२६ मे येतोय तसतशी सर्वांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. सर्व जगाच्या लाडक्या सचिनच्या आयुष्यावर चित्रपट प्रदर्शित होतोय. ज्याने लाखो लोकांना स्वप्न पहायलाच नाही तर स्वप्न जगायलाही शिकवलं त्या ‘क्रिकेट-देवा’बद्दल एका व्यक्तीची मात्र तक्रार आहे की "सचिनने माझ्यातल्या क्रिकेटपटूला उध्वस्त करून टाकलं". का बरं ? कारण लहान वयात जेव्हा जेव्हा ही व्यक्ती क्रिकेटमध्ये चमक दाखवायला गेली तेव्हा त्याचवेळेस मुंबईच्या शालेय क्रिकेटच्या आकाशात 'सचिन' नावाचा तारा एवढा तेजाळून उठला की त्यापुढे या व्यक्तीच्या खेळीचे महत्व अगदी खुजे वाटायचे. तुलना करायला थेट सचिनचीच एखादी ताजी इनिंग असायची. जाणता-अजाणता मनात थोडा न्यूनगंडही येऊ लागला. पण पुढे एक दिवस असा आला की, खुद्द सचिनच्या संघाशीच सामना होता. ही व्यक्ती अंतिम ११ मध्ये नव्हती म्हणून अन्य सहकाऱ्यांसोबत पॅव्हिलिअनमधून सचिनच्या संघाची बॅटिंग बघत होती. "त्या दिवशी सचिनने एक शॉट असा मारला की मी आयुष्यात असा शॉट खेळायचा विचारही करू शकत नाही" हे तिला लक्षात आलं. हाच क्षण होता तो आपली मर्यादा ओळखण्याचा. आपण उत्कृष्ट क्रिकेटपटू होऊ शकतो या विश्वासाला प्रचंड तडा घालवणारा क्षण... त्यातूनच या पुस्तकाला मिळालेलं हे शीर्षक...
तुम्हाला इतपतच सांगितलं तर वाटेल की, काहीतरी सनसनाटी पुस्तक आहे. सूर्यावर थुंकण्याची खोड असणाऱ्या कुणीतरी लिहिलेलं. पण तुम्हाला जेव्हा कळेल की हे पुस्तक प्रसिद्ध क्रिकेट-विनोदवीर 'विक्रम साठ्ये' यांनी लिहिलेलं आहे तेव्हा तुमचा या पुस्तकाकडे पाहायचा दृष्टिकोनच बदलेल. आणि आहेही तसेच... पुस्तक वाचायला सुरुवात कराल तेव्हा लक्षात येईल की, या पुस्तकाचे शीर्षक म्हणजे विक्रम साठ्ये यांनी केलेली एक गोड तक्रार आहे.
ज्या सचिनशी लहानपणी तुलना व्हायची, 'तुझ्या वयाचा असूनही त्या सचिनने बघ कुठल्याकुठे झेप घेतली' अशी डायलॉगबाजी व्हायची त्याच सचिनच्या वागण्याबोलण्याची नक्कल विक्रम साठ्येंना विलक्षण प्रसिद्धी देऊन गेली. इतकी की MBA नंतर करत असलेली नोकरी सोडून ते पूर्णवेळ ‘स्टँडअप कॉमेडियन’ बनले. एवढेच नव्हे तर चक्क सचिनशीही दोस्ती झाली ! एक वर्तुळ पूर्ण झाले... त्याचीच गंमतगोष्ट आहे या पुस्तकात.
सचिनला समांतर प्रवास
पुस्तकाचे पहिले प्रकरण वर म्हटल्याप्रमाणे सचिनचा आयुष्यावरचा प्रभाव सांगते. ‘सचिनने माझं आयुष्य बरबाद केलं’ असं शीर्षक 'गोड तक्रार' या प्रकारचे आहे हे वाचताना लक्षात येतेच कारण त्या प्रकरणात सचिनच्या गुणवत्तेला दादच दिलेली आहे. आणि मुख्य म्हणजे MTV मध्ये काम करत असता सहकाऱ्यांसमोर केलेली सचिनची नक्कलच त्याला मोठ्या मंचावर घेऊन गेली याची कबुली साठ्ये यांनी या प्रकरणात (आणि पुस्तकाच्या उपशीर्षकातही) खुल्या दिलाने दिली आहे. क्रिकेटची पॅशन असणारा छोटा खेळाडू ते जगभरच्या ‘क्रिकेटपटूंशी दोस्ती करणारा हास्यसम्राट व्हाया मॅनेजमेंट क्षेत्रातली एक्सेल-पॉवरपॉईंटवाली नोकरी’ हा सगळा प्रवास अगदी प्रसन्नपणे मांडला आहे.
