Total Pageviews

Saturday, September 15, 2018

Now It Can Be Told : स्वातंत्र्याचा उषःकाल होतानाची काळरात्र ....





सत्तर वर्षं ! जनता दीडशे वर्षं ज्या स्वातंत्र्याची आस लावून बसली होती ते बरोबर सत्तर वर्षांपूर्वी आपल्या कवेत येत होते. डोळ्यात स्वप्नं होती, आकांक्षा होत्या, कुतूहल होते.... आता सुरुवात होणार होती ती नव्या मनूची. समोर आव्हानांचे पर्वत उभे असले तरी वातावरणात भरलेल्या चैतन्यानेच ते आव्हान पेलण्याचा विश्वासही दिला होता. पण सगळीकडे एवढेच आलबेल होते का ? नाही.

दिल्लीतील आनंदोत्सवाच्या पांघरुणाखाली दबलेले होते अनेक हुंदके.... राजकीय नेतृत्वाकडून वाजवल्या जाणाऱ्या त्यागाच्या खऱ्या खोट्या गोष्टींच्या ढोलांच्या आवाजात विरून जात होते अनन्वित आक्रोश आणि करूण किंकाळ्या.... स्वातंत्र्याच्या राजमार्गाच्या बाजूला होते एक घनदाट बाभळीचे बन... आणि त्यात अडकलेले लाखो जीव आस लावून बसले होते, की या मार्गावरून जाणारा कुणीतरी येईल आणि या रक्तबंबाळ अवस्थेतल्या आम्हा लोकांच्या जखमांवर फुंकर घालायला... पण ते व्हायचे नव्हते. हे होते त्रिभाजन एका राष्ट्राचे... एका पुण्यभूमीचे.... जिथे प्राचीन सामायिक परंपरेपेक्षा महत्व आले होते एका परकीय भूमीतून आलेल्या धर्मावरच्या निष्ठेला ! अपरिमित अत्याचार करून शेकडो वर्षे स्थायिक असलेल्या पंजाबी हिंदू, सिंधी हिंदू आणि शीख समाजाला भारताच्या पश्चिम भागातून आणि बंगाली बांधवांना पूर्व भारतातून हाकलून दिले जात होते. हजारो क्रांतिकारक, सत्याग्रही, नेते, अनुयायी यांनी आधीच आपल्या जीवाची खूप मोठी किंमत देऊन आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळवले होते पण हा शेवटच्या तीन-चार महिन्यातला तडाखा सहनशीलतेच्या पलीकडचा होता. इतकी वर्षं इंग्रजांशी लढताना आपले विरुद्ध परके असा सुस्पष्ट लढा होता. पण स्वातंत्र्यदिनाच्या अल्याडपल्याडचा तो संघर्ष होता इतकी वर्षं आपलेच बांधव समजलेल्या माणसांनी स्वतःला वेगळे समजून सुरु केलेला. या काळ्या पर्वाचा ‘आंखों देखा हाल’ सांगणारे पुस्तक आहे Now It Can Be Told, जे एक केवळ घटनांची आणि त्यातल्या वेदनांची कहाणी सांगत नाही तर ते मांडतं लेखाजोखा एका संपूर्ण कालपटाचा.

