पावसाळ्यातला एक रविवार. कोकणाला यथेच्छ
झोडपून झाल्यावर पावसाने किंचीतशी उसंत घेतली असली तरी दिवस तसा भिजलेलाच. अशा
वातारवणात बाहेर पडण्याचा आनंद वेगळाच. मस्तपैकी एखाद्या किल्ल्यावर जावं...
ढगांनी पांगून परवानगी दिली तर उंचावरून आसमंत न्याहाळावा... त्यातून तो किल्ला
एखादा सागरी किल्ला असला तर मग दुधात साखरच! अशा वातारणात कोरलईच्या किल्ल्यावर
जायला किती मजा येईल! तिथल्या तटबंदीला टेकून समुद्रावरचं बेफाम वारं श्वासांत
भरून घेतलं की थकवा, नैराश्य, चिंता कुठल्या कुठे पळून जातात. यापूर्वी काही वेळा
या किल्ल्यावर जायचा योग आला होता, पण पावसाळ्यात – अर्थात पावसाने थोडीशी उघडीप
घेतल्यावरच – जायचा योग कधीच आला नव्हता. इतर ऋतूत इथे एवढं प्रसन्न वाटतं तर
पावसाळ्यात काय बहार येत असेल असा विचार बरेचदा डोक्यात यायचा. आज खरंतर खूप
चांगली संधी होती तिथल्या जादुई वातावरणाचा अनुभव घ्यायची. कोरलई गावाकडेच तर मी
निघालो होतो. पण आज माझं लक्ष्य कोरलईचा किल्ला हे नव्हतं, तर कोरलई गाव आणि
त्यातही विशेषकरून तिथली एक विशिष्ट वस्ती या गोष्टींवर मी लक्ष केंद्रित केलं
होतं. कोरलईच्या किल्ल्याला यापूर्वी दिलेल्या भेटींमध्ये दिसलेल्या शिलालेखांनी
मला इथल्या भागातल्या
पोर्तुगीज
पाऊलखुणांचा
मागोवा
घ्यायला
प्रवृत्त केलं होतं आणि त्यातूनच काही अनोख्या गोष्टी समोर येत
गेल्या होत्या. त्या अभ्यासाचा प्रत्यक्ष पडताळा घ्यायचा तर कोरलईला आणि त्यातही
एका विशिष्ट वस्तीला भेट देणं आवश्यक होतं. म्हणूनच मी कोरलईच्या दिशेने निघालो
होतो.
कोरलई हे अलिबागपासून २२ किलोमीटरवर
असणाऱ्या रेवदंड्याच्या खाडीच्या पलीकडे असणारं छोटंसं गाव. रेवदंड्याच्या खाडीत
घुसलेल्या भूभागावर वसलेलं. वरवर पाहता कोकण किनारपट्टीवर वसलेल्या कुठल्याही
छोट्या गावांसारख्याच खाणाखुणा अंगावर वागवणारं. शेती आणि मासेमारी हा इथलाही
मुख्य व्यवसाय. पण इथली एक गोष्ट विशेष आहे – आणि ती एकमेवाद्वितीय आहे - ती
म्हणजे इथे बोलली जाणारी एक भाषा. ही भाषा या गावाव्यतिरिक्त जगात इतरत्र कुठेही
बोलली जात नाही. ही भाषा इथे कधी आणि कशी आली हे जाणून घ्यायचं तर इतिहासात
डोकवायला हवं.
कोरलईचा इतिहास
१४९८ साली वास्को-दि-गामाच्या रूपाने पोर्तुगीजांची पावलं भारतीय भूमीवर उमटली. केरळच्या कालिकत बंदरापाठोपाठ गोवा, दीव-दमण तसेच वसई याठिकाणी पोर्तुगीजांनी आपले वर्चस्व निर्माण केले आणि हे भाग हळूहळू ताब्यात घेतले. स्वाभाविकपणे तिथे
पोर्तुगीज चालीरीती, भाषा यांचा प्रभाव पडला. या तीन प्रमुख वसाहतींसोबतच
चौल-रेवदंडा आणि कोरलई या भागावरही पोर्तुगीजांचं
वर्चस्व होतं. १५०५ साली पोर्तुगीजांनी चौलमध्ये प्रवेश केला. चौल हे प्राचीन काळापासून बंदर म्हणून प्रसिद्ध होतं. त्यामुळे या भागामध्ये व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश करणं त्यांना सोपं गेलं. त्यावेळी या भागामध्ये निजामाची सत्ता होती. निजामाकडून पोर्तुगीजांना
चौलचा किल्ला बांधण्याची परवानगी
मिळाली. स्वाभाविकपणे त्या भागात आणि कोरलई गावात पोर्तुगीजांचा वावर सुरु झाला. त्याचवेळी पोर्तुगीजांनी
चौलच्या बाजूला असणाऱ्या रेवदंड्याच्या खाडीपलीकडच्या टेकडीवरही तटबंदी बांधायला सुरुवात
करण्याचा प्रयत्न केल्यामुळे निजाम आणि पोर्तुगीज संघर्ष झाला आणि त्यानंतरच्या
समझोत्यात कोरलईच्या टेकडीवर पोर्तुगीजांनी बांधकाम करू नये असं ठरलं. परंतु
बुर्हान निजामाच्या मृत्युनंतर त्याचा उत्तराधिकारी ‘बुर्हान निजाम दुसरा’ याने
कोरलईच्या टेकडीवर किल्ला बांधला. परंतु
साम्राज्यविस्ताराचे स्पष्ट मनसुबे असणाऱ्या पोर्तुगीजांनी जोरदार हल्ला चढवत
कोरलईचा किल्ला ताब्यात घेतला (१५९४). आता खाडीतून चौलमध्ये शिरणाऱ्या जहाजांवर
पलीकडच्या कोरलई टेकडीवरून नजर ठेवणं सोपं जाणार होतं.
या सगळ्या घडामोडींदरम्यान पोर्तुगीजांची वस्ती या भागामध्ये होऊ लागली होती. स्थानिक मराठी
लोकांशी स्वाभाविकपणे संपर्क येऊ लागला. पोर्तुगीज आणि स्थानिक मराठी जनता यांच्यामध्ये
संवादाची गरज निर्माण होऊ लागली आणि त्याचबरोबर पोर्तुगीजांना त्यांनी जबरदस्तीने
गुलाम बनवलेल्या भारतीय समाजातील
गुलामांसोबतशीही संभाषणाची निकड निर्माण झाली. त्यातूनच एका
नव्या भाषेचा उगम झाला, जिला
त्या भाषेत 'नॉ लिंग'
(आमची भाषा) असं
म्हटलं जातं.
