कॉलेजमधलं आयुष्य खूप रंग उधळत येतं. गडद, फिके, बटबटीत, आल्हाददायक … कुठल्याच रंगाची कमतरता नसते. सगळ्यांसारखंच मीही त्यात चिंब भिजून घेतलं. माझा कॅनव्हास त्या रंगांनी जमेल तसा आणि जमेल तितका रंगवून घेतला आहे आणि ते रंग आयुष्यभर पुरूनही वर उरणारे आहेत.
पण माझी रंगपंचमी तिथेच थांबली नाही.
एखाद्या चित्रात खूप सारे रंग असतात. पण त्यात न रंगवता अधेमध्ये तसाच ठेवलेल्या कागदाचा पांढरा रंग चित्राला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. माझी नोकरी लागल्यावरची चार पाच वर्ष तशीच होती. त्यात रंग कमी असतील पण सौंदर्य कमी नव्हतं. सांस्कृतिक भूक असलेल्या कुठल्याही मनुष्याला पुण्यापासून दूर राहणे ही खूप मोठी शिक्षा असते. २५ किमी हे अंतर हे चटकन उठून पार करण्याइतकं छोटं नाही. पुण्यात एवढ्या पंगती रोजच्या रोज उठत असताना मी इकडे निगडीत निपचित पडून राहणं शक्य नव्हतं. पुण्याच्या वाऱ्या अटळ होत्या. वीकएंडला तर मोकाटच असायचोच पण आठवड्यातही जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा ऑफिसमधून थेट पुणं गाठायचो. सिनेमे, नाटकं, व्याख्यानं, मुलाखती, फर्ग्युसनमधला मुक्तछंद, पुस्तक प्रदर्शनं/प्रकाशनं, शुक्रवारपर्यंत उदघाटनं, कसलेकसले महोत्सव, सुदर्शनचे नाट्यानुभव वगैरे भरपूर खजिना लुटायचो. वीकएंड येण्यापूर्वीच त्या आठवड्यातले प्रमुख सिनेरिलीज, नाटकाचे प्रयोग इ. गोष्टींची डोक्यात नोंद तयार असायची. वीकएंडला कुठे, कधी, काय, कसं करायचं या सगळ्याचा आराखडा शुक्रवारपर्यंत डोक्यात तयार झालेला असायचा. शनिवारी/रविवारी घराबाहेर पडताना घरी फक्त "जातोय आणि साधारणपणे अमुक वाजतील" इतकं सांगितलेलं पुरायचं. कुठेही, कधीही जायला आडकाठी न करणारे आणि मुख्य म्हणजे "का ?" असा प्रश्न कधीही न विचारणारे आईवडील फार कमी लोकांना लाभतात, त्यातलाच मी एक.
पहिली दोन वर्षं माझ्याकडे बाईक नव्हती. पण प्लॅन action packed असायचे. म्हणजे कॅम्पातलं काम आटपून 'प्रभात'ला पिक्चर बघणे आणि लक्ष्मी रस्त्याच्या 'पंकज म्युजिक हाऊस'मध्ये जाऊन मराठी गाण्याची सीडी धुंडाळणे, किंवा लोकलने शिवाजीनगरपर्यंत जाऊन पुढे अप्पा बळवंत चौकात एखाद्या पुस्तकाची चौकशी करून निवारा वृद्धाश्रमातल्या एका मुलाखतीला जाऊन पुन्हा सुदर्शनला किंवा भरतला नाटकाला हजर राहणे वगैरे गोष्टी अंगवळणी पडलेल्या असायच्या. रिक्षा वर्ज्य असल्याने या सगळ्या गोष्टी पायी किंवा बसने चालायच्या. एकदा कॅम्पातून चालत फर्ग्युसनला गेलो होतो (वाटेत प्रभातला एक मॅटिनी शो आटोपून घेतला!). असे असे मराठी सिनेमे पाहिले जे त्यातल्या कलाकारांनीही बघितले नसतील. असल्या असल्या थिएटरमध्ये गेलो जिथे हे वाचणाऱ्यांपैकी कुणी गेलं नसेल. लाल महालाजवळच्या ‘वसंत’ला गेलो आणि कल्पनातीत स्वच्छ थिएटर पाहून उडालोच. तिथल्या वस्तीत सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये एकही पानाची पिचकारी न दिसणं किंवा टिपिकल कुबट वास न येणं हे केवळ अशक्य होतं. तिथूनच हाकेच्या अंतरावरच्या ‘रतन’ला गेलो आणि पुण्यातच काय पण कुठेच न पाहिलेली curved screen बघायला मिळाली. जिथे आधी ‘तसले’ सिनेमे लागायचे तिथे अचानक मराठी सिनेमे लागायला लागले अशा ‘अल्पना’मध्येही जायचा प्लान करत होतो पण थिएटरच बंद झालं. भवानी पेठेतल्या जुन्या 'भारत' थिएटरचा (जिथले पिक्चर केव्हाच बंद होऊन आता त्याचं गोडाऊन झालं आहे) आणि मिथुनचे रक्ताळ बी ग्रेड सिनेमे दाखवणाऱ्या कॅम्पातल्या 'निशात' नामक थिएटरचाही मुक्त भटकंतीतच अनपेक्षितपणे शोध लागला (जरा बरा पिक्चर असता तर मी निशातमध्येही घुसलो असतो). बुधवार पेठेतल्या मोक्याच्या गल्लीच्या तोंडाशी असणाऱ्या ‘श्रीकृष्ण’ला जायची मात्र हिम्मत कधी झाली नाही.
