Total Pageviews

Saturday, September 15, 2018

प्रयोगांतून बहरत गेलेला ‘किशोर’ : ज्ञानदा नाईक यांची मुलाखत





‘किशोर’ची संपादकीय भूमिका किंवा उद्दिष्टं काय होती?
‘किशोर’ची वेगळी अशी उद्दिष्टं नव्हती. पाठ्यपुस्तकं का आणि कशी असावीत अशी ‘बालभारती’ची उद्दिष्टं होती. ‘बालभारती’तर्फे पूरक वाचन या उद्दिष्टानेच ‘किशोर’ची निर्मिती होत होती.
तुम्ही संपादिका झालात तेव्हा तुमच्यासमोर कुणी आदर्श होते का?
कुणासारखं काम करावं असं काही डोक्यात नव्हतं. मी आधीही ‘किशोर’मध्ये लिखाण करत होते, तेव्हापासूनच ‘किशोर’मध्ये कुठले बदल व्हावेत याबद्दल माझे काही विचार होते. संपादक म्हणून ते अमलात आणावेत हे डोक्यात होतं.
तुम्ही ‘किशोर’मध्ये कुठले वेगळे प्रयोग केलेत?
बरेच प्रयोग केले. मुलांचा ‘किशोर’मधला सहभाग वाढवला. मुलांच्या लिखाणाची सदरं सुरू केली. ‘किशोर’बद्दलची मतं जी मुलं कळवत असत, त्या मुलांना लिहितं केलं. एकेका विषयाला वाहिलेले विशेषांक काढले. लोककला विशेषांक काढला. कारगिल युद्धाच्या वेळी विशेषांक काढला; त्यात सैन्याधिकाऱ्यांचे लेख, प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांचे अनुभव, तिथली छायाचित्रं यांचा समावेश होता. सैन्यात सहभागी होण्यासाठी कोणते मार्ग आहेत, त्यासाठी काय-काय करावं लागतं याचं मार्गदर्शन त्यापाठोपाठच्या अंकात होतं.
संस्कृत साहित्याची मला अतिशय आवड. मी संपादक होण्यापूर्वी ‘किशोर’मध्ये सुभाषितं वगळता संस्कृत साहित्यविषयक फार काही यायचं नाही. अभिजात संस्कृत वाङ्मयाची ओळख व्हावी म्हणून आम्ही ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ सुलभ गोष्टीच्या स्वरूपात वर्षभर प्रसिद्ध केलं. अन्यही महत्त्वाच्या संस्कृत कलाकृतींना अंकात स्थान दिलं.
एक निरीक्षण असं आहे, की तुमच्या काळात वेगवेगळ्या शैलीच्या चित्रांना ‘किशोर’मध्ये स्थान मिळालं. जी चित्रं सुबकतेच्या चाकोरीबद्ध व्याख्येत बसत नाहीत, अशीही चित्रं दिसू लागली. त्याबद्दल थोडं सांगाल का?
आपल्या इथे साक्षरता ही संकल्पना फक्त अक्षरांच्या बाबतीत वापरली जाते. पण मला वाटायचं, की ‘दृश्यसाक्षरता’ (visual literacy) हीदेखील महत्त्वाची आहे. त्याकडे आपलं विशेष लक्ष्य जात नाही. मुलांना चित्रसाक्षर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात नाहीत. ते ‘किशोर’मधून व्हावेत यासाठी पारंपरिक शैलीपासून ते आधुनिक शैलीपर्यंत सर्व प्रकारची चित्रं देण्याचा प्रयत्न आम्ही केला.
अशा अपारंपरिक शैलीतली चित्रं वापरण्यात तुम्हांला काही धोका वाटला नाही का?
नाही. अर्थात आमच्यावर टीकाही झाली. एक खूप मोठे चित्रकार शांताराम पवार, जे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस’मध्ये प्राध्यापकही होते. त्यांना मी म्हटलं, “आपल्याला एक दिवाळी अंक असा करायचा आहे, जो मुखपृष्ठापासून शेवटपर्यंत तुमच्या कल्पनेप्रमाणे बनलेला असेल.” तो धाडसीच प्रयोग होता. पण मला खात्री होती, की मुलांना अंक आवडेल. रूढ अर्थाने गोंडस, आकर्षक अशी चित्रं त्यात नव्हती. चार घड्या-घड्यांचं मुखपृष्ठ असणारा तो अतिशय वेगळा अंक होता. अंकाच्या मजकुराबद्दल आणखीही काही सांगून जाणारी त्या अंकातली चित्रं होती. तो अंक मुलांना आवडला, पण आमच्या इथल्या मोठ्यांना – म्हणजे पाठ्यपुस्तक मंडळातल्या लोकांना – आवडला नाही. कारण काही माणसं ‘हे म्हणजे चांगलं चित्र, हे म्हणजे वाईट चित्र’ असा पारंपरिक विचार करणारी असतात.