दीडशेहून अधिक वर्षं या भागात पोर्तुगीजांचे अस्तित्व असल्यामुळे नवी भाषा अधिक
दृढ होत गेली यात आश्चर्य नाही. खरं आश्चर्य यात आहे, की मराठ्यांशी झालेल्या
तहामुळे १७४० साली पोर्तुगीज सैन्य निघून येथून गेल्यानंतरही पुढची जवळपास
पावणेतीनशे वर्षं ही भाषा तशीच टिकून राहिलेली आहे! या काळात या भाषेचा प्रसार
गावाबाहेरच काय पण गावाच्या अन्य भागातल्या ख्रिश्चनेतर समाजातही झाला नाही.
त्यामुळे अन्यत्र या भाषेची दखल घेतले जाण्याचं कारणही नव्हतं.
‘कोरलई क्रिओल पोर्तुगीज’चा अभ्यास
कोरलईची ही विशिष्ट भाषा ही एक क्रिओल आहे. क्रिओलचा अर्थं दोन किंवा अधिक
भाषांच्या मिश्रणातून विकसित
झालेली स्वतंत्र भाषा.
युरोपियन देशांमधून अन्य
देशांमध्ये स्थापन झालेल्या वसाहतींमध्ये राज्यकर्ते झालेल्यांची भाषा आणि स्थानिकांची भाषा यांच्या मिश्रणातून अशा क्रिओल्सची निर्मिती झाल्याचं दिसून येतं.
उदा. मॉरिशसमध्ये फ्रेंच भाषेवर आधारित ‘मॉरिशियन क्रिओल’ किंवा
जमैकामध्ये इंग्रजीवर आधारलेली ‘जमैकन
क्रिओल’ निर्माण झाली.
भाषाशास्त्राच्या परिभाषेमध्ये कोरलईच्या भाषेला ‘कोरलई क्रिओल
पोर्तुगीज’ म्हणतात. सोयीसाठी आपण तिला ‘कोरलई क्रिओल’ म्हणू.
कोरलईच्या या विशिष्ट भाषेचा
उल्लेख The Manglore Magazine च्या २५ मे १९०२च्या अंकात आढळतो. त्याशिवाय जर्मन पुरातत्वशास्त्रज्ञ Gritli von Mitterwallner लिखित चौलवरच्या
संशोधनपर ग्रंथामध्येही (१९६४) या भाषेचा उल्लेख आढळतो. परंतु या भाषेकडे जगाचं
लक्ष जायला १९८३ साली लिस्बन येथे भरलेली ‘पोर्तुगीज भाषेची जगभरातील सद्यस्थिती’ या विषयावरची परिषद कारणीभूत ठरली. मूळचे कोरलई गावचे असणारे आणि
Mitterwallner यांना चौलविषयक
संशोधनात सहाय्य करणारे जेरोम रोझारिओ यांनी या परिषदेमध्ये कोरलई क्रिओल भाषेमधली
लोककथा सांगितली. या भाषेला स्वतःची लिपी नसल्यामुळे त्यांनी या भाषेतल्या कथा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या. रोमन
लिपीमध्येही काही गोष्टी लिहिल्या गेल्या
परंतु या भाषेतून देवनागरीत केले गेलेले लिखाण मूळ उच्चारांच्या अधिक जवळ जाते.
त्यानंतर १९८८ पासून अमेरिकेतल्या इंडियाना विद्यापिठातील प्राध्यापक जे. क्लँसी क्लेमेंत्स
यांनी या भाषेचा जो अभ्यास केला आहे तो एखाद्या दीपस्तंभासारखा आहे. कोरलई गावात येऊन
ते राहिले. त्यांनी ही भाषा बोलणाऱ्या भारतीय-पोर्तुगीज मिश्रसंस्कृतीचा अभ्यास
केला, ती भाषा ते शिकले, या अभ्यासातून भाषेच्या निर्मितीचे विवेचन करणारा शोधनिबंध सादर केला. हा
शोधनिबंध या भाषेची निर्मिती होण्याला आणि पोर्तुगीज सैन्य कोरलईमधून निघून
गेल्यावरही ही भाषा इथे टिकून राहण्याला कारणीभूत असणाऱ्या गुंतागुंतीच्या सामाजिक
आणि तसंच वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीवरही प्रकाश टाकतो. हा शोधनिबंध इंटरनेटवर उपलब्ध असून या लेखाच्या शेवटी त्यांची लिंक देखील दिलेली आहे. क्लेमेंत्स
फक्त भाषानिर्मितीच्या अभ्यासावरच ते थांबले नाहीत तर या भाषेचा
शब्दसंग्रह, तिचं व्याकरण, वाक्यरचना, उच्चार, त्यातल्या पोर्तुगीज आणि मराठी या भाषांच्या सहभागाचे पृथःकरण असा विस्तृत अभ्यास करून
त्यावर प्रबंध लिहिला. तो The
Genesis of a Language: The formation and development of Korlai Portuguese या नावाने तो प्रकाशित झाला
असून googleboooks.com
वर अंशतः उपलब्धही आहे. आज या भाषेच्या अभ्यासकांसाठी करणाऱ्यांसाठी क्लेमेंत्स यांचा शोधनिबंध आणि पुस्तक पथदर्शी आहे.
‘कोरलई
क्रिओल’च्या निर्मितीमागची सामाजिक कारणं
वर उल्लेखलेल्या
‘गुलामांसोबतच्या संवादा’च्या मुद्द्याला असलेले बरेच गुंतागुंतीचे कंगोरे जे. क्लँसी
क्लेमेंत्स यांनी उलगडून सांगितले आहेत. पोर्तुगीज भारतात येण्याच्या काळात पोर्तुगालमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांचा वापर ही अतिशय सर्वमान्य गोष्ट होती. सर्रास होणारा
गुलामांचा व्यापार आणि वापर अंगवळणी पडलेली असल्यामुळे ज्या ठिकाणी सत्ता ताब्यात घेतली आहे, अशा ठिकाणच्या स्थानिकांचा गुलाम म्हणून वापर करणे हे पोर्तुगीजांसाठी स्वाभाविकच म्हणावे लागेल. त्यांनी कोरलई भागातही स्थानिक उपेक्षित लोकांना गुलाम म्हणून वापरून घेण्यास सुरुवात झाली. यातली बहुतांश मंडळी तत्कालीन
भारतीय समाजातल्या जातीव्यवस्थेतच्या सर्वात खालच्या स्तरातील होती. दरवर्षी पोर्तुगाल मधून येणाऱ्या मंडळींमध्ये स्त्रिया अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या होत्या.
