'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या वृत्तीचा स्वप्निलला तिटकारा
होता. खास करून स्वतःकडे अपेक्षेपेक्षा कमी असूनही त्यामध्ये संतुष्ट असणारी माणसं
बघून त्याचं माथं भडकायचं. 'इतके संतुष्ट कसे राहता तुम्ही?'
तो मनातल्या
मनात खेकसायचा. ‘मी तुमच्यासारखा आहे का? माझ्यापाशी जे नाही ते मला कधीच
नको इतकी क्षुद्र वृत्ती नाही माझी. माणसापाशी हवं ते सर्व असलं तर बिघडलं कुठे ?’ असं त्याला खडसावून विचारावंसं
वाटायचं. पण जीभ कचरायची...
काय कारण ?
छे छे, ते सोडून विचारा..
कारण असा
प्रश्न त्याने एखाद्या 'असंतुष्टा'ला विचारला असता तर स्वप्निलवर
प्रतिप्रश्नाचा वार झाला असता : "का हो ? तुमच्याकडे असं काय नाही जे
मिळवायला तुम्ही जीवाचा कारखाना करताय ?" स्वप्निलला या प्रश्नाची खूप भीती
वाटायची. का बरं ? त्याच्याकडे काय नव्हतं ? पैसा? अं हं ! गर्भश्रीमंतीत वाढलेला
नसला तरी पैशांची चणचण वगैरे नव्हतीच कधी. मग आईवडिलांचं छत्र लहानपणीच .....? तेही कारण नाही, दोघांचीही तब्येत अगदी धडधाकट.
त्यांच्या लहानपणापासूनच्या संस्कारांमुळेच तो 'सुसंस्कृत नागरिक' बनला होता. .... बरं मग
बुद्धिमत्ता ? शंकाच नको ... पहिल्या पाचच्या बाहेर कधी पडलाच नाही
इंजिनिअर होईपर्यंत. रंगरूपाच्या बाबतीत तर लाखात एक होता. विशेष गोष्ट म्हणजे
त्याचे निळेशार डोळे ! म्हणूनच कीर्तनकाराच्या तोंडी देवाचं नाव यावं तितक्या
सहजतेने त्याच्या आईच्या ओठांवर ‘स्वप्निल’ हे नाव आलं होतं. मग प्रकृतीचं
कारण ? तिकडेही काळजी वाटावी असं काही नाही. सामान्य
माणसाच्या आयुष्यात येणारं सर्दी-पडसं सोडलं तर काहीही धाड भरलेली नव्हती. म्हणजे
तुमच्या-आमच्या दृष्टीने त्याच्या आयुष्यात वजाबाकीपेक्षा बेरीजच जास्त होती... पण
तुमच्या-आमच्या दृष्टीनेच बरं का ! त्याच्या दृष्टीने नाही ! स्वप्निलचा एक छोटासा
प्रॉब्लेम आहे.... ऐकून हसायला येईल तुम्हाला, पण तो प्रॉब्लेम म्हणजे स्वप्निलला
स्वप्नंच पडत नाहीत. शू: sss !! म्हटलं ना हसू नका म्हणून ... स्वप्निल भडकेल !
त्याचा यक्षप्रश्न तुम्ही हसण्यावारी नेता ? एखाद्याला स्वप्नं पडत नाहीत ही
तुमच्या आमच्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे, त्याच्यासाठी नाही. त्याने फारच
मनावर घेतलंय ... अगदी शांत झोप लागते, पण स्वप्नंच पडत नाहीत म्हणून तो
कासावीस झालाय !!!
याची
सुरुवात लहानपणीच झाली. केव्हातरी गप्पा मारता मारता एक मित्र आपल्याला पडलेलं
स्वप्न किती छान होतं, त्यात तो कसा सरबतात पोहत होता, चॉकलेटच्या लादीवर झोपताना कशी मजा
आली वगैरे सांगत होता. ते ऐकून स्वप्निल बुचकळ्यात पडला. 'स्वप्न असतं तरी कसं?' या विचाराने बेचैन झाला. तो सारखा
सगळ्यांना विचारायचा,"तुला स्वप्न पडतं का? काय दिसतं त्यात? स्वप्न खरं होतं का?"
मलाही
विचारलं होतं तेव्हा मला ते खूप विचित्र वाटलं होतं. आमची दोस्ती दूरच राहो, धड ओळखही नव्हती. त्याच्या
आईबाबांनाही तो लहानपणी अक्षरश: भंडावून सोडायचा..... "सगळ्यांना स्वप्नं
पडतात, मलाच का नाही ? नक्की काय होतं तेव्हा?" त्याच्या या शंकाचं निरसन व्हायचं
नाही तेव्हा तो एकदम घसरायचाच, "स्वप्निलचा अर्थ माहितीये ना ? मग माझं नाव कशाला ठेवलंत ते ? 'नाव मोठं लक्षण खोटं' ही म्हण माझ्यावरूनच पडलेली असावी".
दररोज सगळीकडे सांगायला/लिहायला लागणारं स्वतःचं नाव त्याला खूप टोचायचं.
आई-वडील बिचारे प्रश्नांच्या वावटळीत भिरभिरून जायचे. एकच आशा होती, स्वप्निल मोठा झाल्यावर समजूतदार
होईल...
स्वप्निल
मोठा झाल्यावर तो समजूतदार झाला खरा, पण ते 'स्वप्न' सोडून बाकी सर्व गोष्टींमध्ये!
स्वप्नाबद्दल कुणी काही बोललं, किंवा कुणी लिहिलेला लेख वगैरे वाचला, की स्वप्निल अक्षरश हिंस्र व्हायचा, मग त्याची आई मला बोलवून घ्यायची,
"सुनील, तूच ये बाबा... तुझंच ऐकतो तो, तूच समजावून सांग". मग मी
त्याला माणसात आणायचं काम करायचो. हळूहळू तो या प्रश्नावर उपाय शोधायच्या मागे
लागला. सल्ले घेऊ लागला. पण शेकडा नव्याण्णव तर त्याची समस्या ऐकूनच हतबुद्ध
व्हायचे, असमर्थता दाखवायचे... उरलेले एक टक्का आधी रस
दाखवायचे पण मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाणारी स्वप्निलची प्रश्नमालिका पाहून तेही पांढरे निशाण दाखवायचे.
