भारतासारख्या खंडप्राय देशाचा कारभार चालवणं खूप कष्टाचं आणि कौशल्याचं काम आहे. अठरापगड जाती, धर्म, भाषा, प्रांत आणि त्या त्या प्रदेशाचे सांस्कृतिक कंगोरे यांच्यासोबत व्यवस्था, नियम, कायदे यांची सांगड घालूनच आपल्या देशाचा गाडा हाकावा लागतो. भारताला प्रशासकीय पातळीवर जोडून ठेवणाऱ्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांमध्ये चट्कन लक्षात येणार नाही असा परंतु प्रत्यक्षात महत्वाचा वाटा असणारी गोष्ट म्हणजे भारतीय रेल्वे. इंग्रजांनी आपल्या कारभाराच्या सोयीसाठी उभे करत गेलेली ही यंत्रणा बघता बघता देशव्यापी झाली आणि भारताच्या प्रगतीची साक्षीदार आणि भागीदार दोन्हीही बनली. या सेवेने देशाची सुदूर टोकं एकत्र आणली. ते घडत असताना इथला समाज, इथल्या व्यवस्था ढवळून निघत गेल्या . सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक ताण्याबाण्यांनी बनलेली भारतीय रेल्वेची कहाणी अतिशय चित्तवेधक आहे आणि ‘ख्रिश्चन वूल्मर’लिखित ‘रेल्वेज अंड द राज’ या पुस्तकातून ती विलक्षण तपशिलांसह मांडली गेली आहे.
इंग्रजांसाठी अत्यावश्यक सोय
१६०० साली ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने भारतात पाऊल ठेवलेल्या इंग्रजांनी धूर्तपणे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली मुळं रोवत भारताला इंग्रजांची वसाहत बनवलं. १८५७ साली अनपेक्षितपणे इंग्रजांविरोधात उभा राहिलेला स्वातंत्र्यलढा त्यांनी निकराने मोडून काढला असला तरी या घटनेचे इंग्रज अतिशय सावध झाले. यापुढे आपल्याला भारतावर राज्य करायचं असेल तर अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्याच बरोबर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने भारताची पकड अधिक तीव्रतेने आणि वेगाने मजबूत करायला हवी याची त्यांना जाणीव झाली. भारताचा ताबा कंपनीकडून अधिकृतपणे ब्रिटीश सरकारकडे गेला. पुन्हा बंडाची परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी अतिशय वेगाने सैन्य पाठवण्यासाठी दळणवळणाच्या वेगवान सोयींची आवश्यकता होती. त्याचसोबत भारतातल्या अंतर्गत भागांमधला कच्चा बंदरांपर्यंत पोचवणे इंग्रजांच्या व्यापाराच्या आक्रमक वाढीसाठीही आवश्यक होते. या दोन्ही उद्देशांची पूर्तता करण्याचं अतिशय प्रभावी माध्यम होतं ते म्हणजे रेल्वे!
