काही माणसं अशी असतात की, जन्माला आलो आहे म्हणून आयुष्य रेटण्यात त्यांना काहीही रस नसतो. आयुष्याच्या एखाद्या विवक्षित क्षणी त्यांना आपल्या जीवनाचं प्रयोजन काय आहे याची जाणीव होते. तोपर्यंतच्या आयुष्यात अनेक वळणं येऊन गेलेली असतात आणि ती सर्व वळणं काही न काही शिकवून गेलेली असतात. आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता कशात आहे याची अनुभूती होण्याच्या क्षणामागे त्या सर्व वळणांची शिकवणी असते. मागे वळून पाहिलं तर प्रत्येक वळणावर कुणी ना कुणी आप्त, सुहृद उभे असलेले दिसतात. वळणावर कधी वेग कमी होण्याची तर कधी तोल जाण्याची शक्यता असते आणि नेमक्या अशाच क्षणी जवळची व्यक्ती कधी हलकासा धक्का देऊन गती देते तर कधी पुढे होऊन तोल सावरते आणि ही मोठी व्यक्ती पुन्हा एकदा नव्या दमाने आपल्या क्षितिजाकडे कूच करते. अनेकदा महापुरुषांच्या आयुष्यात डोकावलं तर लक्षात येतं की ही वेळोवेळी आधार देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्या महापुरुषाची सहधर्मचारिणीच असते. आपलं अस्तित्व वेगळं जाणवणारसुद्धा नाही इतकी ती त्या महापुरुषाच्या जीवनाशी एकरूप होऊन गेलेली असते. पण तिच्या सतत सोबत असण्यामुळेच महापुरुषाला आपल्या कार्यावर, ध्येयावर निश्चिंत मनाने लक्ष केंद्रित करता येते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हा एक असाच महापुरुष. एका आयुष्यात कित्येक आयुष्यं जगलेला..... एक अर्थतज्ज्ञ, धर्म-इतिहास-संस्कृती यांचा गाढा अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ, द्रष्टा विचारवंत असे त्यांचे कित्येक पैलू. एकेका विषयाच्या अभ्यासासाठी ज्ञानसाधना चालू असताना त्यात खंड पडू नये म्हणून स्वतः प्रचंड खस्ता खाल्लेल्या रमाबाईंविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेतून लेखक योगीराज बागुल यांच्या लेखणीतून ‘प्रिय रामू’ हे त्यांचं चरित्र साकारलं आहे. इतिहासाबद्दलच्या नोंदी म्हणून ते उल्लेखनीय आहेच, पण वर म्हटल्याप्रमाणे महापुरुषांच्या आयुष्यातले पत्नीचे स्थान अधोरेखित करण्याच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे.
खडतर बालपण
वणंदगाव नावाच्या दापोलीजवळच्या गावात रमाबाईंचे बालपण गेले. त्यांचे पाळण्यातले नाव भागीरथी, पण त्यांना रामी या नावाने संबोधले जायचे. घरची परिस्थिती गरिबीची, त्यात जात महाराची, त्यामुळे कष्ट पाचवीलाच पुजलेले. तशात लहान वयातच आईवडिलांचं छत्र नाहीसं झाल्याने आलेलं पोरकेपण आयुष्य आणखीनच अवघड बनवून गेलं. सुदैवाने सहृदय मामा आणि काका लाभल्यामुळे भावंडांना घेऊन त्यांच्यासोबत रामी मुंबईला आली. परिस्थितीने अगदी लहान वयातच तिला प्रगल्भ बनवलं. तशात त्या वेळच्या प्रथेप्रमाणे वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे लग्न सुभेदार रामजी यांचा मुलगा भिवा अर्थात भीमराव याच्याशी झालं. तो चक्क मॅट्रिक पास झालेला होता. महार समाजात जन्माला येऊन एवढी बुकं शिकलेला हा पहिलाच मुलगा होता. एवढं शिकून चांगलं नोकरीला लागण्याऐवजी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या इच्छेला होकार कळवत शिष्यवृत्ती मिळवून तो अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आणि रामीच्या कष्टांचा अध्याय मागील पानावरून पुढे चालू राहिला.
