविश्व आणि त्यात कसलीही बाधा येताना दिसली तरी प्रचंड आदळ आपट करणाऱ्या आजच्या नागरी मुलांचे प्रातिनिधिक रूप घेऊन यातला सोहेल येतो. त्याचे न कळत्या वयातले सतत MTV सारखे channel बघणे, बंदुका-बॉम्ब असल्या गोष्टींनी भरलेले व्हिडीओ गेम्स खेळणे सिनेमा मध्ये पुन्हा पुन्हा डोकावते आणि ते पाहिले की त्याच्यामधला हट्टीपणा, हिंस्त्रपणा याचा कार्यकारणभाव आपोआप लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे अस्वस्थ असणारी पण यात काहीही बदल करता येउ न शकणारी हताश आजी ही जुनी पिढी आजच्या पिढीच्या लेखी किती अडगळीसमान बनत चालली आहे याचेच जणू प्रतिक बनून येते.

   
सामाजिक भाष्याचा आणखी एक कोन चित्रपटाला आहे तो म्हणजे उच्चभ्रू आणि तथाकथित पांढरपेश्यांची आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने खालच्या स्तरावर असलेल्यांकडे असलेली तुच्छतेची नजर.  बळी गेलेल्या मुलीच्या वडिलांचे राहणीमान, त्यांचे कारकून असणे याची सतत हेटाळणी सोहेलची आई करत राहते. जवळच्या डोंगरावरच्या  आदिवासींसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याकडे पहायची नजर देखील अशीच हेटाळणीयुक्त.  स्वतःच्या कोषाबाहेर जे काही आहे त्याच्याशी थोडीही attachment नसण्याची वृत्ती ही खरोखरच आज पावलोपावली दिसते त्याचेच हे प्रतिबिंब.  थोडक्यात काय तर आजच्या काळाचे, वृत्तींचे अप्रिय पण सत्य दर्शन हा सिनेमा दाखवून देतो त्याबद्दल मतकरींचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.

 
आता थोडे मला जाणवलेल्या उणीवांबद्दल आणि पडलेल्या प्रश्नांबद्दल…

  
एक : कथेच्या विषयामध्ये मध्ये एवढा कालसुसंगत असणारा सिनेमा हाताळणीमध्ये जुन्या किंवा पारंपारिक वळणाचा दिसतो. उदा. मंत्र्याशी फोनवर बोलताना नामवंत वकिल त्याला मिळणाऱ्या 'फायद्या' चा उघडपणे उल्लेख करतो हे दृश्य. 'system विरुद्ध हिरो' लढ्याचे चित्रण करणाऱ्या सनी देओलच्या कुठल्याही सिनेमातले वाटावे इतके ढोबळ दृश्य आहे हे ! तसेच खटला संपल्यानंतर त्यातल्या व्यक्तींचे पुढे काय झाले हे सांगणे सुद्धा बाळबोधपणाचे वाटते.  वास्तविक आर्थिकदृष्ट्या सबळ असणारा वर्ग केवळ पैशाच्या जोरावर पीडित आणि दुर्बळ वर्गाला भाल्याबुऱ्याची चाड न बाळगता कसा नामोहरम करतो याचे उद्वेगजनक दर्शन खटल्याच्या सुनावणी आणि निकालाने आपल्याला घडलेलेच असते आणि बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबियांचे उध्वस्त होणे आपल्याला जाणवलेलेच असते. त्यामुळे त्यानंतर मुलीच्या वडिलांचे किंवा आईचे काय हाल झाले हा तपशील पडद्यावर दाखवण्यातून काहीही वेगळे साध्य होत नाही.  या व्यतिरिक्त खटल्यामध्ये साक्ष देणारा प्रत्यक्षदर्शी सोहम सिनेमाच्या अगदी शेवटी तिरस्काराने सोहेलच्या वडिलांवर थुंकतो असे भलतेच Cliched दृश्य आहे. आत्तापर्यंत शेकडो सिनेमा मध्ये दिसलेले (आठवा : नटरंग)   हे दृश्य इथे टाळता नसते का आले ?

 
दोन : सोहेलने नक्की काय केले हे जेव्हा वकील त्याच्याकडून काढून घेतो तेव्हाचा प्रसंग convincing वाटत नाही. खरे म्हणजे शिक्षेच्या विचारांनी घाबरलेला मुलगा ओळखही नसलेल्या वकिलासमोर इतक्या सहजपणे मोकळा होणे अजिबात संभवत नाही. पण इथे सोहेल काही मिनिटातच सगळे काही सांगतो. हा प्रसंग तपशिलात रंगवायला हवा होता.

 
तीन : सोहेलची आई सारखी 'सोहेलला आपण politician बनवायचे' असे म्हणताना दाखवली आहे. कोषात असणारऱ्या उच्चभ्रू आणि सो-कॉल्ड पांढरपेशा समाजामध्ये सर्वदूरपणे आढळणारे राजकारणाविषयीचे कमालीचे नकारात्मक भाव पाहता आपल्या मुलाला राजकारणात पाठवण्यासाठी कुठली उच्चभ्रू आई खरच आसुसलेली असे वाट्त नाही.  उलट अशा वर्गात मुलाला engineer / MBA बनवून खाजगी कंपनीत लट्ठ नोकरी मिळवणे एवढेच उद्दिष्ट दिसते

 
चार : युक्तिवादाच्या वेळी कोर्टात सोहेलचा वकील 'गांगण यांच्यासारख्या खालच्या स्तरावरच्या लोकांकडून आपल्याला खाली खेचले जाते' अश्या अर्थाचे विधान करतो. इतका नामवंत वकील असे थेट वर्गभेद दर्शवणारे पोलिटिकली इन्करेक्ट स्टेटमेंट करेल ? आणि केलेच तर त्यावर कोर्ट आक्षेप घेणार नाही का ?

   
असो. पण हे मुद्दे एकूण सिनेमाचा आवाका आणि विषय मांडणीच्या धाडसापुढे छोटे आहेत. कलाकारांच्या अचूक निवडीमुळे सिनेमा अधिक प्रभावीपणे पोहोचतो. तुषार दळवी(सोहेलचे वडील) , सुप्रिया विनोद (सोहेलची आई), संजय मोने (वकील) आणि सुलभा देशपांडे (आजी)  यांच्या अभिनय कौशल्याविषयी आपण जाणतोच. पण विशेष उल्लेख करावा लागेल तो बालकलाकार प्रहर्ष नाईक(सोहेल) आणि संदीप पाठक (श्री. गांगण) यांचा. प्रहर्ष नाईकने त्याची भूमिका कमालीच्या समंजसपणे केली आहे. हट्टीपणा, तुसडेपणा, कुठल्याही गोष्टीसाठी हटून बसणे, आपली मैत्रीण गायब झाल्याची बातमी कानावर आल्यानंतरचे गांगरून जाणे सगळे त्याने अगदी चपखलपणे दाखवले आहे.  बऱ्याचदा विनोदी भूमिकांमध्ये चमकणाऱ्या संदीप पाठकने अवघ्या देहबोलीतून एका बापाची उद्विग्नता, वेदना, भावाविवशता प्रकट केली आहे. भाग्यश्री पाने यांची सौ. गांगण देखील लक्षवेधी आहे.

   
प्रेक्षकशरण व्यावसायिकतेला जागून सिनेमाचा त्यांना आवडेल असा सुखांत करणे आणि त्यांचे झोपेचे सोंग 'डिस्टर्ब' न करणे, त्या नादात मूळ कथानकामागचा गंभीर विचार मिळमिळीत आणि प्रभावहीन करणे (दुनियादारी आणि पोपट ही अलीकडची ठळक उदाहरणे) हा टिपिकल बॉलीवूडी कित्ता न गिरवल्याबद्दल रत्नाकर मतकरींना आणि निर्मात्यांनाही धन्यवाद द्यायला हवेत.  मुलांना नको त्या वयात नको त्या गोष्टींचे एक्स्पोजर देणाऱ्या, भविष्य सुखाचे व्हावे म्हणून कोणतेही वाकडे मार्ग अनुसरणाऱ्या पालकांना आपण नक्की काय संस्कार त्यांच्याकडे संक्रमित करतोय याचे भान नसणे यातूनच मतकरींसमोर कथेची आणि सिनेमाची निर्मिती झाली आहे हे नक्की आणि याचे गांभीर्य जाणवण्यासाठी सिनेमाचा खिन्न करणारा अंत होणेच गरजेचे होते.  असे वेगळे काही मांडू पाहणारे प्रयोग प्रेक्षक या नात्याने आपण उचलून धरायलाच हवेत…  अन्यथा मातलेले पॉपकॉर्नपट आहेतच बाजारात …