Total Pageviews

Tuesday, December 21, 2010

आपण सारे खुळाडू



ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करू नये म्हणतात, याच चालीवर बालपणीच्या खेळांचे खूळ कुठून, कसे (आणि मुख्य म्हणजे 'का' ) सुरु होते हे शोधण्याचा प्रयंत्न करू नये. कारण आपल्या हाती काहीही लागणे शक्य नसते. नानाविध चमत्कारिक शब्द, जगावेगळ्या कल्पना, कुठल्याही नियमावलीला फेफरे आणतील असे नियम यामुळे लहानपणी खेळले जाणारे खेळ हे अगदी अजब रसायन बनते. मलातर जेव्हा जेव्हा लहानपणीचे खेळ आणि त्यातल्या तर्कापलीकडच्या संकल्पना आठवतात तेव्हा आपल्याच येडेपणाबद्दल जाम हसायला येते. त्यामुळे म्हटले आज लहानपणीच्या अशाच काही चित्तचक्षुचमत्कारिक संकल्पना आठवून बघू. मला खात्री आहे तुम्ही पण हे नक्की अनुभवले असेल , पण खेळताना  'हे असेच का' वगैरे फालतू प्रश्न अजिबात पडले नसतील..

आता हेच बघा ना कोणत्याही खेळात 'राज्य' कोणावर आणायचे हे ठरवण्यासाठी 'सुटणे' नामक एक विधी केला जायचा. त्यात सुद्धा किती खुळ्या गमतीजमती (आणि प्रश्न !!). 'सुटण्या' च्या  दोन पद्धती काहीशा अशा   :

१) सगळ्यांनी रिंगण करून आपला उजवा हात पालथा करून समोर धरायचा (भगतसिंगाने मेणबत्तीवर धरला होता तसा) आणि मग कोणीतरी एक गडी (बऱ्याचदा तो ग्रुप मध्ये लीडरगिरी करणारा असतो ) "जास्तीची majority " असा खच्चून ओरडायचा (उच्चार : "मेजॉ  ssssss  र्टी" ). मग सगळी पोरंसोरं आपापला हात हवेत उडवून उताणा किंवा पालथा करायची. मग यातलं ज्याला कळतं असे काही अनुभवी खेळगडी कोण 'सुटलं' आणि कोण नाही हे सांगायची. मलातर नक्की पालथे हात असणारे सुटले की उताणे असणारे सुटले हे आजपर्यंत कळलेले नाहीये. बहुतेक तो गडी आधी जे काही खच्चून ओरडला त्यावर अवलंबून असावे. कारण बऱ्याचदा तो 'कमीची majority' (?????)  असंही ओरडायचा !! बऱ्याच जणांना तोपर्यंत इंग्लिशचा गंध नसल्यामुळे ओरडणारा भिडू इंग्लिश किंवा मराठी यापैकी एका भाषेला उताणा (की पालथा ?) पाडतोय हे कोणाच्या गावीही नसायचे. सगळे जण आपल्यावर येऊ शकणारे 'राज्य' वाचवायच्या प्रयत्नात असायचे. मी तर 'चार लोक करतात ते बरोबर' हे डोक्यात ठेऊन नेहमी कुंपणावरच असायचो. म्हणजे असे की उगाचच हात उंच हवेत उडवायचो आणि सावका ssss श खाली आणायचो म्हणजे, हात खाली येईपर्यंत एकूण उताणे/पालथे हात किती आहेत याचा अंदाज यायचा आणि मी शिताफीने 'जास्त लोकांचा' हात जसा असेल तसा धरायचो !! (पण कधी कधी माझ्यासारखेच आणखी काही 'सावकाश भामटे' कंपू मध्ये असतील तर मात्र आम्हा सगळ्या भामट्यान्चे हात बराच वेळ खाली न येता 'हाईल हिटलर' म्हणताना हात जसा तिरका हवेत असतो तसेच हवेत राहायचे.)