अंगवळणी पडलेले कष्ट
रामीच्या सासरी गोतावळा मोठा परंतु त्यामानाने उत्पन्न तुटपुंजे. अगोदर सासरे, मग कालांतराने मोठे दीर यांचे निधन झाल्याने कमावते पुरुष कमी झाले. तशात भीमराव परदेशी तुटपुंज्या शिष्यवृत्तीत अत्यंत खडतर परिस्थितीत शिकत असल्याने त्यांच्याकडून कुटुंबियांना आर्थिक पाठबळ मिळणे शक्य नव्हते. अशा कठीण परिस्थितीत रामी रस्ते बांधणीच्या कामावर आपल्या थोरल्या जावेसह रुजू झाली आणि अतिशय श्रमांची कामं करू लागली. शिवाय घरी येताना आसपासच्या जंगलातून काटक्या गोळा करून आणायची. एवढ्या अंगमेहनतीनंतरही जेमतेम अन्न मिळेल एवढंच उत्पन्न मिळत असल्याने पोराबाळांना खायला घालून स्वतः अर्धपोटी राहायची सवयच अंगवळणी पाडून घेतली. यातून कायमचा अशक्तपणा आल्याने पुढे तिच्या बालकांची परिस्थिती सुदृढ होऊ शकली नाही.
बाबासाहेबांच्या कौटुंबिक जीवनावर प्रकाश
पुस्तकाच्या केंद्रस्थानी रमाबाई असल्यामुळे त्यांचा आणि बाबासाहेबांच्या संसारातले क्षण प्रामुख्याने पुस्तकात आले आहेत. बाबासाहेब रमाबाईंना लिहिलेल्या पत्रात त्यांना प्रेमाने ‘प्रिय रामू’ असे संबोधत म्हणून तेच शीर्षक पुस्तकालाही दिले आहे. बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे त्यांना दीर्घकाळासाठी परदेशी राहावे लागल्यामुळे त्यादरम्यानच्या काळात आणि ते परतल्यानंतरही जात आडवी येत असल्याने चांगली नोकरी न मिळाल्यामुळे आलेल्या आर्थिक अस्थैर्याच्या काळात रमाबाईंनी संसाराचा गाडा कसा ओढला असेल हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. अशातच स्वतःच्या पोटचं लेकरू गमवावे लागण्याचं दुःख तब्बल चार वेळा भोगावं लागल्याने त्यांच्या मनावर खोल चरे उमटले. या गोष्टी बाबासाहेबांनाही तितक्याच क्लेशकारक असल्या तरी त्यांच्यापुढे असणारी संपूर्ण दलित समाजाची चिंता आणि त्यांच्यासाठीचं प्रचंड कार्य यांमुळे त्यांना मन गुंतवण्यासाठी निदान काहीएक मार्ग तरी होता. परंतु अत्यंत कष्टमय संसाराच्या रहाटगाडग्यात त्या माऊलीच्य वाट्याला मात्र विरंगुळ्याचे क्षण फारच कमी आले. तरीही त्यांनी धीर आणि बाबासाहेबांची साथ दोन्हीही सोडले नाही. पुढे आर्थिक स्थैर्य आले खरे पण बाबासाहेबांच्या कार्यामुळे त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले. त्यांच्यापासून अनेकदा जीवाला धोका असल्याने तो घोर जीवाला लागून पुन्हा एकदा सततची अस्वस्थता आणि असुरक्षितता रमाबाईंच्या वाट्याला आली. या सगळ्यातूनही अभंग राहिलेली बाबासाहेबांवरची निष्ठा आणि त्यांच्याबरोबरच्या सहजीवनातले चितारलेले आंबटगोड क्षण चित्रित करण्यावर पुस्तकाचा भर आहे.
अल्पस्पर्शित विषयावरचे अभ्यासपूर्ण लिखाण
आजवर बाबासाहेबांबद्दल विपुल लिखाण उपलब्ध झालेलं आहे. परंतु काही छोटेखानी चरित्रं वगळता रमाबाईंच्या जीवनावर म्हणावा तितका प्रकाश पडलेला नाही असं वाटल्याने त्यांचे आयुष्य बारकाव्यांसह उभं करण्याचा ध्यास योगीराज बागुल यांनी घेतला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या ग्रंथाच्या माध्यमातून बागुल यांनी यापूर्वीच एका वेगळ्या दृष्टिकोनातून जातीअंताच्या चळवळीचा आढावा घेतला आहे. ‘प्रिय रामू’ या पुस्तकाच्या माध्यमातूनदेखील त्यांनी वेगळ्या अंगाने अभ्यास करून इतिहासाचा एक अल्पप्रकाशित कोपरा प्रकाशमान केला आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करतानाच कठीण कालखंडात घरची आघाडी समर्थपणे सांभाळून त्यांना संसाराच्या दैनंदिन व्यापापासून लांब ठेवून एका परीने त्यांच्या ज्ञानयज्ञात मदतच करणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचेही या पुस्तकाच्या माध्यामातून स्मरण करणे सयुक्तिक ठरेल.
पुस्तक : प्रिय रामू
लेखक : योगीराज बागुल
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या : २२७
आवृत्ती : पहिली (२७ मे २०१७)
- प्रसाद फाटक
No comments:
Post a Comment