महेश मांजरेकरचे नाव
दिग्दर्शक म्हणून ऐकले तेव्हा 'शिक्षणाच्या आईचा घो' सारखा कचरा आपल्या नशिबी येणार
की 'काकस्पर्श' सारखा अप्रतिम चित्रपट पुन्हा बघायला मिळणार हा एक प्रश्न होताच, पण
नाना आणि नटसम्राट हे दोन एका दमात उच्चारले गेले तीच वेळ श्वास रोखून धरायला लावणारी
होती ! 'टू सी ऑर नॉट टू सी' हा प्रश्नसुद्धा मनात येणे शक्य नव्हते. काहीही
असले तरी नानासाठी हा बघायचाच हे केव्हाच ठरले होते. खरे सांगायचे तर ट्रेलर मध्ये
नाना वगळता अन्य गोष्टी यथातथाच वाटत होत्या पण प्रत्यक्ष चित्रपटाने मात्र खिळवून
ठेवले !
खरेतर नाटकाचा चित्रपट
करणे म्हणजे कठीण काम. शिवाय 'नटसम्राट' मधली दीर्घ स्वगते चित्रपटात तशीच्या तशी घेणे
शक्य नव्हते. असे असताना चित्रपटाची स्क्रिप्ट खरोखरच डोके लावून लिहिली आहे. याचे
श्रेय पूर्णपणे मांजरेकर आणि अभिजित देशपांडे यांना जाते. सगळी स्वगते घेणे शक्य नाही
तरीही स्वगतांच्या जागा खुबीने पेरल्या आहेत. त्या सर्वच चपखल आहेत असे नाही पण प्रयत्नांना
दाद द्यायला हवी. विक्रम गोखलेंच्या पात्राची पटकथेत घातलेली भर हा एक अतिशय आवडलेला
भाग ! राम नावाचे हे पात्र म्हणजे नाना पाटेकर उर्फ आप्पासाहेब बेलवलकरांपेक्षा
अभिनयात सरस असूनही मानसन्मान आणि व्यावसायिक यशाच्या बाबतीत मागे राहिलेला त्यांचा
जिवलग ! एवढेच नाही तर त्यांना संततीसुखाच्या बाबतीत देखील आप्पासाहेबांपेक्षा मागेच
(अर्थात त्या मुलांकडूनदेखील आप्पासाहेबांचा भ्रमनिरास होतो हा भाग अलाहिदा). पण हा
राम रोखठोक बोलून नेहमीचा आप्पासाहेबांना काही अंशी जमिनीवर ठेवतो. इतकेच काय तर स्वतःच्या
संसारात रमल्याने मित्राला विसरलेल्या आप्पासाहेबांना झापडवून भानावरसुद्धा आणतो…
पटकथेतला अजून एक अत्यंत
आवडलेला भाग म्हणजे चित्रपटातून खुद्द वि.वा.शिरवाडकरांनाच दिलेला tribute… पहिला प्रसंग
अतिशय महत्वाचा - राम मृत्यशय्येवर असताना त्याच्या आणि आप्पासाहेबांदरम्यानच्या संवादात
एका नाटकातले कृष्णार्जुनाचे संवाद नकळत मिसळत जाऊन रामच्या त्या अवस्थेशी कर्णाची
परिस्थिती अत्यंत चपखलपणे जुळत जाते. कारण जसा कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर
असूनही त्याला कधीच तशी मान्यता मिळाली नाही तसेच राम हा आप्पासाहेबांपेक्षा राम श्रेष्ठ
नट असूनही मागे राहिलेला ! हे संवाद खुद्द तात्यासाहेब शिरवाडकरांच्या 'कौंतेय'
या कर्णाच्या जीवनावरच्या नाटकातलेच आहेत. विक्रम-नानाच्या या प्रसंगाची गुंफण म्हणजे
चित्रपटाच्या लेखकाच्या उत्कृष्ट प्रतिभेचा परिपाठच ! यातल्या संवादांची जुळवाजुळव
ही कल्पना पटकथाकारांच्या डोक्यातली आहे की संवादलेखक अभिजित देशपांडे/किरण यज्ञोपवीत
यांच्या डोक्यातली याची मला कल्पना नाही पण ज्याने कुणी हे केले आहे त्याची पाठ थोपटायला
हवी ! दुसरा tribute तसा कमी महत्वाचा - पण दाद देण्याजोगा. आप्पासाहेब जेव्हा
बुटपॉलीशवाल्यासोबत नाटक बघायला जातात ते नाटक म्हणजे खुद्द वि. वा. शिरवाडकरांचेच
'ययाती आणि देवयानी' आहे !
