हुकूमशाहीचं सावट किती भयकारी असतं हे लोकांसमोर मांडण्याचे अनेक मार्ग आहेत. पण ती दहशत विनोदी अंगाने दाखवण्याची कल्पना मात्र अभिनव म्हणावी लागेल. सोव्हियत युनियनचा हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन याचा मृत्यू आणि त्याच्या अल्याड-पल्याड घडणारी धावपळ, कुरघोडी, कटकारस्थानं यांच्यावर विनोदाच्या माध्यमातून चुरचुरीत भाष्य करणारा चित्रपट 'द डेथ ऑफ स्टॅलिन' त्यामुळेच लक्षवेधी ठरतो. वेगळं काही पाहू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक बौद्धिक मेजवानी आहे.
चित्रपटाची सुरुवात होते एका रात्रीच्या संगीत मैफलीने. एका प्रेक्षागृहात चालू असणाऱ्या मैफलीचे थेट प्रक्षेपण रशियन रेडिओवरून चालू असते जे स्टॅलिन ऐकतो आणि प्रेक्षागृहातून थेट प्रक्षेपण करणाऱ्या रेडिओ तंत्रज्ञाला फोनवरून आदेश देतो “मला याचं ध्वनिमुद्रण हवं आहे.” तंत्रज्ञ स्टॅलिन पर्यंत पोचवण्यासाठी ध्वनिमुद्रिका तयार करतो आणि ती घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याच्या हातात ती ठेवत असतानाच संगीत मैफलीतली पियानोवादक मारिया त्या ध्वनिमुद्रिकेच्या पाकिटात एक चिठ्ठी ठेवते. त्या
चिठ्ठीमध्ये
तिने निर्भीडपणे स्टॅलिनला दूषणं दिलेली असतात. जेव्हा आपल्याकडे पोचलेली ध्वनिमुद्रिका ऐकण्यासाठी स्टॅलिन पाकीट उघडतो त्यात त्याला चिठ्ठी मिळते आणि ती वाचत असतानाच त्याला अटॅक येतो. सकाळी स्टॅलिन निपचित पडल्याचं लक्षात येतं आणि पाठोपाठ सुरु होते एकच धावपळ. गृहमंत्री बेरिया, उपाध्यक्ष मेलेंकोव्ह, सरचिटणीस क्रुश्चेव्ह तिथे एकापाठोपाठ पोचत जातात आणि सुरु होतो सत्तेचा खेळ. कालांतराने परराष्ट्रमंत्री मोलोटोव्ह, सैन्यप्रमुख झुकॉव्ह हेही या खेळात सामील होतात आणि गुंतागुंत अधिकच वाढते. स्टॅलिनच्या मृत्यूने निर्माण झालेला गोंधळ, त्यातूनच निर्माण झालेली संधी, स्टॅलिनच्या कारकीर्दीत घडलेल्या घटनांचे हिशोब चुकते करणे, ठार मारल्या जाणाऱ्या लोकांच्या यादीत सोयीने होणारे बदल, दीर्घकाळ
कम्युनिस्ट
हुकूमशाहाच्या
आदेशाने दमनकारी धोरणे राबवून अनेकांचे जीव घेऊन आपल्या खुर्च्या अबाधित राखणाऱ्या नेतेमंडळींनी स्टॅलिनच्या मृत्त्यूनंतर अचानक आपण उदारमतवादी, दयाळू आहोत हे दाखवायची धडपड करणे अशा
गोष्टींमुळे
परिस्थिती नवी नवी वळणं घेत जाते आणि एका मोठ्या घडामोडीने चित्रपटाचा शेवट होतो.
हे कथानक थोडक्यात वाचलं तर यात विनोदाला जागा कुठे आहे हा प्रश्न पडेल. पण प्रत्यक्षात संगीत मैफलीच्या पहिल्या दृश्यापासून हास्याची कारंजी उसळत राहतात. मैफलीचे फक्त थेट प्रक्षेपण केलेले असते पण ध्वनिमुद्रण केलेलेच नसते. मग स्टॅलिनला ध्वनिमुद्रिका पाठवणार कशी? मैफल संपवून अर्धे प्रेक्षक बाहेर पडलेले असतात. कलाकारांची आवराआवर सुरु असते. त्यामुळे मग लाईव्ह मैफलीचा माहोल निर्माण व्हावा म्हणून सर्व कलाकारांना पुन्हा गोळा केलं जातं, मूळ मैफलीचा म्युजिक कंडक्टर स्टॅलिनच्या भीतीने मूर्च्छित होऊन पडल्याने एका म्युजिक कंडक्टरला त्याच्या घरून उचलून आणलं जातं. रस्त्यावरून जाणाऱ्या कुणालाही आणून प्रेक्षक म्हणून बसवलं जातं आणि 'लाईव्ह' ध्वनिमुद्रण सुरु होतं. कॅमेरा प्रेक्षकांवरून फिरतो
तेव्हा प्रेक्षकांच्या एकेक तऱ्हा, म्युजिक कंडक्टरचं नाईट गाऊनमध्येच म्युजिक कंडक्ट करणं पाहताना हसू आवरत नाही. पहिल्या दृश्यात चित्रपटाने घेतलेली पकड शेवटपर्यंत ढिली होत नाही.