हे सगळं
परवापरवापर्यंत तेवढं सिरीयस वाटलं नव्हतं. पण त्याने एका संमोहन तज्ज्ञाला गाठलं, तेव्हा मात्र गांभीर्याने विचार
करायला लावणारी घटना घडली. आम्ही डॉक्टर गवाणकरांकडे गेलो होतो. स्वप्निलने आपले
प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टर विचारात पडले. त्यांनी काहीएक मनाशी ठरवलं आणि
बोलायला सुरुवात केली, "हे पहा, स्वप्न हे अजूनही पूर्णपणे न
उलगडलेलं एक कोडंच आहे. आजचं विज्ञान अजूनही या प्रश्नाच्या गाभ्यापर्यंत पोचण्यात
यशस्वी झालेलं नाहीये. तेव्हा तुम्हाला...." हे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच
त्यांची जीभ अडखळली... कारण ती त्यांच्याच दातांमध्ये अडकली होती! संतापाने लालबुंद
झालेल्या स्वप्निलची वळलेली मूठ त्या तडाख्याला कारणीभूत होती. त्याने दुसरा दणका
देण्याआधीच मी त्याला कसेबसे आवरले आणि बाहेर घेऊन गेलो. त्याला कसंबसं शांत केलं
आणि दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलो. तोपर्यंत
त्या अनपेक्षित अनुभवातून ते सावरत होते. आश्चर्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर
संतापाचा लवलेशही नव्हता ... यापूर्वी याहून अधिक दुर्धर प्रसंगातून कदाचित ते
गेले असल्याने ते सरावले असावेत. ते म्हणाले,
"अशी केस मी यापूर्वी कधीही अनुभवलेली नाही. कदाचित हा प्रकार
म्हणजे...."
"थांबा डॉक्टर..." मी त्यांना मध्येच थांबवलं.
"हे तुम्ही मला नंतर सांगाल का प्लीज ? I am sorry पण सध्या मला स्वप्निलला सावरणे
गरजेचे आहे. त्यासाठी माझे स्वप्निलसोबत असणे जास्त गरजेचे
आहे" असे म्हणून मी तिथून सटकलोसुद्धा ...
आता मात्र
माझ्यासमोर एकाच पर्याय होता, तो म्हणजे स्वप्निलला गुरुजींकडे नेणे ! तसं म्हटलं
तर गुरुजी म्हणजे माझे आध्यात्मिक गुरू... पण इतर बुवा-बाबांपेक्षा खूप वेगळे.
सदैव सकारात्मक माणूस. जेव्हा जेव्हा आयुष्यात ताणतणाव असह्य होतात तेव्हा मी
त्यांच्याशी संवाद साधतो. ते उगाच जडजंबाल शब्दांचं ओझं आपल्या डोक्यावर ठेवत नाहीत.
साधं सोपंच बोलतात. त्यांच्या शब्दांत, स्वरांत एक विलक्षण ऊर्जा आहे आणि
त्यांच्या बोलण्यातून ते ती ऊर्जा जणू आपल्याला देत आहेत असंच वाटत राहतं. सध्या स्वप्निलला
त्यांच्याकडे घेऊन जाणं प्रकर्षाने गरजेचं आहे असं मला वाटायला लागलं आहे.
त्यांच्या बोलण्याने स्वप्निलच्या मनातल्या अंधारत चाललेल्या कोपऱ्यांवर काही किरण
पडतील याची मला आशा वाटते आहे
***************
२५ जून
बुधवार १९९६
आज सकाळी
एकदाचे गुरुजींना भेटलो. स्वप्निलला पहिल्यांदा सांगितले तेव्हा तो तयारच नव्हता.
तो म्हणाला, "माझा बुवाबाजीवर अजिबात विश्वास नाही". मग मी
त्याला समजावलं, "गुरुजी म्हणजे तुझ्या कल्पनेतले जटाधारी साधू किंवा
कुणी भक्त संप्रदाय असणारे मठाधिपती नाहीत. ते वेदपाठशाळेत शिकवतात. अध्यात्माचा
त्यांचा गाढा अभ्यास आहे. वेद-उपनिषदं यांच्यामध्ये सांगितलेल्या ऊर्जा संचय आणि
ऊर्जा हस्तांतरण या संकल्पनांचे त्यांना सखोल ज्ञान आहे. आज आपण मॅनेजमेंटमध्ये 'Power
of Positive Thinking' वगैरे खूप फंडे ऐकतो, पण या सगळ्या गोष्टींचे महत्व
आपल्या संस्कृतीने पहिल्यापासूनच जाणले आहे. आत्तापर्यंत तू एवढ्या तज्ज्ञ लोकांना भेटलास ना काहीतरी वाट
दिसावी म्हणून ? आता तू एकदा येऊन तरी बघ गुरुजींकडे". खरंतर मला स्वप्निलच्या डोक्यातून
स्वप्नांचं खूळ काढून टाकायचं होतं. गुरुजींकडे अगदी पूर्ण समस्येचं समाधान जरी नसेल तरी ते स्वप्निलच्या विचारांना
दिशा देतील याची मला खात्री होती. मी स्वप्निलला गुरुजींच्या घरी घेऊन गेलो.
गुरुजींना स्वप्निलने
पाहिलं. नेहमीप्रमाणेच अतिशय साधा – म्हणजे धोतर आणि सदरा असा - वेष
आणि कपाळावर उभं गंध होतं. डोक्यावर जटा किंवा गळ्यात रुद्राक्षाचे सर्प नाहीत
अतिशय तेजस्वी चेहरा आणि मुखावर विलसत असणारं हसू. स्वप्निलचे पूर्वग्रह गळून
पडले. मी गुरुजींना आधीच भेटून स्वप्निलबद्दल कल्पना दिली होतीच. तरीही त्यांनी स्वप्निलकडून
शांत चित्ताने पुन्हा त्याची व्यथा जाणून घेतली. त्याचे बोलून झाल्यावर त्यांनी
शांत स्वरात बोलायला सुरुवात केली.
"मित्रा, तुझी इच्छा मला जगावेगळीच दिसते.
मी पैशांचे लोभी पाहिलेत, ज्ञानप्राप्तीची प्रखर इच्छा असणारे पाहिलेत, पण स्वप्नांची आस धरणारा तू
पहिलाच! तुझं नाव स्वप्निल ना?"