या चित्रपटात पटकथेपेक्षाही
जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे यातले एकमेवाद्वितीय संवाद ! मूळ नाटकातले शिरवाडकरांचे
अतिप्रसिध्द संवाद वगळता मला जास्त संवाद माहित नव्हते पण यातले सर्वच संवाद इतके उत्कृष्ट
आहेत की शिरवाडकरांचे आणि किरण यज्ञोपवीत/ अभिजित देशपांडेचे वेगळे काढताच येऊ
नयेत. एका review मध्ये मी या चित्रपटाचा उल्लेख 'उत्तुंग शब्दलेणे' असा वाचला होता
तो अक्षरशः खरा आहे ! आणि हे फक्त गंभीर संवादासंदर्भातच नाही तर खुसखुशीत संवादाबाबतीत
देखील लागू आहे. इतकेच काय पण यातले अनावश्यक वाटणारे किंवा लांबलेले प्रसंग देखील
संवादांच्या जोरावर तरून गेले आहेत …
आता कलाकारांबदल : मृण्मयी
देशपांडेला पुरुषोत्तममध्ये 'पोपटी चौकट' मध्ये पहिले तेव्हापासूनच तिच्या अभिनयाची
ताकद जाणवली होती आणि ती पुढे अग्निहोत्रमध्ये पुन्हा प्रकर्षाने दिसली होती. इथे ती
पुन्हा एकदा अव्वल आहे. आई-वडिलांवर चोरीचा आळ घेतला म्हणून गांगरून जाउन माफी मागायला
येते तो प्रसंग ! त्यातल्या तिच्या विनवण्या, त्यावर नानाची आतून धगधगत असूनही वरवर
थंड आणि बोचरी प्रत्युत्तरे आणि मेधा मांजरेकरचा विस्फोट हा मूर्तिमंत हादरवून टाकणारा
आणि हलवून सोडणारा प्रसंग !! या प्रसंगाचे वर्णन करणे हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
त्यापैकी कोण श्रेष्ठ अभिनय करते आहे हा प्रश्नच फिजूल आहे. सर्वांच्याच अत्युत्कृष्ट
अभिनयाचा 'समसमासंयोग' होतो तेव्हाच असे काहीतरी अनुभवास येते. पडद्यावरचे सगळे
कल्पित आहे, एवढेच नाही तर हा एक प्रकारचा कालबाह्य शैलीतला मेलोड्रामा आहे हे सगळे
लख्ख माहित असूनही मी अश्रू थोपवू शकलो नाही … आणि बहुदा बरेचसे लोक हेच अनुभवत असावेत.
मेधा मांजरेकर हे यातले
खर्या अर्थाने 'surprise package' आहे. खरेतर तिने दे धक्का मध्ये झकासच काम केले होते
तरीही नानासोबत मेधा 'सरकार' चा रोल करते आहे हे कळले आहे तेव्हा निराशाच झाली होती.
पण तिने फारच छान काम केले आहे. विशेषतः वरती उल्लेखलेल्या प्रसंगातला तिचा अभिनय चिरस्मरणीय
आहे. विस्फोट देखील आकांडतांडव न करता कसा करता येऊ शकतो याचे ते उत्तम उदाहरण !
ज्याच्या अभिनायासाठी
हा चित्रपट मी बघायला गेलो (आणि तमाम जनता जाते आहे) तो नाना कसा आहे ? तर तो खऱ्या
अर्थाने 'बाप' आहे !! नाना हा कुठल्याही चित्रपटात 'नाना'च असतो हा त्याच्यावरचा बराचसा
रास्त आरोप. त्या अर्थाने तो इथेही बराचसा 'नाना'च आहे (विशेषतः त्याचे जाता जाता टाकल्यासारखे
वाटणारे 'वन लायनर्स' तर अशक्य आहेत). पण खरे सांगू का, नाना हा मुळातच 'नटसम्राट'
असल्याने तो 'नाना' म्हणून उभा राहिला तरी 'नटसम्राट' साकारत जातो !! सून आणि
मुलासोबत बोलतानाचे बोचरेपण, नातीसोबतचा आणि कावेरी सोबतचा हळवेपणा, राम सोबत एकाच
वेळेस असणारे तिरकसपणा, आदरभाव, उत्कटता यांचे मिश्रण अशा भूमिकेच्या साऱ्या मागण्या
नानाने उत्कटतेने उतरवल्या आहेत पडद्यावर … आणि शेवटचे स्वगत तर कळसच !!
राहता राहिले विक्रम
गोखले उर्फ राम ! या माणसाबद्दल काही बोलायचे बाकी राहिले आहे असे वाटत नाही.