लेखक ए. एन बाली हे लाहोरचे रहिवासी. पिढ्यानपिढ्या लाहोरमध्ये गेल्याने लाहोरच्या मातीशी गाढ ओळख असणारे आणि एकूणच पंजाब प्रांताचीही नस ओळखणारे. चौकस आणि अभ्यासू. देशाच्या अन्य भागात मुस्लीम लीगने सुरू केलेल्या दंग्यांमुळे आणि त्याला मिळणाऱ्या प्रत्युत्तराने वातावरण ढवळून निघालेले असताना पंजाब शांत असल्याचा त्यांना अभिमान वाटत होता. इतका की त्यांनी त्या अनुषंगाने १९४६ साली ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात पंजाबच्या वैशिष्ट्यांवर लेखही लिहिला होता. पण या विश्वासाला हळूहळू तडे जाऊ लागले. रावळपिंडीमध्ये हिंदू आणि शिखांवरच्या अत्याचाराने भयभीत लोक लाहोरमध्ये येऊन आसरा घेऊ लागले होते. परंतु तो दिलासा तात्पुरता होता. कारण एकेकाळी हिंदूबहुल लाहोरमध्ये मुस्लीम नेत्यांनी अतिशय नियोजनपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे आधीच मुस्लीम व मुस्लिमेतर लोकसंख्येचे गुणोत्तर ५०:५० वर येऊन पोचले होते. हे पुस्तक १९१३ सालापासून लाहोर मुस्लिमबहुल करण्यासाठी झालेले पद्धतशीर प्रयत्न ते आकडेवारीसाहित मांडतं. जाणीवपूर्वक मुस्लिम बहुसंख्य गावं लाहोरच्या हद्दीत आणणे इतकंच काय, तर लाहोरशी जोडणारे रस्तेही नाहीत असे मुस्लीम मोहल्ले लाहोरच्या प्रशासकीय आवाक्यात आणून ५२ चौ. मैलांचे क्षेत्रफळ १२८ चौ. मैलांपर्यंत वाढवणे वगैरे याचे तपशील पुस्तकात आहेत. हे वाचलं की लक्षात होतं दारुगोळा तयार होता, वात (आणि वाट !) लागायची बाकी होती, जी १९४७मध्ये लागलीच.


मार्चमध्ये मुस्लिमांचे अत्याचार सुरु झाले.... त्यापुढच्या एकेका घटनेचे, एकेका प्रसिद्ध व्यक्तीच्या हत्येचे पुस्तकात पानोपानी तपशील आहेत. मॅजिस्ट्रेट चीमा सारख्या उच्चपदस्थांपासून ते स्थानिक मुस्लीम गुंडांपर्यंत एक जबरदस्त साखळी तयार करून अतिशय पद्धतशीरपणे हिंदू व शिखांचे शिरकाण करण्यात आले. लाहोर नगरपालिकेमध्ये सत्तेवर असणाऱ्या मुस्लीम नेत्यांनी तोंडदेखले प्रयत्न म्हणून संचारबंदी लागू केली खरी पण त्यालाही बळी पडले नियमपालन करणारे हिंदू आणि शीखच. व्हायचं काय की संचारबंदीमुळे हिंदू आणि शीख बाहेर पडायचे नाहीत पण मुस्लीम लीगची माणसं मात्र खुलेआम जाळपोळ करत, भोसकाभोसकी करत गल्ल्यागल्ल्यांमधून भटकायचे, केसालाही धक्का न लागता. बरं बाजूच्या गल्लीतल्या हिंदू बांधवाला मदत करायला बाहेर पडायचे तर संचारबंदी मोडल्याबद्दल गोळी खाऊन कुत्र्याची मौत नक्की....

हे सगळं होत असताना काँग्रेसचे नेते काय करत होते ? आश्वासनं देत होते  ! हिंदू व शिखांना वाचवण्यासाठी लष्करी कायदा (मार्शल लॉ) लावण्याशिवाय गत्यंतर नसूनही ना इंग्रज प्रशासक ते करत होते ना कॉंग्रेसचे नेते त्यांच्यावर अथवा हंगामी सरकारवर दबाब आणत होते. बलदेव सिंह वचनं देत होते आणि गांधीजी सल्ले .... गांधीजींनी तर सरळ सांगून टाकलं होतं “तुम्हाला जर वाटत असेल लाहोर मरतंय, तर त्यापासून दूर पळून जाऊन नका ... जे मरणोन्मुख झालंय असं तुम्हाला वाटतंय अशा लाहोर सोबतच प्राण सोडा”. लेखकाचे यावरचे बोचरे भाष्य त्याच्याच शब्दांत : “The presence of Mahatmaji  in the heart of the Punjab at this juncture would have radically altered the situation and perhaps prevented the partition and post-partition holocaust. But that was not be, as the inner voice of Mahatmaji’s conscience and openly expressed popular voice of Hindus and Sikhs of Lahore did not coincide. These coincided very well later in Calcutta and Delhi but minorities in both these places happened to be other than Hindus and Sikhs”

