Total Pageviews

Saturday, September 15, 2018

'खंडाळ्याच्या घाटासाठी' : दुवे सांधणाऱ्या रेल्वेची कहाणी




ऋतू कुठलाही असो पुणे-मुंबई रेल्वे प्रवास एका टप्प्यावर विलक्षण हवाहवासा वाटायला लागतो. तो टप्पा म्हणजे अर्थातच खंडाळ्याचा घाट. चिंता, काळज्या, गाडीतल्या गर्दीने आणलेला वैताग या सगळ्या गोष्टी काही काळापुरत्या विसरायला लावणारी झाडी, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या दऱ्या, उंच सुळके आणि या दृश्यावर तात्पुरता पडदा टाकणारे लहानमोठे बोगदे !! त्यातही पावसाळा असेल तर अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे धबधबे आणि डोंगरमाथ्यावर उतरलेले ढग प्रवास कमालीचा संस्मरणीय करतात. सोबत रूळांचा तालबद्ध आणि मोहक खडखडाट सुरेख पार्श्वसंगीत देत असतो.

परंतु अनेकदा डोळ्यांना मोहवणाऱ्या गोष्टींमागे हजारो हातांचे कष्ट – आणि काही वेळेला जीवांचे बलिदानही - असते. तब्बल दीडशे वर्षांपूर्वी पहाडाच्या छाताडावर उभे राहून हा रेल्वेमार्ग बांधणाऱ्या हातांना अभिवादन करणारी एक छोटीशी सुरेख कादंबरी मराठीत उपलब्ध आहे, तिचे नाव ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’. ही कादंबरी जेव्हा मी प्रदर्शनात पाहिली होती त्यापूर्वी मी तिचे नावही कधी ऐकले नव्हते. पण पुस्तक चाळून अंतर्मन जो काही कौल देते तो अनेकदा खरा ठरतो तसेच ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’चेही झाले. कादंबरीच्या माध्यमातून एक अपरिचित इतिहास जाणून घेता आला.

कादंबरीची मांडणी ऐतिहासिक तथ्यांच्या अवगुंठनात काल्पनिक पात्रे अशी आहे. यापूर्वी गंगाधर गाडगीळ यांच्या ‘प्रारंभ’ या कादंबरीत अशी मांडणी बघायला मिळाली होती. मुंबई शहराची जडणघडण, जगन्नाथ उपाख्य नाना शंकरशेट यांचा त्या जडणघडणीतला सिंहाचा वाटा या गोष्टी विषद करताना त्या कादंबरीत मध्यवर्ती पात्रे काल्पनिक ठेवली गेली होती. विशेष म्हणजे ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ मध्येही जगन्नाथ शंकरशेट आहेत ! याही कादंबरीची सुरुवात मुंबईमध्येच होते. कादंबरीचा नायक ‘नारायण’ हा एका त्या काळाला अनुरूप अशा कर्मठ ब्राह्मण कुटुंबातला मुलगा. वडील नाना शंकरशेट यांच्याकडे कामाला. त्यामुळे त्या अनुषंगाने शंकरशेट यांचाही जवळून परिचय होतो. मुलगा चांगला शिकावा म्हणून वडील त्याला शाळेत घालतात खरे, पण शाळेत जाता जाता त्याला वेगळाच नाद लागतो. देशात प्रथमच येऊ घातलेल्या ‘आगीच्या गाडी’चा – म्हणजेच रेल्वेचा !

हा काळ १८५०च्या आसपासचा. तेव्हा कुठून कुठून पोटापाण्यासाठी येणारी अठरापगड जाती-धर्माची माणसं मुंबईला घडवत होती. मुंबई उभी राहात होती, विस्तारत होती, ढवळून निघत होती. इंग्रजांनी मुंबईचे महत्व ओळखलेही होते आणि वाढवलेही होते. ते करत असलेल्या तांत्रिक, वास्तुशास्त्रीय, दळणवळणसंबंधी बदलांमध्ये एतद्देशीय लोक – इंग्रजांच्या परिभाषेत ‘नेटिव्ह’ - त्यांची इच्छा असो वा नसो, ओढले जातच होते. त्यातच येऊ घातली होती ती आगगाडी. बैल, घोडा वगैरे कुठलाही प्राणी न जोडताही शेकडो लोकांना वाहून नेणारी ही अजस्त्र वस्तू पाहून मुंबईकर अचंबित होऊ लागले होते. या सगळ्याचा प्रभाव नारायणवर पडल्याशिवाय कसा राहील ? रेल्वेच्या प्रेमात वेडा झालेला नारायण शाळा सोडून रेल्वे यार्डात घुटमळायला लागतो आणि त्याचे कुतूहल त्याला घेऊन जाते रेल्वे वर्कशॉपमध्ये. पण तिकडे सुतार, लोहार वगैरे त्याकाळी खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या माणसांसोबत काम केल्याचे लक्षात आल्यावर घरी एकच हलकल्लोळ माजतो. त्याचा ‘विटाळ’ दूर करण्यासाठी विहिरीच्या पाण्याने आंघोळ घालण्यापासून ते त्याची खरडपट्टी काढेपर्यंत अनेक गोष्टींना त्याला सामोरे जावे लागते. पण तरीही तो रेल्वेपासून दूर होणे दूरच, तो त्या सगळ्यात जास्तच गुंतत जातो. इथूनच सुरु होतो त्याचा अनोखा प्रवास ... निरनिराळ्या जातीच्या लोकांसोबत काम करणे, इंग्रजांच्या सोबत अल्पस्वल्प इंग्रजीतून धिटाईने संवाद साधत सगळी कौशल्ये आत्मसात करणे या गोष्टी करता करता अखेर एकदिवस रेल्वेच्या वेडापायी नारायण घरदार सोडून चक्क बोरघाटात डोंगर फोडून बोगदे करण्याच्या कामात सहभागी व्हायलाही निघून जातो. त्याचे कौटुंबिक आयुष्य ढवळून काढणारा हा प्रवास आपल्यासमोर दीडशे वर्षांपूर्वीची सामाजिक घुसळणसुद्धा फार सुरेख पद्धतीने उभी करत जातो.

