Total Pageviews

Monday, October 25, 2021

फाळणीची बीजे रोवणाऱ्या आंदोलनाचा अभ्यास

 

मुखपृष्ठ सौजन्य : https://bhavisa.org

भारताच्या इतिहासात १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध महत्वाचे आहे. एकीकडे भारतीयांना यातल्या पराभवामुळे स्वातंत्र्य मिळवण्याचे आव्हान किती मोठे आहे याची जाणीव झाली, तर दुसरीकडे इंग्रजांनाही भारतीयांनी एकत्र प्रतिकार केला तर काय होऊ शकते चुणूक मिळाली. हिंदू आणि मुस्लिमांच्या लढण्यामागच्या प्रेरणा वेगळ्या असल्या तरी ते एकत्र लढले ही गोष्ट इंग्रजांसाठी महत्वाची होती. त्यातूनच त्यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये अधिकाधिक अंतर पडत जाईल याची काळजी घेतली आणि त्याची फळे काही वर्षांमध्येच दिसू लागली. परंतु हिंदू-मुस्लिमांमधल्या दुहीचे कारण फक्त इंग्रजच होते का; मुस्लिमांचा इस्लामी, इंग्रजी आणि हिंदूंच्या सत्तेकडे पहायचा दृष्टिकोन कसा होता; खिलाफत आंदोलनाचे परिणाम काय झाले यावर डॉ. गिरीश आफळे यांच्या ‘खिलाफत आंदोलन : एक अभ्यास’ या पुस्तकामधून प्रकाश टाकण्यात आला आहे.

मुस्लिम राजकारणाची सुरुवात

भारतीयांमध्ये वेळोवेळी निर्माण होणाऱ्या असंतोषाला वाट मिळावी म्हणून ॲलन ह्यूमने काँग्रेसची स्थापना केली. १८५७ च्या पराभवानंतर नंतर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी फक्त उठाव करून चालणार नाही तर राजकारणाचीही कास धरायला हवी याची भारतातील राष्ट्रवाद्यांना जाणीव झाली. आधुनिक शिक्षणाची कास धरलेल्या सुशिक्षित हिंदू नेत्यांची कॉंग्रेसमध्ये बहुसंख्या होती. मुस्लिमांमधला एक गट कॉंग्रेसकडे ‘हिंदू पक्षाचे राजकारण’ म्हणूनच पाहू लागला आणि स्वतंत्र मुस्लिम राजकारणाचा प्रवासही तेव्हाच सुरू झाला. मुस्लिमांनी इंग्रजी शिक्षण घेऊन इंग्रजांशी निष्ठा दाखवावी अशी भूमिका असणारे सर सय्यद अहमद खान आणि त्यांनी स्थापन केलेले मोहमेडन अँग्लो-इंडियन कॉलेज (आताचे अलिगढ मुस्लिम विद्यापीठ) मुस्लिम राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरले. मोहमेडन कॉलेजच्या थिओडोर बेक नावाच्या कुटील इंग्रज प्राचार्याने हिंदूंविरुद्ध अपप्रचार सुरू केला. सय्यद अहमद यांनीही कॉंग्रेसच्या राजकारणाला विरोध सुरु केला. सय्यद अहमद हे द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचे पहिले उद्गाते होते. “आम्ही वेगळे आहोत” हे दाखवण्याचा मुस्लिमांच्या एका गटाचा प्रयत्न सुरु झाला आणि त्यांना घेतल्याशिवाय देश म्हणून पुढे जाता येणार नाही या भूमिकेतून हळूहळू कॉंग्रेसचे राजकारण मुस्लिमांच्या मनधरणीकडून त्यांच्या लांगूलचालनाकडे झुकू लागले. मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अधिक प्रतिनिधित्व, त्यांनी ‘वंदेमातरम्’ला विरोध केल्यावर काही कडवी वगळणे अशा प्रकारांमधून मुस्लिमांना खुश ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले. एवढे करूनही इंग्रजांची फूस मिळून ‘मुस्लिम लीग’ हा मुस्लिमांचा वेगळा पक्ष स्थापन झालाच.

पहिले महायुद्ध सुरू झाले आणि भारतीय मुस्लिम पेचात पडले. कारण एकीकडे हिंदू शिरजोर होतील या भूमिकेतून इंग्रजांशी जुळवून घेण्याची त्यांची भूमिका होती तर दुसरीकडे खलिफाची गादी (खिलाफत) असणाऱ्या तुर्कस्तानविरोधात इंग्रजांनी आघाडी उघडली होती. मुस्लिमांच्या शिष्टमंडळाने इंग्लंडमध्ये जाऊन ‘तुर्कस्तानच्या खिलाफतीला धक्का पोचणार नाही’ असे आश्वासन मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे भारतामध्ये मुस्लिमांना आता अधिक कडक भूमिका घ्यावी लागणार अशी खिलाफतसमर्थक मुस्लिमांची भावना झाली. हीच भावना भारतामध्ये खिलाफत चळवळ बळकट करत गेली.

 

सकल-इस्लामवादाची भुरळ

सकल-इस्लामवाद ('पॅन-इस्लामिझम') या संकल्पनेचा मुस्लिमांवर पूर्वीपासून खूप मोठा पगडा आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असलेले मुस्लिम एकमेकांचे भाऊबंद आहेत, अशी मुस्लिमांची धारणा असते. भारतात उभ्या राहिलेल्या खिलाफत आंदोलनाचाही हाच पाया होता. परंतु सकल-इस्लामवाद प्रत्यक्षात किती भुसभुशीत आहे हे डॉ. आफळे उदाहरणांसह दाखवून देतात. इतिहासात अरब आणि तुर्क लोकांमध्ये खिलाफत कुणाकडे असावी हा संघर्ष निरंतर चालत होता, ज्याने सकल-इस्लामवाद हे मृगजळ आहे हे सिद्ध केले. भारतामध्ये इंग्रजांचे म्हणजेच खलिफाच्या (आणि पर्यायाने इस्लामच्या) शत्रूचे राज्य असल्याने ही भूमी मुस्लिमांसाठी अनुकूल नाही म्हणून सुमारे हजारो मुस्लिम ‘हिजरत’ करून इस्लामची भूमीअसणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये तिथल्या अमिराच्या आमंत्रणावरून गेले. परंतु यामध्ये त्यांची खूप परवड झाली. अन्नपाण्याची टंचाई, अमिराच्या अधिकाऱ्यांनी केलेले अत्याचार यांमुळे सकल-इस्लामवादाच्या स्वप्नाला पुन्हा सुरुंग लागला.  

गांधीजी आणि खिलाफत

खिलाफत आंदोलनामध्ये आघाडीवर असणारे असणारे अली बंधू (मोहम्मद अली आणि शौकत अली) ‘मोहमेडन अँग्लो-इंडियन कॉलेज’चे विद्यार्थी होते हा योगायोग नक्कीच नाही. इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन छेडण्यासाठी मुस्लिमांचाही पाठिंबा मिळायला हवा या ध्यासापोटी गांधीजींनी अली बंधूंना जवळ करत खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिला आणि ‘एकत्र लढण्याच्या’ हट्टापायी मुस्लिमांच्या अनेक घातक सवयींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रघातच पडला. गांधीजींनी आपल्या हट्टापायी कॉंग्रेस आणि एकूणच स्वातंत्र्यलढ्याला खिलाफतीमागे कसे फरफटत नेले याबद्दलही पुस्तकामध्ये उहापोह केला गेला आहे.

