Total Pageviews

Saturday, March 20, 2021

Railways and The Raj : भारताच्या धमन्यांचा इतिहास

 


 



भारतासारख्या खंडप्राय देशाचा कारभार चालवणं खूप कष्टाचं आणि कौशल्याचं काम आहे.  अठरापगड जाती, धर्म, भाषा, प्रांत आणि त्या त्या प्रदेशाचे सांस्कृतिक कंगोरे यांच्यासोबत व्यवस्था, नियम, कायदे यांची सांगड घालूनच आपल्या देशाचा गाडा हाकावा लागतो. भारताला प्रशासकीय पातळीवर जोडून ठेवणाऱ्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांमध्ये चट्कन लक्षात येणार नाही असा परंतु प्रत्यक्षात महत्वाचा वाटा असणारी गोष्ट म्हणजे भारतीय रेल्वे. इंग्रजांनी आपल्या कारभाराच्या सोयीसाठी उभे करत गेलेली ही यंत्रणा बघता बघता देशव्यापी झाली आणि भारताच्या प्रगतीची साक्षीदार आणि भागीदार दोन्हीही बनली. या सेवेने देशाची सुदूर टोकं एकत्र आणली. ते घडत असताना इथला समाज, इथल्या व्यवस्था ढवळून निघत गेल्या . सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक ताण्याबाण्यांनी बनलेली भारतीय रेल्वेची कहाणी अतिशय चित्तवेधक आहे आणि ‘ख्रिश्चन वूल्मर’लिखित ‘रेल्वेज अंड द राज’ या पुस्तकातून ती विलक्षण तपशिलांसह मांडली गेली आहे. 


इंग्रजांसाठी अत्यावश्यक सोय

१६०० साली ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने भारतात पाऊल ठेवलेल्या इंग्रजांनी धूर्तपणे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली  मुळं रोवत भारताला इंग्रजांची वसाहत बनवलं. १८५७ साली अनपेक्षितपणे इंग्रजांविरोधात उभा राहिलेला स्वातंत्र्यलढा त्यांनी निकराने मोडून काढला असला तरी या घटनेचे इंग्रज अतिशय सावध झाले. यापुढे आपल्याला भारतावर राज्य करायचं असेल तर अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्याच बरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने भारताची पकड अधिक तीव्रतेने आणि वेगाने मजबूत करायला हवी याची त्यांना जाणीव झाली. भारताचा ताबा कंपनीकडून अधिकृतपणे ब्रिटीश सरकारकडे गेला. पुन्हा बंडाची परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी अतिशय वेगाने सैन्य पाठवण्यासाठी दळणवळणाच्या वेगवान सोयींची आवश्यकता होती. त्याचसोबत  भारतातल्या अंतर्गत भागांमधला कच्चा बंदरांपर्यंत पोचवणे इंग्रजांच्या व्यापाराच्या आक्रमक वाढीसाठीही आवश्यक होते. या दोन्ही उद्देशांची पूर्तता करण्याचं अतिशय प्रभावी माध्यम होतं ते म्हणजे रेल्वे!  

भारतात रेल्वेची झपाट्याने वाढ होण्याचं श्रेय जातं लॉर्ड डलहौसीला. त्याने अतिशय निग्रहपूर्वक आणि दूरदृष्टीने रेल्वे उभारणी आणि विस्ताराचं काम लावून धरलं. भारतात रेल्वे सुरू होण्यापूर्वी वीस वर्ष अगोदरच इंग्लंड मध्ये रेल्वे सेवेला प्रारंभ झाला होता. त्यामुळे या क्षेत्रात अनुभव असलेल्या रेल्वे कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी इंग्रज प्रस्ताव ठेवू लागले. त्यांच्या आवाहनामुळे विविध खासगी रेल्वे कंपन्या भारतामध्ये व्यवसाय करण्यास सज्ज होऊ लागल्या. ज्या काळात इंग्लंडमध्ये गुंतवणुकीवरचा व्याजदर ३.५ टक्के होता त्या काळी या इंग्रज सरकारने रेल्वे कंपन्यांना ५% परताव्याची हमी दिल्याने या प्रकल्पांमध्ये गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर झाली आणि धुमधडाक्यात रेल्वेमार्ग उभारणी सुरू झाली. रेल्वे ही भारतीयांसाठी प्रचंड अप्रूपाची गोष्ट होती बोरीबंदर स्टेशन वरून ठाण्याकडे धावलेली पहिली रेल्वे म्हणजे भारतात या तांत्रिक प्रगतीचा एक विलक्षण टप्पा होती स्वतःच्या कारभारासाठी रेल्वे बांधणारे इंग्रज इथल्या  जनतेकडून या गोष्टीला कितपत पाठिंबा मिळेल याबाबत साशंक होते परंतु इंग्रजांची ही भीती एतद्देशीय बघता बघता मोडून काढली आणि फक्त टांगे, बैलगाड्या यांचीच सवय असणाऱ्या भारतीयांनी या वेगवान वाहतुकीला तिच्या गुणदोषांसहित आपलेसे केले आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे हुरूप येऊन इंग्रजांनी रेल्वेमार्गांचे वायव्य सरहद्दीपासून ते ईशान्य भारतापर्यंत आणि दिल्लीपासून ते मद्रासपर्यंत जाळं विस्तारत नेलं. हळूहळू या मार्गांना इतकं महत्व आलं की जणू हे रेल्वेमार्ग आपल्या देशाच्या धमन्याच बनले.  

 

अडथळ्यांवर मात

भारतासारख्या प्रचंड भौगोलिक वैविध्य असणाऱ्या देशांमध्ये रेल्वे लाईन टाकण्यासाठी भरपूर अभ्यास आणि तांत्रिक अचूकतेची आवश्यकता होती. मोठमोठ्या नद्या, डोंगराळ प्रदेश, खडकाळ प्रदेश, बदलत जाणारं तापमान या सर्व अडचणींमधून मधून मार्ग काढणं जिकिरीचं होतं. गंगेसारख्या प्रचंड जलस्त्रोतावरून पूल बांधणे, बोर घाटासारख्या कठीण घाटातलम जंगल साफ करणे आणि बोगदे खणणे अशी आव्हानं इंग्लंडमधून खास बोलवल्या गेलेल्या इंजिनिअर्सनी स्वीकारली. या कामासाठी इंग्रजांनी केलेली तयारी थक्क करणारी आहे. इंग्रज आणि भारतीयांदरम्यान प्रचंड भाषिक, सांस्कृतिक दरी असतानाही इथल्या कामगार आणि कारागीरांकडून कामं करून घेण्यासाठी त्यांनी कुठलं कसब वापरलं असेल हे अभ्यासलं जायला हवं. 

 

रेल्वेचे सामाजिक परिणाम

रेल्वेमुळे झालेले अनेक पदरी सामाजिक परिणाम लेखक वूल्मर यांनी तपशिलाने आपल्यासमोर मांडले आहेत आणि हाच या पुस्तकातला सर्वात लक्षवेधी भाग आहे. रेल्वेने जसं स्थानिक कच्चा माल बाहेरच्या बाजारपेठांमध्ये नेणं शक्य केलं तसंच कुठलाही माल कुठेही मिळू लागल्यामुळे त्या त्या गावच्या आर्थिक स्वावलंबीत्वाला सुरुंगही लागला. रेल्वेमुळे तीर्थाटन सोपं झालं. आता जीवावर उदार होऊन जंगल आणि काट्याकुट्यांमधून प्रवास करायची गरज उरली नाही. शिवाय प्रमुख सणवारांशिवाय देखील तीर्थयात्रा घडू लागल्या आणि त्या त्या तीर्थक्षेत्रीचं स्वतंत्र अर्थकारण आकाराला येऊ लागलं जे अगदी आजपर्यंत चालू आहे. 

जसजशी रेल्वे भारतातल्या अंतर्गत भागांमध्ये येऊ लागली तसतशी इंग्रजांची पकड घट्ट झाली आणि स्थानिकांना ‘इंग्रज आपल्या धर्मात ढवळाढवळ करून त्यांचा धर्म आपल्यावर लादतील अशी भीती वाटू लागली. शिवाय एकाच गाडीच्या एकाच डब्यातून परजातीच्या माणसांसोबत प्रवास करण्यामुळे आपली जात भ्रष्ट होत असल्याची भावनाही होऊ लागली.. रेल्वेच्या डब्यात जातीय उच्च्चनीतेनुसार वेगळी व्यवस्था करणे त्यात पुन्हा स्त्रियांच्यासाठी वेगळी व्यवस्था करणे अशा अनेक अवास्तव अपेक्षा प्रवाश्यांकडून असत ज्या पुरवताना रेल्वे कंपन्यांची मोठी पंचाईत होई…  सामाजिक जीवनातल्या जुन्यापुरण्या धारणा, धार्मिक समजुती आणि जातीय संकल्पना या सर्वांना घुसळून काढणारा हा एक विलक्षण बदल होता आणि तो रोखणे कुणालाही शक्य नव्हतं. भारत हळूहळू पण निश्चितपणे अधिक प्रगत व्यवस्थेकडे वाटचाल करू लागला होता. 