आप्पासोबतच्या दारू पिण्याच्या पहिल्याच प्रसंगात असे काही sixer मारले आहेत की बस्स
!!! फक्त चेहराच नाही तर संपूर्ण शरीर कसे अभिनय करते ते या प्रसंगात बघून थक्क व्हायला
होते. साधी गोष्ट - टेबलावर ग्लास ठेवणे ! पण नशा चढत चाललेला हा माणूस समोरच्या टेबलाच्या
उंचीचा अंदाज घेत त्यावर ग्लास धाडकन न ठेवता असा काही काळजीपूर्वक ठेवतो की या अभिनायातल्या
बारकाईने हादरायला होते. 'नटसम्राट' म्हणून उभा राहिला असता या माणसानेदेखील तर रान
पेटवले असते असे राहून राहून वाटत होते मला. आख्खा चित्रपट एकट्याच्या खांद्यावर तोलून
नेण्याचे सामर्थ्य असलेला बाहुबलीच जणू ('अनुमती' मध्ये ते दिसलेच होते) !! पण हेही
तितकेच खरे आहे की या चित्रपटाचे अफाट व्यावसायिक यश (पहिल्याच आठवड्यात २२ कोटी
!) हे नानाच्या अभिनयसामर्थ्याइतकेच नानामधल्या X factor मध्येही आहे.
विक्रम गोखले जर नटसम्राट असले असते तर तिकीटबारीवरचा एवढा पूर पाहायला मिळाला असता
असे वाटत नाही.
इतक्या सर्व जमेच्या
बाजू असताना उणे काय आहे ? बऱ्याच आहेत…. मुख्य म्हणजे दिग्दर्शन अनेक ठिकाणी अडखळते.
चित्रपटात भावुक करणाऱ्या अनेक गोष्टी असल्या तरी अनेक प्रसंगांत लोक अश्रूपात करण्यासाठी
ठरवून आल्यासारखे दिसतात. उदा. राम नकळत मूल नसल्याबद्दल बोलून जातो आणि दुसऱ्या क्षणाला
त्याच्या बायकोचे कावेरीच्या खांद्यावर डोके ठेवून रडणे सुरु. राम मृत्युशय्येवर असताना
त्याचा आणि आप्पांचा कर्णार्जुनांचा नाट्यमय संवाद सुरु होतो ते ऐकायला त्या तथाकथित
हॉस्पिटलमध्ये नर्स वगैरे मंडळी दुसऱ्या-तिसऱ्या वाक्यालाच हजर होतात. आणि पुढच्या
२-३ वाक्यात डोळ्यातून पाणी वगैरे सुरुवात !!! जी अश्रूंची तीच गोष्ट टाळ्यांची… आप्पासाहेब
थेटरात प्रयोग बघून निघत असताना न राहवून 'टू बी ऑर नॉट टू बी' हे स्वगत म्हणू
लागतात. बाहेर पडणारे ते ऐकून थबकतात. खरेतर इतक्या अनपेक्षितपणे असे काही दमदार ऐकून
कोणीही थरारून जाईल आणि काही क्षणतर स्तब्ध होईल. इथे लोक इतके टाळ्या वाजवायच्या घाईला
आलेले असतात की कधी एकदा आप्पांचे स्वगत संपते आहे आणि आपण टाळ्या पिटतो याची जणू वाट
बघत असावेत. या इतक्या जाणत्या दिग्दर्शकांना दोन संवादांमधला मोकळा अवकाश किती महत्वाचा
असतो हे जाणवतच नाही की ते दुर्लक्ष करतात ? ('कट्यार'मध्ये हीच घाई होती, त्याबद्दल
मी आधी लिहिले आहेच).
शिवाय हा चित्रपट त्यातून दिसणाऱ्या नेपथ्य, कपडे वगैरे गोष्टींमधून काळाच्या झोपाळ्यावर इतके हिंदोळे घेतो की तो १९४० ते २००० एवढ्या मोठ्या span मध्ये घडतोय असे वाटावे. आप्पांच्या मुलीच्या लग्नातली कार एकदम vintage , तिच्या घरचे नेपथ्य (मेजापासून ते मेणबत्ती stand पर्यंत सगळे) हे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या 'फॉरेन returned' माणसाचे राहणीमान असावे तसे. नातीच्या gathering च्या वेळी १९८९ अशी पाटी, रामची बायको हॉस्पिटलमध्ये असताना सगळी instruments २००० च्या दशकातली. नुसता गोंधळ !! त्याचमुळे आशयाला फार धक्का पोहोचतो अशातला भाग नाही पण ते इतक्या गोष्टी चांगल्या असताना या गोष्टी विनाकारण डोळ्यात खुपत राहतात…
मुलीचे घर कधीच सोडलेले असूनही (तेही धो धो पावसात !!) आप्पांचे कपडे हे अनेकदा इतके शुभ्र दिसतात की ते परीटघडीचे वाटावेत ! नानाचा म्हतारपणचा मेकअप झकास आहे पण मेधा मांजरेकर इतकी तुकतुकीत आणि फ्रेश दिसते की तिच्या पांढऱ्या केसांना काहीही अर्थ उरत नाही …
मूळ नाटकातले बेलवलकर
हे तसे बरेचसे सज्जन वगैरे गटात मोडणारे होते असे मला सांगण्यात आले आहे. त्यापेक्षा
इथले बेलवलकर वेगळे आहेत. नटसम्राट असले तरीही सद्गुणांचा पुतळा नाहीत. त्यांच्यातही
उणीवा आहेत, तेही vulnarable आहेत कारण ते कलंदर वृत्तीचे आहेत हे दाखवण्यावर पटकथेचा
फोकस आहे. त्यावर माझ आक्षेप नाही पण त्यांना तसे दाखवण्याच्या नादात त्यांच्या दारू
पिण्यावर इतका जास्त भर दिला आहे की त्यामुळे अक्षरशः त्यांची dignity हरवायला लागते.