"हो". स्वप्निलच्या आवाजात कंप होता. त्याला
अलीकडे स्वतःचे नाव उच्चारताना किंवा ऐकतानासुद्धा करवत फिरवल्यासारखं व्हायचं.
कुणालाच - अगदी स्वतःलासुद्धा - हे नाव आठवू नये असं त्याला वाटायचं.
"हं:! विधात्याचा खेळसुद्धा चमत्कारिक आहे. ज्याला
स्वतःच्या नावाचा अर्थसुद्धा पुरेसा उमगू शकणार नाही त्याच्या आईवडिलांना त्याने
ते नाव ठेवण्याची बुद्धी दिली. पण हे आता घडून गेलेलं आहे. पुढचं मात्र तुझ्याच
हातात आहे. विचित्र नशीब आहे हे तर खरंच पण हे लक्षात घे की जीव जन्माला येताच
अधिक-उण्याचा पट घेऊन येतो. जे अधिक आहे ते वाढीस लाव, त्याचा चांगला उपयोग कर. पण
उण्याचं थोडं वेगळं आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे मुद्दामहून
विधात्याने ठेवलेली उणीव, जी तुम्ही स्वतःहून सुधारण्याचा प्रयत्न करावा.
यातूनच तुमचा उत्कर्ष होतो. स्वतःतल्या या उणीवेवर मात करण्यासाठी तुम्ही जिद्द
जागवता ती आयुष्यात पावलोपावली मदत करते. दुसऱ्या प्रकारची उणीव हे तुमच्या
प्रकृतीचं अभिन्न आणि अपरिवर्तनीय अंग असते. ती तुम्हाला जगात एकमेवाद्वितीय स्थान
देते. जसे एखाद्याचे गुण अनेकदा अद्वितीय असतात तसे एखाद्याचे काही दोषही जगातल्या
कोणत्याही व्यक्तीपेक्षा वेगळे असतात. या प्रकारचे दोष दुरुस्त करणे सामान्य
माणसाच्या हातात नसते. कोणती उणीव निराकरण करण्याजोगी आहे आणि कोणती उणीव
अपरिहार्य आहे हे कळणे फार महत्वाचे असते. एकदा का या दोन्हीतला फरक कळला की
स्व-उत्कर्षाचा मार्ग सापडतो. शक्य ते दोष सुधारून आणि अपरिवर्तनीय दोष
अडथळ्यांच्या शर्यतीतल्या अडसरांप्रमाणे टाळून पुढे गेलं तर या दोषांचा आपल्याला
काही त्रास होत नाही. माझ्यामते तुझी समस्या दुसऱ्या प्रकारातली आहे. तेव्हा तू ती
स्वीकारलीस तर ....”
समोर बसलेला
स्वप्निल हळूहळू लाल होत होता. पण त्याने स्वतःवर ताबा ठेवत विचारलं, “पण हा सुनील म्हणाला होता की
सकारात्मक विचारांच्या ऊर्जेमुळे यात बदल शक्य आहे. ही ऊर्जा वापरण्याचं तंत्र मला
सांगितलंत तर मी समस्येवर विजय मिळवीन याची मला खात्री आहे.”
गुरुजी हसले, ”तुझी उर्जा कोणत्याही टोकापर्यंत
ताणली जाऊ शकते हे मला जाणवतंय. तुझा हट्ट खूप तीव्र आहे आणि पूर्ण ताकदीनिशी जोर
लावण्याची धमक तुझ्यात आहे हे तुझ्या सान्निध्यात आल्यापासून आणि तुझे बोलणे
ऐकल्यापासूनच मला जाणवत होतं. तरी तुला मी एकदा वाट बदलण्याचा सल्ला दिला. पण या
इच्छेपोटी स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही तू कमी करणार नाहीस हे लक्षात येतंय
माझ्या. ठीक आहे एवढा दृढ विश्वास तू जर positively वापरलास तर तुझं उद्दिष्ट तुझ्या
जवळ येईल.” असं म्हणून त्यांनी चित्त एकाग्र केलं. हात स्वप्निलच्या
डोक्यावर ठेवला. स्वप्निलला थोडं थरथरल्यासारखं वाटलं. काही मिनिटांनी गुरुजींनी
हात उचलला. ते म्हणाले, “माझ्याकडून मी माझ्या कुवतीप्रमाणे केलंय. यापुढचं
तुझ्याच हातात आहे, दररोज पहाटे एकाग्रचित्ताने अर्धा तास ‘ओंकार’ ध्यान करायला विसरू नकोस, तुझ्यातली सुप्त ऊर्जा त्यामुळे
जागृत व्हायला मदत होईल”.
आम्ही
दोघेही गुरुजींच्या घराबाहेर पडलो. पडता पडता गुरुजींनी स्वप्निलला उद्देशून
म्हटलेलं वाक्य कानावर पडलं, “हा मार्ग तू स्वखुशीनं स्वीकारला
आहेस. त्यामुळे वाटेत येणारे पेचही तुझे सोबतीच होतील. त्यांच्या सोबतीची तयारी
कर. न जाणो कदाचित अशी वेळही येईल की आधीचीच परिस्थिती बरी होती असं तुला वाटू
शकेल.” पण स्वतःच्याच तंद्रीत बाहेर पडणाऱ्या स्वप्निलला ते
कितपत कळलं कुणास ठाऊक !
***************
बुधवार
३० ऑक्टोबर २००२
“Hello, अरे सुनील .एक खुशखबर !! मला
स्वप्न पडलं अगदी इतरांना पडतं तसं !!! एखाद्या पिक्चरसारखं वाटलं रे एकदम ...
गुरुजींची कृपा.... तू आजच्या आज निघून ये. सुट्टी काढून ये .... अरे कसलं स्वप्न
म्हणून काय विचारतोस ? सगळं इकडे आल्यावर सांगतो... वाट बघतोय तुझी..... बाय
!!!” खलास, फोन कट् ! मी डोळ्यांच्या खाचा
रुंदावत घड्याळ बघितलं.... रात्रीचे सव्वातीन वाजले होते. मग हळूहळू कवितेचा अन्वय
लागावा तसा डोक्यात प्रकाश पडू लागला. स्वप्निलला स्वप्न पडलं ! आज त्याचं नाव सार्थ झालं ! त्या
नादात त्याने ओव्हरएक्साईट होऊन एवढ्या घोर रात्री फोन केला... अगदी हक्काने.
