विसाव्या शतकाने विद्वेषी राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने झालेली अनेक नृशंस हत्याकांडे बघितली. स्टालिन, माओ, हिटलर, पॉल पॉट, इदी अमीन, गद्दाफी, किम जोंग इत्यादी हुकुमशहांनी अमुकएक समाजगट राज्यद्रोही, समाजद्रोही, साम्यवादविरोधी असल्याचे शिक्के मारून पद्धतशीरपणे लाखो लोकांना क्रूरपणे मारलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्या होत असताना एकतर बाह्य जगाला त्याची कल्पना तरी नव्हती किंवा त्यांना रोखण्याची जगात कुणामध्ये ताकद तरी नव्हती. पण जगात अन्यत्र अनेक गोष्टी अशा घडत राहिल्या ज्यांच्या थेट बळींची संख्या वर दिलेल्या उदाहरणांच्या बळींच्या तुलनेत कमी असेल पण त्यांच्यामुळे प्रभावित झालेली लोकसंख्या प्रचंड आहे. या गोष्टी घडण्यामागचे कारण कुणाची असमर्थता किंवा अनभिज्ञता नसून हेतुपुरस्सर मूग गिळणं किंवा मुद्दामून नाक खुपसणं हे आहे. आपले हितसंबंध बिघडू नयेत म्हणून घडणाऱ्या गोष्टी बघत बसणं किंवा आपल्या लाभासाठी मूल्यं वगैरे बाजूला ठेवून युद्धखोरी करणं हे रशिया आणि अमेरिकेचं नेहमीचंच धोरण. त्यातही विभाजनानंतर कमकुवत झाल्याने रशियाचा अशा प्रकारांमधला सहभाग तुलनेने कमी झाला परंतु अमेरिकेच्या संधीसाधूपणाची किंमत मात्र जगाला वारंवार चुकवावी लागलेली आहे. यावरून आपल्याला इराक, व्हिएतनाम अशी उदाहरणं चट्कन डोळ्यासमोर येतात खरी (कारण या ठिकाणी अमेरिकेने उघडपणे लढाया केल्या), परंतु भारतीय उपखंड आणि खुद्द आपला भारतदेशही अमेरिकेच्या हीन दर्जाच्या डावपेचांमुळे होरपळून निघाला होता हे आपल्या चट्कन लक्षात येत नाही. या घटना होत्या १९७१ मधल्या, ज्यांना आपण ‘बांगलादेश मुक्तीसंग्राम’ या नावाने ओळखतो. या लढ्याचा भव्य पट चितारला गेला आहे Gary Bass लिखित ‘द ब्लड टेलिग्राम’ या विलक्षण पुस्तकात.
पूर्व बंगालचा संघर्ष
एकमेकांमध्ये प्रचंड अंतर असणारे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान हे भूभाग केवळ धर्माच्या आधारावर १९४७ साली भारतापासून हट्टाने वेगळे झालेले असले तरी तिथल्या पंजाबी आणि बंगाली या संस्कृतींचं म्हणावं असं नातं जुळलंच नव्ह्तं. पंजाब्यांचा वरचष्मा हळूहळू बंगाली बाबूंना असह्य व्हायला लागला होता. तशातच पूर्व बंगालमध्ये अभूतपूर्व वादळ झालं. अडीच लाख लोक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान सरकारकडून मदत आणि पुनर्वसनाची जबाबदारी नीट न पार पाडली गेल्याने पश्चिमेचे राज्यकर्ते आपल्याला सापत्निक वागणूक देत असल्याची भावना पूर्व बंगालमध्ये बळावली. असंतोष टिपेला पोचला आणि १९७० सालच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पूर्व बंगालमधल्या एकूण जागांपैकी पूर्व बंगालच्या स्वायत्ततेसाठी आग्रही असणाऱ्या अवामी लीगला दणदणीत विजय मिळाला. त्यामुळे पाकिस्तानचे लष्करशहा याह्याखान यांचे धाबे दणाणले. त्यांनी वेळकाढू धोरण सुरू केलं. अधिवेशन पुढे ढकललं. लोकशाही मार्गाने निवडून येऊनही आपलं कुणी ऐकत नाही हे कळल्यावर अवामी लीगचे प्रमुख मुजिबुर रेहमान यांनी रान पेटवायला सुरूवात केली. पूर्व बंगाल अस्थिर झाला. ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी फिरू लागला पाकिस्तानचा अमानुष वरवंटा. आपल्याच देशातल्या नागरिकांवर रणगाडे घालणे, बॉम्बवर्षाव करणे असले अघोरी प्रकार सुरू झाले.
‘आज स्वायत्ततेची मागणी करणारे उद्या स्वातंत्र्याची मागणी करतील. असे अलगतावादी विचार बंगाली मुस्लिमांच्या डोक्यात घालून देण्यामध्ये पूर्व बंगालमधले हिंदू भद्रजन कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांना प्राधान्याने चिरडून टाकायला हवं’ असं पाकिस्तानी नेतृत्वाला वाटत होतं. पाकिस्तान निर्मितीच्या हिंदुद्वेषी भूमिकेशी हे सुसंगतच होतं. पूर्व बंगालमधल्या छोट्या छोट्या गावांमधून हिंदूंना वेचून वेचून मारायला सुरुवात झाली. विद्यापीठातले हिंदू प्राध्यापक आणि विद्यार्थी टिपले गेले. भारताच्या दिशेने आधीच वाहणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्यात त्यातली हिंदूंची संख्या खूप वाढली. भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे अतिशय हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. हे ओझे आता भारताला पेलवेनासे झाले.
हे सगळं चालू असताना अमेरिकेची अधिकृत भूमिका शहामृगाची होती. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर ‘हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे’ असं सोयीस्करपणे समजून चालले होते. मुळातच दोघेही प्रचंड भारतद्वेष्टे, त्यातच याह्याखान हे निक्सनचे प्रचंड विश्वासू. शिवाय व्हिएतनाम युद्धावर तोडगा काढण्याची निकड असणाऱ्या अमेरिकेला कम्युनिस्ट चीनसोबतच्या १९४८ पासून खंडित झालेल्या संवादाची पुनर्स्थापना करण्यामध्ये याह्याखान मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याने त्यांच्यावर अविश्वास ठेवला तर त्यांना किती वाईट वाटेल ही निक्सनला चिंता! त्यांचा विश्वास हिंसाचारावर पांघरूण घालणाऱ्या याह्याखानवर होता..... अगदी ढाक्याच्या अमेरिकन दूतावासाच्या अहवालांपेक्षाही जास्त!
द ब्लड टेलिग्राम
कोण पाठवत होतं हे अहवाल ? ते ढाक्याची आणि बांगलादेशाची धूळधाण आपल्या डोळ्यांनी पाहणारे अमेरिकेच्या दूतावासाचे अधिकारी आर्चर ब्लड. ब्लड यांचे वास्तव्य दीर्घकाळ ढाक्यात होते. त्यामुळे त्यांना तिथलं जनमानस माहित होतं. दिवसेंदिवस चिघळत जाणारी परिस्थिती पाहून ते दुःखी होत होते. परिस्थितीची वर्णनं ते पाठवत असत. हिंदूंना निवडून काढून मारण्याच्या पाकिस्तानी सैन्याच्या प्रयत्नांना त्यांनीच प्रथम ‘वंशविच्छेद’ असं संबोधलं (जो शब्द प्रामुख्याने जर्मनीतल्या ज्यूंच्या शिरकाणासाठी वापरला जातो) परंतु त्यांच्या लक्षात येत गेलं की आपल्या अहवालांना washington काडीचीही किंमत देत नाहीये. त्यांच्या डोळ्यांदेखत अमेरिकेने पुरवलेली विमानं, रणगाडे, बंदुका यांच्या सहाय्याने पाकिस्तानी लष्कर हत्यासत्र घडवत होते आणि अमेरिकेचे राज्यकर्ते याला कुठेही पायबंद घालण्याचा प्रयत्न करत नाहीयेत हेही त्यांना दिसत होतं. ढाक्याच्या दूतावासातल्या प्रत्येकाची हीच भावना होती. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर ब्लड यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतला – खुद्द अमेरिकन सरकारचाच निषेध करण्याचा! अमेरिकन धोरणांची निर्भत्सना करणारा अहवाल ढाका दूतावासाकडून वॉशिंग्टनला पाठवला गेला. हेच ते इतिहासप्रसिद्ध ‘ब्लड टेलिग्राम’. ज्यांच्यावर आपल्या देशाची ध्येयधोरणे राबवण्याची जबाबदारी असते त्यांनीच देशाच्या नेतृत्वावर टीका करणे हे किती मोठं बंड आहे... पण त्याचबरोबर अन्यायाची चाड असणारी माणसं सर्वच देशात असतात यावरचा विश्वास दृढ करणारी ही घटना होती.
अभद्र जोडी
अमेरिकेत दर चाळीस वर्षांनी गोपनीय शासकीय कागदपत्रं सर्वासाठी खुली होतात. १९७० ची कागदपत्रं खुली झाल्यावर अनेक धक्कादायक तपशील उघड झाले होते आणि त्यामध्ये Gary Bass यांना प्रचंड दारुगोळा दिसू लागला. कारण त्यांमधून त्याकाळच्या अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली नेत्यांच्या अक्षम्य चुकांचे ढळढळीत पुरावे मिळत होते. त्यांच्यातल्या चर्चा, बैठका, निर्णय, अहवाल या सगळ्यांमधून भारत, इंदिरा गांधी यांच्याविषयीचा टोकाचा विद्वेष दिसत होता, पाकिस्तानच्या सगळ्या चुका पोटात घालण्याची वृत्ती दिसत होती. पंच्याहत्तर लाखाच्या आसपास बळी व एक कोटीच्या आसपास निर्वासित अशी भयंकर देणगी दिलेल्या या संघर्षादरम्यानही पाकिस्तानला अमेरिकेचा शस्त्रपुरवठा निर्वेध चालू होता. त्याच शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने बंगाली लोकांवर अत्याचार होत होते आणि वकिलातीचे अधिकारी, परराष्ट्रखात्याचे अधिकारी, पत्रकार, व्हाईट हाउसचे दक्षिण आशिया विशेषज्ञ या सर्वांच्या इशाऱ्यांकडे, सल्ल्यांकडे डोळेझाक करून किसिंजर-निक्सन ही मस्तवाल दुक्कल फक्त आणि फक्त याह्याखान यांच्यावरच विश्वास ठेवत राहिली हे वाचताना संतापाने मन पेटून उठतं.
