आपल्यापैकी खूप जणांना लहानपणी नाणी, स्टॅम्प गोळा करण्याचा छंद असतो. मोठं होत जातो तसतसा त्यातला रस बऱ्याचदा कमी व्हायला लागतो आणि ‘आपल्याकडे असलेल्या दुर्मिळ गोष्टी’ याहून अधिक त्या संग्रहाचे अप्रूप उरत नाही. फार थोडे जण त्या एवढ्याश्या इतिहासाच्या साधनांचा धांडोळा घेत वर्तमानाचा इतिहासाशी पूल जोडू पाहतात. नाणी, पोथ्या, शिलालेख, ताम्रपट, पत्रं, फर्मानं इथपासून ते उत्खननात मिळालेली गाडगी-मडकी, आभूषणं वगैरे सगळी इतिहासाची साधनं अभ्यासत, त्यांना एका सूत्रात गुंफत-गुंफत सर्व ऐतिहासिक घटनांची शृंखला जगासमोर मांडणाऱ्या व्यक्तीलाच इतिहासकार म्हणतात. ज्ञात घटनांमधल्या अज्ञात गाळलेल्या जागा भरून शोधून काढण्याची नशा या इतिहासतज्ञांना अनेक दिव्यं पार पडायला लावते... मग ते बाबासाहेब पुरंदरेंचं एका छोट्या जुन्या-पुराण्या कागदासाठी धो-धो पावसात सायकल मारत पुण्याहून प्रतापगडपाशी जाणं असो, गो.नी. दांडेकरांचं हवापाण्याची तमा न बाळगता रायगडाला दोन-दोनशे वेळा भेट देणं असो, इतिहासाचार्य राजवाडेचं जुनी पत्रं मिळवण्यासाठी दारोदार वणवण भटकणं असो किंवा प्रस्तुत 'इतिशोध' पुस्तकाचे लेखक सुरेश जोशी यांचं सिद्धनागार्जुनाची गुहा शोधण्यासाठी अपरिचित खेड्यापाड्यांमध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये चार वर्षं भटकणं असो.... सगळ्या इतिहास अभ्यासकांचं गोत्र एकच !
सुरेश जोशी यांनी नगरच्या वस्तुसंग्रहालयाचे विश्वस्त म्हणून काम पहिले. शाळेत असताना इतिहासाबद्दल मनात प्रचंड भीती होती, इतकी की दहावी पास होण्यामध्ये हा एकमेव अडसर होता. पण आयुष्यातल्या त्या मोक्याच्या टप्प्यावर मुख्याध्यापक द. वि. केतकर यांनी आपल्या ‘इतिहासातील अंतःप्रवाह’ या हस्तलिखिताचे बाड सुरेशला वाचायला दिले. तो त्यांच्या आयुष्यातला कलाटणीचा क्षण ठरला. त्या पुस्तकात इतिहासातील अंतःप्रवाह कोणते, ते का निर्माण झाले, त्यांची दिशा व मार्ग कोणता, त्याचा परिणाम काय होतो आदिंचे रसाळ विवेचन केले होते. त्या पुस्तकाने त्यांना इतिहासाकडे बघायची नवी दृष्टी दिली. त्याने केवळ दहावींच्या गुणांमध्ये वाढ झाली असे नाही तर कशासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तरच दिलं. मग इतिहास हा विषय त्यांचे वेडच बनला. अत्यंत तुटपुंज्या पगारातून, प्रसंगी स्वतःच्या पदराला खार लावून छोट्या-मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी केलेली वणवण आणि अविश्रांत धडपडीतून हे संग्रहालय उभे राहिले आहे. ‘इतिशोध’ हे तसे रूढार्थाने त्यांचे आत्मचरित्र नसले तरीही यातली प्रकरणं त्यांच्या उद्दिष्टासाठी झोकून दिलेल्या आयुष्याचा पट यातून ठळकपणे आपल्यासमोर येतो.
हे अनुभव कथन रोचक आहे वेधक आहे आणि त्याचबरोबर शिकवूनही जाणारं आहे. दूरगावच्या दुर्योधन मंदिराच्या शोधाची कथा सांगताना त्यांनी अशा मंदिरामागचा हेतू काय असावा, त्याबद्दलचे लोकांचे समज, श्रद्धा याबद्दल खूप छान विवेचन केलेले आहे. इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असला तरी क्वचित कधीतरी जितांचा इतिहास नजरेस पडतो तेव्हा दुर्योधन मंदिरामागचा कार्यकारण भावही लक्षात येतो याचीही जाणीव ते आपल्याला करून देतात. एका पुजाऱ्याच्या चुलीत सरण म्हणून टाकलेली ज्ञानेश्वरीची प्रत हस्तगत करणे, अत्यंत तापट, तिरसट असणाऱ्या एका म्हाताऱ्याकडून संवादकौशल्याच्या बळावर जुन्या पोथ्या मिळवणे हे या पुस्तकातील लक्षात राहणारे हे प्रसंगही संशोधकाच्या अंगी गरजेच्या असणाऱ्या चिकाटी आणि इच्छाशक्ती या गुणांबद्दल बरंच काही सांगून जातात. ‘संभाजीराजांची धिंड’ हे नगरच्या संग्रहालयाचे मानचिन्ह असणारे चित्र अहंकारी वरिष्ठ अधिकारी पु. म. जोशी यांच्यापासून वाचवायला जे प्रचंड कष्ट पडले त्याची कथा हे पुस्तकातले (आणि बहुदा त्यांच्या आयुष्यातलेही) हे सर्वात महत्वाचे प्रकरण आहे. खरं म्हणजे वरिष्ठ या नात्याने पु. म. जोशी यांना त्या चित्राचे मूल्य कळायला हवे होते पण झाले उलटेच. इतिहासाच्या एवढ्या अमूल्य ठेव्याच्या जपणुकीवरून एवढे राजकारण झाल्याचे पाहून मन खरोखर उद्विग्न होते, पण दुसरीकडे सुरेश जोशींच्या चिकाटीला वंदनही करते.