भारतात रेल्वेची झपाट्याने वाढ होण्याचं श्रेय जातं लॉर्ड डलहौसीला. त्याने अतिशय निग्रहपूर्वक आणि दूरदृष्टीने रेल्वे उभारणी आणि विस्ताराचं काम लावून धरलं. भारतात रेल्वे सुरू होण्यापूर्वी वीस वर्ष अगोदरच इंग्लंड मध्ये रेल्वे सेवेला प्रारंभ झाला होता. त्यामुळे या क्षेत्रात अनुभव असलेल्या रेल्वे कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी इंग्रज प्रस्ताव ठेवू लागले. त्यांच्या आवाहनामुळे विविध खासगी रेल्वे कंपन्या भारतामध्ये व्यवसाय करण्यास सज्ज होऊ लागल्या. ज्या काळात इंग्लंडमध्ये गुंतवणुकीवरचा व्याजदर ३.५ टक्के होता त्या काळी या इंग्रज सरकारने रेल्वे कंपन्यांना ५% परताव्याची हमी दिल्याने या प्रकल्पांमध्ये गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर झाली आणि धुमधडाक्यात रेल्वेमार्ग उभारणी सुरू झाली. रेल्वे ही भारतीयांसाठी प्रचंड अप्रूपाची गोष्ट होती बोरीबंदर स्टेशन वरून ठाण्याकडे धावलेली पहिली रेल्वे म्हणजे भारतात या तांत्रिक प्रगतीचा एक विलक्षण टप्पा होती स्वतःच्या कारभारासाठी रेल्वे बांधणारे इंग्रज इथल्या जनतेकडून या गोष्टीला कितपत पाठिंबा मिळेल याबाबत साशंक होते परंतु इंग्रजांची ही भीती एतद्देशीय बघता बघता मोडून काढली आणि फक्त टांगे, बैलगाड्या यांचीच सवय असणाऱ्या भारतीयांनी या वेगवान वाहतुकीला तिच्या गुणदोषांसहित आपलेसे केले आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे हुरूप येऊन इंग्रजांनी रेल्वेमार्गांचे वायव्य सरहद्दीपासून ते ईशान्य भारतापर्यंत आणि दिल्लीपासून ते मद्रासपर्यंत जाळं विस्तारत नेलं. हळूहळू या मार्गांना इतकं महत्व आलं की जणू हे रेल्वेमार्ग आपल्या देशाच्या धमन्याच बनले.
अडथळ्यांवर मात
भारतासारख्या प्रचंड भौगोलिक वैविध्य असणाऱ्या देशांमध्ये रेल्वे लाईन टाकण्यासाठी भरपूर अभ्यास आणि तांत्रिक अचूकतेची आवश्यकता होती. मोठमोठ्या नद्या, डोंगराळ प्रदेश, खडकाळ प्रदेश, बदलत जाणारं तापमान या सर्व अडचणींमधून मधून मार्ग काढणं जिकिरीचं होतं. गंगेसारख्या प्रचंड जलस्त्रोतावरून पूल बांधणे, बोर घाटासारख्या कठीण घाटातलम जंगल साफ करणे आणि बोगदे खणणे अशी आव्हानं इंग्लंडमधून खास बोलवल्या गेलेल्या इंजिनिअर्सनी स्वीकारली. या कामासाठी इंग्रजांनी केलेली तयारी थक्क करणारी आहे. इंग्रज आणि भारतीयांदरम्यान प्रचंड भाषिक, सांस्कृतिक दरी असतानाही इथल्या कामगार आणि कारागीरांकडून कामं करून घेण्यासाठी त्यांनी कुठलं कसब वापरलं असेल हे अभ्यासलं जायला हवं.
रेल्वेचे सामाजिक परिणाम
रेल्वेमुळे झालेले अनेक पदरी सामाजिक परिणाम लेखक वूल्मर यांनी तपशिलाने आपल्यासमोर मांडले आहेत आणि हाच या पुस्तकातला सर्वात लक्षवेधी भाग आहे. रेल्वेने जसं स्थानिक कच्चा माल बाहेरच्या बाजारपेठांमध्ये नेणं शक्य केलं तसंच कुठलाही माल कुठेही मिळू लागल्यामुळे त्या त्या गावच्या आर्थिक स्वावलंबीत्वाला सुरुंगही लागला. रेल्वेमुळे तीर्थाटन सोपं झालं. आता जीवावर उदार होऊन जंगल आणि काट्याकुट्यांमधून प्रवास करायची गरज उरली नाही. शिवाय प्रमुख सणवारांशिवाय देखील तीर्थयात्रा घडू लागल्या आणि त्या त्या तीर्थक्षेत्रीचं स्वतंत्र अर्थकारण आकाराला येऊ लागलं जे अगदी आजपर्यंत चालू आहे.
