Total Pageviews

Sunday, March 31, 2019

ज़िंदादिल



मी उर्दू गजल आणि शायरी या काव्यप्रकारांकडे वळण्याची शक्यता फारच कमी होती. अर्थात हे प्रकार मराठीतही आलेले असल्याने ते थोडेफार कानावर पडलेच होते. सुरेश भट, भीमराव पांचाळे, जयंत कुळकर्णी यांच्या काही गज़ल मी ऐकल्या आणि त्या मला खूपच आवडल्या, पण तरीही मी स्वतःहून गज़लचा शोध घेत गेलो नाही याचं कारण काव्य या साहित्यप्रकाराकडेच ओढा कमी असणं हे असू शकतं.

शायरी हाही खरंतर एक लक्षवेधी प्रकार. चढत्या भाजणीत माहौल बनवत नेणे, उत्कंठा वाढवत नेणे आणि शेवटच्या चरणांत मर्म सांगणे, असं याचं आकर्षक स्वरूप. 'शॉर्ट अँड क्रिस्प' ! सचिन पिळगावकर यांची सध्या कितीही हुर्यो उडवली जात असली तरी टीव्हीवर वेगवेगळ्या प्रसंगी त्यांची जी झलक दिसते त्यात त्यांच्याकडून बरेचदा अतिशय उत्तम दर्जाचे शेर कायम ऐकायला मिळतात..
हा प्रकार मला आवडला असूनही मी याही प्रकाराच्या वाट्याला स्वतःहून फारसा गेलो नाही.
कदाचित हे बहुतांशी उर्दूतच असल्याने मी कंटाळा केला असेल.

परवा मात्र भाऊसाहेब पाटणकरांची शायरी स्टोरीटेलवर आल्याचं कळल्यावर मात्र ऐकायचंच असं ठरवलं.
ते ऐकलं आणि वेडा झालो.
ठार झालो.
संपलो.

पहिल्या दोन शेरमध्येच त्यांनी असं काही जिंकलं की संपूर्ण दीड तासाचा कार्यक्रम ऐकूनच संपवला.

शायर म्हणतो :
भास्करा, आम्हां दयाही येते तुझी अधिमधी
पाहिली आहेस का रे, रात्र प्रणयाची कधी ?

त्यावर सूर्य म्हणतो :
आम्हासही या शायराची कीव येऊ लागते
याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते!!

**

उर्दू शायरीमध्ये उर्दू भाषेशी संबंधित सांस्कृतिक प्रतीकं स्वाभाविकपणे भरपूर असतात.
भाऊसाहेबांची शायरी मात्र मराठी मातीतली आहे. त्यात त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या अवतीभवतीचे संदर्भ वापरले आहेत.

शायरीत बऱ्याचदा ज्यावर भाष्य असते अशा इश्क़, हया (लज्जा), ज़िन्दगी या विषयांवर भाऊसाहेबांनी अस्सल मराठीत भन्नाट रचना केल्या आहेत. त्यात काही शब्द मात्र तसेच उर्दूही ठेवले आहेत. त्यामुळे ऐकायला गंमत येते.

उर्दू शायरीमध्ये प्रेमभंग, त्यामुळे येणारी विफलता, मय(दारू), दर्द, ग़म या गोष्टींवर भर असतो. अगदी देवदास, ग़ालिब यांना शोभावी अशी.. पण भाऊसाहेबांची शायरी मात्र अतिशय उत्फुल्ल, प्रसन्न आहे. नैराश्यापासून कोसो दूर आहे. त्यात आसक्ती कुठेही लपवलेली नाही, पण तरीही ती वखवखतेपासून लांब आहे. ती हशाच्या लाटा उसळवणारी असली तरीही उथळ नाही. जीवनाचं तत्वज्ञानही ती जाता जाता इतक्या सहजपणे सांगून जाते की उत्स्फूर्तपणे आपल्या तोंडून दाद आल्याशिवाय राहत नाही.

भाऊसाहेबांच्या शायरीला चार-चाँद लावले आहेत ते त्यांच्याच सादरीकरणाने. त्याला विलक्षण ओघ आहे.यातली शायरी लिहिताना कदाचित सुटीसुटी लिहिली असेलही, पण यात त्यांनी ती सूत्रात फार छान बांधली आहे. दोन शेरांच्या मध्ये येणारी भाऊसाहेबांची टिप्पणी असली चुरचुरीत आहे की हास्याची कारंजी उसळत राहतात. ज्या मैफलीचे हे ध्वनिमुद्रण आहे तिच्यातल्या श्रोत्यांच्या 'वा, वा' आणि 'हा हा'च्या कल्लोळात संपूर्ण दीड तास आपणही बुडून जातो.