२) सगळ्यांनी रिंगण करून आपले हात शेजारच्याच्या हातात गुंफायचे आणि मग हात दोन वेळा वरखाली करून ते हात सोडून द्यायचे आणि (आपल्याच) डाव्या तळव्यावर उजवा हात (परत एकदा उताणा किंवा पालथा !) आपटायचा. जो 'सुटला' आहे तो त्याने एकदम खुश होऊन आनंदाच्या भरात दोन्ही हात तसेच्या तसे लगेच ('वाचलो' या भावनेने) उचलून छातीला लावले की बाकीचे 'न सुटलेले' रडतराव एकसुरात ओरडणार "जळला sssssss" . झाले ! सुटलेल्या भिडूला  पुन्हा त्या प्रक्रियेत नाईलाजाने सामील व्हावे लागायचे.  असे करता करता एक एक जण सुटत गेला आणि शेवटी दोघेच उरले मग अर्थातच कोण 'सुटला' हे कळणार नाही म्हणून मग आधी सुटलेल्या गड्यांपैकी एक जण परत 'राज्य कोणावर' हा पेच सोडवायला या प्रकारात सामील व्हायचा. आता एवढ्या साध्या गोष्टीसाठी मदतीला येणारा तो गडी एक चमत्कारिक कृती करून मगच 'सुटण्या' च्या प्रक्रियेत सामील व्हायला यायचा. ती कृती म्हणजे - 'एक तंगडी इतपत उचलावी की मांडी जमिनीला समांतर असेल आणि गुढग्यापासून पुढचा भाग लोंबकळता आणि मग उचललेला पाय आणि जमीन याच्या मध्ये दोन्ही हात नेऊन टाळी वाजवायची !!'  यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की कृती जास्तीत जास्त अर्ध्या सेकंदात पूर्ण व्हायची. एवढे झाले की तो मदतीला तयार. एवढी अचाट कृती पहिल्यांदा कोणाच्या डोक्यात आली, पाय उचलणे आणि टाळी वाजवणे यातला परस्पर संबध काय, 'एकच पाय उचलणे' यामागे माणसाचे संतुलन वगैरे सुधारण्याचा प्रयत्न असावा का, इत्यादी प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. अभ्यासूंनी प्रकाश टाकावा.

हे झाले 'सुटणे', जे जवळपास प्रत्येक खेळाच्या सुरुवातीला अनिवार्य असते. प्रत्यक्ष खेळामध्ये सुद्धा इतक्याच सुरस गोष्टी असतात. उदाहरणार्थ, लपाछपी खेळात असताना लपलेला कोणीतरी दिसला की त्याचे नाव घेऊन "अमुक अमुक
इस्टॉप (?????)" असे ओरडायचे. मी समासविग्रह, संधीविग्रह वगैरे व्याकरण चालवून 'इस्टॉप'चा अर्थ शोधायचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त जवळ पोचू शकलो तो 'Is Stop' या शब्दांच्या. पण तरीही हे दोन इंग्लिश शब्द आहेत याव्यतिरिक्त त्यांचा परस्परसंबंध, इंग्लिश व्याकरणाशी त्याचे नाते, 'इस्टॉप' ही आज्ञा आहे की 'सापडला' या अर्थाचा उद्गार आहे, वगैरे अर्थबोध मला आजतागायत होऊ शकलेला नाही. याव्यतिरिक्त धावत येऊन पाठीत दिलेला गुद्दा, पाठोपाठ 'धप्पा' ही आरोळी (कदाचित तो शब्द 'धप्पा' हा नसून गुद्द्याच्या आवाजाला represent करणारा 'धप्प' असा असावा), एखाद्याला दुसराच समजून 'इस्टॉप'  दिल्यावर चहूबाजूंनी घुमणारा 'अंडं sssss' (म्हणजे काय ????) वगैरे रोमहर्षक प्रकारांनी लपाछपीला अजूनच मनोरंजक बनवलंय ! (लपाछपीचा एक चुलतभाऊ आहे. त्याच्या तर नावापासूनच गोलमाल आहे, त्याच्या नावाचा अर्थ लागत नाहीच पण त्याचे खरे नाव 'डब्बा ऐसपैस' आहे की 'डब्बा एक्स्प्रेस' आहे हे मला कधीच कळले नाही. पुन्हा एकदा अ. प्र. टा. !!)