चित्रपटाने पकड घेण्याचं कारण म्हणजे चित्रपटाचा वेग आणि खुसखुशीत हाताळणी. कम्युनिस्ट राजवटीत असलेला व्यक्तिस्वातंत्र्याचा अभाव, प्रत्येकावर सतत पाळत असणं, क्षुल्लक चुकांसाठी होणाऱ्या कठोर शिक्षा, राज्यद्रोही ठरवले जाऊ नये म्हणून
नेत्यांनी
सतत एकनिष्ठत्वाची ग्वाही देण्याची धडपड करणे, संधी मिळताच उफाळून आलेला त्यांचा स्वार्थ अशा अनेक गोष्टींमधून लेखक डेव्हिड स्नायडर - इयान मार्टिन आणि दिग्दर्शक अरमांडो इयानुची (Armando Ianucci) यांनी विनोदाच्या जागा खुबीने हेरल्या आहेत. चुरचुरीत संवादांमुळे चित्रपटातले प्रसंग अधिकच लक्षात राहणारे झाले आहेत. निपचित पडलेला स्टॅलिन नक्की मेला आहे की नाही हे कळेपर्यंतची सर्व नेत्यांची धांदल म्हणजे गुंतागुंतीची परिस्थिती विनोदाचा आधार घेऊनही किती खुबीने दाखवून देता येते याचा उत्तम नमुना आहे. स्टॅलिनबद्दल बोलताना प्रत्येकाने समोरच्याला जोखत घेत केलेलं मतप्रदर्शन, समोरच्याला संशय आला तर सारवासारव करून स्टॅलिनचे गुणगान करणे आणि समोरचा आपल्याला अनुकूल आहे असं वाटलं तर येऊ घातलेल्या काळाबद्दल आणि नव्या धोरणांबद्दल थोडं ठामपणे बोलणे
अशी तारेवरची कसरत बघताना खरंच त्या काळी काय घडलं असेल असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर होणाऱ्या महत्वाच्या बैठकीत 'एकमताने' घेतलेले निर्णय, स्टॅलिनच्या अंत्यविधीसारख्या महत्वाच्या प्रसंगीही सोव्हिएत नेत्यांचे एकमेकांवर असलेले संशय आणि शिजणारे
कटकारस्थान असे अनेक प्रसंग धमाल असले तरी त्यातून साम्यवादी हुकूमशाही राज्यातली कार्यपद्धती सतत अधोरेखित होते. चित्रपटातल्या अनेक प्रसंगांमध्ये कॅमेऱ्यासमोर अथवा फ्रेमच्या कोपऱ्यामध्ये कुणाची ना कुणाची धरपकड दिसते, गोळीबार दिसतो, मृत्यू दिसतो... या सर्वांत एकप्रकरचा कोरडेपणा, निर्विकारपणा आहे. कम्युनिस्ट हुकूमशाहीतला हा नित्यक्रम आपसूक डोक्यात फिट्ट बसतो.
प्रसंगनिष्ठ विनोद, उपहास यांचा आधार घेत घेत हा चित्रपट शेवटाकडे जाताना मात्र अधिक थेट आणि धारदार होत जातो. विनोद आटतो आणि उरतो व्यवहार.. थंड आणि क्रूर... ! शेवटच्या प्रसंगात स्टॅलिनच्या हतबल मुलीशी - स्वेतलानाशी - बोलताना क्रुश्चेव्ह म्हणतो "This is how people get killed when their stories don't
fit."
संपूर्ण चित्रपटाचं - किंबहुना एकूणच हुकूमशाहीचं - सार या एका ओळीत सामावलं आहे!
(चित्रपट अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे)
(चित्रपट अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे)
आवडलं. मी ही लिहीणार आहे पण तुम्ही इतकं छान लिहील्याने मी काय भर टाकणार असा प्रश्न आहे पण साम्यवाद हा अभ्यासाचा विषय असल्याने प्रयत्न करतो.
ReplyDelete