माणूस समूहात राहतो. हे एकत्र राहणं समूहाने राहणाऱ्या अन्य प्राण्यांप्रमाणेच गरजेपोटी निर्माण झालं असलं तरी प्राण्यांमध्ये असणाऱ्या मुलभूत प्रेरणांच्या (Basic Instincts) च्या पुढे जाऊन माणसाने समूहाचं समाजात रुपांतर केलं. मानवाला उपजत असलेली बुद्धी आणि मन या गोष्टींच्या मदतीने आपली अशी एक समाजव्यवस्था निर्माण केली. एकमेकांमधले आदान-प्रदान सुलभ व्हावे आणि या व्यवहारांना एक संदर्भचौकट असावी या उद्देशाने पृथ्वीवरच्या सर्व मानव समूहांमध्ये काळ आणि भवतालानुरूप सामाजिक संकेत, नीतीनियम ठरवले गेले. यातूनच आधी असणारा प्रवाहीपणा जाऊन घट्ट अशी समाजव्यवस्था अस्तित्वात येत गेली. या नीतीनियमावलीला कधी धर्माचं तर कधी पंथाचं अधिष्ठान दिलं गेलं. जेव्हा जेव्हा दोन भिन्न भूभागातले मानवसमूह काही ना काही कारणाने एकमेकांना सामोरे गेले तेव्हा काहीजण समोरच्या समूहाला आपल्या समूहाचे नियम लागू व्हायलाच हवेत असा हट्ट धरू लागले, त्यामुळे अर्थातच त्या विरुद्ध आपलं स्वतःचं, आपल्या परिसराचं ‘आहे तसं’ अस्तित्व राखण्यासाठी सामुहिक प्रयत्नही लागले. माझं जे आहे ते माझ्या समजामुळेच आहे आणि हा समाज एका भूभागाशी अतूट नातं सांगतो या भावनेतूनच पुढे राष्ट्र या संकल्पनेचा उगम झाला.
भारतभूमी ही देखील अशीच राष्ट्रभावना रुजत गेलेली भूमी. प्राचीन काळापासून इथले अनेकविध समूह, त्यांची दैवतं, त्यांच्या पूजापद्धती हे एकाच वेळी - एकमेकांचे सहअस्तित्व मान्य करून - पुढे जात राहिले. इतर जगाप्रमाणेच इथेही व्यवहाराची सोय आणि कामाची विभागणी या उद्देशातून सामाजिक चौकट रूढ झाली. पण पुढे चुकीच्या धारणांमुळे या कामांमध्ये श्रेष्ठ,कनिष्ठ असे स्तर निर्माण होत गेले आणि आपसूकच ते ते काम करणारा मनुष्य श्रेष्ठ की कनिष्ठ यावरून भेदभाव सुरू झाला. कामानुसार वर्गवारी न ठरता जन्मानुसार ठरू लागली आणि यातूनच जातीव्यवस्था दृढ झाली, जातीभेद कडवे झाले. अशा खंडित समाजात विघटनाची बीजे रोवली गेली नसती तरच नवल. राष्ट्रापुढच्या समस्यांचे मूळ म्हणजे इथला विभाजित हिंदू समाज हे डॉ. हेडगेवारांनी अचूक ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ स्थापन करून भेदाभेद विसरून इथला हिंदू समाज संघटित व्हावा यासाठी अखंड प्रयत्न केले. आपापसातील उच्च-नीच भावाला तिलांजली देऊन समरसतेचा भाव जागृत करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नांचा प्रवास म्हणजेच रमेश पतंगे लिखित ‘मी, मनु आणि संघ' हे पुस्तक.
एक वैचारिक प्रवास
पुस्तकाचं स्वरूप आत्मकथनपर असलं तरीही हे आत्मचरित्र नाही. हा आहे एका स्वयंसेवकाचा आधी कार्यकर्ता आणि पुढे तत्वचिंतक बनण्याचा असा प्रवास. लेखक स्वतः मुंबईतील झोपडपट्टीत लहानाचे मोठे झालेले. आर्थिक विवंचना, अस्वस्थ शेजार, शिक्षणात न सापडणारा सूर अशा निराशाजनक वातावरणात खऱ्या अर्थाने आधार मिळाला तो संघाच्या शाखेचा. खेळ, पद्य, शिबिरं यातून चित्त योग्य ठिकाणी गुंतून राहिलं. स्वतः मध्यमवर्गीय घरात राहणारे असूनही न चुकता लेखकाच्या झोडपट्टीतल्या घरी विचारपूस करण्यासाठी येणारे शाखेतले शिक्षक, शाखेच्या कामानिमित्त विविध समाजघटकांशी संपर्क आणि त्यांच्याकडून येणारे आपुलकीचे अनुभव यामुळे सामाजिक दरी कधी अलगद बुजवली गेली हे खुद्द पतंगे यांना कळलेही नाही. पुढे संघकामाच्या जबाबदारीत गुंतत गेल्याने अतिरिक्त विषयांवर वाचन, चिंतन याकडे त्यांना जास्त लक्ष देता आलं नाही. पण त्याच दरम्यान आलेल्या आणीबाणीमुळे अनपेक्षितपणे काही बंद दरवाजे उघडले गेले.
