२०२० साल अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ करून गेलं. कधी कल्पनाही न केलेले अनुभव कित्येक लोकांना देऊन गेलं. ... माझ्या आयुष्यात सुदैवाने काही उलथापालथ झाली नसली तरी हे वर्ष मलाही एक कल्पनातीत अनुभव देऊन गेलं. शंभर पुस्तकं ऐकण्याचा/वाचण्याचा अनुभव ! तुफान अनुभव ! गेली काही वर्षं माझं वाचन रोडावत चाललं होतं. २०१९च्या शेवटी त्या वर्षीच्या वाचन/श्रवणाची यादी केली होती तेव्हा एकूण पुस्तकसंख्या पाहून खरंच इंडिकेटर लागले होते. २०२०मध्ये मात्र वाचनसवयीला चांगलीच तरतरी आली.. साडेनऊ महिने वर्क फ्रॉम कामाचा प्रचंड फायदा झाला. ऑफिसला जाण्या येण्याचा वेळ वाचला. ऑफिसमध्ये पुढची टास्क/तिकीट असाइन होईपर्यंतच्या, मीटिंगची वाट बघेपर्यँतच्या, ईमेल-पिंगचा रिप्लाय येईपर्यंतच्या वेटिंग पिरियडचा सदुपयोग करता येत नाही, पण घरी तो पुरेपूर करता आला!
सप्टेंबर आला तसतसं लक्षात आलं की यावर्षी पुस्तकांची शंभरी गाठता येऊ शकते. मग ती संख्या गाठण्याच्या दृष्टीने थोडी लबाडी करून छोट्या आकाराची/लांबीची पुस्तकंही निवडली ;) पण तरी आनंद याचा आहे की या निमित्ताने शंभर वेगवेगळ्या विषयातली/प्रकारची/वातावरणातली पुस्तकं वाचली/ऐकली गेली..
वाचनाच्या निमित्ताने घरात अनेक दिवस कपाटात दडून बसलेली पुस्तकं जशी वाचली गेली तशीच मुद्दामून ग्रंथालयातून आणूनही पुस्तकं वाचली गेली. किंडल अनलिमिटेडची ऑफर होती त्या निमित्ताने किंडलवरही वाचून ऑफर वसूल केली. २०१९ मध्ये स्टोरीटेल ऐकत होतोच. २०२०मध्ये कधी ऑफर होती म्हणून तर कधी ठरवून ऑडिबल, स्नॉवेल आणि स्टोरीटेलवर ऑडिओबुक्स आलटून पालटून ऐकली... एकुणात काय पुस्तकांच्या विषयांप्रमाणेच त्यांच्या स्वरूपातही भरपूर वैविध्य आलं.
वर्षाच्या सुरुवातीला कल्पनाही केली नव्हती एवढं अकल्पनीय वाचन यावर्षी झालं (जसजशी पुस्तकं संपवत जात होतो तसंतसं जाणवत होतं की फेसबुक बंद असल्याने आपल्याला केवढा तरी वेळ मिळतोय. लक्ष एकाग्र होऊ शकतंय. खरंच, फेसबुक माझा वेळ, विचार, शांतता किती शोषून घेत होतं!! पण असो, फेसबुकबद्दल परत कधीतरी). अर्थात सतत वाचनाने वर्षाच्या शेवटी शेवटी थोडं सॅच्युरेशन आल्यासारखं वाटल्यावरही ही वन्स इन लाईफटाइम गोष्ट आहे याची जाणीव होत असल्याने, नेटाने वाचन चालू ठेवलं आणि परत प्रवाह वाहता झाला....
वाचनासोबतच आणखी एक गोष्ट वर्षाच्या सुरुवातीपासूनच ठरवून केली, ती म्हणजे वाचलेल्या पुस्तकांची तारीखवार यादी करणे. शिवाय गेली काही वर्षं लेखन (टायपिंग नव्हे, actual पेनने लेखन!) पूर्णपणे बंद झालं होतं, त्याचं पुनरुज्जीवन होणं अत्यंत आवश्यक आहे हे प्रकर्षाने जाणवलं. यावर्षी जे जे वाचू त्याच्या काही ना काही नोट्स वहीत लिहून काढायच्याच हे ठरवलं होतं. पण तरीही लॉकडाऊनमध्ये वाचन एक्सप्रेस सुसाट सुटली आणि लेखन काही होईना. मग एका टप्प्यावर वाचन स्लो केलं आणि काही पुस्तकांच्या आवर्जून नोट्स काढल्या. हाताने लिहीत असताना पहिल्या दिवशी अक्षरशः फेफे उडाली. डोक्यातले विचार आणि हातातलं पेन यांचा वेग तर जुळत नव्हताच, पण जोडाक्षरं आली तर चट्कन हातातून ती उमटेनात. उमटली तर त्यात चुका व्हायच्या, खाडाखोड व्हायची... अशक्य लाज वाटली तेव्हा... अर्थात टायपिंगवर अति विसंबलो आहोत याची जाणीव होत असल्यानेच लेखनप्रपंच सुरु केला होता मी.. हळहळू हात डोक्याचं ऐकू लागला आणि विनासायास अक्षरं कागदावर उमटू लागली...