कथनाच्या ओघात पुस्तकात खूप मोठ्या व्यक्ती भेटत जातात.. त्यापैकी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, लेखकाचे गुरु द. वि. केतकर, कॉलेजचे प्राचार्य टी. बार्नबस अशा मोठ्या व्यक्तींसोबतच लौकिकार्थाने थोर नसणारी परंतु लेखकाच्या जीवनात खूप महत्वाची भूमिका पार पडणारी त्यांची आई, तसंच रद्दीतलं अमूल्य ग्रंथधन कुठल्याही मोबदल्याविना जोशींच्या हवाली करणारे रद्दीवाले काका यांचीही शब्दचित्रं लक्षवेधी आहेत. ग्रंथालयाच्या एका विभागाला कृतज्ञतापूर्वक रद्दीवाल्या काकांचे नाव देऊन सुरेशजींनी त्यांचा यथोचित सन्मान केला हे पाहून खरंच बरं वाटतं.
पुस्तकामध्ये लेखक फक्त स्वतःच्या कष्टांबद्दलच सांगतात असे नाही तर, जुन्या भग्न वास्तू, हेळसांड झालेले ऐतिहासिक दस्तावेज यांमुळे आपल्या संस्कृतीची टांगली गेलेली लक्तरं, आपल्या समाजाची उदासीन आणि कोती वृत्तीही दाखवून देतात हेही तितकेच महत्वाचे आहे. प्रवरा संस्कृतीचा ऱ्हास, जामगावच्या महादजी शिंदेंच्या गढीची उपेक्षा याबद्दल वाचताना आपलं मन अगदी अस्वस्थ आणि उद्विग्न होऊन जातं. अर्थात एवढ्या सगळ्या गोष्टी पुस्तकात असल्या तरी पुस्तक अकारण गंभीर झालेले नाही, उलट अनेक ठिकाणी लेखणीचा मिश्कीलपणा सतत डोकावत राहतो. ‘मिरी’ गावच्या पंचम जॉर्जच्या अत्यंत अनोख्या आणि अभूतपूर्व दिंडीचे वर्णन करणारा लेख म्हणजे त्यांच्या खुसखुशीत शैलीचे उत्तम उदाहरण.
अनेकदा सनावळ्या आणि तहाच्या कलमांमध्ये अडकून पडणारा इतिहास प्रभावी भाषा आणि निवेदन शैली लाभली की, किती रंजक होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक. वृत्तपत्रात सदर म्हणून पूर्वप्रकाशित झालेले असल्यामुळे यातली प्रकरणे छोटी आणि नेटकी आहेत. त्यामुळे पुस्तकही आटोपशीर झालेले आहे. एकेका प्रकरणात त्यांच्या एकेका शोधयात्रेची कहाणी आलेली आहे. कुठलेही प्रकरण उघडून वाचणे सोपे जाते. पुस्तकाला लाभलेली ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांची प्रस्तावना, सुरेश जोशींच्या पत्नीने रेखाटलेला पतीच्या अविरत कष्टांचा प्रवास हीदेखील या पुस्तकाची बलस्थानं. पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय सुयोग्य आणि मुख्य म्हणजे शीर्षक तर अतिशय चपखल. फक्त रसभंग करतात ती यातली ‘अदृश्य’ विरामचिन्हे ! अवतरणचिन्हाचा तर भयंकर दुष्काळ आहे. संभाजी महाराजांच्या चित्राबद्दलच्या लेखामध्ये तर लेखक आणि त्यांचे वरिष्ठ यांच्या वादामध्ये पाठोपाठ येणारी एकमेकांची वाक्ये अवतरणचिन्हाशिवायच असल्यामुळे कुणाचे वाक्य कोणते हे वाक्य मोजूनच लक्षात ठेवावं लागतं हे पुस्तकाला लागलेलं सगळ्यात मोठं गालबोट. पुढच्या आवृत्त्यांमध्ये तरी हे दोष दूर झाले आहेत की नाही हे बघायला हवे.
'वन नाईट ऍट म्युझिअम' नावाचा इंग्रजी चित्रपट बऱ्याच जणांनी पाहिला असेल. रात्र होताच पुराणवस्तू संग्रहालयातील ऐतिहासिक आणि प्राचीन मूर्ती, सांगाडे, वस्तू जिवंत अशी त्याची संकल्पना आहे. गतकाळाच्या पाऊलखुणांवर एवढं प्रेम करणारा सुरेश जोशींसारखा इतिहास संशोधक जेव्हा आपल्या ऐतिहासिक वस्तूंच्या सान्निध्यात राहत असेल तेव्हा या सगळ्या गोष्टी तशाच जिवंत होऊन त्यांच्याशी प्रेमाने बोलत असतील आणि धुळीतून बाहेर काढून सत्कारणी लावल्याबद्दल आभार मानत असतील असंच हे पुस्तक वाचल्यावर जाणवत राहतं....
पुस्तकाचे नाव : इतिशोध
लेखक : सुरेश जोशी
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन
आवृत्ती : पहिली (१९९७)
किंमत : १२५
पृष्ठसंख्या : १७२
- प्रसाद फाटक
mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/5/6/Itishodh-shodh-itihasacha-shodh-astitvacha-book-review-.html
No comments:
Post a Comment