काय आहे ही घुसळण ?

ही घुसळण आहे जातीश्रेष्ठतेच्या बुरसटलेल्या कल्पना आणि परिस्थितीमुळे नाईलाज झाल्यामुळे कराव्या लागलेल्या तडजोडी यांच्यामधली ... असं म्हणतात की रेल्वे ही भारतीय इतिहासातली बहुदा सर्वात मोठी सुधारक आहे. कारण वर्षानुवर्षे आपल्याच जातीला शिवाशिव, विटाळ वगैरे कल्पना उराशी धरून बसणाऱ्या लोकांना रेल्वेच्या प्रवासामुळे अत्यंत नाईलाजाने का होईना अन्य जातीच्या माणसांसोबत – अगदी त्यांना खेटून – प्रवास करणे भागच पडले.

ही घुसळण आहे परंपरागत चालत आलेली चाकोरी आणि नव्या क्षितीजांना घातली जाणारी साद यांच्यामधली.... घरातल्या पांढरपेशा, कर्मठ वातावरण हवे ते करण्याची मोकळीक देत नसताना नारायण एक बंडच करतो – आपल्या स्वप्नामागे धावताना कुटुंबाचे कायदेकानू मोडण्याचे ... हे बंड आजही अजिबात अप्रस्तुत वाटत नाही.

घाटाचे काम भयंकर अवघड होते. घाट दुर्गम, किर्रर्र जंगल आणि हिंस्त्र श्वापदे या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत खंडाळ्याच्या घाटात बोगदे खणण्याचे काम सुरु होते तेव्हा त्यात सहभागी होण्यासाठी नारायण घराबाहेर पडतो. त्यानंतरचा भाग अतिशय रोमहर्षक आहे. डोंगरफोडीचे प्रचंड काम, त्यात वादळवाऱ्याच्या रूपाने खोडा घालणारा निसर्ग, पाठोपाठ येणारे रोगराईचे थैमान, बळी पडलेले हजारो जीव, तरीही निष्ठेने काम करणारा मनुष्यप्राणी, या कामात नारायणाला येऊन मिळणारी त्याची सहधर्मचारिणी, पूर्वी सर्व जातीच्या मंडळींसोबत काम केल्याने आधीच बोथट झालेली जातीश्रेष्ठत्त्वाची भावना घाटाच्या कामात आल्यानंतर उरलीसुरलीदेखील गळून पडणे आणि अपरिमित कष्टांनंतर निसर्गाविरुद्धच्या लढ्यात अखेर मानवाच्या वाट्याला आलेले यश हा सगळा प्रवास अक्षरशः खिळवून ठेवतो.

या कादंबरीसाठी लेखिका शुभदा गोगटे यांनी रेल्वेचा बराच इतिहास अभ्यासला आहे, त्यासाठी वेगवेगळ्या गॅझेटियर्समधून, त्याकाळच्या नियतकालिकांचे अंक व अन्य ग्रंथांमधून संदर्भ मिळवले आहेत. त्यामुळे १८४५ सालच्या ‘ग्रेट इंडियन रेल्वे कंपनी’च्या स्थापनेपासून ते १८६३च्या बोरघाटमार्गाच्या उद्घाटनाच्या दिवसापर्यंत सगळे महत्वाचे टप्पे तारखांसहित मांडल्यामुळे ऐतिहासिक दृष्टीनेही ही कादंबरी महत्वाची आहे. त्याचबरोबर वर उल्लेखल्याप्रमाणे सामाजिक बदलदेखील नेमकेपणाने टिपल्यामुळे कादंबरीच्या वाचनीयतेत भरच पडली आहे. सर्वात शेवटी परिशिष्टवजा टिपण जोडले आहे, ज्यात बोरघाटमार्ग बांधला जात असतानाच्या तांत्रिक बाबींबद्दल, मार्गामध्ये वेळोवेळच्या सुधारणा या माहितीसोबतच इतर काही रेल्वेमार्गांच्या कामाबद्दल, रेल्वे भाड्याबद्द्ल रंजक माहिती देखील आहे. ज्ञान आणि मनोरंजन दोन्हीचा छानसा मिलाफ करत या छोट्याश्या कादंबरीतून एक अगदी वेगळा इतिहास समोर आणल्याबद्दल शुभदा गोगटे यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. या पुस्तकाच्या पानापानात एखाद्या चित्रपटाला आवश्यक सर्व ऐवज दडलेला आहे. एखाद्या दिवशी तिला न्याय देणारा भव्य चित्रपट येईल अशी मला मनोमन आशा आहे.

 

प्रकाशक: भारत बुक हाऊस

पृष्ठे : ४६६, किंमत : १५० रू,

आवृत्ती : दुसरी


ता.क : लेख लिहिल्यानंतर नेटवर धुंडाळत असताना कळले की या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. ती ‘विश्‍वकर्मा प्रकाशन’ यांनी प्रकाशित केली असून किंमत ३२० रू आहे.


--- प्रसाद फाटक

No comments:

Post a Comment