वाचनाचं बायप्रॉडक्ट म्हणून येणाऱ्या लेखनावरही यावर्षी मी अधिक लक्ष केंद्रित केलं (याला मात्र टायपिंगशिवाय पर्याय नव्हता ;) ) आणि विशेष प्रयत्न केले. 'सकाळ'च्या 'सप्तरंग' मध्ये एक आणि 'महाराष्ट्र टाईम्स'ची 'संवाद' पुरवणी तसंच संपादकीय पान यावर एकूण तीन लेख प्रकाशित झाले आणि चौथा जस्ट २०२१ च्या पहिल्याच शनिवारी प्रकाशित झाला. याशिवाय काही पुस्तकांवर लेख लिहूनही ठेवले आहेत. तेही कधी ना कधी सर्वांसमोर येतीलच.
यावर्षीच्या वाचनव्यापाचा सारांश असा :-
- यावर्षी वाचलेली/ऐकलेली पुस्तकं : १०३ पूर्ण आणि एक अर्धे
- एकूण वाचलेली पानं (हार्ड कॉपी आणि ईबुक मिळून) : ९७०९
- एकूण श्रवणवेळ (ऑडिओबुक्स) : ३३३ तास
वाचलेल्या/ऐकलेल्या एकूण पुस्तकांची यादी आणि अल्पपरिचय देतोय. वेळ मिळेल तसा त्यावर अधिक विस्ताराने लिहायचा प्रयत्न करेनच.
१. पर्वतपुत्र शेर्पा - उमेश झिरपे
एव्हरेस्ट चढाईचा कणा असणाऱ्या
शेर्पा जमातीचा अनेक अंगांनी परिचय करून देणारे पुस्तक
२. India Moving - Chinmay Tumbe
भारतीयांनी भारतात
आणि भारताबाहेर केलेल्या केलेल्या स्थलांतराचा रोचक इतिहास.
महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यावर आलेला माझा लेख : https://maharashtratimes.com/editorial/literature/prasad-phatak-review-on-india-moving-a-history-of-migration-book-by-chinmay-tumbe/articleshow/80066759.cms
३. मराठी
पत्रकारिता : पहिली पावले - प्रा. सु. ह. जोशी
'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकरांचे यांचे अल्पचरित्र
आणि मराठी वृत्तपत्रांच्या सुरुवातीच्या काळातील तीसेक वर्तमानपत्रांची माहिती .
४. काबूलनामा - फिरोज
रानडे
भारत सरकारतर्फे
काबुलच्या नगररचनेच्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी १९७५ ते १९८० या काळात तिथे
जाऊन राहिलेल्या आर्किटेक्टचे अनुभव. अतिशय मोकळ्या वातावरणाकडून अराजकाकडे पावलं
टाकणाऱ्या अफगाणिस्तानचे जवळून दर्शन घेतलेला मराठी लेखक.
५. विजयदुर्ग
व परिसर - प्र. के. घाणेकर
६. संचार - चिं.
वि. जोशी
चिं. वि. जोशींचे भारताच्या विविध भागांना दिलेल्या
भेटींचे प्रवासवर्णन. खैबरखिंडीच्या प्रदेशात केलेले प्रवासवर्णन महत्वाचे.