एक अजोड दस्तावेज
पुस्तकाचा आवाका छाती दडपून टाकणारा आहे. अधिकृत अमेरिकन कागदपत्रं, निक्सन-किसिंजर यांच्यातल्या संवादांच्या ध्वनिफिती, व्हाईटहाऊस पासून ढाक्यातल्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती/लेखन, न्यूयॉर्क टाईम्स पासून हिंदुस्तान टाईम्सपर्यंतचे वार्तांकन, पाकिस्तानी आणि भारतीय सेनाधिकाऱ्यांच्या आठवणी अशा पर्वतप्राय माहितीच्या उत्खननामधून एकन् एक बारीक गोष्ट अभ्यासून ती अत्यंत सविस्तर, सप्रमाण मांडली आहे. संपूर्ण पुस्तक हे निक्सन-किसिंजर यांचं दुटप्पी रूप जगासमोर उघड करण्याच्या भावनेतून लिहिलेलं आहे आणि पानोपानी त्याचा प्रत्यय येत राहतो. भारत आणि इंदिरा गांधींविषयी त्यांच्याकडून वेळोवेळी काढले गेलेले हिणकस आणि असभ्य शब्द पुस्तकभर विखुरलेले आहेत. अर्थात त्यासोबतच पाकिस्तानची दमनकारी मानसिकता, इंदिरा गांधींची एकाच वेळी अंतर्गत विरोधक आणि अकल्पनीय जागतिक दडपण यांचे हिशोब मनात ठेवून पावलं टाकण्याची मानसिकता या गोष्टींवरही मोकळेपणाने प्रकाश टाकला आहे. पूर्व बंगालच्या वादळापासून सुरू होणारं हे पुस्तक बांगलादेश युद्धातल्या पाकिस्तानी सैन्याच्या पराभवापर्यंतच्या प्रत्येक घटनेची सर्वंकष माहिती देतं. अमेरिका-चीन-पाकिस्तान-भारत-रशिया यांच्या परस्पर संबंधांची भूराजकीय गुंतागुंत मांडतं. त्याचबरोबर भारतातले, अमेरिकेतले अंतर्गत राजकारण, विरोधक-सत्ताधारी यांच्यातले परस्परसंबंध या सर्व प्रकरणातल्या माध्यमांच्या भूमिका यांचीही सविस्तर नोंद करतं.
उपसंहार
‘उपसंहार’ या प्रकरणामुळे हे पुस्तक मनावर अधिकच ठसतं, कारण हे पुस्तक फक्त जे घडलं ते कथन करून थांबत नाही तर या संघर्षात सहभागी चारही देशांचा १९७१ नंतरच्या काळातला जमाखर्चही मांडतं. १९७१ च्या युद्धाचे खापर भारतावर फोडणारी परंतु पुढे इराकवर हल्ला करणारी युद्धपिपासू अमेरिका, भारताने एवढा मोठा मैत्रीचा हात पुढे करूनही भारतासोबत सीमावाद घालणारा, अंतर्गत परिस्थितीशी अजूनही झगडणारा बांगलादेश या गोष्टी मन विषण्ण करून जातात.
पुस्तकातली वाक्यरचना काहीशी क्लिष्ट आणि औपचारिकतेचा मुलामा असणारी आहे. मराठी अनुवाद बहुतांशी निर्दोष असला तरी मूळ वाक्यरचनेला चिकटून राहायच्या हट्टामुळे काही ठिकाणी रसभंग होतो. पण या गोष्टी अन्य गोष्टींपुढे अगदी नगण्य आहेत. शीर्षकामध्ये ‘ब्लड’ हा शब्द आडनाव आणि तसंच रक्तरंजित संघर्ष या दोन्ही अर्थांनी चपखल बसत असल्याने पुस्तकाच्या कल्पक शीर्षकाला दाद द्यायला हवी. भारतीय उपखंडाचा भूगोल, demography आणि भविष्य बदलणाऱ्या बांगलादेश युद्धाबद्दलचा हा दस्तावेज आपल्या संग्रही हवा असाच आहे.
पुस्तक : द ब्लड टेलिग्राम
लेखक : Gary Bass
अनुवादक : दिलीप चावरे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या : ४८२
किंमत : ४९५
आवृत्ती : २०१६
- प्रसाद फाटक
No comments:
Post a Comment