Total Pageviews

Sunday, March 29, 2020

सु. ह. जोशी - ५० वर्षांत ५० हजार पत्रे लिहिणारे अवलिये



साधारणपणे दीड वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. सोशल मीडिया, ब्लॉग, नियतकालिकं, वर्तमानपत्रं इ. अशा माध्यमातून सातत्याने लिखाण करणाऱ्या नव्या तसंच जुन्याजाणत्या लेखकांना एकत्र आणणारा तो कार्यक्रम होता. कार्यक्रमातले प्रमुख वक्ते, समोर व्यासपीठावर महत्त्वाचं बोलत असताना एक एक ज्येष्ठ गृहस्थ माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसल्या बसल्या हातातल्या पोस्टकार्डावर फाउंटन पेनने फटाफट लिहीत होते. अतिशय सुवाच्य अक्षरातलं ते पत्र पूर्ण झाल्यावर त्यांनी ते पत्र लिखाणाच्या आधारासाठी खाली घेतलेल्या पोस्टकार्डच्या गठ्ठ्याखाली सारलं आणि त्या गठ्ठ्यातलं सगळ्यात वरचं कोरं पत्र घेऊन त्यावर पुन्हा एकदा वेगाने लिहू लागले. एकीकडे हे काम चाललेलं असताना समोर वक्ते जे बोलत होते त्यांच्याकडेही त्यांचा एक कान होता हे माझ्या लक्षात आलं. माझं कुतूहल जागं झालं होतं. ते नक्की काय करत आहेत हे जाणून घ्यायची मला उत्सुकता लागून राहिली होती. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये सूत्रसंचालकांनी कार्यक्रमाला जमलेल्या आम्हा सर्व मंडळींची नावं सांगून, प्रत्येक जण कुठल्या प्रकारचे लिखाण करतो या तपशिलासह आमचा परिचय करून द्यायला सुरुवात केली. माझ्या उजवीकडच्या ज्येष्ठ गृहस्थांचे नाव ऐकल्यावर मी चमकलो. वर्तमानपत्रातल्या वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये काही ठराविक नावं अतिशय नियमितपणे दिसायची त्यातलंच एक हे नाव. 'सु. ह. जोशी, शिरूर' या नावाने असलेली अनेक पत्रं मी वर्तमानपत्रांमध्ये पाहिलेली होती. मला अशा मंडळींबद्दल खूप कुतूहल होतं. इतक्या वर्तमानपत्रांकडे आपली पत्रं पाठवणारे हे लोक एवढी चिकाटी आणि सातत्य दाखवणे कसे काय साध्य करू शकतात, याचं मला आश्चर्य वाटायचं. वर्तमानपत्रांमध्ये पत्र पाठवून खरंच काही बदल घडू शकतो का, याबद्दलही मला कायम शंका वाटत आलेली होती. त्यामुळे अनायसे संधी आली आहे तर कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना आपण वैयक्तिकरित्या भेटायलाच हवं असं मी ठरवलं. कार्यक्रम संपताच त्यांना गाठलं आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पहिल्या पाचच मिनिटांमध्ये माझ्या लक्षात आलं की हे पाणी वेगळंच आहे. त्या छोट्या संभाषणातून लगेच लक्षात आलं होतं की त्यांच्या बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्यांना एखाद्या दिवशी वेळ काढून भेटून सविस्तर गप्पा मारल्या पाहिजेत. मग ठरवून त्यांच्या घरीच गेलो आणि त्यांच्याशी तासभर छान पैकी गप्पा मारल्या. पण तेवढ्याने माझं समाधान झालं नाही. त्यांच्याकडे असलेली माहिती, विलक्षण अनुभव संग्रहित होणे आणि ती अधिकाधिक लोकांना समजणे आवश्यक आहे असं मला प्रकर्षाने वाटलं म्हणून मी काही दिवसांनी पुन्हा एकदा त्यांच्याकडे मुलाखत घ्यायला गेलो आणि त्यानिमित्ताने गप्पांना पुन्हा एकदा बहर आला.

