काही माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगून जातात. आजूबाजूचे लोक आपापलं टीचभर आयुष्य अंदमानातला कोलू ओढावा तश्या भावनेने ओढत असताना या लोकांचा मात्र अनेक प्रदेश, अनेक क्षेत्रं एवढंच काय तर अनेक काळात मुक्त विहार असतो. त्यांना बांधून घालणारं काही अस्तित्वातच नसावं की काय असा प्रश्न आपल्यासारख्या पामरांना पडू लागतो. पण एवढे मोकळेपण असूनही त्यांचा स्वच्छंदीपणा स्वैराचाराच्या अंगणात पाऊल टाकत नाही की त्यांचं मुक्त असणं त्यांना मोकाट बनवत नाही. आयुष्य समरसून जगणं आणि दोन्ही करांनी देत राहणं एवढंच त्यांना माहिती असतं. गोपाल नीलकंठ दांडेकर हे अशाच एका अवलियाचे नाव. पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी मात्र ते होते फक्त ‘गोनीदा’ किंवा ‘आप्पा’... आप्पा आयुष्यभर लिहित गेले, वाचत गेले, वाटत गेले, शोधत गेले... त्यांनी तुडवलेले माळ, कातळ-पत्तर पाठीमागच्यांसाठी पायवाट बनत गेले.
चिदानंद
गोनीदा मूळचे विदर्भातल्या परतवाडा गावचे. त्यांचे मूळ नाव आत्माराम.आत्माराम वयाच्या तेराव्या वर्षी सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी घरातून पळून गेला. त्यापुढच्या प्रवासात आत्मारामला एकाने "तू कोण कुठला" प्रश्न विचारल्यावर खरी ओळख लपवण्यासाठी आत्मारामने स्वतःचे नाव 'गोपाल' असे सांगितले... आणि तेच पुढे रूढ नाव झाले. त्यानंतर गोपाल वणवण भटकला, उन्हातान्हात तापला (त्यांच्या स्वतःच्याच शब्दांत सांगायचं तर 'दोरा तुटलेल्या पतंगासारखा दिशाहीन भटकला') आणि एके दिवशी गाडगेबांकडे जाऊन आंचावला. तगमग आयुष्याला त्या भल्या माणसाची सावली मिळाली. त्यांच्यासमवेत गोपाल पुन्हा भटकला. पण हे भटकणं निरुद्देश नव्हतं. निरर्थक तर नव्हतंच. कारण याच काळात गाडगेबाबांच्या रोखठोक कीर्तनांचा त्यांना जवळून परिचय झाला. त्यांचे विचार, त्यांच्या कीर्तनामधली कला असे वेगळेवेगळे पैलू त्यांना लख्ख दिसले. त्यांचं संतसाहित्याशी नातं गहिरं होत गेलं ते इथूनच. प्रसिद्ध निरूपणकार सोनोपंत दांडेकर हे गोनीदांचे मामाच. त्यांच्याकडूनही गोनीदांना शिकायला मिळालंच होतं. संत साहित्याच्या संचिताची शिदोरी गोनीदांना आयुष्यभर पुरली. सततच्या वाचन-मनन--पठणाने संतवचने, ओव्या, अभंग, पदावल्या त्यांना मुखोद्गत झाल्या होत्या. त्यातूनच त्यांचा पिंड अध्यात्मिक बनला. ‘मृण्मयी’सारखी रचितकादंबरी असो वा मोगरा फुलला, तुका आकाशा एवढा, दास डोंगरी राहतो या ज्ञानोबा, तुकोबा, रामदास यांच्यावरच्या चरितकादंबऱ्या असोत, गोनीदांची लेखणी परमतत्वाशी पुनःपुन्हा तादात्म्य पावत राहिली.
