Total Pageviews

Wednesday, May 15, 2013

'गृहित'क मोडताना

गेल्या वर्षीच्या चित्रपटांमध्ये मला बर्फी, वासेपूर, तुकाराम, काकस्पर्श खूप आवडले, पण काळजात घर केलं ते 'इंग्लिश विंग्लिश'नेच. मला वाटते इंग्लिश विंग्लिश हा ’अपने हाथोंसे बनाया हुवा गाजर का हलवा’, ’वडील गेल्यानंतर आईने केलेले काबाडकष्ट’ असला कोणताही मेलोड्रामा न दाखवता देखील आईचा आणि गृहिणीचा केलेला गौरवच आहे. नुकताच 'मातृदिन' साजरा झाला. तर त्या निमित्ताने आज याच चित्रपटबद्दल लिहितोय...







इंग्लिश विंग्लिशबद्दल प्रोमो पाहिल्यापासूनच उत्सुकता होती. एक तर श्रीदेवी परत येत होती आणि विषय इंटरेस्टिंग वाटत होता. त्यामुळे रिलीज झाल्याझाल्या लगेच थिएटर गाठलेच …
बहुतांश वेळेस साधारणपणे सिनेमा सुरू झाल्या नंतर पहिल्या १० - १५ मिनिटात आपोआप मन 'सिग्नल' देते की सिनेमा चांगला असणारे की नाही. तसा इंग्लिश विंग्लिश पहिल्या दहा मिनिटातच पकड घेतोय हे जाणवायला लागले.

चित्रपट सुरु होतो तो सकाळच्या चिरपरिचित दृश्यांनी. गजर झालाय, गृहिणी शशी गोडबोले (श्रीदेवी) उठून तडक कामाला लागलीये …. नवरा निवांतपणे अंथरुणात लोळून मग उठतोय…  पेपर वर पहिला हक्क त्याचा. पेपर वाचता वाचता आपसूक चहाचा कप त्याच्या हातात दिला जातोय. त्यातच घरातल्या कच्च्या बच्च्यांची आवरा आवर चालू आहेच. या सगळ्यामध्ये तिची प्रचंड धावपळ होते. अखेर मुलं, नवरा घराबाहेर पडल्यावर तिला वेळ मिळतो तो स्वतःच्या छंदासाठी , आनंदासाठी. ऑर्डरप्रमाणे लाडू बनवून देणे, हे खरेतर एक कामच, पण शशीला ते काम वाटत नाही. कारण ते तिच्या कार्यक्षेत्रातलं आहे  - स्वयंपाकघरातलं ! शशी सुगरण आहे. दुसऱ्यांना खायला करून घालणे तिला मनापासून आवडते. चार घरच्या लोकांना लाडू खूप आवडले हे सांगायला ती उत्साहाने फसफसत नवऱ्याला फोन करते तेव्हा तो तुटकपणे "कामात आहे नंतर बोलू" असे सांगून त्या उत्साहावर माती टाकतो.… तेव्हा जाणवते की इथे कणसूर लागतोय.  घरच्यांसाठी एवढं सगळं करूनही शशीची मैफल म्हणावी तशी रंगत नाहीये. कारण या आणि पुढच्या काही प्रसंगातून दिसते की तिला गृहित धरले जात आहे, नवऱ्याकडून , मुलांकडून. आणि त्याचबरोबर तिच्या मोडक्या इंग्रजीची पण वेळोवेळी टिंगल होतीये….

पुढे भाचीच्या लग्नासाठी शशी अमेरिकेत जाते आणि तिथे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून चारचौघात अपमानित होण्याची वेळ ओढवते तेव्हा मात्र ती नेटाने पण कोणाच्याही नकळत spoken english कोर्स करून इंग्रजी शिकते. ऐन परीक्षेच्या वेळेस मात्र कितीही तीव्र इच्छा असली तरीही भाचीच्या लग्नातल्या गडबडीमुळे परीक्षेला जाऊच शकत नाही. पण योगायोगाने लग्नाच्या समारंभात इंग्रजी  संधी तिच्याकडे चालून येते आणि ती त्याचे सोने करते आणि गंमत म्हणजे त्या समारंभाला उपस्थित असणारे तिचे इंग्रजीचे गुरुजी तिला परीक्षा पास झाल्याचे प्रशस्तीपत्रक सुद्धा देतात.