 रेल्वेचा अनेक अंगांनी वेध

पुस्तकामध्ये रेल्वेच्या इतिहासाचा आढावा घेताना रेल्वे संबंधी अनेक अंगांचा बारकाईने ऊहापोह केला आहे रेल्वे वाहतुकीसाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी, मार्गांची आखणी, तांत्रिक सहाय्य, परदेशातून आयात केले गेलेले तंत्रज्ञान, त्यासाठी इंग्रज सरकारकडून केली गेलेली आर्थिक तजवीज, रेल्वेच्या आर्थिक व्यवहारा मागचं राजकारण आणि अर्थकारण, मालवाहतूक, सैन्याची वाहतूक अशा अनेक अंगांचे पैलू अगदी विस्ताराने मांडले आहेत. रेल्वेमुळे उपलब्ध होत असलेले रोजगार, कामगारांच्या युनियन्स आणि त्यांचे संप, कामाच्या स्वरूपानुसार असणारी उतरंड आणि त्यामुळे तयार झालेले वर्ग अशा अनेक अपरिचित अंगांना स्पर्श केल्यामुळे रेल्वे नावच्या अवाढव्य सेवेला वरवर लक्षातही येणार नाही किती बारीक कंगोरे आहेत हे जाणवल्यावर अचंबित व्हायला होतं. 

लेखक केवळ घटना नमूद न करता त्या त्या घटनांमुळे मनुष्यजीवनावर काय बरेवाईट परिणाम झाले हे शोधत गेल्याने असल्यामुळे त्याच्या लिखाण कोरडं रहात नाही. तिसऱ्या वर्गातून प्रवास करणाऱ्या अतिशय सामान्य आणि गरीब नागरिकांच्या प्रचंड गैरसोयीबद्दल त्याने अतिशय विस्ताराने लिहिलं आहे. अगदी तिसरा वर्ग सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत असूनही तिसऱ्या वर्गाच्या डब्यात स्वच्छतागृहं, पुरेशी मोकळी जागा पुरवण्यात रेल्वे कंपन्यांनी केलेली टाळाटाळ, त्यातून प्रवाशांचे होणारे हाल आणि ग्राहक असूनही त्यांच्याकडे बघण्याचा कंपन्या आणि सरकारचा दृष्टीकोन दाखवून देऊन प्रगत, विचारी आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या इंग्रजांच्या तुच्छतावादी मानसिकतेबद्दल लेखकाने आडपडदा न ठेवता लिहिलं आहे.


मनोरंजक किश्श्यांची जोड  

पुस्तकात आकडेवारी, रेल्वेचे व्यावसायिक तपशील अशी माहिती अतिशय सविस्तर असूनही त्या तांत्रिक बाबींना किश्श्यांची जोड दिल्यामुळे पुस्तक रुक्ष राहात नाही, शिवाय तात्कालिक समाजाची मानसिकता, समजुती यांवरही प्रकाश पडतो. 

उदाहरणार्थ : 

• पहिली रेल्वे धावण्यापूर्वी grant trunk road या रस्त्यावरून वाफेचं रेल्वे इंजिन चालवण्याचा अयशस्वी प्रयोग करून पाहिला गेला होता.  

• इंग्रजांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून उन्हाळ्यात ते सगळा कारभार हिल स्टेशनला हलवत असत आणि त्यांची व बायकामुलांची सोय व्हावी म्हणून सिमला, उटी, दार्जीलिंग या ठिकाणच्या toy trains चालू केल्या गेल्या

• बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान पहिली रेल्वे धावली त्या वेळी ‘रेल्वे म्हणजे लोखंडी राक्षस आहे’, ‘रूळ टाकण्यास सुरुवात करण्यापूर्वी काही बालकांचा बळी देऊन ती त्या मार्गावर पुरावी लागतात’, ‘रेल्वेमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चटकन गेल्यामुळे आपला एकूणच आयुष्याचा विस्तार कमी होतो’ अशा समजुती स्थानिक समाजमनात रुजल्या होत्या इ. 


नाण्याच्या दोन्ही बाजूंची चर्चा

 रेल्वेच्या या सखोल इतिहासाची चर्चा करताना इंग्रजी मानसिकतेच्या गुण दोषांची अतिशय तटस्थ वृत्तीने मांडणी केली आहे. रेल्वे म्हणजे इंग्रजांसाठी एक दुधारी शस्त्र होतं असंही प्रतिपादन लेखक करतो. कारण एकाच वेळी इंग्रज आणि क्रांतिकारक व राष्ट्रवादी या दोन्ही टोकांना रेल्वे उपयुक्त ठरली. त्यामुळेच एकीकडे एवढा अवाढव्य पसारा कुशलपणे हाताळून मार्गी लावणाऱ्या दऱ्याखोऱ्यातून हिल स्टेशन मधून आणि वाळवंटातून रेल्वे मार्ग बांधणाऱ्या एकीकडे कौतुक वाटतं तर त्याचबरोबर मागे असणारे त्यांचे अतिशय धूर्त, स्वार्थी आणि भारतीयांप्रती असणारे तुच्छ विचार देखील आपल्याला दिसतात. आधुनिक विचारांचे समजले गेलेल्या परंतु प्रत्यक्षात ‘स्थानिकांना जास्त जबाबदारीची कामं (उदा. इंजिन चालक) देऊ नयेत कारण त्यांची तेवढी कुवतच नाही’ अशी ठाम समजूत असणाऱ्या इंग्रजांपासूनच हा श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेदाभेद कसा केला जायचा हे लेखक परखडपणे सांगतो.

लेखक ख्रिश्चन वूल्मर हे रेल्वेचे इतिहासकार म्हणूनच प्रसिद्ध असून यापूर्वी त्यांनी इंग्लंड व अन्य ठिकाणच्या रेल्वेचा इतिहास शब्दबद्ध केलेला आहे. या पुस्तकात भारताच्या पहिल्या रेल्वेच्या आधीपासून ते कोकण रेल्वेच्या बांधकामापर्यंत अतिशय मोठा कालखंड आणि कार्यखंड लेखकाने अभ्यासला आहे. त्यासाठी त्यांनी इंग्रजांचा पत्रव्यवहार, गॅझेटियर्स, प्रवासवर्णनं असे अनेक समकालीन संदर्भ, तसेच भारतीय रेल्वेवरील अन्य लेखकांची पुस्तकं यांचा भरपूर अभ्यास केला आहे. भारताकडे पाहणाच्या सर्वसाधारण युरोपीय मनोवृत्तीपेक्षा वूल्मर यांचा भारताकडे पाहण्याचा अधिक समंजस आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन पुस्तकभर जाणवत राहतो, त्यामुळे पुस्तकाच्या प्रभावात भर पडते. 

 

पुस्तक : Railways and the Raj

लेखक : Christian Wolmar

प्रकाशक : 

पृष्ठसंख्या : ३८४

आवृत्ती : नोव्हेंबर २०१७

किंमत : ३५० रू. 



Wednesday, March 3, 2021

राममंदिर निधी संकलन अभियानाचे सखोल नियोजन

राममंदिर निधी संकलनाच्या निमित्ताने संपूर्ण देश रामरंगी रंगून निघाला आहे असं म्हणायला हरकत नाही. समाजाच्या सर्व स्तरांतून हा निधी उभा करण्यासाठी आनंदाने हातभार लावला जातोय. या संबंधीचे विविध अनुभव आपल्याला वर्तनमानपत्रं, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमं या दोन्ही ठिकाणी वाचायला बघायला मिळत असतीलच. पण निधीसंकलनाचा एवढा प्रचंड व्याप सांभाळला कसा जातोय याबद्दल अनेकांना कल्पना नसेल. हजारो स्वयंसेवक घरोघर संपर्क करून निधी उभा करत असताना पडद्यामागे एक मोठी यंत्रणा हे नियोजन करत होती. सखोल नियोजनाच्या बळावर ही गोष्ट कशी साध्य झाली हे या लेखामधून सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

रोख पैसा ही अतिशय जोखमीची गोष्ट. रामभक्तांनी श्रद्धेने दिलेला निधी सांभाळून ठेवणे आणि त्या पै न् पैचा हिशोब ठेवणे या गोष्टी सुरळीतपणे पार पाडायच्या असतील तर व्यवस्थित नियोजन ही गोष्ट अत्यावश्यक ठरते. 'पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन' हा आग्रह संघकामामध्ये कायम धरला जातो. त्यालाच अनुसरून प्रत्यक्ष अभियान सुरु होण्याच्या खूप आधीपासून आर्थिक बाजूचे नियोजन सुरु झाले होते. सर्वसाधारणपणे संघाच्या रचनेतून कोणतेही व्यापक संपर्क अभियान अथवा मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन होतं तेव्हा प्रांतापासून पासून ते वस्तीपर्यंत योजना केली केली जाते. संघदृष्ट्या 'नगर' हे कार्यक्षेत्र अतिशय महत्वाचं असतं. शहरी भागामध्ये साधारणपणे चार वॉर्ड मिळून होईल एवढा परिसर 'नगर'. माझ्या भवतालच्या कार्यक्षेत्राच्या रचनेबद्दल बोलायचं तर चार नगरं मिळून एक गट आणि असे पाच गट मिळून पिंपरी-चिंचवड जिल्हा (संघकार्याच्या दृष्टीने) अशी रचना आहे.

