Total Pageviews

Tuesday, March 2, 2021

संचार : चिं. वि. जोशी यांचे प्रवासवर्णन


चिं. वि. जोशींनी भारताच्या विविध भागांना दिलेल्या भेटींचे प्रवासवर्णन 'संचार' या पुस्तकात आहे.  आहे. साधारणपणे १९१४ ते १९४५ दरम्यान केलेले हे प्रवास आहेत. जुन्या काळातलं प्रवासवर्णन हा खूप रंजक अनुभव असावा हे गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' मधून आणि मुकुंद वझे यांच्या 'प्रवासवर्णनांचा प्रवास' वाचून लक्षात आलं होतं. त्यामुळे हे पुस्तक घेण्यामागे चिं. वि. जोशींच्या नावापेक्षाही त्यातल्या कालखंडाचं कुतूहल हे जास्त कारणीभूत होतं. पुस्तकात विजापूर, उत्तर काठेवाड, जुनागड, बंगाल, मध्य प्रदेश, साल्हेर-खान्देश, त्रावणकोर-मदुरै, मेवाड अशा प्रांतांचे प्रवासवर्णन आहे.  चिं. वि. जोशी स्वतः बडोदा संस्थानच्या चाकरीत होते. त्यांच्या कामाचे स्वरूप निश्चित कळत नसले तरी शिक्षण क्षेत्राशी संबंधित असावे. कारण पुस्तकात इंडियन हिस्टोरिकल रेकॉर्ड कमिशनच्या अधिवेशनाला बडोदा सरकारचे प्रतिनिधी या नात्याने गेल्याचे दोन-तीन लेखांमध्ये उल्लेख आहेत. शिवाय एका लेखात "आमच्या बडोदा कॉलेजच्या क्रिकेट संघासोबत जुनागडला प्रवास" केल्याचा उल्लेख उल्लेख आहे. याशिवाय पाली भाषेच्या अभ्यासात धर्मानंद कोसंबी आपल्याला गुरुस्थानी होते, असा चिं. विं. नी  कुठल्याश्या पुस्तकात उल्लेख केल्याचं स्मरतंय. असो. कामानिमित्ताने तसेच वैयक्तिक प्रवासही जमेस धरता त्या काळाच्या मानाने चिं. विं. नी पुष्कळच प्रवास केला म्हणायला हवं. 

सुरुवातीचा प्रवास  फक्त रत्नागिरी ते गणपतीपुळे असा आहे. शंभर वर्षांपूर्वी एवढ्याश्या प्रवासाला सुद्धा बरेच सायास पडत. हा प्रवास पायी केलेला होता. "गाडी रस्ता सोयीचा नसल्याने कोकणात बहुतेक प्रवास पायीच करावा लागतो" असं चिं. वि. नोंदवतात. हे अंतर सहा कोस. शंभर वर्षांपूर्वी एवढ्याश्या प्रवासाला सुद्धा बरेच सायास पडत. चिं. विं. ना प्रवासात तीन वेळा खाडी पार करावी लागली. लेखाच्या शेवटी 'श्रीक्षेत्र गणपती-पुळे माहात्म्यवर्णन' नावाच्या पुस्तकाचा उल्लेख आहे. त्यातल्या दोन प्रथा चिं. विं. नी पुस्तकात दिलेल्याही दिल्या आहेत. 

१) दर गणेशचतुर्थीला सकाळी सहा तास ब्राह्मणेतरांना गाभाऱ्यात प्रवेश करण्याची व मूर्तीस स्पर्श करण्याचीही मुभा आहे. अन्य वेळी ब्राह्मणेतरांनी सभामंडपातूनच दर्शन घ्यावे. 

२) दुसऱ्या दिवशी हत्यारांची पूजा करून बकऱ्याचा बळी दिला जातो. 

त्या काळातला ब्राह्मणांचा व्यवहार पाहता पहिल्या प्रथेबाबत आश्चर्य वाटले नाही. पण पुळ्याच्या गणपतीसमोर बळी हा प्रकार नवीन वाटला. चिं. वि. स्पष्ट शब्दांत "ही हिंसा बंद व्हायला हवी" असं नमूद करतात. ब्राह्मणेतरांना वर्षभर गाभाऱ्यात प्रवेश न देण्याबद्दलही नाराजी व्यक्त करतात. चिं. वि. मंदिरांत वगैरे जात असले तरी फार मोठे भाविक नसावेत असं या आणि अन्य लिखाणावरूनही वाटतं. पुळ्याला आणि पुढच्याही एका प्रकरणात मंदिर परिसरात रूढींच्या नावाखाली केलेला आगाऊपणा करणाऱ्याला चिं. विं. नी खपवून न घेतल्याचे उल्लेख आहेत. 