खिलाफत आंदोलनाला पाठिंबा मिळाल्यामुळे मुस्लिमांना मिळालेले बळ अखेर हिंदूंवरच कसे उलटले याचे भीषण उदाहरण म्हणजे केरळमधील मोपल्यांनी केलेला नरसंहार. वरवर इंग्रजांविरुद्ध मुस्लिमांना चेतवले जात आहे असे दृश्य असले तरीही या ‘काफिरांविरुद्ध लढण्याच्या’ संधीचा फायदा घेऊन मोपला समाजाच्या मुस्लिमांनी हिंदूंवर हल्ले केले. २८००० हिंदूंचे हत्याकांड झाले आणि ४००० हून अधिक हिंदूंना बाटवले गेले. स्त्रियांवर बलात्कार झाले. मुस्लिम लीगने अत्याचारांवर पांघरूण घातले, अली बंधूंनी काहीही शोक व्यक्त केला नाही आणि “मोपले आपल्या धर्मासाठी लढले” असे म्हणून गांधीजींनी हिंदू पीडितांच्या जखमांवर मीठ चोळले. कॉंग्रेसने आपल्या ठरावामधून गुळमुळीतपणे हिंसेचा निषेध केला आणि लगेच ‘मुस्लिमांना भडकावले गेले’, ‘धर्मांतराच्या तीनच घटना घडल्या’ अशी पुस्तीही जोडली. ॲनी बेझंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र या प्रकारावर खरमरीत टीका केली.

मोपला जिहाद ही अपवादात्मक घटना नव्हती. खिलाफत चळवळीच्या तीन वर्षांत (१९१९ ते १९२२) भारतात झालेल्या दंगलींची यादीच पुस्तकात दिली आहे. खिलाफतीला पाठिंबा देताना गोहत्या बंदीची घातली गेलेली अट खिलाफतवादी मुस्लिमांकडून कधीही पाळली गेली नाही. एवढेच नाही तर भारतावर आक्रमण करून मुस्लिमांना ‘मुक्त’ करण्यासाठी अफगाणिस्तानच्या अमिराला आमंत्रण धाडण्यापर्यंत खिलाफतवाद्यांची मजल गेली. खुद्द कॉंग्रेसमधील अनेक नेते खिलाफत पाठिंब्याला अनुकूल नसताना गांधीजींनी खिलाफतीला पाठिंबा देऊन काय साध्य केले हा प्रश्न हे सर्व वाचताना छळत राहतो.

 

विविध पैलूंवर प्रकाश

सुटसुटीत प्रकरणे, मुद्द्यांना साजेशी उपशीर्षके, आवश्यक तिथे संदर्भ आणि तळटीपा यांमुळे उत्तम पुस्तक वाचल्याचे समाधान मिळते. फक्त काही ठिकाणी इंग्रजी संदर्भग्रंथातील भाषांतरित मजकूर दिला आहे, त्यामध्ये क्लिष्टता आली आहे. पुस्तकाचा आकार फार मोठा नसला तरीही पुस्तकामध्ये अनेक मुद्द्यांना स्पर्श केला गेला आहे. खिलाफतीशी संबंधित असलेल्या मुस्लिम संस्था, व्यक्ती यांची माहिती दिली आहे. आंदोलनाला समर्थन देणाऱ्या, संदिग्ध भूमिका असणाऱ्या व्यक्ती इथे कळतात त्याचप्रमाणे विरोध करणाऱ्या व्यक्तीही कळतात. डॉ. आंबेडकरांचे या संदर्भातले ठिकठिकाणी उद्धृत केलेले परखड भाष्य त्यांनी केलेल्या इस्लाम प्रश्नाच्या अचूक निदानाची साक्ष देते.

दूरवरच्या तुर्कस्तानमधल्या खलिफासाठी भारतामध्ये आंदोलन का उभे राहिले आणि त्यासाठी देशाची एकताही पणाला का लावली गेली हे जाणण्यासाठी मुस्लिम समाजाच्या धारणा, त्यांची श्रद्धास्थाने, धार्मिक शिकवण तसेच खिलाफत म्हणजे काय, पूर्वीपासूनच भारताचे खलिफांशी संबंध कसे होते या सर्वांची कल्पना असणे आवश्यक आहे. पुस्तकामध्ये डॉ. आफळे यांनी हे सर्व उलगडून दाखवले आहे. इंग्रजांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात वैरभाव वाढवण्यात पुढाकार घेतला असला तरीही मुळातच या दोन समाजांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या तणावाचा इंग्रजांनी कसा फायदा घेतला हे दर्शवणारी इंग्रजांच्याच शब्दांतली उद्धृते पुस्तकामध्ये वाचायला मिळतात.

खिलाफत आंदोलनाने पाकिस्तानसाठी मूलभूत सिद्धांताचे काम केल्याची जाणीव डॉ. आफळे यांनी या पुस्तकामधून करून दिली आहे. ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले यांची प्रस्तावना काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकते. पुस्तकातील ‘खिलाफत चळवळीतून घ्यायचा बोध’ हे प्रकरण चिंतनीय आहे. एकूणच या पुस्तकामुळे वाचनाने ‘आज शंभर वर्षांनी खिलाफतीचा अभ्यास कशासाठी करायचा?’ या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे.

 

खिलाफत आंदोलन : एक अभ्यास

लेखक : डॉ. गिरीश आफळे

प्रकाशक : भारतीय विचार साधना, पुणे

पृष्ठसंख्या : १४०

किंमत : १५० रु


(mahamtb.com वर पूर्वप्रकाशित)




गेल्या दीड-दोन हजार वर्षांचा विचार करता, इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीचा जगातल्या विविध देशांमधल्या संस्कृतींशी मोठा संघर्ष झाल्याचे दिसून येते. या धर्मांच्या वरवंट्याखाली अनेक संस्कृती लोप पावल्या. या धर्मांच्या आक्रमकतेला सर्वात मोठा प्रतिकार झाला तो भारतामध्ये. धर्माभिमानी हिंदूंनी क्षात्रतेज दाखवून केलेल्या प्रतिकाराने भारताचा हिंदू आत्मा टिकून राहिला हे आपल्याला ज्ञात असते. परंतु, हिंदू धर्माचे अस्तित्व टिकून राहायला कारणीभूत ठरलेल्या दुसर्‍या मार्गाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. हा दुसरा मार्ग आहे परधर्मात गेलेल्या हिंदूंचे पुनर्हिंदूकरण. आजच्या परिभाषेत सांगायचं तर ‘घरवापसी’! डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या प्रस्तुत पुस्तकामुळे पूर्वापार चालत आलेल्या परावर्तनाच्या प्रयत्नांबद्दल मोलाची माहिती मिळते.

 

‘शुद्धी’चा धर्मशास्त्रीय आधार

 

परधर्मात गेलेल्या व्यक्तीला स्वधर्मात परत घेण्याच्या प्रक्रियेला ‘शुद्धी’ या शब्दाने पूर्वापार संबोधले गेले आहे. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात डॉ. गोडबोले यांनी ‘शुद्धी’ म्हणजे काय, याचा ऊहापोह केला आहे. मुळात धर्मशास्त्राच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीला ‘पतित’ अथवा ‘भ्रष्ट’ असे संबोधले जाई, अशा व्यक्तीला प्रायश्चित्त देऊन त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी आणणे म्हणजे ‘शुद्धी.’ ‘शुद्धी’साठी करावयाची प्रायश्चित्ते आणि संस्कारविधी यांचा विविध स्मृतिग्रंथांमध्ये ऊहापोह केला गेलेला आहे. कालपरत्वे ‘शुद्धी’ या शब्दाची अर्थच्छटा बदलली. इस्लामी आक्रमण सुरू झाल्यावर ‘धर्मांतर’ या गोष्टीचा भारतीयांना परिचय होऊ लागला. बाटवली गेलेली व्यक्ती आता धर्मभ्रष्ट झाली आहे आणि अशा भ्रष्ट झालेल्या व्यक्तीला पुन्हा आपल्यामध्ये सामावून घेणे म्हणजेच ‘शुद्धी’ करणे, अशी संकल्पना रूढ झाली. परधर्मात गेलेल्यांना हिंदू धर्मात सामावून घेण्यासाठी ‘देवलस्मृती’ एक अतिशय महत्त्वाचा आधार आहे. हा ग्रंथ इस्लामच्या आक्रमणाला सुरुवात झाल्याच्या काळातला असल्याने शुद्धीची काळानुरूप निकड त्यामध्ये विचारात घेतली गेलेली आहे. विशेष म्हणजे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णातल्या स्त्री-पुरुषांची शुद्धिप्रक्रिया त्यामध्ये सविस्तर सांगितली गेली आहे.

