'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे'
या कविवर्य विंदा करंदीकरांच्या प्रसिद्ध काव्यपंक्ती. एका वाचनप्रेमीच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये किंचित बदल करून त्या ओळींची पुनर्मांडणी करावीशी वाटली ती अशी -
लिहिणाऱ्याने लिहीत जावे वाचणाऱ्याने वाचत जावे
वाचणाऱ्याने वाचता वाचता लिहिणाऱ्याचे हात घ्यावे'
याचं कारण असं की सातत्याने वाचत असणाऱ्या अनेकांच्या वाचनप्रवासात एक वळण असं येतं की 'लिहिणाऱ्याचे हात घ्यावे' असं त्यांना मनापासून वाटू लागतं. हे 'घेणं' कुठल्या एकट्या दुकट्या लेखकाकडूनंच असतं असं नाही, तर ते आता पर्यंत वाचलेल्या अनेक लेखकांकडून कण कण घेणं असतं. निरंजन घाटे यांच्या बाबतीत हेच घडलं आणि त्यातूनच ते लिहीत गेले. वैज्ञानिक, तांत्रिक, मनोविश्लेषणात्मक लेख, विज्ञानकथा, गूढकथा, अनुवाद इतके वैविध्य निरंजन घाटे यांच्या लिखाणात आहे. त्यांच्या लेखणीला विषयाचे बंधन नाही, कारण त्यांच्या वाचनाला आणि त्यामागे असणाऱ्या कुतूहलालाही कुठल्याच विषयाचे बंधन नाही. ज्या ज्या वाचकांना 'घाटे एवढं कसं काय लिहू शकतात' असा प्रश्न पडत असेल त्या सर्वांसाठी प्रस्तुत पुस्तक हे उत्तर आहे. कारण हे पुस्तक 'लेखक निरंजन घाटें'ना इंधन पुरवणारे वाचक 'निरंजन घाटे' यांच्या वाचनप्रवाहाबद्दल आपल्याला अनेक रंजक गोष्टी सांगतं.
पुस्तकाचं नावंच लक्ष वेधून घेणारं आहे. 'माझा वाचनप्रवास' किंवा 'माझी वाचनयात्रा' असं ठोकळेबाज शीर्षक न देता 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' असं का दिलं आहे ते पुस्तक वाचायला लागल्यावर लक्षात येतं. निरंजन घाटे वयाच्या दुसऱ्या वर्षी रस्त्यावरून जाताना दुकानांच्या पाट्या वाचायला आणि तिसऱ्या वर्षी पुस्तकं वाचायला शिकले. त्यामुळे लहान वयातच अनेक प्रकारचे वाचन त्यांच्या अंगवळणी पडले आणि त्यानंतर ते अक्षरशः 'सुटले'च. ग्रंथालयात, घरी झोपून, प्रवासात, रेशनच्या दुकानाच्या रांगेत असं स्थळकाळाचं बंधन न मानता पुस्तकं, नियतकालिकं, एवढंच काय पण शब्दकोशही वाचले. एका पुस्तकातून दुसऱ्याचा धागा मिळत गेला आणि एक भरगच्च वस्त्र विणलं जाऊ लागलं.
निरंजन घाटे यांनी वाचलेल्या प्रत्येक साहित्यप्रकारावर पुस्तकात एक एक प्रकरण आहे. रहस्यकथा, साहसकथा, विनोदी साहित्य, विज्ञानकथा, शब्दकोश, चरित्रं यांच्यावरच्या अक्षरशः शेकडो पुस्तकांची माहिती त्या त्या प्रकरणांमध्ये आहे. अवचितपणे गवसलेली पुस्तकं, प्रचंड मेहनतीने मिळवलेली पुस्तकं, रद्दीवाल्यांकडून मिळवलेली दुर्मिळ पुस्तकं यांच्याबद्दल वाचताना अगदी गुंतून जायला होतं. 'चुकला पीर मशिदीत' या न्यायाने कामानिमित्त ज्या शहरात जातील तिथली पुस्तकांची दुकानं, रद्दीवाले यांना शोधून काढणं हे घाटेंचं आवडतं काम. त्यामुळे पुण्या-मुंबईत जी पुस्तकं मिळू शकत नाहीत अशीही अनेक अनोखी पुस्तकं त्यांना मिळत गेली. त्यातूनच मग कळत गेले पायरेटेड पुस्तकं, दुर्मिळ पुस्तकं यांचे व्यवहार. आपल्या हातात पडलेलं जुनं पुस्तक नक्की कुठून प्रवास सुरु होऊन, कुठले टप्पे घेत घेत आपल्यापर्यंत आलं याचा सामान्य वाचक फारसा विचार करण्याच्या फंदात पडत नाही. पण अशा गोष्टींचा मागोवा घेतल्यामुळे त्यांना जे बारीकसारीक तपशील कळले ते वाचताना आपल्यालाही एका विलक्षण जगाची माहिती मिळते. पुस्तकातलं याचं एक उदाहरण बघा : पूर्वी जहाजाचे संतुलन व्यवस्थित राहावे यासाठी जहाजाच्या तळाशी मोठ्या प्रमाणात वाळू भरली