जसजशी रेल्वे भारतातल्या अंतर्गत भागांमध्ये येऊ लागली तसतशी इंग्रजांची पकड घट्ट झाली आणि स्थानिकांना ‘इंग्रज आपल्या धर्मात ढवळाढवळ करून त्यांचा धर्म आपल्यावर लादतील अशी भीती वाटू लागली. शिवाय एकाच गाडीच्या एकाच डब्यातून परजातीच्या माणसांसोबत प्रवास करण्यामुळे आपली जात भ्रष्ट होत असल्याची भावनाही होऊ लागली.. रेल्वेच्या डब्यात जातीय उच्च्चनीतेनुसार वेगळी व्यवस्था करणे त्यात पुन्हा स्त्रियांच्यासाठी वेगळी व्यवस्था करणे अशा अनेक अवास्तव अपेक्षा प्रवाश्यांकडून असत ज्या पुरवताना रेल्वे कंपन्यांची मोठी पंचाईत होई… सामाजिक जीवनातल्या जुन्यापुरण्या धारणा, धार्मिक समजुती आणि जातीय संकल्पना या सर्वांना घुसळून काढणारा हा एक विलक्षण बदल होता आणि तो रोखणे कुणालाही शक्य नव्हतं. भारत हळूहळू पण निश्चितपणे अधिक प्रगत व्यवस्थेकडे वाटचाल करू लागला होता.
रेल्वेचा अनेक अंगांनी वेध
पुस्तकामध्ये रेल्वेच्या इतिहासाचा आढावा घेताना रेल्वे संबंधी अनेक अंगांचा बारकाईने ऊहापोह केला आहे रेल्वे वाहतुकीसाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी, मार्गांची आखणी, तांत्रिक सहाय्य, परदेशातून आयात केले गेलेले तंत्रज्ञान, त्यासाठी इंग्रज सरकारकडून केली गेलेली आर्थिक तजवीज, रेल्वेच्या आर्थिक व्यवहारा मागचं राजकारण आणि अर्थकारण, मालवाहतूक, सैन्याची वाहतूक अशा अनेक अंगांचे पैलू अगदी विस्ताराने मांडले आहेत. रेल्वेमुळे उपलब्ध होत असलेले रोजगार, कामगारांच्या युनियन्स आणि त्यांचे संप, कामाच्या स्वरूपानुसार असणारी उतरंड आणि त्यामुळे तयार झालेले वर्ग अशा अनेक अपरिचित अंगांना स्पर्श केल्यामुळे रेल्वे नावच्या अवाढव्य सेवेला वरवर लक्षातही येणार नाही किती बारीक कंगोरे आहेत हे जाणवल्यावर अचंबित व्हायला होतं.
लेखक केवळ घटना नमूद न करता त्या त्या घटनांमुळे मनुष्यजीवनावर काय बरेवाईट परिणाम झाले हे शोधत गेल्याने असल्यामुळे त्याच्या लिखाण कोरडं रहात नाही. तिसऱ्या वर्गातून प्रवास करणाऱ्या अतिशय सामान्य आणि गरीब नागरिकांच्या प्रचंड गैरसोयीबद्दल त्याने अतिशय विस्ताराने लिहिलं आहे. अगदी तिसरा वर्ग सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत असूनही तिसऱ्या वर्गाच्या डब्यात स्वच्छतागृहं, पुरेशी मोकळी जागा पुरवण्यात रेल्वे कंपन्यांनी केलेली टाळाटाळ, त्यातून प्रवाशांचे होणारे हाल आणि ग्राहक असूनही त्यांच्याकडे बघण्याचा कंपन्या आणि सरकारचा दृष्टीकोन दाखवून देऊन प्रगत, विचारी आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या इंग्रजांच्या तुच्छतावादी मानसिकतेबद्दल लेखकाने आडपडदा न ठेवता लिहिलं आहे.
मनोरंजक किश्श्यांची जोड
पुस्तकात आकडेवारी, रेल्वेचे व्यावसायिक तपशील अशी माहिती अतिशय सविस्तर असूनही त्या तांत्रिक बाबींना किश्श्यांची जोड दिल्यामुळे पुस्तक रुक्ष राहात नाही, शिवाय तात्कालिक समाजाची मानसिकता, समजुती यांवरही प्रकाश पडतो.
