Total Pageviews

Friday, January 22, 2016

एका आत्महत्या पंथाची अखेर



गावोगावी उगवलेले बुवा-बाबांचे पीक, त्यांनी केलेली फसवणूक, नरबळी, लूट या गोष्टी आपल्याला नवीन नाहित. किंबहुना आपला देश 'फॉरेन' च्या तुलनेत किती अंधश्रद्ध नि मागासलेला आहे हे दाखवायला अनेक लोक उत्सुक असतात पण असा अंधविश्वासू वर्ग अगदी अमेरिकेतही अस्तित्वात होता, आहे आणि असतो हे अगदी ठळकपणे दाखवून देणारे हे पुस्तक. ज्येष्ठ पत्रकार, 'सकाळ'चे माजी संपादक विजय कुवळेकर यांनी अतिशय अभ्यासपूर्वक आणि तपशीलवार लिहिलेले हे पुस्तक वाचले तेव्हा अक्षरशः चक्रावून गेलो होतो

ही सत्यकथा आहे रेव्हरंड जिम जोन्सची. तऱ्हेतऱ्हेच्या गुणावगुणांचे अजब रसायन. जिम अमेरिकेतल्या लीन नावाच्या लहान गावात जन्माला आला. जन्मापूर्वीच त्याच्या आईला स्वप्नात दृष्टांत झाला होता "तुझा मुलगा सर्वांचा उद्धार करेल". जिमचा सुरुवातीचा रस्ता योग्य होत. पण नवा मार्ग बनवण्याच्या नादाने तो इतका पछाडला की आपल्यासोबत हजारो लोकांना तो खाईत लोटून गेला

जिमचे वडील खरेतर निग्रोद्वेषी  संघटनेत होते. पण लहानपण पासून जिमचे मन मात्र समानता, समाजवाद यांच्याकडे ओढ घेत होते. कोणत्याही सुधारकच्या वाट्याला येतो तसाच सामाजिक विरोध त्याच्या वाट्याला आला. एकीकडे तो कनवाळू, प्राणीमित्रसुद्धा होता तर दुसरीकडे तो अतिशय आग्रही - खरेतर हट्टी - असा होता. मित्रांना टोचून बोलायचा पण तरीही मित्र त्याला सोडून जायचे नाहीत. त्याचे व्यक्तिमत्वच जणू चुंबक होते

वयाच्या १३-१४ व्या वर्षापासून तो ख्रिस्तधर्माविषयी प्रवचने द्यायचा. हळू हळू तो चर्चचा सदस्य बनला. त्याच्या समाजवादी स्वप्नांममधूच 'People's Temple' म्हणजेच 'लोकांचे देवालय' जन्माला आले. 'बोले तैसा चाले' ही त्याची वृत्ती होती. तो लोकांना जसा उपदेश करायचा तसाच स्वतःही वागायचा. त्याने अनेक मुले दत्तक घेतली - ज्यात अनेक निग्रो मुलांचाही समावेश होता. त्याच्या अनुयायांचा परिवार खूप मोठा होता. पण हा सर्व परिवार तो एकाच ठिकाणी कधीच ठेवत नसे. समाजातले हितशत्रू लोक मोडता घालतात या सबबीखाली तो त्याचा काफिला लमाणांसारखा सतत हलवत राहायचा. कधी इंडियानापोलीस, कधी कॅलिफोर्निया तर कधी चक्क ब्राझील ! पुढे रशियात जायचेही त्याचे स्वप्न होते. शेवटी अखेर त्याने गयाना मध्ये बस्तान  बसवले

 
हळूहळू स्वतःच्या प्रसिद्धीचे मध्यम म्हणून तो वृत्तपत्रांकडे पाहू लागला. समाजात स्वतःचे वजन वाढवले. पाय जमिनीवर नसलेल्या लोकांचे होते तेच त्याचेही होऊ लागले. मनातली परोपकाऱ्याची जागा दिखाव्याने घेतली. अहंकाराने त्याला गिळंकृत केले. बायबल पायाखाली घेऊन तो प्रवचने देऊ लागला. येशुपेक्षाही श्रेष्ठ असल्याची बतावणी करू लागला. 'अंतिम मुक्तिदाता मीच' अशा वल्गना करू लागला. 'माझे अनुयायी व्हा आणि पुण्य कमवा' अशी आमिषे दाखवू लागला. धर्मादाय संस्थेच्या नावाखाली पैश्याच्या राशीत लोळू लागला. हळूहळू भारतात घडते तसेच घडले. लाखो अंध भाविकांच्या बळावर हा विषवृक्ष फोफावू लागला