७. आनंदमठ
: आक्षेप आणि खंडन - सचिन सबनीस
आनंदमठ कादंबरीवर, विशेषतः त्याच्या शेवटावर बरेच आक्षेप घेतले गेले होते, त्याचे स्पष्टीकरण देणारी आणि कादंबरीचा एकूण भवताल समजवून सांगणारी ही छोटेखानी पुस्तिका
८. नाईन्टीन
नाईन्टी - सचिन कुंडलकर
गर्दीपासून दूर राहणाऱ्या शहरी माणसाच्या डायरीतल्या शहरी जाणीवांच्या नोंदी. त्याच्या आशा निराशांमधल्या झोक्यांचा जमाखर्च. स्वतःच्या अंगवळणी
पडलेल्या नैराश्याची झाडाझडती घेणारं
अतिशय नेटकं आणि नेमकं प्रकरण 'नैराश्याची सुबक नोंदवही' हा पुस्तकाचा हायलाईट
९. यज्ञसमर्पित - अरविंद
स. हर्षे
संघाचे ज्येष्ठ
प्रचारक, कवी, 'डॉक्टर हेडगेवार चरित्र' आणि 'इस्राएल छळाकडून बळाकडे' या पुस्तकांचे लेखक नारायण हरी अर्थात नाना
पालकर यांचे चरित्र
१०. पु.
ल. : चांदणे स्मरणाचे - मंगला गोडबोले
पुलंचे चरित्र
११. ऑफ
लाईन - डॉ. बाळ फोंडके
विज्ञानकथा
१२. एकला
बोलो रे - शिरीष कणेकर
फिल्लमबाजी, कणेकरी, फटकेबाजी या stand-up talk showsच्या निमित्ताने आलेल्या अनुभवांवरचे
धमाल पुस्तक
१३. गदिमान - मधू पोतदार
गदिमांच्या काव्याच्या सोबतीने उलगडत जाणारे त्यांचे छोटेखानी
चरित्र
१४. कांगारू - सुनंदन
लेले
क्रिकेट सामन्यांच्या
निमित्ताने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यांतले संस्मरणीय अनुभव
१५. हॉलिवूडचे
विनोदवीर - राजेंद्र खेर
चार्ली चाप्लीन,
लॉरेल-हार्डी, बस्टर कीटन आदींचा परिचय करून देणारे
पुस्तक
१६. खिद्रापूरची
मंदिरे - डॉ. रामचंद्र गोविंद चोथे, श्री. शशांक रामचंद्र चोथे
१७. श्री.
बाळासाहेब देवरस - शरद हेबाळकर
तृतीय सरसंघचालक
बाळासाहेब देवरस यांचे चरित्र
१८. हिंदू
धर्मसंग्राम आणि वनवासींचे जीवन - वसंत भाऊ पाटील
मुहम्मद बिन कासीम
पासून होत आलेल्या इस्लामी आक्रमणाचा संक्षिप्त आढावा.
पुस्तकाचा उत्तरार्ध
वनवासींच्या हिंदू धर्माशी असलेल्या अतूट नात्याची जाणीव करून देणारा.
१९. नागझिरा - व्यंकटेश
माडगूळकर
नागझिरा जंगलात
महिनाभर राहून केलेल्या नोंदी आणि रेखाटने
२०. माझे
पुराण - सौ. आनंदीबाई कर्वे
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या
पत्नीचं आत्मचरित्र. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या अनिष्ट प्रथा आणि खडतर आयुष्य यांचं
चित्र उभं करतं.
२१. ते
पंधरा दिवस - प्रशांत पोळ
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
१९४७ या वादळी कालखंडात भारतातले प्रमुख नेते कुठे होते कशात गुंतले होते याची
बित्तंबातमी
२२. मेरी
प्रचारक यात्रा - शशिकांत चौथाईवाले
१९६१ पासून ईशान्य
भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करणारे शशिकांत चौथाईवाले
यांचे अनुभव
२३. नावामागे
दडलंय काय? - सुप्रसाद पुराणिक
पुण्यातल्या
ठिकाणांच्या चित्रविचित्र नावांचा इतिहास
२४. एकनाथजी - निवेदिता
रघुनाथ भिडे (अनुवाद : सुनीता करकरे)
राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे प्रचारक, कन्याकुमारीच्या
विवेकानंद शिलास्मारकाचे स्वप्न अफाट प्रयत्नांनी प्रत्यक्षात उतरवणारे एकनाथजी
रानडे यांचे चरित्र
२५. सुरेशराव
केतकर - संकलन
राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर यांच्याबद्दलच्या आठवणी
२६. जीवन
व्हावे यज्ञसमर्पण : श्री. जगन्नाथराव जोशी - डॉ.
