Total Pageviews

Saturday, September 15, 2018

प्रोत्साहन आणि प्रतिसादाच्या प्रतीक्षेत रोलबॉल



बालेवाडीच्या छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलातली पहिलीच इमारत....  आतल्या कोर्टवर अटीतटीचा सामना सुरू....  एकीकडे सामन्याचं धावतं समालोचन चालू आहे....  दुसरीकडे फोटोग्राफर खेळातले अद्वितीय क्षण टिपण्याच्या गडबडीत.... रविवारचा दिवस असूनही गर्दी  मात्र मोजकीच आहे....  खरंतर समोरचा खेळ इतका वेगवान आहे की, डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळाडू इकडचे तिकडे गेलेले असतात. वेगाच्या बाबतीत Ice Hockey सोबत तुलना होऊ शकते असा हा सुसाट खेळ म्हणजे रोलबॉल. सोप्या शब्दात सांगायचं तर स्केटिंग, हँडबॉल आणि बास्केटबॉल यांचा संगम असणारा खेळ. पायाखालच्या फिरत्या चाकांमुळे त्याचा तोंडवळा परदेशी खेळासारखा वाटत असला तरी या खेळाचा जन्म आहे या महाराष्ट्राच्या भूमीतला..... तोही खुद्द पुण्यातलाच ! राजू दाभाडे या मराठमोळ्या व्यक्तीच्या कल्पकतेचा आणि ध्यासाचा अविष्कार ! रोलबॉल हा क्रीडाजगतातला सर्वात तरुण (आणि २१ व्या शतकात जन्मलेला एकमेव !) खेळ. अधिकृतरित्या २००३ साली जगासमोर आलेला हा खेळ फक्त १४ वर्षात जगातल्या चाळीस देशात पोचला असून एक लाखाहूनही अधिक खेळाडू या  खेळाशी संबंधित आहे. रोलबॉलचे ४ विश्वचषक सुध्दा झालेले असून ३ वेळा तो भारताने जिंकला आहे. यावर्षी  ढाक्याला झालेल्या विश्वचषक स्पर्धेत  १६ देशांच्या चुरशीच्या सामन्यांमधून भारत विजेता ठरला. परंतु अंटार्क्टिका वगळता सर्व खंडामध्ये पोहचलेल्या आणि खेळत असलेल्या या खेळाला अजूनही प्रतीक्षा आहे ती प्रेक्षकांच्या, मान्यवरांच्या आणि प्रायोजकांच्या भरघोस प्रतिसादाची. तस पहायला गेलं तर एक चांगली गोष्ट म्हणजे अन्य खेळाप्रमाणेच रोलबॉलचे ही लीग सुरू झाले असून 'महारोल बॉल लीग' असे त्याचे नाव आहे. यंदा हे लीगचे दुसरे वर्ष असून २३ ते २६ जून असा त्याचा कालावधी आहे. महाराष्ट्रातील ८ शहरांच्या नावांचे प्रत्येकी मुलांचे तसेच मुलींचे संघ यात भाग घेत आहेत. शहरांची नावं जरी महाराष्ट्रातील असली तरी यामध्ये भारतभराच्या खेळाडूंचा समावेश आहे.  (जम्मू काशीरचे खेळाडू या खेळामध्ये विशेष प्रवीण असून ते भारताच्या टीमचेही प्रतिनिधित्व करतात ही एक उल्लेखनीय बाब !)