संस्कार, मानवी मूल्यं, साधनशुचिता यावर त्यांची अपार श्रद्धा होती. बहुदा याच श्रद्धेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम पाहून ते अतिशय प्रभावित झाले. दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या आवाहनाने प्रेरित होऊन जे अनेक ध्येयवादी तरुण राष्ट्रकार्यासाठी पुढे आले व संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले त्यात गोनीदाही होते. प्रचारक म्हणून पुन्हा एकदा फिरस्ती त्यांच्या वाट्याला आली. पण त्याला त्यांची कधीच ना नव्हती. ३ वर्ष मनोभावे ही भूमिका पार पडली, परंतु त्यानंतर मात्र प्रकृती त्रास देऊ लागल्याने त्यांना प्रचारक म्हणून काम थांबवावं लागलं. पण संघाशी जुळलेलं नातं त्यांनी आयुष्यभर जपलं. रा. स्व. संघाच्या ऋणातून अंशतः का होईना उतराई होण्यासाठी पुढे त्यांनी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचं 'वादळातील दीपस्तंभ' हे चरित्रही लिहून काढलं.
पूर्णवेळ लेखन
खूप कमी वयातच पूर्णवेळ लेखक म्हणूनच जगण्याचा निर्णय घेतला. तरीही त्यांच्या भावी पत्नीने त्यांच्याशी त्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न केला नाही कारण त्यांना थांबवणं म्हणजे वाऱ्याला मुठीत बंद करण्यासारखं होतं. लिखाणावरच चरितार्थ चालवणारे गोनीदा बहुदा पहिलेच लेखक असावेत. पण त्यांचं मोठेपण यातच आहे की, अर्थार्जनासाठी लिहिलेली धार्मिक, पौराणिक पुस्तकेही पाट्या टाकल्याप्रमाणे कधीही लिहिली नाहीत. ज्या प्रदेशावर लिखाण करायचं आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन राहायचे, तिथल्या माणसांचे व्यवहार, स्वभाव, बोली, लकबी निरखायचे, त्या प्रदेशाबद्दलच्या, तिथल्या इतिहासाबद्दलच्या नोंदी अभ्यासायच्या असा त्यांचा शिरस्ता. त्यात कोरडेपणा नव्हता. ही एक लोभस व्यावसायिकता होती..
अचपळ तन माझे
गोनीदा कधी लिखाणाचा विषय म्हणून ठरवून भटकले, तर कधी अंतरीच्या समाधानासाठी केलेल्या भटकंतीतून त्यांना नवीन काही सुचत गेलं. एकुणात काय, त्यांची पादत्राणं आणि त्यांची लेखणी यांचं नातं अगदी घनिष्ट होतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाक्रा नांगलचं धरण उभं राहत होतं... ते अनुभवायला गोनीदा पोचले थेट हरियाणामध्ये. त्या अजस्र् धरणाचा पसारा, बांधकामाच्या निमित्ताने तिथे आलेल्या मजुरांचे बोटभर संसार या सगळ्याचं मिळून उभं राहिलेलं विश्व गोनीदांच्या लेखणीला खुणावत होतं. त्यातूनच मग साकारली 'आम्ही भगीरथाचे पुत्र' ही कादंबरी. आयुष्यातल्या पुन्हा एका अस्थिर मनस्थितीच्या वेळी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. त्या स्मृती कागदावर उतरल्या आणि अप्रतिम कादंबरी बनून गेल्या. संपूर्ण श्रद्धेने केलेल्या परिक्रमेत दिसलेली मनुष्यस्वभावाची रूपं, चमत्कार वाटावे असे अनुभव, भक्तीमार्गाच्या बाजूने जाणारी प्रीतीची धूसर पायवाट, वैराग्य, वैगुण्य या साऱ्यांचं एक रसरशीत मिश्रण म्हणजे 'कुण्या एकाची भ्रमणगाथा'. ‘दुर्गभ्रमणगाथा’ हे पुस्तक म्हणजे तर भटक्यांची गीताच म्हणायला हवं. अनेक अनवट वाटा तुडवण्याचे त्यांचे अनुभव, एकेका किल्ल्याने दिलेलं शहाणपण, भटकंतीची झिंग या सगळ्यामुळे ते अगदी चविष्ट होऊन गेलं आहे. ही भटकंती फक्त त्यांच्या किल्ल्याबद्दलच्या आणि इतिहासाबद्दलच्या पुस्तकातूनच प्रकटते असे नाही. त्यांच्या बहुतेक सर्व कादंबऱ्या या फिरस्तीचाच परिपाक आहेत.