बंगालच्या प्रकरणात १९४०च्या दशकातल्या बंगाली नाटकाचं वर्णन आलं आहे. अन्य भागातल्या रंगभूमीविषयी त्या काळातल्या मराठी साहित्यात कितपत लिहून आलं असावं याची शंकाच वाटते. अन्य प्रकरणं वर्णनात्मक आहेत, त्यावर इथे वेगळं लिहावं असं काही नाही. पण पुस्तक चिं. विं. चे आहे म्हटल्यावर अपेक्षित होता तसा खुसखुशीतपणा मात्र  अभावानेच दिसल्याने त्या आघाडीवर मात्र निराशाच झाली. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत असणारं 'बडोद्यातील जलप्रलय' हे प्रकरण मात्र यातून वगळ्याचं दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने प्रकाशकाने या पुस्तकात लिहिलेल्या टिपणामुळे कळलं. असले बदल का करतात हे खरंच अनाकलनीय असतं. असा 'आँखों देखा हाल' म्हणजे किती महत्वाचा दस्तावेज असतो! तो वगळून नक्की काय साध्य केलं असेल? अर्थात दुसऱ्या आवृत्तीत दोन प्रकरणं नव्याने समाविष्टही केली गेली आहेत. त्यातलंच एक प्रकरण 'खैबरघाटाची सफर'  माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं प्रकरण वाटलं. कारण भारतापासून कायमच्या तुटलेल्या त्या भागात जायचा अनुभव असणारी मराठी माणसं आणि त्यातूनही कुणी ते अनुभव लिहून ठेवलेले असणं हे दुर्मिळच.. 

चिं. वि. १९४५ मध्ये इंडियन हिस्टोरिकल रेकॉर्ड कमिशनच्या अधिवेशनाला पेशावरला गेले होते. विशेष म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा धाकटा भाऊ राहात होता. कराचीमध्ये मराठी लोक पुष्कळ होते, इतकंच काय अगदी आत्ताही तिथे मराठी शाळा आहे असं वाचण्यात आलं होतं. पण पेशावरसारख्या वायव्येच्या भागातही मराठी माणूस राहायला होता हे वाचून नवल वाटलं. या प्रकरणात पुढे तसे अनेक उल्लेख आहेत. दिल्लीहून पेशावरला जाताना गाडीत चिं. विं. ना महामहोपाध्याय द. वा पोतदार भेटले! त्यांच्या सोबतीमुळे ज्या ज्या प्रदेशातून रेल्वे गेली त्या त्या प्रदेशाचा इतिहास चिं. विं. ना जाणून घेता आला. 
पुढे येऊ घातलेल्या अराजकाची १९४५च्या या प्रवासात चाहूल लागली असावी. कारण "आम्ही हिंदू आहोत असं मुसलमानांना कळलं तर आमची अब्रू धोक्यात येईल, म्हणून आम्ही कुंकू लावत नाही" असं म्हणणाऱ्या बायकाही भेटल्या. यापुढच्या नोंदी वाचताना आज रोचक वाटतात, कारण आज त्यावर विश्वास बसणंही अशक्य व्हावी अशी परिस्थिती आहे. ते वाचताना आपल्या हिंदू मनाला सुया बोचतात. या प्रवासात चिं. विं. नी एका टेकाडावरच्या गोरखत्री नावाच्या स्थानबद्दल लिहिले आहे. हे गोरखनाथांचे स्थान, परंतु हे नाथ संप्रदायातील सुप्रसिद्ध गोरखनाथ नव्हेत, हे त्याच नावाचे दुसरे. याचं वैशिष्टय असं की एक मशीद पाडून त्यावर हे उभं केलेलं आहे. "मंदिरे पाडून मशिदी केल्याचे दाखले हिंदुस्थानात लक्षावधी आहेत, परंतु मोठी थोरली मशीद तिच्याजवळील सराईसह जमीनदोस्त करून तेथे मंदिर बांधल्याचे उदाहरण मला वाटते हे एकच असेल. हे श्रेय प्रसिद्ध शीखसुभेदार अबू ह्यास. हा सन १८३८-४२ पर्यँत पेशावरचा सुभेदार होता. हिंदुमहासभेने ह्या सुभेदाराचा पुतळा अवश्य उभारला पाहिजे" ही चिं. विं. ची प्रतिक्रिया बोलकी आहे.  