अभियानासाठी या जिल्हा ते वस्ती या प्रत्येक स्तरावर विशेष नियुक्त्या केल्या गेल्या. 'अभियान प्रमुख आणि सहअभियानप्रमुखाने घरोघर संपर्काची रचना लावणे आणि हिशोब प्रमुखाने अभियानासाठी हिशोबाच्या बारकाव्यांमध्ये लक्ष घालणे आणि त्यासाठीची पूर्वतयारी करणे अशी कामाची ढोबळमानाने विभागणी होती. माझ्याकडे आकुर्डी नगराचा हिशोब प्रमुख हे दायित्व होतं. हिशोब प्रमुख या नात्याने सर्व वस्तीप्रमुखांना कूपनपुस्तक आणि पावतीपुस्तक यांचे रोजच्या रोज वाटप करणे आणि त्याची तपशिलाने नोंद ठेवणे आवश्यक असे. प्रत्येक पुस्तकावर आणि पुस्तकातल्या प्रत्येक पावती/कूपनवर अनुक्रमांक असे. एकूण निधी संकलनात सहभागी कार्यकर्त्यांकडून होणारी पुस्तकांची मागणी आणि केंद्रीय स्तरावरून होत जाणारा पुरवठा यांचा ताळमेळ ठेवणे ही एक तारेवरची कसरतच होती. या पुस्तकांची छपाई केंद्रीय स्तरावर फक्त एकाच ठिकाणी होत असल्याने तिथून अगदी पार नगरापर्यंत टप्प्याटप्प्याने वितरण होईपर्यंत काळजी बाळगणे आणि संयम ठेवणेही आवश्यक असे.

रोज संपर्क होणाऱ्या घरांच्या संख्येचे उद्दिष्ट मोठे असल्याने रोज निधीही मोठ्या प्रमाणावर जमा होत असे. त्या निधीचा भरणा करण्यासाठी प्रत्येक वस्तीसाठी एक अथवा दोन वस्त्यांचा मिळून एक 'जमाकर्ता' (Depositor) नियुक्त केला गेला होता. रोज प्रत्येक उपवस्तीमध्ये घरोघर संपर्क करत फिरणाऱ्या प्रत्येक जोडीमध्ये एक जण अभियानाची माहिती देणारा तर दुसरा जण निधी घेणारा म्हणजेच 'संग्रहकर्ता' असे. प्रत्येक संग्रहकर्ता दिवसभरात जमा झालेला निधी आपल्या वस्ती अभियान प्रमुखाकडे जमा करत असे आणि वस्ती अभियान प्रमुख व त्या वस्तीचा जमाकर्ता रोज रात्री एकत्र भेटून त्या दिवसाचा हिशोब पूर्ण करत. दर दिवशी जमा झालेला निधी दुसऱ्या दिवशी भरण्याची जबाबदारी जमाकर्त्याची असे.

निधी देणाऱ्या व्यक्तीला तेवढ्या रकमेचे कूपन अथवा पावती दिली जाई. दिली गेलेली रोख रक्कम १० ते २००० रुपयांदरम्यान असेल तर त्या बदल्यात देणगीदाराला १०, १०० किंवा १००० रुपयांचे कूपन त्याच्या किमतीच्या योग्य त्या पटींमध्ये दिले जाई. २००१ पासून वरच्या रकमेसाठी रोख अथवा धनादेश स्वरूपात रक्कम देण्याची मुभा होती. परंतु करामध्ये 80Gची सवलत हवी असल्यास मात्र धनादेश देणे आवश्यक होते. अभियानप्रमुखाकडे निधी जमा करताना प्रत्येक संग्रहकर्त्याने एक प्रपत्रक (फॉर्म) भरून देणे अपेक्षित होते. या प्रपत्रकात संबंधित संग्राहकर्त्याने त्या दिवशी ज्या पुस्तकातून कूपन अथवा पावती दिली गेली त्या पुस्तकाचा क्रमांक, १०, १०० आणि १०००ची प्रत्येकी किती कूपन्स दिली गेली, चेक घेतला असल्यास त्या चेकचा क्रमांक, बँक इत्यादी तपशील प्रत्येक संग्रहकर्त्याने वस्ती अभियानप्रमुखाकडे जमा केल्यास तो वस्ती अभियानप्रमुख आणि जमाकर्त्याला दिवसाच्या शेवटी हिशोबाचा ताळमेळ करणे सोपे होई. निधीचा हिशोब करताना बऱ्याच गोष्टींचे व्यवधान ठेवणे गरजेचे असे. त्यासाठी जमाकर्त्याच्या मदतीला होते एक महत्वाचे साधन : एक विशेष मोबाईल ॲप! संपूर्ण अभियानाच्या हिशोब नियोजनातील ही अतिशयउल्लेखनीय गोष्ट होती.

अभियानाची सुरुवात होण्याआधीच प्रत्येक जमाकर्त्यासाठी एक विशेष क्रमांक (ID) तयार केला गेला. ॲपमध्ये रोज त्या त्या वस्तीतील एकूण कूपन्स, पावत्या व धनादेश यांच्या तपशिलांची नोंद जमाकर्ता करत असे. तशी नोंद करण्यापूर्वी संबंधित पावती पुस्तक/ कूपन पुस्तकाची नोंदणी ॲपमध्ये स्वतःच्या नावावर करणे अनिवार्य असे. रात्री ॲपमध्ये नोंद करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी जमकर्ता धनादेश व रोख रक्कम यांचा बँकेत भरणा करत असे.

बँकेत पैसे भरणे सुलभ व्हावे यासाठी काही गोष्टी केंद्रीय स्तरावरून केल्या गेल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक या तीन बँकांमध्ये राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या नावाने खाते उघडण्यात आले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तिन्ही बँकांमध्ये राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या खात्यासाठी विशेष भरणा पावती (deposit slip) होती. त्यामुळे जमाकर्त्याला रोज बँक खाते क्रमांक त्या पावतीवर लिहिण्याची आवश्यकता राहिली नाही. फक्त रोज भरणा करताना त्या पावतीवर जमाकर्ता क्रमांक लिहिणे आवश्यक होते, जेणेकरून अभियान चालू असताना प्रत्येक जमाकर्त्याने केलेला ॲपमध्ये भरलेली माहिती आणि त्या प्रत्येक जमाकर्त्याने बँकेत केलेला एकूण भरणा यांचा अभियानसमाप्तीनंतर ताळमेळ व्हायला मदत व्हावी. ज्या ज्या जमाकर्त्याने ॲपमध्ये नियमितपणे आणि अचूक माहिती भरली त्याला अभियानसमाप्तीनंतर हिशोब पूर्ण करणे सोपेही गेले आणि त्यामध्ये जास्त वेळही गेला नाही. ॲपमध्ये असणाऱ्या update now या बटणावर क्लिक केले की भरलेली माहिती मुख्य सर्व्हरवर अद्ययावत व्हायची. बँकेत भरलेली रक्कम आणि ॲपमध्ये भरलेली माहिती यात तफावत असेल तर ॲपमध्ये तशी नोंद दिसायची. त्याचप्रमाणे भरलेल्या धनादेशाचे तपशील आणि धनादेश वटला की नाही याबाबतची सद्यस्थितीची त्यामध्ये दिसायची. त्यामुळे जमाकर्त्याला आपल्या कामाचा सारांश आणि तपशील हे दोन्ही या ॲपमध्ये पाहता आले. अभियान संपल्यानंतर सर्व जमाकर्त्यांची एकूण भरणा झालेली रक्कम आणि त्यांनी वापरलेली एकूण कूपन्स यांचा ताळमेळ करून हिशोब पूर्ण करण्यात आला. ॲपमध्ये भरलेल्या माहितीवर लक्ष ठेवता यावे यासाठी गट व जिल्हा हिशोब प्रमुखांना एका विशेष वेबसाईटचा ऍक्सेस देण्यात आला होता. त्यांच्याकडून जमाकर्त्यांना नियमितपणे होणाऱ्या पाठपुरावा होत राहिला तसेच कुठलीही शंका असल्यास त्याबाबाबत लगेच माहिती पुरवली जाई. जमाकर्त्याला काही तांत्रिक अडचण आल्यास  कॉल सेंटर हेल्पलाईनवर मदतही उपलब्ध करून दिली गेली होती. अशा प्रकारे ॲप मदतीला असल्याने कूपनपुस्तक/पावतीपुस्तक कुणाच्या नावावर आहे हे शोधून काढणे गट व जिल्हा कार्यकर्त्यांनाही शक्य झाले. या सर्व कामामध्ये बँकांकडूनही उत्तम प्रकारे सहकार्य मिळाले. म्हणूनच अभियान संपल्यावर बँकेमध्ये कर्मचारी व व्यवस्थापक यांची भेट आवर्जून घेऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

एकूणच अभियानाच्या उत्साहाला हिशोबाच्या नियोजनाची जोड मिळाल्याने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसोबतच विश्व हिंदू परिषद, अखिल भरतीत विद्यार्थी परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय स्त्री शक्ती इ. समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही महत्वाचं योगदान दिल्याने अभियान यशस्वीपणे पार पडण्यास मोठीच मदत झाली. अधिकाधिक घरांपर्यंत श्रीराम मंदिर हा विषय पोचवणं आणि या निमित्ताने संपर्कात येणाऱ्या अनुकूल व्यक्तींना संघकार्याशी जोडून घेणं, पूर्वी संघ अथवा समविचारी संस्थांचे कार्य केलेले आहे परंतु सध्या कार्यरत नाहीत अशा जुन्या कार्यकर्त्यांशी पुन्हा संबंध प्रस्थापित करणं हे या अभियानाचे महत्वाचे उद्देश होते. त्या दृष्टीनेही हे अभियान नक्कीच यशस्वी ठरलं आहे हे निश्चित.