त्याचा आग्रह मोडणं मला अशक्य होतं ... जणू आपण बाप झाल्याची वार्ता द्यावी तशा
उत्साहात त्याने स्वप्न पडल्याची सुवार्ता मला दिली होती. आनंद, विस्मय, उत्सुकता अशा संमिश्र भावना घेऊनच
मी पुन्हा झोपी गेलो.
सकाळी लवकर
उठून आवरून ट्रेन गाठली. प्रवासात निवांतपणे विचार केला. स्वप्निलच्या
तपश्चर्येला फळ यायला ६ वर्षं लागली होती. गुरुजींच्या भेटीनंतर बरंच काही घडलं
होतं. माझी बदली झाल्याने मला दूर जावं लागलं. मध्ये फक्त एकदा स्वप्निलच्या
लग्नात आमची भेट झाली होती. गुरुजींच्या भेटीनंतर आणि त्यांच्या आश्वासक
शब्दांमुळे स्वप्निलचं चित्त खूप स्थिर आणि शांत झालं होतं. त्याच्यातला
आत्मविश्वास पुन्हा जागा होऊ लागला होता. आयुष्याला दिशा मिळाली. लग्नाबिग्नाचे
विचार करणं शक्य झालं. शिवाय लाकूड कटाई, प्लायवूड च्या family
business मध्ये तो
नव्या दमाने उतरला होता. त्याने जाणीवपूर्वक अनेक निराधार व गरजू हातांना काम मिळवून दिलं होतं. या
सगळ्याच्या जोडीला नियमितपणे ‘ओंकार’ साधना होतीच. आपले जुने लक्ष्य तो
विसरला नव्हता. फक्त जाळणाऱ्या वणव्याचं रुपांतर आता शांत तेवणाऱ्या समईमध्ये झालं
होतं. नियमितपणे गुरुजींची भेट घेतल्याचा हा परिणाम. त्यांच्या आश्वासक स्वरांत
खूप बळ आहे हे मी अनुभवलं होतंच पण आता ते त्यालाही अनुभवास येऊ लागलं होतं.
***************
गुरुवार
३१ ऑक्टोबर २००२
आज स्वप्निलकडून परतलो. खूप समाधान वाटतंय मित्राला आनंदात पाहून. स्वप्निलला तर डोंगराएवढा आनंद झाला होता. त्याला गमतीशीर स्वप्न पडलं होतं. तो एका नावेत बसून चालला होता. पण ती नाव रिकामी होती. त्याला मनोमन वाटलं ही नाव भरलेली असायला हवी. दुसऱ्याच क्षणी नाव भरून गेली .... माणसांनी, पैशांनी, वस्तूंनी ... एवढी की त्या भाराने सगळे तळाकडे खेचले जाऊ लागले आणि स्वप्निल खडबडून जागा झाला. पण दुसऱ्या सेकंदाला त्याची भीती छू झाली आणि त्याजागी हसू उमटलं. पहिल्यांदा त्याने बायकोला जागं केलं. मग मला फोन लावला. सकाळी सकाळी गुर्जींची भेट घेऊन त्यांना वंदन केलं. गुरुजींनी आशीर्वाद देऊन म्हटलं, ”तुझ्या सकारात्मक विचारांचा आणि एकाग्रतेचा हा यशस्वी आविष्कार आहे. पण लक्षात ठेव, तटस्थपणे स्वप्नं बघ. स्वप्नांमध्ये फार काही शोधण्याचा आणि अर्थ लावत बसण्याचा उपद्व्याप करू नकोस. ते एक मृगजळ आहे.” नंतर तो जेव्हा मला भेटला तेव्हा त्याने मला चक्क ट्रीट दिली. काय खुळा आहे हा ! परतीच्या प्रवासात मला खूप समाधान वाटत होतं.
***************
शनिवार
२० मार्च २००४
फुंकरीसारख्या
भासणाऱ्या झुळकीचं पाहता पाहता वावटळीत रुपांतर झालं आहे. स्वप्निलच्या काळजीने
माझी झोप उडाली आहे. काय करावं ? त्याला फोन करून धीर द्यावा का ? का माझ्या फोनमुळे तो आणखीनच
अस्वस्थ होईल ? अरे हे काय ? त्याचाच फोन येतोय ! बापरे, माझाच घसा कोरडा पडलाय. आता कुठलं
ताट वाढून ठेवलंय त्याच्यासमोर कोण जाणे.
“Hello”
“Hello, Hello... सुनील, Hello .... काहीतरी कर न अरे, ते स्वप्न माझा पाठलाग करतंय.
प्लीज तू तरी काहीतरी कर ना... मी काहीही केलं तरी ते माझा पाठलागच करतंय ... दिवसासुद्धा विश्रांतीसाठी थोडा
आडवा झालो तरी तेच !! प्लीज तू काहीतरी कर....” स्वप्निलचा आवाज भयानक कापरा होता. “शांत हो पाहू”, मी समजावणीच्या सुरात म्हणालो. “आधी डोक्यातून negative
विचार काढून
टाक. आणि तू गुरुजींना का नाही भेटत ? ते काहीतरी मार्गदर्शन नक्कीच
करतील”.
“त्यांच्यापुढे कोणत्या तोंडाने जाऊ रे? त्यांनी पदोपदी सांगूनही मी
स्वप्नांचा अर्थ लावण्याचा खटाटोप सोडला नाही. कळत-नकळत तेच करत राहिलो आणि माझ्या
सुखी आयुष्यात माती कालवली. काहीतरी कर ना प्लीज.... आत्ताचं स्वप्न तर फार भयानक
होतं. आत्ताही ते माझ्या डोळ्यासमोर आहे... दोन हातांनी कुऱ्हाड परजली आहे ....
अगदी कोवळे हात आहेत ते. आणि ... आणि एका मोठ्या पिंपळावर ते घाव घालत आहेत. झाड
किंकाळ्या फोडतंय... खूप दुःखी आहे ते .... नाही रे ..... मस्तकात कळ येतीये
नुसती... आई गं !! ते बघ ते झाड उखडलं गेलंय .... उन्मळून पडलंय.... आजूबाजूची
कोवळी रोपटी चेपत ... चिरडत ... आ: .....”
