Total Pageviews

Saturday, September 15, 2018

'बापलेकी' : अव्यक्त नात्याचा वेध




कुटुंबव्यवस्था, त्यातले बदलत जाणारे संदर्भ, विविध कोनातून दिसणारे नातेसंबंध या गोष्टी साहित्यात कायमच केंद्रस्थानी राहत आलेल्या आहेत. मग ते नाटक, कथा, कादंबरीसारखे ललित साहित्य असो वा आत्मचरित्र, चरित्रासारखे साहित्यप्रकार. कुटुंबातल्या ज्या नात्यांवर प्रामुख्याने लिखाण झाले आहे त्यात आई-मुलगा यांच्यातील हृद्य नाते (श्यामची आई तसेच अनेक कविता), वडील-मुलगा यांच्यातील ताणतणाव (रायगडाला जेव्हा जाग येते) यावर बरेचसे लिखाण झालेले आढळते. अगदी किंवा ‘जनरेशन gap’ चा विचार केला तरी आई-मुलगी किंवा वडील-मुलगा यांच्यावरच बऱ्याचदा भर असतो. परंतु कुटुंबातल्या वडील-मुलगी या नात्यावर ‘दिल्या घरी तू सुखी राहा ....’  सारखी टिपिकल कढ काढणारी गीते/कविता यांच्यापुढे जाऊन वेगवेगळ्या कोनातून लिखाण फारसे झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच ‘बापलेकी’ कुटुंब व्यवस्थेचा अप्रकाशित पैलू समोर आणणारे पुस्तक खूप महत्वाचे आहे.

पुस्तकाचे दोन विभाग आहेत. पहिल्यामध्ये काही मुलींनी वडिलांविषयी लिहिलेले लेख आहेत तर दुसऱ्यामध्ये काही वडिलांनी मुलींविषयी लिहिलेले लेख आहेत. पहिल्या विभागातील लेखात विद्या बाळ यांनी न.चिं.केळकर आणि त्यांची कन्या यांच्यातील नात्यावर, तर प्रतिभा रानडे यांनी दुर्गाबाई भागवत व त्यांचे वडील यांच्यावर लेख लिहिला आहे. हे दोन्ही लेख शंभर वर्षांपूर्वीच्या कर्मठ काळातदेखील कुटुंब प्रमुखाचे पुढारलेले विचार दर्शविणारे आहेत. आजच्या काळातही जिथे मुलींवर बंधने आणली जातात तिथे इतक्या जुन्या काळातही मुलीला शिकण्याचे आणि मुख्य म्हणजे विचार करण्याचे स्वातंत्र्यदेणारे वडील हे खरोखरच आदरणीय ठरतात.

अनुराधा पोतदार ‘...आणि मी’ या लेखात वडील कवी घाटे यांच्याशी असणारा आदरयुक्त दुरावा सांगतात तर दीपा गोवारीकर या अत्यंत तापट वडिलांचं सर्वपरिचित चित्र उभं करतात. बापलेकीच्या नात्यात यांच्यामध्ये परस्परांविषयी आपुलकी प्रेम असूनही ते व्यक्त न होणे आणि आपण म्हणू तसेच व्हायला हवे हा दुराग्रह असल्याने वडिलांशी शब्दही बोलायची हिम्मत न होणे या दोन्ही प्रकारांमध्येच त्या काळातल्या बहुतांश लेकींचे बालपण व्यतीत झालेले आहे, याची आठवण हे लेख करून देतात.