या सगळ्या खेळातल्या गोष्टींसोबतच आपसूकपणे घडणारी एक गोष्ट अजिबात विसरता येणार नाही, आणि ती कृती आठवली की मी आजही अवाक होतो - 'राज्य' असणारा भिडू पकडायला खूप आला जवळ की पळणारा हमखास एक गोष्ट करायचा - झटकन मनगट चाटायचा आणि ओरडायचा "ट्यामप्ली sss ज". झाले ! सगळे असतील तिथे थांबायचे. कधीकधी 'ट्यामप्लीज' ओरडायला आणि त्याला 'राज्यकर्त्या' ने पकडायला एकच गाठ पडायची तेव्हा मात्र आधी पकडणाऱ्याने औट केले की पळणारा 'ट्यामप्लीज' आधी ओरडला यावरून दोघांची जुंपायची.... मग पळणारा पोरगा हुकमी एक्का टाकायचा आणि म्हणायचा "हे बघ, मी आधीच ट्यामप्लीज 'घेतली' होती" आणि आणि असे पुरावा म्हणून लाळेने माखलेले मनगट उन्हात धरून चमकवायचा !!! आहे की नाही हाईट  !! स्वतःचे मनगट हे 'मेवाड'  ice cream असल्यागत चाटण्याच्या प्रथेचा उद्गाता कोण ??? कृपया अ. प्र. टा.

इथे एक गम्मत आठवते आहे, जी खेळताना घडत नसली तरी एरवी नेहमी घडायची ... शाळेत असताना 'बिट्टी धरणे'  हा एक प्रकार आमच्यात फार पॉप्युलर होता. कधीकधी शाळेत अचानक नाक बेचैन करणारा दुर्गंध हळूहळू पसरत जायचा (यामागचे कारण एखाद्या पोराचा शाळेत येतायेता रस्त्यातल्या शेणात पाय पडलेला असणे, कोणीतरी अंघोळ केलेली नसणे, कोणीतरी अपानवायू मुक्त केलेला असणे यापैकी काहीही  असू शकायचे). काही मिन्टे अशाच अस्वस्थतेत गेल्यावर अचानक आमच्यातलाच एखादा 'शेरलॉक होम्स' त्या दुर्गंधाचे उगमस्थान असणारा गडी शोधून काढायचा.  झाले ! आता त्या उगमस्थान पोराची अचानक दहशत निर्माण व्हायची. याने आपल्याला स्पर्श जरी केला तरी आपण जणू आपण बाटणारच  ! यावर उपाय एकच 'बिट्टी धरणे'. सगळी पोरं हाताच्या मधल्या बोटाचा तर्जनीला विळखा घालून 'बिट्टी ' धरायची. आता आपण 'सेफ'. "अब वो तो अपना बाल भी बांका नाही कर सकता" असा confidence यायचा. वास्तविक ज्या पोरावर 'आळ' आलेला आहे  त्याने यावेळी शरमेने चूर होणे अपेक्षित असायचे. पण व्हायचे भलतेच. त्या कारट्याच्या अंगी अचानक हत्तीचे बळ  संचारायचे. तो हिरीरीने आजूबाजूच्यांना स्पर्श करून त्यांना पण 'आपल्यात' घ्यायचा प्रयत्न करायचा आणि नकळत 'बिट्टी सुटलेले' काही गाफील भिडू त्याला सापडायचेच. मग ते पण नवी जबाबदारी स्वीकारून तेच करायला लागायचे आणि  जसे एका अमिबाचे दोन दोनाचे चार व्हावेत तसा हा समाज वाढत जायचा !! ( अर्थात कोणत्याही प्रकारच्या भूतबाधेपासून वाचण्यासाठी मांत्रिकाकडे जस हरतऱ्हेचा उपाय असतो (गंडा , अंगारा, अंगठी  इ. इ.), तसा या गाफील मंडळींसाठी माझ्या एका मित्राकडे नेहमी काही ना काही 'उतारा' असायचाच. तो अधिकारवाणीने सांगायचा "हाताने 'बिट्टी धरलेली नसेल तरी चालते - अंगावर लोखंड असेल (बक्कल वगैरे) तर ते दाखवायचे किंवा हातावर अगोदरच खाजवून ठेवायचे आणि ते ओरखडा सदृश पांढरे फराटे दाखवायचे म्हणजे 'त्या' पोराने तर अंगाला हात लावला तरी प्रॉब्लेम नाही" !!!!)