 

 

इस्लामी राजवटीतले शुद्धिकार्य

 

मुस्लीम जेव्हा भारतामध्ये शासक झाले, तेव्हा हरप्रकारे हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. अनेकांना तलवारीच्या बळावर बाटवले गेले. सुलतानी संकटाविरोधात इथलेच धर्माभिमानी लोक उभे राहिले आणि मुस्लीम झालेल्या आपल्याच बांधवांना परत हिंदू धर्मात आणत राहिले. बाप्पा रावळ, सुखपाल, रावल जगमाल तसेच काश्मीरचे राजे रणबीरसिंहजी अशा राज्यकर्त्यांसोबतच स्वामी विद्यारण्य, चैतन्य महाप्रभू अशा संत महंतांनीही शुद्धीकरणाची परंपरा चालूच ठेवली.

 

 

मराठ्यांनी केलेले ‘शुद्धिकार्य’

 

शुद्धीकरणाची प्रक्रिया राजकीय पाठबळ असेल तर अधिक जोमाने आणि ठामपणे सुरू राहते. शुद्धीकरणाच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी केलेले कार्य अजोड आहे. त्यावर पुस्तकात स्वतंत्र प्रकरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरनोबत नेताजी पालकर काही कारणाने औरंगजेबाला सामील झाला होता. तिथे त्याला बाटवून मुस्लीम केले गेले आणि ‘महंमद कुलिखान’ हे नवे नाव दिले गेले. परंतु, कालांतराने पश्चात्तापदग्ध होऊन परत आलेल्या नेताजीला महाराजांनी केवळ आपलेसे केले नाही, तर त्याला विधिवत पुन्हा हिंदू करण्यात आले. महाराजांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी तसेच त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनीही परधर्मात गेलेल्यांना हिंदू करून घेतले. ही परंपरा अगदी दुसर्‍या बाजीरावापर्यंत चालू राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी यांनी तंजावरमध्ये मराठा सत्ता स्थापन केली होती. त्यांच्या पुत्राचे नावही शाहू होते. जेझुईट मिशनर्‍यांनी अत्याचार करून तंजावरमधल्या अनेक हिंदूंना ख्रिस्ती बनवले होते, त्याला उत्तर म्हणून तंजावरच्या या शाहू महाराजांनी शुद्धीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. धर्मांतरित ख्रिश्चनांची संपत्ती ताब्यात घेऊन पाद्य्रांना बंदीवान बनवण्यात यावे, यापासून सुटका करून घ्यायची असल्यास ख्रिस्ती झालेल्या हिंदूंनी पुन्हा मंदिरात पूजा करावी आणि ख्रिस्ती आचारांचे पालन करणे सोडून द्यावे, असे कडक धोरण त्यांनी अवलंबले.

 

 

आधुनिक काळातील शुद्धीकरण

 

आधुनिक काळामध्ये पुन्हा जोमाने शुद्धिकार्य सुरू करणार्‍यांमध्ये यातले सर्वात ठळक नाव म्हणजे महर्षी दयानंद सरस्वती. एकोणिसाव्या शतकात त्यांनी धर्मांतरित होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या हजारो हिंदूंचे प्रबोधन करून त्यांना धर्म सोडण्यापासून त्यांनी परावृत्त केले. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका विलक्षण होता की, ख्रिस्ती आणि मुस्लीम हिंदूच नव्हे, तर काही युरोपियन ख्रिस्ती लोकांनीही हिंदू धर्म स्वीकारला होता. ‘आर्य समाज’ या महर्षी दयानंदांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या माध्यमातून देशभर परधर्मात गेलेल्यांना हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेण्याची चळवळच उभी राहिली. आधुनिक काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे शुद्धीकरणाच्या कार्यामध्ये अग्रणी असल्याचे सर्वश्रुत आहेच. पण, याशिवायही अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वेसुद्धा शुद्धिकार्यासाठी अनुकूल होती. स्वामी विवेकानंद, प्रबोधनकार ठाकरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वेळोवेळी लेख लिहून अथवा भाषणांमधून शुद्धीचे समर्थन केल्याबद्दलचे पुस्तकातले तपशील या कार्याची व्याप्ती आणि स्वीकारार्हता किती मोठी आहे, याची जाणीव करून देतात.

 

धर्मसुधारणा आणि धर्मनिष्ठा

  

हिंदू धर्मामध्ये काळानुरूप सुधारणा होत गेल्यानेच हा धर्म प्रवाही राहिला आहे आणि कालसुसंगत बनला आहे. सोळाव्या-सतराव्या शतकात शुद्धीकरणाचे सोपे विधी निर्माण केले गेल्याने परत हिंदू धर्मात येण्याचा मार्ग सुकर कसा झाला, याची उदाहरणे गोडबोले यांनी दिली आहेत. आधुनिक काळातले करवीरपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी म्हणजे शुद्धिकार्याचे दीपस्तंभच! खुद्द शंकराचार्यांनी शुद्धिकार्याला अनुकूलता दर्शवल्याने बाटवलेल्या हिंदूंना धर्मात परत घेण्याच्या कृतीला धार्मिक अधिष्ठान मिळाले. पोर्तुगिजांच्या ख्रिस्ती वरवंट्याखाली दडपल्या गेलेल्या गोव्यासारख्या ठिकाणीदेखील शुद्धीचे कार्य चालू ठेवण्यामध्ये मसुरेकर महाराज यांनी मोठे योगदान दिले. शुद्धिकार्य करत असताना धर्मनिष्ठ हिंदूंनी केलेल्या बलिदानाची परंपराही मोठी आहे. फिरोझशहा तुघलकाच्या कारकिर्दीमध्ये एका ब्राह्मणाच्या देवकार्यामध्ये मुस्लीमही सहभागी होऊ लागले आहेत, हे कळल्यावर त्या ब्राह्मणाला मुस्लीम होण्यास सांगण्यात आले. त्याने त्यास नकार दिल्यावर दरबाराबाहेर चिता रचून त्यात त्याला जाळण्यात आले. इ. स. १३७५च्या आसपासच्या या घटनेतल्या या ब्राह्मणापासून शुद्धिकार्यासाठी बलिदानाची परंपरा सुरू झाली. १९२०च्या दशकामध्ये स्वामी श्रद्धानंदांनी केलेल्या हजारोंच्या केलेल्या शुद्धीकरणामुळे मुस्लीम इतके बिथरले की, अब्दुल रशीद नामक इसमाने चर्चेच्या बहाण्याने येऊन गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला.

 

 

शुद्धिकार्य-आजच्या संदर्भात


पुस्तकाच्या उपसंहारामध्ये शुद्धीच्या अनुषंगाने डॉ. गोडबोले यांनी मांडलेले विचार चिंतनीय आहेत. ते म्हणतात, “यवन, शक, अंकुश इत्यादी परक्या लोकांना हिंदू समाजाने आत्मसात केले. परंतु, त्या लोकांची विशिष्ट उपासनापद्धती, पवित्र ग्रंथ अथवा धार्मिक नेतृत्व असल्याचा कोणताही पुरावा नाही. स्वतःची उपासना पद्धती तीच ग्राह्य आणि भिन्न उपासना करणार्‍यांची हत्या किंवा धर्मांतर करणे, असा त्यांचा दुराग्रही विचार असल्याचा पुरावा नाही. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी यांचे वेगळे होते आणि आहे. इथे दुराग्रहाला दैवी अधिष्ठान आहे. या दोन्ही आव्हानांसमोर जगातील बहुतेक संस्कृती टिकू शकल्या नाहीत. परंतु, गेली हजारो वर्षे हिंदू समाजच काय तो आपली परंपरा आणि इतिहास टिकवू शकला. धर्मांतरित केल्या गेलेल्या हिंदूंना परत आपल्या धर्मात आणणार्‍या महापुरुषांचे कार्य पुढे चालू ठेवणे,” ही आपली जबाबदारी असल्याचेही प्रतिपादन ते करतात. भालचंद्र जोशी यांनी पुस्तकाचा अनुवाद उत्तम केला आहे. फक्त पुस्तकाच्या उत्तरार्धात मुद्रितशोधनाच्या चुका राहून गेल्या आहेत, त्या टाळता आल्या असत्या.