 (मार्च महिन्याच्या 'हिंदूबोध' मासिकात प्रकाशित लेख)

Tuesday, March 2, 2021

संचार : चिं. वि. जोशी यांचे प्रवासवर्णन


चिं. वि. जोशींनी भारताच्या विविध भागांना दिलेल्या भेटींचे प्रवासवर्णन 'संचार' या पुस्तकात आहे.  आहे. साधारणपणे १९१४ ते १९४५ दरम्यान केलेले हे प्रवास आहेत. जुन्या काळातलं प्रवासवर्णन हा खूप रंजक अनुभव असावा हे गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' मधून आणि मुकुंद वझे यांच्या 'प्रवासवर्णनांचा प्रवास' वाचून लक्षात आलं होतं. त्यामुळे हे पुस्तक घेण्यामागे चिं. वि. जोशींच्या नावापेक्षाही त्यातल्या कालखंडाचं कुतूहल हे जास्त कारणीभूत होतं. पुस्तकात विजापूर, उत्तर काठेवाड, जुनागड, बंगाल, मध्य प्रदेश, साल्हेर-खान्देश, त्रावणकोर-मदुरै, मेवाड अशा प्रांतांचे प्रवासवर्णन आहे.  चिं. वि. जोशी स्वतः बडोदा संस्थानच्या चाकरीत होते. त्यांच्या कामाचे स्वरूप निश्चित कळत नसले तरी शिक्षण क्षेत्राशी संबंधित असावे. कारण पुस्तकात इंडियन हिस्टोरिकल रेकॉर्ड कमिशनच्या अधिवेशनाला बडोदा सरकारचे प्रतिनिधी या नात्याने गेल्याचे दोन-तीन लेखांमध्ये उल्लेख आहेत. शिवाय एका लेखात "आमच्या बडोदा कॉलेजच्या क्रिकेट संघासोबत जुनागडला प्रवास" केल्याचा उल्लेख उल्लेख आहे. याशिवाय पाली भाषेच्या अभ्यासात धर्मानंद कोसंबी आपल्याला गुरुस्थानी होते, असा चिं. विं. नी  कुठल्याश्या पुस्तकात उल्लेख केल्याचं स्मरतंय. असो. कामानिमित्ताने तसेच वैयक्तिक प्रवासही जमेस धरता त्या काळाच्या मानाने चिं. विं. नी पुष्कळच प्रवास केला म्हणायला हवं. 

सुरुवातीचा प्रवास  फक्त रत्नागिरी ते गणपतीपुळे असा आहे. शंभर वर्षांपूर्वी एवढ्याश्या प्रवासाला सुद्धा बरेच सायास पडत. हा प्रवास पायी केलेला होता. "गाडी रस्ता सोयीचा नसल्याने कोकणात बहुतेक प्रवास पायीच करावा लागतो" असं चिं. वि. नोंदवतात. हे अंतर सहा कोस. शंभर वर्षांपूर्वी एवढ्याश्या प्रवासाला सुद्धा बरेच सायास पडत. चिं. विं. ना प्रवासात तीन वेळा खाडी पार करावी लागली. लेखाच्या शेवटी 'श्रीक्षेत्र गणपती-पुळे माहात्म्यवर्णन' नावाच्या पुस्तकाचा उल्लेख आहे. त्यातल्या दोन प्रथा चिं. विं. नी पुस्तकात दिलेल्याही दिल्या आहेत. 

१) दर गणेशचतुर्थीला सकाळी सहा तास ब्राह्मणेतरांना गाभाऱ्यात प्रवेश करण्याची व मूर्तीस स्पर्श करण्याचीही मुभा आहे. अन्य वेळी ब्राह्मणेतरांनी सभामंडपातूनच दर्शन घ्यावे. 

२) दुसऱ्या दिवशी हत्यारांची पूजा करून बकऱ्याचा बळी दिला जातो. 

त्या काळातला ब्राह्मणांचा व्यवहार पाहता पहिल्या प्रथेबाबत आश्चर्य वाटले नाही. पण पुळ्याच्या गणपतीसमोर बळी हा प्रकार नवीन वाटला. चिं. वि. स्पष्ट शब्दांत "ही हिंसा बंद व्हायला हवी" असं नमूद करतात. ब्राह्मणेतरांना वर्षभर गाभाऱ्यात प्रवेश न देण्याबद्दलही नाराजी व्यक्त करतात. चिं. वि. मंदिरांत वगैरे जात असले तरी फार मोठे भाविक नसावेत असं या आणि अन्य लिखाणावरूनही वाटतं. पुळ्याला आणि पुढच्याही एका प्रकरणात मंदिर परिसरात रूढींच्या नावाखाली केलेला आगाऊपणा करणाऱ्याला चिं. विं. नी खपवून न घेतल्याचे उल्लेख आहेत. 

बंगालच्या प्रकरणात १९४०च्या दशकातल्या बंगाली नाटकाचं वर्णन आलं आहे. अन्य भागातल्या रंगभूमीविषयी त्या काळातल्या मराठी साहित्यात कितपत लिहून आलं असावं याची शंकाच वाटते. अन्य प्रकरणं वर्णनात्मक आहेत, त्यावर इथे वेगळं लिहावं असं काही नाही. पण पुस्तक चिं. विं. चे आहे म्हटल्यावर अपेक्षित होता तसा खुसखुशीतपणा मात्र  अभावानेच दिसल्याने त्या आघाडीवर मात्र निराशाच झाली. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत असणारं 'बडोद्यातील जलप्रलय' हे प्रकरण मात्र यातून वगळ्याचं दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने प्रकाशकाने या पुस्तकात लिहिलेल्या टिपणामुळे कळलं. असले बदल का करतात हे खरंच अनाकलनीय असतं. असा 'आँखों देखा हाल' म्हणजे किती महत्वाचा दस्तावेज असतो! तो वगळून नक्की काय साध्य केलं असेल? अर्थात दुसऱ्या आवृत्तीत दोन प्रकरणं नव्याने समाविष्टही केली गेली आहेत. त्यातलंच एक प्रकरण 'खैबरघाटाची सफर'  माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं प्रकरण वाटलं. कारण भारतापासून कायमच्या तुटलेल्या त्या भागात जायचा अनुभव असणारी मराठी माणसं आणि त्यातूनही कुणी ते अनुभव लिहून ठेवलेले असणं हे दुर्मिळच.. 

चिं. वि. १९४५ मध्ये इंडियन हिस्टोरिकल रेकॉर्ड कमिशनच्या अधिवेशनाला पेशावरला गेले होते. विशेष म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा धाकटा भाऊ राहात होता. कराचीमध्ये मराठी लोक पुष्कळ होते, इतकंच काय अगदी आत्ताही तिथे मराठी शाळा आहे असं वाचण्यात आलं होतं. पण पेशावरसारख्या वायव्येच्या भागातही मराठी माणूस राहायला होता हे वाचून नवल वाटलं. या प्रकरणात पुढे तसे अनेक उल्लेख आहेत. दिल्लीहून पेशावरला जाताना गाडीत चिं. विं. ना महामहोपाध्याय द. वा पोतदार भेटले! त्यांच्या सोबतीमुळे ज्या ज्या प्रदेशातून रेल्वे गेली त्या त्या प्रदेशाचा इतिहास चिं. विं. ना जाणून घेता आला. 
पुढे येऊ घातलेल्या अराजकाची १९४५च्या या प्रवासात चाहूल लागली असावी. कारण "आम्ही हिंदू आहोत असं मुसलमानांना कळलं तर आमची अब्रू धोक्यात येईल, म्हणून आम्ही कुंकू लावत नाही" असं म्हणणाऱ्या बायकाही भेटल्या. यापुढच्या नोंदी वाचताना आज रोचक वाटतात, कारण आज त्यावर विश्वास बसणंही अशक्य व्हावी अशी परिस्थिती आहे. ते वाचताना आपल्या हिंदू मनाला सुया बोचतात. या प्रवासात चिं. विं. नी एका टेकाडावरच्या गोरखत्री नावाच्या स्थानबद्दल लिहिले आहे. हे गोरखनाथांचे स्थान, परंतु हे नाथ संप्रदायातील सुप्रसिद्ध गोरखनाथ नव्हेत, हे त्याच नावाचे दुसरे. याचं वैशिष्टय असं की एक मशीद पाडून त्यावर हे उभं केलेलं आहे. "मंदिरे पाडून मशिदी केल्याचे दाखले हिंदुस्थानात लक्षावधी आहेत, परंतु मोठी थोरली मशीद तिच्याजवळील सराईसह जमीनदोस्त करून तेथे मंदिर बांधल्याचे उदाहरण मला वाटते हे एकच असेल. हे श्रेय प्रसिद्ध शीखसुभेदार अबू ह्यास. हा सन १८३८-४२ पर्यँत पेशावरचा सुभेदार होता. हिंदुमहासभेने ह्या सुभेदाराचा पुतळा अवश्य उभारला पाहिजे" ही चिं. विं. ची प्रतिक्रिया बोलकी आहे.  

याशिवाय चिं. वि. , प्राध्यापक शेजवलकर (बहुदा पानिपत अभ्यासक ते हेच असावेत) आणि डॉ. यशवंत देशपांडे यांनी मिळून एका जयकृष्ण पंथाच्या मंदिराचा शोध घेण्यास सुरुवात केली . पेशावरच्या हिंदुबहुल भागात एका हवेलीत गोपाळकृष्णाच्या अनेक मूर्ती होत्या. तिथे काही महंत होते त्यांनी चिं. विं. ना ओळखले, कारण चिं. विं. चे 'मनोहर'च्या अंकाततलं छायाचित्र त्यांनी पाहिलं होतं. एवढ्या लांब मठ आणि महंत होते आणि तेही मराठी भाषक हे वाचताना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या महंतांनी महानुभाव पंथांच्या अनेक पोथ्या जपून ठेवल्या होत्या, शिवाय "काबूल येथे शेवटचा महानुभावी मठ जिवंत आहे आणि तिथेही पुष्कळ अनुयायी आहेत" असंही त्या महंतांनी सांगितलं. 