चित्रपटाची गोष्ट सांगायची झाली तर ती इतकी साधी सोप्पी आहे. पण पडद्यावर ज्या कौशल्याने ती विणली आहे आणि सुंदर त्यात रंग भरले आहेत की आपल्याला ती अगदी खोल जाऊन बसते.

लेखक-दिग्दर्शिका गौरी शिंदेला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. चित्रपट सुरु होतो आणि पहिल्या दहा मिनिटात ती गोष्ट केवळ शशीची नाहीच हे अगदी जाणवायला लागते. ही तर तुमच्या माझ्या आईची, काकूची, मावशीची गोष्ट वाटायला लागते. तपशील वेगळे पण गोष्ट हीच. एका गृहिणीला गृहीत धरले जाणे हे तुमच्या माझ्या आयुष्यात इतके नित्याचे झाले आहे की ते एरवी आपण जाणूनच घेऊ शकत नाही. पण जेव्हा एखादी गौरी शिंदे एक आरसा धरून आपल्याला ते दाखवून देते तेव्हा मात्र कडकडून जाणवते, आपले या ’गृहीत धरण्य”कडे किती सातत्याने दुर्लक्ष होते ते.  

चित्रपटाचा आलेख खूप छान आहे. सुरुवातीला अगदी छोटेसे असणारे शशीचे जग, अमेरिकेत आल्यावर अचानक मोठ्या अवकाशात आल्यावर सुरुवातीचे भांबावून जाणे, इंग्रजीच्या शिक्षकाने तिचा enterpreneur म्हणून गौरव केल्यामुळे तिच्यामध्ये येणारा आत्मविश्वास, मुलगा धडपडतो तेव्हा आपण आपले कर्तव्य बजावले नाही म्हणून निराश होऊन इंग्रजीची शिकवणी सोडून देणे, पुन्हा एकदा जिद्दीने परीक्षेची तयारी आणि लग्नाच्या ऐन गडबडीत लाडू वाया गेलेले पाहून हे जणू आपल्यातल्या गृहिणीच्या आणि मुख्य म्हणजे सुगरणीच्या स्वाभिमानाला ललकारले जाणे आहे असे मानून पदर खोचून मेहनतीने सगळे लाडू पुन्हा करणे हे सगळे फार सुरेख साकारले आहे. इतर कितीही गोष्टी आवडीच्या असल्या आणि त्या मनापासून कराव्याश्या वाटत असल्या तरी कोणत्याही गृहिणीला स्वयंपाकघर हे खरे कार्यक्षेत्र आणि आपल्या आप्तांचे समाधानी चेहरे ही खरी कमाई वाटते, अशी अस्सल भारतीय मानसिकता अगदी तंतोतंत टिपली अहे.

संपूर्ण चित्रपटात खास दिग्दर्शकीय स्पर्श असलेल्या कित्येक जागा आहेत. त्यातल्या थोड्या सांगतो :

चित्रपटाच्या सुरुवातीलाच नवरा चहा पिताना पेपर वाचतोय असा प्रसंग आहे. अमेरिकेत गेल्यावर एका निवांत क्षणी शशी पेपर वाचत असते इतक्यात नवऱ्याचे फर्मान येते , "चहा ss " आणि तो तिकडे येउन तिच्याकडून पेपर घेतो… स्थळ बदलले, काम नाही !!

नवरा शशीला गृहीत धरत असला तरी तो वाईट नाहीये. त्याचेही तिच्यावर प्रेम आहे. जेव्हा खूप दिवसांनी तो अमेरिकत तिला भेटतो आणि तिला जवळ घेणार तितक्यात मुलगा कुरकुरत येतो " आई sss झोप येत नाहीये" आणि थेट तिच्या कुशीत शिरतो. संपली जवळीक. "स्त्री अल्पकाळची पत्नी आणि अनंत काळची माता असते" हे आत्यंतिक घिसे पिटे वाक्य, पण त्याचा अर्थ पाच सेकंदात समोर उलगडतो तो असा.…

पुढे लग्नाच्या सगळ्या गडबडीत शशी आवरण्यासाठी खोलीत येते तेव्हा तिला दिवाणावर एक सुंदरशी साडी ठेवलेली दिसते. नवऱ्याने आणलेली खास … संपला शॉट ! अगदी हळुवार …