 

 

परधर्मात गेलेल्या व्यक्तींसाठी हिंदू धर्माचे दरवाजे कायमचे बंद करून घेण्यात आल्याची उदाहरणे प्रसिद्ध आहेत (उदा. काश्मीर). स्वाभाविकपणे, परधर्मात गेलेल्या व्यक्तीला परत घेण्याच्या बाबतीत हिंदू समाज सरसकटपणे उदासीनच राहिला, असे एक सर्वसाधारण चित्र डोळ्यासमोर येते. प्रस्तुत पुस्तकामुळे हा गैरसमज दूर व्हायला मदत होईल.


पुस्तकाचे नाव : शुद्धी चळवळीचा संक्षिप्त इतिहास - सन ७१२ते १९४७

मूळ लेखक : डॉ. श्रीरंग गोडबोले

अनुवादक : भालचंद्र जोशी

प्रकाशक : भारतीय विचार साधना, पुणे

पृष्ठसंख्या : ९४

मूल्य : ८० रु.



www.mahamtb.comवर १२ जून २०२१ रोजी पूर्वप्रकाशित 

https://www.mahamtb.com//Encyc/2021/6/12/Book-Review-of-Shuddhi-Chalval-history-712-to-1947.html

Friday, October 22, 2021

बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे दुर्लक्षिलेले हत्याकांड : अस्वस्थ शेजाराची स्पंदनं

 


८१ वर्षांपूर्वी स्वतंत्र होत असताना भारतासमोरची आव्हानं पर्वतप्राय होती. विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योगधंदे इ. अनेक क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं होतं. भौतिक प्रगती साधणं तर आवश्यक होतंच पण जाणिवांच्या पातळीवरही 'ही आपली मातृभूमी आहे', 'इथे राहणारे सर्व नागरिक एकमेकांचे बांधव आहेत' अशा विचारांची रुजवात होणं आणि एकोपा वाढीस लागण यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. आपल्या देशात अनेक समस्या, मतभेद असूनही आपल्या देशाने अनेक क्षेत्रात नेत्रदीपक म्हणावी अशी प्रगती केली आहे. भारताचे अंतर्गत प्रश्न भरपूर असूनही भारताला हे जमलं पण भारताच्या शेजाऱ्यांना मात्र ते जमलं नाही. गेली अनेक वर्षं त्यातले बहुतेक देश सतत धुमसत राहिले आहेत, ज्यांनी स्वतःच्या प्रगतीतच खीळ घातली असं नाही तर भारताच्याही पायात पाय घालून अडथळे आणले. काही देशांनी सतत भारतविरोधी कुरापती करत राहून आपले नुकसान केले तर काहींनी आपल्या देशातल्या एका मोठ्या समूहाला इतक्या वाईट पद्धतीने वागवलं की भीतीपोटी तो समाज अनिर्बंधपणे भारतामध्ये स्थलांतरित होऊ लागल्याने अनेक नागरी समस्या भारतापुढे उभ्या राहिल्या आणि भारताच्या प्रगतीपथावर अनेक काटे विखुरले गेले. प्रस्तुत पुस्तकात आपले शेजारी बांगलादेश आणि म्यानमार या देशांमधल्या अल्पसंख्याकांच्या स्थितीमुळे भारतापुढे उभ्या राहणाऱ्या समस्यांचं विश्लेषण केलं गेलेलं आहे.

गेली काही वर्षं म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे रोहिंग्यां मुस्लिमांचं मोठ्या प्रमाणावर विस्थापन होत आहेत. त्यावरून वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रं आणि समाजमाध्यमांवर वादळी चर्चा, आरोप/प्रत्यारोप होत असेलेले आपण बघत आहोत. अगदी संयुक्त राष्ट्रांनीही या संदर्भात वेळोवेळी टिप्पणी केलेली आहे. आपल्या देशातील अनेक ‘उदारमतवादी’ मंडळी, ‘सामाजिक कार्यकर्ते’ रोहिंग्या मुस्लिमांबद्दल अश्रू ढाळताना, त्यांच्यासाठी पायघड्या घालताना आपण बघत आहोत. पण गेली ८० वर्षं चालू असणाऱ्या बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरच्या भीषण अत्याचारांबद्दल वरीलपैकी कुणीही वातावरण ढवळून काढताना दिसत नाही. अशी निवडक मानवता पाहून अस्वस्थ झालेल्या अक्षय जोग यांनी या संदर्भात अधिक अभ्यास करायचं ठरवलं आणि त्यातूनच साकारलेल्या लेखमालांचे पुस्तकरूप म्हणजेच प्रस्तुत पुस्तक.

 

बांगलादेशातील बिकट परिस्थिती

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथम पूर्व पाकिस्तान आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या बांगलादेशमधील बहुसंख्यांक मुस्लिमांकडून हिंदू आणि बौद्ध अल्पसंख्यांक सुनियोजितपणे लक्ष्य होत आलेले आहेत. चित्तगाव पर्वतीय क्षेत्रात बहुसंख्य असलेल्या बौद्धांची इच्छा भारतात सामील व्हायची असूनही त्यांना बांगलादेशात जावं लागलं आणि त्यानंतर पाकिस्तानी राजवटीत त्यांची ससेहोलपट सुरू झाली. बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात पूर्व बंगालमधील अल्पसंख्याकांचा पाठिंबा असणाऱ्या आणि स्वातंत्र्यानंतर सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायची भाषा करणाऱ्या मुजीब-उर-रेहमानच्या आवामी लीगच्या कार्यकर्त्यांकडून बौद्धांवर हल्ले होतच राहिले. हिंदूंचे तर एवढे नृशंस हत्याकांड झाले की अमेरिकेचे बांगलादेशातील राजदूत आर्चर ब्लड यांनी नि:संदिग्ध शब्दात ‘हा हिंदूंचा वंशविच्छेद (genocide) आहे’ असं आपल्या अहवालात नमूद केलं होतं. शेवटी भारतात येणाऱ्या निर्वासितांचे लोंढे एवढे अनावर झाले की भारताला यात लक्ष घालून एक युद्ध लढून हा प्रश्न सोडवावा लागला. त्या घटनेला आज ४७ वर्षं होऊनही आजही बांगलादेशात अल्पसंख्यांकांची स्थिती काळजी करण्यासारखीच आहे. हिंदू आणि बौद्धच नव्हे तर ख्रिश्चन आणि खुद्द मुस्लिम धर्मातील शिया आणि अहमदिया या पंथांनाही तिथल्या बहुसंख्यांकांच्या मूलतत्त्ववादाची झळ बसली आहे. हिंदू आणि उदारमतवादी मुस्लिम ब्लॉगरच्या हत्याही ताज्या आहेत. या घटना जगासमोर आणण्यासाठी पुढाकार कोण घेतंय, तर अमेरिकेचे नागरिक असणारे ज्यू धर्मीय डॉ. रिचर्ड बेन्कीन आणि बांगलादेशातले उदारमतवादी मुस्लिम आणि त्यांच्या NGO. वास्तविक भारतातील बुद्धिवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने आवाज उठवून आंतरराष्ट्रीय पातळीवर याबद्दल जागृती करायला हवी पण त्यांचं लक्ष, सहानुभूती कुणाकडे आहे ? रोहिंग्यांकडे! प्रस्तुत पुस्तकाचा उत्तरार्ध रोहिंग्या प्रश्नाचा इतिहास आणि वर्तमान आपल्यासमोर मांडतानाच या बुद्धिवंतांच्या देशविघातक ठरू पाहणाऱ्या भूमिकेवरही प्रकाश टाकला आहे.