पुढे त्यांनी खैबरखिंडीलाही भेट दिली. त्या परिसरात बुद्धमूर्ती आणि कलाकृती तोपर्यँत खूप सापडल्या होत्या आणि सापडत होत्या. तिथल्या बुद्धमूर्तींची ठेवणही पठाणांसारखीच असल्याची गमतीशीर पण महत्वाची नोंदही ते करतात. हे सगळं वाचताना आतमध्ये कुठेतरी अस्वस्थही वाटलं. वायव्य सरहद्द प्रांत आणि अफगाणिस्तानात मुस्लिमांचं राज्य शेकडो वर्षं होतं, आहे. त्या रासवट राजवटीत बौद्ध फार आधीच उखडले गेले, पण अगदी फाळणी होईपर्यंत काही हिंदू तिथे नेटाने आपलं स्थान आपली देवालयं कशीबशी का होईना टिकवून होते. एवढ्या राजेशाहीत घडलं नाही ते पुढे घडलं आणि उरल्या सुरल्या हिंदू, बौद्ध खुणा तिथून उखडल्या गेल्या. हा लेख चिं. विं. नी प्रवासानंतर काही काळानंतर लिहिला आहे. त्यांच्या लिखाणातही खंत जाणवते. आता या भागात महाराष्ट्रीय लोकांना जायला मिळण्याची शक्यता फारच थोडी आहे, हे ते सुरुवातीलाच नमूद करतात आणि महंतांच्या भेटीनंतर लिहितात, "सत्तेचाळीच्या दंगलीत या मठाचा नाश झाला असावा असे भय वाटते. काबूलचा मठ चालू आहे का तेही कळत नाही..." "....मी अद्यापपर्यंत ह्या दोन मठांची आणि त्यातील  महंतांची काय गत झाली याचा तपास केला नाही ही माझी अक्षम्य चूक आहे."


जुनी पुस्तकं (त्यातही प्रवासवर्णनं) यासाठी वाचायला हवीत, काही ना काही महत्वाचं गवसतं. जुन्या पुस्तकाचा विषय निघाला आहे तर एक निरीक्षण नोंदवतो. चिं. वि. जोशींच्या पुस्तकांमध्ये (आणि बहुदा सर्वच जुन्या पुस्तकांमध्ये) कुणाही मोठ्या सन्माननीय पुरुषाच्या नावामागे रा. ('राजमान्य'चा शॉर्ट फॉर्म) कायम असतं. पूर्वी नावामागे 'श्री.' लिहायचा अजिबातच प्रघात नसावा.  'श्री.' लिहायची सुरुवात नक्की कधीपासून झाली असेल? कुणाला काही कल्पना असेल तर कळवावे. 

एकूण हे पुस्तक शैलीच्या दृष्टीने महत्वाचं अथवा रंजक नसलं तरी काळाआड चाललेल्या प्रवासनोंदी त्यात करून ठेवल्या आहेत हे महत्वाचं. 

(जाता जाता : चिं. वि. जोशींच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांसाठी गंमतशीर शब्द योजलेले असतात तसे या पुस्तकातही आहेत. गावातला शून्य मैलाचा दगड फादर स्टोन म्हणून ओळखला जातो त्याला चिं. वि. जोशींनी बापदगड म्हटलंय आणि पेशावर भागात त्यावेळी त्यांनी फ्लशचे संडास पाहिले त्याला त्यांनी धबधब्याचे संडास म्हटलंय :D )


संचार : चिं. वि. जोशी
आवृत्ती चौथी 
१५० पानं
पंचेचाळीस रुपये 
कॉन्टिनेन्टल प्रकाशन 

Thursday, February 11, 2021

२०२०ची वाचन एक्सप्रेस!





२०२० साल अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ करून गेलं. कधी कल्पनाही न केलेले अनुभव कित्येक लोकांना देऊन गेलं. ... माझ्या आयुष्यात सुदैवाने काही उलथापालथ झाली नसली तरी हे वर्ष मलाही एक कल्पनातीत अनुभव देऊन गेलं. शंभर पुस्तकं ऐकण्याचा/वाचण्याचा अनुभव ! तुफान अनुभव !  गेली काही वर्षं माझं वाचन रोडावत चाललं होतं. २०१९च्या शेवटी त्या वर्षीच्या वाचन/श्रवणाची यादी केली होती तेव्हा एकूण पुस्तकसंख्या पाहून खरंच इंडिकेटर लागले होते. २०२०मध्ये मात्र वाचनसवयीला चांगलीच तरतरी आली.. साडेनऊ महिने वर्क फ्रॉम कामाचा प्रचंड फायदा झाला. ऑफिसला जाण्या येण्याचा वेळ वाचला. ऑफिसमध्ये पुढची टास्क/तिकीट असाइन होईपर्यंतच्या, मीटिंगची वाट बघेपर्यँतच्या, ईमेल-पिंगचा रिप्लाय येईपर्यंतच्या वेटिंग पिरियडचा सदुपयोग करता येत नाही, पण घरी तो पुरेपूर करता आला! 

सप्टेंबर आला तसतसं लक्षात आलं की यावर्षी पुस्तकांची शंभरी गाठता येऊ शकते. मग ती संख्या गाठण्याच्या दृष्टीने थोडी लबाडी करून छोट्या आकाराची/लांबीची पुस्तकंही निवडली  ;) पण तरी आनंद याचा आहे की या निमित्ताने शंभर वेगवेगळ्या विषयातली/प्रकारची/वातावरणातली पुस्तकं वाचली/ऐकली गेली.. 

वाचनाच्या निमित्ताने घरात अनेक दिवस कपाटात दडून बसलेली पुस्तकं जशी वाचली गेली तशीच मुद्दामून ग्रंथालयातून आणूनही पुस्तकं वाचली गेली.  किंडल अनलिमिटेडची ऑफर होती त्या निमित्ताने किंडलवरही वाचून ऑफर वसूल केली. २०१९ मध्ये स्टोरीटेल ऐकत होतोच. २०२०मध्ये कधी ऑफर होती म्हणून तर कधी ठरवून ऑडिबल, स्नॉवेल आणि स्टोरीटेलवर ऑडिओबुक्स आलटून पालटून ऐकली... एकुणात काय पुस्तकांच्या विषयांप्रमाणेच त्यांच्या स्वरूपातही भरपूर वैविध्य आलं. 

वर्षाच्या सुरुवातीला कल्पनाही केली नव्हती एवढं अकल्पनीय वाचन यावर्षी झालं (जसजशी पुस्तकं संपवत जात होतो तसंतसं जाणवत होतं की फेसबुक बंद असल्याने आपल्याला केवढा तरी वेळ मिळतोय. लक्ष एकाग्र होऊ शकतंय. खरंच, फेसबुक माझा वेळ, विचार, शांतता किती शोषून घेत होतं!! पण असो, फेसबुकबद्दल परत कधीतरी). अर्थात सतत वाचनाने वर्षाच्या शेवटी शेवटी थोडं सॅच्युरेशन आल्यासारखं वाटल्यावरही ही वन्स इन लाईफटाइम गोष्ट आहे याची जाणीव होत असल्याने, नेटाने वाचन चालू ठेवलं आणि परत प्रवाह वाहता झाला.... 

वाचनासोबतच आणखी एक गोष्ट वर्षाच्या सुरुवातीपासूनच ठरवून केली, ती म्हणजे वाचलेल्या पुस्तकांची तारीखवार यादी करणे. शिवाय गेली काही वर्षं लेखन (टायपिंग नव्हे, actual पेनने लेखन!) पूर्णपणे बंद झालं होतं, त्याचं पुनरुज्जीवन होणं अत्यंत आवश्यक आहे हे प्रकर्षाने जाणवलं. यावर्षी जे जे वाचू त्याच्या काही ना काही नोट्स वहीत लिहून काढायच्याच हे ठरवलं होतं. पण तरीही लॉकडाऊनमध्ये वाचन एक्सप्रेस सुसाट सुटली आणि लेखन काही होईना. मग एका टप्प्यावर वाचन स्लो केलं आणि काही पुस्तकांच्या आवर्जून नोट्स काढल्या. हाताने लिहीत असताना पहिल्या दिवशी अक्षरशः फेफे उडाली. डोक्यातले विचार आणि हातातलं पेन यांचा वेग तर जुळत नव्हताच, पण जोडाक्षरं आली तर चट्कन हातातून ती उमटेनात. उमटली तर त्यात चुका व्हायच्या, खाडाखोड व्हायची... अशक्य लाज वाटली तेव्हा... अर्थात टायपिंगवर अति विसंबलो आहोत याची जाणीव होत असल्यानेच लेखनप्रपंच सुरु केला होता मी.. हळहळू हात डोक्याचं ऐकू लागला आणि विनासायास अक्षरं कागदावर उमटू लागली... 

वाचनाचं बायप्रॉडक्ट म्हणून येणाऱ्या लेखनावरही यावर्षी मी अधिक लक्ष केंद्रित केलं (याला मात्र टायपिंगशिवाय पर्याय नव्हता ;) ) आणि विशेष प्रयत्न केले.  'सकाळ'च्या 'सप्तरंग' मध्ये एक आणि 'महाराष्ट्र टाईम्स'ची  'संवाद' पुरवणी तसंच संपादकीय पान यावर एकूण तीन लेख प्रकाशित झाले आणि चौथा जस्ट २०२१ च्या पहिल्याच शनिवारी प्रकाशित झाला. याशिवाय काही पुस्तकांवर लेख लिहूनही ठेवले आहेत. तेही कधी ना कधी सर्वांसमोर येतीलच. 