मैत्र जीवांचे
बाबासाहेब पुरंदरे आणि आप्पासाहेब उपाख्य गोनीदा ही दोन्हीही मराठीचिये नगरीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्वं. या दोहोंचा अकृत्रिम स्नेह हे महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न. कुठलीही स्पर्धा, ईर्ष्या यांच्या पार पोचलेलं हे मैत्र एकमेकांमधल्या अभ्यासूवृत्तीला दुणावत गेलं, उभ्या महाराष्ट्रातल्या अनवट, अवघड वाटांवर हसत हसत घेऊन गेलं. परस्परांच्या क्षमतेला दाद देणं किंवा तिला आव्हान देऊन अधिक उत्तुंग काही करण्यास प्रवृत्त करणं यामुळे महाराष्ट्र आयताच नशीबवान ठरला.... एकमेकांच्या
पावनखिंडीच्या साक्षीने एका धुवाँधार क्षणी बाबासाहेबांनी आप्पांना एक वचन मागितलं 'शिवरायांचा इतिहास शब्दबद्ध करण्याचं'. दीपस्तंभासारखं शिवचरित्र स्वतः लिहिलेलं असूनही त्यांनी गोनीदांना अशी गळ घातली यात बाबासाहेबांची उंची दिसतेच पण त्यांच्याठायीची पारखही दिसते. त्यांचा गोनीदांच्या क्षमतेवर आणि ज्ञानावर प्रगाढ विश्वास होता. त्या वचनाला जागून गोनीदांनी केलेल्या बखरी, पत्रव्यवहार, गड-कोट यांच्या अभ्यासातून साकारलं शिवरायांवरचं आणखी एक लेणं - पाच कादंबऱ्यांनी मिळून बनलेला 'कादंबरीमय शिवकाल' !
बरोबर तितकाच विश्वास गोनीदांचाही बाबासाहेबांवर होता याचं एक उदाहरण सांगतो. एकदा एका देवतेची जुनी मूर्ती गोनीदांच्या ताब्यात आली. त्यांचा अभ्यास एका रोमांचकारी शक्यतेकडे अंगुलीनिर्देश करत होता. पण ‘आपल्याहून अधिक जाणकार व्यक्तीचे मत महत्वाचे’ हे त्यांना माहित होते, म्हणूनच त्यांनी गाठले बाबासाहेबांना ! बाबासाहेबांनी आपल्या अभ्यासातून गोनीदांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि हे निश्चित झालं की गोनीदांच्या ताब्यात असणारी मूर्ती ही साक्षात जिजाऊंकडून पूजिली जाणारी त्यांच्या पाचाडच्या देवघरातली मूर्ती होती !!!
आजच्या काळात गोनीदा
अलीकडे मला प्रकर्षाने वाटलं की निव्वळ कथानकाच्या दृष्टीने पाहता गोनीदांच्या काही कादंबऱ्या ‘आऊटडेटेड’ झाल्या आहेत. अगदी प्रेडिक्टबल कथानक, अत्यंत भाबडी पात्रं, नातेसंबंधांमधल्या गुंतागुंतीचा अभाव किंवा तशी गुंतागुंत झालीच तर त्या नात्याला काहीतरी नाव देण्याचा (भाऊ-बहिण !) अट्टहास (विशेषतः शितू, मृण्मयी वाचताना हे फारच प्रकर्षाने जाणवलं) या गोष्टी आता आकर्षून घेऊन शकत नाहीत. आजच्या काळातल्या वाचकाने त्या कादंबऱ्या प्रथमच हातात घेतल्या तर त्यांचे कथानक त्याला कितपत भुरळ पडेल याबद्दल साशंकता वाटते.
पण मग यामुळे गोनीदा पूर्णपणे कालबाह्य ठरतात का ? याचं उत्तर मात्र मी ‘नाही’ असंच देईन.
का ?