‘किशोर’चं काम कसं चालतं ही उत्सुकता आहे. लेखांचे विषय ठरवणे, लेखक ठरवणे, चित्रकारांना सहभागी करून घेणे हे सगळं कसं चालत असे?
काही ठरलेली सदरं असतात. ती त्या-त्या लेखकांकडून लिहून घेणे हे नियमित काम असे. त्याशिवाय लेखकांनी स्वतःहून पाठवलेलं साहित्य असे, त्यातलं वेचक साहित्य निवडणं हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग म्हणजे मुद्दाम मागवलेलं साहित्य, जे विशेषांकाच्या मुख्य सूत्रासाठी लिहायची विनंती लेखकांना केलेली असे. असं तिन्ही प्रकारचे साहित्य एकत्र येऊन अंक बनत असे.
यासाठीच्या चित्रांची वाटणी चित्रकारांमध्ये कशी व्हायची?
चित्रांची जातकुळी पाहून ते ठरवायचो आम्ही. उदा. भावुक चित्रं असतील, तर ती पद्माताई सहस्रबुद्धेंना द्यायचो. विनोदी कथा असेल, तर श्याम जोशींसारखे चित्रकार असायचे. ‘किशोर’ची चित्रकारांची मोठी फळी होतीच, पण एक गोष्ट मी जाणीवपूर्वक केली. ती म्हणजे ‘अभिनव’ किंवा ‘जे. जे.’सारख्या कलामहाविद्यालयांमधून उत्तीर्ण झालेल्या तरुण चित्रकारांना ‘किशोर’च्या चित्रांच्या कामात सहभागी करून घेणे. अशा महाविद्यालयांमध्ये जाऊन मी तिथल्या प्राध्यापकांकडून माहिती घ्यायचे. ‘तुमच्याकडे अशा प्रकारचं काम करू शकणारे कोण कलाकार आहेत, त्यांची नावं सुचवा. त्यांना आम्ही मानधन देऊ आणि चित्र काढायला सांगू. त्यातून कदाचित चांगले चित्रकार घडतील,’ असं मी त्यांना सांगत असे आणि नवीन चित्रकारांशी संपर्क साधत असे.
तुम्ही केलेल्या या ‘टॅलेंट हंट’मधून पुढे आलेली काही नावं सांगता येतील का?
आत्ता मला सगळी नावं आठवत नाहीत, पण यातून बरेच जण पुढे आले. रेश्मा बर्वे ही अगदी विशीतली तरुणी होती, जी आजही उत्तम काम करते आहे. प्रभाकर भाटलेकर हे असंच एक नाव डोळ्यासमोर येतंय. अशा अनेकांना ‘किशोर’मुळे मंच मिळाला. जसे चित्रकार होते, तसेच नवीन लेखकही होते. मी अन्य काही वाचन करत असायचे, तेव्हा नवीन आश्वासक लिहिणारं कुणी दिसतं का; याकडेही मी लक्ष्य ठेवायचे आणि असं कुणी दिसलं की त्याला ‘किशोर’मध्ये सहभागी करून घ्यायचे. राजीव तांबे अगदी सुरुवातीला ‘किशोर’मध्ये लिहीत असे.
जागतिक बालसाहित्याचं प्रतिबिंब ‘किशोर’मध्ये पडावं या दृष्टीने फार प्रयत्न झालेले नाहीत…
अधूनमधून असे प्रयत्न आम्ही केले, परंतु आपल्या संस्कृतीत शिकवण्यासारख्या इतक्या गोष्टी, मूल्यं असताना अट्टाहासाने परदेशातलं काही आणून ते शिकवावं अशी आवश्यकता मला फार प्रकर्षानं वाटली नाही.
प्रकाशित होणारं नवीन साहित्य, बालसाहित्य यांची विशेष दाखल ‘किशोर’मध्ये घेतलेली दिसत नाही. याचं कारण काय?
मी संपादक असताना पुस्तकपरिचयाचं एक सदर सुरू केलं होतं, शिवाय ‘बालचित्रवाणी’ हा ‘किशोर’सह ‘किशोर’ला समांतर चालवला जाणारा राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा उपक्रमही होताच. त्यातून आजूबाजूच्या घडामोडींचा परिचय करून दिला जात असे.