 

रोहिंग्या समस्येचा वेध

उत्तरार्ध पूर्णपणे रोहिंग्या प्रश्नाला वाहिलेला असला तरी पुस्तकाच्या शीर्षकात फक्त बांगलादेशचा उल्लेख आहे ही एक त्रुटी पुस्तकात राहून गेली आहे. आज रोहिंग्या म्हणून ओळखला जाणारा समूह हा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते १९४८ पर्यंत चित्तगावमधून म्यानमारच्या रखिन प्रांतात शेतमजुरीसाठी स्थलांतरित झाला. जपानने म्यानमार वर (तत्कालीन ‘बर्मा’) हल्ला केला तेव्हा स्थानिक बौद्ध जपानच्या बाजूने तर रोहिंग्या मुस्लिम इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले होते तेव्हापासूनच या दोन समाजांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. या निष्ठेचे फळ म्हणून इंग्रजांनी त्यांना स्वतंत्र मुस्लिम प्रदेश देण्याची घोषणा केली. पुढे तसे घडले नाही, परंतु फुटीरतावादाची बीजं त्यापूर्वीच रुजली होती. सतत १९४८ साली म्यानमार स्वतंत्र झाल्यावर रोहिंग्यांना राजकीय प्रतिनिधित्वही मिळाले. म्यानमारमधल्या १३५ वांशिक गटांच्या यादीमध्ये त्यांचा समावेशही होता परंतु १९८२ मध्ये या यादीतून त्यांना वगळण्यात. रोहिंग्यांच्या फुटीरतावादाबद्दल म्यानमारमधील बौद्धांनी मनात असणाऱ्या रोषाला बदलेल्या परिस्थितीने खतपाणीच मिळालं आणि रोहिंग्यांवर हल्ले व्हायला सुरुवात केली. निर्वासितांचे लोंढे म्यानमार सोडून जाऊ लागले. आसपासच्या देशांमध्ये अवैध मार्गाने घुसू लागले आणि त्या त्या देशांवरचा भारही वाढू लागला. आज भारतात अवैधपणे राहणारे ४०,००० रोहिंगे आहेत! प्रत्यक्षात त्याहून जास्त आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर अत्याचार होत असले तरी तिथून पळून भारतात आलेल्या रोहिंग्यांनी जरा स्थैर्य मिळताच आपली नखं काढायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. २०१२ साली भारतीय मुस्लिम संघटनांनी आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून झालेले दंगे, अमर जवान स्मारकाची नासधूस या गोष्टी सर्व देशाने पाहिल्या आहेत. या घटनेच्या आठवडाभर आधी चिथावणीखोर संदेश प्रसृत करणारा युसुफ शेख हा रोहिंग्या आहे. रोहिंग्यांच्या संघटनांचे हिज्बुल, अल् कायदा, जैश ए मोहम्मद इ. अतिरेकी संघटनाशी संबंध असल्याचे आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांचे अहवाल आहेत. शिवाय रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये होत असणारी बेसुमार लोकसंख्यावाढ हेही वाढत्या चिंतेचं कारण आहे. असं असताना रोहिंग्या केवळ मुस्लिम आहेत म्हणून त्यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक भारतीय मुस्लिम संघटना आणि मानवतेच्या नावाखाली त्यांना आपल्या देशात वसवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या NGO यांच्यामुळे देशाच्या अंतर्गतसुरक्षेलाच आव्हान उभे राहिले आहे हे लेखकाने आकडेवारी व उदाहरणांसहित स्पष्ट केले आहे आणि रोहिंग्यांना हद्दपार केले पाहिजे असे ठाम प्रतिपादन केले आहे.

 

सखोल विश्लेषण

पुस्तक छोटेखानी असलं तरी त्यात बांगलादेश आणि म्यानमार या दोन्ही देशांमधल्या परिस्थितीबद्दल विस्ताराने माहिती दिली आहे. दोन्ही देशांचा भूगोल आणि थोडक्यात राजकीय इतिहास, लोकसंख्येचे धार्मिक पृथक्करण आणि धार्मिक समस्येची पूर्वपीठिका यांमुळे मुख्य प्रश्नाची पार्श्वभूमी व्यवस्थित तयार झाली आहे. आकडेवारीचे तक्ते, आलेख यांच्या पुढे जाऊन या प्रश्नांच्या अनुषंगाने अनेक महत्वाच्या गोष्टींना इथे हात घातला गेला आहे. निर्वासितांमध्ये असणारे शरणार्थी आणि खुसखोर यांच्यात असणारा फरक समजावून सांगितला आहे आणि रोहिंग्या शरणार्थी नाहीत हे ध्यानात आणून दिले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार असणारी बंधनं आणि भारतीय घटनेची या विषयासंबंधात असणारी कलमं यांच्यातले परस्परसंबंध याचाही उहापोह थोडक्यात आणि सोप्या शब्दात केलेला आहे. 

म्यानमारमध्ये अत्याचार होत असल्यामुळे तिथले रोहिंग्या मुस्लिम दहशतवादाकडे वळत आहेत असा युक्तिवाद काही जणांकडून केला जातो त्यावर “काश्मिरमधील अल्पसंख्य हिंदूंचा वंशविच्छेद होऊनही त्यांना दहशतवादाकडे का वळावेसे वाटले नाही?” असा रोखठोक प्रश्न लेखक विचारतो. रोहिंग्यांची बाजू घेण्याच्या नादात केल्या जाणाऱ्या ‘मुस्लिम आहेत म्हणून म्यानमारमध्ये त्यांना लक्ष्य केलं जात आहे’, ‘निर्वासितांना स्वीकारताना भारत सरकार फक्त मुस्लिमांनाच नाकारतं’, ‘रोहिंग्यांना भारत मानवतेच्या दृष्टिकोनातून काहीच मदत करत नाही’ अशा सोयीस्कर आरोपांना पुस्तकात उत्तरं दिली आहेत.

पुस्तकातली विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ प्रश्नांचीच यात चर्चा नसून त्यावरचे उपायही सुचवले आहेत. भारताने निर्वासितांना आसरा देणे हा काही या प्रश्नांवरचा कायमस्वरूपी तोडगा नाही. शेवटी बांगलादेश आणि म्यानमार या दोन्हीही देशांनी तिथल्या अल्पसंख्याकांची काळजी घेतली तर भारताचीही वाटचाल सुखकर व्हायला मदत होणार आहे. विविध संस्थांचे व अभ्यासगटांचे अहवाल, सर्वेक्षणांची आकडेवारी निर्वासित प्रश्नासंबंधित कायद्याची कलमं यांच्या अभ्यासातून साकारलेल्या या पुस्तकाला उत्तम संदर्भमूल्य व संग्राह्यमूल्य प्राप्त झाले आहे.

 

पुस्तक : बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे दुर्लक्षिलेले हत्याकांड

लेखक : अक्षय जोग

प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स

पृष्ठसंख्या : ८८

किंमत : १५०

आवृत्ती : पहिली (सप्टेंबर २०१८)


Saturday, June 12, 2021

'लिंकन' : गुलामगिरीला मूठमाती देणाऱ्या नेत्याचे डावपेच



 १८६५ साल. अमेरिकन गृहयुद्ध गेली चार वर्षं चालू आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी (ज्यांना कॉन्फेडरेशन स्टेट्स असं संबोधलं जातं, आणि जे  गुलामगिरीचे पाठीराखे आहेत) अमेरिकेन संघराज्यातून फुटून निघून उत्तरेकडच्या राज्यांविरुद्ध आरंभलं आहे. हे युद्ध निग्रोंची गुलामगिरी कायम राहावी की नाही मुद्द्यावरच केंद्रित आहे.. युद्धाचा शेवट जवळ आलेला आहे असं वाटतंय, आणि कॉन्फेडरेशन स्टेट्स पराभूत होतील अशी लक्षणं आहेत, पण अजून युद्धाचा शेवट झालेला नाही. तसं पाहता लिंकननी युद्धाच्या धामधुमीत दीड वर्षांपूर्वीच Emancipation Proclamation (म्हणजेच (गुलामांच्या) मुक्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर ते दुसऱ्यांदा निवडणूक अध्यक्षपदी निवडूनही आलेले आहेत, याअर्थी त्यांच्या या भूमिकेला अनेकांचा पाठिंबाही आहे. पण... 


