Total Pageviews

Tuesday, April 14, 2020

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एक विशाल संघटन (समग्र दर्शन)



समूहआणि संघटनहे दोन्ही शब्द संख्यात्मक अनेकत्व दर्शवत असले तरी, त्या दोन्हींच्या अर्थामध्ये मूलभूत फरक आहे. सर्वांच्या एकत्र येण्यामागे काही सामायिक उद्देश असला तरी, प्रत्येक समूहाला संघटनम्हणता येत नाही. बसथांब्यावर उभे असलेले लोक किंवा एखादा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात आलेले लोक यांचा उद्देश एकच असला तरी, तो समूहम्हणजे संघटननसते. मग दोन्हीमध्ये नेमका फरक कोणता ? ‘एकजूटहा घटक समूह आणि संघटन यांच्यामधील सीमारेषा आखतो. जेव्हा कुठलाही समूह आपले अनेकत्व विसरून आपल्यातली एकजूट प्रकट करून एखादे निश्चित ध्येय गाठायला निघतो तेव्हा जे बनते त्याला संघटन' असे म्हटले जाते. एखाद्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दाखवलेली एकजूटहेही संघटनाचेच उदाहरण. अशी अनेक संघटनंआपल्याला नित्यनेमाने दिसत असतात. पण अशा संघटनांच्या भाऊगर्दीत काहीसंघटनं मात्र अगदी उठून दिसतात. कारण, त्यात समाविष्ट असलेल्या लोकांचा उद्देश वैयक्तिक प्राप्ती हा नसतो. व्यापक हितासाठी एकत्र येऊन ते समाजासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करत असतात. परस्पर स्नेहभावहा गुण त्यांना एकमेकांशी बांधून ठेवत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघहे एक असेच संघटन. तब्बल ९३ वर्षं कुठलीही उभी फूट न पडता केवळ टिकलेलेच नाही तर सतत वर्धिष्णू असणारे हे संघटन व्यवस्थापनशास्त्र आणि संघटनशास्त्र यांच्या अभ्यासकांनी आवर्जून अभ्यासावे असे आहे. टीकाकारांनी संघावर टीका करणारी इतकी पुस्तकं लिहिली, पण त्यातल्या कुणी हे संघटन सतत का वाढत राहिले हे जाणून घेण्यासाठी संघाच्या कार्यपद्धतीचा सर्वंकष अभ्यास केला का, हा प्रश्नच आहे. अशा पार्श्वभूमीवर संघाच्या कार्यपद्धतीबद्दल विस्ताराने ऊहापोह करणारे रामकृष्ण पटवर्धन लिखित नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचे नाव आहे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - एक विशाल संघटन (समग्र दर्शन).
 
संघटन स्थापनेमागील विचार प्रभाव,’ ‘संघटनेचे ध्येय आणि वाटचाल,’ ‘संघटनेची निर्मिती,’ ‘संघस्वयंसेवक,’ ‘संघप्रचारक,’ ‘व्यवस्थापन कार्यपद्धती आणि विस्तार,’ ‘संघाच्या उपलब्धीआणि हिंदू स्वयंसेवक संघया प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलेले असून प्रत्येक प्रकरणात त्या त्या अनुषंगाने सविस्तर विवेचन केले गेले आहे.
 
संघस्थापना आणि संघवृद्धी
 
संघ टिकून राहण्यामागचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर संघाचे स्वरूप जाणून घेणे आवश्यक ठरते आणि संघाचे स्वरूप जाणून घ्यायचे असेल, तर संघाच्या स्थापनेमागचा विचार आणि तत्कालीन पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करण्याआधी वैचारिक तसेच कार्यशैलीतील भिन्नता असणाऱ्या अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता. यात सत्याग्रहापासून ते भूमिगत क्रांतिकार्यापर्यंतचे विविध मार्ग समाविष्ट आहेत. या गोष्टी जाणून घेतल्या तर डॉक्टर संघस्थापनेच्या निर्णयापर्यंत का पोहोचले हे जाणून घेणे सोपे जाते. त्या दृष्टीने पुस्तकातले संघटनस्थापनेमागील विचार प्रभाव' हे प्रकरण महत्त्वाचे आहे.
 
पुढच्या प्रकरणांमध्ये संघाच्या वाटचालीबरोबरच संघाची कार्यपद्धती उलगडून सांगितली आहे. दैनंदिन शाखा व तिथे होणारे कार्यक्रम, अखिल भारतीयस्तरापासून ते शाखास्तरापर्यंत नियमितपणे होणाऱ्या बैठका, बैठकांच्या माध्यमातून होणारे सूक्ष्मातिसूक्ष्म नियोजन, संघटन श्रेणी आणि जाग्रण श्रेणी यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांमुळे कामाला कशी गती मिळते या गोष्टींचे यात विवेचन आहे. संघाची सेवाकार्ये, धर्मांतर रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे संघाच्या व्याप्तीची कल्पना देतात. परस्परांमध्ये असलेला विशुद्ध स्नेहभावसंघटन मजबूत करण्यात आणि चिरस्थायी होण्यात कसा महत्त्वाचा ठरतो हेही आवर्जून सांगितले आहे. कारण, तेच तर संघाच्या वाढीचे रहस्य आहे.
 
संघस्वयंसेवकआणि संघप्रचारकया दोहोंच्या खांद्यावरच संघाचा सगळा डोलारा उभा आहे. त्यामुळे या दोन्हींच्या वैशिष्ट्यांना विस्ताराने हात घालणारी स्वतंत्र प्रकरणे या पुस्तकात समाविष्ट केली गेली आहेत. संघप्रचारक' या प्रकरणात संघाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय कष्टात दिवस कंठून, विरोध पत्करून संघटनेचे रोपटे रुजवणाऱ्या प्रमुख प्रचारकांची ओळख करून दिली आहे. वेश, भाषा, अन्न, वातावरण या सर्वच बाबतीत अपरिचित असणाऱ्या प्रदेशात जाणाऱ्या आणि कुठल्याही आर्थिक मोबदल्याशिवाय राहून संघकार्य वाढवत नेण्यासाठी केलेले भीमप्रयत्न पाहून अचंबित व्हायला होते. संघाचा चिवटपणा हा अशा प्रचारकांच्या निष्ठेपणातून आलेला आहे हे संघाच्या यातून ध्यानात येतं.
 