हातात अधिकार आणि पाठीशी सत्तेचे बळ असलेल्या पोर्तुगीज सैनिकांची
नजर भारतामध्ये गुलाम बनवलेल्या स्त्रियांवर जात
असे.
लग्न न झालेले
पोर्तुगीज सैनिक (ज्यांना सोल्डॅडोज म्हटले जाई) आपल्यासोबत अनेक गुलाम स्त्रिया
बाळगत आणि त्यांच्याशी त्या सैनिकांचा शरीरसंबंध येत असे. यापैकी एखाद्या सैनिकाने
स्थानिक भारतीय स्त्रीसोबत लग्न
करून इथेच स्थायिक व्हायचे ठरवले तर पोर्तुगीजांकडून त्यांना सैन्यातून पदमुक्त होऊन इथेच राहण्याची मुभा होती. काही सैनिक याचा अवलंब करून भारतीय स्त्रियांसोबत राहून किंवा त्यांच्याशी लग्न करून इथे स्थायिक झाले (अशांना कॅसॅडोज म्हटले जात
असे). त्यांच्या पदरीदेखील स्त्री आणि पुरुष दोन्ही प्रकारचे गुलाम असत. सोल्डॅडोज
आणि कॅसॅडोज यांच्या भारतीय गुलाम स्त्रियांसोबत येणाऱ्या संबंधांतून
युरोपियन-भारतीय अशा मिश्र वर्णाची संतती निर्माण होऊ लागली. राजकीय आक्रमणाइतकाच
धार्मिक आक्रमणावर भर देणाऱ्या पोर्तुगीजांकडून गुलाम स्त्री-पुरुष तसेच अन्य स्थानिकांचेही
बऱ्यावाईट मार्गांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले गेले, युरोपियन-भारतीय अशा
मिश्र वर्णाची अनौरस संतती यांनाही बाप्तिस्मा देण्यात येऊ लागला. इथल्या
जातीव्यवस्थांच्या चौकटीत नव्या ख्रिस्ती धर्मांतरितांचा एक नवा समाजघटक समाविष्ट
होऊ लागला होऊ लागला होता. कुठल्याही जातीतला माणूस जर हिंदूधर्मातून परधर्मात गेला तर त्याचा हिंदू धर्मातील स्वजातीतील
मंडळीही त्याच्याशी संपर्क
ठेवणं बंद करत. धर्मांतरित झालेल्या निम्न जातीतील समाजापुढे दुहेरी पेच उभा राहिला. मुळामध्ये जातीच्या आधारावर त्यांना वेगळे ठेवण्यात आले होतेच. परंतु धार्मिक बाबतीतही ते वेगळे गणले जाऊ लागल्याने स्वतःच्या जातीतील हिंदू आप्त देखील त्यांना पारखे झाले. असा समाजगट आणखी छोट्या कप्प्यामध्ये जगू लागला.
ख्रिश्चन झाल्याने पोर्तुगीजांशी आणि पोर्तुगीज भाषेशी त्यांचा हिंदूंपेक्षा अधिक
संबंध येऊ लागला असला तरीही शुद्ध पोर्तुगीज भाषेशी त्यांचा संपर्क जास्त येऊ शकला
नाही. याला पोर्तुगीजांमधल्या सामाजिक स्तरांचाही यामध्ये वाटा होता. भारतात
आलेल्या पोर्तुगीज ख्रिश्चनांमध्ये आई-वडील दोघेही युरोपिययन, वडील युरोपियन व आई
युरेशियन, वडील युरोपियन व आई भारतीय इत्यादी अनेक पातळ्यांवरचे भेद होते. पोर्तुगीज पुरुष आणि त्याची स्थानिक भारतीय बायको/जोडीदारीण
असाही एक स्तर निर्माण झाला.
भारताच्या विशिष्ट
जातीतून धर्मांतरित करून ख्रिश्चन केलेल्या लोकांच्या जातींवरून आणखी पोर्तुगीज
ख्रिश्चनांमध्येही एक मोठी जातीव्यवस्था निर्माण झाली होती. सोबतच्या तक्त्यावरून
तिच्या स्वरुपाची कल्पना येईल.
(इथे हे लक्षात घ्यायला
हवं की त्यातही युरोपियन पोर्तुगीज ख्रिश्चन स्वतःला उच्च समजत. एवढंच नाही तर
त्यावेळचा पोर्तुगीज गव्हर्नर अफ्ल्फोन्सो द अल्बुकर्कने घालून दिलेल्या अटीनुसार
भारतातील पोर्तुगीजांनी भारतीय स्त्रियांची संबंध ठेवायचे असल्यास ते कायदेशीर (लग्न करून ठेवलेले) असण्याची
अपेक्षा असे. जातीव्यवस्थेला नावं ठेवणाऱ्या किंवा त्यातल्या भेदांचा फायदा उठवून
धर्मांतर करणाऱ्या या तथाकथित पुढारलेल्या समाजातही उच्चनीचतेच्या कल्पना प्रबळ
होत्याच. अर्थात असा आग्रह असला तरी प्रत्यक्षात पोर्तुगीजांचे स्थानिक उच्च जातीतील स्त्रियांशी लग्न करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले
नाहीत. अशा वेळेस निम्न समजल्या जाणाऱ्या जातीतील स्त्रियांना गुलाम करून प्राप्त करणे तुलनेने सोपे होते).
