Total Pageviews

Saturday, September 15, 2018

'चीपर बाय दी डझन’ : लेकुरे उदंड झाली !





'छोटा परिवार सुखी परिवार', 'कुटुंब लहान सुख महान', 'हम दो हमारे दो' वगैरे सरकारी घोषणा स्थिरावूनसुद्धा आता खरंतर भरपूर वर्षं झाली आहेत. आता शून्य किंवा एक अपत्य अशा 'बायनरी' संख्येची उदाहरणंही पुष्कळ दिसू लागली आहेत. पण तरीही एकूण कुटुंबसंस्थेच्या वाटचालीचा विचार करता तो कालावधीही नगण्य आहे. आपल्या नात्यागोत्यात एखाद्-दोन पिढी अगोदरपर्यंत पाच-सात अपत्यं असणं अगदी सर्वसामान्य होतं. घरातली सात-आठ माणसं शिवाय आला-गेला, पै-पाहुणा सगळेच धरायचे म्हटलं तर घर म्हणजे गोकुळच असायचं. आजही सणासुदीच्या निमित्ताने मुलामुलींचं आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबाचं एकत्र येणं झालं की मगच आजी-आजोबांना घर भरल्यासारखं वाटतं. पण हे सगळं झालं आपल्या आजूबाजूच्या समाजातलं. आपल्या अशा कुटुंबव्यवस्थेबद्दल पाश्चात्त्यांना कुतूहल वाटत असल्याचं आपण ऐकतो. पण मग तिथल्या समाजात कुटुंबसंस्था कधी आपल्यासारखी होती का, असा प्रश्न आपल्याला पडणं साहजिक आहे. जुन्या अमेरिकन कुटुंबावर प्रकाश टाकणारं पण आजही अगदी तजेलदार असणारं एक पुस्तक वाचनात आलं, ज्याचं नाव आहे 'चीपर बाय द डझन'.




मिस्टर फ्रॅंक आणि मिसेस लिलियन गिलब्रेथ दांपत्य आणि त्यांच्या तब्बल एक डझन मुलांची ही खरीखुरी गोष्ट. शतकभरापूर्वी अमेरिकेत घडलेली. त्याकाळी अमेरिकेत अपत्यांची संख्या अगदी मर्यादित नसली तरी बारा मुलं असणं हे तेव्हाही दुर्मिळच होतं. त्यामुळे गिलब्रेथ कुटुंबाबद्दल आजूबाजूचे नागरिक, तसंच ते कुटुंब फिरायला निघाले की त्यांना न्याहाळणारे लोक या सगळ्यांच्या डोळ्यांत प्रचंड कुतूहल असायचं. त्यांचे अनोखे अनुभव वाचणं हे आपल्यासाठीही मेजवानी आहे.



कुटुंबातलं 'मॅनेजमेंट'



फ्रॅंक गिलब्रेथ हे यशस्वी व्यावसायिक होते. 'हालचाली आणि गती' या विषयाचा दांडगा अभ्यास होता. या अभ्यासातून त्यांनी बांधलेले ठोकताळे वापरून स्वतः च्या व्यवसायात वृद्धी तर केली होतीच. शिवाय इतर उद्योगांसाठीही सल्लागार म्हणून काम करून त्यांच्या उत्पादनातही भर घातली होती. 'जे व्यवसायात करता येतं ते कुटुंबात आणि जे कुटुंबात करता येतं ते व्यवसायात करून पाहण्याचा त्यांचा आग्रह असायचा. व्यवसायात अधिक संख्येने असणाऱ्या माणसांना हाताळण्याचं कौशल्य घरातल्या गोतावळ्यासाठीही उपयोगी पडेल असा विश्वास त्यांना होता. त्यांनी घरी अनेक प्रयोग केले. संकटसमयी सर्वांना एकत्र येण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा यासाठी शिट्टीच्या संकेतावर ताबडतोब हजर राहण्याची सवय आपल्या मुलामुलींना लावली. पुढे एकदा घरी बाका प्रसंग उद्भवला तेव्हा याच तंत्रामुळे सर्वांचे जीव वाचले. एवढ्या सर्वांची कामे पटापट उरकावीत म्हणून कुटुंबात सर्वांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. घरामध्ये कौटुंबिक समिती बनवून त्यात प्रत्येक सदस्याला सहभागी करून घेतलं, विविध गोष्टींवर चर्चा केली आणि बहुमत लक्षात घेऊन ठराव पास केले. दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेण्याच्या या संस्कारांमुळे मुलं लोकशाही आपल्या कुटुंबातच शिकली ती अशी !