संघाच्या बहुसंख्य स्वयंसेवकांप्रमाणेच रमेश पतंगे यांनाही आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगावा लागला. ही त्यांच्यासाठी एक इष्टापत्ती ठरली. विविध विषयांवर भरपूर वाचन, सोबतच तुरुंगात असलेल्या ज्येष्ठ संघकार्यकर्त्यांशी चर्चा यामुळे दृष्टी अधिकाधिक व्यापक होत गेली. याच दरम्यान धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र हातात पडले आणि आता पर्यंत ज्या विश्वाचा फारसा परिचय नव्हता त्याचं दर्शन घडलं. समाजातील जातवास्तवाची खऱ्या अर्थाने प्रखर जाणीव झाली. एक व्यक्ती म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणूनही हा पतंगे यांच्यासाठी 'टर्निंग पॉईंट' ठरला. संघामध्ये कुठल्याही ज्ञातीबांधवाला प्रवेशास मज्जाव नसतो. मुळात येणाऱ्या व्यक्तीची जात विचारण्याची पद्धतच संघात नसल्याने स्वाभाविकपणेच मुद्दामून विशिष्ट समाजाच्या लोकांना संघात आणण्यासाठी वेगळे प्रयत्न केले जात नव्हते. पण कार्यवाढीसाठी वंचित समाजातील लोकांनाही प्रयत्नपूर्वक संघाशी जोडणे, त्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणे या गोष्टीबद्दल संघात मंथन सुरू झाले, ज्यात स्वतः पतंगे, सुखदेव नवले, दामुअण्णा दाते आणि अन्य सहविचारी कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यायला सुरू झाली. यातूनच सुरुवात झाली 'सामाजिक समरसता मंचा'ची. घटनेने समानता बहाल असली तरीही जोपर्यंत सर्व समाजामध्ये समरसतेच्या भावाची रुजुवात होत नाही तोवर एकोपा नांदणे अशक्य आहे या विचारातून समरसता मंचाच्या माध्यमातून समर्पित प्रयत्न सुरू झाले.
समरसता मंचाचे कार्य
बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी आणि महात्मा फुलेंची स्मृतिशताब्दी एकाच वेळी आल्याने त्यानिमित्ताने समरसता मंचातर्फे महाराष्ट्र्भर संदेश यात्रा काढण्यात आली. मराठवाडा विद्यापीठ नामांतराला निःसंदिग्ध पाठिंबा जाहीर केला गेला, 'रिडल्स' प्रकरणानिमित्ताने पुन्हा एकदा समाजात फूट पाडण्याचा राजकारण्यांचा कुटील डाव ओळखून त्या वादात तेल न ओतता सामंजस्याची भूमिका मांडण्यात आली.
चर्चासत्रं, परिसंवाद आयोजित करून विविध विचारसरणीच्या लोकांमध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. केवळ विद्रोहाच्या भूमिकेतून दलित प्रश्नाला भिडण्याचा सवयीमुळे एकूणच दलित चळवळीला नकारात्मकता येऊ लागली होती. हे चित्र बदलण्यासाठी त्या समाजात अगदी मूलभूत स्वरूपाचं सकारात्मक कार्य करत असलेल्या अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. समरसता मंचाच्या कार्यामुळे हिंदू समाजाचा एकात्म विचार करण्याच्या संघाच्या प्रयत्नांना आणखी गती आली.
