Total Pageviews

Saturday, September 15, 2018

‘मेळघाटावरील मोहर’ : एक पालवी आशेची




आम्ही हे केलं ते केलं अशा बढाया मारण्याची सत्ताधाऱ्यांची नेहमीचीच सवय असते आणि तुम्ही काहीच केलं नाही हे सांगण्यासाठी विरोधक धडपडत असतात. दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबरही असतात आणि चूकही. कारण ते अशा पेल्याकडे बघत असतात ज्यात अर्ध्यापर्यंत पाणी आहे.  वास्तव बरेचदा मध्यावर कुठेतरी असतं.

दोन्हीकडचे लोक जेव्हा आपापल्या तीरावरून दगडफेक करण्यात मग्न असतात तेव्हा काही माणसं मात्र मधल्या दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवाहात झेपावलेले असतात आणि त्यातल्या खळग्यांची आणि भोवऱ्यांची पर्वा न करता पाणी कापत निघालेले असतात. एकाच ध्येयाच्या दिशेने. न थकता, न थांबता. पण त्यांचं धाडस एवढ्यापुरतंच नसतं हे नीट लक्ष दिल्यावर कळतं. कारण ते प्रवाहाच्या विरुध्द दिशेने निघालेले असतात.

त्यांचा मार्ग असा असतो की मदतीला येणाऱ्यांपेक्षा मोडता घालणाऱ्यांची संख्या जास्त असते. मलम लावणाऱ्यांपेक्षा जखमा करणाऱ्यांची संख्या जास्त असते. एकाच वेळी निर्दयता आणि निरुत्साह अशा दोन्ही वृत्तींशी दोन हात करणं हे त्याचं भागधेय होऊन बसलेलं असतं. पण त्यातूनही ते पुढे जातच राहतात. आमटे कुटुंबीय, राजेंद्रसिंह, अण्णा हजारे, नानाजी देशमुख अशा असंख्य ध्येयवाद्यांनी वेळप्रसंगी व्यवस्थेशी संघर्ष करून परंतु व्यवस्थेत राहूनच जग सुंदर करण्यासाठी आपापल्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे हे दांपत्य याच परंपरेतलं. त्यांची अविश्वसनीय वाटावी अशी जीवनगाथा सांगणारं पुस्तक म्हणजे ‘मेळघाटावरील मोहोर’.

अज्ञातात पाऊल

डॉ. रवींद्र कोल्हे हे एक वेगळंच पाणी. लहानपणापासून त्यांना हृदयाचा आजार. बरं तो आजार असा की त्याचं निश्चित निदान कधीच होऊ शकलं नाही. धाप लागणे, कमी प्रतिकारशक्ती अशा समस्यांमुळे लहानपण तब्येतीच्या काळजीने संदिग्धतेत गेलेलं. पुढे कॉलेजमध्ये शिक्षकांनी समजूत घातल्यावर मात्र मन कणखर बनलं. शिवाय त्याला वाचनाची जोड मिळाली. विनोबा, गांधीजी, गाडगेबाबा यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला. कणखर मन ध्येयवादी बनलं तर त्याला स्वस्थ राहणं खूप कठीण असतं. अभावग्रस्तांची अज्ञात आयुष्यं त्याला साद घालू लागतात. डॉक्टर झाल्यावर रवींद्रच्या मनाने एकच ध्यास घेतला : वनवासी क्षेत्रात जाऊन वैद्यकीय उपचारच सुरू करायचे. आणि खरोखरच ते जाऊन पोचले मेळघाटातल्या बैरागड नावाच्या अतिशय दुर्गम गावात. असं गाव जिथून जवळचं जरा सांगता येण्याजोगं गाव चाळीस किलोमीटरवर होतं आणि जिथून बैरागड पर्यंत यायला पक्का रस्तासुद्धा नव्हता!


कामाची सुरुवात करताना ना तिथल्या निसर्गाची माहिती होती, ना माणसांची. सोबतीला होत्या फार मोजक्या गोष्टी. त्यातल्या सर्वांत महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे खुद्द बाबा आमटेंचे प्रोत्साहन आणि दुर्दम्य इच्छाशक्ती. डॉक्टरांनी सुरुवातीपासूनच एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली होती की कुठलेही उपचार द्यायचे नाही. कारण त्यामुळे सेवेची किंमत राहत नाही. पण त्याचसोबत त्यांनी औषधोपचाराचे मूल्य अत्यंत माफक ठेवण्याचेही भान राखले कारण बहुतांश गावाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. एका परमुलुखातून आलेल्या माणसाकडे अविश्वासाने बघितलं जातं तसंच इथेही झालं. सामान्य औषधोपचारांसोबतच डॉक्टर प्रसूतितज्ञ म्हणूनही कामं करायचे पण या गावात बहुसंख्य असणाऱ्या मुस्लिम समाजामध्ये पुरुष डॉक्टरची मदत घेणंही निषिद्ध! पण कुठलंही नातं सहवासानेच समृध्द होत जातं. जसजसे अधिक लोक डॉक्टरांच्या संपर्कात आले तसतसा त्यांच्याबद्दलचा विश्वास दृढ होत गेला. इतका की जेव्हा डॉक्टर उच्चशिक्षणासाठी गाव सोडून निघाले तेव्हा लोक काळजीत पडले. पुन्हा ते येतील की नाही याबद्दल त्यांना शंका वाटू लागली. पण डॉक्टरांनी वचन पाळलं. ते उच्च शिक्षण घेऊन अधिक ज्ञान आणि अधिक सज्ज होऊन परतले आणि आपल्या कामाला अधिकाधिक आयाम जोडत गेले.

... मिलकर बोझ उठाना

या सगळ्या प्रवासात त्यांना खंबीर सोबत मिळाली ती त्यांची पत्नी डॉ. स्मिता यांची. या दांपत्याच्या लग्नाची कथा विलक्षण आहे! डॉक्टरांची अटच होती की ‘महिना चारशे रूपयात संसार करण्याची आणि चाळीस कि.मी. चालण्याची तयारी असणाऱ्या मुलीशीच मी लग्न करीन’. होमिओपॅथिक डॉक्टर असणाऱ्या आणि तोपर्यंतचे आयुष्य मध्यमवर्गीय परिस्थितीत जगलेल्या स्मिता यांनी जेव्हा रवींद्र कोल्हेंशी गप्पा मारल्या तेव्हा त्यांच्या प्रामाणिकपणा आणि तळमळीविषयी त्यांची खात्री पटली आणि या सेवायज्ञात त्या दोघांनी हातात हात घालून उडी घेतली.

या दांपत्याचा लढा फक्त अनारोग्याशी नव्हता. तो औदासिन्य, अविश्वास, अंधश्रद्धा आणि अन्याय या सगळ्यांशीच होता. त्यासाठी दोघांना गावकऱ्यांपैकी एक व्हावं लागलं. त्यांच्यात राहून, त्यांच्यासारखी वेशभूषा, घर, आहार या गोष्टी आत्मसात करून. एकदा तर डॉ. रवींद्र कोल्हे यांनी या आग्रहाचं दुसरं टोक गाठलं. इथल्या महिलांची जितक्या मर्यादित सुविधांमध्ये (खरंतर विवंचनेतच) प्रसूती होते त्याच वातावरणात डॉ. स्मिता यांचेही बाळंतपण करायचा निर्णय त्यांनी घेतला. खरंतर त्यांना शहरात जाऊन सोयीसुविधायुक्त प्रसूती करणं शक्य होतं पण तरीही त्यांनी आपल्या पत्नीचा जीव धोक्यात घातला. हे वाचताना डॉक्टरांचा हा वेडेपणा वाटतो. पण शेवटी वेडी माणसंच इतिहास घडवत असतात. कोल्हे पतीपत्नींनीही तो घडवला. नुसतं आरोग्य सुधारून नव्हे तर गावकऱ्यांचं वर्तनही सुधारून. या परिसरात त्यांनी अनेक धाडसी प्रयोग केले. स्वतः रेशनिंगचे लायसन्स मिळवून साऱ्या वाटपात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणली, स्वतः शेती करून त्यात प्रयोगशीलता दाखवली, अडीअडचणीत सापडलेल्या गावकऱ्यांना रक्ताचं पाणी करून कायदेशीर मदत मिळवून दिली, हक्काची सरकारी मदत गावाकडे खेचून आणली. हे सर्व करताना 'कधीही भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार नाही' हा निर्धार पाळला. त्यासाठी वर्षानुवर्षं सरकारी कचेऱ्यांचे आणि न्यायालयांचे उंबरे झिजवावे लागले. निगरगट्ट सरकारी कर्मचाऱ्यांचा मुर्दाडपणा आणि ढिम्म न हलणारी न्याययंत्रणा यांना तोंड द्यावं लागलं. एवढ्या सगळ्यांतून त्यांना जगण्याची, कार्यरत राहण्याची इच्छा कशी शिल्लक राहिली हाच प्रश्न पडतो.

या दांपत्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते नुसतं 'अमुक एक वाईट गोष्ट करू नका' असं म्हणून थांबले नाहीत. त्या ऐवजी काय करावे याचे पर्याय दिले. जवळच्या गावात देवापुढे दिले जाणारे पशुबळी रवींद्र कोल्हेंना फार अस्वस्थ करायचे. ते थांबण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 'एवढी जुनी परंपरा कशी थांबवायची' असा प्रश्न विचारणाऱ्यांना रामनवमीच्या निमित्ताने कबड्डीचे जंगी सामने सुरू करून देऊन त्यांनी एक नवीन विधायक परंपरा सुरू करून दिली. नुसतेच जुने खोडणाऱ्या व्यक्तीपेक्षा नवे काही रेखाटणारी व्यक्ती लोकांना अधिक जवळची वाटते. त्यामुळेच आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांचंही या दांपत्याशी नातं जुळलं.

....पाषाणाहुनि कठोर

आपलं सर्वस्व सोडून केवळ लोकांच्या भल्यासाठी एवढ्या आडवाटेला येऊन राहणाऱ्यांच्या कामात कोलदांडे घालणाऱ्या विघ्ससंतोषी लोकांबद्दल वाचून मन अतिशय उद्विग्न होतं. डॉक्टरांचं शेत जाळण्यापासून ते चारित्र्यावर संशय घेण्यापर्यंतचे सगळे हीन नमुने वाटेत येत असूनही कोल्हे कुटुंबीय पाय रुतवून तसेच उभे राहिले, पाषाणासारखे... गाव सोडून निघून जाण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. उलट नानाविध व्याप वाढवून ते स्वतःला कधीकधी गुंतवत गेले. गावाला प्रेम वाटत राहिले पण मूल्यांशी तडजोड केली नाही की गैरप्रकार खपवून घेतले नाहीत. गावात गरीब वनवासी आणि बऱ्यापैकी सधन आणि वरचढ असणारे मुस्लिम यांच्यात तणावाचे प्रसंग निर्माण व्हायचे. एकदा तर गावच्या मुस्लिम सरपंचानेच एका अत्यंत गरीब माणसाला अवघ्या पन्नास रुपयांचे आमिष दाखवून त्याच्या १४ वर्षांच्या मुलाचे धर्मांतर करवले, तेव्हा डॉ. रवींद्र थोडेसे बॅकफूटवर होते पण अशी धर्मांतरं आधीही गावात घडत असल्याने डॉ. स्मिता आता काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला आणि त्या निष्पाप मुलाला न्याय मिळवून दिला.




वेधक मांडणी

डॉ. स्मिता यांचं असं करारी आणि खमकं व्यक्तिमत्व पुस्तकात सतत दिसत राहतं. घरात उपटणाऱ्या बेडूक, साप, विंचू यांच्याशी सामना करण्यापासून ते छेड काढणाऱ्या माणसाला धडा शिकवेपर्यंतचे अनेक प्रसंग त्यांना अधिकाधिक टणक करत गेले. अतिशय संयत आणि हळव्या डॉक्टरांशी त्यांचं हे व्यक्तिमत्व पूरकच ठरलं. लेखिका मृणालिनी चितळे यांनी या दोघांच्या कामासोबतच त्यांच्या नात्यांचे असे कंगोरेदेखील आपल्यासमोर आणून एक समृद्ध होत गेलेलं नातं मांडलं आहे. त्यांना या कामात मदत करणाऱ्यांना एका स्वतंत्र प्रकरणात आवर्जून स्थान दिलं गेलेलं आहे.


या पुस्तकाची मांडणी करणं तितकंसं सोपं नाही. एकतर इतक्या प्रचंड कामातून काय आणि किती वेचायचं हे ठरवणं आवश्यक होतं. त्यातून कोल्हे दांपत्याचं काम इतकं बहुआयामी आहे की एकाच वेळी त्यांच्या विविध क्षेत्रातली कामं समांतर चालू असतात. त्यामुळे सगळं कालक्रमानुसार एकरेषीय मांडायला गेलं तर एवढ्या कामांचे धागे एकातएक गुंफणे कठीण. म्हणून त्यांनी त्यांच्या एकेका कार्यक्षेत्रावर एकेक प्रकरण आणि त्या त्या प्रकरणात सुरुवातीपासूनचा प्रवास अशी सुटसुटीत मांडणी केली आहे. लेखिकेसाठी सर्वात आव्हानात्मक होतं ते दुर्गम भागातल्या आणि सतत कामावर असणाऱ्या प्रसिद्धीपराङ्मुख या जोडप्याला गाठणं आणि स्वतःबद्दल बोलतं करणं. पुस्तकाची प्रस्तावना वाचताना डॉक्टरांच्या चिकाटीबरोबरच लेखिकेच्या चिकाटीबद्दलही आदर वाटू लागतो.


डॉक्टरांच्या कार्याचं असं तपशीलवार दस्तावेजीकरण करणं हे त्यांनी लावलेल्या ज्योतीमागे आरसा धरण्यासारखं आहे. आरशामुळे त्या ज्योतीचा प्रकाश अधिकाधिक फाकेल आणि अनेकांना नुसती प्रकाशवाटच दाखवेल असं नाही तर अंधाराशी दोन हात करण्याचे बळही देईल.


पुस्तक : मेळघाटावरील मोहर

लेखिका : मृणालिनी चितळे

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या : ३००

किंमत : ३०० रू.

आवृत्ती : सहावी (फेब्रुवारी २०१५)




-  प्रसाद फाटक


No comments:

Post a Comment