अरविंद लेले
जनसंघाचे ज्येष्ठ
नेते, वक्ता दशसहस्रेषु
श्री. जगन्नाथराव जोशी यांच्यावरची पुस्तिका
२७. एक
अग्नीशिखा : दादाराव परमार्थ - चं. प. भिशीकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
प्रचारकांच्या पहिल्या फळीतील प्रचारक, देशभर फिरून संघकार्याचा पाया घालणारे
दादाराव परमार्थ यांच्या कार्याची ओळख करून देणारी पुस्तिका
२८. निश्चयाचा
महामेरू : मुकुंदराव पणशीकर - प्रदीप नाईक
राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे ज्येष्ठ प्रचारक, धर्मजागरण विभाग, पूर्वांचलचे संघकार्य, केशवसृष्टी,
समरसता मंच अशा अनेक
आयामांमध्ये लक्ष घालून मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक मुकुंदराव पणशीकर यांच्या कार्याची या पुस्तकात ओळख करून दिली गेली आहे
२९. डॉलरच्या
देशा - शिरीष कणेकर
एकपात्री
प्रयोगांच्या निमित्ताने केलेल्या अमेरिका प्रवासातले खुसखुशीत अनुभव
३०. शिणेमा
डॉट कॉम - शिरीष कणेकर
मिश्कील, टपल्या मारणारे, रसग्रहणात्मक अशा सिनेलेखांचा संग्रह. 'उभे ठाकले झुंजाया' हा शक्ती सिनेमातल्या अमिताभ-दिलीप
कुमार जुगलबंदी वरचा अप्रतिम लेख हा पुस्तकाचा हायलाईट आहे
३१. माणदेशी
माणसं - व्यंकटेश माडगुळकर
दूरवरच्या गावखेड्यात
राबणाऱ्या, कुणाच्या खिजगणतीतही
नसणाऱ्या व्यक्तींची शब्दचित्रं
३२. गुगली - सुबोध
जावडेकर
विज्ञानकथा
३३. पुणेरी - श्री.
ज. जोशी
पाउणशतकापूर्वीच्या
पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक पाऊलखुणा उमटलेले एका अस्सल पुणेकराचे लेख.
३४. यक्षांची
देणगी - जयंत नारळीकर
विज्ञानकथा
३५. मा.
एकनाथजींनी सांगितलेली 'कथा
विवेकानंद शिलास्मारकाची' - एकनाथ रानडे
संपूर्ण देश पिंजून काढत, सर्व राजकीय नेत्यांना सोबत घेत केवळ सात वर्षांत कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक उभं करणाऱ्या एकनाथजी रानडे यांनी सांगितलेले स्मारकउभारणीचे अनुभव चरित्र
३६. एकनाथजींची
निवडक पत्रे : भाग १ - एकनाथ रानडे
विवेकानंद शिलास्मारक
निर्मितीच्या काळात देशभर फिरत असताना लिहिलेली पत्रं. एकनाथजींची चौफेर नजर,
स्मरणशक्ती, समर्पण, काटेकोर नियोजन अशा गुणांचं प्रतिबिंब या
पत्रांमध्ये दिसतं.
३७. माझ्या
लिखाणाची गोष्ट - अनिल
अवचट
आपल्या लिखाणाची
निर्मितीप्रक्रिया आणि पुस्तकांच्या निर्मितीकथा उलगडून सांगणारे अनिल अवचट इथे भेटतात
३८. अक्षरनिष्ठांची
मांदियाळी - अरुण टिकेकर
व्यासंगी वाचकाच्या
पुस्तकशोधाच्या कहाण्या, किस्से
आणि आठवणी
३९. मोरू
आणि मैना - चिं. वि. जोशी
लहान मुलांसाठी
लिहिलेल्या मोरू आणि मैनाच्या गोष्टी
४०. आफ्रिकेतील
आठवणी - सौ. सुमन जोशी
१९३०च्या दशकात
नोकरीसाठी आफ्रिकेत गेलेल्या डॉक्टरच्या मुलीने सांगितलेले अनुभव
४१. हरवलेलं
दीड वर्ष - श्रीकांत बोजेवार
४२. अंगठी
१८२० - श्रीकांत बोजेवार
४३. न्यूड
पेंटिंग @19 - श्रीकांत बोजेवार
वरच्या तिन्ही डिटेक्टिव्ह अगस्तीच्या रहस्यकथा
४४. इस्लामचे
भारतीय चित्र - हमीद दलवाई
१९६०च्या दशकात बंगाल
आणि आसाममध्ये प्रवास करून तिथल्या मुस्लिम मनाचा कानोसा घेण्याचा दलवाईंनी केलेला
प्रयत्न.