 (सु. ह. जोशी यांची सविस्तर मुलाखत याठिकाणी पाहता येईल)
सु. ह. जोशी म्हणजेच सुहास हरी जोशी मूळचे पुण्याचे असले तरी त्यांनी आपल्या शिक्षकीय कारकिर्दीमध्ये शिरूर येथे वास्तव्य केले. ते करत असलेल्या अनेक गोष्टींपैकी सर्वात लक्षवेधी आणि व्यापक गोष्ट म्हणजे त्यांचं पत्रलेखन. वाचकांच्या पत्रव्यवहारात ते करत असलेलं मधून ते करत असलेलं पत्रलेखन हे हिमनगाचं फक्त एक टोक आहे. गेली जवळपास साठ वर्षं ते फक्त नातेवाईकांनाच नाही तर तर अनोळखी लोकांनाही पत्र पाठवत आहेत. आता हे वाचून प्रश्न पडेल की, ‘अनोळखी माणसांना पत्र का बरं पाठवत असावेत?’. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या वाचताना किंवा कुणा आप्त परिचितांशी बोलताना जर चांगलं काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीविषयी कळलं तर, ओळख नसली तरीही त्या व्यक्तीला सु. ह. जोशी प्रोत्साहनपर पत्र पाठवतात. 'पत्र' या एका अतिशय साध्याशा साधनामुळे त्यांच्याकडून अशा काही विलक्षण गोष्टी घडल्या आहेत आणि एवढी माणसं जोडली गेली आहेत की ऐकून आपण चकित झाल्याशिवाय राहत नाही.

त्यांच्या पत्रलेखनाच्या किश्श्यांकडे वळण्यापूर्वी या सर्वांची सुरुवात कशी झाली ते पाहणं रंजक ठरेल. सु. . जोशी हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. १९५९ साली शासकीय नोकरीत असलेल्या संघ स्वयंसेवकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव श्री. बंडोपंत परचुरे यांच्या घरी आयोजित केला गेला होता. त्याकाळी सरकारी नोकरांसाठी उघडपणे संघकाम करणे जोखमीचे असे. तत्कालीन राज्यकर्ते संघाकडे वक्रदृष्टीने पहात असत. थेट नोकरीवर गंडांतर यायची शक्यता असे. परचुरे यांच्या घरी जमलेल्या सर्व संघ स्वयंसेवकांनी आपली अडचण सांगून "आम्ही संघकाम कसं करावं" असं विचारलं. त्यावर परचुरे म्हणलेतुम्ही एक सोपी गोष्ट करू शकता. कुठलीही चांगली बातमी वाचली की त्यातल्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीचं पत्र लिहून कौतुक करा. प्रत्येक गावात एकतरी ज्योत जळत असतेच, जी विझवायला खूप जण उत्सुक असतात. आपण ते विझू नयेत म्हणून त्यावर तेलाचा शिडकावा करत राहायचं." संघाच्या समाज जोडण्याच्या कार्याशी हे अगदी सुसंगत होतं. हा अतिशय साधा सोपा उपाय ऐकल्यावर सु. . जोशी यांनी तसं करायचं ठरवलं आणि तेव्हापासून सुरू झाला एक अव्याहत पत्रयज्ञ! आतापर्यंत त्यांनी जवळपास पन्नास हजार पत्रं लिहिली आहेत. आजही रोजच्या दिवसातले काही तास ते पत्रलेखनासाठी राखून ठेवतात. 