हे सगळे आठवून आता स्वतःवरच हसू येते. अशा कित्येक वेड्या गोष्टी आहेत ज्यांनी आत्ता मनात गर्दी केलीये - ज्या आठवताना 'का ????? का ?????' असा नेहमीचा प्रश्न पडतोय मला... मग हळूच माझं दुसरं मन मला सांगतंय, "अरे वेड्या, लहानपणी खेळता खेळता दंगून जाणे एवढाच तर उद्देश असतो. किंबहुना तर्कसंगती, डोकं लावणे वगैरे गोष्टी त्या वयातल्या खेळांचा उद्देश नसतोच. मिळेल त्या जागेत, मिळेल त्या साधनांसह आणि हजर असतील तितक्यांसह एन्जॉय करणे एवढंच तर आपली आनंदाची सर्वोच्च कल्पना असते. जे आधीपासून आले आहे ते 'का ?? ' असे न विचारता follow करण्याइतकं निरागस मन असतं आपलं आणि तेच आपलं 'लहानपण' शाबूत ठेवत असतं " .
अशा वेळेस मात्र प्रकर्षाने जाणवायला लागतं की आपण सगळे आयुष्याचा वेगवान खेळ खेळणारे निबर खेळाडू झालोय. खुळ्या संज्ञा आणि शब्द वापरणारा आपल्यातला निरागस 'खुळाडू' कधीच अंधारात गाडला गेलाय ही कल्पना मात्र नकळत कुठेतरी अस्वस्थ करत राहते..... 


ता. क. : कोणाला असल्या आणखी काही गमती जमती किंवा अतर्क्य शब्द ( उदा: गोट्या खेळतानाचे 'अक्क्या, बोक्क्या, टोकक्या' वगैरे शब्द)  आठवत असतील तर नक्की share करा. मी वाट बघतोय...

Tuesday, December 14, 2010

चार पावलं o o o o



वाचनाचा नाद कधी लागला हे आठवत नाही आता, पण वाचनाचे बोट पकडूनच हळू हळू मनातल्या मनात काहीतरी जुळवायला लागलो. सुचतंय ते लिहून वगैरे काढायची अक्कल फारशी नव्हती आधी. नंतर नंतर मात्र मनात बरेच विचार फेर धरायला लागले तेव्हा मात्र त्यांना कान पकडून डायरीत आणायला लागलो. वाचता वाचता आणि डायरी लिहिता लिहिता स्वप्नं पाहायला लागलो - कधीतरी स्वतः नक्की स्वतःचे पुस्तक लिहीन..... आणि जेव्हा केव्हा पुस्तक लिहीन तेव्हा त्याच्या अर्पणपत्रिकेत कोणाची नावे असतील हे पण ठरवलं होतं. नाल तयार होती, घोडा आणणे तेवढे बाकी होते.