४५. गावोगावी - ल. त्र्यं. जोशी
तरुण भारतचे माजी
संपादक ल. त्र्यं. जोशी यांचे आत्मकथन
४६. कलम
३५अ + कलम ३७० - अरविंद व्यं. गोखले, वासुदेव कुलकर्णी
घटनेत कलम ३५अ व कलम ३७० कसे आले, काश्मीरचे त्याच्याशी नाते काय, काश्मीरचा राजकीय पट याबद्दल माहिती
सांगणारे पुस्तक
ईबुक्स
४७. Wonder Woman : Earth One (Vol 1) Grant Morrison / Yanick Paquette
Graphic novel
४८. The First Indian - Dilip Donde
बोटीतून एकट्याने
पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय व्यक्ती दिलीप दोंदे यांचे अनुभव
४९. A River In Darkness - Masaji Ishikawa
उत्तर कोरियाच्या
हुकुमशाहीत पिचलेल्या आणि महत्प्रयासाने तिथून पळालेल्या नागरिकाची हृदय पिळवटून टाकणारी आत्मकथा
५०. मेघदूत - शांता
शेळके
कालिदासाच्या
मेघदूताचा काव्यमय अनुवाद
५१. वाटेवरल्या
सावल्या - ग. दि. माडगूळकर
गदिमांच्या
सुरुवातीच्या दिवसांमधले अनुभव, संघर्ष
सांगणाऱ्या आत्मपर लेखांचा संग्रह.
मराठी चित्रपटसृष्टीत
गदिमांची पहिली पावलं कशी पडत गेली याची रंजक कहाणी
५२. हटके
भटके - निरंजन घाटे
चाकोरी मोडून घराबाहेर
पडलेल्या धाडसी भटक्यांच्या रंजक गोष्टी. यात चित्रकारापासून ते वन्यजीव
अभ्यासकांपर्यंत अनेक अभ्यासू भटके आपल्याला भेटतात
५३. Tales from the road - Aniket Ketkar
CA ची नोकरी सोडून
आग्नेय आशियात भटकंतीसाठी बाहेर पडलेल्या तरुणाचे आपल्याच लयीत जाणारे, एक ठहराव असणारे प्रवासवर्णन. प्रत्येक
जागेचा इतिहास सांगण्याचा आणि आलेला प्रत्येक अनुभव सांगण्याचीही अट्टहास नाही.
५४. The God Who Failed - Madhav Godbole
नेहरूंच्या मर्यादा,
चुका आणि बलस्थानांचा लेखाजोखा मांडणारे
संतुलित पुस्तक
५५. Third Claas of Indian Railways - Mahatma Gandhi
एकूण पाच लेखांचा संग्रह.
आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर आधी देश
कसा आहे हे नजरेखालून घालण्यासाठी गांधींनी देशभर तिसऱ्या वर्गातून प्रवास केला.
त्या दरम्यान अनुभवलेल्या 'भारतीय
रेल्वे' या परिसंस्थेतचा
मुख्य घटक प्रवासीवर्सगाच्या बिकट स्थितीच्या नोंदी घेणारा मुख्य लेख. सोबत स्वदेशी, स्थानिक भाषेचा आग्रह , भारतीय पोशाख, अहिंसा या विषयांवरचे लेख यात आहेत. गांधींची भाषा समजायला क्लिष्ट
वाटली.
५६. खैबरखिंडीपलीकडून - अरुण
मोकाशी
अफगाणिस्तान संस्कृती, कला, कलाकार, खैबरखिंडीसारखी ठिकाणं यांबद्दल माहिती
सांगणाऱ्या लेखांचा संग्रह. वैयक्तिक अनुभव त्यात असतील असं वाटलं होतं, पण त्या दृष्टीने निराशा वाट्याला आली.
५७. A Walk Through Barygaza - Zac O'Yeah
प्राचीन काळापासून
भारतातले महत्वाचे बंदर असणाऱ्या भडोचमध्ये फेरफटका मारून तिथला इतिहास, ग्रीस वगैरे पाश्चिमात्य देशांशी भारताचे असलेले
संबंध, पाश्चात्यांच्या या
भागातल्या पाऊलखुणा शोधण्याचा केलेला प्रयत्न.
५८. मृत्युपेटीत
पाच दिवस - विजय देवधर
एकाहून एक भन्नाट
साहसकथा. विजय देवधरांचा हातखंडा विषय.
