Total Pageviews

Tuesday, April 14, 2020

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एक विशाल संघटन (समग्र दर्शन)



समूहआणि संघटनहे दोन्ही शब्द संख्यात्मक अनेकत्व दर्शवत असले तरी, त्या दोन्हींच्या अर्थामध्ये मूलभूत फरक आहे. सर्वांच्या एकत्र येण्यामागे काही सामायिक उद्देश असला तरी, प्रत्येक समूहाला संघटनम्हणता येत नाही. बसथांब्यावर उभे असलेले लोक किंवा एखादा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात आलेले लोक यांचा उद्देश एकच असला तरी, तो समूहम्हणजे संघटननसते. मग दोन्हीमध्ये नेमका फरक कोणता ? ‘एकजूटहा घटक समूह आणि संघटन यांच्यामधील सीमारेषा आखतो. जेव्हा कुठलाही समूह आपले अनेकत्व विसरून आपल्यातली एकजूट प्रकट करून एखादे निश्चित ध्येय गाठायला निघतो तेव्हा जे बनते त्याला संघटन' असे म्हटले जाते. एखाद्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दाखवलेली एकजूटहेही संघटनाचेच उदाहरण. अशी अनेक संघटनंआपल्याला नित्यनेमाने दिसत असतात. पण अशा संघटनांच्या भाऊगर्दीत काहीसंघटनं मात्र अगदी उठून दिसतात. कारण, त्यात समाविष्ट असलेल्या लोकांचा उद्देश वैयक्तिक प्राप्ती हा नसतो. व्यापक हितासाठी एकत्र येऊन ते समाजासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करत असतात. परस्पर स्नेहभावहा गुण त्यांना एकमेकांशी बांधून ठेवत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघहे एक असेच संघटन. तब्बल ९३ वर्षं कुठलीही उभी फूट न पडता केवळ टिकलेलेच नाही तर सतत वर्धिष्णू असणारे हे संघटन व्यवस्थापनशास्त्र आणि संघटनशास्त्र यांच्या अभ्यासकांनी आवर्जून अभ्यासावे असे आहे. टीकाकारांनी संघावर टीका करणारी इतकी पुस्तकं लिहिली, पण त्यातल्या कुणी हे संघटन सतत का वाढत राहिले हे जाणून घेण्यासाठी संघाच्या कार्यपद्धतीचा सर्वंकष अभ्यास केला का, हा प्रश्नच आहे. अशा पार्श्वभूमीवर संघाच्या कार्यपद्धतीबद्दल विस्ताराने ऊहापोह करणारे रामकृष्ण पटवर्धन लिखित नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचे नाव आहे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - एक विशाल संघटन (समग्र दर्शन).
 
संघटन स्थापनेमागील विचार प्रभाव,’ ‘संघटनेचे ध्येय आणि वाटचाल,’ ‘संघटनेची निर्मिती,’ ‘संघस्वयंसेवक,’ ‘संघप्रचारक,’ ‘व्यवस्थापन कार्यपद्धती आणि विस्तार,’ ‘संघाच्या उपलब्धीआणि हिंदू स्वयंसेवक संघया प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलेले असून प्रत्येक प्रकरणात त्या त्या अनुषंगाने सविस्तर विवेचन केले गेले आहे.
 
संघस्थापना आणि संघवृद्धी
 
संघ टिकून राहण्यामागचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर संघाचे स्वरूप जाणून घेणे आवश्यक ठरते आणि संघाचे स्वरूप जाणून घ्यायचे असेल, तर संघाच्या स्थापनेमागचा विचार आणि तत्कालीन पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करण्याआधी वैचारिक तसेच कार्यशैलीतील भिन्नता असणाऱ्या अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता. यात सत्याग्रहापासून ते भूमिगत क्रांतिकार्यापर्यंतचे विविध मार्ग समाविष्ट आहेत. या गोष्टी जाणून घेतल्या तर डॉक्टर संघस्थापनेच्या निर्णयापर्यंत का पोहोचले हे जाणून घेणे सोपे जाते. त्या दृष्टीने पुस्तकातले संघटनस्थापनेमागील विचार प्रभाव' हे प्रकरण महत्त्वाचे आहे.
 
पुढच्या प्रकरणांमध्ये संघाच्या वाटचालीबरोबरच संघाची कार्यपद्धती उलगडून सांगितली आहे. दैनंदिन शाखा व तिथे होणारे कार्यक्रम, अखिल भारतीयस्तरापासून ते शाखास्तरापर्यंत नियमितपणे होणाऱ्या बैठका, बैठकांच्या माध्यमातून होणारे सूक्ष्मातिसूक्ष्म नियोजन, संघटन श्रेणी आणि जाग्रण श्रेणी यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्यांमुळे कामाला कशी गती मिळते या गोष्टींचे यात विवेचन आहे. संघाची सेवाकार्ये, धर्मांतर रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे संघाच्या व्याप्तीची कल्पना देतात. परस्परांमध्ये असलेला विशुद्ध स्नेहभावसंघटन मजबूत करण्यात आणि चिरस्थायी होण्यात कसा महत्त्वाचा ठरतो हेही आवर्जून सांगितले आहे. कारण, तेच तर संघाच्या वाढीचे रहस्य आहे.
 
