रिकामे हात आणि रिकामी मनं हे तसं डेडली कॉम्बिनेशन. त्या हातांमध्ये पहार दिली तर दगड फोडून रस्ते बनवतील पण जर दगड दिले तर डोकीसुद्धा फोडतील! त्यामुळे अशा बेरोजगारांच्या आयुष्याला कशी दिशा द्यायची यामागचा विचार खूप महत्वाचा ठरतो. १९६०च्या दशकात नव्यानेच जन्माला आलेल्या महाराष्ट्र नावाच्या राज्याच्या राजधानी मुंबईतच अनेक शिकलेले मराठी तरूण बसून होते. अशात या मराठी तरुणांचा कैवार घेण्याच्या आणि त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या निमित्ताने एक रांगडी संघटना मैदानात उतरली आणि पाहता पाहता इथल्या आर्थिक, राजकीय सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व उलथापालथ घडवून आणली. त्या संघटनेचं नाव शिवसेना. तिने मराठी तरुणांच्या हातात काय काय दिलं, तिची कार्यपद्धती कशी होती, तिच्याशी संबंधित महत्वाचे टप्पे कोणकोणते होते या साऱ्याचा सखोल मागोवा घेणारं पुस्तक म्हणजेच ‘जय महाराष्ट्र – हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’. राज्यशास्त्राचे अभ्यासक, साठच्या दशकाबद्दल कुतूहल असणारे लोक, सर्वसामान्य वाचक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते अशा सर्वांसाठीच संदर्भग्रंथ ठरावे असे असे हे पुस्तक आहे.
मार्मिक ते शिवसेना
शिवसेना १९६६ साली स्थापन झाली. परंतु ही घटना जरी त्यावेळची असली तरी त्यामागे जवळपास सहा वर्षांची पूर्वपीठिका होती. ‘बाळ ठाकरे’ नावाचा एक तरूण व्यंगचित्रकार ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये आपल्या तीक्ष्ण निरीक्षणांवर आधारित व्यंगचित्रं काढत असे. त्याचे वडील ‘प्रबोधनकार ठाकरे’ यांच्याकडून ‘महाराष्ट्र धर्म’, ‘मराठी बाणा’ या गोष्टींचं बाळकडू घरातच मिळत असल्यामुळे मुंबईतली मराठी माणसाची परिस्थिती, बाहेरून येऊन मुंबईत वसलेल्या अन्य प्रांतियांची कंपूशाही या गोष्टी बाळला दिसत होत्या आणि तिरकस नजरेने तो ते व्यंगचित्रांतून उतरवत होता. परंतु ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये त्याच्या या मराठी बाण्याला प्रोत्साहन मिळणं शक्य नसल्याने त्याने स्वत:चं व्यंगचित्र नियतकालिक काढायचा निर्णय घेतला आणि १९६० साली ‘मार्मिक’या व्यंगचित्र साप्ताहिकाची स्थापना झाली. त्यावेळी कुणाला कल्पनाही नसेल पण ती होती नांदी एका संघटनेच्या उदयाची, ‘बाळ ते बाळासाहेब’ अशा स्तिमित करणाऱ्या प्रवासाची.
सुरुवातीच्या काळात ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठी माणसावरच्या अन्यायाला मोठ्या प्रमाणावर वाचा फोडण्यात आली. निरनिराळ्या कचेऱ्यांमधील उच्चपदस्थ अमराठी माणसांच्या याद्याच प्रसिद्ध करण्यात यायच्या. त्यामुळे नाक्यानाक्यावरच्या बेरोजगार तरूणांमध्ये अस्वस्थता पसरू लागली. याच विषयाला धरून मुंबईत ठिकठिकाणी सभा होऊ लागल्या ज्यांना वक्ता म्हणून बाळासाहेबांना बोलावलं जाई. याचा पुढचा अपरिहार्य टप्पा ‘मराठी माणसांची संघटना’ हाच होता. त्याला अनुसरूनच १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. अस्वस्थ बेरोजगार तरूणाचं नातं त्याचं प्रथम मार्मिकशी नातं जुळलं होतंच, ते अलगदपणे शिवसेनेशीही जोडलं गेलं आणि रिकाम्या हातांना स्थानिक समस्या, गाऱ्हाणी घेऊन महापालिकेत जायची संधी मिळाली. त्या माध्यमातून ठिकठिकाणच्या पाणी, रस्ते व अन्य सोयीसुविधांबाबतच्या तक्रारींची तड लागू लागली. स्थानिकांमध्ये संघटनेविषयी विश्वास निर्माण होऊ लागला. शिवसेनेच्या शाखा म्हणजे तक्रार निवारण केंद्रं बनू लागली आणि या शाखाच पुढची जवळपास पाच दशकं सेनेसाठी ऊर्जास्रोत म्हणून कार्य करत आली आहेत. या शाखांच्या माध्यमातून जम बसवल्यावर सेनेचा विस्तार झपाट्याने होत गेला. हा सर्व प्रवास, सेनेचे आणि पर्यायाने बाळासाहेबांच्या स्वभावाचे विविध कंगोरे यांचा अनेक अंगांनी पुस्तकातल्या पुढील सर्व प्रकरणांमध्ये वेध घेतला आहे.