संघाची व्यापकता
 
संघ नक्की करतो कायअसे कुतूहल असणाऱ्यांनी आणि इतकी वर्षं तुमच्या संघाने काय केलंअसे कुत्सितपणे विचारणाऱ्या संघविरोधकांनी पुस्तकातलं संघाच्या उपलब्धीहे प्रकरण अवश्य वाचावे. राष्ट्रजीवनाच्या कोणकोणत्या अंगावर संघाचा प्रभाव पडला आहे, संघविचाराने चालणाऱ्या संघटना कोणत्या, त्यांचं कार्य खोलवर पोहोचवण्यासाठी कोणते कार्यक्रम हाती घेतले जातात याचं या प्रकरणात विवेचन केलेलं आहे. संघाची देशभरच्या विविध प्रांतांमधली व्यापक शिबिरं कोणती याची नोंद करतानाच उपस्थितांची संख्या किती याबद्दल पुस्तकात आलेख आणि तक्तेदेखील दिले आहेत. ते वाचून संघाचा विस्तार किती आहे आणि व अधिकाधिक कसा वाढत जातो आहे हे लक्षात येते. संघाच्या वाढीमध्ये त्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे आणि याद्वारे काय साध्य झाले हेही मांडले आहे.
 
उदा :
एका घोष शिबिरासाठी संघाच्या घोष पथकाव्यततिरिक्त अन्य बँडवाल्यांनाही बोलावले गेले होते. त्यांच्याशी संपर्क आल्याने त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा अभ्यास झाला. गुजरातमध्ये एका शिबिराच्या निमित्ताने एकत्रीकरण करत असताना वनवासी भागामध्ये डोके वर काढत असलेल्या फुटीरतावादी शक्तींची जाणीव झाली. एकदा समस्येचं स्वरूप लक्षात आलं की, त्यावर संघाच्या माध्यमातून उपाययोजनाही केली जातेच. त्यामुळेच आज देशभरात दीड लाखांहून अधिक सेवाकार्ये संघविचारांच्या माध्यमातून चालू आहेत.
 
अमूक एका प्रश्नावर संघाची भूमिका काय' याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण केला जातो. संघाच्या कार्यकारिणीची दरवर्षी प्रदीर्घ बैठक होत असते. त्यामध्ये देशापुढच्या, समाजापुढच्या समस्यांचा सखोल ऊहापोह होऊन त्यावर संघाची भूमिका स्पष्ट करणारा ठराव कार्यकारिणी मंजूर करते आणि ती संघाची अधिकृत भूमिका असते. कार्यकारिणीत मंजूर झालेल्या अशा अनेक कालसुसंगत ठरावांचा या पुस्तकात आवर्जून केलेला समावेश हा या पुस्तकाचे मूल्यवर्धन करतो. आसाम दंगल, बांगलादेशातील हत्याकांड, चीनसंबंधी अपेक्षित असलेले धोरण, भ्रष्टाचारावर अंकुश अशा वैविध्यपूर्ण विषयांवरचे ठराव संघाने पारित केले आहेत हे या निमित्ताने वाचकांना कळते.
 
पुस्तकाच्या जमेच्या बाजूबद्दल लिहितानाच पुस्तकात सुधारणेची गरज असणारी गोष्टही सांगायला हवी. संघाबद्दल विस्ताराने ऊहापोह करण्याच्या ओघात यातली वाक्यरचना सुटसुटीत राहिली नाही. त्यामुळे काही ठिकाणी वाक्यरचनेच्या चुका झाल्या आहेत. पुढच्या आवृत्तीआधी या पुस्तकाचे या अनुषंगाने पुनरावलोकन व्हावे.
 
नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे संघाबद्दलचे समाजातले कुतूहल अधिक वाढले आहे. एकूणच संघाचे विविध अंगांनी दर्शन घडवणारे, संघ टिकून राहण्याचे रहस्य उलगडून दाखवणारे, संघाच्या कार्यपद्धतीचे पदर उलगडवून दाखवणारे हे पुस्तक संघाविषयी कुतूहल असणाऱ्यांनी अवश्य वाचावेच, पण संघटन पातळीवर अनेक वर्षे कच्चेच राहिलेल्या किंवा काळाच्या ओघात संघटनाची ताकद खिळखिळी झालेल्या आणि सदैव संघावर टीका करण्यात धन्यता मानणाऱ्या संघविरोधकांनीही अवश्य वाचावे असे आहे. न जाणो त्यांना या अभ्यासातून काही महत्वाची सूत्रं मिळतील आणि उभारीही मिळेल!
 
पुस्तक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - एक विशाल संघटन (समग्र दर्शन)
लेखक : रामकृष्ण पटवर्धन
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पृष्ठसंख्या : ३९०
आवृत्ती : पहिली (९ एप्रिल २०१९)
किंमत : ४५० रु

Saturday, April 11, 2020

‘मंज़िल- ए- मक्सूद पाकिस्तान ’ : बंद दार किलकिलं होतं तेव्हा...