विशेषतः मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या partyचा दारू ढोसून येऊन केलेला विचका करण्याचा
प्रसंग तर (तो बरीचशी करमणूक करत असला तरी) 'नटसम्राटा' विषयीची बरीचशी सहानुभूती गमावणारा
ठरतो (निदान मला तरी असे फार जाणवले).
(जाता जाता : माझे आणखी
एक निरीक्षण आहे. ते बरोबर आहे का हे कुणीतरी कृपया सांगावे : आप्पासाहेबांचे घर, मुलीची
शाळा आणि रामला शेवटी ठेवलेले असते ती रुग्णालयातली खोली या सगळ्या गोष्टी एकाच इमारतीतल्या
वाटत होत्या. तसे जर खरच असेल तर महेश मांजरेकरसारख्या मराठीतल्या 'showman'
चा चित्रपट असूनसुद्धा शूटिंग locations साठी इतकी काटकसर का केली देव जाणे.)
आता इतक्या उणीवा लिहिल्यानंतर
'चित्रपट बघावा का?' असे मला कुणी विचारले तर या प्रश्नाचे उत्तर मी देईन 'अजिबातच
चुकवू नये'. इतक्या साऱ्या खटकणाऱ्या गोष्टी असूनही मी अगदी तल्लीन होऊन चित्रपट बघू
शकलो. आप्पा, कावेरी, रामच्या सुखदुःखाशी समरस होऊ शकलो. इतकेच नव्हते तर घड्याळाकडे
बघण्याची वेळच आली नाही. कारण ? अर्थातच अलौकिक शब्दसामर्थ्य आणि अविस्मरणीय अभिनय
!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteमी गेल्या महिन्यातच नाटक पहिले आणि मला तेंव्हा जाणवला कि नानांनी हा चित्रपट गाजवला असणार ..... मुळात मला एक गोष्ट (कट्यार आणि नटसम्राट) आवडली कि नाटकाची व्याप्ती stage च्या बाहेर गेली कि किती सुंदर खुलते.
ReplyDeleteनवीन कट्यार(नाटक) पाहायला सुरु केलेला पण त्याआधी सिनेमा पहिल्याने तशी ग्रीप नाही आली (कदाचित TV वर पहिल्याने पण असेल तसे)
खूप आवर्जून वाट बघतोय ह्याची इथे नटसम्राटची ....
आणि शेवटी तुझ्या ब्लोगची खरच आतुरतेने वाट बघत होतो नटसम्राट वर... आणि खरोखर तो तू खूप सुंदर आणि समर्पक लिहिलयस ... मुळात तुझ्या लिखाणात पण मला बरेच प्रसंग डोळ्यासमोर आले ... सहज म्हणून सुचवतोय पण जमल्यास "मला समजलेले बाजी राव " हा आजचं पिढीला समजणार ब्लोग लिही.... सगळेच जन राउ वाचतील असे नाही पण निदान एका ब्लोग मध्ये समजून घेता आल तर नक्की राउ वाचतील(नरहर कुरुन्दाकारान्नी जसा शिवाजी वर लिहिलंय) ....
पुढील सर्व ब्लोगसाठी शुभेच्छा !!!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteMast. Review vachatana tuch bharbharun boltoys asa vatla. Baki cinema pahilyavar boluch :)
ReplyDeleteपशा, अद्याप चित्रपट पाहिला नसल्यामुळे तुझ्या अभिप्राया बद्दल चा अभिप्राय राखून ठेवतो. पण उत्तम लिहिलय .. नेहमी प्रमाणे
ReplyDeleteवा वा!!!
ReplyDelete