यावर्षीच्या वाचनव्यापाचा सारांश असा :-

  • यावर्षी वाचलेली/ऐकलेली पुस्तकं : १०३ पूर्ण आणि एक अर्धे
  • एकूण वाचलेली पानं (हार्ड कॉपी आणि ईबुक मिळून) : ९७०९
  • एकूण श्रवणवेळ (ऑडिओबुक्स) : ३३३ तास  


वाचलेल्या/ऐकलेल्या एकूण पुस्तकांची  यादी आणि अल्पपरिचय देतोय. वेळ मिळेल तसा त्यावर अधिक विस्ताराने लिहायचा प्रयत्न करेनच. 


१.         पर्वतपुत्र शेर्पा   -     उमेश झिरपे

एव्हरेस्ट चढाईचा कणा असणाऱ्या शेर्पा जमातीचा अनेक अंगांनी परिचय करून देणारे पुस्तक

२.          India Moving  -    Chinmay Tumbe

भारतीयांनी भारतात आणि भारताबाहेर केलेल्या केलेल्या स्थलांतराचा रोचक इतिहास. 

महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यावर आलेला माझा लेख : https://maharashtratimes.com/editorial/literature/prasad-phatak-review-on-india-moving-a-history-of-migration-book-by-chinmay-tumbe/articleshow/80066759.cms

३.          मराठी पत्रकारिता : पहिली पावले  -    प्रा. सु. ह. जोशी 

'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकरांचे यांचे अल्पचरित्र आणि मराठी वृत्तपत्रांच्या सुरुवातीच्या काळातील तीसेक वर्तमानपत्रांची माहिती  .

४.          काबूलनामा       -    फिरोज रानडे 

भारत सरकारतर्फे काबुलच्या नगररचनेच्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी १९७५ ते १९८० या काळात तिथे जाऊन राहिलेल्या आर्किटेक्टचे अनुभव. अतिशय मोकळ्या वातावरणाकडून अराजकाकडे पावलं टाकणाऱ्या अफगाणिस्तानचे जवळून दर्शन घेतलेला मराठी लेखक. 

५.          विजयदुर्ग व परिसर    -     प्र. के. घाणेकर

६.          संचार   -     चिं. वि. जोशी

चिं. वि. जोशींचे भारताच्या विविध भागांना दिलेल्या भेटींचे प्रवासवर्णन. खैबरखिंडीच्या प्रदेशात केलेले प्रवासवर्णन महत्वाचे.

७.          आनंदमठ : आक्षेप आणि खंडन  -    सचिन सबनीस

आनंदमठ कादंबरीवर, विशेषतः त्याच्या शेवटावर बरेच आक्षेप घेतले गेले होते, त्याचे स्पष्टीकरण देणारी आणि कादंबरीचा एकूण भवताल समजवून सांगणारी ही छोटेखानी पुस्तिका

८.          नाईन्टीन नाईन्टी         -     सचिन कुंडलकर
गर्दीपासून दूर राहणाऱ्या शहरी माणसाच्या डायरीतल्या शहरी जाणीवांच्या
नोंदी. त्याच्या आशा निराशांमधल्या झोक्यांचा जमाखर्च. स्वतःच्या अंगवळणी पडलेल्या नैराश्याची झाडाझडती घेणारं  अतिशय नेटकं आणि नेमकं प्रकरण 'नैराश्याची सुबक नोंदवही' हा पुस्तकाचा हायलाईट

९.          यज्ञसमर्पित      -     अरविंद स. हर्षे

संघाचे ज्येष्ठ प्रचारक, कवी, 'डॉक्टर हेडगेवार चरित्र' आणि 'इस्राएल छळाकडून बळाकडे' या पुस्तकांचे लेखक नारायण हरी अर्थात नाना पालकर यांचे चरित्र

 

१०.       पु. ल. : चांदणे स्मरणाचे   -    मंगला गोडबोले

पुलंचे चरित्र

११.       ऑफ लाईन      -    डॉ. बाळ फोंडके

विज्ञानकथा

१२.       एकला बोलो रे     -     शिरीष कणेकर

फिल्लमबाजी, कणेकरी, फटकेबाजी या stand-up talk showsच्या निमित्ताने आलेल्या अनुभवांवरचे धमाल पुस्तक

१३.       गदिमान           -     मधू पोतदार

गदिमांच्या काव्याच्या सोबतीने उलगडत जाणारे त्यांचे छोटेखानी चरित्र

१४.       कांगारू      -     सुनंदन लेले

क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यांतले संस्मरणीय अनुभव

१५.       हॉलिवूडचे विनोदवीर     -     राजेंद्र खेर

चार्ली चाप्लीन, लॉरेल-हार्डी, बस्टर कीटन आदींचा परिचय करून देणारे पुस्तक

१६.       खिद्रापूरची मंदिरे          -     डॉ. रामचंद्र गोविंद चोथे, श्री. शशांक रामचंद्र चोथे

१७.       श्री. बाळासाहेब देवरस     -     शरद हेबाळकर

तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे चरित्र

१८.       हिंदू धर्मसंग्राम आणि वनवासींचे जीवन    -   वसंत  भाऊ पाटील
मुहम्मद बिन कासीम पासून होत आलेल्या इस्लामी आक्रमणाचा संक्षिप्त आढावा.

पुस्तकाचा उत्तरार्ध वनवासींच्या हिंदू धर्माशी असलेल्या अतूट नात्याची जाणीव करून देणारा.

१९.       नागझिरा          -     व्यंकटेश माडगूळकर

नागझिरा जंगलात महिनाभर राहून केलेल्या नोंदी आणि रेखाटने

२०.       माझे पुराण      -     सौ. आनंदीबाई कर्वे

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नीचं आत्मचरित्र. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या अनिष्ट प्रथा आणि खडतर आयुष्य यांचं चित्र उभं करतं.

२१.       ते पंधरा दिवस     -        प्रशांत पोळ

१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट १९४७ या वादळी कालखंडात भारतातले प्रमुख नेते कुठे होते कशात गुंतले होते याची बित्तंबातमी

२२.       मेरी प्रचारक यात्रा     -     शशिकांत चौथाईवाले

१९६१ पासून ईशान्य भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करणारे शशिकांत चौथाईवाले यांचे अनुभव

२३.       नावामागे दडलंय काय?      -     सुप्रसाद पुराणिक

पुण्यातल्या ठिकाणांच्या चित्रविचित्र नावांचा इतिहास

२४.       एकनाथजी        -     निवेदिता रघुनाथ भिडे (अनुवाद : सुनीता करकरे)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, कन्याकुमारीच्या विवेकानंद शिलास्मारकाचे स्वप्न अफाट प्रयत्नांनी प्रत्यक्षात उतरवणारे एकनाथजी रानडे यांचे चरित्र

२५.       सुरेशराव केतकर         -     संकलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर यांच्याबद्दलच्या आठवणी

२६.       जीवन व्हावे यज्ञसमर्पण : श्री. जगन्नाथराव जोशी   - डॉ. अरविंद लेले

जनसंघाचे ज्येष्ठ नेते, वक्ता दशसहस्रेषु श्री. जगन्नाथराव जोशी यांच्यावरची पुस्तिका

२७.       एक अग्नीशिखा : दादाराव परमार्थ    -    चं. प. भिशीकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांच्या पहिल्या फळीतील प्रचारक, देशभर फिरून संघकार्याचा पाया घालणारे दादाराव परमार्थ यांच्या कार्याची ओळख करून देणारी पुस्तिका

२८.       निश्चयाचा महामेरू : मुकुंदराव पणशीकर       -     प्रदीप नाईक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, धर्मजागरण विभाग, पूर्वांचलचे संघकार्य, केशवसृष्टी, समरसता मंच अशा अनेक आयामांमध्ये लक्ष घालून मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक मुकुंदराव पणशीकर यांच्या कार्याची या पुस्तकात ओळख करून दिली गेली आहे

२९.       डॉलरच्या देशा      -     शिरीष कणेकर

एकपात्री प्रयोगांच्या निमित्ताने केलेल्या अमेरिका प्रवासातले खुसखुशीत अनुभव

३०.       शिणेमा डॉट कॉम    -    शिरीष कणेकर

मिश्कील, टपल्या मारणारे, रसग्रहणात्मक अशा सिनेलेखांचा संग्रह. 'उभे ठाकले झुंजाया' हा शक्ती सिनेमातल्या अमिताभ-दिलीप कुमार जुगलबंदी वरचा अप्रतिम लेख हा पुस्तकाचा हायलाईट आहे

३१.       माणदेशी माणसं          -     व्यंकटेश माडगुळकर

दूरवरच्या गावखेड्यात राबणाऱ्या, कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या व्यक्तींची शब्दचित्रं

३२.       गुगली   -     सुबोध जावडेकर

विज्ञानकथा

३३.       पुणेरी      -    श्री. ज. जोशी

पाउणशतकापूर्वीच्या पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक पाऊलखुणा उमटलेले एका अस्सल पुणेकराचे लेख.

३४.       यक्षांची देणगी    -    जयंत नारळीकर

विज्ञानकथा

३५.       मा. एकनाथजींनी सांगितलेली 'कथा विवेकानंद शिलास्मारकाची' -   एकनाथ रानडे

संपूर्ण देश पिंजून काढत, सर्व राजकीय नेत्यांना सोबत घेत केवळ सात वर्षांत कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक उभं करणाऱ्या एकनाथजी रानडे यांनी सांगितलेले स्मारकउभारणीचे अनुभव चरित्र

३६.       एकनाथजींची निवडक पत्रे : भाग १    -    एकनाथ रानडे

विवेकानंद शिलास्मारक निर्मितीच्या काळात देशभर फिरत असताना लिहिलेली पत्रं. एकनाथजींची चौफेर नजर, स्मरणशक्ती, समर्पण, काटेकोर नियोजन अशा गुणांचं प्रतिबिंब या पत्रांमध्ये दिसतं.

