मी उर्दू गजल आणि शायरी या काव्यप्रकारांकडे वळण्याची शक्यता फारच कमी होती. अर्थात हे प्रकार मराठीतही आलेले असल्याने ते थोडेफार कानावर पडलेच होते. सुरेश भट, भीमराव पांचाळे, जयंत कुळकर्णी यांच्या काही गज़ल मी ऐकल्या आणि त्या मला खूपच आवडल्या, पण तरीही मी स्वतःहून गज़लचा शोध घेत गेलो नाही याचं कारण काव्य या साहित्यप्रकाराकडेच ओढा कमी असणं हे असू शकतं.
शायरी हाही खरंतर एक लक्षवेधी प्रकार. चढत्या भाजणीत माहौल बनवत नेणे, उत्कंठा वाढवत नेणे आणि शेवटच्या चरणांत मर्म सांगणे, असं याचं आकर्षक स्वरूप. 'शॉर्ट अँड क्रिस्प' ! सचिन पिळगावकर यांची सध्या कितीही हुर्यो उडवली जात असली तरी टीव्हीवर वेगवेगळ्या प्रसंगी त्यांची जी झलक दिसते त्यात त्यांच्याकडून बरेचदा अतिशय उत्तम दर्जाचे शेर कायम ऐकायला मिळतात..
हा प्रकार मला आवडला असूनही मी याही प्रकाराच्या वाट्याला स्वतःहून फारसा गेलो नाही.
कदाचित हे बहुतांशी उर्दूतच असल्याने मी कंटाळा केला असेल.
परवा मात्र भाऊसाहेब पाटणकरांची शायरी स्टोरीटेलवर आल्याचं कळल्यावर मात्र ऐकायचंच असं ठरवलं.
ते ऐकलं आणि वेडा झालो.
ठार झालो.
संपलो.
पहिल्या दोन शेरमध्येच त्यांनी असं काही जिंकलं की संपूर्ण दीड तासाचा कार्यक्रम ऐकूनच संपवला.
शायर म्हणतो :
भास्करा, आम्हां दयाही येते तुझी अधिमधी
पाहिली आहेस का रे, रात्र प्रणयाची कधी ?
त्यावर सूर्य म्हणतो :
आम्हासही या शायराची कीव येऊ लागते
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते!!
**
उर्दू शायरीमध्ये उर्दू भाषेशी संबंधित सांस्कृतिक प्रतीकं स्वाभाविकपणे भरपूर असतात.
भाऊसाहेबांची शायरी मात्र मराठी मातीतली आहे. त्यात त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या अवतीभवतीचे संदर्भ वापरले आहेत.
शायरीत बऱ्याचदा ज्यावर भाष्य असते अशा इश्क़, हया (लज्जा), ज़िन्दगी या विषयांवर भाऊसाहेबांनी अस्सल मराठीत भन्नाट रचना केल्या आहेत. त्यात काही शब्द मात्र तसेच उर्दूही ठेवले आहेत. त्यामुळे ऐकायला गंमत येते.
उर्दू शायरीमध्ये प्रेमभंग, त्यामुळे येणारी विफलता, मय(दारू), दर्द, ग़म या गोष्टींवर भर असतो. अगदी देवदास, ग़ालिब यांना शोभावी अशी.. पण भाऊसाहेबांची शायरी मात्र अतिशय उत्फुल्ल, प्रसन्न आहे. नैराश्यापासून कोसो दूर आहे. त्यात आसक्ती कुठेही लपवलेली नाही, पण तरीही ती वखवखतेपासून लांब आहे. ती हशाच्या लाटा उसळवणारी असली तरीही उथळ नाही. जीवनाचं तत्वज्ञानही ती जाता जाता इतक्या सहजपणे सांगून जाते की उत्स्फूर्तपणे आपल्या तोंडून दाद आल्याशिवाय राहत नाही.
भाऊसाहेबांच्या शायरीला चार-चाँद लावले आहेत ते त्यांच्याच सादरीकरणाने. त्याला विलक्षण ओघ आहे.यातली शायरी लिहिताना कदाचित सुटीसुटी लिहिली असेलही, पण यात त्यांनी ती सूत्रात फार छान बांधली आहे. दोन शेरांच्या मध्ये येणारी भाऊसाहेबांची टिप्पणी असली चुरचुरीत आहे की हास्याची कारंजी उसळत राहतात. ज्या मैफलीचे हे ध्वनिमुद्रण आहे तिच्यातल्या श्रोत्यांच्या 'वा, वा' आणि 'हा हा'च्या कल्लोळात संपूर्ण दीड तास आपणही बुडून जातो.
ऐकताना सारखं वाटत होतं, इतके दिवस या खजिन्याकडे आपलं का लक्ष गेलं नाही ??
छे आता, पुन्हा भाऊसाहेबांची शायरीची पुस्तकं वाचल्याशिवाय मुक्ती नाही..
'ज़िंदादिल' हे भाऊसाहेबांच्या एका पुस्तकाचं नाव आहे.
भाऊसाहेबांच्या शायरीचं याहून चपखल वर्णन असू शकत नाही
जाता जाता मृत्यूवर भाऊसाहेबांनी केलेले एकाहून एक सरस शेर ऐकले की त्यांच्या ज़िंदादिलीचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही.
त्यात मृत्यूची खंत नाही, उलट त्याचं सेलिब्रेशनच जास्त आहे.
ते म्हणतात :
"मृत्यो, अरे आलास जर का क्षीण मी होता असा |
म्हणवेल का तेव्हा मलाही साधे तुम्हाला,या, बसा ||
ज्याचे सवे अज्ञात देशी जावयाचे शेवटी |
शोभेल का त्याशीच ऐसे वागून आम्हा शेवटी ||
ये अरे आताच मृत्यो, कुठवरी सांगू तुला |
प्रेत का नुसतेच माझे न्यायचे आहे तुला ||"
ऐकता ऐकता अवचित टचकन डोळ्यांत पाणी उभं राहायचं ...
दरवेळी दुःखानेच डोळे पाणावतात असं नाही. ...
अतीव समाधानानेही हेच होतं.
भाऊसाहेब, आयुष्याला श्रीमंत केलंत, मृत्यूला श्रीमंत केलंत.
... आणि मलाही!
© प्रसाद फाटक
*****
भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी स्टोरीटेल वर ऐकण्यासाठी : https://bit.ly/2uu65dR
युट्युबवर ऐकण्यासाठी, :
भाग १: https://www.youtube.com/watch?v=JaA_2EO7_pI&t=474s
भाग २: https://www.youtube.com/watch?v=XiPEtAfOHJc
(छायाचित्र आंतरजालावरून साभार)
No comments:
Post a Comment