शिवसेनेची संस्कृती
विविध अंगांनी वेध घेत असताना पुस्तकात हे ठामपणे नमूद केलं आहे की शिवसेनेच्या प्रवासात आपुलकी आणि दहशत या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच चालत आल्या आहेत. आपल्या वेळोवेळच्या भाषणांमधून बाळासाहेबांनी सातत्याने शिवसैनिकांमधल्या पौरुषत्वाला आव्हान दिले. ‘षंढ आहात का?’, ‘बांगड्या भरल्यात का?’ अशी कायम आव्हानात्मक भाषा सैनिकांना पेटवायला पुरेशी असायची. ‘जे संघटनेच्या प्रमुखाच्या विरोधात आहे त्याला प्रखर विरोध करा’ हाही त्यांनीच बिंबवलेला विचार. एकदा या विचारांनी शिवसैनिक भारावला की मग सभेतून घरी येताना तोडफोड, लुटालूट करण्यापासून ते शिवसेनाप्रमुखांवर टीका करणाऱ्याला तुडवण्यापर्यंत कशाचाच त्याला विधिनिषेध नसायचा. एकीकडे दत्ताजी नलावडे, साळवी, मनोहर व सुधीर जोशी, प्रमोद नवलकर अशी नेतृत्वाची फळी ‘व्हाईट कॉलर’ नागरिकांना आकर्षित करत असतानाच दुसरीकडे ‘राडा gang’ मुळे ‘ब्ल्यू कॉलर’ अर्थात कामगार वर्गातही शिवसेनेने भीतीयुक्त आदराचं स्थान पटकावल्याचं महत्वपूर्ण निरीक्षण लेखक मांडतो.
संघटनेचा दबदबा वाढत असतानाच त्या अनुषंगानेच ‘बाळासाहेब ठाकरे’ हे brand name कसं प्रस्थापित होत गेलं तेही पुस्तकात विस्ताराने नमूद केलं आहे. सामान्य माणसाच्या मनात बाळासाहेबांची ‘मसीहा’, ‘दैवी पुरुष’ आणि या सोबतच ‘कुटुंबप्रमुख’ ही प्रतिमा कशी निर्माण झाली आणि सामान्य मनुष्याची नस अचूक जाणणाऱ्या बाळासाहेबांसारख्या व्यक्तीने कधी ताणायचं आणि कधी हलकं सोडायचं हे बरोब्बर जाणून लोकांच्या मनातलं आपलं स्थान अढळ केलं. ‘बाळासाहेब म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब’ असंच समीकरण बनवण्यात आलं
विविध अंगांनी मागोवा
पहिल्यापासून वसंतराव नाईकांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंब्यातून बस्तान बसवणे, हातात कुठलेही अधिकार नसताना स्थानिक लोकाधिकार समित्यांच्या माध्यमातून मराठी माणसाला उद्योगांच्या अनेक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्थैर्य प्राप्त करून देऊन त्यांना पुन्हा एकदा संघटनेच्या कामात सक्रिय करणे, कुठलाही ठराविक pattern नसणारी अन्य पक्षांसोबतची वेळोवेळी झालेली सोयीस्कर युती, आणीबाणीच्या काळात अक्काबाईचा फेरा टाळण्यासाठी चक्क आणीबाणीचे समर्थन, विविध दंगली आणि राडे, नामांतर आणि रिडल्स प्रकरणांच्या वेळची उघडउघड दलित विरोधी भूमिका, आपल्या विरुद्ध लिहिणाऱ्या प्रत्येक पत्रकाराशी हाडवैर आणि त्यातून हातघाई, युतीचे सरकार आल्यानंतरच्या कुरबुरी अशा बऱ्याच विषयांवर पुस्तकात स्वतंत्र प्रकरणे आहेत. अनेक कोनांमधून पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी शिवसेना नावाच्या महावस्त्राच्या उभ्या आणि आडव्या ताण्याबाण्यांचा अतिशय प्रभावी वेध घेतला आहे. अनेक छोट्या पण शिवसेनेच्या प्रगती/अधोगतीत महत्वाच्या घटक ठरलेल्या घटना आवर्जून नोंदवल्या आहेत. वृत्तपत्रांच्या, मासिकांच्या, अभिलेखागारातून त्या त्या काळातल्या घटनांचे उल्लेख मिळवणं, संबंधित नेते, कार्यकर्ते, अभ्यासक यांच्या मुलाखती घेणे, त्याला आपल्या निष्कर्षांची जोड देणे आणि या सगळ्याची सुसूत्र आणि अतिशय ओघवती मांडणी काम करणे हे फारच जिकीरीचे होते. एवढ्या सगळ्या मेहनतीतून शिवसेना या नावाच्या वादळाचा पट त्याच्या गुणदोषांसहित आपल्या डोळ्यासमोर साकार केला आहे. त्यासाठी प्रकाश अकोलकर यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
हे सर्व वाचत असताना शिवसेनेने नक्की कुठल्या प्रकारची संस्कृती आणली आणि तिला कनिष्ठ आणि मध्यमवर्गातून, तसंच कॉंग्रेससारख्या सत्ताधरी पक्षाकडूनही वेळोवेळी मिळत आलेल्या पाठिंब्यातून पुढे येणाऱ्या कुठल्या प्रकारच्या राजकीय संस्कृतीसाठी पायघड्या घातल्या गेल्या आहेत ही गोष्ट निश्चितच विचार करायला लावणारी आहे.
पुस्तक : ‘जय महाराष्ट्र – हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’
लेखक : प्रकाश अकोलकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या : ३९२
आवृत्ती : सुधारित दुसरी आवृत्ती (१९ जून २०१३)
किंमत : रू ३८०.
- प्रसाद फाटक
No comments:
Post a Comment