५९. केस
अटॅची केसची - सत्यजित रे, अनुवाद : अशोक जैन
वेगवान फेलूदा
साहसकथा. शिमल्याच्या बर्फाळ वातावरणात ऍक्शनपॅक्ड् क्लायमॅक्स
६०. माझ्याविषयी - निरंजन
घाटे
आत्मपर लेखांचा
संग्रह. बऱ्याच ठिकाणी माहितीची
पुनरावृत्ती झालेली असली तरी लिखाणाच्या सर्व प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या
लेखकाच्या आतल्या माणसाची नक्की जडणघडण कशी झाली याबद्दल महत्वाची माहिती मिळते.
६१. गंगटोकमधील
गडबड - सत्यजित रे, अनुवाद : अशोक जैन
वेगवान फेलूदा
साहसकथा.
६२. कहाणी एका रँग्लरची - सुमती
विष्णू नारळीकर
जयंत नारळीकरांच्या
सुविद्य, सुसंस्कृत वडिलांचा
परिचय करून देणारे खूप छान पुस्तक. जयंतरावांमध्ये असणारे अनेक सद्गुण कुठून,
कसे आले असतील याची यातून उत्तम कल्पना
येते.
६३. डिटेक्टिव्ह
अल्फा आणि रत्नजडित खंजिराचे रहस्य - सौरभ वागळे
नवख्या लेखकाची ढिसाळ
रहस्यकथा
६४. अंतर्बाह्य - रत्नाकर मतकरी
अनेक वर्षांनी
मतकरींच्या गूढकथा वाचल्याचा आनंद मिळाला
६५. काठमांडूतील
कर्दनकाळ - सत्यजित रे, अनुवाद : अशोक जैन
वेगवान फेलूदा
साहसकथा.
६६. आनंदमठ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
देशाच्या इतिहासातली
अजरामर कलाकृती. क्षत्रिय संन्याश्यांच्या धाडसी कारवायांभोवती गुंफलेले काळाच्या मानाने काहीसे गुंतागुंतीचे
कथानक. शेवट संभ्रमात टाकणारा. 'आनंदमठ
: आक्षेप आणि खंडन' ही
पुस्तिका त्यानंतर वाचल्याने संभ्रम दूर झाला
६७. Feluda@50 - Boria Muzumdar
प्रदोष मित्र उर्फ
फेलूदा हे खासगी गुप्तहेर पात्र
कुमारांसाठी सत्यजित रे यांनी निर्माण केले. त्याच्याच प्रभावाखाली बंगाली
कुमारवाचकांच्या पिढ्या घडल्या. फेलूदा हे पात्र निर्माण होऊन ५० वर्ष
झाल्यानिमित्ताने फेलूदा हे पात्र, सत्यजित
यांची त्यामागची भूमिका, फेलूदावर
निर्माण झालेले चित्रपट आणि त्यात फेलूदाची भूमिका साकारणारे कलाकारांच्या मुलाखती,
फेलूदा कथांची बलस्थानं व मर्यादा यांची
चर्चा करणारे चिकित्सात्मक लेख यांनी सजलेले पुस्तक
६८. मैं
पाकिस्तान में भारत का जासूस था - मोहनलाल भास्कर
हेरगिरीच्या
आरोपामुळे अटक होऊन पाकिस्तानी तुरुंगात काही वर्ष काढलेल्या भारतीय गुप्तहेराची
आत्मकथा. प्रत्यक्ष हेरगिरीचा फक्त ओझरता उल्लेख. पुस्तक प्रामुख्याने तुरुंगातील
कडू-गोड अनुभवांना वाहिलेले.
६९. बातमीमागची
बातमी - जयप्रकाश प्रधान
पत्रकार जयप्रकाश
प्रधान यांनी आपण दिलेल्या प्रमुख बातम्यांचे 'मेकिंग' यात दिलं आहे. घातपाताच्या तयारीत
असलेल्या लोकांवर धाड टाकणाऱ्या पोलिसांसोबतच असताना आलेले अनुभव सांगणारे प्रकरण
विशेष वाचनीय.
७०. सोने
का किला - सत्यजित राय
वेगवान फेलूदा
साहसकथा.
७१. Savarakar : Echoes of a forgotten past
(Vol 1. Part 2) - Vikram Sampath
ताज्या दमाच्या
लेखकाने अतिशय सखोल अभ्यास करून लिहिलेलं बेस्ट-सेलर सावरकर चरित्र
७२. Bandits of Bombay - Satyajit Ray
वेगवान फेलूदा
साहसकथा.
७३. The Curse of The Goddess - Satyajit Ray
वेगवान फेलूदा
साहसकथा.