आपल्या जन्मभूमीतून पाय बाहेर टाकण्याची इच्छा नसलेले अनेक जण नेत्यांच्या आश्वासनांवर आणि भावनिक आवाहनांवर विसंबून तिथेच राहिले आणि मुस्लीम लीगच्या लांडग्यांच्या तावडीत आयतेच सापडले. जे कसेबसे जीव वाचवून पूर्व पंजाबकडे पळत सुटले त्यांचे हाल कुत्रे खाईनात. लेखक स्वतः मात्र अन्य दोन परिचित कुटुंबांसोबत लाहोरमध्ये कसाबसा राहत होता. आजूबाजूला जाळपोळ, हत्या आणि लुटालूट होत असताना लाहोरमधल्या घरात जीव मुठीत धरून लेखक दिल्लीच्या रेडीओ केंद्रावरून होणारे स्वातंत्र्यदिनाचे धावते समालोचन ऐकत बसला होता. तो म्हणतो “निवेदक उत्साहाने सांगत होता की पाऊस थांबून आकाशात अचानक सुरेख इंद्रधनुष्य उमटले आहे. वातावरणात चैतन्य भरले आहे. इतक्यात माझ्या गल्लीत गोळीबार झाल्याचा आवाज आला. निवेदक इंद्रधनुष्याचे (Rainbow) वर्णन करत होता आणि मी इथे अग्निधनुष्याच्या (Firebow) सान्निध्यात होतो” काय असतील या वेदना ? नेते फुलबाज्या उडवत आहेत, आपल्याला वणव्यात तसेच सोडून ... कुठलीही आश्वासने न पाळता .... या वेदनेवर कुठलेच मलम नव्हते. स्वतंत्र भारतातले बांधव तिकडे मिठाई वाटत आहेत मग इकडे पश्चिम भारतात, पाकिस्तानाच्या घशात जाणाऱ्या पितृभूमीवर होते कोण सोबतीला, रक्षणाला ? याचे उत्तर आहे प्रकरण सात – A FRIEND IN NEED IS A FRIEND INDEED - मध्ये


ही गाथा आहे असीम धैर्याची आणि त्यागाची ! जीवावर उदार होऊन हजारो जीव वाचणाऱ्या आणि आवश्यकता पडेल तिथे संघर्ष करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नि:स्वार्थी स्वयंसेवकांची. त्याकाळी पंजाब प्रांत, कराची या सध्याच्या पाकिस्तानात संघाच्या प्रभावी शाखा लागायच्या. तिथल्या स्वयंसेवकांनी प्रत्येक असुरक्षित गल्ली आणि परिसरातून हिंदू आणि शिखांना सुरक्षित ठिकाणी नेणे, त्यासाठी वाहनव्यवस्था करणे, त्यांच्यासाठी अन्न, औषधपाणी, कपडे यांच्या सोयी करणे, एवढंच काय पण अग्निशामकाचीही व्यवस्था करणे, एवढे प्रचंड काम केले. एवढंच काय तर दंगलीत अडकलेल्या अनेक मुस्लिम महिला आणि बालकांनाही निर्वासित छावण्यांपर्यंत पोचवल्याची उदाहरणं पाहिल्याचेही लेखक नमूद करतो. शाखांवर मिळणाऱ्या शारीरिक शिक्षणामुळे कणखर झालेल्या स्वयंसेवकांनी निर्वासितांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा पथकं स्थापन केली आणि अनेक ठिकाणी हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले. अनेक कॉंग्रेस नेत्यांनी संघ स्वयंसेवकांकडून मदत मागितली होती. जनतेचे पालक असणाऱ्या नेत्यांकडून हिंदू आणि शीख समाजाला अक्षरशः वाऱ्यावर सोडलेले असताना एका बिगर-राजकीय, बिगर-सैन्यदलीय संघटनेने पुढे येऊन जीवाची आहुती दिल्याबद्दल तसंच निर्वासितांची काळजी घेण्यात व सेवा सुविधा पुरवण्यात नवे सरकार सपशेल अपयशी ठरत असताना ही जबाबदारी स्वयंसेवकांनी स्वतः हाती घेतल्याचे फळ काय मिळाले ? पंडित नेहरूंनी कानपूरच्या सभेत सरळ आरोप केला “संघ स्वयंसेवक पंजाब प्रांतात अस्थिरता निर्माण करत आहेत”. एखाद्या देशाच्या प्रमुखाकडून इतके बेजाबदारच नव्हे तर कृतघ्नही  वक्तव्य क्वचितच ऐकायला मिळाले असेल. पण लेखक नमूद करतो “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी पंजाबमधील हिंदू तसेच शीख निर्वासितांची असणारी भावना पराकोटीच्या कृतज्ञतेची आहे. कारण त्यांना कुणीही विचारत नसताना हेच मदतीला धावून  आले होते”

एवढे सगळे विस्ताराने मांडल्याबद्दल लेखकाला धन्यवाद दिले पाहिजेत. १९४९ सालच्या या छोटेखानी पुस्तकात एवढे तपशील आकडेवारीसह मांडले आहेत की ते फक्त एक कैफियत मांडणारे अनुभव कथन होत नाही तर ऐतिहासिक दस्तावेज बनते. या पुस्तकात काय नाही ? १९४१ साली लाहोरमध्ये असणाऱ्या प्रत्येक धर्माच्या रहिवाश्यांची मालमत्ता, भाडेकरू आणि मालकांची संख्या, हिंदू व मुस्लीमबहुल भागातील दुकानांचे व उद्योगांचे टक्केवारीनुसार पृथक्करण, प्रत्येक भाषेतील वृत्तपत्रांची संख्या, पोलिसखात्याकडे ‘गुंड’ म्हणून नोंदले गेलेल्या परंतु दंगलीच्या काळात पोलिसांच्या नाकाखाली राजरोसपणे हिंदूहत्या करणाऱ्या समाजकंटकांची यादी, पाकिस्तानातून आपली जमीन सोडून आलेले बिगर-मुस्लीम आणि इथून पाकिस्तानात आपली मालमत्ता सोडून गेलेल्या मुस्लिमांच्या जमिनींच्या क्षेत्रफळांममधला फरक, त्यांच्या मालमत्तांचे हिशेब, फाळणीपूर्व पंजाबमधल्या विविध परगण्यातील मुस्लीम व बिगर मुस्लिमांची टक्केवारी, विविध नकाशे, काश्मीर समस्येवरचे भाष्य इ. गोष्टी थक्क होऊन जावे इतक्या तपशिलाने मांडलेल्या आहेत. पुस्तकाची भाषा बोचरी आहे पण त्यांनी कुठेही पातळी सोडून भाषा वापरेलेली नाहीये की नुसते दुःखाचे कढ काढत राहिलेले नाहीयेत. इतक्या भयानक गोष्टी त्यांच्यासमोर घडल्या असून, अनेक निष्क्रिय नेते दिसत असूनही हे संतुलन राखणे फार अवघड आहे. फक्त भावनिक न बनता घडलेल्या गोष्टींच्या मागचा कार्यकारणभाव शोधणारी लेखक ए. एन् बाली यांची वृत्ती हे या पुस्तकाचे सर्वात मोठे बलस्थान आहे.

या १५ तारखेला भारतीय प्रजासत्ताक सत्तरीचे होत असताना आपण आजवर केलेल्या कामगिरीचे कौतुक करतानाच हे सगळं मिळवताना आपण काय गमावलं, त्याची किती किंमत मोजावी लागली आणि त्यामागची कारणं कुठली याची जाणीव मनात सतत जागी राहिली तरच मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल राहते आणि स्वैराचार होत नाही. Now It can be Told सारखी पुस्तकं त्यासाठीच वाचायची....


पुस्तकाचे नाव : Now It Can Be Told

लेखक : ए. एन्. बाली

प्रकाशक : आकाशवाणी प्रकाशन, जालंधर

हे पुस्तक १९४९ साली प्रकाशित असून त्याची छापील आवृत्ती बाजारात नाही. परंतु आपल्या सुदैवाने ते इंटरनेटवर मोफत डाऊनलोडसाठी pdf, text, kindle  इ. विविध format मध्ये उपलब्ध आहे.


त्याचा दुवा पुढीलप्रमाणे : https://archive.org/details/NowItCanBeTold


- प्रसाद फाटक


mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/8/15/Now-it-can-be-told-Book-review-by-prasad-Phatak-.html


- प्रसाद फाटक


No comments:

Post a Comment