जोन्सच्या धूर्तपणाची साक्ष देते ते म्हणजे त्याचे अफलातून planning. केव्हा, कुठे आणि काय करायचे याचे  आराखडे त्याच्या डोक्यात तयार असायचे. डोळे दिपून अनुयायी झालेल्यांना 'जमेल तेवढे दान माझ्या कार्यासाठी द्या' असे सांगता सांगता त्यांच्या पासपोर् सकट सगळे ताब्यात घ्यायचा. वैतागून लोकांनी बाहेर पडू नये यासाठी एक अतिशय हलकट उपाय त्याच्याकडे होता. तो आधीच अनुयायांकडून निरनिराळ्या कागदावर एक प्रकारचे self declaration लिहून घ्यायचा, उदा. 'मी (म्हणजे त्या अनुयायाने सरकार विरोधी कट रचला' किंवा 'मी अमकीतमकीवर बलात्कार केला' . मग कायतो अनुयायी जर  पळून गेला तर ती आधीच लिहिलेली निवेदने तो सरळ पेपरातून प्रसिद्ध करून द्यायचा . पळालेल्याला जगात तोंड दाखवायला जागा उरायची नाही.

त्याने सदैव सजगता दाखवणारा पत्रलेखकांचा ताफा तयार ठेवला होता. कोणी जोन्सची स्तुती केली तर आनंद व्यक्त करणारी हजारो पत्रे हे लोक लिहून वर्तमानपत्रांना पाठवायचे किंवा कुणी टीका केली तर निषेध करणारी पत्रे ! याशिवाय जोन्सची कीर्ती पसरवण्यासाठी त्यांचे लिखाण चालू असायचेच.

जोन्सचा स्वभाव अतीविक्षिप्त होता. तो पीपल्स टेम्पलच्या अनुयायांना क्रूर शिक्षा द्यायचा आणि ती भोगताना अपराध्याला 'Thank you father' ची पारायणे करायला लावायचा. क्रौर्याची सीमा गाठणाऱ्या शिक्षा तो स्वतःच्या हातांनी मात्र द्यायचा नाही. त्याचे 'देवदूत' शिक्षा द्यायचे आणि हा ते बघत बघत खिदळायचा. जोन्स स्वतः लिंगपिसाट होताच आणि त्याच्या अनुयायी पती-पत्नींनाही अत्यंत विकृत शिक्षा द्यायचा. असा हा क्रूर माणूस अणुयुद्धाला मात्र प्रचंड घाबरायचा. त्याच्या मनात सतत अधिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायचे विचार घोळायचे.

हळूहळू त्याच्या कृत्यांच्या बातम्यांना पाय फुटू लागले.  'न्यू वेस्ट' नावाच्या वृत्तपत्राच्या किल्डफ नावाच्या वार्ताहराने त्याचे बिंग फोडणारा मजकूर प्रसिद्ध केला. ते साल होते १९७७. जोन्सला याची कुणकुण लागली होतीच. त्याने गयानाला पळ काढला. तिथे त्याचे 'जोन्स टाऊन' आधीच तयार होते !! त्या धूर्त माणसाने ते आधीच उभे केले होते.

जोन्स टाऊनमधल्या शेतावर त्याने आपल्या अनुयायांना मजुरासारखे राबवायला सुरुवात केली, आणि तीही एकही पैच्या मोबदल्याशिवाय ! केवळ कैद्यांना मिळते त्या दर्जाचे जेवण द्यायचा. अशातच एका 'शिस्त मोडणाऱ्या' अनुयायाला ठार करून प्रेत रेल्वे मार्गावर टाकून देण्यात आले. या क्रूर कृत्यापासून जोन्सचा शेवटचा अध्याय सुरु झाला. 'लिओ रायन' हा अमेरिकेतला खासदार हा त्या मृताचा  नातेवाईक होत. तो वकिलांना घेऊन थेट जोन्सटाऊनमध्येच येउन थडकला. सुरुवातीला जोन्सच्या धाकापोटी त्याच्या अनुयायांनी आपण अगदी खुशीत असल्याचे भासवले. पण थोडा जोर लावल्यावर सगळे मुखवटे हळूहळू गळून पडू लागले. एकाने तर जोन्सदेखतच रायनला सांगितले, "मला अमेरिकेत परतायचे आहे". जोन्सला संताप गिळ्ण्याशिवाय पर्याय नव्हता. एक एक करून अठरा जण तयार झाले. सगळे गयाना विमानतळाकडे निघाले. १८ जणांबरोबर जोन्सचा एक अतिविश्वासू साथीदारही 'टेंपल' सोडून निघाला. हे पाहून इतर १८ जणांच्या मनात पाल चुकचुकली. अन् झालेही तसेच ! सगळे विमानात बसताना त्या साथीदाराने आतून आणि ऐनवेळी tractor वरून आलेल्या अन्य साथीदारांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यात छायाचित्रकार आणि लिओ हे नाव करणारा तो धडाडीचा खासदार यांचा दुर्दैवी अंत झाला. काही अनुयायी आणि लिओबरोबरचे अनुयायांचे नातेवाईक जखमी झाले किंवा कसेबसे पळून गेले. सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे विमानतळावरच्या सैनिकांनी बघ्याची भूमिका घेतली ! आणि वर "आम्ही काही केले असते तर गोळीबार वाढून आणखी काही जीव गेले असते" असे लंगडे कारणही दिले.