“स्वप्निल, स्वप्निल ..... सावर स्वतःला... स्वप्निल
.... अरे... “ खलास, फोन कट् .... बापरे त्याला माझी
फार गरज आहे. उद्या सकाळी निघालंच पाहिजे....
***************
रविवार
२१ मार्च २००४
आख्खा
प्रवासभर मी चिंतेने व्याकूळ होतो. गेल्या वर्षभरातल्या आठवणी पाठोपाठ
लाटांसारख्या आदळत होत्या मनावर .. स्वप्निलच्या स्वप्नयात्रेची स्वप्नवत सुरुवात
होऊन वर्ष लोटलं होतं. गुरुजींनी टाळायला सांगितलेली गोष्टच त्याच्या डोक्यात
वळवळत राहिली होती. फावल्या वेळात तो आपली स्वप्नं आठवत राहायचा. अचानक त्याने एके
दिवशी बातम्यांमध्ये पाहिले की मुंबईत एका माथेफिरू ट्रक ड्रायव्हरने भरधाव ट्रक
चालवून एक-दोन नव्हे तर तब्बल १४ माणसे चिरडली. शेवटी मांसाच्या चिखलात रुतूनच
त्याचा ट्रक थांबला. पुढचे तपशील ऐकण्यापूर्वीच स्वप्निलच्या डोक्यात ठिणगी. तिने त्याचं स्वास्थ्य,सौख्य भस्मसात करायला सुरुवात केली
होती.... हळूहळू , पण निश्चितपणे .... काही रात्रींपूर्वीच त्याने स्वप्न
बघितलं होतं. एका कोपऱ्यात प्रचंड संख्येने मुंग्या जमा झालेल्या
आहेत. अचानक वरून एक रासवट पाय आला आणि त्याने त्या मुंग्यांना चिरडून
टाकले. ते स्वप्न टीव्हीवरच्या बातमीशी जुळत आहे असे त्याला
वाटायला लागलं. या घटनेत स्वप्निलचे एक परिचित गृहस्थ जबर जखमी झाले होते. स्वप्निलने
हाय खाल्ली. कृष्णपक्षातल्या चंद्रकोरीसारखा तो झिजायला लागला.
पुढे त्याला
आणखी एक स्वप्न पडलं. एक मुलगा आपल्या संघातर्फे कबड्डी खेळण्यात दंग आहे.
प्रतिस्पर्ध्याच्या भागात चढाई करण्याची त्याची पाळी आहे. मध्यरेषेला वाकून
नमस्कार करून त्याने प्रतिपक्षाच्या भागात मुसंडी मारली आणि असं काही आक्रमण चढवलं
की समोर असलेल्या पाचपैकी तिघांना एकाच फटक्यात बाद केलं. ते
हबकल्याचं पाहून तो जास्तच आत्मविश्वासाने परतू लागला..... पण ... त्यांनी
त्याच्यावर वाघासारखी झडप घालून त्याला खाली पाडलं. तो तोंडावर आदळला. तरीही
त्याने हात खेचून मध्यरेषेला लावण्याचा प्रयत्न खूप केला. पण काही उपयोग झाला
नाही. तो बादच झाला. स्वप्न पडून गेल्यावर तिसऱ्याच दिवशी त्याला बातमी कळली, सैन्यात असणारा त्याचा चुलतभाऊ
पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेवर मारला गेला. अतिरेक्यांचा पाकव्याप्त काश्मिरातील
तळ उद्ध्वस्त करण्यासाठी झालेल्या गुप्त कारवाईत तो सहभागी होता. तळावर झालेल्या
चकमकीत सर्व अतिरेकी नष्ट झाले असे समजून परत निघत असताना शिल्लक असलेल्या
त्यांच्यातल्याच एका चिलटाने झाडलेल्या फैरींमुळे स्वप्निलचा चुलतभाऊ गंभीर जखमी
झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला आपल्या हद्दीत आणण्यापूर्वीच त्याने प्राण
सोडले होते... स्वप्निलला खोक पडल्यासारखं झालं. मनाला कसलीतरी खोलवर जखम झाली.
सगळ्या गोष्टीतून त्याचं लक्ष उडायला लागलं. त्याच्या आईवडिलांनी समजावून पाहिलं, बायकोने शांत करण्याचा प्रयत्न
केला. त्याच्या ३ वर्षांच्या छोट्या मुलाने – समीरने - भेदरून बाबाला बिलगत
"बाबा काय होतंय तुला.. माझ्याशी खेळत का नाहीस?"
असं
निरागसपणे विचारून झालं. पण हा कुणाला काही सांगेचना...
ते स्वप्न
पाहून जेमतेम आठवडा उलटला असेल, आणि ती काळरात्र उगवली.
बाहेर
पावसाचं मंत्रपठण चालू होत. कुणालाही न दचकवता. एकही वीज चमकत नव्हती, पण सर्वत्र एक गूढ अंधार कोंदटला
होता. इतक्यात ... एक वीज कानाचे पडदे भेदून जाणारा आवाज करत ढगांच्या फटीतून
झेपावली एका जुनाट झाडाकडे.... निमिषार्धात झाडाची राख झाली.... झाडाला लपेटून असणाऱ्या वेलीनेही मृत्यूला कवटाळले होते ...
शॉक बसावा
तसा स्वप्निल खडबडून जागा झाला. म्हणजे ? ते स्वप्न होतं ? त्याच्या घशाला भयानक कोरड पडली
होती. बायको आणि मुलगा त्याची अवस्था पाहून कावरेबावरे झाले होते. ती रात्र
सर्वांनीच टक्क उघड्या डोळ्यांनीच काढली..
सकाळी जड पावलांनीच
स्वप्निलने आवराआवर करायला सुरवात केली. इतक्यात फोन खणखणला. त्याने फोन उचलला आणि
तापलेल्या शिशासारखी ती बातमी त्याच्या कानात ओतली गेली. अमरनाथ यात्रेसाठी
निघालेल्या त्याच्या आई-वडिलांच्या बसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन बस कापरासारखी पेटली
होती. अमरनाथला पोचण्यापूर्वीच त्यांनी वैकुंठाचा रस्ता पकडला होता.
