Total Pageviews

Saturday, September 15, 2018

'मुद्रणपर्व' : भाषा, कला आणि मुद्रणतंत्राच्या आकलनाचा प्रवास





२३ एप्रिल म्हणजे 'जागतिक पुस्तक दिन'. खरं म्हणजे जातीच्या वाचकाला पुस्तकदिनाच्या मुहूर्ताची वाट बघायची गरज नसते. पण यानिमित्ताने निरनिराळे उपक्रम हाती घेतले जातात, आपापल्या आवडत्या पुस्तकांच्या 'टॉप टेन' याद्या जाहीर केल्या जातात, पुस्तकांसोबतच वाचक, प्रकाशनव्यवहार, पुस्तकांची खरेदीविक्री याही विषयांवर मंथन घडून येतं, म्हणून या दिवसाचं वाचकांना कौतुक असतं. खरंतर 'पुस्तकदिन' या नावात फक्त 'पुस्तक' हा शब्द समाविष्ट असला तरी एकूण चर्चेच्या केंद्रस्थानी मात्र घटती/वाढती वाचनसंस्कृती, वाचनसवयी हाच विषय असतो. डोळ्यासमोर आलेलं वाचणं ही आज इतकी स्वाभाविक क्रिया बनली आहे की त्यामागे खूप मोठा इतिहास आहे हे आपल्या गावीही नसतं. मौखिक परंपरेमध्ये होणारं विचारांचं संक्रमण मर्यादित स्वरूपाचं होतं पण लिखाणाची कला विकसित झाल्यानंतर विचार स्थल आणि काल यांच्या मर्यादा ओलांडून जाऊ लागले. पुढे पंधराव्या शतकात गटेनबर्गमुळे छपाईचं तंत्र जगाला माहित झालं आणि त्याने भाषा आणि विचार यांच्या प्रसारात अक्षरशः क्रांती घडवून आणली. सुरुवातीला बायबलच्या छपाईमुळे धार्मिक विचारांचा प्रसार वेगाने झाला असला तरी प्रबोधनकाळात सुधारणावादी विचारांचा प्रसार वेगाने व्हायलाही मुद्रणच कारणीभूत ठरलं. आज आपण अगदी सहजपणे जी पुस्तकं वाचतो ती सगळी त्या क्रांतीचीच फळं आहेत, त्यामुळे पुस्तकदिनाच्या निमित्ताने मुद्रणतंत्र आणि मुद्रणकला या दोन्हींच्या उत्क्रांतीचा सखोल आढावा घेणाऱ्या 'मुद्रणपर्व' या पुस्तकाविषयी जाणून घेणं सयुक्तिक ठरेल.

व्यापक पट

पुस्तकाचं शीर्षक खरंतर त्याच्या व्याप्तीची कल्पना देत नाही. पुस्तकात केवळ मुद्रणाचा तांत्रिक इतिहास नाही, तर मुद्रणाच्या आधीच विकसित झालेल्या भाषा, लिपी, लिखाणाची माध्यमं अशा अनेक घटकांचा इतिहासही यात येतो. हा इतिहास म्हणजे खरंतर मनुष्याच्या आकलनात, अभिव्यक्तीच्या क्षमतेत झालेल्या उत्क्रांतीचे टप्पेच आहेत. मुद्रणतंत्रामुळे झालेल्या क्रांतीबद्दल सांगण्यापूर्वी मनुष्याला असणारी भाषेची गरज, भाषांच्या विकासातले टप्पे, चिन्हं-खुणा-प्रतीकं यांचा लिपीच्या माध्यमातून होत गेलेला विकास आणि पुढे अक्षरांच्या मुद्रणात झालेले प्रयोग या सर्व गोष्टींचा उहापोह पुस्तकामध्ये आहे. आपले विचार जसेच्या तसे दुसऱ्यापर्यंत पोचवणं शक्य नसतं, म्हणून त्यासाठी भाषेचा आधार घेतला जातो. हा अमूर्ततेकडून मूर्ततेकडे जाणारा प्रवास असतो. ही भाषा ध्वनिरूपात तसंच चिन्हरूपात असू शकते. मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांना इशारे देण्यासाठी, खाणाखुणा हा संवादाचा आद्य टप्पा होता. त्यानंतरच्या काळात आदिमानवाने गुहांमध्ये काढलेली चिन्हं, चित्रं म्हणजे विचारांच्या अभिव्यक्तीचा अधिक ठोस आणि म्हणूनच टिकाऊ फॉर्म. आज आपण ज्यांना अक्षरं/लिपी म्हणून ओळखतो ती अशा चिन्हांचीच शब्दांशी सांगड घालून केलेली नियमबद्ध मांडणी आहे. ताम्रपट, भूर्जपत्र, शिलालेख यांच्यावर होणाऱ्या लिखाणामुळे अक्षराला प्राप्त होणाऱ्या वळणांपासून ते छपाईमधल्या बदलांमुळे निर्माण झालेली अक्षरवळणं (Fonts) आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिमा या सगळ्याबद्दल पुस्तकात विस्ताराने चर्चा केली गेलेली आहे.