सर्वसाधारणपणे एखाद्या ठिकाणी आलेले परकीय आणि स्थानिक यांच्यामध्ये जो भाषिक व्यवहार होतो, तो एखाद्या कामचलाऊ भाषेच्या माध्यमातून होतो, ज्यामध्ये
मुख्यत्वेकरून दोन्ही भाषांमधले काही सोयीचे शब्द समाविष्ट असतात. या संपर्काच्या माध्यमाला पूर्णपणे विकसित भाषा समजता येत नसले तरीही ती एक प्रकारची बोली असते. पोर्तुगीज आणि स्थानिक स्त्रिया हे एकाच कुटुंबात समाविष्ट झाल्यामुळे याठिकाणी व्यवहारापुरती भाषा न राहता ती कुटुंबव्यवहारातली भाषा म्हणून आकाराला येऊ लागली. ही भाषा पोर्तुगीज सैनिक आणि भारतीय गुलाम स्त्री यांच्यापासून निर्माण झालेल्या संततीची मातृभाषा बनली आणि स्वाभाविकपणे ती त्या समाजामध्ये अधिक अधिक प्रमाणात पसरली आणि त्याला एक निश्चित स्वरूप प्राप्त झालं. मुळात या
भाषेतला पोर्तुगीज भाषेचा वाटा हा तिच्या संपूर्ण शुद्ध स्वरूपातला नाही. कारण
ज्या सामाजिक स्तरामध्ये ही भाषा विकसित झाली त्यांचा संपर्क मुख्यत्वे सोल्डॅडोज
बोलत असलेल्या पोर्तुगीज भाषेच्या काहीशा भेसळयुक्त आवृत्तीशीच आला होता
(सोल्डॅडोजची भाषा अशी भेसळयुक्त पोर्तुगीज असण्याची कारणं दोन : १) त्यांचा
भारतात येण्याआधी अन्य ठिकाणी आलेल्या बिगरपोर्तुगीज भाषेशी संबंध आणि २)
पोर्तुगालमध्ये असतानाची त्यांची निम्न सामाजिक स्तराची पार्श्वभूमी). बंदिस्त
जातीव्यवस्थेमुळे भारतातील नवख्रिश्चनांचा आपल्यापेक्षा वरच्या स्तरावरील – म्हणजे
एका अर्थाने पोर्तुगीज अभिजनांच्या – शुद्ध पोर्तुगीज भाषेशी संपर्क येऊ शकला नाही
आणि त्यातच आपल्या मूळच्या मराठी भाषेतील शब्दांची रूपंही समाविष्ट झाली. त्यातूनच
या भाषेला प्रमाण मराठी आणि प्रमाण पोर्तुगीज या दोन्ही भाषांपेक्षा वेगळं स्वरूप
प्राप्त झालं.
आता प्रश्न असा पडू शकतो की ही भाषा कोरलईची
क्रिओल कोरलईबाहेर
कशी
गेली
नाही? यासाठी कोरलईचं भौगोलिक स्थान लक्षात घ्यायला हवं.
आधी
म्हंटल्याप्रमाणे
खाडीमध्ये
घुसलेल्या
एका
चिंचोळ्या
जमिनीच्या
पट्ट्या
वरती
हे
गाव
वसलेलं
आहे.
त्याच्या
आजूबाजूला
किंवा
सीमेला
लागून
एकही
गाव
नाही
तसंच
बाजूला
असलेल्या
रेवदंड्याच्या
खाडीमुळे
कोरलाईचा
थेट
जमिनीवरून
संपर्क
हा
रेवदंड्याशीसुद्धा नव्हता. त्यामुळे कोरलईबाहेर ही भाषा जाऊ शकली नाही. बाहेरच कशाला, परंतु जाती-धर्माच्या कुंपणात अडकल्यामुळे कोरलईच्या
अन्य समाजामध्येदेखील ही
भाषा
जाऊ
शकली
नाही.
आज
भारतातल्याच नव्हे तर जगातल्या दुर्मीळ होत असलेल्या भाषांपैकी ही एक भाषा आहे.
(http://www.kokansearch.com/forts/english/forts_in_raigad/korlai/)
माझा
कोरलईतला वाटाड्या
या भाषेबद्दल इंटरनेटवर बरीच माहिती मिळू
शकली असली तरी फक्त तेवढ्यावर न थांबता
खुद्द कोरलई गावांमधल्या
ख्रिश्चन वस्तीला
भेट
द्यायच्या उद्देशाने मी कोरलईकडे निघालो होतो. कोरलईमध्ये प्रवेश केला तेव्हा दुपारचे
दोन वाजून गेले होते.
यापूर्वी
जेव्हा
दोन-तीनदा कोरलईला येऊन गेलो होतो तेव्हा डावीकडे एक कॉन्व्हेंट दिसलं होतं. इथे
ख्रिश्चनधर्मियांच्या या विशेष भाषेबद्दल इथे नक्की माहिती मिळेल म्हणून त्या कॉन्व्हेंटमध्ये शिरलो. परंतु तिथल्या
सिस्टर तिथे नवीनच आलेल्या असल्याने त्यांना याबद्दल फारशी काही माहिती नव्हती. “तुम्ही इथे विचारण्यापेक्षा ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये जा, तथे त्या लोकांना सगळी माहिती आहे. ते तुम्हाला व्यवस्थित माहिती देतील” असा सल्ला
त्यांनी दिला
म्हणून ग्रामपंचायतीकडे
कूच केले. तिथल्या एकमेव कर्मचाऱ्याकडे या गावात बोलल्या जाणाऱ्या विशेष भाषेबद्दल
चौकशी केली. त्याने
एकदम प्रश्नार्थक
चेहरा
केला
आणि
म्हणाला
“ती भाषा ख्रिश्चन बोलतात. ती आम्हाला येत नाही आणि त्या भाषेची आम्हाला काही माहितीही नाही” मी हैराण झालो
आणि म्हणालो “तुम्हाला येत नाही ठीक आहे पण ते तुमच्याच गावातले नागरिक आहेत ग्रामपंचायतीसारख्या
महत्वाच्या ठिकाणी काही
ना
काही
माहिती
मिळेल
असं वाटलं
म्हणून मी इथे आलो”. पण त्याने तेही उडवून लावले आणि म्हणाला “आम्ही मराठी बोलतो... त्यांची भाषा त्यांना माहिती.. तुम्ही त्यांनाच भेटा..” खरं म्हणजे त्या भाषेबद्दल चौकशी करायला गावात
अलीकडे कुणी ना कुणी येत असतं आणि हे त्या गावातल्या लोकांनाही माहित आहे. जे
पर्यटक, भटके फक्त किल्ला पाहण्यासाठी गावात येतात त्यांना या एकमावेद्वितीय
भाषेबद्दल थोडक्यात माहिती व्हावी म्हणून गावात अथवा किल्ल्यावर काही माहितीफलक
लावले तर ते किती चांगलं होईल! परंतु एका अत्यंत दुर्मीळ भाषेचा ठेवा आपल्या
भाषेला लाभला आहे याचं कुठलंही सोयरसुतक इथल्या प्रशासकीय यंत्रणेला नाही. ही
उदासीनता पाहून वाईट वाटलं.