७४. An Era of Darkness - Shashi Tharoor
इंग्रजांनी भारताचं अनेक अंगांनी केलेलं
उलगडून सांगणारं पुस्तक. "इंग्रजांमुळे भारतात लोकशाही आली, भारत एकसंध झाला" इ. दाव्यांचा
वकिली खाल्याने घेतलेला समाचार
७५. Byomkesh Bakshi - Saradindu Bandopadhyay
व्योमकेश बक्षीच्या ७
चातुर्यकथा
७६. Putin : Prisoner of Power - Misha Glenny
पुतीनने सत्ता कशी
काबीज केली हे सांगणारी छोटेखानी लेखमाला
७७. Pandeymonium - Piyush Pandey
जाहिरातक्षेत्रातील
बाप माणूस असणाऱ्या पियुष पांडे यांचे रसाळ अनुभवकथन. प्रत्येक प्रकरण म्हणजे
उत्तम व्यवस्थापनाचा एकेक स्वतंत्र धडाच
७८. Benedict Cumberbatch reads Sherlock
Holmes : Rediscovered Railway Misteries & Other Stories - John Taylor
आर्थर कॉनन डॉयलने
लिहिलेल्या वाटाव्यात अशा शेरलॉक होम्स कथा
७९. अंतराळातील
स्फोट - जयंत नारळीकर
काही शतकांच्या
अंतराने इतिहासाच्या ३ टप्प्यांमध्ये एकाच धूमकेतूचे निरीक्षण करून पृथ्वीवरील
संभाव्य संकट हेरणाऱ्या चौकस अभ्यासकांची विज्ञानकथा. कुमार वयोगटातील मुलांना
डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली.
८०. निळीच्या
गोदामातील आतंक - सत्यजित राय
उत्कृष्ट साउंड
डिझायनिंग आणि पार्श्वसंगीताच्या साहाय्याने रंगवलेली ऑडिओकथा
८१. दोन
जादूगार - सत्यजित राय
सत्यजित राय लिखित
गूढरम्य कथा
८२. मी
दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे (दिवाकर)
दिवाकरांच्या
नाट्यछटा
८३. जपानी
डायरीज - ॠतावरी मराठे
सुरुवातीला
नोकरीनिमित्ताने आणि लग्नानंतर कायमच्याच जपानमध्ये स्थायिक झालेल्या मराठी मुलीचे
जपानी सण आणि संस्कृती उलगडून दाखवणारे लेख.
८४. एका
कोळीयाने - पु. ल. देशपांडे
इतकी वर्षं
हेमिंग्वेच्या पुस्तकाबद्दल ऐकून होतो
म्हणून स्टोरीटेलवर आल्यावर खूप अपेक्षेने (तेही विक्रम गोखलेंच्या
आवाजात!) ऐकलं. पण निराशा झाली. मुळात मला कथानकच विलक्षण बोअर झालं. शिवाय
गोखलेंनीचाही काहीही विशेष प्रभाव जाणवत नाही. पुलंचा अनुभव मात्र फर्मास!
८५. दीपमाळेचे
रहस्य - भा. रा. भागवत
अनेक वर्षं आऊट ऑफ
प्रिंट असणारं पुस्तक स्टोरीटेलच्या कृपेने फायनली पूर्ण करता आलं. भारांची टिपिकल
टीन-इज साहसकथा.
८६. वाघरू - गो.
नी. दांडेकर
रूप, स्पर्श, गंध, आवाज जिवंत करणारी गोनीदांची रसाळ भाषा
आणि वीणा देव - रुचिर कुलकर्णी यांचं उत्कट अभिवाचन आणि हृदयाचा ठाव घेणारं
कथानक. बस्स ! अजून काय हवं !
८७. भारतीय
जीनियस - जयंत नारळीकर अच्युत गोडबोले, दीपा देशमुख
८८. भारतीय
जीनियस - आर्यभट, भास्कराचार्य,
ब्रह्मगुप्त ... इ. अच्युत
गोडबोले, दीपा देशमुख
८९. भाग्यशाली
सिक्सर - भा. रा. भागवत
सहा टीन-एज
साहसकथांचा संग्रह. हेही अनेक आऊट ऑफ प्रिंट आहे
९०. भारतीय
जीनियस : श्रीनिवास रामानुजन अच्युत गोडबोले, दीपा देशमुख
९१. To The Edges of The Earth - Edward J. Larson
१९०९ या एकाच वर्षात
दक्षिण ध्रुव, उत्तर
ध्रुव ही पृथ्वीची दोन टोकं आणि K2 हे शिखर अशा तीन गोष्टी सर करण्याच्या मोहिमांमध्ये नवे विक्रम प्रस्थापित झाले.