इकडे या कटाचा सूत्रधार जिम जोन्सच्या मनाचा थांग तर येशुलाही लागू शकत नव्हता. जोन्सने सर्वांना बोलावून सांगितले, "आपल्याला या जगात कोणी जगू देणार नाही. त्यापेक्षा स्वतःहून मृत्यू पत्करून आपण आपली मूल्ये जगाला पटवून देऊ. विमानतळावर काही गडबड झाली तर पोलिस पकडून तुमच्या मुलाबाळांना छळतील, मारतील… त्यापेक्षा तुम्ही स्वहस्तेच मुलांना विष पाजा… " कहर म्हणजे अनेकांना ते पटले. 'जिवंतपणे मृतवत् राहण्यापेक्षा खरे मरण बरे' असा त्यांनी विचार केला असावा. सर्वांनी विष पिउन सामुदायिक आत्महत्या केली. जोन्सने स्वतःनेही गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.



तिकडे गयाना पोलिसांना गोळीबाराची माहिती कळल्यावर त्यांनी जोन्सटाऊनकडे धाव घेतली. तिथे जाउन पाहतात तर काय , प्रेतांचा खच पडला होता. मुख्य हॉल व इतर घरांमध्ये आढळलेल्या मृतांची संख्या जवळजवळ ९०० होती. प्रेतांची विल्हेवाट लावणे हा एक यक्षप्रश्नच होता. जोन्सची प्रचंड संपत्ती गायब होती …. अर्थात ती घेऊन पोबारा करणाऱ्यांना लवकरच पकडण्यात आले.

जोन्सच्या मृत्यूनंतरही बरेच वाद झाले. मेलेला जोन्सच आहे हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध करावे लागले. त्याच्या तपासणीत डोक्यातल्या गोळीसोबतच पोटात विषही सापडले. वैद्यकीय अहवाल पूर्णपणे प्रकाशातच आला नाही. पकडलेल्या जोन्सच्या सहकाऱ्यांपैकी एकाने पत्रकार परिषद घेऊन जोन्स कसा निरपराध होता हे पटवायचा प्रयत्न केला आणि toilet मध्ये जाउन गोळी झाडून आत्महत्या केली !

अशी ही मुलखावेगळी जीवनकहाणी रेव्हरंड जिम जोन्सची. पुस्तकाच्या शेवटी सगळ्या घटनांचा अन्वय लावताना विजय कुवळेकर लिहितात, 'जोन्सला विकृत, माथेफिरू, हुतात्मा यापैकी कोणतेही विशेषण पूर्णतः लागू होत नाही. सर्व विशेषणांचे त्याच्यामध्ये अजब म्मिश्र्न होते. त्याच्या कृत्यांचे कदापीही समर्थन शक्य नसले तरीही त्याच्यामागे हजारो अनुयायी गेले ही गोष्ट नजरेआड करता येणार नाही.'

एकूणच जोन्सचे उत्तरायुष्यात जगण्याचे उद्दिष्ट काय होते हे जसे आपल्याला कळत नाही तसे सर्वांना घेऊन मृत्यूचे दार ठोठावण्यामागे काय तत्वज्ञान होते हेही समजत नाही. इतिहासात नोंद व्हावी ही तीव्र इच्छा पुरी करण्यासाठी त्याने इतका विचित्र, विकृत आणि विध्वंसक मार्ग का निवडावा याचे उत्तर केवळ जोन्सकडेच असू शकते … आणि कदाचित नियतीकडे !

(सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)

पुस्तक : एका आत्महत्या पंथाची अखेर
लेखक : विजय कुवळेकर
प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन
पृष्ठे : अंदाजे १५०




 या व्यतिरिक्त अन्य तपशील विकिपीडियाच्या या दुव्यावर मिळतील : https://en.wikipedia.org/wiki/Jim_Jones



काही डॉक्युमेंटरीज यूट्यूबवर उपलब्ध आहेत त्या अशा

No comments:

Post a Comment