आत्ता तुम्ही ज्या सदराचा उल्लेख केलात, त्यात सातत्य असल्याचं दिसत नाही. त्याच्यामागे कारण काय असावं?
आमच्याकडे पुस्तकपरीक्षणासाठी फारशी पुस्तकं येईनाशी झाली, त्यामुळे ते चालू राहिलं नाही.
‘किशोर’ हा पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुढाकाराने सुरू झालेला प्रकल्प आहे. म्हणजेच पर्यायाने ते सरकारी योजनेचा भाग म्हणून चालत आलेलं आणि तरीही स्वायत्त असलेलं असं प्रकाशन आहे. या कारणामुळे तुमच्या कामात सरकारी हस्तक्षेप झाला का कधी?
काही वेळा तसं होणं स्वाभाविक होतं. काही वेळा मंत्र्यांचा दबाव यायचा, पण त्यावर ‘ठीक आहे, असं असेल तर मी राजीनामा देते’, असा पवित्रा मी घेत असे.
मग त्यांना त्यांचं म्हणणं रेटता येत नसेल…
नाही. ‘राजीनामा देऊ द्या, पण आम्हांला हवं तसंच व्हायला हवं’ असा दबाव मात्र कधी आला नाही. माझं काम मला करू देण्यात आलं, त्यामुळेच मी संपादक म्हणून येण्याआधी आधी अठरा ते वीस हजार अंकांपर्यंत असणारा ‘किशोर’चा खप माझ्या कारकिर्दीत एक लाख अंकांपर्यंत गेला.
‘किशोर’चा असा कुठला प्रकल्प होता का, जो करण्याची इच्छा असूनही लाल फितीमुळे करता आला नाही?
नाही. मला भरपूर मोकळीक होती. शिक्षणमंत्री पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष असायचे. मी मांडीन त्या-त्या कल्पनांना ते मान्यता द्यायचे, त्यांच्याकडून मला कधीही आडकाठी झाली नाही. ‘निवडक किशोर’ या प्रकल्पाची कल्पना माझीच होती. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प मी केला. चार भिंतींच्या आत बसून आम्ही एक मासिक काढतोय आणि आम्हांला हवं ते आम्ही मुलांवर लादतोय असं न करता आम्ही लेखक मंडळींना सोबत घेऊन खेडोपाडी जायचो. माडगूळसारख्या छोट्या खेड्यापर्यंतही आम्ही गेलो होतो. आमच्यासोबतचे लेखक तिथल्या मुलांशी बोलून त्यांना लिहितं करण्याचा प्रयत्न करायचे. पुण्याजवळच्या दगडाच्या खाणीत काम करणाऱ्यांच्या मुलांपर्यंतही आम्ही पोचलो. एका वर्षीचा दिवाळी अंक आम्ही त्या मुलांच्या हस्ते प्रकाशित केला होता. त्यांना लिहायला सांगितलं आणि तेही प्रकाशित केलं. अशा शिबिरांमधून मुलांकडून जे साहित्य मिळायचं, ते आम्ही छापायचो. त्यामुळे मुलांनाही अंक आपलासा वाटायचा. फक्त शहरी, मध्यमवर्गीय मुलांपर्यंतच आम्ही स्वतःला मर्यादित ठेवलं नव्हतं, अगदी वाड्यावस्त्यांपर्यंतही आम्ही पोचलो.
सरकारी पाठबळावर ‘किशोर’ उभा राहिलेला आहे. विविध समित्या, त्यांतली राजकीय पक्षांशी संबंधित असणारी माणसं यांमुळे ‘किशोर’वर कधी कुठल्या विचारसरणीचा प्रभाव पडला असं वाटतं का?
नाही, मला नाही तसं वाटत.
पौगंडावस्थेत मुलांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात. त्यांचा वेध घेणारं काही लिखाण ‘किशोर’मधून कधी प्रकाशित झालं का?
हो, बालमानसशास्त्रज्ञांकडून या विषयावर मुद्दाम लिखाणही करवून घेतलं. बा. सी. मर्ढेकर यांच्या कुटुंबातील एक सदस्यादेखील या विषयावर लिखाण करत असत.
या लिखाणात लैंगिक शिक्षणाबद्दल लिहिण्याचे प्रयोग झाले का?
नाही, थेट नाही झाले.
यामागे काही कारण होतं का? किंवा हा विषय टॅबू असल्याने प्रतिक्रियांची काळजी होती का ?