शिक्षणाचे अनोखे प्रयोग



मुलांनी सहजपणे जास्तीत जास्त गोष्टींचं ज्ञान मिळवावं यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. उदा. न्हाणीघरात एक ग्रामोफोन ठेवला होता. त्यावर वाजवण्यासाठी जर्मन/फ्रेंच तबकड्या आणल्या आणि आंघोळ करताना त्या तबकड्या वाजवायला सांगितल्या. हा हा म्हणता मुलं फ्रेंच आणि जर्मन शिकली. मुलांसाठी टाईपरायटर आणून मुलांना वेगवेगळी आव्हानं देऊन वेगाने टायपिंग शिकायला उद्युक्त केलं. घरातल्या भिंतींवर मोर्सकोडच्या खुणा लिहिण्याचा प्रयोग इतका यशस्वी झाला की जेवणाच्या टेबलावर आपल्या ताटल्यांवर चमचे वाजून मुलं त्या सांकेतिक भाषेत बोलू लागली. मोठमोठ्या संख्यांचे गुणाकार करण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीही त्यांनी मुलांना शिकवल्या. या अभिनव पद्धतींनी मुलांना शिकवताना त्यांनी हे सगळं घरच्या कॅमेऱ्यात चित्रित करून ठेवल्यामुळे त्याचं छान दस्तावेजीकरण झालं आणि त्या फिल्म्स प्रसिद्ध झाल्यामुळे अनेकांना त्यातून अभ्यास करता आला. शिवाय वेगवेगळ्या कामांच्या चित्रीकरणातून फ्रॅंक यांनी गती आणि हालचालींचं निरीक्षण करून कमी वेळात जास्त परिणामकारकतेने करण्याच्या युक्त्याही शोधून काढल्या ज्याचा अनेकांना उपयोग झाला.


जुनं, तरीही समकालीन



एकत्र कुटुंबपद्धती किंवा मोठी कुटुंबं या गोष्टी सध्याच्या काळात जवळपास नाहीशा झाल्या आहेत. पण तरीही हे पुस्तक पूर्णपणे कालबाह्य ठरवता येणार नाही. कारण गिलब्रेथ कुटुंबाच्या आकाराशी संबंधित तपशिलांच्या थोडंसं पुढे जाऊन पाहिलं तर यात काही अतिशय महत्वाच्या गोष्टी आढळतात ज्या आजच्या काळातही महत्वाच्या आहेत. पुस्तकभर जाणवत राहतो तो फक्त कुटुंबीयांबद्दलच नाही तर एकूणच कुटुंब व्यवस्थेविषयीचा ओलावा. आधीच छोटी असणारी कुटुंबं आणखी विभाजित होत अणुमात्र होताना दिसण्याच्या आजच्या काळात अशा कुटुंब व्यवस्थेविषयी सकारात्मक लिखाणाचं महत्व निश्चितच आहे. घरातल्या व्यक्तींचे आपापसांतले बंध घट्ट असतील तर मोठ्या अडचणींना तोंड देण्यासाठी फायद्याचं ठरतं हे यातून अधोरेखित होतं. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांवरचं वाढत जाणारं अभ्यासाचं, परीक्षांचं ओझं, त्यावर उतारा शोधण्यासाठी चालणारी पालकांची धडपड आणि त्यातूनच विविध ट्युशन्स, ट्रेनिंग्जचं वाढत गेलेलं प्रस्थ, या सगळ्या धबडग्यात मुलांना शिक्षण आवडतंय का आणि त्यातून त्यांचं कुतूहल जागृत होऊन नवनवीन गोष्टी स्वतःहून शिकाव्याश्या वाटताहेत का हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. अशा वेळी फ्रॅंक गिलब्रेथ यांनी मुलांचं शिकणं हसत खेळत व्हावं यासाठी वापरलेल्या क्लृप्त्या उपयुक्त ठरू शकतात.