'पाकिस्तान ' ही भारतीयांसाठी एक ठसठसती जखम आहे. त्या देशाचा नुसता उल्लेखदेखील मनात प्रचंड खळबळ निर्माण करतो. त्या खळबळीला असंख्य पदर आहेत. 'संताप' ही भावना या खळबळीमध्ये सर्वाधिक दृश्यमान असली तरी तिच्या तळाशी वेदना, विश्वासघात, दुःख, हताशा आणि सूडभावनादेखील असते. धर्मांध शक्तींच्या उन्माद आणि दहशतीमुळे आपल्या भारतभूमीवर कायमचा चरा उमटला आणि त्याने देशाचे तुकडे केले याची जाणीव आजही भारतीयांना अस्वस्थ करते. पण त्याहीपुढे जाऊन भारतीयांच्या मनात राग आहे कारण, एकदा स्वतंत्र झाल्यावर तरी सुखाने नांदायचे सोडून या नव्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतरही भारताला सतत त्रास दिला आहे. यातून पाकिस्तान आणि तिथल्या जनतेकडे बघण्याचा भारतीयांचा एक विशिष्ट दृष्टिकोन तयार झाला असेल तर त्यांना दोष देता येणार नाही. अशा परिस्थितीत कधीतरी पाकिस्तानबद्दलच्या सरसकट समजाचा पृष्ठभाग खरवडला जातो, तेव्हा त्याखाली आपण कल्पना न केलेली चित्रं दिसतात. प्रवीण कारखानीस लिखित 'मंजिल-ए-मक्सूद पाकिस्तान' हे पुस्तक अशा चित्रांचं कोलाज डोळ्यासमोर उभं करतं.
पाकिस्तानभेटीची अपूर्व संधी
२००४ च्या आसपासचा कालखंड हा भारत-पाकिस्तान संबंधातला रोमँटिक कालखंड म्हणता येईल. भारतीय क्रिकेट संघाचा यावर्षीचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक होता. कारगिल युद्धामुळे ताणले गेलेले संबंध निवळण्याच्या दृष्टीने भारत सरकारने पावलं उचलली होती. त्यातलंच एक पाऊल म्हणजे भारत-पाकिस्तान क्रिकेटचे पुनरुज्जीवन. या दौऱ्याच्या निमित्ताने पाकिस्तानात गेलेल्या पत्रकार, कलाकार इत्यादींकडून आपल्या अनुभवांवर बरंच काही लिहिलं, बोललं गेलं आहे. प्रवीण कारखानीस यांनी सर्वसामान्य प्रेक्षक या नात्याने पाकिस्तानला भेट दिली आणि त्यानिमित्ताने केलेल्या भटकंतीदरम्यान आलेले मनोज्ञ अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. पाकिस्तानात एकट्याने प्रवास करणे हे तसे जिकीरीचेच, परंतु कारखानीस यांनी मुंबईपासून रोमपर्यंत केलेल्या दुचाकी प्रवासाचे रोचक अनुभव ('अष्टचक्री रोमायण' या पुस्तकात) ज्यांनी वाचले आहेत, त्यांना कारखानीस यांच्या या हिमतीचे आश्चर्य वाटणार नाही. पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी कराव्या लागलेल्या धावपळ-धडपडीने पुस्तकाची सुरुवात होते. तेव्हापासून पुस्तकाने घेतलेली पकड शेवटपर्यंत कायम राहते. पुस्तकात पाचही सामन्यांचे '.. याची डोळां ' केलेलं वर्णन आहे खरं, पण मुळात लेखकाच्या प्रवासाचा उद्देशच शक्य त्या प्रकारे पाकिस्तान टिपून घेणे हाच आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे पुस्तकाचा गाभा पाकिस्तानातील स्थळांचा आणि माणसांचा अनुभव हाच आहे.
सामाजिक आणि ऐतिहासिक नोंदी
शेजारी देश असूनही पाकिस्तानबद्दल आपल्याला किती कमी माहिती असते, याची पुस्तक वाचताना जाणीव होते. आपल्या लेखी फक्त एक 'मुस्लिम राष्ट्र' अशी ओळख असलेल्या या देशातही विविध भाषा, वंश, पंथ यांच्या अनुषंगाने अनेक प्रवाह आहेत आणि कुठल्याही दोन मानवसमूहात असू शकतील असेच ताणतणावाचे, संघर्षाचे संबंध त्यांच्यातही आहेत. पंजाबी लोकांचे असणारे वर्चस्व; त्यांनी बलोच, पश्तून, सिंधी जनतेवर केलेली दंडेली; आजच्या पाकिस्तानच्या भूमीशी काहीही संबंध नसलेली उर्दू भाषा अन्य भाषांवर लादली गेल्याने निर्माण झालेला असंतोष याबद्दल लेखकाने लिहिले आहे. ज्या ज्या ठिकाणांना लेखकाने भेट दिली त्यांचा इतिहास आवर्जून लिहिला आहे. त्यामुळे पुस्तक म्हणजे नुसती स्थलदर्शनाची डायरी न होता त्याला अधिक खोली प्राप्त झाली आहे. अन्य प्रांतातून आलेल्या मुम राज्यकर्त्यांच्या कबरी, जन्मस्थळं यांच्या इतिहासाबद्दल आपल्याला माहिती मिळते. ते सगळे बाहेरून आलेले क्रूर आक्रमक असूनही ते फक्त 'इस्लामचे पाईक' होते म्हणून त्यांच्याविषयी प्रेम वाटणाऱ्या पाकिस्तानी जनतेच्या वृत्तीवरही लेखक बोट ठेवतो. इथल्या मुुस्लिम पूर्वसुरींसोबतच हिंदू पूर्वसुरी, त्यांचे कार्य, त्यांच्या पुसट होत जाणाऱ्या आठवणीही लेखक मांडतो तेव्हा धर्मवेडापायी पाकिस्तानने पुसत नेलेल्या इतिहासाविषयी चुटपुट वाटत राहते.