त्यामागे काही कारणं आहेत
त्यांच्या लिखाणातले वैविध्य विलक्षण आहे. कथा, प्रादेशिक कादंबऱ्या, नाटक, ऐतिहासिक कादंबऱ्या, गीतं, भक्तिसाहित्य, प्रवासवर्णन .... काय काय नाही लिहिलं लिहिलं त्यांनी !! प्रत्येक प्रकारात विलक्षण वैविध्य आहे. महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील अनेक प्रदेशांचे त्यांनी उभे केलेले तपशील थक्क करणारे आहेत. तिथल्या निसर्गाचं, पानाफुलांचं, ऋतूंचं वर्णन अतिशय बारकाईने केलेलं आहे. डोळसपणे केलेले ते एक प्रकारचे डॉक्युमेंटेशनच आहे. त्याचबरोबर एक गमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने पारंपारिक पठडतली पात्रं असताना त्यांच्या कथानायिका मात्र अतिशय कणखर आहेत ! ‘पडघवली’मधल्या अंबू वहिनी, ‘मृण्मयी’मधली मनू या अतिशय निग्रही आहेत. ‘जैत रे जैत’ मधली चिंधी म्हणजे तर मराठी साहित्यातला मैलाचा दगड ठरावी. फटकळ, निडर, आपण होऊन प्रेमात पुढाकार घेणारी, कठीण प्रसंगी नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी त्या काळात अगदी वेगळी ठरली असणार यात शंका नाही. (मला तर आजच्या ‘आर्ची’मध्येही सतत चिंधीचाच भास होत राहतो !)
भाषाप्रभू, बोलीप्रभू !
गोनीदांच्या लिखाणात सर्वात खिळवून ठेवणारं काही असेल तर ती म्हणजे अत्यंत रसाळ भाषा. वाचताना जणू एखादे वेल्हाळ आजोबा मांडीवर घेऊन नातवंडांना गोष्ट सांगत आहेत असंच वाटत राहतं. आताच्या त्या काळात ती भाषा, उच्चार काहीसे वेगळे वाटतात. त्याची सुरुवात त्यांच्या पुस्तकावर छापल्या गेलेल्या नावापासूनच होते, कारण मुखपृष्ठावर त्यांचे नाव आताच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे अनुस्वारासह ‘गोपाल नीलकंठ दांडेकर’ असे न लिहिता जोडाक्षरासह ‘गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर’ असं असतं ! त्यांच्या लिखाणातले ‘माझ्यासवे आले’, ‘मजजवळ नाही’ असे शब्दप्रयोग वाचताना अतिशय गोड वाटतात.
गोनीदांच्या भाषावैभवाबद्दल बोलत असताना त्यांनी वापरलेल्या बोलीभाषांचा उल्लेख न करणे हे पातकच ठरेल. त्यांच्या पूर्ण साहित्यप्रवासात ओघवती भाषा वेगवेगळ्या बोलींचं अंगडं-टोपडं परिधान करून आल्यामुळे अधिक लोभसवाणी बनली आहे. वऱ्हाडी (श्रीगाडगेमहाराज), मावळी (माचीवरला बुधा, पवनाकाठचा धोंडी), कातकरी (जैत रे जैत), प्राकृत (मोगरा फुलला), १६व्या शतकातली मराठी (त्यातही ‘दास डोंगरी राहतो’ आणि तुका आकाशाएवढा’ मधल्या बोलींमध्ये पुन्हा फरक !), उत्तर भारतीय (आम्ही भगीरथाचे पुत्र) या बोलींवरचे त्यांचे प्रभुत्व पाहून ते त्या त्यांच्या मातृबोलीच असाव्यात की काय अशी शंका येते. भालचंद्र नेमाडेंच्या 'हिंदू'च्या कितीतरी पूर्वी एकाच पुस्तकात अनेक बोलीभाषांचा समावेश गोनीदांच्या 'कादंबरीमय शिवकाल'मध्ये झालेला आहे.
कीर्तन-निरूपणासारख्या performing art मध्ये हातखंडा असल्यामुळे कदाचित पण गोनीदा अतिशय उत्तम अभिवाचकही होते. 'जगन्नाथाचा रथ' हे गोनीदांनी लिहिलेले नाटक. त्यासंदर्भात भेटायला डॉ. लागू गोनीदांच्या तळेगावच्या घरी गेले होते. घराबाहेर पडून त्यांनी वृक्षराजीच्या सान्निध्यात सर्वांसमक्ष केलेले अभिवाचन म्हणजे कसा अविस्मरणीय अनुभव होता हे डॉ. लागू यांनी आपल्या ‘लमाण’ या पुस्तकात तपशिलाने नमूद केले आहे. सादरीकरणातली ही हातोटीच गोनीदांच्या लिखाणात अलगदपणे उतरली असावी.