आता काय करावे मला कळेना. बाजूला एक आखूड पंचा गुंडाळलेले आजोबा दिसले. त्यांचं
नाव नारायण बलकवडे.
ते तिथे
कसल्याश्या
कामासाठी आलेले असावेत. ते आमचं
बोलणं ऐकत होते. मला म्हणाले “ती भाषा कुठल्या भागातले लोक बोलतात मला माहिती आहे. पण त्याबद्दल
तुम्ही चर्चच्या फादरकडेच चौकशी करायला हवी.” मी चक्रावलो. म्हटलं “आत्ता तिथून कॉन्व्हेंट मधूनच आलो, पण त्या सिस्टरनी
असे कुणी फादर आहेत असं काहीच सांगितलं नाही”. ते म्हणाले “तुम्हाला चर्चमध्ये जावे लागेल. तिथले फादर
याबद्दल माहिती देऊ शकतात”.
मी विचारलं “मला तुम्ही फादर कडे घेऊन जाता का ?” तर ते कुरकुरायला लागले. “बघा आता माझं वय किती आहे, एवढं कसं चालू... ते चर्च माझ्या
घराच्या विरुद्ध दिशेला आहे...” वगैरे वगैरे. मी त्यांना म्हटलं “काही काळजी करू नका. माझ्याकडे कार आहे. मी तुम्हाला कारमधून फादरकडे घेऊन जातो.”
“ठीक
आहे, पण फादरशी गाठ घालून दिली की मला आधी घरी आणून सोड आणि मग त्यांच्याशी बोलत
बस” असं ते म्हणाले. मी त्यासाठीही तयार झालो म्हटल्यावर ते माझ्यासोबत कारमध्ये बसले. आल्या
वाटेने मी पुन्हा निघालो, एवढेच नाही तर गावाबाहेर पडलो आणि मुख्य
रस्त्यावर आलो. त्या रस्त्याला लागल्यावर लगेचंच डावीकडे चर्च पाहिलं.
गावात शिरण्याआधी असणाऱ्या या चर्चकडे माझं दुर्लक्षच झालं होतं.
चर्चपाशी पोचल्यावर आम्ही
दोघे कारमधून उतरलो आणि चर्चच्या आवारात शिरलो. चर्चच्या शेजारीच माउंट कार्मेल
शाळाही आहे.
खेळणारी
दोनचार मुलं सोडली तर तिथे शांतता होती. त्यांना फादर कुठे असतात हे विचारून
घेतलं. चर्चमागच्या
बाजूने
जिन्याने
फादरच्या
निवासस्थानाबाहेर
जाऊन
उभे
राहिलो.
आता
प्रार्थनेची
वेळ
झालेली
असल्यामुळे
फादर
येतील
असं
कळलं
होतं. आम्ही बाहेरून खूपवेळ बेल/कडी वाजवूनही दरवाजा उघडला नाही. आत कुणी नसेल असे
समजून मी परत
निघायच्या
विचारात
होतो.
पण बलकवडे
आजोबांनी कडक आवाजात सांगितलं “काम
झाल्याशिवाय
इथून हलायचं
नाही.”
मला
गंमत
वाटली. बहुदा
त्यांनाही माझ्या कामात रस निर्माण झाला होता. बरोबर पाच वाजता दरवाजा उघडला... म्हणजे फादर आतच होते तर! फादर म्हणल्यानंतर हिंदी चित्रपट अनेक गोष्टी ‘बढा चढा के’ दाखवतात हे माहित असलं तरी फादर म्हटलं की
एक विशिष्ट प्रतिमाच आपल्या डोक्यात पक्की असते. त्यापेक्षा हे एकदमच वेगळे होते. वय फार दिसत नव्हतं. त्यांचा
तो सुप्रसिद्ध पेहरावही नव्हता. साध्या शर्ट-पँट मध्ये होते. त्यांच्याकडे इथल्या
भाषेबद्दल चौकशी केली. त्यांना
चर्चमध्ये
काम
असल्यामुळे
ते
वेळ देऊ शकणार नव्हते, पण
त्यांनी तिथून जाणाऱ्या एका शाळकरी मुलीला हाक मारली आणि आम्हाला एका गृहस्थांकडे घेऊन जायला तिला सांगितलं. मगाशी “मला आधी घरी सोड” म्हणणारे आजोबा आता
माझ्यासोबतच चालू लागले होते. मला खरंच गंमत वाटत होती आणि बरंही वाटत होतं.
अशावेळी स्थानिक कुणी सोबत असलं की बरं असतं...
‘नॉ लिंग’
भाषकाशी
गप्पाटप्पा
चालत
चालत आम्ही निघालो होतो. अरुंद गल्ल्या असणारी ती
वस्ती होती. तिथल्या
एका
छोट्याशा
चौकात
एक मोठा क्रॉस उभा केलेला दिसला. घरातच थाटलेली एक-दोन दुकानं दिसली. घरांच्या
दारांवर अथवा दुकानांमध्ये क्रॉस अथवा येशूची प्रतिमा हटकून दिसत होती. वस्तीतली माणसं आमच्याकडे काहीशा कुतूहलाने बघत
होती. पुढे एका गल्लीत वळलो आणि एक दुकान असं दिसलं ज्यावर चक्क स्वस्तिकाची खूण होती! मला आश्चर्य वाटलं.. संपूर्ण
ख्रिश्चन वस्तीत हे एक दुकान वेगळं उठून दिसत होतं. त्याच्यापुढची काही घरं ओलांडली आणि आमच्यासोबतची
मुलगी थांबली. हाक मारून तिने घरातल्या गृहस्थांना बोलावलं आणि एका अगम्य भाषेत त्यांच्याशी बोलली. “फादरने यांना तुमच्याकडे पाठवलं आहे” असं काहीतरी बोलली असावी. मीही पुढे होऊन त्यांना माझा तिथे येण्याचा उद्देश सांगितला. त्यांनी हसतमुखाने आम्हाला आत यायला सांगितलं. मी आणि आजोबा दोघेही आत गेलो. दारावर ‘Ignatius
Pereira’
अशी
पाटी
होती.