पण गुलामांच्या मुक्तीच्या मार्गात अनेक अडथळे आहेत, ज्यांबद्दल लिंकनना काळजी वाटते. 


मुक्तीची घोषणा एकप्रकारे अध्यादेशासारखी आहे. ती न्यायालयाकडून रद्द होऊ शकते. त्यामुळे तसा कायदा करणे आवश्यक आहे. त्यासाठी थेट घटनादुरुस्तीच व्हायला हवी. त्यासाठी २/३ संख्याबळ असणे तर आवश्यक आहेच, पण वेळ हाही मोठा फॅक्टर आहे. आज ना उद्या युद्ध संपले की कॉन्फेडरेशन स्टेट्सना पुन्हा संघराज्यात सामावून घेण्याबाबतही लिंकनच्या मनात स्पष्टता आहे. पण ती राज्यं आल्यावर ती हमखास विधेयकाला संसदेत विरोध करणार आणि २/३ बहुमत हे मृगळजळच ठरणार. त्यामुळे आहे संसदेची जी स्थिती आहे त्यातच विधेयक पारित करून घेण्याची घाई करावी लागणार आहे. 

 

संसदेत डेमोक्रॅट्सचे गुलामगिरीला उन्मत्त समर्थन आहे आहेत. तर दुसरीकडे रिपब्लिकन्समध्ये दोन गट आहेत. सगळे रिपब्लिकन्स गुलामगिरीच्या विरोधात भूमिका घेण्याप्रत अजून आलेले नाहीत, विशेषतः दक्षिणेकडच्या राज्यातील रिपब्लिकन्सचा पाठिंबा मिळेल याची आज शाश्वती नाहीये. पण रॅडिकल रिपब्लिकन्स मात्र आज आत्ता ताबडतोब कायदा होऊन गुलामगिरी नष्ट व्हायला हवी या मानसिकतेचे आहेत आणि त्यांचा युद्ध लवकर संपवण्यासाठी कॉन्फेडरेशन स्टेट्सशी वाटाघाटी करण्यास प्रखर विरोध आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा संस्थापक ब्लेअर याची मदत लिंकनना हवी आहे, पण ब्लेअरची दोन मुले युद्धात लढत असल्याने त्यांचा जीव जाण्याआधी त्याला युद्ध संपवणे आणि त्याच्यासाठी महत्वाचे आहे. त्यासाठी कॉन्फेडरेशन स्टेट्सशी वाटाघाटी करण्याची आवश्यकता आहे, हे तो लिंकनच्या गळी उतवरतो आहे.  


वैयक्तिक पातळीवरही लिंकन पेचात आहेत. त्यांचा धाकटा मुलगा स्वतःची वेगळी ओळख शोधू पाहतो आहे, म्हणून त्याला सैन्यात भरती होऊन मानाने मिरवायचं आहे, पण वडील तसे होऊ देत नसल्याने पित्याबद्दल त्याच्या मनात कडवटपणा आला आहे आणि दोघांचे संबंध मधुर राहिलेले नाहीत. त्याउलट लिंकनची बायको "या जीवघेण्या युद्धात मुलाचा मृत्यू होईल" या भीतीने लिंकनना मुलाला सैन्यात भरती कारण्याबाबत कडाक्याचा विरोध करते आहे आणि तो सैन्यात जाणारच हे कळल्यावर तिने "काहीही करून युद्ध लवकर संपुष्टात यायला हवं" अशी लिंकनना जवळपास धमकीच दिली आहे...


एवढ्या सगळ्या पेचप्रसंगातून लिंकननी कुशलतेने मार्ग कसा काढला याचे चित्रण हा चित्रपट करतो. लिंकनचे हळवे मन, गुलामांप्रति असणारी त्यांची सहृदयता याबद्दल कुठेही फार मोठी डायलॉगबाजी चित्रपटात नाही. पण वेळ आल्यानंतर अगदी मोजके संवाद आणि ठाम स्वर यातून लिंकनची हा प्रश्न सोडवण्यासाठी असणारी कटिबद्धता स्पष्टपणे दिसून येते. 


संसदेतले काही सदस्य पुन्हा निवडून येऊ न शकल्याने संसदेबाहेर पडणार आहेत (आपल्यासारखं निवडणुकीचे निकाल लागले की की जुने बाहेर आणि नवे आत अशी एकदमच प्रक्रिया होत नाही बहुतेक इकडे. याबद्दल अधिक वाचायला हवं). अशांचा पाठिंबा मिळवणं तसं कठीणच (आपल्या इथे नोटीस पिरियडमध्ये असणाऱ्या नोकरदाराकडून मॅनेजरने हवं ते काम करवून घेण्याइतकंच अवघड काम होतं हे... ). मग अशावेळी लिंकन त्यांच्या भविष्याची काळजी घेण्याचा मार्ग अवलंबतात. हा तसा ग्रे एरिया होता. म्हणजे मतांसाठी लाच देणे, इतका हा थेट भ्रष्टाचार नाही. पण संसदेबाहेर जाणाऱ्यांना (ज्यांना 'लेम डक' अशी संज्ञा वापरतात) भविष्यात नोकरीधंद्याची गरज पडणार, हे ओळखून आपल्या राजवटीत नव्याने निर्माण होऊ घेतलेल्या नोकरीच्या संधी त्यांना मिळू शकतील याबद्दल आश्वस्त करण्याचं लिंकन (अप्रत्यक्षपणे) करतात. पण हे सगळं ते करतात ते 'ग्रेटर गुड'साठीच..  मोठ्या माणसाच्या शुभ्र नसणाऱ्या अशा बाजूचे चित्रीकरण आपल्या इथे कधी होऊ शकेल? चित्रपट पाहताना आणखी एक विचार मनात आला. अमेरिकेत आफ्रिकन्सना निग्रो म्हणणं आता निषिद्ध आहे. पण याचे चित्रीकरण दीडशे वर्ष जुन्या काळाचं असल्याने तेव्हा प्रचलित असलेला 'निग्रो' हा शब्द त्यांनी जसाच्या तसा चित्रपटात वापरला आहे. आपल्या इथे असं त्या काळाशी प्रामाणिक राहणारं काही चित्रित झालं तर ते ज्ञातीसंघटना, त्यांना पाठीशी घालणारे राजकीय पक्ष ते समजून घेतील?


विधेयक संसदेत मांडल्यावर संसदेतली वादळी भाषणं पाहताना थरारून जायला होतं. वाईट आणि चांगल्या, दोन्ही अर्थाने. गुलाम बाळगणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे अशा तोऱ्यात गुलामगिरीचे नि:संकोचपणे समर्थन करणारे सिनेटर, "आज हे केलं तर उद्या तुम्ही निग्रोंना मतदानाचा अधिकारही द्याल!" असं म्हणतात तेव्हा हतबुद्ध व्हायला होतं. दुसरीकडे गुलामगिरीचा प्रखर विरोधक असणारे सिनेटर स्टीव्हन्स असतात. गोरे आणि काळे यांच्यात वांशिक समानताही आहे अशी टोकाची वाटेलशी भूमिका जपलेले स्टीव्हन्स संसदेत बोलायला उभे राहतात तेव्हा मात्र आपल्या भूमिकेमुळे अधिक गोंधळ उडून विधेयकाच्या भवितव्यावर गदा येईल हे जाणून आपली भूमिका मवाळ करत, "काळे आणि गोरे वांशिक समानता नसून ए असं मी मानत नाही, पण त्यांच्यातली कायदेशीर समानतेचा मी पुरस्कर्ता आहे" असं सांगतात, तेव्हा त्यांचं आपल्याला कौतुक वाटतं. अगदी विधेयकावरच्या मतदानाच्या क्षणापर्यंत चलबिचल होणारे सिनेटर्स पाहून आज ऑब्व्हिअसली मानवतावादी वाटणारी भूमिका त्या काळी घेणं किती अवघड होतं हे जाणवतं. 