‘चीपर बाय दी डझन’ भावण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यातली वैश्विकता. एका परक्या देशातल्या लोकांच्या राग, लोभ, प्रेम या मूलभूत भावना आपल्याहून यत्किंचितही वेगळ्या नाहीत; तसंच गिलब्रेथ दांपत्याची कुटुंबाबद्दलची पितृत्वाची भावना, त्यांचं भलं व्हावं यासाठीची सततची धडपड, वयात येणाऱ्या मुलींबद्दलची चिंता, त्यांना वाईट नजरांपासून वाचवण्यासाठी पंखाखालीच ठेवण्याची धडपड आपण स्वतः च्या, आसपासच्या कुटुंबांत बघतो तशीच आहे. हे असं काही दिसतं तेव्हा पृथ्वीच्या दोन टोकांना असणाऱ्या समाजांमधलं अंतर क्षणात नाहीसं होतं आणि गिलब्रेथ कुटुंबाची ही आनंदयात्रा आपल्याला अगदी जवळची वाटायला लागते.


हसरं विश्व

गिलब्रेथ आई-बाबांना एवढी मुलं सांभाळताना अडचणी तर आल्याच असणार. पण कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता हसत-खेळत कसं जगता-वाढता येऊ शकतं याचा परिपाठच गिलब्रेथ आईवडिलांनी घालून दिला. आपलं एवढं मोठं मोठं लटांबर कुठेही घेऊन गेले तरी लोक कुतूहलाने त्यांना "एवढी मुलं तुमची आहेत ?" किंवा "तुम्हाला बारा मुलं आहेत?" असं विचारायचे तेव्हा फ्रॅंक गिलब्रेथचं उत्तर असायचं "हो, कारण डझनावर घेतली की कुठलीही गोष्ट स्वस्त पडते!" बहुदा वडिलांकडून आलेल्या अशा मिश्किल वारश्यामुळेच पुस्तकाचा सूर अतिशय खेळकर आहे. छोट्याछोट्या प्रसंगांतून विनोद शोधण्याची आणि तो फुलवण्याची लेखनशैली पुस्तक रंजक करते. सकारात्मक बाजूंसोबतच मुलांना शिकवण्याच्या भावनेने पछाडलेले वकील कसे वाहवत जात यावरही मार्मिकपणाने बोट ठेवलं आहे. उदा. काहीवेळा वेळ वाचवण्याच्या अट्टहासात मि. गिलब्रेथ यांनी दोन्ही हातांनी दाढी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांच्या गालाला जखम झाली, त्यावर "४० सेकंद वेळ वाचवायच्या प्रयत्नात झालेल्या जखमेवर मलमपट्टी करण्यात त्यांची २ मिनिटं वाया गेली" अशी टिप्पणी केली आहे. मुलांना काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न त्यांच्याच अंगाशी कसा आला हे वाचताना ओठांवर हसू आल्याशिवाय राहत नाही.


पुस्तकाचा मूड प्रसन्न ठेवण्याचं श्रेय जातं ते गिलब्रेथ कुटुंबाचेच सदस्य असणाऱ्या लेखकद्वयीला. मंगला निगुडकर यांनी ते मराठीत इतकं चपखलपणे आणलंय की वाचताना आपण अनुवाद वाचतोय असं जाणवतही नाही.

पुस्तक : चीपर बाय दी डझन


लेखक : फ्रॅंक बंकर गिलब्रेथ (ज्यु.) आणि अर्नेस्टाईन गिलब्रेथ कॅरे


अनुवाद : मंगला निगुडकर


प्रकाशन : स्त्री-सखी प्रकाशन


आवृत्ती : पहिली (मार्च १९८३)


पृष्ठसंख्या : १६०


किंमत : २५ रु. .



(जाता जाता : वर मी वाचलेल्या जुन्या आवृत्तीचा उल्लेख केला असला तरी अलीकडेच या पुस्तकाची आवृत्ती मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आल्याचं कळलं)



- प्रसाद फाटक

No comments:

Post a Comment