जात असे. पण काही वेळा ती वाळू मुक्कामाच्या ठिकाणी ओतली जात असे आणि नवीन वाळू भरली जात असे. यामुळे जिथून वाळू उपसली जाते तिथे बेसुमार वाळू उपशामुळे आणि जिथे ती टाकली जाते तिथे वाळूतील जीव-जंतू पसरल्यामुळे पर्यावरणीय असंतुलन व्हायला लागले. मग ते बंद केले गेले आणि त्याजागी चक्क अमेरिकन प्रकाशकांची न खपलेली (आणि त्यामुळे विमा कंपनीला देऊन टाकलेली) पुस्तकं खरेदी केली जाऊन ती जहाजाच्या तळाशी भरली जात. अशी जहाजं भारतात आल्यावर ती पुस्तकं काढून मूळ किमतीपेक्षा स्वस्तात विकली जात. जुन्या पुस्तकांच्या व्यवसायात मुरलेले लोक ती विकत घेत. त्यांना इंग्रजी फारसं कळायचं नाही, त्यामुळे त्या पुस्तकांच्या विक्रीच्या किमती ठरवण्याच्या पद्धतीही विलक्षण होत्या. मुखपृष्ठावर उत्तान चित्रं असेल, ब्लर्बवर 'सेक्स' हा शब्द असेल तर पुस्तकाचा भाव अमुक, आकार मोठा असेल तर किंमत तमुक वगैरे वगैरे. मग ती देशभरातल्या बाजारांमध्ये पोहचवली जात. आपल्याला फूटपाथवर दिसणाऱ्या पुस्तकामागे एवढा मोठा प्रवास (आणि इतिहास !) असेल याची आपल्याला कल्पनाच नसते.
'साहित्यातला हसरा अध्याय' या प्रकरणात देशीदेशीच्या विनोदी साहित्याचा आढावा देताना इंग्रजीतल्या लिमरिक नावाच्या प्रकारची माहिती फार अनोखी आहे. आपल्याकडे जशा चारोळ्या नावाच्या लघुकथा असतात ताशा या 'पाचोळ्या'. ज्यात पहिली आणि सूरी ओळ यांचे यमक जुळते, तिसरी आणि चौथी ओळ पहिल्या ओळीच्या निम्मीच असते आणि पाचव्या ओळीचे यमक पुन्हा पहिल्या-दुसऱ्या ओळीशी जुळते. गंमत म्हणजे अशा लिमरिक्स खेळीमेळीत विज्ञानातल्या संकल्पना मांडण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे वापरल्या जातात.
उदा. अमीबाचं जनन कसं होतं हे सांगणारी ही लिमरिक :
अँड अमिबा नेम्ड सॅम अँड हिज ब्रदर
वेअर हॅविंग अ ड्रिंक वुईथ ईच अदर
इन द मिड्स्ट ऑफ देअर क्वाफिंग
दे स्प्लिट देमसेल्व्हज् लाफिंग
अँड ईच ऑफ देम इज अ मदर
एखाद्या पट्टीच्या वाचकाला अनेक साहित्यप्रकारांच्या वाचनाची आवड असणं स्वाभाविक असतं पण शब्दकोश वाचनाची आवड असणारे मात्र विरळाच. 'शब्दकोशांची समृद्ध खिडकी' हे प्रकरण त्यालाच वाहिलेले आहे. मराठीत माणसाला दीपस्तंभासारखे असणारे तर्खडकर, वीरकर यांचे इंग्रजी-मराठी शब्दकोश, वेब्स्टर आणि ऑक्सफोर्ड यांच्या डिक्शनरीज, इंग्रजीमध्ये slang म्हणजेच अशिष्ट समजल्या जाणाऱ्या शब्दांसाठीचे शब्दकोश. त्यातही ट्रकचालकांचे अशिष्ट शब्द, सैन्यदलात वापरले जाणारे अशिष्ट शब्द (यात पुन्हा नौदल, हवाईदल अशी वर्गवारी), टॅक्सी चालकांचे अशिष्ट शब्द (ज्यात पुन्हा आफ्रिकन, अमेरिकन, युरोपिअन यांचे शब्द वेगळेवेगळे !!!) असे वैविध्य. अशा प्रकारच्या गाळीव शब्दांचा कुणीतरी मेहनत घेऊन शब्दकोश बनवला आहे ही गोष्टच थक्क करणारी आहे. मराठीत शब्दकोश आणि अन्य कोशांची संख्या कमी असली तरी 'बोलीभाषांमधील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार' यांचा संग्रह असणारे एक अ. द. मराठे संपादित पुस्तक मराठीत उपलब्ध आहे आणि त्यातल्या बहुतांश म्हणी या स्त्रियांकडूनच कळल्या आहे (आणि त्या स्त्रियांकडून मिळतील असं साक्षात दुर्गाबाई भागवत यांनीच मराठेंना सांगितलं होतं, असे रोचक तपशील या प्रकरणात वाक्यावाक्यांत आहेत. शब्दकोश,अन्य विषयांवरील कोश यांसारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या विषयात किती वैविध्य असू शकते आणि ते किती रंजक असू शकतात हे या प्रकरणातून पुरेपूर कळतं.