 

लिंकन आपल्या हजरजबाबी स्वभावाबद्दल प्रसिद्ध होते. चित्रपटातही त्यांचा मिश्किल स्वभाव दाखवणारे प्रसंग खुबीने पेरले आहेत. तणावाच्या वेळी एखादा किस्सा सांगण्याची त्यांची हातोटी त्यांच्या संवादपटुत्वाची चुणूक दाखवून जाते. चित्रपट पाहताना आवश्यक त्या सर्व ठिकाणी लिंकननी संवादाचे दरवाजे मोकळे ठेवल्याचं दिसून येतं. अगदी घटनादुरुस्ती नंतरही कॉन्फेडरेशन स्टेट्सशी लढत राहण्यापेक्षा त्यांना संघराज्यात यायची आणि त्याबद्दल चर्चेची ऑफरही लिंकन देतात आणि तशी चर्चाही करतात. यातून आणि मृत्यूदंडाच्या दयेच्या अर्जावर विचार करण्याच्या प्रसंगातून आणखी कुणाला तरी धडा शिकवावा म्हणून मुडदे पाडण्यात लिंकनना अजिबात रस नसल्याचंही आपल्या मनावर ठसत जातं. लोकशाहीवर असणारी त्यांची निष्ठा लोभसवाणी वाटते. शक्य तितकं  सामोपचाराने घेणं, आपले सहकारी उगाच फार फाटे फोडत आहेत असं वाटल्यावर त्यांना एक राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःच्या हाती असलेल्या प्रचंड अधिकारांची आठवण करून देणं, या गोष्टींमुळे या लिंकन पात्राचं चित्रपटातलं  संतुलन व्यवस्थित राखलं गेलं आहे. 


डॅनियल डे-लुईसला मेकप कमाल भारी केलाय. खुद्द लिंकनच पडद्यावर अवतरलेत असं वाटतं. फक्त या भूमिकेसाठी दमदार आवाजाच्या अपेक्षेत मी होतो आणि प्रत्यक्षात त्याचा एकदम पातळ आवाज ऐकून नाही म्हटलं तरी निराशा झाली. पण त्याने काम मात्र छानच केलं आहे. वि. ग. कानिटकर यांनी 'फाळणी टाळणारा महापुरुष' असे ज्यांचे वर्णन केले आहे त्या लिंकन यांच्या शेवटच्या काळावरचा हा चित्रपट नक्की पहा (आणि हो, चित्रपट सुरु करण्याआधी गृहपाठ जरूर करा, नाहीतर अनेक गोष्टींचे संदर्भ लागणं कठीण जातं!)


टीप : चित्रपट 'सोनी लिव्ह'वर उपलब्ध आहे. 


(छायाचित्र सौजन्य : https://wallpapercave.com)

डिव्हाईन जस्टिस : एका कार्यकर्त्याच्या जडणघडणीचा प्रवास



शिक्षण, नोकरी, लग्न, निवृत्ती हे सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यातले ढोबळ टप्पे असतात. काही जणांना मात्र चाकोरीबाहेर पडून वेगळ्या वाटेने जाण्याची प्रेरणा मिळते आणि वाटेत कितीही अडचणी आल्या तरीही त्यांचा प्रवास ते थांबवत नाहीत. अशाच वेगळ्या वाटेने जाणाऱ्या उमाकांत मिटकर या मुशाफिराचे आत्मकथन 'डिव्हाईन जस्टिस' वाचकाला आपल्या जवळ असूनही आपले लक्ष न जाणाऱ्या भवतालाची ओळख करून देते.

उमाकांत मूळचे मराठवाड्यातल्या एका शिक्षकाच्या कुटुंबातले कुटुंबातले आणि त्याला अनुसरूनच त्यांचे बालपण होते. महाविद्यालयात मात्र संभाजी ब्रिगेडशी संबंध आला आणि ब्राह्मणद्वेष, हिंदुधर्मद्वेष मनामध्ये भरला जाऊन घरातले देवसुद्धा काढण्यापर्यंत मजल गेली. सुदैवाने काही काळाने महाविद्यालयातच एन. सी. सी. शी संबंध आल्यामुळे ब्रिगेडचा विखार मागे सरून राष्ट्रीय विचार अंकुरित व्हायला मदत झाली. परंतु आईचा विरोध असल्याने सैन्यात जाण्याचा विचार सोडून द्यावा लागला. पदवीधर झाल्यानंतर काही कारणाने एम. ए. पूर्ण झाले नाही. पुढे काय करावे हे निश्चित नव्हते, अशा परिस्थितीत एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे संघविचारांच्या कार्यकर्त्यांचा परिचय झाला. त्यातूनच हळूहळू ब्रिगेडी विचारांना कायमची तिलांजली मिळायला मदत झाली.

यमगरवाडीच्या भटके विमुक्त प्रकल्पाच्या एकलव्य विद्यालयात शिकवणारे अनिल घुगे उमाकांत यांच्या भावाच्या भेटीसाठी घरी येत असत. संघ स्वयंसेवकाच्या सहज स्वभावाला अनुसरून अनिल घुगे उमाकांत यांच्याशी सहज संपर्क ठेवत राहिले, विचारपूस करत राहिले आणि परिचयाचे रूपांतर आपोआप मैत्रीमध्ये झाले. त्यांच्यासोबत आणखीही कार्यकर्त्यांचा घरी राबता सुरु झाला, चर्चा झडू लागल्या. यमगरवाडी प्रकल्पाबद्दल माहिती मिळू लागली.  उमाकांत यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचे कुतूहलही वाढू लागले. एके दिवशी अनिल घुगे यांनी "यमगरवाडीतल्या आठवी ते दहावीच्या वर्गांवर शिक्षकाची आवश्यकता आहे.” असे सांगितले. 'सध्या सरकारी मान्यता न मिळालेल्या या इयत्तांना कालांतराने मान्यता मिळेल आणि शिक्षकाची जागा नियमित होऊन नोकरीचा प्रश्न सुटेल' अशी उमाकांत यांची माफक अपेक्षा  होती, परंतु  जेव्हा अधिक तपशील कळले तेव्हा मात्र ही नोकरी सध्या बिनपगारी नोकरी असल्याचे कळले. असे असूनही हा वेगळा अनुभव घेऊन बघावा असे उमाकांतना वाटले हे विशेष. इथूनच त्यांच्या आयुष्यातले एक नवे पर्व सुरु झाले.

यमगरवाडीमध्ये भटक्या विमुक्त मुलांच्या सवयी, आहार आणि एकूणच जगणे जेव्हा दृष्टीस पडले तेव्हा उमाकांत हादरून गेले. आपण त्यांच्या आयुष्याबद्दल किती अनभिज्ञ आहोत याची जाणीव झाली. उमाकांत कामात गुंतत गेले तसतश्या भटके विमुक्तांच्या समस्या त्यांच्या ध्यानात येऊ लागल्या. उदरनिर्वाहाच्या अडचणी, स्वतःचे घर नसणे, कुठलीही कागदपत्रे नसणे, व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव, पोलिसी अत्याचार अशी समस्यांची न संपणारी यादी होती. यावर उत्तर शोधायचं तर काठावरून न पाहता प्रवाहात उडी मारायला हवी होती. याच विचारातून यमगरवाडी प्रकल्पातून काही कार्यकर्ते 'पालावरची शाळा' ही संकल्पना घेऊन निघाले. इमारत, गणवेश, वह्या-पुस्तके यातले काहीच नसणारी ही शाळा असणार होती. एकेकाला एकेका समाजाच्या पालांवर जाऊन त्यांच्यात मिसळून काम करायचे होते.