आमच्या गप्पा सुरू झाल्या. परेरा अगदी
मनमोकळेपणाने बोलत होते. त्यांच्याकडून आणखी तपशील कळत गेले. ते इथेच
जन्मले-वाढले. शिक्षण माऊंट कार्मेल शाळेच्या मराठी माध्यमातूनच झालेलं असल्याने ते
अस्खलित मराठी बोलतात. १९६४ सालापासून इथल्या चर्चमधला
'मास'सुद्धा
मराठीत होतो. घरामध्ये मात्र ते कोरलई क्रिओल भाषाच बोलतात.
चर्चचे फादरही मूळचे इथले नसल्याने त्यांनाही कोरलई क्रिओल भाषा समजत नाही.
सुमारे पाचशे वर्षं या भाषेत व्यवहार होत असले तरी असली तरी या भाषेला
स्वतःची लिपी नाही. जे.
क्लँसी क्लेमेंत्स यांनी आणखी एक अत्यंत महत्वाचं काम
करून ठेवलं आहे. या भाषेतल्या परंपरागत चालत आलेल्या लोककथा एका पुस्तकात संकलित केल्या
आणि त्यासाठी यासाठी देवनागरी लिपी
वापरली.
हा
एक
अतिशय महत्त्वाचा (आणि कदाचित या भाषेतला एकमेव)
लिखित दस्तावेज आहे. यामुळे भाषा फक्त मौखिक न राहता छोट्याशा प्रमाणात का होईना लिखित स्वरुपात देखील आली आणि लोकांच्या अभ्यासासाठी उपलब्ध झाली.
‘नॉ लिंग सू इस्तॉर’ (आपल्या
भाषेतल्या गोष्टी) असं
या पुस्तकाचं नाव आहे. स्थानिक
तसंच पोर्तुगीज संस्कृतीचेही काही संदर्भ या कथांमध्ये विखुरलेले आहेत.
परेरा यांनी त्यांच्याकडचं ते पुस्तकही मला दाखवलं. मी उत्सुकतेपोटी पुस्तकामधलं काहीतरी वाचून दाखवून त्याचा अर्थ सांगण्याची त्यांना विनंती केली. त्यांनी उदाहरण म्हणून पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमधली काही शीर्षकं वाचली आणि प्रत्येक शीर्षकाचा मराठी मध्ये अर्थ सांगितला. मी तो
रेकॉर्डही करून घेतला.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत कोरलईच्या ख्रिश्चन
समाजाचा संक्षिप्त इतिहास लिहिलेला आहे, त्यात
कोरलई, चौलचे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आल्यावर
ख्रिश्चन मंडळींना रेवदंड्याहून इथे (जिथल्या
ख्रिश्चन वस्तीतल्या घरात मी परेरा यांच्याशी बोलत होतो)
डोंगरापाशी पिटाळलं गेल्याचंही म्हटलं आहे
(आता नीट लक्षात येत नसलं तरी पूर्वी इथे डोंगर उताराचा भाग होता.
कोरलईच्या किल्ल्याच्या टेकडीच्या दक्षिणेला असलेल्या या डोंगराचा
१८८३च्या कुलाबा जिल्ह्याच्या गॅझेटियटरमध्येही उल्लेख आहे).
हा डोंगर उतार आणि कोरलईचा किल्ला असणारी टेकडी (जिला पोर्तुगीज
‘मोरो’ असं संबोधत असत) यांच्या दरम्यान कोरलई गाव पसरलेलं आहे. इथलं माउंट कार्मेल
चर्च १७४१ मध्ये बांधलं गेल्याचा गॅझेटियटरमध्ये उल्लेख आहे.
चर्चच्या डागडुजी आणि रंगरंगोटीमुळे एवढ्या प्राचीन वास्तूच्या आवारात
आपण फिरत आहोत याची मगाशी जाणीव झाली नव्हती.
“ही भाषा बोलणारी किती कुटुंब असतील?”
मी विचारलं.
“पोर्तुगालला
न जाता इथेच स्थायिक झालेल्या पोर्तुगीजांची या गावात सात प्रमुख घराणी आहेत
: रोजारिओ, डिसूजा, परेरा,
मार्तीस, रॉड्रिग, वेगास,
रोचा, पेना आणि गोम्स. कालांतराने कारवार, गोवा आणि दीव-दमणमधूनही काही कुटुंबं इथे स्थायिक झाली. ही सर्व मिळून सुमारे २३० च्या ख्रिश्चन घरांमधली
सुमारे हजारेक माणसं ही भाषा बोलतात” असं परेरा यांनी सांगितलं (क्लेमेंत्स यांना कोरलई क्रिओलमध्ये
काही मल्याळी शब्द देखील आढळले असल्याने त्यांनी 'इथे कालिकतच्या पोर्तुगीज वसाहतीतून काही जण आलेले असण्याचीही शक्यता
आहे' असं नमूद केलं आहे).
जगाच्या ७.२ अब्ज लोकसंख्येपैकी फक्त हजार माणसं म्हणजे ०.००१३८८८८८ %
इतका
छोटासा
समूह
कोरलई क्रिओल भाषा बोलतो
यावरून ही भाषा किती दुर्मीळ आहे
याची आपल्याला कल्पना यावी. या संदर्भात पुढे
अधिक अभ्यास करताना
मला https://www.ethnologue.com/cloud/vkp या दुव्यावर पुढील आलेख बघायला मिळाला.
किती लोकांची ही ‘प्रथम भाषा’ आहे ('य'
अक्ष) आणि ही भाषा किती संकटग्रस्त (Endangered) ('क्ष'
अक्ष) आहे यानुसार
त्या त्या भाषेचं स्थान बघता येतं. कोरलई क्रिओल भाषा ही या आलेखात कुठे येते हे
सोबतच्या आलेखामध्ये बघता येईल.
हिरव्या
बिंदूने आलेखातलं या भाषेचं स्थान दाखवलं आहे. सध्या याचं स्थान 6a इथे आहे, याचा
अर्थ अजूनही ही भाषा एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होते आहे आणि तिला नजीकच्या
भविष्यात धोका नाही. परंतु अन्य भाषांचा वाढता प्रभाव
(मराठी/हिंदी/इंग्रजी) आणि त्या प्रमाणात ही भाषा बोलणारी लोकसंख्या न वाढणे, तसंच
विविध कारणांनी कोरलईमधून बाहेर स्थलांतरित होणारा कोरलई क्रिओल भाषक समाज या
गोष्टी या भाषेला हळूहळू पण निश्चितपणे प्रभावित करत आहेत. 6b पासून पुढची स्थानं ही भाषा अधिकाधिक संकटग्रस्त
असल्याचं दर्शवत असल्याने कोरलई क्रिओल संकटग्रस्ततेच्या एक पायरी
खाली आहे असं म्हणू शकतो.