असहिष्णू विरोधक
हे पुस्तक संघाने केलेल्या समरसतेच्या प्रयत्नांना अगदी ठळकपणे मांडत असलं तरी पुस्तकातून एक ठुसठुसणारी वेदना सतत जाणवत राहते. याला कारण म्हणजे जातीपाती विसरून एवढं काम केलेलं असलं तरी संघ जातीयवादी, मनुवादी, प्रतिगामी असल्याचा विखारी प्रयत्न स्वतःला पुरोगामी, जातीअंताच्या लढाईचे शिलेदार म्हणवणारे लोक वर्षानुवर्षं करत राहिले. त्यांच्या ढोंगीपणाची असंख्य उदाहरणं पुस्तकात आली आहेत. उभ्या आयुष्यात संघात रमेश पतंगे यांना कधीही त्याची जात विचारली गेली नाही, परंतु संघाबाहेर मात्र असे अनुभव चिकार आले. संघाला असहिष्णू ठरवणारे लोक स्वतः मात्र आपल्या विरोधी विचारांवर कायमच बहिष्कार टाकत आले आहेत. सामाजिक परिषदांमध्ये, विविध विचारसरणीच्या मंचावर जाऊन पतंगे यांनी विचारमांडणी करावी यासाठी दामुअण्णा दाते, शिवराय तेलंग यांच्यासारखे संघातले ज्येष्ठ कार्यकर्ते कायम आग्रही असायचे. त्याउलट बरोबर याच्या उलट अनुभव समाजवादी 'साथीं'चा! त्यात कधी सामाजिक परिषदेला आयोजकांकडून रीतसर आमंत्रण असलेला संघाचा कार्यकर्ता बोलायला उभा राहताना त्याने बोलू नये यासाठी थयथयाट करणारे बाबा आढाव येतात तर कधी संघाला सतत पाण्यात पाहणारे, टोमणे मारणारे ना. ग. गोरे येतात. केवळ हेडगेवार जन्मशताब्दी समितीचे अध्यक्षपद स्वीकारले म्हणून किंवा समरसता परिषदेचे उद्घाटक म्हणून गेले म्हणून अनुक्रमे प्रा. शिवाजीराव भोसले आणि गंगाधर पानतावणे यांच्यावर प्रचंड टीका करणारे दबाव टाकणारे 'पुरोगामी' विचारवंतांची वर्तवणूक पाहून पतंगे यांच्याइतकीच आपल्यालाही उद्विग्नता येते. पुरोगाम्यांकडून संघाला मिळत आलेल्या वैचारिक अस्पृश्यतेच्या वागणुकीने खूप चुकीचा पायंडा पडला आहे.
सशक्त वैचारिक मांडणी
संघविचाराच्या साहित्यात न आढळणारी एक गोष्ट या पुस्तकात आली आहे, ती म्हणजे स्वतःच्या आणि अन्य काही संघकार्यकर्त्यांच्या जातींचे उल्लेख. तथाकथित शूद्र जातीत जन्माला येऊन संघरचनेत महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे कार्यकर्ते, त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे तथाकथित उच्चवर्णीय कार्यकर्ते यांची नोंद लेखकाने केली आहे. संघकामाचा परिचय असणाऱ्यांसाठी असे उल्लेख अनपेक्षित असले तरीही दुर्दैवाने संघावर सतत होणाऱ्या मनुवादी, ब्राह्मणी वगैरे आरोपांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक ठरले आहे. समरसतेच्या जाणीवांसोबच आणि संघकामातील काही उणिवांचाही उल्लेख केल्यामुळे पुस्तकातल्या निवेदनाला प्रांजळपणा प्राप्त झाला आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर लेखकाला उमगत गेलेला संघ, आकळत गेलेला समाज आणि त्यातून येत गेलेली विचारप्रवणता यामुळे पुस्तकाला चिंतनात्मक डूब मिळाली आहे. त्यामुळेच संघविचारांची कालसुसंगत मांडणी, डॉ. हेडगेवार आणि डॉ. आंबेडकर अशा वरकरणी अगदी वेगळ्या विचारधारांच्या वाटणाऱ्या व्यक्तिमत्वांमध्ये असणाऱ्या हिंदुहिताच्या समान सूत्राचे दर्शन अशा मंथनामुळे हे पुस्तक म्हणजे एक बौद्धिक खाद्य ठरतं. वैचारिक लेखनाची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक चुकवू नये असं आहे.
पुस्तक : मी, मनु आणि संघ
लेखक : रमेश पतंगे
प्रकाशक : साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था)
पृष्ठसंख्या : १५४
आवृत्ती : चौथी (२००४)
मूल्य : १०० रू.
- प्रसाद फाटक
No comments:
Post a Comment