या पुस्तकाबद्दल लिहू तेवढं थोडं आहे. आपल्या वाचनाबद्दल सांगू तेवढं थोडं आहे असं घाटेंनाही निश्चितपणे वाटलेलं असणार. आपल्या उभ्या आडव्या, उलट-सुलट केलेल्या वाचनाबद्दल संगतवार मांडणी करणं म्हणजे अतिशय कठीण काम. परंतु पुस्तकात अनेक पुस्तकांचे संदर्भ, किस्से, आठवणी, अनुभव अगदी प्रवाहीपणे आलेले आहेत. काही ठिकाणी लेखाच्या ओघात अवांतर गोष्टी सांगण्याचा मोह लेखकाला झाला आहे (जे अगदी स्वाभाविक आहे) पण ती गोष्ट सांगून पुन्हा मूळ धाग्यावर येणाचे भान त्यांना असल्यामुळे आपण फापटपसारा वाचतोय अशी भावना पुस्तक वाचताना अजिबात होत नाही.
यासाठी लेखक आणि संपादक या दोघांचं कौतुक करायला हवं. 'अनुभव' हे मासिक आणि 'समकालीन' हे प्रकाशन यांच्या माध्यमातून काळासोबत असणाऱ्या विषयांना वाचकांसमोर आणणाऱ्या 'युनिक फीचर्स'च्या चमूकडून अशा दर्जेदार पुस्तकाची निर्मिती होणं ही गोष्ट त्यांच्या लौकिकाला साजेशीच आहे. अर्थात एक खटकणारी गोष्ट या पुस्तकात आढळली त्याचाही उल्लेख व्हायला हवा. कुठल्याही पुस्तकात सम संख्येच्या (डाव्या बाजूच्या) पानावर पुस्तकाचे नाव आणि विषम संख्येच्या (उजव्या बाजूच्या) पानावर प्रकरणाचे नाव छापण्याचा संकेत असतो. त्यामुळे पानखूण (बुकमार्क) नसली तरी पुस्तक बंद करताना आपण ज्या पानावर होतो तिथे पोचण्यासाठी उजव्या पानावरच्या प्रकरणाच्या नावाची मदत होते. या पुस्तकात दोन्ही बाजूंच्या पानावर पुस्तकाचे नावच आहे आणि प्रकरणाच्या नावाचा पत्ताच नाही, जे बरंच त्रासदायक ठरतं. पुढच्या आवृत्तीत याची दुरुस्ती व्हावी ही अपेक्षा आहे.
पुस्तकात असलेल्या हजारो पुस्तकांच्या संदर्भामुळे हे महत्वाचं आहेच, पण चांगले शिक्षक वाचनसंस्कार होण्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत, वाचनाला दिशा कशी मिळू शकते, एखाद्या गोष्टीचे संदर्भ कसे शोधायचे, त्यांचा लिखाणात वापर करून वाचनीयता कशी वाढवता येते, वाचनाच्या/लिखाणाच्या निमित्ताने वाढणारा लोकसंग्रह आणि त्यांचा पुन्हा आपल्या वाचन आणि लिखाणासाठी होणारा उपयोग याही गोष्टी उलगडत जातात. वाचनप्रेमींनी अजिबात चुकवू नये असं हे पुस्तक आहे.
पुस्तकाचं नाव : वाचत सुटलो त्याची गोष्ट
प्रकाशक : समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या : २४५
आवृत्ती : पहिली (२३ एप्रिल २०१७)
किंमत : ३०० रु.
- प्रसाद फाटक
mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/9/2/Wachat-sutalo-tyachi-goshta-Book-review-by-prasad-phatak-.html
No comments:
Post a Comment