यापुढच्या दोन लेखांमध्ये मात्र खूप वेगळा सूर आपल्याला आढळतो. विद्या विद्वांस यांचा ‘बापरे बाप !’ हा लेख आणि लीला पाटील यांचा ‘लेकीचे अव्यक्त प्रश्नोपनिषद’ हे लेख अतिशय कडवट अनुभवातून आलेले आहेत. दोघींच्या घरच्या परिस्थितीत प्रचंड फरक, तरीही वडिलांबद्दल लिहिताना त्यांच्या लेखणीला सारखीच धार चढली आहे. लीला पाटील म्हणजे प्रसिद्ध लेखक ना. सी. फडके यांची कन्या. ‘उत्तुंग, आदर्श प्रेमकथा लिहिणाऱ्या वडिलांना स्वतःच्या पत्नीची निष्ठा, प्रेम का कळू नये ?’  ही भावना लीला पाटील यांना छळत राहते आणि त्यातूनच निर्माण होते हे प्रश्नोपनिषद ! “पाच मुलं असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःपेक्षा २५ वर्षांनी तरुण असणाऱ्या कमल सोबत संसार थाटताना त्यांना लाज कशी वाटली नाही” असा खरमरीत सवाल त्या करतात. अर्थात या ठिकाणी आवर्जून हे सांगावंसं वाटतं की वडिलांविषयी इतका तिरस्कार मनात असूनही त्यांनी लहानपणी केलेल्या संस्कारांचे ऋण मान्य करायला त्या विसरत नाहीत. विद्या विद्वांस यांच्या लेखात मात्र फक्त उद्वेग आणि संतापच आहे. चांगला वारसा असूनही फक्त स्वतःपुरतं पाहणारे, चांगल्या कामांमध्ये अकारण मोडता घालणारे वडील विद्वंस यांच्या मनात तिडीक निर्माण करून जातात. घरातल्या अशा अप्रिय विषयावर जाहीरपणे लिहिणे हेही एक धाडसच ...

रझिया पटेल यांच्या लेखातून अत्यंत कर्मठतेचा पगडा असणाऱ्या मुस्लिम धर्मात जन्माला येऊन व आधुनिकतेला विरोध करणाऱ्या मंडळींच्या गराड्यात राहूनही सुधारणा आणू पाहणाऱ्या वेगळ्या मुस्लिम पित्याची भेट होते आणि अशा वडिलांची या समाजाला किती गरज आहे हे त्यातून अधोरेखित होते...

सई परांजपेंचा लेख एखाद्या कथेच्या फॉर्ममध्ये येतो. सई च्या खूप लहानपणी तिला सोडून गेलेल्या वडिलांना पुढे कित्येक वर्षांनी सणांच्या निमित्ताने भेटायला जाणारी मनातून अत्यंत हललेली सई मनात घर करून जाते. एकीकडे निवेदनात मिश्किल असणारी आणि दुसरीकडे त्या मुलीविषयी अस्वस्थता निर्माण करणारी ही कथा अनोखीच म्हणायला हवी !


दुसऱ्या - म्हणजेच वडिलांच्या 'अँगल' ने मांडणी असणाऱ्या विभागातला- 'नंदिता-एक आव्हान' हा लेख हा लेख विशेष उल्लेखनीय. बौद्धिक पातळीवर विकल असणाऱ्या मुलीसाठी प्रचंड झटणाऱ्या दामोदर टिळक यांच्या कष्टांची ही कहाणी. मुकुंद टाकसाळेंचा लेख त्यांच्या मुलींसाठी कुटुंबात असलेल्या मोकळ्या वातावरणा बद्दल. एका अर्थाने आजच्या उच्चमध्यमवर्गीय कुटुंबाचे हे प्रातिनिधिक चित्रच आहे. पहिल्या विभागाशी तुलना करता 'बापांचं मनोगत' हा विभाग कुठे तरी कमी पडतोय असं मला प्रकर्षाने वाटलं. कारण त्यात वैविध्य खूप कमी आहे. विशेष उल्लेख करावा असे लेख यात जवळपास नाहीतच.

अनेक वाचनीय लेख असणाऱ्या या पुस्तकाचे खरे मानकरी यातल्या या पुस्तकाचे संपादक मंडळ आहे. हे पुस्तक खऱ्या अर्थाने संपादिकांनी घडवलेलं पुस्तक आहे यात शंकाच नाही. संपादिकांची भूमिका, पुस्तकात वैविध्य आणण्यासाठी त्यांनी दाखवलेली कल्पकता यामुळे या पुस्तकाचे क्षितिज खूप विस्तारले आहे. पहिले उदाहरण म्हणजे एकाच कुटुंबाचे दोन वेगळ्या दृष्टिकोनातून दर्शन घडावे यासाठी इरावती कर्वे यांच्या जाई निंबकर आणि गौरी देशपांडे या दोन कन्यांचे यात समाविष्ट केले गेलेले लेख. स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरणारे आणि तत्वज्ञानाची पोपटपंची न करता ती आचरणातही आणणारे वडील यातून आपल्याला दिसतात. तसेच प्रिया आणि विजय तेंडुलकरांचे एकमेकांविषयीचे लेख व वसंत गोवारीकर आणि त्यांची कन्या यांचे परस्परांविषयीचे लेख एकाच नात्यात दोन्ही बाजूंनी असणारी खोली दाखवून देतात.