त्या तिन्हींचा वेध घेणारं पुस्तक.
महाराष्ट्र
टाईम्समध्ये त्यावर आलेला माझा लेख
: https://maharashtratimes.com/editorial/literature/prasad-phatak-review-on-india-moving-a-history-of-migration-book-by-chinmay-tumbe/articleshow/80066759.cms
९२. भारतीय
जीनियस : होमी भाभा - अच्युत गोडबोले, दीपा देशमुख
९३. तंत्रज्ञ
जीनियस : थॉमस अल्वा एडिसन - अच्युत गोडबोले, दीपा देशमुख
९४. मैत्रेयी - अरुणा
ढेरे
याज्ञवल्क्यांना
अस्तित्वात असणाऱ्या संकल्पनांचे नवे अर्थ सहजपणे समजवून सांगणारी मैत्रेयी, ज्ञानोपासक पण त्यातच गुंतून पडणाऱ्या याज्ञवल्क्यांना
भावनांचे महत्व समजावून सांगणारी मैत्रेयी… यज्ञ संकल्पनेचा नवा, उदात्त अर्थ… आणि
बरंच काही…
९५. भारतीय
जिनियस : दामोदर धर्मानंद कोसंबी - अच्युत गोडबोले, दीपा देशमुख
९६. दैत्यालय - हृषिकेष गुप्ते
कलेकडे, कलेच्या पराकोटीच्या प्रकटीकरणाकडे
वेगळ्या नजरेनी पाहणारी गूढकथा
९७. हाकामारी - हृषिकेष गुप्ते
नागोठण्याच्या
पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा. आऊट अँड आऊट गूढकथा नाही, पण गुप्तेंनी कथेल्या भयाच्या
हलक्या सावटाआडच्या मानवी मनातल्या कोपऱ्यांवर प्रकाश टाकला आहेत तो इंटरेस्टिंग
आहे.
९८. परफेक्टची
बाई, फोल्डिंगचा पुरुष - हृषिकेष
गुप्ते
प्रत्येक पात्राचा प्रत्येक वेळी त्याच्या वैशिष्ट्यांसह सतत उल्लेख करून एक
वैचित्र्यपूर्ण फॉरमॅटमध्ये कथा लिहिली आहे. वेगळा प्रयोग.
९९. दुर्मिळ
तिकीटाची साहसयात्रा - भा. रा. भागवत
कलासिक बिपीन
बुलकलवार ऍडव्हेंचर. खूप वर्षांनी पुन्हा वाचलं/ऐकलं
१००. काय
वाट्टेल ते होईल - जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली, अनुवाद
पु. ल. देशपांडे
सुमारे शंभर वर्षांपूर्वी
नशीब आजमावण्यासाठी जॉर्जिया देशातून अमेरिकेमध्ये आलेल्या जॉर्ज पापाश्विलीचे
खुसखुशीत अनुभव. पुलंचा अगदी फक्कड , फर्मास अनुवाद
१०१. बाजिंद - पै.
गणेश मानुगडे
शिवकाळात घडणारी
साहसकथा. गूढरम्यता, आदर्शवाद,
धाडस यांचे इंटरेस्टिंग मिश्रण
१०२. पुत्र
व्हावा ऐसा गुंडा - भा. रा. भागवत
बिपीन बुकलवारने सांगितलेल्या देशोदेशीच्या रंजक कथा
१०३. खादीशी जुळले नाते - रघुनाथ कुलकर्णी
खादी क्षेत्रात महत्वाचे कार्य केलेले रघुनाथ कुलकर्णी यांचे आत्मकथन.
माझा या पुस्तकावरचा महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित लेख : https://maharashtratimes.com/editorial/samwad/prasad-phatak-review-on-khadishi-julale-nate-by-raghunath-kulkarni/articleshow/79821052.cms
भारीच 👌🏼👌🏼 थोडक्यात अनेक पुस्तकांचा परिचय झाला. यातली काही पुस्तकं नक्कीच वाचावी लागतील.
ReplyDeleteखरंच आजकाल मराठी लिहिताना खूप दमायला होत. अक्षरशः लाज वाटते स्वतःची..आणि काळात नाही की एके काळी तासाला 10-15 पाने लीहणारे आपणच होतो का? तुमचं पाहून मी पणं नक्की परत लिहायला सुरवात करेन.
ReplyDelete