स्वप्निलच्या
आयष्यातले उरलेसुरले रंगही उडून गेले. लाकूडकटाई आणि प्लायवूडचा उद्योगही डळमळू
लागला. मालकाची अवस्था पाहून कामगारांच्या पायातले बळही सरत चालले. म्हणूनच त्याला
सांत्वनासाठी फोन करण्याच्या विचारात असतानाच त्याचा काल फोन आला आणि नव्या स्वप्नाची
वार्ता घणासारखी डोक्यात घालून गेला.
शेवटी
एकदाचा प्रवास संपला आणि स्वप्निलकडे पोचलो. माझ्या मिठीत शिरून तो हमसूनहमसून
रडायला लागला.... त्याचे रडणे थांबेचना.... शेवटी त्याला घेऊन फिरायला किनाऱ्यावर
गेलो. त्याला म्हटलं, "अरे तुझ्या पॉसिटीव्ह थिंकिंगचं काय झालं ? चांगले विचार कर ना जरा ..."
त्याचं
बोलणं ऐकून मी जास्तच काळजीत पडलो. “माझी ताकदच गेल्यासारखी वाटतीये रे
... ही स्वप्नं सावलीपेक्षाही जास्त सोबत करतात. परवाच्या स्वप्नाने तर माझी सगळी
ऊर्जाच काढून टाकल्यासारखं वाटायला लागलंय. हवा गेलेल्या चाकासारखी माझी अवस्था
झालीये.. पुढे सरकणेच शक्य नाहीये. त्या झाडात मला.... मला माझाच चेहरा दिसतोय. 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' ही म्हणच सारखी डोक्यात येतीये.
कुऱ्हाड पेलणारे हात म्हणजे माझ्या समीरचेच असणार. हो.. . नक्कीच ... स्वप्नात दिसणारे हात अगदी कोवळे
आहेत. समीरच माझा एक दिवस घात करणार .... माझा कुणावरच विश्वास नाही... माझा अंत
अटळ आहे.. आज ना उद्या ... पण एकदम शुअर आहे माझा शेवट ... नाही... माझंच रक्त
माझ्यावरच ... .." असं काहीतरी मोठ्यांदा बरळत तो एकदम धावू लागला. मी कसंबसं
त्याला गाठून आवरलं. चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. घरी नेऊन
झोपायला लावलं. उद्या त्याला सगळं संगतवार सांगितलं तरच त्याला ते पटेल...
*********
सोमवार
२२ मार्च २००४
स्वप्निल आज
जरा सावरल्यासारखा वाटलं. मी त्याला समजावलं होतं, "स्वप्नांचा विचार डोक्यातून काढून
टाक. स्वप्नं पडत नव्हती तेव्हा भुकेचं दुःख आणि आता पडत आहेत तर त्याचं अपचन, अशी तुझी अवस्था झालीये...
त्यापेक्षा तुझ्या हिमतीवर तू तुझं स्वप्न खोटं पाडून दाखव. तरंच तुझी या
आवर्तातून सुटका होईल. समीरवर एवढे दृढ संस्कार कर की त्याचे हात वाईट गोष्टींसाठी
एकत्र न येता तुला नमस्कार करण्यासाठी एकत्र येतील. मला खात्री आहे, ही जबाबदारी तू नक्की पेलू शकशील.
नियतीला खोटं पाडण्याची संधी तू सोडू नकोस" असा हेवी डोस त्याला दिला तेव्हा
कुठे तो जरा सावरला. पण त्याच्या नजरेतलं शून्य अगदी अनंताला गिळू पाहणारं भासत
होतं. तो मधूनमधून पुटपुटत होता, "मी स्वप्न खोटं ठरवणार ... अगदी
नक्की.... हे स्वप्न मी सत्यात उतरू देणार नाही ... "
*********
बुधवार
२४ मार्च २००४
आज डायरी लिहिताना हात कापतोय ... डोळ्यांतले अश्रू टपकून डायरीचं पान ओलं होतंय... स्वप्निलच्या स्वप्नांचा जीवघेणा प्रवास कायमचा थांबलाय.. त्याची गाडी रुळावर आणण्याच्या माझ्या विश्वासाच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत.... त्याच्या आयुष्याची गाडी खोल दरीत कोसळली आहे.... स्वप्न चुकीचं ठरवण्यासाठी त्याने नियतीला फसवण्याचा प्रयत्न केला.... असफल प्रयत्न ...
आज सकाळी मी
त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी घेऊन गेलो. कुरकुरत का होईना, तो तयार झाला ... मी स्वतःसुद्धा
त्याच्या कामात रस घेतोय असं दाखवलं. उगाचच दोन-चार गोष्टींबद्दल माहिती विचारली.
ती त्याने व्यवस्थित सांगितली. कामगार मंडळींनाही जरा बरं वाटलं. तो सावरल्यासारखा
वाटत होता. माझ्या इथे येण्याने तुझ्यात फरक पडलेला दिसतोय. मला आता निघायला हवं.
अजून सुट्टी घेणं शक्य नाहीये मला. पण तू प्लीज जिद्द सोडू नकोस. आयुष्याची लढाई तू
जिंकून दाखवशील याची मला खात्री आहे. बाय बाय !"
मी निघताना तो एकच वाक्य म्हणाला, "मी स्वप्न खोटं ठरवेन." त्याच्या स्वरात कसा कुणास ठाऊक पण एक टणकपणा आला होता. मला सोडायला तो स्टेशनपर्यंत आला नाही. “सॉरी, मला जरा काम आहे. तू जाशील का एकटाच ?” म्हणाला.