चित्रपटाच्या अगदी शेवटी शशी सगळ्यांना एक एक लाडू वाढत पुढे जात असते नवऱ्याच्या ताटात मात्र एक लाडू जास्त वाढते …. विशेष काळजी :)

याशिवाय एक कॅमेरा angle खासच आठवतोय. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये शशीने पुन्हा लाडू वळायला घेतलेत, तिची अमेरिकेतली भाची प्रामाणिकपणे लाडू वळण्यात मदत करतीये, तेव्हा दोघींच्या हातांवर रोखलेला कॅमेरा : भाची प्लास्टिकचे ग्लोव्हज घालून 'हायजीनिक' पणे लाडू वळतीये आणि बाजूला  शशीच्या लाडू वळणाऱ्या हातात काहीच नाहीये - अध्याहृत गोडवा तेवढा आहे.

यातली तीन पात्रं मला विशेष आणि त्यांचे शशीशी असणारे नाते मला फार आवडले.
पहिलं पात्र : सुलभा देशपांडेंनी साकारलेली गोड सासू. थोडीशी मिश्किल. सून फोनवर चौकशी करते, 'तुम्हालाच काम करावं लागतंय' म्हणते तेव्हा त्या म्हणतात "बिनधास्त राहा तिकडे… मला काही कामं करावी लागत नाहीत, मी कामं करवून घेते. म्हातारी झाल्याचा हाच तर फायदा आहे ". रोजच्या व्यापातून सुनेला सुद्धा मोठ्ठा ब्रेक हवा हे त्यांनाही जाणवतंय. कारण त्या स्वतः देखील याच रगाड्यातून पूर्वी गेलेल्या असणारेत…

दुसरं  पात्र : शशीचा फ्रेंच सहाध्यायी. भाषा, देश, संस्कृती सगळे काही वेगळे असताना शशीकडे आकर्षित झालेला, शशीला सुद्धा प्रथमच ती सुंदर आहे हे शब्दातून जाणवून देणारा पण तरीही संयमी, शांत, मर्यादेत राहणारा मित्र … कित्येक वेळा शशी त्याच्याशी तावातावाने किंवा उत्साहाने नकळत हिंदीतच बोलते तेव्हा तिचे भाव टिपणारा समंजस मित्र. आणि शेवटी शशीच्या भाचीच्या लग्नाच्या वेळी शशीला भाषा समजली नाही तरी भाव समजतील याची खात्री ठेऊन फ्रेंच मधेच बोलणारा मनस्वी मित्र ….  खूप भिडणारं पात्र.

तिसरं पात्र : शशीची धाकटी भाची … शशीच्या कुटुंबाची सदस्य नसल्यामुळे असेल कदाचित पण  शशीला गृहीत धरले जाणे तिला जाणवते आहे. ठरलेल्या चौकटीबाहेर जाऊन शशी स्वतःच्या हिमतीवर इंग्रजी शिकते आहे याला तिचा पूर्ण पाठिंबा आहे. "जन्मभर लाडू बनवणे यातच तुझे इतिकर्तव्य नाहीये" असे ठामपणे मावशीला सांगणारी आणि मावशीला घरच्या कार्यामुळे परीक्षा देत येणार नाही हे कळल्यामुळे मनापासून दु:खी होणारी भाची खरेतर शशीची मैत्रीणच आहे. फ्रेंच मित्राला शशी आवडते हे कळल्यावर ती मैत्रीच्या नात्याने विचारते सुद्धा "तुला तो आवडतो का" त्यावर शशीचे उत्तर फार छान आहे "मला प्रेमाची आवश्यकता नाहीये , आवश्यकता आहे ती सन्मानाची". किती साधं पण किती नेमकं उत्तर !