याशिवाय चिं. वि. , प्राध्यापक शेजवलकर (बहुदा पानिपत अभ्यासक ते हेच असावेत) आणि डॉ. यशवंत देशपांडे यांनी मिळून एका जयकृष्ण पंथाच्या मंदिराचा शोध घेण्यास सुरुवात केली . पेशावरच्या हिंदुबहुल भागात एका हवेलीत गोपाळकृष्णाच्या अनेक मूर्ती होत्या. तिथे काही महंत होते त्यांनी चिं. विं. ना ओळखले, कारण चिं. विं. चे 'मनोहर'च्या अंकाततलं छायाचित्र त्यांनी पाहिलं होतं. एवढ्या लांब मठ आणि महंत होते आणि तेही मराठी भाषक हे वाचताना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या महंतांनी महानुभाव पंथांच्या अनेक पोथ्या जपून ठेवल्या होत्या, शिवाय "काबूल येथे शेवटचा महानुभावी मठ जिवंत आहे आणि तिथेही पुष्कळ अनुयायी आहेत" असंही त्या महंतांनी सांगितलं. 

पुढे त्यांनी खैबरखिंडीलाही भेट दिली. त्या परिसरात बुद्धमूर्ती आणि कलाकृती तोपर्यँत खूप सापडल्या होत्या आणि सापडत होत्या. तिथल्या बुद्धमूर्तींची ठेवणही पठाणांसारखीच असल्याची गमतीशीर पण महत्वाची नोंदही ते करतात. हे सगळं वाचताना आतमध्ये कुठेतरी अस्वस्थही वाटलं. वायव्य सरहद्द प्रांत आणि अफगाणिस्तानात मुस्लिमांचं राज्य शेकडो वर्षं होतं, आहे. त्या रासवट राजवटीत बौद्ध फार आधीच उखडले गेले, पण अगदी फाळणी होईपर्यंत काही हिंदू तिथे नेटाने आपलं स्थान आपली देवालयं कशीबशी का होईना टिकवून होते. एवढ्या राजेशाहीत घडलं नाही ते पुढे घडलं आणि उरल्या सुरल्या हिंदू, बौद्ध खुणा तिथून उखडल्या गेल्या. हा लेख चिं. विं. नी प्रवासानंतर काही काळानंतर लिहिला आहे. त्यांच्या लिखाणातही खंत जाणवते. आता या भागात महाराष्ट्रीय लोकांना जायला मिळण्याची शक्यता फारच थोडी आहे, हे ते सुरुवातीलाच नमूद करतात आणि महंतांच्या भेटीनंतर लिहितात, "सत्तेचाळीच्या दंगलीत या मठाचा नाश झाला असावा असे भय वाटते. काबूलचा मठ चालू आहे का तेही कळत नाही..." "....मी अद्यापपर्यंत ह्या दोन मठांची आणि त्यातील  महंतांची काय गत झाली याचा तपास केला नाही ही माझी अक्षम्य चूक आहे."


जुनी पुस्तकं (त्यातही प्रवासवर्णनं) यासाठी वाचायला हवीत, काही ना काही महत्वाचं गवसतं. जुन्या पुस्तकाचा विषय निघाला आहे तर एक निरीक्षण नोंदवतो. चिं. वि. जोशींच्या पुस्तकांमध्ये (आणि बहुदा सर्वच जुन्या पुस्तकांमध्ये) कुणाही मोठ्या सन्माननीय पुरुषाच्या नावामागे रा. ('राजमान्य'चा शॉर्ट फॉर्म) कायम असतं. पूर्वी नावामागे 'श्री.' लिहायचा अजिबातच प्रघात नसावा.  'श्री.' लिहायची सुरुवात नक्की कधीपासून झाली असेल? कुणाला काही कल्पना असेल तर कळवावे. 

एकूण हे पुस्तक शैलीच्या दृष्टीने महत्वाचं अथवा रंजक नसलं तरी काळाआड चाललेल्या प्रवासनोंदी त्यात करून ठेवल्या आहेत हे महत्वाचं. 

(जाता जाता : चिं. वि. जोशींच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांसाठी गंमतशीर शब्द योजलेले असतात तसे या पुस्तकातही आहेत. गावातला शून्य मैलाचा दगड फादर स्टोन म्हणून ओळखला जातो त्याला चिं. वि. जोशींनी बापदगड म्हटलंय आणि पेशावर भागात त्यावेळी त्यांनी फ्लशचे संडास पाहिले त्याला त्यांनी धबधब्याचे संडास म्हटलंय :D )


संचार : चिं. वि. जोशी
आवृत्ती चौथी 
१५० पानं
पंचेचाळीस रुपये 
कॉन्टिनेन्टल प्रकाशन 

1 comment: