Total Pageviews

Saturday, September 15, 2018

‘पांढऱ्या सोन्याच्या शोधात’ : वाळूच्या समुद्रातलं रोचक साहस



प्रवास सुरू करताना आपल्याला शेवटचं ठिकाण माहिती असलं तरी कित्येकदा मुक्कामी पोहचल्यावरच आपल्यासमोर त्या स्थानाबद्दलची गुपितं नव्याने उघड होत जातात. अनेक तपशील प्रथमच कळतात. तिथे आपण जे रंध्रांत भरून घेतो, नजरेत बिंबवतो, स्मृती गोंदवतो ते सर्वस्वी नवं असतं. बऱ्याचदा आपल्या मनात असलेल्या चित्रापेक्षा हे तपशील खूपच वेगळे असतात. हे नवं चित्रं दिसावं, नवी ओळख आपल्याला व्हावी म्हणून गरज असते ती आपल्या एकरेषीय आयुष्याला छेदून जाणारी तिरकी वाट पकडण्याची. एकदा इच्छित स्थळ गाठायचं मनाशी पक्कं ठरवलं की मग त्या दिशेने होणाऱ्या प्रवासातले आंबटगोड अनुभव आपली शिदोरी अधिक रुचकर करत जातात. हे अनुभव चांगले असोत किंवा वाईट, माणूस म्हणून ते आपल्याला समृद्ध करत जातात एवढं नक्की. अशा प्रवासाची एकदा गोडी लागली की "मंजिल से बेहतर लगने लगे है ये रास्ते" अशीच काहीशी मानसिकता होऊ लागते. फार पूर्वीच्या काळातल्या युआन श्वांग, इब्न बतुता या अभ्यासू प्रवाश्यांपासून ते वास्को-दि-गामा, कोलंबस यांसारख्या साहसी दर्यावर्द्यांपपर्यंत अनेक भटके घराबाहेर पडत आलेले आहेत. मुक्कामी पोचण्याइतकीच मधल्या प्रवासाची त्यांच्या मनात ओढ असे. त्यातल्या अनिश्चिततेशी, संकटांशी दोन हात करणे याचीही नशा त्यांच्या मनात असल्याशिवाय सतत नवनव्या क्षितिजांकडे झेप त्यांना घ्यावीशी वाटतलीच नसती. ‘मायकल बेनानव्ह’ हे काही या नावांइतकं झळाळतं नाव नसलं तरी त्याचं भटकण्याचं वेड आणि साहसी वृत्ती त्यांच्यापेक्षा कमी होती असं अजिबात नाही. जगभरातली वाळवंटं पालथी घालण्याचं त्याला अनोखं वेड. आपली मायभूमी अमेरिकेकेपासून ते मंगोलियापर्यंतची वाळवंटं पार केल्यानंतर त्याने ठरवलं की कठीणतम अशा सहारा वाळवंटातून खनिज मिठाची वाहतूक करणाऱ्या उंटांच्या काफिल्यासोबत खडतर प्रवास पार पाडायचा !



पण असलं घनचक्कर साहस करायचं का ठरवलं मायकलने ? वाळवंट हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने तो त्याबद्दल सतत काही ना काही वाचत असायचा. त्यातूनच त्याला वाचायला मिळालं की आफ्रिकेतल्या माली देशातल्या टिंबक्टूपासून ते ताऊदेन्नी या ठिकाणच्या खनिज मिठाच्या खाणीपर्यंत आणि तिथून परत असा चाळीस दिवसांचा अत्यंत खडतर प्रवास करणारी स्थानिक मंडळी अस्तित्वात आहेत. परंतु 'आता या मार्गावर ट्रकची संख्या वाढल्यामुळे उंटांच्या पाठीवरून होणारी मिठाच्या वाहतुकीची परंपरा हळूहळू लयाला चालली आहे' असं त्यात नमूद केलं होतं. 'काही शतकं अबाधितपणे चालू असणारी ही परंपरा खंडित होण्यापूर्वी आपण अशा एका मोहिमेत सहभागी व्हायलाच हवं' हे त्याने मनावर घेतलं. बरीच माहिती गोळा करून, शारीरिक आणि मुख्य म्हणजे मानसिक तयारी करून मायकल टिंबक्टूच्या दिशेने प्रवासाला निघाला.



मुळात टिंबक्टूपर्यंतचा प्रवास हाच एक दीर्घ प्रवास होता. पुराणकथांमध्येही टिंबक्टूचा उल्लेख अतिदुर्गम प्रदेश म्हणून येतो. प्रवासाच्या सुरुवातीचं ठिकाणच असं, तर शेवटचं ठिकाण कशा परिस्थितीत असेल याची कल्पना आपल्याला यावी. टिंबक्टूला पोचल्यावर वाटाड्या मिळवून प्रवासाला निघेपर्यंत उंटांचा तांडा ताऊदेन्नीच्या दिशेने निघाल्याचं कळल्यावर मायकल आपला वाटाड्या वालीदसोबत त्यांच्या मागावर निघाला आणि सुरू झाला शारीरिक क्षमतेचा आणि मानसिक स्थैर्याचा अंत पाहणारा प्रदीर्घ प्रवास.... पार पेशींमध्ये घुसणारं भयानक ऊन, गोठवून टाकणाऱ्या रात्री, धुळीची वादळं, उंटावरची कठीण बैठक, सुमार आणि तुटपुंजं अन्न, अत्यल्प झोप या सगळ्याला तोंड देत त्याने प्रवास कसा केला, वाटेतल्या संकटांवर मात कशी केली आणि मुख्य म्हणजे ज्या समजुती मनाशी बाळगून तो निघाला होता त्यांच्या ताऊदेन्नीच्या मिठाच्या खाणीत पोहेचल्यावर कशा ठिकऱ्या झाल्या याची चित्तवेधक हकीगत जणू घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.



हे पुस्तक जेवढं वागण्याबोलण्याबद्दल आहे तेवढंच विचारांबद्दल आहे. जेवढं शारीरिक कष्टांबद्दल आहे तेवढंच मानसिक थकव्याबद्दल आहे. पुढे पुढे जावं तसतशी 'केल्याने देशाटन येते मनुजा शहाणपण'ची जाणीव मायकलला कशी होत गेली हे तो आपल्याला उलगडून सांगतो. जगभरच्या वाळवंटांतून फिरून आल्यावरही त्याच्या मनात किती पूर्वग्रह शिल्लक होते आणि टिंबक्टूला परतेपर्यंतच्या चाळीस दिवसांत एका माणसाच्या विचारांमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये किती आमूलाग्र बदल घडू शकतात हे त्याने फार छान मांडलं आहे. वालीदने छोट्या छोट्या कृतींमधून न बोलता दिलेले संदेश, त्याच्यासोबत मैत्री होता होता काही काळाने त्याच्यासोबत झालेले मायकलचे मतभेद, मायकलने समंजस विचारांतून ते मतभेद बाजूला सारणं आणि मैत्री अधिकाधिक परिपक्व होत जाणं हा प्रवास अतिशयक मोहक आहे. आधी वालीदसोबत एकटा असताना आणि नंतर उंटांच्या तांड्यातल्या अझलाय (उंटचालक) मंडळींसोबत असताना 'आपण एक बांडगुळ नसून आपलंही या सगळ्या पसाऱ्यात काही एक स्थान आहे, महत्व आहे' हे दाखवून देण्याची मायकलची धडपड पाहून गंमत तर वाटतेच, पण एवढ्या अनोळखी ठिकाणी आणि परावलंबी अवस्थेत असतानाही स्वाभिमानाला तिलांजली न देण्याच्या त्याच्या वृत्तीचं कौतुकही वाटल्याशिवाय राहात नाही.



संपूर्ण प्रवासात आपल्या मनाची दारं उघडी ठेवल्यामुळे अनेक गोष्टी स्वीकारण्याची आणि आपल्या पाश्चात्य संस्कृतीतल्या उणिवांची कबुली देण्याची तयारीही तो वेळोवेळी दाखवून देतो. आधुनिक सोयीसुविधांपासून मैलोगणती दूर असूनही आफ्रिकेतल्या त्या प्रांतातल्या मंडळींनी कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी काढलेले तोडगे बघून 'आपण आपल्या गरजा किती वाढवून ठेवतो, त्यांची खरंच गरज असते का ?' हा प्रश्न मायकलला पडतो. तो लिहितो, "या तांड्यांच्या कामातील साधेपणा लक्षणीय होता. युगानुयुगांच्या प्रवासातून प्राप्त केलेल्या अनुभवांची त्याला जोड होती. गवताचे भारे वाहून नेताना वाटेत टाकून परतीच्या प्रवासात पुन्हा उचलून न्यायचे. अझलायींची कांबळी बसण्याच्या, झोपण्याच्या आणि वेळप्रसंगी तंबूच्या कामी यायची. उंटांच्या लेंड्यांच्या स्वयंपाकाचं इंधन म्हणून उपयोग व्हायचा. उच्च तंत्रज्ञान असलेल्या आणि जंगलातील प्रवासात बरोबर घेतल्याचं पाहिजेत अशा अनेक महाग वस्तूंच्या जाहिराती मासिकांमधून मोठ्या प्रमाणात केल्या जातात. पण या साऱ्या महाग-मोलाच्या वस्तूंची या साध्यासुध्या गोष्टींनी पार खिल्ली उडवली होती. आधुनिक वस्तूंच्या तुलनेत अझलाय वापरत असलेल्या वस्तू इथल्या वातावरणात आणि परिसरात जास्तच उपयुक्त ठरत होत्या. उंटांच्या लेंड्यांची चूल आधुनिक स्टोव्ह प्रमाणे चोंदत नव्हती. महाग स्लीपिंग बॅग्सच्या तुलनेत कांबळी अधिक टिकाऊ आणि बहुविध उपयोगी होती. त्यांचे कपडे स्वस्त, सहज दुरुस्त करण्याजोगे आणि अतिउपयुक्त होतेच पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'स्टायलिश' होते". अशी चिंतनाची जोड मिळाल्यामुळे हे पुस्तक केवळ टिंबक्टू-ताऊदेन्नी-टिंबक्टू असं प्रवासवर्णन राहात नाही तर ते मायकलचा अधिकाधिक परिपक्वतेकडे होणारा प्रवासही ठरतं.


पुस्तक : पांढऱ्या सोन्याच्या शोधात

लेखक : मायकल बेनानव्ह

अनुवादक : शुभदा पटवर्धन

प्रकाशक : रोहन प्रकाशन

पृष्ठसंख्या : २१२

आवृत्ती : पहिली (मार्च २०१४)

किंमत : १९५ रू.


- प्रसाद फाटक

No comments:

Post a Comment