प्रवासादरम्यान भेटलेल्या पाकिस्तानी हिंदूंशी झालेल्या संवादातून तिथल्या हिंदूंसमोर वासून उभ्या असलेल्या प्रश्नांची जाणीव होते. आपल्या मुलीच्या लग्नासाठी, आपल्या जातीतला जाऊ दे, किमान हिंदू धर्म असलेला वर तरी मिळावा एवढी माफक अपेक्षा पूर्ण करणंही तिथल्या हिंदू वधुपित्यांना दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. वर उल्लेखलेल्या पाकिस्तानांतर्गत संघर्षांपेक्षा हा संघर्ष अधिक असमान बाजूंमधला आहे, हे जाणवतं. पुस्तकातली अजून एक लक्षणीय गोष्ट म्हणजे यात केलेला उर्दूचा उत्तम वापर. स्वतः लेखकाने पाकिस्तानातल्या लोकांशी साधलेला संवाद उर्दूमध्ये आहेच, शिवाय एक संपूर्ण प्रकरण पाकिस्तानातील प्रसिद्ध शायर, लेखक, कलाकार यांना वाहिलेले आहे. हे प्रकरण उर्दू काव्यपंक्ती, शेरोशायरी, चित्रपटगीतं यांनी समृद्ध आहे. ते वाचत असताना सीमेच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या कला आणि कलाकारांची मुळं एकच आहेत हे आपण किती सहजपणे विसरलो आहोत, याची जाणीव होते.
आदरातिथ्य
सर्वसाधारणपणे भारतीयांच्या मनात पाकिस्तानी लोकांविषयी एक संशयाचं धुकं असतं. पण २००३ च्या दौऱ्याच्या निमित्ताने पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांचे अनुभव ऐकले तर त्यांचा अनुभव खूप वेगळा असल्याचं दिसतं. प्रस्तुत पुस्तकामध्येही लेखकाने पाकिस्तानी नागरिकांकडून आलेले सुखद अनुभव नमूद केलेले आहेत. त्यात त्यांच्याकडून भाडे नाकारणारा टॅक्सीवाला आहे, लेखकाला आपला पाहुणा समजून आश्वस्त करणारा हॉटेलवाला आहे, विमानात भेटलेला आणि उतरल्यावर रात्रीची वेळ आहे म्हणून लेखकाला स्वतःच्या गाडीतून इच्छित स्थळी पोचवणारा सहप्रवासी आहे... मेहमान नवाज़ीचे अनेक किस्से यात वाचायला मिळतात, जे पाकिस्तान्यांविषयीच्या पारंपरिक समजुतींना छेद देतात. लेखकाने जसे हे अनुभव नमूद केले आहेत त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या वाटचालीत त्यांच्याकडून घडलेल्या चुका, अल्पसंख्याकांना तिथे मिळणारी वागणूक यावरही भाष्य केले आहे. लिखाणातले असे संतुलन आणि मांडणीमधला ओघ यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.
पुस्तकाच्या तांत्रिक बाजूंचा विचार करता एकूण छपाई सुटसुटीत आहे परंतु, पानावरचा दोन्हीकडचा समास अतिशय कमी रुंदीचा असल्याने वाचताना खटकत राहते. शिवाय पुस्तकात केवळ मधल्या काही पानांवर छायाचित्रं छापलेली असताना संपूर्ण पुस्तक आर्टपेपरवर छापण्याचे प्रयोजन कळत नाही. ते टाळले असते तर पुस्तकाची किंमत कमी होऊ शकली असती. असो. अशा काही गोष्टी वगळता पुस्तक उत्तम अनुभव देते. थोड्याश्या काळासाठी किलकिल्या झालेल्या दरवाजातून पूर्वग्रह बाजूला ठेवून, सजगपणे पाहिल्यामुळे पाकिस्तानच्या अंतरंगाचे धावते, तरीही लक्षात राहील, असे दर्शन लेखकाने घडवले आहे. प्रामाणिकपणे आणि नेटकेपणाने मांडल्याने पुस्तक वाचनीय झालं आहे. आपल्यासारख्याच असणाऱ्या तरीही आपल्यासारख्या नसणाऱ्या भारताच्या या शेजाऱ्याचे हे दर्शन जसे चकित करते तसेच कोड्यातही पाडते. व्यक्तिगत पातळीवर शहाणीव असणारा, सौजन्यशील पाकिस्तान एक समाज म्हणून इतका एकांगी आणि शहाणपण गमावलेला का आहे, हा प्रश्न पुस्तक संपताना त्यामुळेच छळत राहतो.
पुस्तक : मंज़िल-ए-मक्सूद पाकिस्तान
लेखक : प्रवीण कारखानीस
प्रकाशक : श्री सर्वोत्तम प्रकाशन, इंदूर
आवृत्ती : दुसरी (मार्च २०१९)
पृष्ठसंख्या : १८८
किंमत : ३०० रु.