सु. . जोशी  : एक पत्रलेखक
सु. ह. जोशींच्या पत्रलेखनाचे किस्से विलक्षण आहेत. १९६०च्या दशकात - म्हणजे रक्तदानावियी अजिबात जनजागृती नव्हती त्या काळात - त्यांनी ३५ वेळा रक्तदान करणार्‍या एका व्यक्तीची माहिती वर्तमानपत्रामध्ये वाचली. ते वाचून भारावलेल्या जोशी यांनी खटपट करून त्या व्यक्तीचा पत्ता मिळवला आणि "आपण ३५ वेळा फक्त रक्तदानच केलेले नाही, तर ३५ लोकांचे प्राण वाचवले आहेत" असं प्रोत्साहनपर पत्र त्या व्यक्तीला पाठवलं. काही वर्षांनंतर ती व्यक्ती जोशी यांना भेटली आणि तिने सांगितले, "मी एवढ्या वेळा रक्तदान करूनही कुणाला त्याची काहीच किंमत नाही, कौतुक नाही असं वाटून मी रक्तदान बंद करण्याचा निर्णय घेतला होता, पण तुमचं पत्र वाचून इतका हुरूप आला, की मी ठरवलं - आता रक्तदान थांबवायचं नाही! त्यामुळे माझा रक्तदानाचा आकडा आता ७५ झालेला आहे." एका साध्याशा पत्राने ही किमया केली होती हे कळल्यावर तर सु. ह. जोशींना खूपच हुरूप आला. आपण पत्र लिहित राहाणे किती आवश्यक आहे, हे त्याच्या लक्षात आलं आणि पत्रलेखन हे त्यांच्या जीवनाचे एक अविभाज्य अंगच होऊन गेले.

गप्पा मारताना एक हृद्य अनुभव सु. . जोशी यांनी सांगितला. एका गावामध्ये गावातल्या काही मंडळींकडून चांभार समाजाच्या एका माणसाला मारहाण केल्याची बातमी जोशी यांनी वाचली. त्यांना हे वाचून खूप वाईट वाटले परंतु ते नुसते हळहळून थांबले नाहीत, तर त्यांनी त्या व्यक्तीला पत्र लिहिले. "हे व्हायला नको होतं. तुझ्या पाठीवर जो मार बसला त्याचे वळ माझ्या पाठीवर उठले आहेत." तरुण तो एक संघ स्वयंसेवक होता. संघविरोधकांची तिथे दहशत होती. त्याने ठरवलं की संघकाम सोडून देऊन आपण पिढीजात व्यवसायच फक्त चालू ठेवावा. पण जोशी यांचं बंधुभाव जपणारं पत्र वाचून त्याने ठरवलं की आता संघकाम सोडायचं नाही. एका चार ओळींच्या पत्राने एका कार्यकर्त्याला कार्यपरांङ्मुख होण्यापासून वाचवलं होतं

 हैदराबादच्या एका विद्वानांचा किस्साही विशेष आहे. १९६०च्या आसपासचा काळ. दक्षिणात्य द्रविड लोक उत्तरेच्या लोकापेक्षा वेगळे आहेत. उत्तर भारतीयांशी काही संबंध नाही, आर्य-अनार्य वेगळे आहेत अशा स्वरूपाचे विखारी भडकू लागण्याचा तो सुरवातीचा काळ होता. अशा परिस्थितीमध्ये हैदराबादच्या प्रा. डॉ. . . भुसारी यांनी संपूर्ण भारताच्या संस्कृतीचा मूलाधार एकच आहे आहेत हे विशद करणारा 'द्रविड संस्कृतीची कुळकथा' हा लेख लिहिला होता. तो वाचून सु. ह. जोशी यांनी त्यांना हैदराबादला पत्र पाठवून त्यांच्या कार्याबद्दल आनंद आणि आभार व्यक्त केले. त्या विद्वानांचे जोशी यांना उलट टपाली पत्र आले "मी इतका तळमळीने एकत्वाची भूमिका मांडत आहे, परंतु कुणाला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही अशी माझी भावना बळावली होती. मी ही लेखमाला लिहायचं थांबवणार होतो. पण तुमच्या पत्राने हुरूप आला. आता मी ही लेखमाला पूर्ण करणार!" कौतुकाच्या चार शब्दांचा कुठे कधी आणि किती मोठा परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाही येऊ शकत नाही. पण जोशी यांच्याशी बोलताना त्याची अनेक उदाहरणं आपल्याला कळतात.