नंतर जेव्हा कळून चुकलं , की पुस्तक लिहिण्यासाठी (खरं म्हणजे छापून येण्यासाठी ) लिखाणामध्ये किमान काही दर्जा असावा लागतोतेव्हा पुस्तक छापून येण्याची  स्वप्नं बघणं सोडून दिलंखूप दिवस लोटले आणि अचानक लक्षात आलं की , पुस्तक लिहिण्याची स्वप्नं बघण्यापेक्षा मी ब्लॉग लिहू शकतो !! मनात आलं ते लिहिलं आणि share करावसं वाटलं ते ब्लॉग वर टाकलं, इतका सोप्पा मामला वाटला मला हाअधे मधे थोडं फार सुचत होतं ते कागदावर लिहिलंच होतं; आता ते ब्लॉगवर उतरवता येईल .. वा, छान कल्पना !! त्यात अलीकडे नवीन नवीन बरेच काही वाचायला - अनुभवायला मिळायला लागलं आणि डोक्यात अक्षरांची फुलपाखरं भिरभिरायला लागली ...मग जेव्हा डोक्यात ती मावेनाशी झाली, तेव्हा त्यांच्यासाठी माझ्या बोटांतून वाट फुटली  आणि मी keyboard बडवायला सुरुवात केली ....
ब्लॉग वर काय काय लिहीन मी ?? बघूया .... ठरवलं काहीच नाहीये..... सुचेल तेव्हा, मनात येईल तसे आणि share करावेसे वाटेल ते ... निश्चित असे कोणतेही स्वरूप नाही किंवा फॉर्म सुद्धा नाही  ...  त्यामुळेच ब्लॉगचे नाव ठेवणे अवघड नाही गेले , ते आपोआप डोक्यात आले ... "इत्यादी

एवढं मात्र नक्की की पुढे एकवेळ 'लिहायला काहीच सुचल्यामुळे' ब्लॉगची नंतरची पानं कोरी राहिली, तरी सुरुवातीचं एक पान नक्की भरलेलं असेल - अर्पणपत्रिकेने !! (एकेकाळी पुस्तक लिहिता येणार नाही हे कळल्यावर "आता अर्पणपत्रिका केव्हा आणि कुठे लिहिणार" या विचाराने चिंतेत पडलो होतो ...  नंतर नंतर तर किमान अर्पणपत्रिका लिहिण्यासाठी तरी पुस्तक लिहावसं वाटायला लागलं याचे कारण अर्पण पत्रिकेतल्या 'त्या' दोन व्यक्तींनी मला जे काही दिलंय ते खरच अनमोल आहे).

यापूर्वी कोणता ब्लॉग अर्पणपत्रिकेने सुरु झालाय की नाही माहित नाही , पण मी मात्र (नमनाला घडाभर तेल ओतल्यानंतर का होईना) अशी सुरुवात करतोय ... 'त्या' चार पावलांना नमस्कार केल्यामुळे मी पावलं न अडखळता चालत राहीन अशी अशा वाटते आहे
-----------------------------------------------------------------------------------------------
प्रिय भा.रा.भागवत आणि पु.



भा.रा.: तुमची पुस्तकं वाचायला सुरुवातपण केली नव्हती तेव्हा वाटायचं की 'चटकदार' चव ही फक्त भेळेलाच असते, पुस्तकाला नसतेच मुळी !! आणि ते फास्टर फेणे नावाचं भूत जे माझ्या मानगुटीवर बसवलंत   ते अजूनही उतरायचं नाव घेत नाहीये ...



पु. : जगण्यातली एकही situation अशी नसते ज्यावेळी तुम्ही आणि तुमचे dialog आठवत नाहीत, मग ती situation म्हणजे अगदी जन्म असो ( "रामराणा जन्माला ती  टळटळीत दुपारची वेळ होती...." - मी आणि माझा शत्रुपक्ष'  )  किंवा मृत्यू  ("शेवटी "चांगली बरणी आल्याशिवाय तुमच्या साड्या बोहारणीला देणार नाही" असं बोलल्यावर  पिंडाला कावळा शिवला ...." - पाळीव प्राणी ).  अवघं जगणं किती आनंदी होऊ शकतं हे तुमच्या मुळे कळलं ...



तुम्ही दोघांनी लिहिलं नसतंत तर मला वाचायची आवड लागली असती असं खरोखर वाटत नाही.. आणि वाचायला लागलो नसतो आज हे पांढऱ्यावर काळं (खरेतर काळ्यावर पांढरं) लिहायची काही शक्यताच नव्हती !

तुम्ही दोघेही हयात असताना (किंवा निदान अखेरच्या प्रवासाला निघालात तेव्हा तरी) तुम्हाला नुसतं एकदा बघून तरी यावं हा विचार माझ्या डोक्यात सुद्धा येऊ नये याबद्दल राहून राहून खंत वाटतीये  ......!!!

-----------------------------------------------------------------------------------------------