मी
स्टेशनकडे रवाना झालो. गाडीला वेळ असला तरी तिकिटासाठी गर्दी असते म्हणून लवकरच
निघालो होतो. स्टेशनवर जाऊन पाहिलं तर अजिबात गर्दी नाही !! अगदी ५ मिनिटात तिकीट
मिळालं. अजून गाडीला सव्वा तास वेळ होता. platform आल्यावर कळलं की गाडी किमान तासभर
उशिरा आहे वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते. प्लॅटफॉर्मवर
बसल्याबसल्या सगळ्या घडामोडींचा विचार करत बसलो. स्वप्निलने एवढ्या कठीण काळात
गुरुजींची भेट घेऊन सल्ला घ्यायला हवा होता. पण सुरुवातीला गुरुजींनी सल्ला देऊनही
त्याने स्वप्नांचे अर्थ लावणे सोडले नसल्याने पुढेपुढे त्याला त्यांच्याशी
स्वतःहून संपर्क करावासाच वाटत नव्हता. त्याची स्वतःचीच तयारी नसल्याने मी स्वतःही
गुरुजींना काही बोललो नव्हतो पण त्यांच्याशी निदान फोनवर तरी याबद्दल सविस्तर
बोललंच पाहिजे असं मला वाटायला लागलं होतं. त्याच विचारांत मी गढून गेलो असताना
मोबाईल वाजला म्हणून मी कुणाचा आहे ते न पाहताच उचलला ... पहिल्यांदा नुसते हुंदक्यावर हुंदके ...... मग कसाबसा आवाज
उमटला.
"भाऊजी, प्लीज असाल तिथून परत फिरा.... स्वप्निल
... स्वप्निलने .... आ .. आत्महत्येचा प्रयत्न केलाय...." माझ्या कानात बॉम्ब
फुटल्याचा मला भास झाला. डोकंच गरगरायला लागलं. कसंबसं भान ठेऊन स्वप्निलच्या घरी
परतलो.... पण ... तिथे पोचेपर्यंत खेळ खलास झाला होता .... स्वप्निलला चादरीने
झाकून जमिनीवर ठेवण्यात आलं होतं ... चादर रक्ताने माखलेली होती... माझं डोकंच बंद
पडलं होतं .... स्वप्निलची बायको हमसाहमशी रडत होती... आपल्या जिवलग मित्राला एकदा
पाहण्याची माझी इच्छा अनावर झाली आणि नकळत माझ्या हाताची यंत्रवत हालचाल झाली आणि
त्याच्या डोक्यावरची चादर मी दूर केली. माझ्या मणक्यातून एक अनामिक वीज दौडत
गेली. स्वप्निलची मान अर्ध्याहून अधिक चिरली गेली होती... कलिंगडासारखी ...
माझे तर पायच लटपटले. मी मट्कन बसलोच.... तशाच अवस्थेत ५-१० मिनिटं गेली... तिथे असलेल्या काही कामगार मंडळींकडून एक एक तपशील कळला : मी स्वप्निलच्या कामाच्या ठिकाणाहून निघाल्यानंतर स्वप्निलने कामात बराच रस दाखवला. "बघू, मला काम जमतंय का वूडकटिंगचं" असं कामगारांना विचारून पाहिलं. पण कुणीच त्याला कामाला हात लावू देईना. "बस साहेब, आज आरामात काम बघा फक्त. शेवटी महाशयांनी शक्कल लढवली... जीवघेणी ..
माझे तर पायच लटपटले. मी मट्कन बसलोच.... तशाच अवस्थेत ५-१० मिनिटं गेली... तिथे असलेल्या काही कामगार मंडळींकडून एक एक तपशील कळला : मी स्वप्निलच्या कामाच्या ठिकाणाहून निघाल्यानंतर स्वप्निलने कामात बराच रस दाखवला. "बघू, मला काम जमतंय का वूडकटिंगचं" असं कामगारांना विचारून पाहिलं. पण कुणीच त्याला कामाला हात लावू देईना. "बस साहेब, आज आरामात काम बघा फक्त. शेवटी महाशयांनी शक्कल लढवली... जीवघेणी ..
लंच टाइमला सगळे कामगार काम थांबवून निघून गेले. फक्त सुदामा नावाचा एक कामगार मात्र जाईना. त्याच कटिंगचं काम चालूच होतं . स्वप्निल प्रचंड अस्वस्थ झाला. त्याने सुदामाला जेवायला जाण्यासाठी सुचवून पाहिलं पण तो म्हणाला," साहेब अगदी थोडंच राहिलंय, तेवढं आटपून मग निवांत जेवण करतो".... स्वप्निल अस्वस्थ झाला. त्याच्या कपाळावर घाम तरळू लागला. अचानक म्हणाला, "सुदामा अरे तुझ्या पाठीमागे काय आहे ?" सुदामा कटरवरचा हात तसाच ठेवून पाठीमागे वळून पाहू लागला, मात्र स्वप्निलने क्षणार्धात वाकून आपली मान त्या कटरसमोर ठेवली. पाठीमागे पाहणाऱ्या सुदामाला प्लायवूड अचानक एवढं बदबदीत का वाटतंय म्हणून त्याने तोंड पुढे केलं तेव्हा स्वप्निलचं मस्तक धडावेगळं व्हायचंच बाकी होतं....."
सगळी कहाणी ऐकून माझं मन अक्षरशः विदीर्ण होऊन गेलं होतं. स्वप्निलच्या बायकोचं सांत्वन नक्की कशा शब्दात करावं हे न कळल्याने मी तिथेच घुटमळलो. इतक्यात माझ्या हातात एका कामगाराने एक चुरगळलेला कागद ठेवला. त्यावर परिचित तिरकस अक्षरात लिहिलं होतं : 'माझ्या मृत्यूची जबाबदारी फक्त माझ्यावरच आहे, अन्य कुणाहीवर नाही. मला माझ्या कृतीतून सिद्ध करायचं आहे, की माझं स्वप्न खोटं होतं. कुणा कोवळ्या हातांनी माझा जीव घेण्यापूर्वी मीच मृत्यूला मिठी मारतोय. मरता मरता नियतीवर विजय मिळवायचाय मला......' पुढे आणखीही काही होतं पण मला चिठ्ठी वाचता वाचताच घेरी आली... आणि पुढचे मी पूर्ण वाचूच शकलो नाही ...
कुणीतरी तोंडावर पाणी मारल्यामुळे मी शुद्धीवर आलो. ग्लासभर पाणी प्यायल्यावर मला तरतरी आली. मग कळलं की स्वप्निलची बॉडी पोस्टमॉर्टेम साठी न्यावी लागणार होती.... आणखी एक विदारक आणि वेळखाऊ प्रक्रिया ! आता मला एकच लक्ष्य दिसायला लागलं होतं, ते म्हणजे आमचे गुरुजी ! स्वप्निलच्या बायकोची भेटही न घेता मी तडक गुरुजींकडे गेलो.