पत्रलेखनाची आवड निर्माण झाल्यावर सु. ह. जोशी यांचे लेखन हे फक्त प्रोत्साहनपर उरले नाही. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना, लेखकांना त्यांनी आवर्जून पत्र लिहून आपली पसंती पळवायला सुरुवात केली. त्यातूनच पु ल देशपांडे, गो. नी. दांडेकर यांच्यासारख्या अनेक दिग्गजांशी त्यांचा पत्रसंवाद होत राहिलेला आहे. अशा वैयक्तिक स्वरूपाच्या पत्रांशिवाय त्यांच्या पत्रलेखनातला मोठा वाटा हा सण, उत्सव आणि परीक्षांच्या शुभेच्छापर पत्रांचा आहे. एकाचवेळी अशा प्रकारची दोनदोनशे पत्रं ते पाठवतात. अशा प्रासंगिक पत्रांची संख्या एवढी मोठी असल्याने ते त्यासाठी दोन लेखनिकांचीही मदत घेतात. शुभेच्छापत्रांमध्ये एखादं सुवचन अथवा चांगल्या पद्याच्या ओळी हमखास असतातच. त्यामुळे चार ओळींचं असलं तरी ते पत्र संग्रही ठेवावं असं आपल्याला वाटतं.

सु. . जोशी : एक वक्ते
सु. . जोशी यांच्याशी गप्पा मारणे हा अतिशय प्रसन्न अनुभव असतो. त्यांच्याशी बोलताना त्यांचा व्यासंग सतत जाणवत राहतो. आपण एखाद्या छोट्या गावाबद्दल गावाबद्दल बोललो तरी तिथल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा, संघकार्यकर्त्याचा संदर्भ ते देतातच. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेले प्रसंग आणि पाठवलेल्या पत्रांचे बारीकसारीक तपशील त्यांना आजही आठवतात. त्यांच्याकडे माहितीची खजिना याआहे. त्यांनी दोन विषयात बी. .(संस्कृत इतिहास) आणि तब्बल चार विषयांमध्ये एम्. . (संस्कृत, इतिहास, समाजशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास) केलेलं आहे!! पण त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या विद्वत्तेचं दडपण येत नाही. याचं कारण त्यांची संवादाची त्यांची शैली अगदी वेल्हाळ आहे.एखादी आठवण सांगताना, एखाद्या प्रसंगाचं वर्णन करताना, आपल्याच पत्रातली एखादी ओळ सांगताना एखादी कथा सांगावी तशाप्रकारे रंगवून सांगतात. त्यामुळे आपोआपच आपल्या संभाषणातली औपचारिकता गळून पडते.

सु. . जोशी हे कसलेले वक्तेदेखील आहेत. आतापर्यंत ६०० हून अधिक गावात त्यांनी ४०००हून अधिक व्याख्यानं दिली आहेत. कदाचित यामुळेच ते छोट्याछोट्या गावातही त्यांच्या अनेक ओळखी आहेत, ज्यांचा मी वर उल्लेख केला. ते कोणकोणत्या विषयांवर व्याख्यान देतात असं विचारल्यावर "विविध क्रांतिकारकांची चरित्रं, ऐतिहासिक घटना, वीर महिला अशा वेगवेगळ्या दीडशे विषयांची माझी तयारी आहे" आहे असं ते म्हणाले. मी थक्कच झालो. आपल्यावर थक्क व्हायची पाळी किती वेळा येणार आहे याचाच अंदाज येत नव्हता. "एवढ्या विषयांची तयारी कशी काय केली?" असा प्रश्न अगदी स्वाभाविकपणे माझ्या तोंडून आल्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर खूप शिकवून जाणारं होतं. ते म्हणाले, "काही विषयांची माहिती मी स्वतःहून काढून त्यावरची टिपणं तयार ठेवलेली असतात, जेणेकरून त्यावर व्याख्यान द्यायची संधी आली तर थोडं ब्रश-अप केलं की व्याख्यानाची तयारी पूर्ण होते. कधी माझ्याकडे कुणी व्याख्यानाचा प्रस्ताव घेऊन आलं आणि त्यांनी सुचवलेला विषय मला अपरिचित असेल तरीही मी कधीच 'नाही' म्हणत नाही. कारण ती एक संधी असते नवीन काही अभ्यासण्याची. असं करत गेल्याने माझ्याकडच्या विषयांची संख्याही वाढत गेली." मळलेली वाटच तुडवण्यात धन्यता मानणाऱ्या बहुसंख्यांमध्ये हे असं कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन स्वतःला सतत जोखत राहणारे, धार लावत राहणारे लोक लक्ष वेधून घेतात. सु. . जोशी आपल्या वक्तृत्वाचं श्रेय रा. स्व. संघाला देतात. तिथे सर्वांसमक्ष विषय मांडण्याची संधी मिळणे, विचारांचे आदानप्रदान यांमुळे आपलं वक्तृत्व घासूनपुसून लख्ख झालं अशी त्यांची भावना आहे