उदाहरणार्थ :
• पहिली रेल्वे धावण्यापूर्वी grant trunk road या रस्त्यावरून वाफेचं रेल्वे इंजिन चालवण्याचा अयशस्वी प्रयोग करून पाहिला गेला होता.
• इंग्रजांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून उन्हाळ्यात ते सगळा कारभार हिल स्टेशनला हलवत असत आणि त्यांची व बायकामुलांची सोय व्हावी म्हणून सिमला, उटी, दार्जीलिंग या ठिकाणच्या toy trains चालू केल्या गेल्या
• बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान पहिली रेल्वे धावली त्या वेळी ‘रेल्वे म्हणजे लोखंडी राक्षस आहे’, ‘रूळ टाकण्यास सुरुवात करण्यापूर्वी काही बालकांचा बळी देऊन ती त्या मार्गावर पुरावी लागतात’, ‘रेल्वेमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चटकन गेल्यामुळे आपला एकूणच आयुष्याचा विस्तार कमी होतो’ अशा समजुती स्थानिक समाजमनात रुजल्या होत्या इ.
नाण्याच्या दोन्ही बाजूंची चर्चा
रेल्वेच्या या सखोल इतिहासाची चर्चा करताना इंग्रजी मानसिकतेच्या गुण दोषांची अतिशय तटस्थ वृत्तीने मांडणी केली आहे. रेल्वे म्हणजे इंग्रजांसाठी एक दुधारी शस्त्र होतं असंही प्रतिपादन लेखक करतो. कारण एकाच वेळी इंग्रज आणि क्रांतिकारक व राष्ट्रवादी या दोन्ही टोकांना रेल्वे उपयुक्त ठरली. त्यामुळेच एकीकडे एवढा अवाढव्य पसारा कुशलपणे हाताळून मार्गी लावणाऱ्या दऱ्याखोऱ्यातून हिल स्टेशन मधून आणि वाळवंटातून रेल्वे मार्ग बांधणाऱ्या एकीकडे कौतुक वाटतं तर त्याचबरोबर मागे असणारे त्यांचे अतिशय धूर्त, स्वार्थी आणि भारतीयांप्रती असणारे तुच्छ विचार देखील आपल्याला दिसतात. आधुनिक विचारांचे समजले गेलेल्या परंतु प्रत्यक्षात ‘स्थानिकांना जास्त जबाबदारीची कामं (उदा. इंजिन चालक) देऊ नयेत कारण त्यांची तेवढी कुवतच नाही’ अशी ठाम समजूत असणाऱ्या इंग्रजांपासूनच हा श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेदाभेद कसा केला जायचा हे लेखक परखडपणे सांगतो.
लेखक ख्रिश्चन वूल्मर हे रेल्वेचे इतिहासकार म्हणूनच प्रसिद्ध असून यापूर्वी त्यांनी इंग्लंड व अन्य ठिकाणच्या रेल्वेचा इतिहास शब्दबद्ध केलेला आहे. या पुस्तकात भारताच्या पहिल्या रेल्वेच्या आधीपासून ते कोकण रेल्वेच्या बांधकामापर्यंत अतिशय मोठा कालखंड आणि कार्यखंड लेखकाने अभ्यासला आहे. त्यासाठी त्यांनी इंग्रजांचा पत्रव्यवहार, गॅझेटियर्स, प्रवासवर्णनं असे अनेक समकालीन संदर्भ, तसेच भारतीय रेल्वेवरील अन्य लेखकांची पुस्तकं यांचा भरपूर अभ्यास केला आहे. भारताकडे पाहणाच्या सर्वसाधारण युरोपीय मनोवृत्तीपेक्षा वूल्मर यांचा भारताकडे पाहण्याचा अधिक समंजस आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन पुस्तकभर जाणवत राहतो, त्यामुळे पुस्तकाच्या प्रभावात भर पडते.
पुस्तक : Railways and the Raj
लेखक : Christian Wolmar
प्रकाशक :
पृष्ठसंख्या : ३८४
आवृत्ती : नोव्हेंबर २०१७
किंमत : ३५० रू.