स्पर्धेला व एकूणच रोलबॉल या खेळाला मिळणाऱ्या प्रतिसाद व प्रसिध्दी बाबत विस्ताराने माहिती घेतली असता एक धक्कादायक गोष्ट कळली की इंग्रजी वर्तमानपत्रांकडून या खेळाला प्रसिध्दी दिली जात नाही. फक्त आलिंम्पिकमध्ये असणारे खेळ व क्रिकेट यांनाच क्रीडापानांवर जागा देण्याचे त्यांचे धोरण असल्याचा रोलबॉलला तोटा झाला आहे. खेळ अधिकाधिक खोलवर पोचण्यासाठी त्यामध्ये जास्तीत जास्त उद्योगपती, प्रतिथयश तारेतारका यांना रस निर्माण होणे गरजेचे आहे. परंतु ते ज्यांचे वाचक असतात अशा इंग्रजी वर्तमानपत्रांची मात्र या खेळाबाबत उदासीनता असल्याने त्यांच्यापर्यंत हा खेळ पुरेसा पोचतच नाही. शिवाय लीगबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली असता बहुतांश पत्रकारांचा सगळा रस लीगच्या तपशिलांपेक्षा या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू कोण आणि त्याला किती रकमेचे 'डील' मिळाले यातच होता. सुदैवाने मराठी माध्यमांना मात्र याबाबतीत चांगला अनुभव असून बहुतांश मराठी वृत्तपत्रे नियमितपणे रोलबॉलचे वृत्त देतात. मराठी भूमीत, मराठी माणसाकडून जन्माला आलेला खेळ अशी आपुलकीची भावना याला कारणीभूत असू शकेल.

नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कप्तानांसोबत आदेश बांदेकर
रोलबॉल संदर्भात महाराष्ट्रात एक अतिशय चांगली घटना घडली आहे. 'होम मिनिस्टर' मुळे घराघरात (शब्दशः!) पोचलेले आदेश बांदेकर यांनी रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. बरेचदा मान्यवर व्यक्ती नावापुरत्या अध्यक्ष असतात. बांदेकरांनी ही भूमिका गांभीर्याने घेतली असून ते या खेळाच्या सर्व अंगामध्ये स्वतः बारकाईने लक्ष घालतात. लीगच्या चारही दिवसांमध्ये त्यांचा मुक्काम पुण्यातच असतो. सामने चालू असताना प्रेक्षक म्हणून कसा अनुभव आहे हे प्रेक्षागृहातून बघण्यापासून ते सामन्यानंतर सहभागी संघातील प्रत्येक खेळाडूची विचारपूस करेपर्यंत तसेच नवनवीन ठिकाणी रोलबॉलचा प्रसार, प्रशिक्षण करण्याचे प्रयत्नांवरही ते लक्ष ठेवतात. याबद्दल त्यांच्याशी सामन्यांच्या ठिकाणीच संवाद साधला असता रोलबॉलबद्दलचा जिव्हाळा दिसून आला. "मला हा खेळ खूप आवडला. राजू दाभाडे किती झोकून देऊन काम करत आहेत हे पाहून मला वाटलं आपलाही यात सहभाग असलाच पाहिजे. माझी स्वत:ची समाजामध्ये असलेली ओळख या आपल्या मातीतल्या खेळाच्या प्रसाराच्या कामी आली तर आनंदच आहे. अधिकाधिक मान्यवर व्यक्तींचे  लक्ष खेळाकडे वेधून घेण्याचा माझा प्रयत्न आहे.", असं त्यांनी सांगितलं. 

सामन्यानंतरचा पारितोषिक वितरण समारंभ
केसरी टूर्सच्या झेलम चौबळ याही रोलबॉल सामना पाहण्यासाठी रविवारी उपस्थित होत्या. या स्पर्धेतला रोलबॉलचा मुंबई संघ त्यांच्या मालकीचा आहे. अशाच मोठ्या व्यावसायिकांना या खेळाकडे अधिकाधिक प्रमाणात वळवल्यास खेळाचा विस्तार वेगाने होईल याबद्दल आयोजकांना विश्वास वाटतो. राजाश्रयाबरोबर लोकाश्रय मिळाला तर 'महा रोलबॉल लीग' हे 'महाराष्ट्र रोलबॉल लीग' न राहता खऱ्या अर्थाने 'महालीग' होईल.  प्रेक्षक म्हणून रोलबॉलला देणे प्रोत्साहन देणे ही आपलीही तितकीच मोठी जबाबदारी आहे.
 - प्रसाद फाटक
(रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांची सविस्तर मुलाखत येत आहे लवकरच .... )


mahamtb.com वर पूर्वप्रकाशित :   http://mahamtb.com//Encyc/2017/6/28/Roll-ball-is-waiting-for-encouragement-and-feedback-Article-.html

No comments:

Post a Comment