चांगली नोकरी सोडून मनापासून अस्सल मराठी/पुणेरी जेवण शिकण्यासाठी पुण्यात आलेला तरुण आणि जेवणाचे डबे बनवणारी त्याची गुरू होणारी स्त्री यांच्याभोवती फिरणारा हा सिनेमा. सुरुवातीपासून त्यांचे मूड्स, त्यांच्यातले रुसवे-फुगवे, हळवे क्षण खूप छान टिपले आहेत. त्याची स्वैपाक शिकण्याची तीव्र इच्छा आणि तिचा सुरुवातीचा reluctance, मग त्याने विश्वास संपादन करणं आणि तिच्या हाताखाली तयार होणं, तिला तिच्या आयुष्यातल्या गर्तेतून बाहेर काढत आत्मविश्वास देणं हे टप्पे छान फुलवत नेले आहेत. आणि सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे गोष्टी घडायला आणि नातं घट्ट व्हायला आवश्यक तो अवकाश दिलेला आहे. अलीकडच्या काही चांगल्या सिनेमात देखील जो ‘ठहराव’ आढळत नव्हता तो इथे अगदी व्यवस्थित आहे.
सोनाली आणि सिद्धार्थ या दोघांचं अन्नाबद्दल आदर दाखवणं, आपण करत असलेल्या पदार्थांशी बोलणं, राधाचा तिच्या पोळपाटाबद्दल असणारा पझेसिव्हनेस, “पदार्थ बनवतो म्हणजे आपण त्या पदार्थाला आपल्यातलं काहीतरी देतो” यासारखे अन्नतत्वज्ञान सांगणारे संवाद हे सगळं बघताना हे सतत जाणवत राहतं की स्वयंपाकावर अपरंपार प्रेम करणाऱ्या दिग्दर्शकानेच हा सिनेमा बनवला आहे.
यातल्या तांत्रिक गोष्टी 'ए वन' आहेत. काळाच्या धावपळीत राधा (सोनाली कुलकर्णी) मागेच कुठेतरी अडकून पडलेली आहे हे ठसवण्यासाठी अनेक गोष्टी जाणीवपूर्वक योजल्या आहेत. घरातल्या वस्तू जुन्या आहेत, वशिवाय खालच्या मजल्यावरचे काका वाचत असलेलं पुस्तकही कालप्रवासाबद्दलचंच आहे. तिचं घर, राहता परिसर हे सगळं जुनं पुणं दाखवणारं आणि नॉस्टाजिक करणारं आहे. एकूणच सिनेमातले रंग आणि लायटिंग ही मला सगळ्यात आवडलेली गोष्ट. वेळेनुसार घरातला बदलत जाणारा सूर्यप्रकाश परफेक्ट दाखवला आहे. सिनेमात वापरलेल्या पिवळसर, सेपिया रंगछटा वापरल्या आहेत त्याही रेंगाळेला काळ सूचित करणाऱ्याच आहेत. मुबलक प्रमाणात वापरलेले कॅमेऱ्याचे top angles मजा आणतात. या top angles मुळे चित्रपटभर बनत राहणारे असंख्य पदार्थ त्यामुळे विलक्षण हवेहवेसे वाटतातच पण आतली अस्वस्थता दाखवणारे आदित्यचे सीन्सही अधिक इंटेन्स होतात. शिवाय पदार्थ पार्श्वसंगीत मोजकं आणि प्रभावी आहे. अवधूतच्या आवाजातलं गाणं खूप छान आहे.
एवढं सगळं असूनही माझ्या सिनेमाबद्दल काही जेन्युईन तक्रारी आहेत ज्यामुळे तो ग्रेट होता होता राहिल्यासारखं वाटतं. एक म्हणजे काही गोष्टी हळूहळू establish होऊ न देता एकदम दाखवून टाकणे (उदा. राधाच्या घराच्या आतल्या पहिल्याच दृश्यात तिचं जुनाट विश्व एकदम भसकन दाखवून टाकलं आहे. दुसरं म्हणजे भावनिक प्रसंगात सातत्य नसणं. म्हणजे काही प्रसंग अगदी ‘सटल’ आणि हळुवार झाले आहेत तर काही इतके सरळसोट आणि थेट आहेत की त्यात विलक्षण कृत्रिमता येते (उदा. चिन्मय उदगीरकर सोनालीला भेटायला येतो तेव्हा मागे रेडिओवर मोठ्या आवाजात ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना चालू असणं’) (अगदी असाच imbalance सचिन कुंडलकरच्या ‘राजवाडे and सन्स’ मध्येसुद्धा होता!) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवट. आपल्या इथे बहुतांश दिग्दर्शकांना ‘कहाणी सुफळ संपूर्ण’ असं दाखवल्याशिवाय चैनच पडत नाही. चितळे मास्तरांसारखं ‘.... आणि ते सुखाने नांदू ........ लागले’ असं वदवून घ्यायची जणू सवयच लागलेली असते. ज्या दिग्दर्शकाने स्पून फीडिंग पासून मैलोनमैल दूर असणारा ‘गंध’ सारखा सिनेमा दिला त्याला अशी सवय लागेल असं वाटलं नव्हतं पण इथे त्याने किमान तीन सीन आधी संपवून खूप जास्त प्रभावी होऊ शकला असता असा चित्रपट उगाच ‘सगळ्यांचं सगळं कसं मार्गी लागलं’ हे दाखवून मगच थांबवलाय.... अनावश्यक cameo चा मोह ‘आपला मानूस’ सारखा ‘गुलाबजाम’ला देखील झालाय.
असो. थोडं उन्नीस-बीस व्हायचंच .... इतक्या वेगळ्या विषयावरचा सिनेमा मराठीत यावा आणि त्याची नाळ या मातीशी घट्ट जुळलेली असावी यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. ‘रुचिपालट’ (शब्दशः!) म्हणून हा सिनेमा नक्कीच बघावा असा आहे....
No comments:
Post a Comment