कथेची मांडणी आणि त्यातले बारकावे हे यातले प्रमुख घटक असले तरी चित्रपटाला चार चांद लावलेत ते दोन गोष्टींनी. पहिली म्हणजे श्रीदेवीचा अविस्मरणीय अभिनय. चित्रपट येण्यापूर्वीच तिचा comeback म्हणून मला फार उत्सुकता होती. ती तिने फोल ठरवली नाही.    विचित्र थरथरत्या आवाजाच्या उणीवेवर तिने सूक्ष्म हावभावांनी आणि डोळ्यांनी सहज मात केली आहे. तिच्या पिढीच्या कुठल्या अभिनेत्रीला (माधुरी वगैरे)  ही भूमिका निभावता आली असती असे वाटतच नाही. त्यामुळे तिला १ ० ० पैकी  १ ० ० गुण.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकमेवाद्वितीय अमित त्रिवेदीचे संगीत. हा माणूस अजब रसायन आहे. अनुराग कश्यप सोबत काम करतो तेव्हा त्या चित्रपटामधला सगळा अत्रंगीपणा याच्या संगीतात उतरतो. आणि इथे इंग्लिश विंग्लिश सारखा करताना त्याला साजेशी अशी 'जियारा धाकधूक होय…' आणि 'नवराई माझी…' सारखी सुंदर गाणी देतो

 (धाकधूक…  या गाण्यामध्ये मुलांना सोडून दूरदेशी जायचे या कल्पनेने आई हळवी झालीये

 'घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलांपाशी'  अशी काहीशी कातर अवस्था अमित त्रिवेदीच्या संगीतातून आणि गायक म्हणून गळ्यातूनसुद्धा तंतोतंत उतरली आहे ….)   एकुणात काय तर हा चित्रपट मला अंतर्बाह्य आवडून गेला. अनेक चित्रपट आवडतात. पण मोजकेच असे असतात हे मनाच्या कप्प्यात जाऊन बसतात. त्यातलाच हा एक… एका समीक्षकाने याला अडीच 'स्टार' दिले होते, एकाने म्हटले होते " 'इंग्रजी न येणे म्हणजे उणीव आणि ते आले म्हणजे काही विशेष होणे' अशी मानसिकता यात का आहे" मला वाटते या दोघांनाही या चित्रपटाचा आत्माच समजलेला नाहीये. असो. एकाच गोष्टीबद्दल लोकांची मते वेगवेगळी असू शकतात. मला चित्रपट भावला कारण मी रोज घरात, आसपास पाहत असलेल्याच गोष्टी यात आलेल्या आहेत. प्रेम करणारी आई आहे, गृहीत धरणारे पण वाईट नसणारे कुटुंबीय आहेत, एक आपलीशी वाटणारी कुटुंब संस्था आहे.  मातीतला चित्रपट म्हणजे असते काय दुसरे ? झोपडपट्टी, शेतकऱ्यांचे हाल, अंधार, दारिद्र्य, शोषितांचे दु:ख दाखवले म्हणजेच मातीतला चित्रपट होतो असे थोडेच आहे ? अपूर संसार, सलाम बॉम्बे जेवढे या मातीतले होते तेवढेच घरोंदा, छोटीसी बात आणि अभिमान पण होते. आणि ८० % चित्रीकरण देशाबाहेर होऊनसुद्धा 'इंग्लिश विंग्लिश'  सुद्धा तितकाच अस्सल 'मातीतला' आहे. चित्रपट बघून परतलो तेव्हा माझा आईकडे पाहायचा दृष्टीकोन जास्त व्यापक झाला एवढे नक्की. पहिला नसल्यास नक्की पहा.  तुमचाही नक्की होईल. आई, सून, बायको, बहीण, मावशी या सगळ्या भूमिका एकाच वेळेस वठवणारी त्यामधली गृहिणी ही फक्त चित्रपटातली नव्हे तर खऱ्या आयुष्यातलीही नायिका (खरेतर unsung heroine) आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले हे फार महत्वाचे आहे. धन्यवाद गौरी शिंदे !!!!

4 comments:

  1. Nice one mitra... awadala... magil lekha peksha khupach sundar lihile ahes.

    ReplyDelete
  2. chan lihile ahe. punha movie baghat ahe asa vatla ani tyatlya kahi baarik goshti (handgloves etc) mazya manaat adhorekhit zalya :)

    ReplyDelete
  3. kay bolave..
    nehami pramane apratim..tula jashi ti goshta dislis tashi ti amhalahi dakhavalis..

    movie kashi hoti? tar
    timepass
    ekda baghnya sarkhi
    family la gheun janya sarkhi

    ya palikade jaun konitari boltey ani te hi itke nemake he awadale mala
    ata tu shots baddal boltoys teva janavale ki camera farach angwalani padala aahe tuzya :)

    ReplyDelete