परेरा यांना
“या
भाषेच्या
जतनासाठी
सरकारदरबारी
काही
प्रयत्न
होतो
का?” असा
प्रश्न विचारल्यावर तसे प्रयत्न त्यांच्या दृष्टीस पडले नसल्याचं सांगितलं. काही अभ्यासक मात्र आवर्जून या भाषेचा अभ्यास करत असल्याचं ते म्हणाले.
भाषेबद्दल जाणून घेण्यासाठी या
गावाला
भेट
देणाऱ्या
मंडळींची
संख्या
वाढत
आहे.
ती
पुरेशी
आहे
की
नाही
हे
आपण
सांगू
शकत
नाही, परंतु या भाषेच्या अस्तित्वाची जाणीव आहे याची कल्पना असणं हेही नसे थोडके. दोन-चार
दिवसांपूर्वीच गावात युरोपातील विविध देशांतल्या मंडळींचा एक ग्रुप गावात आला होता.
कोरलई क्रिओल इतकंच या गावातलं हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन
यांच्यातलं सामंजस्य हाही त्यांच्या कुतूहलाचा विषय होता. काही दिवसांपूर्वीच परेरा यांच्याकडे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून काही विद्यार्थिनी आणि एक पत्रकार येऊन या भाषेचे बरेच तपशील जाणून घेऊन गेले होते. त्यांचा यावर पुस्तक काढण्याचाही मानस आहे, हे ऐकून याबद्दल अधिक काही
ठोस गोष्ट घडत असल्याबद्दल बरं वाटलं. आमच्या गप्पा चालू असताना या सगळ्या संवादांमध्ये बलकवडे आजोबासुद्धा उत्साहाने भाग घेत होते. ते आणि परेरा यांची एकमेकांशी ओळख नसली तरी एकाच गावात राहत असल्याने काहीतरी
सामायिक ओळख निघालीच आणि बोलणं आणखीनच अनौपचारिक होऊन गेलं.
इग्नेशिअस परेरा यांच्याशी बोलून झाल्यावर या भेटीची आठवण म्हणून ते आणि बलकवडे आजोबा यांच्यासोबत एक
फोटो काढला. परेरा यांना त्यांना obrigada (‘धन्यवाद’
या अर्थाचा ‘कोरलई क्रिओलमधला शब्द) म्हणून बाहेर पडलो. मी बलकवडे आजोबांना म्हणालो “माझ्यामुळे तुमच्या बराच वेळ गेला. तुमच्या घरचे तुमची वाट बघत असतील” तर ते म्हणाले “घरच्यांना काही वाटणार नाही. मी कोणाकडे तरी गेलो असेन असं समजतील... तुझं काम झालं हे महत्त्वाचं.” मला खूप छान वाटलं. त्यांनी मला फक्त कोणाला भेटायचं एवढंच दाखवलं नाही, तर क्रिओल भाषेचा अभ्यास करण्याची माई इच्छा आहे हे पाहून माझ्या त्यातही रस घेतला होता. खुद्द त्यांचा मुलगा ‘माउंट कार्मेल’ शाळेमध्ये शिक्षक आहे. त्यामुळे आजोबांचा या भाषेशी प्रत्यक्ष संबंध आलेला नसला तरीही त्यांना या भाषेच्या अस्तित्वाबद्दल कल्पना आहे.
'नॉ लिंग'
बोलणारा
बिगरख्रिश्चन!
मी आणि
बलकवडे आजोबा बोलता बोलता पुन्हा एकदा माउंट कार्मेल चर्चच्या आवारात आलो होतो. तिथे आजोबांचे एक ओळखीचे ख्रिश्चन गृहस्थ
भेटले. आजोबांनी त्यांना मी इथे कशासाठी आलोय हे सांगितल्यावर ते म्हणाले
“बराच काळ बाकीच्या समाजातले (ख्रिश्चनेतर)
लोक आमच्या
फारसे संपर्कात आले नाहीत. जे आले
त्यांनाही आमच्या भाषेबद्दल कुणालाही त्याबद्दल उत्सुकता वाटली नाही. फक्त त्या दुकानातला मारवाडी माणूस भाषा शिकला.”
मी हे ऐकून उडालोच.
“कुठला मारवाडी ? त्याला ही भाषा येते?”
“आत मध्ये गल्लीत एक दुकान आहे त्या दुकानाचा मालक मारवाडी आहे, त्याला ही भाषा येते”.
बलकवडे आजोबांना मी म्हणालो “अजून थोडासा वेळ थांबता का? मी त्या दुकानात जाऊन येतो” ते आनंदाने तयार झाले. मी घाईघाईने गल्लीत गेलो. मगाशी स्वस्तिक चितारलेलं दुकान पाहून जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर मिळालं होतं.
मी त्या दुकानात जाऊन त्याच्या तरुण मालकाशी गप्पा मारल्या. त्याचं
नाव राकेश गांधी.
“या भाषेची माहिती घेत असताना मला ती इथल्या ख्रिश्चनांव्यतिरिक्त कुणाला येत नाही असं कळलं होतं. मग तुम्हाला ही भाषा कशी काय येते?” त्यावर तो म्हणाला “माझा जन्म इथलाच. माझं शिक्षणही इथल्याच माउंट कार्मेल शाळेमध्ये झालं. मी इथल्याच मुलांमध्ये राहिलो, वाढलो. त्यामुळे स्वाभाविकच मला आणि माझ्या सहा बहिणभावांना ही भाषा येते. माझ्या
आईवडिलांनाही यायची, पण ते आता हयात नाहीत.” त्याचे बहिणभाऊ लग्न झाल्यामुळे किंवा कामानिमित्त इतरत्र स्थायिक
झाले. त्यांचा आता या भाषेशी संपर्क, संबंध कमी कमी होत जाणार. राकेश स्वतःदेखील
आता बायकामुलांसोबत घेऊन खाडीपलीकडच्या रेवदंड्यात राहतो, फक्त आपलं छोटंसं दुकान
चालवायला तो दिवसभर इथे असतो म्हणून फक्त त्याचा या भाषेशी रोजचा संबंध येत असतो.