अर्थात हे पुस्तक केवळ सचिनबद्दल नाही. सचिनसोबतच सेहवाग, द्रविड, युवराज आणि अन्य खेळाडूंबद्दल यात बरंच काही आहे. त्यांच्याशी झालेली भेट असेल किंवा मंचावरून त्यांची केलेली नक्कल असेल, अनेक प्रसंगांतून खेळाडूंसोबत लेखकाचे ऋणानुबंध कसे घट्ट होत गेले याबद्दलही लिहिलेले आहे.
क्रिकेट खेळण्यामागचा सखोल विचार
खुसखुशीत भाषा हे पुस्तकाचे सगळ्यात मोठे बलस्थान असले तरी मला यातला सगळ्यात भावलेला भाग म्हणजे हा नुसताच किस्से आणि विनोदांचा संग्रह नाही. एकेका खेळाडूची क्रिकेटकडे पाहण्याची दृष्टी, सातत्याने स्वतःला उत्तमतेकडे घेऊन जाण्याचा ध्यास याबद्दल यात विस्ताराने लिहिलेलं आहे. याबद्दलची चर्चा हा या पुस्तकाचा USP आहे. प्रत्येकातल्या ‘राखीव ऊर्जासाठ्या’बद्दल सचिनने मांडलेले विचार विचार करायला लावणारे आहेत. तो म्हणतो, “प्रत्येकाकडे एक राखीव ऊर्जासाठा असतोच. जेव्हा तुम्ही प्रचंड थकता तेव्हा तुम्हाला आपल्यातली सगळी ताकद संपली असंच वाटायला लागतं. पण तेव्हाच खरी परीक्षा असते. प्रचंड थकव्याच्या टप्प्यापर्यंत तुम्ही पोचल्यानंतर केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही आपल्या मर्यादा लांघू पाहता तेव्हाच आपल्यामधली ऊर्जेची राखीव कोठारं खुली होतात जी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातात.” स्वतः सचिनने चेन्नईसारख्या भयंकर उष्ण ठिकाणी धावांच्या सत्तरीत पोचेपर्यंत सगळ्या शक्तीचा निचरा झाल्यानंतरही स्वतःला असंच खेचून पुढे नेलं होतं..
एकेका प्रकरणाची सुरुवात एखाद्या खेळाडूला केंद्रस्थानी धरून केली असली तरी त्या-त्या प्रकरणातून विक्रम साठ्ये यांनी एकेका महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला आहे. जसं की राहुल द्रविडवरचे प्रकरण हे स्वाभाविकपणे एकाग्रतेवर भाष्य करते. इतिहास व भविष्याच्या भानगडीत न पडता 'एका वेळी एक चेंडू' हे तत्व आत्मसात करून वर्तमानात कसं राहायचं याबद्दलचे द्रविडचे विचार वाखाणण्यासारखे आहेत. त्याचसोबत खेळाडूने काही काळ खेळापासून विचाराने दूर जाणं, रिलॅक्स होणं हे पुन्हा जोमाने खेळण्यासाठी किती आवश्यक आहे हेही द्रविड सांगतो. याकामी त्याला पुस्तक वाचनाची खूप मदत झाली हेही आवर्जून सांगायला तो विसरत नाही. उगीच नाही द्रविड एवढा अभ्यासू वाटत !!