३७.       माझ्या लिखाणाची गोष्ट    -    अनिल अवचट

आपल्या लिखाणाची निर्मितीप्रक्रिया आणि पुस्तकांच्या निर्मितीकथा उलगडून सांगणारे अनिल अवचट इथे भेटतात

३८.       अक्षरनिष्ठांची मांदियाळी    -    अरुण टिकेकर

व्यासंगी वाचकाच्या पुस्तकशोधाच्या कहाण्या, किस्से आणि आठवणी

३९.       मोरू आणि मैना    -    चिं. वि. जोशी

लहान मुलांसाठी लिहिलेल्या मोरू आणि मैनाच्या गोष्टी

४०.       आफ्रिकेतील आठवणी    -    सौ. सुमन जोशी

१९३०च्या दशकात नोकरीसाठी आफ्रिकेत गेलेल्या डॉक्टरच्या मुलीने सांगितलेले अनुभव

४१.       हरवलेलं दीड वर्ष     -    श्रीकांत बोजेवार

४२.       अंगठी १८२०    -    श्रीकांत बोजेवार

४३.       न्यूड पेंटिंग @19    -    श्रीकांत बोजेवार

वरच्या तिन्ही डिटेक्टिव्ह अगस्तीच्या रहस्यकथा

४४.       इस्लामचे भारतीय चित्र    -    हमीद दलवाई

१९६०च्या दशकात बंगाल आणि आसाममध्ये प्रवास करून तिथल्या मुस्लिम मनाचा कानोसा घेण्याचा दलवाईंनी केलेला प्रयत्न.

४५.       गावोगावी    -    ल. त्र्यं. जोशी

तरुण भारतचे माजी संपादक ल. त्र्यं. जोशी यांचे आत्मकथन

४६.       कलम ३५अ + कलम ३७०    -    अरविंद व्यं. गोखले, वासुदेव कुलकर्णी

घटनेत कलम ३५अ  व कलम ३७० कसे आले, काश्मीरचे त्याच्याशी नाते काय, काश्मीरचा राजकीय पट याबद्दल माहिती सांगणारे पुस्तक

ईबुक्स

४७.       Wonder Woman : Earth One (Vol 1)  Grant Morrison / Yanick Paquette

Graphic novel

४८.       The First Indian    -    Dilip Donde

बोटीतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय व्यक्ती दिलीप दोंदे यांचे अनुभव

४९.       A River In Darkness    -    Masaji Ishikawa

उत्तर कोरियाच्या हुकुमशाहीत पिचलेल्या आणि महत्प्रयासाने तिथून पळालेल्या  नागरिकाची हृदय पिळवटून टाकणारी आत्मकथा

५०.       मेघदूत    -    शांता शेळके

कालिदासाच्या मेघदूताचा काव्यमय अनुवाद

५१.       वाटेवरल्या सावल्या    -    ग. दि. माडगूळकर

गदिमांच्या सुरुवातीच्या दिवसांमधले अनुभव, संघर्ष सांगणाऱ्या आत्मपर लेखांचा संग्रह.

मराठी चित्रपटसृष्टीत गदिमांची पहिली पावलं कशी पडत गेली याची रंजक कहाणी

५२.       हटके भटके    -    निरंजन घाटे

चाकोरी मोडून घराबाहेर पडलेल्या धाडसी भटक्यांच्या रंजक गोष्टी. यात चित्रकारापासून ते वन्यजीव अभ्यासकांपर्यंत अनेक अभ्यासू भटके आपल्याला भेटतात

५३.       Tales from the road    -    Aniket Ketkar

CA ची नोकरी सोडून आग्नेय आशियात भटकंतीसाठी बाहेर पडलेल्या तरुणाचे आपल्याच लयीत जाणारे, एक ठहराव असणारे प्रवासवर्णन. प्रत्येक जागेचा इतिहास सांगण्याचा आणि आलेला प्रत्येक अनुभव सांगण्याचीही अट्टहास नाही.

५४.       The God Who Failed    -    Madhav Godbole

नेहरूंच्या मर्यादा, चुका आणि बलस्थानांचा लेखाजोखा मांडणारे संतुलित पुस्तक

५५.        Third Claas of Indian Railways     -    Mahatma Gandhi

एकूण पाच लेखांचा  संग्रह.
आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर आधी देश कसा आहे हे नजरेखालून घालण्यासाठी गांधींनी देशभर तिसऱ्या वर्गातून प्रवास केला. त्या दरम्यान अनुभवलेल्या 'भारतीय रेल्वे' या परिसंस्थेतचा मुख्य घटक प्रवासीवर्सगाच्या बिकट स्थितीच्या नोंदी घेणारा मुख्य लेख. सोबत स्वदेशी, स्थानिक भाषेचा आग्रह , भारतीय पोशाख, अहिंसा या विषयांवरचे लेख यात आहेत.  गांधींची भाषा समजायला क्लिष्ट वाटली.

५६.        खैबरखिंडीपलीकडून    -    अरुण मोकाशी 
अफगाणिस्तान संस्कृती, कला, कलाकार, खैबरखिंडीसारखी ठिकाणं यांबद्दल माहिती सांगणाऱ्या लेखांचा संग्रह. वैयक्तिक अनुभव त्यात असतील असं वाटलं होतं, पण त्या दृष्टीने निराशा वाट्याला आली.

५७.        A Walk Through Barygaza    -    Zac O'Yeah

प्राचीन काळापासून भारतातले महत्वाचे बंदर असणाऱ्या भडोचमध्ये फेरफटका मारून तिथला इतिहास, ग्रीस वगैरे पाश्चिमात्य देशांशी भारताचे असलेले संबंध, पाश्चात्यांच्या या भागातल्या पाऊलखुणा शोधण्याचा केलेला प्रयत्न.

५८.        मृत्युपेटीत पाच दिवस    -    विजय देवधर

एकाहून एक भन्नाट साहसकथा. विजय देवधरांचा हातखंडा विषय.

५९.        केस अटॅची केसची       -     सत्यजित रे, अनुवाद : अशोक जैन

वेगवान फेलूदा साहसकथा. शिमल्याच्या बर्फाळ वातावरणात ऍक्शनपॅक्ड् क्लायमॅक्स

६०.        माझ्याविषयी    -    निरंजन घाटे

आत्मपर लेखांचा संग्रह. बऱ्याच ठिकाणी  माहितीची पुनरावृत्ती झालेली असली तरी लिखाणाच्या सर्व प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या लेखकाच्या आतल्या माणसाची नक्की जडणघडण कशी झाली याबद्दल महत्वाची माहिती मिळते.

६१.        गंगटोकमधील गडबड    -    सत्यजित रे, अनुवाद : अशोक जैन

वेगवान फेलूदा साहसकथा.

 

६२.        कहाणी एका रँग्लरची    -    सुमती विष्णू नारळीकर

जयंत नारळीकरांच्या सुविद्य, सुसंस्कृत वडिलांचा परिचय करून देणारे खूप छान पुस्तक. जयंतरावांमध्ये असणारे अनेक सद्गुण कुठून, कसे आले असतील याची यातून उत्तम कल्पना येते.

६३.        डिटेक्टिव्ह अल्फा आणि रत्नजडित खंजिराचे रहस्य    -    सौरभ वागळे

नवख्या लेखकाची ढिसाळ रहस्यकथा

६४.        अंतर्बाह्य    -    रत्नाकर मतकरी

अनेक वर्षांनी मतकरींच्या गूढकथा वाचल्याचा आनंद मिळाला

६५.        काठमांडूतील कर्दनकाळ    -    सत्यजित रे, अनुवाद : अशोक जैन

वेगवान फेलूदा साहसकथा.

६६.        आनंदमठ    -    बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

देशाच्या इतिहासातली अजरामर कलाकृती. क्षत्रिय संन्याश्यांच्या धाडसी कारवायांभोवती  गुंफलेले काळाच्या मानाने काहीसे गुंतागुंतीचे कथानक. शेवट संभ्रमात टाकणारा. 'आनंदमठ : आक्षेप आणि खंडन' ही पुस्तिका त्यानंतर वाचल्याने संभ्रम दूर झाला

६७.        Feluda@50       -    Boria Muzumdar

प्रदोष मित्र उर्फ फेलूदा हे खासगी गुप्तहेर पात्र  कुमारांसाठी सत्यजित रे यांनी निर्माण केले. त्याच्याच प्रभावाखाली बंगाली कुमारवाचकांच्या पिढ्या घडल्या. फेलूदा हे पात्र निर्माण होऊन ५० वर्ष झाल्यानिमित्ताने फेलूदा हे पात्र, सत्यजित यांची त्यामागची भूमिका, फेलूदावर निर्माण झालेले चित्रपट आणि त्यात फेलूदाची भूमिका साकारणारे कलाकारांच्या मुलाखती, फेलूदा कथांची बलस्थानं व मर्यादा यांची चर्चा करणारे चिकित्सात्मक लेख यांनी सजलेले पुस्तक

६८.        मैं पाकिस्तान में भारत का जासूस था    -    मोहनलाल भास्कर

हेरगिरीच्या आरोपामुळे अटक होऊन पाकिस्तानी तुरुंगात काही वर्ष काढलेल्या भारतीय गुप्तहेराची आत्मकथा. प्रत्यक्ष हेरगिरीचा फक्त ओझरता उल्लेख. पुस्तक प्रामुख्याने तुरुंगातील कडू-गोड अनुभवांना वाहिलेले.