बापलेकींच्या नात्यातले फक्त गोडगोड क्षण दाखवणारे लेख टाळून या नात्याचं अधिकाधिक उत्खनन करून हाती लागणारे नानाविध भाव समोर आणणारे लेख या पुस्तकात आले आहेत हीच याच्या संपादनाची सर्वात स्पृहणीय गोष्ट आहे. विवेचन हा या पुस्तकाच्या शेवटी येणारा परिशिष्टवजा विभाग हे या पुस्तकाचं खूप महत्वाचं अंग आहे. 'नकुशा' या लेखातून स्त्री अपत्य पूर्वीपासून कसं नकोसं होत गेलं आहे, सर्व धर्मांमध्येच स्त्रीला दुय्यम स्थान कसं आलेलं आहे हे नमूद केलेलं आहे. 'वेध विविध पैलूंचा' या लेखातून मानसोपचार तज्ज्ञांच्या नजरेतून समाजाचा नात्यांकडे पाहायचा दृष्टिकोन  मांडण्यात आला आहे. 'न बोलण्याचा विषय' या लेखातून मुलींच्या आप्तांकडूनच होणाऱ्या लैंगिक शोषणावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

या पुस्तकात खटकणाऱ्या काही गोष्टीही आहेत. यामध्ये लेकींचे लेख सलग वाचत गेल्यास पुढे त्यात तोचतोचपणाही जाणवायला लागतो आणि काही लेखिकांचे लेख एकसुरी वाटतात. कारण वैयक्तिक जीवनातले तपशील वगळले तर प्रोत्साहन देणारे, चांगले संस्कार करणारे वडील हे या लेखांमध्ये अगदी सारखेच आहेत. संपूर्ण पुस्तकाचा विचार करता या ४-५ लेखांपैकी प्रातिनिधिक म्हणून एकच लेख छापून उर्वरित जागेत समाजातल्या अन्य स्तरातल्या बाप-लेकींविषयी लेख असते तर ते अधिक योग्य ठरले असते (अर्थात याची कबुली प्रस्तावनेत दिलेली आहेच).

संपादकत्रयीने स्वतःच्या मजकुराला पृष्ठसंख्येच्या बाबतीत फारच झुकते माप दिलेले आहे. पद्मजा फाटक यांचा लेख तर तब्बल ३५ पानी आहे ! (आणि तरीही त्या लेखात फार अनोखे आणि अपरिचित असे काही नाहीये - तपशिलाच्या थोड्याफार फरकाने अन्य लेखांतही ते आलेले आहे). विद्या विद्वांस यांना तर तब्बल तीन ठिकाणी स्थान आहे !

या त्रुटी वगळता पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. मौज प्रकाशनाचे पुस्तक असल्याने छपाईसह अन्य तांत्रिक अंगं अर्थातच उत्तम. पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे केवळ लहानमोठे दगडधोंडे नसून खरंतर एकमेकांना आधार देऊन सगळ्या समाजाचाच तोल सावरणारं कुटुंब आहे..

 या पुस्तकाच्या निमित्ताने बापलेकीच्या नात्याबद्दल मंथन व्हावे हा उद्देश निश्चितपणे साध्य होतो. बापलेकीच्या आणि इतरही नात्यांकडे खेळीमेळीच्या आणि निरोगी नजरेतून पाहणे हे आजच्या ढासळत्या कुटुंबव्यवस्थेच्या काळात अत्यावश्यक बनलंय. ती दृष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून नक्की मिळू शकते असा विश्वास हे पुस्तक वाचताना वाटतो, हेच या पुस्तकाचे यश आहे.


पुस्तकाचे नाव : बापलेकी


संपादन : पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस


प्रकाशक : मौज प्रकाशन


पृष्ठसंख्या : ४१८,


किंमत : ३५० रू,


आवृत्ती दुसरी, ऑगस्ट २००४.


No comments:

Post a Comment