एकीकडे ही विचारसरणी तर दुसरीकडे सेहवागसारखा जगावेगळा खेळाडू... त्याच्यावरचं प्रकरण त्याच्या अचाट विचारपद्धतीची ओळख करून देतानाच 'नियमांना अपवाद असतातच' या सत्याचीही जाणीव करून देतं. उदा. टीममधले अन्य खेळाडू ध्यानधारणा अतिशय व्यवस्थितपणे करत असताना "मला एका चेंडूसाठी जास्तीत जास्त २५ सेकंद एकाग्रतेची गरज असताना मी १५ मिनिटे ध्यानधारणा का करू ?" असा वरकरणी बावळट प्रश्न सेहवाग विचारायचा, ऐन सामन्यात दडपण येऊ नये म्हणून दोन चेंडूंदरम्यान चक्क गाणी गुणगुणायचा. आता एकाग्रतेच्या अलिखित नियमावलीत हे वागणे ‘अब्रह्मण्यम’ असले तरी याच गोष्टींमुळे सेहवाग यशस्वी झाला हेही तितकेच खरे. त्यामुळेच खेळाडू किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकतात हे माहित करून घेणं खूप रंजक आणि त्याचवेळेस शिकवूनही जाणारं आहे. उदा. झहीर खान म्हणतो, “बॉलिंग ही एखाद्या ध्यानधारणेसारखी असते. विशेषतः तुम्ही चेंडू टाकून झाल्यावर आपल्या रनअपकडे परत जाताना कोणत्या विचारांनी आणि मानसिकतेतून जाताय यावर तुमची कामगिरी फार अवलंबून असते.” तर "निर्णयातला विलंब म्हणजे गमावलेली संधी, जरी तो निर्णय चुकीचा असला तरी तो इतरांनी कुणीतरी घेऊन टाकण्याआधी स्वतःच घेऊन टाकण्यात शहाणपणा असतो" असा मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाला साजेसा विचार आर. अश्विन मांडून जातो. हे सगळं वाचून एकच लक्षात येतं की प्रत्येकाला साधारणपणे एकसारखेच मूलभूत प्रशिक्षण मिळत असले तरी त्या त्या खेळाडूचे व्यक्तिमत्व, विचार, खेळाकडे आणि आयुष्याकडे पहायची दृष्टी हे त्याला सर्वार्थाने एकमेवाद्वितीय बनवत असतात. खेळाचं हेच तर सौंदर्य असतं !
मैदानाच्या परिघाबाहेरचे बरेच काही
पुस्तक केवळ सचिन, क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांच्याबद्दल नाही. तर हा खेळ आपल्यासाठी जे अनेक घटक जिवंत करतात त्यांच्याबद्दलही पुस्तकात बरेच काही आहे. इथे आपल्याला हर्षा भोगलेसारख्या विद्वान समालोचकाच्या मेहनतीबद्दल, सुनंदन लेले या अवलिया क्रीडापत्रकाराच्या प्रवासाबद्दल कळते. क्रिकेटच्या आकडेवारीचा महाकुंभ असलेले मोहनदास मेनन, भारतीय क्रिकेट टीमच्या प्रत्येक खेळाडूला रोजच्या थकव्यातून बाहेर काढणारे त्यांचे लाडके मसाजीस्ट ‘माने काका’ वगैरे खूप अपरिचित मंडळीही भेटतात. फक्त शेवटाकडे येणारे Are Women Responsible For The Sporting State Of Our Country हे प्रकरण नसते तरी चालले असते असं मला वाटलं. ते कमी रंजक आहे म्हणून नव्हे तर त्यातला मजकूर हा पुस्तकापेक्षा ‘स्टँडअप कॉमेडी शो’ मध्ये सादर करण्यासाठी अधिक योग्य वाटतो म्हणून.
एवढ्या घडामोडी, माणसं वगैरे गोष्टी जवळून ऐकण्या/अनुभवण्याचे भाग्य विक्रम साठयेंना लाभल्याबद्दल पुस्तक संपेपर्यंत खरंच हेवा वाटायला लागतो. पण त्यांनी ते फक्त त्यांच्याजवळ न ठेवता अगदी नेमक्या शब्दांत आपल्यापर्यंत पोचवले यासाठीही त्यांना धन्यवादच द्यायला हवेत. फक्त क्रिकेटप्रेमींनीच नाही तर चांगले विचार जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनीच हे पुस्तक वाचायला हवे
पुस्तकाचे नाव : How Sachin Destroyed My Life
….. but gave me an All Access Pass to the world of cricket.
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठसंख्या : २०८
किंमत : १९२ रु.
- प्रसाद फाटक
mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/5/20/book-review-of-how-sachin-destroyed-my-life-by-prasad-phatak.html
No comments:
Post a Comment