Monday, April 6, 2020

‘आज भी खरे हैं तालाब’ : आपला संपन्न जलवारसा



रोज वर्तमानपत्र उघडावे आणि दुष्काळाच्या बातम्यांनी मनावर मळभ यावे, असे दिवस आहेत. टँकर हा आता अपवाद राहिला नसून जणू व्यवस्थेचा एक भागच झाला आहे की काय असं वाटू लागलं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच गावोगाव टँकर फिरू लागतात. वर्षानुवर्षे कोरड्या असणाऱ्या जमिनीच्या सिंचनाची सुयोग्य व्यवस्था अजूनही न झाल्याने तालुकेच्या तालुके तहानलेले आहेत. सरकार आपली कामं करत नसेल, तर नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अंग झटकून कामाला लागावं असं सर्वत्र घडत नाही. झाडं लावणे, पावसाच्या पाण्याच्या साठवणीकरिता प्रयत्न करणे, याचं महत्त्व अजूनही लोकांच्या ध्यानात येत नाही. कदाचित हे म्हणणं कोणाला आवडणार नाही, पण अनेक ठिकाणी लोक जलव्यवस्थापन ही आपलीही जबाबदारी आहे हे अजूनही समजूनच घेत नाहीत. तात्कालिक उपायांपेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांची खूप गरज आहे. ‘पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘जनकल्याण समिती’ अशा संस्थांच्या पुढाकाराने काही प्रमाणात सकारात्मक बदल घडतो आहे खरा; पण अजून जास्त प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे. ही अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. सर्व जबाबदारी राज्यकर्त्यांवर टाकून आपण निवांत राहणे, ही आपली परंपरा नव्हती. जलव्यवस्थापन, जलसंधारण ही जनतेची चळवळ कशी होती आणि त्यात समाजाच्या प्रत्येक घटकाचा वाटा कसा होता याची माहिती देणारं एक अनोखं पुस्तक मराठीत आलेलं आहे. त्याचं नाव आहे 'आज भी खरे हैं तालाब'. हे पुस्तक आपल्या जलपरंपरेचे फक्त तांत्रिक तपशील देत नाही, तर तिचा गौरवही करतं. या लिखाणाला भावनेचा ओलावा आहे म्हणून ते मनामध्ये अधिक रुजतं.

तलाव बांधणीतील लोकसहभाग
प्रस्तुत पुस्तकात गेल्या शेकडो वर्षांमध्ये भारतामध्ये तलाव बांधण्याचं शास्त्र कसं कसं रुजत गेलं, बहरत गेलं यावर प्रकाश टाकला आहे. राजस्थानसारख्या अल्प-स्वल्प पाऊस पडणाऱ्या प्रदेशातही पाणी साठवण्याच्या क्लृप्त्या शतकानुशतकं टिकून आहेत, हे लेखक अनुपम मिश्र यांच्या लक्षात आलं. अधिक खोलात जाऊ लागल्यावर त्यांना फक्त राजस्थानच नाही, तर भारतातल्या अन्य प्रदेशांमध्येही पाणी साठवण्यासाठी वापरलेले जाणारे तंत्र-मंत्र माहिती होऊ लागले. हे पारंपरिक ज्ञान पिढीजात पद्धतीने संक्रमित होत गेलं आहे, याचं कारण सर्व समाजाने जलसंधारण ही आपली जबाबदारी मानली. समाजातल्या प्रत्येक जातीने यात आपापला वाटा कसा उचलला याची सविस्तर माहिती देणारं 'संसार सागराचे खरे नायक' हे संपूर्ण प्रकरण या पुस्तकात आहे. तलाव बांधणीशी संबंधित किती प्रकारची कामं होती आणि ती समाजाच्या एकेका हिश्श्याने कशी वाटून घेतली होती, हे यातून लक्षात येतं. बांधकामाचे संपूर्ण नियोजन करणारे 'गजधर,’ दगड फोडणारे 'सिलावट (पाथरवट),’ माती खोदणारे व विटा पाडणारे 'मटकुट,’ गावातल्या जमिनीची आणि आधी बांधलेल्या विहिरी आणि तलावांची इत्यंभूत माहिती असणारे 'बुलई,’ तलाव बांधल्यावर त्यात कमळं, कुमुदिनी लावणारे व तलावाचं रक्षणही करणारे 'माळी' अशा कित्येक जातींचं तलाव बांधणीच्या कामातलं योगदान यात नोंदवून ठेवलं आहे. समाजाच्या सर्व स्तरातली माणसं तलाव बांधणीशी संबंधित काही ना काही योगदान द्यायचीच. राजस्थानातील पालीवाल ब्राह्मण पाणी अडवण्याच्या कामात तज्ज्ञ होते, तर दक्षिणेत पाणी वितरणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी 'नीरघंटी' हे पद होतं जे फक्त दलितांना दिलं जायचं. अशी कामं करणाऱ्यांचा गावाकडून सन्मान केला जायचा, कधी गावात थोडी जमीन दिली जायची. हे वाचताना  आपला इतिहास फक्त वर्गसंघर्षाचा, जातीसंघर्षाचा होता हे बिंबवण्याचा प्रयत्न किती एकांगी असतोहे लक्षात येतं.


संस्कृतीशी जोडलेली नाळ
तलाव बांधणीचं काम आपल्या संस्कृतीशीही कसं जोडलेलं आहे, याची अनेक उदाहरणं पुस्तकात आहेत. पंचांगात तिथी, वार पाहून खोदाईच्या कामाला सुरुवात करणे, हस्ता’च्या पावसाच्या दिवशी साठलेल्या पाण्याचा आस्वाद घ्यायला जमणे, अवजारांची पूजा करणे, तलावाच्या रक्षणासाठी देवतेची स्थापना करणे अशा अनेक गोष्टींमुळे हे काम म्हणजे एक सांस्कृतिक कार्यक्रमच होऊन जायचे. फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला नगरातल्या सर्वात मोठ्या तलावावर सर्वांना 'ल्हास' खेळायला बोलावलं जायचं. त्या दिवशी स्वतः राजा, त्याचा परिवार, दरबार, प्रजा असे सर्वजण तलावावर जमून श्रमदान करायचे. राजाच स्वतः मातीत हात घालत असेल, तर ती जबाबदारी प्रजेने स्वतःच्या खांद्यावर घेतली नाही तरच नवल!
तलावाशी संबंधित अनेक संज्ञा आणि त्यांना असणारे पारिभाषिक शब्द यांनी पुस्तक समृद्ध केलं आहे. सर्वसामान्य माणसाला तलावाचा पाणी साठवणारा भाग आणि काठ एवढ्या दोनच गोष्टी माहीत असतात, पण पुस्तक वाचताना कळतं की तलावाच्या निरनिराळ्या भागांना स्वतंत्र नावं आहेत. पाल, नीव, आगर, आगौर, नेष्टा, डांट, मोखी इ. भाग हे जणू तलावाचे अवयवच आहेत. पुस्तकातली वर्णनं फक्त एवढ्यावरच थांबत नाहीत. विविध प्रांतात तलावाशी संबंधित संज्ञांना असणारे निरनिराळे प्रतिशब्द, एका ठिकाणच्या शब्दाचे दुसऱ्या प्रदेशात जाताना बदलणारे रूप, काळ पुढे जाईल तसतसे मूळ शब्दांचे होत जाणारे अपभ्रंश अशा अनेक अंगांनी शब्दांचा आणि पर्यायाने संस्कृतीचाही वेध घेतला आहे. अवघी ७० पानं असणाऱ्या या पुस्तकात माहितीचा अक्षरशः खजिना आहे.