गुरुजींच्या घरी गेलो आणि उगीचच वाटलं, गुरुजी माझीच वाट पाहत असावेत.
स्वप्निलच्या मृत्यूची वार्ता ऐकून गुरुजींच्या कपाळावर क्षणभर आठ्या पडल्या. त्यांना सगळं काही जमेल तसं कथन केलं . स्वप्निलला पडणाऱ्या झाडाच्या स्वप्नाबद्दल आणि चिट्ठीतल्या मजकूराबद्दल सांगितलं तेव्हा त्यांच्या ओठाच्या कोपऱ्यात एक स्मित चमकल्यासारखं वाटलं. मी तापलोच. एवढा झुरुन त्याचा अंत होण्यापेक्षा तुम्ही त्याला स्वप्नाची दीक्षा दिलीच नसती तर ?"
चेहऱ्यावरची
शांतता ढळू न देता गुरुजींनी सुरुवात केली. "झुरत तर तो पहिल्यापासूनच होता.
आहे त्यात माणूस कधीच सुखी नसतो. एखादी गोष्ट नसेल तर 'का नाही' म्हणून आणि असेल तर 'मनासारखी वापरता येत नाही' म्हणून. स्वप्निलशी पहिल्यांदा
बोलतानाच जाणवलं होतं, हा माणूस वेगळ्याच मातीचा बनलेला आहे. त्याची उर्मी
दाबली तर तो मातीच्या भुईनळ्यासारखा फुटेल. त्याने स्वप्नं खेचून आणताना एक चूक
केली - सांगूनसुद्धा ! स्वप्नांचे अर्थ लावत बसला. स्वप्न आणि सत्यातली सीमारेषा
त्याने स्वतःच्या हाताने पुसली. उत्तरोत्तर तो स्वप्नांमध्ये आणि स्वतःमध्येसुद्धा
गुंतत गेला. नियतीला मुठीत पकडण्याच्या विचाराने पछाडला गेला. स्वप्नांचा अर्थ
खोटा ठरवण्यासाठी त्याने स्वतःचाच बळी दिला. एकच गोष्ट चांगली - त्याच्या
दृष्टिकोनातून - की जाता जाता तो समाधानाने गेला .... स्वप्न खोटं पाडल्याचं
समाधान ...... "
"म्हणजे गुरुजी, त्याने मरता मरता नियतीचा कौल धुळीला मिळवला, खरं ना ?"
गुरुजी सौम्यसे हसले. "अज्ञानात सुख असतं. स्वप्निलचं मरतानाचं सुख असंच होतं. स्वप्नांचा त्याने लावलेलाच अर्थ बरोबर होता हे त्याला कसं कळलं ? अरे, स्वप्नांचं थोडंसं ढगांच्या नक्षीसारखं असतं. तुम्ही शोधाल ते आकार दिसतात त्यात. तसं बघायला गेलो तर स्वप्नांचे अर्थ जगातल्या कुठल्या ना कुठल्या घटनेशी जुळतातच ! फक्त आपल्याला ती घटना कळली तरंच घटना खरी, आणि आपल्याला ती कळलीच नाही तर ? ते स्वप्न खोटं ? नसते अर्थ लावायला सांगितलेत कुणी ? जागेपणी आपल्याला कितीतरी घटनांचे, त्यामागच्या सूत्रांचे अर्थ लावायचे असतात. त्यांच्यापासून अराम पडावा म्हणून तर निद्रेची निर्मिती झाली आहे. त्या सुप्तावस्थेचेही अर्थ लावून 'संदर्भासह स्पष्टीकरण' देत बसाल तर जागृतावस्था आणि सुप्तावस्थेचं प्रयोजनच खोटं पाडाल.... आणि जर अर्थच लावायचा झाला तर दुसऱ्या बाजूने विचार करता स्वप्निलचं शेवटचं स्वप्न खरं ठरतंय असा निष्कर्ष काढला तर? ज्या गरजू लोकांना काम देऊन स्वप्निलने त्यांचं आयुष्य नव्याने रुजवलं होतं असे कामगार म्हणजे वृक्षाच्या आसपासची छोटी रोपटी ... उगवू पाहणारी, वाढू पाहणारी. पण स्वप्निलच्या मृत्यूने त्यांचं उभारी धरणारं आयुष्य चिरडलं गेलंय ... पुन्हा त्यांच्या भुकेल्या पोटातून भविष्याची चिंता जन्म घेईल. स्वप्निल म्हणजे त्यांना सावली देणारं झाड. कोवळ्या हातांचं म्हणशील तर त्या श्रमिक कामगारांचंच उदाहरण देईन. त्यांच्या हातात अजून पुरेसं बळ आलंच नव्हतं. किती थोडा काळ झाला होता त्यांना कामावर रुजू होऊन. दुर्दैवाने स्वप्निलचा मृत्यू ओढवला तेव्हा करवती चक्राच्या एका बाजूला स्वप्निलची मान होती आणि दुसऱ्या बाजूला एका मजुराचे एका अर्थाने कोवळे हात, स्वप्नातले ... तुला आठवतं सुनील, स्वप्निलचं पहिलं स्वप्न ? बोटीचं? त्याचा अर्थ लावू ? अर्थच लावायचा झाला तर तेच त्याचं भविष्य आरशासारखा दाखवणारं होतं. मोकळी नाव म्हणजे त्याचं स्वप्नरहित आयुष्य. अगदी मजेत चालली होती नाव. पण तीव्र इच्छेचं ओझं त्याला पेलवेना. नावेंतला भार म्हणजे स्वप्निलची स्वप्नं . नाव बुडालीच शेवटी .... प्रवाश्याला घेऊनच... नियती तुमच्यासमोर फासे टाकत असते. त्यावर जे दान पडलं असेल तशी तुमच्या आयुष्याची सोंगटी हलवायची. पडलेल्या फाश्यांवरच्या आकड्यांची बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार करत नाही ते अर्थ लावत बसलात ना, तर आयुष्याचं गणित चुकलंच म्हणून समजा... "
मी उठून मुकाट्याने मान खाली घालून बाहेर पडलो... स्वप्निलला स्वप्नांपलीकडच्या जगात पोचवण्यासाठीच्या मर्त्य जगातल्या काही शेवटच्या क्रिया अन् कर्म करण्यासाठी ...
No comments:
Post a Comment