सु. . जोशी  : एक लेखक
काही जणांकडे सांगण्यासारखं, मांडण्यासारखं इतकं काही असतं की व्यक्त होण्याचे वेगवेगळे मार्गही त्यांना सापडत जातात. पत्रलेखन आणि वक्तृत्व या व्यतिरिक्त सु. . जोशी यांनी आतापर्यंत ३० पुस्तकांचे लेखन केले आहे. ज्यात स्फूर्तीकथा, ऐतिहासिक कथा, संस्कार कथा, चिमाजीअप्पा यांचे चरित्र अशा विषयांचा समावेश आहे. त्यांनी २ महत्वाच्या पुस्तकांचे सहसंपादन देखील केले आहे

) संघ हीच जीवनगाथा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एका अर्थाने कोशच. संघाची स्थापना, सरसंघचालक, सुरुवातीच्या काळातले संघप्रचारक यांची माहिती यात संकलित केलेली आहे. फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे अशी 'संघाची घटना' या ग्रंथात आहे. संघस्वयंसेवकच नव्हे तर अभ्यासकांसाठीही हा जणू संदर्भग्रंथच आहे.

) . ना. भिडे यांचे चरित्र : लक्षावधी स्वयंसेवक रोज 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' ही प्रार्थना म्हणतात परंतु फार थोड्यांना ही प्रार्थना लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव माहिती असते. त्या प्रार्थेनेचे रचियेते ज्येष्ठ संघस्वयंसेवक नरहरी नारायण भिडे यांचा जीवनपट सर्वांसमोर आणण्याचे महत्वाचे काम सु. . जोशी यांनी अन्य दोघांच्या सहभागाने पार पाडले आहे. 

सु. . जोशी  : एक खळाळता प्रवाह

आज ऐंशीच्या घरात वय असलं तरीही सु. . जोशी कधी स्वस्थ बसलेले सापडणार नाहीत. त्यांच्या भेटीला जाण्यासाठी वेळ ठरवायची असल्यास आधी त्यांना डायरीत लिहिलेलं त्यांचं वेळापत्रक बघावं लागतं! कारण दैनंदिन शाखा, पत्रलेखन, पत्रं पोस्टात टाकणे, विविध कार्यक्रमांना हजेरी लावणे, व्याख्यानं देणे अशा गोष्टी आजही अव्याहतपणे चालू असतात. एकदा भेट झाली की मग त्यासारखा प्रसन्न अनुभव दुसरा नसतो. त्यांच्या पत्रांचा, व्याख्यानांचा आणि अनुभवकथनाचा ओघ सदैव असाच खळाळता राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.



----- प्रसाद फाटक



सु. . जोशी यांचा पत्ता:

ॐकार, ३२, लक्ष्मी पार्क, राजेंद्रनगर, नवी पेठ, पुणे - ४११०३०



-मेल : shjoshi5110@gmail.com

(शब्दमल्हार मासिकात पूर्वप्रकाशित)

2 comments:

  1. Mi Govt. Polytechnic pune yethe astana sirana bhetalo hoto.. Tyana amachya Collegemadhye Vyakhyanasathi bolavale hote... Tyanche lecture khup chhan zale... Tyani malasudhha ek patra lihile hote... Sirancha kahi contact number asel tar dyava..

    ReplyDelete
    Replies
    1. सु ह जोशी यांचा क्रमांक : 9922419210

      Delete