कारण असं काही नाही. हा विषय त्या वेळी डोक्यात आला नाही खरा. पण काही टॅबूज् मात्र आम्ही पाळले. उदा. बलात्काराला स्थान असू नये. एका नामवंत लेखकाने तसा विषय असणारी कथा दिली, ती नाकारली गेली. मग त्याने वरिष्ठांकडे तक्रार केली. मग मला विचारणा झाली. मी म्हटलं, “मुलांना या वयात हे देण्याची आवश्यकता आहे का?” ते त्यांना पटलं. आपण आपल्या विचारांशी ठाम असलं की अशा प्रसंगात कुणाची आडकाठी येऊ शकत नाही.
नव्वदच्या दशकाच्या शेवटी मजकुराच्या दर्जात आधीच्या पंचवीसेक वर्षांइतकं सातत्य राखलं गेलं नाही, असं एक निरीक्षण आहे. तुम्हांला असं वाटतं का?
माझ्या कारकिर्दीत तसं झालं असं मला नाही वाटत. आधीच्या वीस वर्षांत जे चांगलं जमलं, ते शेवटच्या सात-आठ वर्षांत न जमण्याचं काही कारण नाही.
मी हे संपादनाच्या दृष्टीने नाही, तर लिखाणाच्या दृष्टीने विचारलं. कारण आधीच्याइतके मातब्बर लेखक या काळात लिहीत नव्हते. कमी प्रसिद्ध लेखकांच्या लिखाणामुळेही ते असू शकेल.
प्रसिद्ध लेखकांनी लिहिलं नाही हा मला नकारात्मक भाग वाटत नाही. ते उत्तम साहित्य होतं की नाही, हे महत्त्वाचं. जे छापलं जात होतं, ते उत्तम दर्जाचं होतं असं मला वाटतं.
अलीकडच्या काळात ‘किशोर’ काळासोबत किती बदलला? काळासोबत राहण्यासाठी ‘किशोर’नं नवीन कुठलं माध्यम आत्मसात करावं असं वाटतं का?
अलीकडच्या काळामध्ये मी ‘किशोर’ बघितला नाहीये. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही. मी मागच्या गोष्टींमध्ये पुन्हा लक्ष्य घालत नाही. आपला सहभाग संपला की आपण बाजूला व्हावं, हा माझा स्वभाव आहे.
‘किशोर’ बघितला नसेल, तरीही प्रयोग म्हणून आजच्या काळाला अनुसरून अमुक एक प्रयोग व्हावा, असं तुम्हांला वाटतं का?
नाही, मी त्या दृष्टीने विचार नाही केला. ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे, ते यात लक्ष्य घालतीलच.
आजच्या काळात ‘किशोर’सारखी मासिकं कालसुसंगत आहेत असं तुम्हांला वाटतं का?
अलीकडे वाचनाची आवड खूपच कमी झाली आहे. प्रामुख्याने शहरी भागात. पण मी छोट्या गावांत जाते; तेव्हा लक्ष्यात येतं, की मुलांना अजूनही वाचनाची आवड आहे. ‘माडगूळकर प्रतिष्ठान’तर्फे ग्रामीण मुलांसाठी कार्यक्रम घेऊन आम्ही लेखन, वाचन, अभिनय या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर मांडतो. तालुक्यांत, खेड्यांत अजूनही चांगली पुस्तकं वाचायची आवड आहे असं दिसतं. ‘किशोर’ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जातो. तो पडून राहिला आहे असं मला कधी कुठे दिसलं नाही. मुलांच्या मानसिकतेवर आक्रमणं बरीच झाली आहेत. करमणुकीची साधनं बदलली आहेत. खेड्यांत अजून हे वारं तितकंसं पोचलेलं नाही. अजूनही तिथल्या मुलांना शब्दकोडं सोडवायला आवडतं. त्यामुळे ‘किशोर’ आजही कालसुसंगत आहे.
शहरांमधल्या मराठी कुटुंबांमध्ये मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. शहरातल्या मुलांच्या वाचनाची आवड कमी होण्यामागे शिक्षणाचं हे बदललेलं माध्यम असू शकतं का?
हो, नक्कीच. पुण्यात मराठी शाळांचं प्रमाण खूप कमी झालंय. गोव्यातही मी हेच पाहिलं. ७०% मराठी शाळा बंद झाल्या आहेत. बऱ्याच घरात मुलांशी इंग्रजीच बोललं जातं. मग मुलांची मराठीची गोडी वाढणार कशी!

– प्रसाद फाटक
(रेषेवरची अक्षरे या ऑनलाईन दिवाळी अंकावर पूर्वप्रकाशित : http://www.reshakshare.com/2017/10/1039/)

No comments:

Post a Comment