ऐकताना सारखं वाटत होतं, इतके दिवस या खजिन्याकडे आपलं का लक्ष गेलं नाही ??
छे आता, पुन्हा भाऊसाहेबांची शायरीची पुस्तकं वाचल्याशिवाय मुक्ती नाही..
'ज़िंदादिल' हे भाऊसाहेबांच्या एका पुस्तकाचं नाव आहे.
भाऊसाहेबांच्या शायरीचं याहून चपखल वर्णन असू शकत नाही

जाता जाता मृत्यूवर भाऊसाहेबांनी केलेले एकाहून एक सरस शेर ऐकले की त्यांच्या ज़िंदादिलीचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही.

त्यात मृत्यूची खंत नाही, उलट त्याचं सेलिब्रेशनच जास्त आहे.

ते म्हणतात :

"मृत्यो, अरे आलास जर का क्षीण मी होता असा |
म्हणवेल का तेव्हा मलाही साधे तुम्हाला,या, बसा ||
ज्याचे सवे अज्ञात देशी जावयाचे शेवटी |
शोभेल का त्याशीच ऐसे वागून आम्हा शेवटी ||
ये अरे आताच मृत्यो, कुठवरी सांगू तुला |
प्रेत का नुसतेच माझे न्यायचे आहे तुला ||"

ऐकता ऐकता अवचित टचकन डोळ्यांत पाणी उभं राहायचं ...
दरवेळी दुःखानेच डोळे पाणावतात असं नाही.  ...

अतीव समाधानानेही हेच होतं.
भाऊसाहेब, आयुष्याला श्रीमंत केलंत, मृत्यूला श्रीमंत केलंत.
... आणि मलाही!

© प्रसाद फाटक

*****

भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी स्टोरीटेल वर ऐकण्यासाठी : https://bit.ly/2uu65dR
युट्युबवर ऐकण्यासाठी, :
भाग १: https://www.youtube.com/watch?v=JaA_2EO7_pI&t=474s
भाग २: https://www.youtube.com/watch?v=XiPEtAfOHJc

 (छायाचित्र आंतरजालावरून साभार)

Sunday, March 24, 2019

पस्तीस

'फ्रेंड्स' चा एक एपिसोड होता : Where Everybody Turns Thirty
रेचलचा तिसावा वाढदिवस असतो. सहा जणांच्या  गॅंगमधली तिशीचा उंबरा ओलांडणारी ती शेवटची असते.
नोकरी फार भारी नाहीये. स्वतःहून लग्नवेदीवरून पळून आल्यानंतर किनाऱ्याला लावणारी नेणारी रिलेशनशिप अजून हाताला लागली नाहीये.  तारुण्य जून व्हायला लागल्याचं फीलिंग यायला लागलं आहे, दोस्तांचे तिशीत पदार्पण करतानाचे किस्से धमाल तर आहेत पण उमेदीचे क्षण चिमटीतून निसटून चालल्याची भावना प्रबळ होत चालली आहे आणि हे सगळंसाचून येऊन वाढदिवसाच्या दिवशीच रेचल सॅड मूडमध्ये आहे...
फ्रेंड्सच्या कुठल्याही भागासारखाच हाही चुरचुरीत संवाद आणि धमाल प्रसंगांनी भरलेला असल्याने मी तेव्हा तो नेहमीसारख्याच खेळकर मूडमध्ये पाहिला होता. तेव्हा तिशीहीओलांडलेली नसल्याने असेल कदाचित, तो एपिसोड फार मनावर घेतला नसेल असं आता वाटतं.

पण तसं पाहिलं तर मी खरोखर तिशी ओलांडली तेव्हाही अशी कुठलीच भावना मनाला चाटून गेली नाही. तो एपिसोड पुन्हा दोन-तीनदा बघूनसुद्धा त्याचा काहीसा गंभीर अंडरटोन जाणवला नाही. त्यांच्या आणि आपल्या जीवनपद्धतीतला कमालीचा फरक हे एक कारण असू शकते. फ्रेंड्समध्ये दाखवलं आहे. आपल्या इथे आपण शिक्षण करून नोकरी होऊन लग्न होईपर्यंत आईवडिलांच्या छत्रछायेत असतो. तुलनेने हा प्रवास उबदार असतो... निदान माझ्यातरी होताच.. शिक्षण संपून नोकरी लागली तेव्हापासूनची ५ वर्ष एका मस्तीतच गेली. नोकरीचं पहिलं वर्ष कॉन्फिडन्स येईपर्यंत मानसिक पातळीवर बरंच स्ट्रगल केलं खरं, पण ते वगळता फिकीर नावाची गोष्ट कधी केलीच नाही. अभ्यासाचं टेन्शन नव्हतं, कर्जाचं नव्हतं, आयुष्याचंही नव्हतं. स्वतः कमावता नव्हतो तेव्हा कॉलेजची आठ वर्षं खूप जपून पैसे खर्च केले होते. पण आता हातात पैसे यायला लागले होते. नाटक, सिनेमे, पुस्तकं, खादाडी यापैकी कशातही हातचं राखून खर्च करायची गरज नव्हती. उंचावर तरंगणाऱ्या एखाद्या पक्ष्यासारखं हलकं वाटायचं त्या दिवसांत. त्यामुळेच असेल तिशी ओलांडताना अंगावर नवीन जबाबदारी पडली असली तरी एकंदरीत आयुष्यातला मूड मस्तीचाच होता.