उमाकांत उमरग्याजवळच्या मसणजोगी समाजाच्या पालावर पोहोचले. प्रचंड घाण, डुकरांचा मुक्त वावर, भीक मागून पोटापुरते अन्न मिळवून गुजराण करणारे लोक असे प्रगतीच्या कुठल्याही पाऊलखुणा नसणारे त्या वस्तीचे स्वरूप होते. अशा ठिकाणी तिथल्या एका व्यक्तीची ओळख काढून गेले तरीही संपूर्ण वस्तीशी संपर्क कसा करावा, संबंध वाढवावेत कसे हा प्रश्नच होता. वस्तीतल्या पत्र्याच्या शेडमधला उकिरडा साफ करून तिथेच मुक्काम ठोकला. लोक व्यवस्थित बोलायचे पण कार्य उभे करण्याच्या दृष्टीने प्रतिसाद शून्य… विचित्र अवघडलेपण आले… वाट दिसेना…  खिशात पैसे नसल्याने जेवणही दुरापास्त होते. तशात दिवाळी आली. पण पालावर दिवाळी वगैरे काहीच नसायचे. मन घरच्यांच्या आठवणीने व्याकुळ होते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. उमाकांतबद्दल आपुलकी असणाऱ्या वस्तीवरच्या एकाने भीक मागून आणलेल्या भाकरीचे तुकडे आणि घरात बनवलेले डुकराचे मटण आणून दिले. आता समोर दुसरा काहीही पर्याय नव्हता. माळकरी कुटुंबातल्या उमाकांतनी त्या दिवशी थेट डुक्कर खाल्ले. खाताना ब्रह्मांड आठवले खरे, पण भूक शांत झाली. त्या दिवशीपासून मात्र संपूर्ण वस्तीचा त्यांच्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला. उमाकांत आणि मसणजोगी यांच्यातली अदृश्य भिंत ढासळू लागली. त्यानंतर उमाकांत यांनी अनेक बदलांची सुरुवात करून दिली. मुलांसाठी शाखा लावून संस्कार रुजवायला सुरुवात केली. स्वच्छतेचे महत्व रुजवले. जन्मदाखला, रहिवास प्रमाणपत्र अशी कागदपत्रे मिळवून द्यायला सुरुवात केली. वीज, बोअरवेल यांची सोय होण्यासाठी खटपट केली. पावसाळ्यानंतर रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या पालांसोबत उमाकांतसुद्धा जात राहिले आणि पालावरच्या शाळेचे कार्य वृद्धिंगत केले.

 

संघ परिवारातल्या संस्थेचा अनुभव घेतल्यानंतर उमाकांत यांच्याकडे संघाचा प्रचारक म्हणूनही जबाबदारी सोपवली गेली. या सगळ्यांमधून त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला पैलू पडत गेले. समाजाचे आकलन अधिकाधिक विस्तारत गेले. संघकामावरची निष्ठा अधिक दृढ झाली. दरम्यानच्या काळात पुण्याच्या स्पायसर कॉलेजमधून बी. एड. केल्यानंतर तिथेच चालून आलेली उत्तम पगाराची नोकरी सोडतानाही मनाची चलबिचल झाली नाही.  त्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा यमगरवाडीमधलीच शिक्षण समन्वयाची जबाबदारी आली. त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम प्रयोग करता आले. समाजातल्या मोठ्या वर्गामध्ये यमगरवाडी, संघ यांच्याबद्दल आपुलकी आणि अनुकूलता निर्माण झाली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग यमगरवाडीची सर्व माहिती अद्ययावत करण्यासाठी उपयोग झाला. उमाकांत यांच्या कामाचा आवाका वाढत वाढत एके दिवशी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या पोलिस न्याय प्राधिकरणाचा सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली!

 

उमाकांत मिटकर यांचा भटक्यांच्या बकाल पालापासून मुंबईच्या चकाचक कार्यालयात रुजू होईपर्यंतचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. सोपवलेली जबाबदारी कुठलीही असली तरी ती मनापासून पार पाडणे, कामामधली कल्पकता, संघावरची निष्ठा हे उमाकांत यांचे गुण पुस्तकामधून जसे जाणवतात, तसेच त्यांना योग्य वेळी आधार देणाऱ्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणाऱ्या संघकार्यकर्त्यांची वैशिष्ट्येही दिसून येतात. कुठलीही विशेष पार्श्वभूमी नसतानाही उत्तम कार्यकर्ता घडण्यासाठी 'आहे तसा मिळवा आणि हवा तसा घडवा' हा संघमंत्र कारणीभूत ठरला. मनोबल टिकून ठेवण्यासाठी, मनातल्या शंका दूर होण्यासाठी उमाकांत यांच्याशी यमगरवाडीतले अनिल घुगे, गिरीश प्रभुणे आणि इतर अनुभवी कार्यकर्ते आवर्जून चर्चा, संवाद करत राहिले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासातून आणि त्यांच्या वागण्याबोलण्याच्या निरीक्षणातूनही संघसंस्कार नकळतपणे कसे रुजत जातात हे उमाकांत यांनी आवर्जून नमूद केले आहे.

 

पुस्तकातले काही प्रसंग विशेष उल्लेखनीय आहेत. धर्माबाद तालुका प्रचारक म्हणून काम करत असताना उमाकांत यांनी अन्य संघ यंत्रणेच्या सहकार्याने तिथल्या दलितांना मंदिर प्रवेश मिळवून देण्याच्या घटनेबद्दल पुस्तकातच तपशीलाने वाचायला हवे.  कुठलाही भडकपणा न करता न काढता सर्वांना विश्वासात घेऊन सामोपचाराने एका गंभीर सामाजिक समस्येची उकल करून समरसता कशी साधली जाऊ शकते केली याचे हे उत्तम उदाहरण आहे.  शुद्ध सात्विक प्रेमामधून किती शाश्वत कार्य उभं राहू शकतं याची प्रचिती देणारे उमाकांत याचे अनेक अनुभव हृद्य आहेत. ॲट्रॉसिटीच्या खोट्या खटल्यात अडकवले गेले असताना छळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याशी काही वर्षांनी अगदी वेगळ्या परिस्थितीत झालेली भेट हा प्रसंग तर चित्रपटात शोभावा असा आहे. उण्यापुऱ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात उमाकांत यांनी घेतलेल्या अनुभवांचा पट खूपच विस्तृत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे अनुभव शब्दबद्ध करण्याची वाट न पाहता कमी वयातच आपले अनुभव शब्दबद्ध करण्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे. त्यातून तरुण वयातल्या व्यक्तींना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. पत्रकार दत्ता जोशी यांनी उमाकांत मिटकर यांच्या अनुभवांचे शब्दांकन व संपादन नेमकेपणाने केल्यामुळे एक नेटके स्फूर्तिदायी पुस्तक वाचल्याचा अनुभव वाचकांना निश्चितपणे येईल.

 

               

डिव्हाईन जस्टिस

लेखक : दत्ता जोशी

प्रकाशक : द कॅटालिस्ट

पृष्ठसंख्या : २२४

किंमत : ३०० रु.

पुस्तकासाठी संपर्क : मनोजकुमार जाधव - ९४२३७ ०३४३४

(या पुस्तकाच्या विक्रीतून आलेली रक्कम वात्सल्य सामाजिक संस्थेस निधी म्हणून समर्पित केली जाईल)



पूर्वप्रसिद्धी : 'मुंबई तरुण भारत', २९ मे २०२१ 
https://www.mahamtb.com//Encyc/2021/5/29/Book-Review-of-Divine-Justice.html