उत्तम मांडणी
लेखक अनुपम मिश्र यांचा सखोल अभ्यास पानापानावर उमटलेला आहे. त्यांच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. पुस्तकाच्या वाचनीयतेचं श्रेय अनुवादक विश्वास भावे यांनाही द्यायला हवं. ते स्वतःदेखील या विषयाचे अभ्यासक असल्याचा अनुवाद करतेवेळी फायदा झाला आहे. अनेक ठिकाणी मूळ हिंदी अथवा प्रादेशिक शब्द त्यांनी तसेच ठेवल्याने पुस्तकाला मातीचा गंध प्राप्त झाला आहे. पुस्तकात उत्तरेकडच्या जलसंस्कृतीवर जास्त भर दिला आहे. दक्षिणेकडचे ‘भगीरथ प्रयत्न’ पुस्तकात अधिक प्रमाणात मांडले गेले असते, तर पुस्तक अधिक व्यापक झालं असतं असं वाटतं. पुस्तक छोटेखानी असलं तरी मांडणीच्या दृष्टीने लक्षवेधी आहे. मुखपृष्ठावरचे गोंदण, आतमधली बिंदुचित्रं पुस्तकाला अधिक उठावदार करतात. व्यावसायिक फायद्या-तोट्याचा विचार न करता अशा वेगळ्या विषयावरचे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशकांचे आभार मानायला हवेत. 


हे सगळं वाचत असताना आपण विचारप्रवणही होत जातो. किंबहुना तोच लेखकाचा उद्देश आहे. तलाव बांधणीच्या तंत्राविषयी लिखित स्वरूपात काहीही उपलब्ध नसतानाही कित्येक शतकं, पिढ्यानपिढ्या हे ज्ञान कसं प्रवाहित होत आलं असेल याबद्दल आश्चर्य वाटत राहतं. एवढ्या विपुल ज्ञानाचा खजिना आपल्याकडे असतानाही आज पाणीप्रश्न का भेडसावतो, समाजाच्या एकेका घटकाने तलाव बांधणीच्या एकेका ज्ञानांगाचे जतन केले असूनही पुढे त्यांचा ऱ्हास का आणि कसा झाला, ब्रिटिशांच्या आगमनानंतर हे पिढीजात शहाणपण कसे मोडून काढण्यात आले, त्यांनी आणलेल्या तंत्राच्या आहारी जात आपण आपल्या पारंपरिक ज्ञानाला कसे दूर लोटत चाललो आहोत, अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह करत लेखक आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. अक्षरशः शेकडो-हजारो वर्षांचा इतिहास असलेले आणि अगदी १९८०च्या दशकापर्यंत बऱ्याच अंशी सुस्थितीत असणारे तलाव आपण आपल्या भौतिक प्रगतीच्या हव्यासापोटी कसे नष्ट करत चाललो आहोत, हे वाचून रुखरुख लागते. एकीकडे आपल्या परंपरेचा यथार्थ अभिमान जागृत करत असतानाच 'आज भी खरे हैं तालाब' चं रूपांतर नकळत 'आज बिखरे हैं तालाब' मध्ये होत असल्याची ठसठसती जाणीवही हे पुस्तक करून देत राहतं..

लेखक : अनुपम मिश्र
अनुवादक : विश्वास भावे
प्रकाशक : मंगेश र. वाडेकर (अभिषेक टाईपसेटर्स अँड पब्लिशर्स, १२४३, सदाशिव पेठ, खुन्या मुरलीधराजवळ, पुणे
आवृत्ती : पहिली (२० नोव्हेंबर, २०१७)
पृष्ठसंख्या : ७२
किंमत : १०० रुपये
(टीप : हे पुस्तक कुठे आणि कसे मिळू शकेल यासंबंधी प्रकाशकांच्या कार्यालयीन क्रमांकावर (०२० - २४४७१०६१) अथवा ई-मेलवर (abhishekpublishers@yahoo.co.in) संपर्क साधून चौकशी करता येईल.


(mahamtb.com वर पूर्वप्रकाशित)


Saturday, April 4, 2020

'कथा एका ध्येयसाधनेची' : अविरत आरोग्यसेवेचा वसा



जेव्हा एखाद्या देशाची जडणघडण होत असते तेव्हा उत्तम शिक्षण, आर्थिक आणि तांत्रिक उन्नती यांप्रमाणेच ‘उत्तम आरोग्यसेवा’ हेदेखील राज्यकर्त्यांचे उद्दिष्ट असायला हवे. परंतु आरोग्यक्षेत्रात मूलभूत सोयी नाहीत अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. अतिशय महाग आरोग्यसेवांमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडून जाते. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं होऊन गेली तरी कितीतरी खेडोपाडी मूलभूत आरोग्यसेवा मिळण्यात अडचण येते. अशा कठीण परिस्थितीतही सरकारी कृपेची वाट न बघता स्वतः मैदानात उतरून काम करणाऱ्या आमटे, बंग, कोल्हे कुटुंबियांनी आरोग्यक्षेत्रात उत्तम उदाहरण घालून दिलेलं आहे. याच मालेत शोभावं असं काम मराठवाड्यासारख्या आधुनिक आरोग्य सुविधांचा अभाव असणाऱ्या भागात जाऊन उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्यांची ध्येयनिष्ठा डॉ. अशोक कुकडे यांनी प्रस्तुत पुस्तकातून आपल्यासमोर मांडली गेली आहे.

ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचे ध्येय

अशोक कुकडे हे पुण्याच्या कसबा पेठेत लहानाचे मोठे झाले. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या कुकडे यांनी एमबीबीएसची पदवी विद्यापीठात प्रथम येत मिळवली. इंटर्नशिपसाठी मिरज सारख्या निमशहरी परंतु आरोग्य सेवेसाठी अतिशय नावाजल्या गेलेल्या शहरातील मिशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक प्रवेश घेतला. याच ठिकाणी त्यांची भेट भूलतज्ज्ञ डॉक्टर रामभाऊ अलुरकर यांच्याशी झाली. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मनावर असल्यामुळे आपोआपच सामाजिक भावना जोपासली गेली होतीच. त्यात अलुरकर यांच्याशी शहरापासून दूरच्या ठिकाणी आरोग्यसेवेच्या आवश्यकतेबद्दल विचार विनिमय होत असे. मिशन हॉस्पिटलमध्ये ज्या उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवेकडे लक्ष दिलं जात होतं तशा प्रकारचं काम ग्रामीण भागात उभं करण्याच्या दृष्टीने मनात विचार पक्के होत गेले.

रा. स्व. संघाचे विभाग प्रचारक असणाऱ्या सुरेशराव केतकर यांच्याकडून मराठवाड्यातल्या आरोग्यसेवेच्या निकडीबद्दल त्यांना कळलं. मूळचे लातूरचे असणारे संघ स्वयंसेवक डॉक्टर गोपीकिशन भराडिया यांच्याकडून लातूरच्या आरोग्यसोयींच्या अडचणींबद्दल माहिती मिळाल्यावर त्याच ठिकाणी वैद्यकीय सेवेची मुहूर्तमेढ करण्याचा निर्णय पक्का झाला. वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवून स्वस्तात उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न बाळगून ४ जानेवारी १९६६  रोजी ‘विवेकानंद रुग्णालय’ हे रोपटं लावलं आणि सुरू झाला एक अखंड सेवायज्ञ! या ठिकाणी फक्त वैद्यकीय सेवा देणे एवढेच काम नसून हॉस्पिटलच्या जागेची सोय, उपकरणांची जमवाजमव, आर्थिक जुळवाजुळव अशा अनेक जबाबदाऱ्या येऊन पडल्या.


आरोग्यसेवा आणि संघकार्य यांचे अद्वैत

नुकतेच लग्न झालेले असूनही कुकडे पती-पत्नी आणि डॉक्टर अलुरकर व त्यांच्या पत्नी यांनी १२ खोल्यांच्या एका घरात संसार आणि दवाखाना एकत्रच सुरू चालू ठेवला. सुरुवातीच्याच काळात आलेल्या काही अवघड केसेस आपल्या कौशल्याच्या बळावर पार पडल्या आणि आपल्या सहृदय वागणुकीमुळे परिसरामध्ये या रुग्णालयाविषयी विश्वास निर्माण झाला आणि रोपटं बाळसं धरू लागलं.

रुग्णालयाचे संबंधित सर्वजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. ‘संघानुकुल जीवनपद्धती’ हे संघ कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य असतं. आपलं सर्व काम संघकाम सुरळीत चालू राहील या दृष्टीने आखणे म्हणजे ‘संघानुकुल जीवनपद्धती’. विवेकानंद रुग्णालयाचा एवढा मोठा पसारा असूनही डॉ. कुकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते काम सांभाळून संघकार्य देखील तितक्याच निष्ठेने चालू ठेवले हे पुस्तक वाचताना लक्षात येते. संघाकडे बघण्याच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे इतर अनेक ठिकाणप्रमाणेच लातूरलाही या डॉक्टर मंडळींना अडचणींचा सामना करावा लागला. परंतु रुग्णसेवा हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे याचे कधीही न सुटणारे भान आणि ‘शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है’ ही संघाची शिकवण यामुळे काँग्रेससारख्या वैचारिक विरोधकांचा विश्वास मिळवण्यातही हे रुग्णालय यशस्वी ठरले. शिवराज पाटलांसारखा काँग्रेसचा मोठा नेते प्रथमपासूनच रुग्णालयाशी जोडले गेले आणि हितचिंतक बनले. वाढत गेलेल्या संघकार्याच्या जाळ्याचा उपयोग पुढे किल्लारी भूकंपाच्या वेळी झाला.


अन्य कामांमध्येही पुढाकार

हे सर्व करत असताना पसारा वाढत असताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होतील याची प्रथम व्यवस्था करून स्वतः कमी पगार घेण्याचा पायंडाही संचालक मंडळाने पाडला यामुळे रुग्णालयातील कर्मचारी सदैव सहकार्य करत राहिले. कर्मचाऱ्यांच्या  वसाहतींचे कामही पूर्णत्वास नेऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य येईल याची सोय केली.भविष्यात कामगार युनियन निर्माण झाल्यानंतर जेव्हा काही कसोटीचे प्रसंग आले तेव्हाही डॉ. कुकडेंनी कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाने घेतलेल्या काळजीची जाणीव करून दिल्यावर कर्मचाऱ्यांना आपली चूक कळली आणि कटुता टळली.

रुग्णालयातर्फे लातूरपासून दूर असणाऱ्या गावांमध्ये नियमितपणे आरोग्य शिबिरं सुरू केली. रक्तपेढी, ब्लड ट्रान्स्फ्युजन अशा अतिशय महत्वाच्या परंतु लातूरला तेव्हा उपलब्ध नसणाऱ्या सोयी उपलब्ध करून दिल्या गेल्या. अशा कामांमधून रुग्णालयाच्या कामाचा परीघ विस्तारत राहिला.