पण दिवस कायम असेच राहात नाहीत.
निश्चित असा टर्निंग पॉईंट सांगता येत नाही, पण दिवस बदलत जातात...
बदललेले स्पष्टपणे जाणवतात... जाणवत आहेत..

वादावादीत एक पाऊलही मागे न हटणारा मी, छोट्या छोट्या गोष्टीचाही कीस पाडणारा मी आता वादाची शक्यता जरी दिसली तरी तिथे मौन साधायला लागलो आहे हे तर माझ्याही कल्पनेपलीकडचं आहे. कॉलेजात असताना कुणी मला हे चित्र दाखवलं असतं तर मी विश्वास ठेवला नसता.

"काय आजकालची गाणी!!"  हे वाक्य वारंवार तोंडात येतंय.

नव्या पिढीची भाषाच आपल्याला कळत नाहीये की काय असं कधीकधी फार वाटतं.

ज्या माध्यमक्रांतीमुळे मला स्वतःला माझी क्षितिजं विस्तारायला मिळतं आहेत तिच्याबद्दलच मनात अढी बसतीये. ऑब्सेशन असल्यासारखा बातम्या वाचणारा, न चुकता डिबेट्स बघणारा मी, बातम्यांच्या वेष्टनात गुंडाळलेल्या प्रॉपगॅण्डाच्या कोल्हाळाचा उबग येऊन दूर पळतोय...  दिवसदिवस टीव्ही लावत नाहीये, आज पेपर वाचला की नाही हेही आठवेनासं झालं आहे...

जादूची कांडी फिरावी आणि नव्वदचं दशक पुन्हा अवतरावं अशी प्रचंड इच्छा व्हायला लागलीये. सारखी तेव्हाची गाणी, तेव्हाचं पॉप म्युजिक कानात वाजावीत असं वाटतं. तंत्रज्ञानाने नाती स्वस्त केली नव्हती तेव्हाचा नॉस्टॅल्जिया पुन्हा पुन्हा उसळी मारून येतोय. घरात फारतर लँडलाईन असावा. मोबाईल-बिबाईलचा तर गंधही नसावा आणि माहिती मिळवण्यासाठी थोडीतरी तोशीस मिळावी असा काळ परत यावासा वाटतोय.

हे असं काहीतरी हरवल्यासारखं वाटायला लागेल याची ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत कल्पना नव्हती. कधीही सिरियसली विचार केला नव्हता असल्या गोष्टी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी अस्तित्व दाखवू लागल्या आहेत. डोकं म्हणजे विचारांच्या लाटांचा मारा होणाऱ्या किनाऱ्यासारखं काहीतरी वाटायला लागलं आहे. कुठलीशी शांत भासणारी लाट अचानक कुठे जिव्हारी बसेल आणि कुठली उसळती लाट माझ्यापर्यंत पोचायच्या आत विझून जाईल याचा अंदाज बांधणंच कठीण होतंय. पुलवामाच्या नरसंहाराने जग आक्रंदत आहे आणि इथे माझा फक्त मेंदू याचं गांभीर्य रजिस्टर करतो आहे, पण हृदयात खळबळीचा मागमूस नाहीये. उलट एखाद्या गाण्याची एखादी ओळ, एखाद्या अनुभवाचं कुणीतरी केलेलं हृद्य वर्णन अचानक कंठ दाटून आणत आहे.