६९.        बातमीमागची बातमी    -    जयप्रकाश प्रधान

पत्रकार जयप्रकाश प्रधान यांनी आपण दिलेल्या प्रमुख बातम्यांचे 'मेकिंग' यात दिलं आहे. घातपाताच्या तयारीत असलेल्या लोकांवर धाड टाकणाऱ्या पोलिसांसोबतच असताना आलेले अनुभव सांगणारे प्रकरण विशेष वाचनीय. 

७०.        सोने का किला    -    सत्यजित राय

वेगवान फेलूदा साहसकथा.

७१.        Savarakar : Echoes of a forgotten past (Vol 1. Part 2)    -    Vikram Sampath

ताज्या दमाच्या लेखकाने अतिशय सखोल अभ्यास करून लिहिलेलं बेस्ट-सेलर सावरकर चरित्र

७२.        Bandits of Bombay    -    Satyajit Ray

वेगवान फेलूदा साहसकथा.

७३.        The Curse of The Goddess    -     Satyajit Ray

वेगवान फेलूदा साहसकथा.

७४.        An Era of Darkness    -    Shashi Tharoor
इंग्रजांनी भारताचं अनेक अंगांनी केलेलं उलगडून सांगणारं पुस्तक. "इंग्रजांमुळे भारतात लोकशाही आली, भारत एकसंध झाला" इ. दाव्यांचा वकिली खाल्याने  घेतलेला समाचार

७५.        Byomkesh Bakshi    -    Saradindu Bandopadhyay

व्योमकेश बक्षीच्या ७ चातुर्यकथा

७६.        Putin : Prisoner of Power    -    Misha Glenny

पुतीनने सत्ता कशी काबीज केली हे सांगणारी छोटेखानी लेखमाला

७७.        Pandeymonium    -    Piyush Pandey

जाहिरातक्षेत्रातील बाप माणूस असणाऱ्या पियुष पांडे यांचे रसाळ अनुभवकथन. प्रत्येक प्रकरण म्हणजे उत्तम व्यवस्थापनाचा एकेक स्वतंत्र धडाच

७८.        Benedict Cumberbatch reads Sherlock Holmes : Rediscovered Railway Misteries & Other Stories    -    John Taylor

आर्थर कॉनन डॉयलने लिहिलेल्या वाटाव्यात अशा शेरलॉक होम्स कथा

७९.        अंतराळातील स्फोट    -    जयंत नारळीकर

काही शतकांच्या अंतराने इतिहासाच्या ३ टप्प्यांमध्ये एकाच धूमकेतूचे निरीक्षण करून पृथ्वीवरील संभाव्य संकट हेरणाऱ्या चौकस अभ्यासकांची विज्ञानकथा. कुमार वयोगटातील मुलांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली.

८०.        निळीच्या गोदामातील आतंक    -    सत्यजित राय

उत्कृष्ट साउंड डिझायनिंग आणि पार्श्वसंगीताच्या साहाय्याने रंगवलेली ऑडिओकथा

८१.        दोन जादूगार    -    सत्यजित राय

सत्यजित राय लिखित गूढरम्य कथा

८२.        मी दिवाकर    -    शंकर काशिनाथ गर्गे (दिवाकर)

दिवाकरांच्या नाट्यछटा

८३.        जपानी डायरीज    -    ॠतावरी मराठे

सुरुवातीला नोकरीनिमित्ताने आणि लग्नानंतर कायमच्याच जपानमध्ये स्थायिक झालेल्या मराठी मुलीचे जपानी सण आणि संस्कृती उलगडून दाखवणारे लेख.

८४.        एका कोळीयाने    -    पु. ल. देशपांडे

इतकी वर्षं हेमिंग्वेच्या पुस्तकाबद्दल ऐकून होतो  म्हणून स्टोरीटेलवर आल्यावर खूप अपेक्षेने (तेही विक्रम गोखलेंच्या आवाजात!) ऐकलं. पण निराशा झाली. मुळात मला कथानकच विलक्षण बोअर झालं. शिवाय गोखलेंनीचाही काहीही विशेष प्रभाव जाणवत नाही. पुलंचा अनुभव मात्र फर्मास!

८५.        दीपमाळेचे रहस्य    -    भा. रा. भागवत

अनेक वर्षं आऊट ऑफ प्रिंट असणारं पुस्तक स्टोरीटेलच्या कृपेने फायनली पूर्ण करता आलं. भारांची टिपिकल टीन-इज साहसकथा.

८६.        वाघरू    -    गो. नी. दांडेकर

रूप, स्पर्श, गंध, आवाज जिवंत करणारी गोनीदांची रसाळ  भाषा  आणि वीणा देव - रुचिर कुलकर्णी यांचं उत्कट अभिवाचन आणि हृदयाचा ठाव घेणारं कथानक. बस्स ! अजून काय हवं !

८७.        भारतीय जीनियस    -    जयंत नारळीकर            अच्युत गोडबोले, दीपा देशमुख

८८.        भारतीय जीनियस    -    आर्यभट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त ... इ. अच्युत गोडबोले, दीपा देशमुख

८९.        भाग्यशाली सिक्सर    -    भा. रा. भागवत

सहा टीन-एज साहसकथांचा संग्रह. हेही अनेक आऊट ऑफ प्रिंट आहे

९०.        भारतीय जीनियस : श्रीनिवास रामानुजन      अच्युत गोडबोले, दीपा देशमुख

९१.        To The Edges of The Earth    -    Edward J. Larson

१९०९ या एकाच वर्षात दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव ही पृथ्वीची दोन टोकं आणि K2 हे शिखर अशा तीन गोष्टी सर करण्याच्या मोहिमांमध्ये नवे विक्रम प्रस्थापित झाले. त्या तिन्हींचा वेध घेणारं पुस्तक.

महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यावर आलेला माझा लेख : https://maharashtratimes.com/editorial/literature/prasad-phatak-review-on-india-moving-a-history-of-migration-book-by-chinmay-tumbe/articleshow/80066759.cms

९२.        भारतीय जीनियस : होमी भाभा    -    अच्युत गोडबोले, दीपा देशमुख

९३.        तंत्रज्ञ जीनियस : थॉमस अल्वा एडिसन    -     अच्युत गोडबोले, दीपा देशमुख

९४.        मैत्रेयी   - अरुणा ढेरे

याज्ञवल्क्यांना अस्तित्वात असणाऱ्या संकल्पनांचे नवे अर्थ सहजपणे समजवून सांगणारी मैत्रेयी, ज्ञानोपासक पण त्यातच गुंतून पडणाऱ्या याज्ञवल्क्यांना भावनांचे महत्व समजावून सांगणारी मैत्रेयी… यज्ञ संकल्पनेचा नवा, उदात्त अर्थ…  आणि बरंच काही…

९५.        भारतीय जिनियस :   दामोदर धर्मानंद कोसंबी    -    अच्युत गोडबोले, दीपा देशमुख

९६.        दैत्यालय  -    हृषिकेष गुप्ते

कलेकडे, कलेच्या पराकोटीच्या प्रकटीकरणाकडे वेगळ्या नजरेनी पाहणारी गूढकथा

९७.        हाकामारी    -    हृषिकेष गुप्ते

नागोठण्याच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा. आऊट अँड आऊट गूढकथा नाही, पण गुप्तेंनी कथेल्या भयाच्या हलक्या सावटाआडच्या मानवी मनातल्या कोपऱ्यांवर प्रकाश टाकला आहेत तो इंटरेस्टिंग आहे.  

९८.        परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष    -    हृषिकेष गुप्ते

 प्रत्येक पात्राचा प्रत्येक वेळी त्याच्या वैशिष्ट्यांसह सतत उल्लेख करून एक वैचित्र्यपूर्ण फॉरमॅटमध्ये कथा लिहिली आहे. वेगळा प्रयोग.

९९.       दुर्मिळ तिकीटाची साहसयात्रा    -    भा. रा. भागवत

कलासिक बिपीन बुलकलवार ऍडव्हेंचर. खूप वर्षांनी पुन्हा वाचलं/ऐकलं

१००.      काय वाट्टेल ते होईल    -    जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली,  अनुवाद पु. ल. देशपांडे

सुमारे शंभर वर्षांपूर्वी नशीब आजमावण्यासाठी जॉर्जिया देशातून अमेरिकेमध्ये आलेल्या जॉर्ज पापाश्विलीचे खुसखुशीत अनुभव. पुलंचा अगदी फक्कड , फर्मास अनुवाद

१०१.      बाजिंद    -    पै. गणेश मानुगडे

शिवकाळात घडणारी साहसकथा. गूढरम्यता, आदर्शवाद, धाडस यांचे इंटरेस्टिंग मिश्रण

१०२.      पुत्र व्हावा ऐसा गुंडा    -     भा. रा. भागवत

बिपीन बुकलवारने सांगितलेल्या देशोदेशीच्या रंजक कथा

१०३.    खादीशी जुळले नाते    -    रघुनाथ कुलकर्णी

खादी क्षेत्रात महत्वाचे कार्य केलेले रघुनाथ कुलकर्णी यांचे आत्मकथन.

माझा या पुस्तकावरचा महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित लेख  : https://maharashtratimes.com/editorial/samwad/prasad-phatak-review-on-khadishi-julale-nate-by-raghunath-kulkarni/articleshow/79821052.cms