हे सगळं ऐकत
असताना माझ्या डोक्यात एका विलक्षण शक्यतेबद्दल विचारचक्र सुरू झालं होतं. मुळात
कोरलई क्रिओल भाषा बोलणारी माणसं जगभरात फक्त हजारच्या आसपास. तीही फक्त कोरलईच्या
ख्रिश्चन समाजातली. त्याशिवाय मूळची त्या समाजातली नसलेली पण ती भाषा (मातृभाषा
नसूनही) अस्खलितपणे जाणणारी माणसं जगात कदाचित फक्त ७-८ (तीही या एकाच गांधी
कुटुंबातली), त्यातही त्या भाषेतून दैनंदिन व्यवहार करणारा तो एकमेव
ख्रिश्चनेतर.... त्या अर्थाने मी जगातल्या एकमेवाद्वितीय व्यक्तीशी बोलत असण्याच्या
शक्यतेने थरारलो. कोण कुठल्या मारवाड प्रांतातून बाहेर पडून सर्वार्थाने अपरिचित प्रांतात जाऊन, तिथली भाषा शिकून, तिथे आपले पाय घट्ट रोवून धंदा कसा करावा हे मारवाडी लोकांकडून शिकावं. या समाजातल्या दोन पिढ्यांअगोदरच्या एका माणसाने कोरलईसारख्या बाजूला
पडलेल्या गावात येऊन धंदा केला आणि त्यातून निर्माण झालेल्या एका शक्यतेशी
मला संवाद साधता आला. मळलेली वाट सोडून थोडं आडवाटेला गेलं की काळाचे, शक्यतांचे
धागे कसे जुळू शकतात याची घराबाहेर पडताना आपल्याला कल्पनाही नसते. फक्त गरज असते
ती डोळे उघडे आणि कुतूहल जागे ठेवून फिरण्याची.
डोक्यात चक्र चालू असतानाच मी पुन्हा
चर्चकडे निघालो होतो. येताना समोरून एक एकदम गोऱ्या, तुकतुकीत कांतीच्या आणि
राखाडी डोळ्यांच्या, स्थानिक पद्धतीची साडी नेसलेल्या आज्जी येताना दिसल्या.
गळ्यात क्रॉस होता. त्यांच्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिलो. मग मला जाणवलं, की
सकाळी ग्रामपंचायतीत पाहिलेल्या एका मुलीपासून
ते या वस्तीतली माणसं आणि अगदी या आज्जींपर्यंत अनेकांचे डोळे वेगळे होते. सर्वसाधारणपणे कोळीवाड्यांमध्ये आढळून येणार नाहीत अशा डोळ्यांच्या रंगाशी ते नातं सांगत होते. शिवाय
काहींची तुकतुकीत
त्वचाही
त्यांच्या एकेकाळच्या
गोरेपणाची आठवण करून देत होती. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी या भूमीवर पाय ठेवलेल्या त्यांच्या पूर्वजांच्या खाणाखुणा काळाच्या ओघामध्ये पुसट झालेल्या असल्या तरी नष्ट झाल्या नव्हत्या.
निरोप
चर्चपाशी पोचलो तेव्हा बलकवडे आजोबा वाट पहात उभे
होते. त्यांनी मला जेवढी मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच होते.
त्यांना कारमध्ये बसवलं आणि समुद्रकिनाऱ्याजवळच्या त्यांच्या घरी नेऊन सोडलं. त्यांच्या मुलाशी
गप्पा मारता आल्या. तो
स्वतः माउंट कार्मेल विद्यालयांमध्ये शिकवत असल्यामुळे या समाजातल्या मुलांचा त्याच्याशी चांगला परिचय आहे. शिक्षणाचं माध्यम मराठी असलं तरी ती मुलं वर्गात आपापसात बोलताना, एवढंच नाही तर भांडतानादेखील आपली मातृभाषा अर्थात ‘कोरलई क्रिओल’च वापरतात. “एकाने दुसऱ्याला शिव्या घातल्या तरी सुद्धा ते मला कळत नाही. शेवटी मी त्यांना म्हणतो, ज्या काही शिव्या घालायच्या आहेत त्या मराठीत घाला, म्हणजे मला कळेल तरी...”
असं तो म्हणाला आणि मला हसू आवरलं नाही. एखाद्या भाषेचं वेगवेगळ्या माणसांशी कसं वेगवेगळं नातं असू शकतं याचा एक गंमतशीर दाखला मला
मिळाला. भाषेच्या
अस्तित्वाचा आणखी एक पैलू कळला...
बलकवडे
कुटुंबाचे मनापासून आभार मानून मी निघालो. समोर कोरलईचा किल्ला होता. सूर्य
समुद्रात नुकताच लुप्त झाला होता. कुंद
पावसाळी हवेत किल्ल्यावरचा सुसाट वारा अंगावर घेण्याची इच्छा आज अपूर्णच राहणार होती.
पण त्या वाऱ्याइतक्याच भन्नाट गोष्टी आज मला अनुभवता आल्या होत्या.
त्या किल्ल्यावरच्या पोर्तुगीज
भाषेतल्या शिलालेखांनी जागं केलेलं कुतूहल आज मला अगदी वेगळ्या उद्देशाने कोरलईला
घेऊन आलं होतं. त्या कुतूहलानेच मला इतिहासाच्या पानांमध्ये लपलेलं ‘कोरलई
क्रिओल’ नावाचं एक जीर्ण
पिंपळपान दाखवलं होतं. पाचशे वर्षांपूर्वी कधीतरी त्याचं बीज वाऱ्यावरून लहरत आलं,
रुजलं आणि इतकी वर्षं एक रोपटं म्हणून का होईना नेटाने तग धरून राहिलंसुद्धा.
त्याचं पुढे काय होईल याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही. परंतु सध्यातरी एका अगदी छोट्या भूभागाची ओळख बनून राहिलेली ही भाषा आपल्या देशाच्या इंद्रधनुष्यासारख्या संस्कृतीमध्ये आपलीही एक छटा घेऊन उभी आहे एवढं मात्र खरं.
---- प्रसाद फाटक
संदर्भसूची:
१. Portuguese
Settlement of the ChaulKorlai area and the Formation of Korlai Creole
Portuguese: By J. Clancy Clement
२. The
Genesis of a Language: The formation and development of Korlai Portuguese : By J.
Clancy Clement
३. Sing
Without Shame: Oral Traditions in Indo-Portuguese Creole Verse:
By Kenneth David Jackson