संघस्वयंसेवकआणि संघप्रचारकया दोहोंच्या खांद्यावरच संघाचा सगळा डोलारा उभा आहे. त्यामुळे या दोन्हींच्या वैशिष्ट्यांना विस्ताराने हात घालणारी स्वतंत्र प्रकरणे या पुस्तकात समाविष्ट केली गेली आहेत. संघप्रचारक' या प्रकरणात संघाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय कष्टात दिवस कंठून, विरोध पत्करून संघटनेचे रोपटे रुजवणाऱ्या प्रमुख प्रचारकांची ओळख करून दिली आहे. वेश, भाषा, अन्न, वातावरण या सर्वच बाबतीत अपरिचित असणाऱ्या प्रदेशात जाणाऱ्या आणि कुठल्याही आर्थिक मोबदल्याशिवाय राहून संघकार्य वाढवत नेण्यासाठी केलेले भीमप्रयत्न पाहून अचंबित व्हायला होते. संघाचा चिवटपणा हा अशा प्रचारकांच्या निष्ठेपणातून आलेला आहे हे संघाच्या यातून ध्यानात येतं.
 
संघाची व्यापकता
 
संघ नक्की करतो कायअसे कुतूहल असणाऱ्यांनी आणि इतकी वर्षं तुमच्या संघाने काय केलंअसे कुत्सितपणे विचारणाऱ्या संघविरोधकांनी पुस्तकातलं संघाच्या उपलब्धीहे प्रकरण अवश्य वाचावे. राष्ट्रजीवनाच्या कोणकोणत्या अंगावर संघाचा प्रभाव पडला आहे, संघविचाराने चालणाऱ्या संघटना कोणत्या, त्यांचं कार्य खोलवर पोहोचवण्यासाठी कोणते कार्यक्रम हाती घेतले जातात याचं या प्रकरणात विवेचन केलेलं आहे. संघाची देशभरच्या विविध प्रांतांमधली व्यापक शिबिरं कोणती याची नोंद करतानाच उपस्थितांची संख्या किती याबद्दल पुस्तकात आलेख आणि तक्तेदेखील दिले आहेत. ते वाचून संघाचा विस्तार किती आहे आणि व अधिकाधिक कसा वाढत जातो आहे हे लक्षात येते. संघाच्या वाढीमध्ये त्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे आणि याद्वारे काय साध्य झाले हेही मांडले आहे.
 
उदा :
एका घोष शिबिरासाठी संघाच्या घोष पथकाव्यततिरिक्त अन्य बँडवाल्यांनाही बोलावले गेले होते. त्यांच्याशी संपर्क आल्याने त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा अभ्यास झाला. गुजरातमध्ये एका शिबिराच्या निमित्ताने एकत्रीकरण करत असताना वनवासी भागामध्ये डोके वर काढत असलेल्या फुटीरतावादी शक्तींची जाणीव झाली. एकदा समस्येचं स्वरूप लक्षात आलं की, त्यावर संघाच्या माध्यमातून उपाययोजनाही केली जातेच. त्यामुळेच आज देशभरात दीड लाखांहून अधिक सेवाकार्ये संघविचारांच्या माध्यमातून चालू आहेत.
 
अमूक एका प्रश्नावर संघाची भूमिका काय' याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण केला जातो. संघाच्या कार्यकारिणीची दरवर्षी प्रदीर्घ बैठक होत असते. त्यामध्ये देशापुढच्या, समाजापुढच्या समस्यांचा सखोल ऊहापोह होऊन त्यावर संघाची भूमिका स्पष्ट करणारा ठराव कार्यकारिणी मंजूर करते आणि ती संघाची अधिकृत भूमिका असते. कार्यकारिणीत मंजूर झालेल्या अशा अनेक कालसुसंगत ठरावांचा या पुस्तकात आवर्जून केलेला समावेश हा या पुस्तकाचे मूल्यवर्धन करतो. आसाम दंगल, बांगलादेशातील हत्याकांड, चीनसंबंधी अपेक्षित असलेले धोरण, भ्रष्टाचारावर अंकुश अशा वैविध्यपूर्ण विषयांवरचे ठराव संघाने पारित केले आहेत हे या निमित्ताने वाचकांना कळते.
 
पुस्तकाच्या जमेच्या बाजूबद्दल लिहितानाच पुस्तकात सुधारणेची गरज असणारी गोष्टही सांगायला हवी. संघाबद्दल विस्ताराने ऊहापोह करण्याच्या ओघात यातली वाक्यरचना सुटसुटीत राहिली नाही. त्यामुळे काही ठिकाणी वाक्यरचनेच्या चुका झाल्या आहेत. पुढच्या आवृत्तीआधी या पुस्तकाचे या अनुषंगाने पुनरावलोकन व्हावे.
 
नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे संघाबद्दलचे समाजातले कुतूहल अधिक वाढले आहे. एकूणच संघाचे विविध अंगांनी दर्शन घडवणारे, संघ टिकून राहण्याचे रहस्य उलगडून दाखवणारे, संघाच्या कार्यपद्धतीचे पदर उलगडवून दाखवणारे हे पुस्तक संघाविषयी कुतूहल असणाऱ्यांनी अवश्य वाचावेच, पण संघटन पातळीवर अनेक वर्षे कच्चेच राहिलेल्या किंवा काळाच्या ओघात संघटनाची ताकद खिळखिळी झालेल्या आणि सदैव संघावर टीका करण्यात धन्यता मानणाऱ्या संघविरोधकांनीही अवश्य वाचावे असे आहे. न जाणो त्यांना या अभ्यासातून काही महत्वाची सूत्रं मिळतील आणि उभारीही मिळेल!
 
पुस्तक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - एक विशाल संघटन (समग्र दर्शन)
लेखक : रामकृष्ण पटवर्धन
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पृष्ठसंख्या : ३९०
आवृत्ती : पहिली (९ एप्रिल २०१९)
किंमत : ४५० रु

No comments:

Post a Comment