फिरता छोट्या मोठ्या खाऊच्या अड्डयांचे शोध लागायचे. रमणबागेजवळच्या पुष्करणी भेळेच्या दुकानात स्वर्गीय चवीचे दडपे पोहे, लक्ष्मी रस्त्याच्या पूर्वेच्या तोंडापासच्या क्वार्टर गेटपाशी शिंदे काकांच्या गाडीवरचे तोफगोळ्याच्या आकाराचे डिंक-शेंगदाणे-मनुकांनी युक्त पौष्टिक लाडू आणि अर्धवट जळक्या गुळातली काळपट लाल खमंग चिक्की, पत्र्यामारुतीला लागून असलेल्या टपरीतले मसाला पोहे, भरतनाट्यपासून हाकेच्या अंतरावर असणारा गुडदाणीवाला ..... आणखी बरच काय काय जिभेवर रेंगाळत राहायचं...
पुढे माझ्याकडे बाईक आली आणि wild became wilder. एका दिवसात चार सिनेमे आणि दिवसाच्या शेवटी एक नाटक असं साहस दोनदा केलं. त्यापैकी एकदा तर चार सिनेमे चार वेगवेगळ्या थिएटरला पाहिले होते! बरं हा पसारा फक्त पुण्यात मांडला नव्हता तर तो चिंचवड ते पुणे असा आडमाप विस्तारलेला होता. कसली किक यायची कोण जाणे, पण भन्नाट थ्रिल वाटायचं.
या सगळ्या प्रवासात सगळ्यात विलक्षण गोष्ट अनुभवता यायची ती म्हणजे पेठांमधली भटकंती. भवानी, रास्ता वगैरे पेठांमधली रखरखीत, आपल्यापासून अंतर राखून असणारी घरं नजरेला पडायची. लक्ष्मी रस्त्यावरून सिटी पोस्ट चौकापाशी येताना उजवीकडे अटळपणे जाणवणारे रंगवलेले ओठ आणि त्या ओठांमधून येणारी ‘शुकशुक’ त्या चौकातल्या वाहनांच्या कलकलाटातही कानावर यायची. चौकापलीकडेच अदृश्य बेलबाग मंदिरातल्या विष्णूला ही शुकशुक कधीच ऐकू येत नसेल ? तिथून जरा पुढे आलं की तीन देवियां : सदाशिव, नारायण आणि शनवार! तिथली ती कोमट, सुस्त घरं हवीशी वाटायची. या पेठांना एक वेगळाच वास आहे. तिथल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून फिरताना माजघरात फिरल्यासारखं वाटतं. इथे कुठेतरी रहात असतो असतो तर कैच्याकै ऐश करता आली असती असं स्वप्नरंजन करताना मी स्वतःच स्वतःला खुश करायचो. त्या एकेकट्या गल्ल्या मला माझ्यासारख्याच वाटायच्या…. आपल्यातच मश्गुल. ते एकलेपण बाय चॉईस नसेल पण ते तसं असण्याबद्दल तक्रारही नव्हती. एक गल्ली दुसऱ्या गल्लीला फक्त त्यांच्यातून आडव्या जाणाऱ्या बोळाद्वारे शेकहँड करते तेवढंच. बाकी जे काही आहे ते आतल्या आत आणि आपल्या आपण… हेही वागणं तिथे राहणाऱ्या स्वयंभू माणसांसारखंच. इथे फिरता फिरता शांत व्हायला व्हायचं. बाहेरचे आवाज थांबायचे. मग तसंच ओंकारेश्वरापाशी जाऊन बसायचं. माझा मीच मला ऐकू यायचो. माझीच सोबत मी प्रचंड एन्जॉय करायचो. इतकं ऐकून घेणारी, मी विचारल्याशिवाय सल्ला देण्याच्या फंदात न पडणारी, मी नेईन तिथे निमूट येणारी आणि तिथे गेल्यानंतर मात्र मला आतापर्यंत न जाणवलेल्या गोष्टी गाईड बनून स्वतःहून दाखवणारी ही व्यक्ती म्हणजे माझ्याआत असणारी पण माझ्यापेक्षा वेगळे अस्तित्व असणारी कुणीतरी आहे याची जाणीव झाली. तेव्हापासून माझ्यातल्या ‘मी’ सोबत जी गट्टी जमली ती आजपर्यंत कायम आहे. आजही जेव्हा डोक्यात सगळा येळकोट झालेला असतो तेव्हा मी तो त्याच्यासमोर मांडतो. 'तो' सारा पसारा आवरून मोकळं करेलच असं नाही पण माझ्यासोबत डाव मांडायला तो नेहमीच तयार असतो. काही वेळा प्रश्नचिन्हाचं उद्गारचिन्ह करून देणारं कुणी भेटलं तरी पुरेसं असतं.
व्हॅलंटाईन म्हणजे तरी अजून वेगळं काय असतं?
No comments:
Post a Comment