गंमत म्हणजे हाच काळ फुलोऱ्याच्या नवनव्या वाटा पुरवतो आहे. ज्या आवडीनिवडी पुरवण्यासाठी कदाचित मी दहावर्षांपूर्वी झटून कामाला लागलो नसतो त्या पुरवायला नवनवी साधनं मिळत आहेत. नवनव्या ओळखी होत आहेत आणि त्यातून नवनवीन माहिती मिळत आहे, नवे विषय मिळत आहेत. माझ्याहून कितीतरी लहान असलेल्यांमध्ये मी सहजतेने मिसळतो आहे. रडत, कुढत बसणे हा स्वभाव तसाही कधी नव्हताच पण या सगळ्या गोष्टींमुळे आनंदाची झाडं आजूबाजूला असल्याची भावना होतीये. तरीही आपल्या हातात नसणाऱ्या, कुणालाही थांग लागलेला नाही अशा गोष्टीचं अस्तित्व आधीइतकं अस्पष्ट राहिलेलं नाहीये. कुठेतरी कोपऱ्यात ते माळ ओढत बसलेलं असतं. प्रत्येकासाठी एक वेगळी माळ त्याच्याकडे असते. प्रत्येकाचं अस्तित्व ती माळ संपेपर्यंत. त्यात किती मणी आहेत हे मात्र कुणालाच माहिती नाहीये. आयुष्य दुहेरी होतंय असं वाटायला लागलं आहे. कदाचित ते आधीपासून असेल, असतंच बहुदा. फक्त आयुष्याचे कॉन्ट्रास्टिंग रंग आधीपेक्षा जास्त डोळ्यांत भरत आहेत म्हणून ते तीव्रतेने जाणवत असावं. सतत डोक्यात चक्रं चालू असतात.  काही नवीन ऐकत, वाचत, पहात नाहीये असा एक क्षणही घालवू नये असं वाटतंय. सतत इतकं डोक्यात रिंगरिंग चालू असणं फारसं बरं नाही असंही त्याचवेळी वाटत असतं...

वय वाढलं तसं आकलनाच्या नव्या उंचीवर पोचलो त्याचा यात वाटा किती आणि फुफाटत आदळणाऱ्या  मीडियाचा - विशेषतः सोशल मीडियाचा - यात वाटा किती?

दोन्ही सुटं करणं कठीण आहे. पण सोशल मीडियाचा आणि एकूणच इंटरनेटचा प्रभाव, परिणाम आधी कल्पना केली होती त्यापेक्षा जास्त आहे. पंचेंद्रियांवर, गात्रांवर, मनावर...  अखंडपणे नकारात्मकता पसरवणारी किती माणसं असतात इथे! मला या विश्वाने खूप आहे मिळवून दिलं आहे, देतही राहील. पण याच्यासोबत येणारा 'कंडिशन्स अप्लाय'वाला ऍस्टेरिक खऱ्याखुऱ्या ताऱ्यापेक्षा ठळक आहे. तो देण्यापेक्षा खूप काही शोषून घेतोय. कीटक खाणाऱ्या वनस्पतीसारखं वाटतं हे कधीतरी. जरुरीपेक्षा जास्त जवळ गेलो तर आपला घास घेतला जाणार हे माहित असूनही तिकडे आपण खेचले जातो. तास-तास, दिवस-दिवस कसे जातात ते कळत नाही.
एकाच वेळी मी स्वतःला विस्तारतोय, जुनी झापडं उघडल्याने जुन्या समजुती गळून पडत आहेत आणि त्याच वेळी मी अधिक संकुचित आणि अधिक जजमेंटल होतोय. हे काय रसायन आहे तेच कळत नाहीये. दुहेरीपणा जास्त अधोरेखित होत चालल्याचं फीलिंग येतंय. आपण यात दलदलीसारखे रुतत आहोत आणि आपणच आपल्याला लगाम घालण्याशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात यायला लागल्यावर गेल्या महिन्या-दीड महिन्यात तसे दोनदा प्रयत्न केले. याची फ्रिक्वेन्सी वाढत जाईल असं वाटतंय. इथून अलिप्त राहून एक वेगळीच शांतता जाणवते. एक कवाड बंद करून ठेवलं की मग एरवी ऐकून न येणारे आवाज जास्त स्पष्ट ऐकता येतात.

अर्थात या उपायाने सगळीच उत्तरं मिळतात असं नाही. ही शांतताही नवं कुतूहल घेऊन येते, नवे प्रश्नही घेऊन येते. त्यांना अंत आहे असं वाटत नाही. काही प्रश्न अस्वस्थ करणारेही पडायला लागलेत. जबाबदारी वाढतीये. 'पस्तीस'च्या टप्प्यावर काही नवे पेच आहेत, काही नवे रस्तेही आहेत. कशावरून गेल्यावर काय लागेल याची कल्पनाही नाहीये. पण चालतही राहायचंय.

छे.. फारच येळकोट खरडलंय सगळं मी. त्याला काही आगापिछा, थांग आहे की नाही हेही कळत नाहीये. गिरमिट आहे एकुणात. Does that happen When Everybody Turns Thirty Five?