उत्तम नियोजन व व्यवस्थापन

विवेकानंद रुग्णालयाच्या कारकिर्दीतल्या दोन सर्वात महत्वाच्या कामगिऱ्या या आपल्या रुग्णालयाची नियमित पठडी सोडून केलेल्या होत्या. त्यातली पहिली म्हणजे १९७२ च्या भीषण दुष्काळात रुग्णांवर अतिशय नगण्य किमतीत उपचार केले. लातूरला आयटीआय मध्ये शिकणाऱ्या शंभर मुलांच्या रोजच्या दोन वेळच्या भोजनाची सोय करून त्यांचे शिक्षण विनाअडथळा पूर्ण होईल याची काळजी घेतली.

रुग्णालयातर्फे अतिशय महत्त्वाचं आणि देशभरातूनच नव्हे तर जगभरातून वाखाणलं गेलेलं कार्य म्हणजे १९९२च्या किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी केलेलं सेवाकार्य. लातूर शहरात झालेल्या भूकंपावरून किल्लारीला अधिक मोठ्या प्रमाणात भूकंप झाला असणार असा कयास बांधून प्रशासन अथवा अन्य कोणाहीकडून कुठलीही सूचना आलेली नसताना स्वयंप्रेरणेने आणि संघाच्या शिस्तीने प्रत्यक्ष भूकंपस्थानी प्रशासनाच्या अगोदरच विवेकानंद रुग्णालयाची मदत पोहोचली. युद्ध पातळीवर शस्त्रक्रिया आणि अन्य उपचार केले गेले. विवेकानंद रुग्णालयाने स्वतःला उपचारांपुरते मर्यादित न ठेवता उद्धवस्त झालेल्या रेबेचिंचोली गावाचे पुनर्वसन, अनाथ झालेल्या मुलांसाठी आधी शेड आणि त्यानंतर कायमस्वरूपी खोल्यांमधून शिक्षणाची व्यवस्था करणे, मानसिक आघात झालेल्या रुग्णांचा मन:स्थितीचा अभ्यास व त्यांना उभारी देणे अशा अनेक प्रकारचं कार्य केलं.

पुस्तक वाचताना जाणवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास पन्नास वर्षं एवढं व्यापक  काम करत असताना कुकडे, अलूरकर, भराडिया या संस्थापकांनी दाखवलेला कमालीचा समजूतदारपणा. एकत्र काम करताना भांड्याला भांडं लागणारच, परंतु मतभेदाचं रूपांतर मनभेदांमध्ये न होऊ देता आपल्यासमोरचं उद्दिष्ट काय आहे याची सतत जाणीव जागी ठेवल्यास कार्यसिद्धी किती प्रभावीपणे होऊ शकते हेच यातून दिसून येतं. एक डॉक्टर म्हणून, संघाचा कार्यकर्ता म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून काय काय योगदान देऊ शकतो याचा विचार रुग्णालयाशी संबंधित सर्वजण सतत करत  असल्याचं जाणवत राहतं.


सेवाकार्याचे दस्तावेजीकरण
 

संघविचारातून देशभरामध्ये एक लाखांहून अधिक सेवाकार्ये चालत असताना त्यात काम करणाऱ्या निरलस कार्यकर्त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यता न केल्यामुळे उर्वरित खूप मोठ्या समाजाला अशा सेवाकार्यांची माहिती झालेली नाही. खरंतर असं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक असतं. प्रस्तुत पुस्तकामधून अशाच एका प्रेरणादायी सेवाप्रकल्पाची तपशिलाने नोंद केल्याबद्दल डॉक्टर अशोक कुकडे यांचे आभार मानायला हवेत. रुग्णालयाकडून घडलेल्या पुनर्वसन व बचावकार्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या एका विद्यार्थिनीला प्रोत्साहन दिलं गेलं आणि तिच्याकडून त्यासंदर्भात प्रबंध सादर केला गेला. यामुळे या कामाचं उत्तम दस्तावेजीकरण झालं. विवेकानंद रुग्णालयाचा एक रोल मॉडेल म्हणून अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल इतकी क्षमता या पुस्तकामध्ये आहे. डॉक्टर अभय बंग यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेमधून आरोग्यसेवेच्या स्थितीबद्दल मांडलेले विचार मननीय आहेत.
 

पुस्तकात रुग्णालयाच्या जडणघडणीबद्दल जे तपशील मांडले गेले आहेत त्याहून अधिक कार्य डॉ. अशोक कुकडे यांनी त्यानंतरच्या काळात केले आहे. २०१६ सालच्या दुष्काळात जनकल्याण समितीच्या माध्यमातून त्यांनी लातूर भागामध्ये केलेलं जलसंधारणाचं काम खूप मोठं आहे. त्यामुळे वर्षानुवर्षं लातूरला भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावर तोडगा निघायला मदत झाली. या कार्याची माहिती प्रस्तुत पुस्तकाच्या पुढच्या आवृतीमध्ये समाविष्ट व्हायला हवी अथवा त्यावर एक वेगळं पुस्तक यायला हवं अशी सूचना या निमित्ताने करावीशी वाटते.

कुठलाही वृथा अभिनिवेश नसलेले, सर्व सहकाऱ्यांचे योगदान अतिशय खुल्या मनाने मांडणारे हाडाच्या कार्यकर्त्याचे हे आत्मकथन समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात यावरचा विश्वास दृढ करणारे आहे.


लेखक : डॉक्टर अशोक कुकडे
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पृष्ठसंख्या : २३१
आवृत्ती : चौथी (२८ फेब्रुवारी २०१६)
किंमत : तीनशे रुपये.

(https://www.mahamtb.com/ वर पूर्वप्रकाशित )