चुकवू नये असे काही
या उत्कट, तल्लीन, स्वच्छंदी व्यक्तिमत्वाचं लिखाणात प्रतिबिंब कसं पडतं हे जाणून घ्यायचं असेल तर कथानकाच्या पलीकडचे गोनीदा अनुभवायलाच हवेत आणि त्यासाठी पुढील ३ पुस्तकं 'मस्ट' आहेत.
१) आशक मस्त फकीर : कन्या वीणा देव यांनी लिहिलेल्या या पुस्तकात गोनीदांच्या फकीर वृत्तीबद्दल खूप विस्तारानं लिहिलं आहे. सगळ्यात असूनही कशातच नसण्याची त्यांची वृत्ती, संसारी असूनही विरक्तीची ओढ असल्यामुळे त्यांच्या पत्नीची होणारी ओढाताण, त्याचवेळेस आपल्या एकुलत्या कन्येवर केलेले संस्कार, तिला दिलेली मोकळीक, एवढंच नव्हे तर अगदी जावयालाही आपल्या गड-कोट मोहिमांमध्ये सामावून घेणे, असंख्य लोकांशी जोडलेला स्नेह याबद्दल अगदी जवळून कळतं.
२) छंद माझे वेगळे : खुद्द गोनीदांनी स्वतःच्या छंदांबद्दल लिहिलंय. एका माणसात किती कलागुण असू शकतात ते वाचून अचंबित व्हायला होतं. छायाचित्रकला (यासाठी त्यांनीं 'सावलीदिवलीचा खेळ' असा अतीव गोड शब्दप्रयोग केलाय), स्फटिकातले कोरीवकाम इथपासून ते पुराणवस्तू, नाणी इथपर्यंत अनेक गोष्टींमध्ये एकाच माणसाला असलेली गती पाहून तोंडात बोट गेल्याशिवाय राहत नाही.
या पुस्तकात नसलेली आणखी एक कला म्हणजे गीतलेखन. त्यांचं एक गंमतशीर धनगर गीत तुम्ही इथे ऐकू शकता.
'जैत रे जैत' कादंबरीत त्यांची काही फर्मास गीतं आहेत. त्यावर चित्रपट बनला तेव्हा त्यातली गीतं गोनीदांनी का लिहिली नसावीत हे एक कोडंच आहे. याशिवाय रा. स्व. संघात म्हटली जाणारी अनेक पद्यं/गीतं गोनीदांनी रचलेली आहेत. परंतु संघात पद्यलेखक कोण याची नोंद ठेवली जात नसल्यामुळे दुर्दैवाने नक्की कुठली कुठली गीतं त्यांची आहेत हे आता निश्चित माहित नाही.)
३) कहाणीमागची कहाणी : गोनीदांच्या गाजलेल्या पुस्तकांच्या जन्मकथा खुद्द त्यांच्याच शब्दात. एकेका कादंबरीचे बीज त्यांच्या मनात कसे रुजले, ते फुलवण्यासाठी गोनीदांनी काय काय तयारी केली आणि मेहनत घेतली याचे रोचक अनुभव.
खरंतर ही तीन पुस्तकंच काय, पण त्यांचे संपूर्ण साहित्य वाचले तरी त्या सगळ्याच्या बेरजेपेक्षा गोनीदा अधिक मोठे आहेत असं वाटत राहतं. हेच आयुष्याचं सार होतं. इतक्या गोष्टी करूनही, इतका लोकसंग्रह जोडूनही त्यांना खरं आकर्षण होतं अनाघ्रात शांततेचं. झाडं-वेली, पशुपक्षी, फळंफुलं या सगळ्यांच्या बेरजेपेक्षा अधिक असणाऱ्या निसर्गाचं. ‘माचीवरला बुधा’सारखा कुठेतरी गिरिकुहरी अखेरचा श्वास घ्यावा हेच त्यांचं स्वप्न होतं. ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ ही ओळ सुरेश भटांनी त्यांच्यासाठीच लिहिलेली असावी की काय असंच वाटत राहतं....
- प्रसाद फाटक
mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/7/8/Article-on-Gopal-nilkanth-dandekar-s-101-birth-anniversary-by-prasad-phatak-.html
No comments:
Post a Comment