पुस्तकाचे दोन विभाग आहेत. पहिला म्हणजे 'भाषा' ज्यात वर उल्लेखल्या भाषेच्या उत्पत्तीपासून ते मुद्रणपर्वातलं भाषेचं प्रकटन आणि सादरीकरण यासंबंधी विवेचन आहे. दुसरा विभाग आहे 'चित्रं'. मुद्रणाच्या तंत्रातल्या प्रगतीमुळे लिपीसोबतच चित्रांचं मुद्रण कसं विकसित होत गेलं हे या विभागात सांगितलं आहे. पाश्चात्य जगातील रेनेसान्सपूर्व आणि त्यानंतरच्याही काळातल्या अनेक उत्तम चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रांमधले बारकावे, सांस्कृतिक संदर्भ उलगडून सांगितले आहेत. जाहिरात क्षेत्रातलं चित्रकलेचं योगदान देखील या विभागात अधोरेखित केलं गेलं आहे. अभिजात चित्रकलेसोबतच आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रं, शि. द. फडणीस यांची हास्यचित्रं यांच्यावरही या विभागात प्रकाश टाकला आहे.

भारतीयांच्या योगदानाची दखल

भाषेच्या उत्क्रांतीचा अभ्यास, भाषेला नियमबद्ध करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न यामध्ये पाश्चात्यांचे योगदान मोठं आहे आणि त्याबद्दल पुस्तकात विस्ताराने लिहिलं गेलं आहेच पण आवर्जून उल्लेख करायला हवा तो या पुस्तकात विस्ताराने आलेल्या भारतीय योगदानाचा. पाणिनीची व्याकरणसूत्रं आणि त्यांचा संगणकभाषेच्या रचनेत झालेला उपयोग, अ. ब. वालावलकर आणि ल. श्री. वाकणकर यांनी भाषेच्या संदर्भात केलेले संशोधन आणि वेदकाळातही असणाऱ्या लेखनकलेच्या अस्तित्वाचे दिलेले पुरावे याबद्दल इथे कळतं. वाकणकर यांनी तर 'गणेशविद्या' या ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय लेखनकलेचा मूलाधार असणाऱ्या माहेश्वरी सूत्राच्या शास्त्रशुद्धतेचं विवेचन केलं. आज संगणकातही मजकुराची जुळणी करण्यासाठी ही प्राचीन नियमावली अतिशय उपयुक्त आहे. वालावलकर आणि वाकणकर यांनी गणेशविद्येचं रहस्यच शोधून काढलं असं नाही तर त्याचं संगणकावर उपयोजन करून भारतीय आणि आशियाई भाषांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातही आणलं. १८६०च्या सुमारास स्थापन झालेल्या ‘निर्णयसागर प्रेस’चे संस्थापक जावजी दादाजी चौधरी यांनी घडवलेल्या टाईप्सचा (मुद्राक्षरांचा) आणि अक्षरवळणांचा भारतीय मुद्रणविश्वावर अमीट ठसा उमटला. अलीकडच्या काळात र. कृ. जोशी हे एक प्रतिभावान कलावंत, संशोधक आणि उपयोजक होते. त्यांनी जाहिरातक्षेत्र, सुलेखन, संगणकावरच्या भाषांची अक्षरवळणं यात विलक्षण प्रयोग केले. जाहिरात क्षेत्रात असलेल्या मराठी भाषेबद्दलच्या उदासीनतेच्या काळात जाहिरात अन्य भाषेतून मराठीत भाषांतरित न करता ती मुळातूनच मराठीत असावी यासाठी आग्रह धरला. त्यांनी केलेल्या मराठीत केलेल्या जाहिरातींची मध्यवर्ती कल्पना अन्य भारतीय भाषांमध्येही गेली. पुस्तकात या कर्तृत्ववान मराठी व्यक्तींवर स्वतंत्र प्रकरणं आहेत, ती वाचताना अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.



पुस्तकाच्या उत्तरार्धात उत्पादनं, नाटकं, चित्रपट यांच्या जाहिरातींसाठी वापरल्या गेलेल्या मुद्रणतंत्राचाही आढावा घेण्यात आला आहे. कमल शेडगे यांची जाहिरातक्षेत्रातली कामगिरी तसंच षांताराम पवार, वसंत सरवटे, शि.द. फडणीस यांनी पुस्तकांच्या मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीत केलेले प्रयोग यांच्याबद्दलचे तपशील कळतात. राजा रवीवर्मा यांची चित्रं ही राजेराजवाड्यांच्या दालनांपुरती मर्यादित न राहता जनसामान्यांच्या घरात कशी पोहचली ती केवळ मुद्रणातल्या नवंनव्या तंत्रामुळे. मुद्रणाचे कलेच्या प्रसारात केवढे प्रचंड योगदान आहे याची हे वाचताना जाणीव होते.

उत्तम मांडणी

'मुद्रणपर्व' या पुस्तकाची मांडणी करताना मजकुराला पूरक ठरणाऱ्या प्रतिमांना महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे. मुळात मुद्रणकला वाचकावर दृश्य परिणाम विचारात घेऊन विकसित झालेली कला आहे, त्यामुळे मुद्रणाशी संबंधित संकल्पना, अक्षरवळणं यांचं स्पष्टपणे आकलन व्हावं यासाठी या पुस्तकात भरपूर आकृत्या, रेखाटनं आणि छायाचित्रं दिली गेली आहेत. त्यामुळे विषय कळायला मदत होते. लेखक दीपक घारे हे स्वतः ‘जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट्स’मध्ये शिकलेले असून जे.जे.च्याच आवारात असणाऱ्या ‘शासकीय मुद्रण तंत्र संस्थे’त त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे. त्यामुळे कलेमागचा विचार, कलांचा विकास, कलांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यासोबतच कलेची तंत्राशी सांगड घालणारं मुद्रणक्षेत्र या सर्वांचा त्यांचा जवळून परिचय आहे. त्यामुळेच या पुस्तकाचा आशय अतिशय समृद्ध आहे. मुद्रणाचा इतिहास सांगतानाच संगणकक्रांती, त्यामुळे लिप्यांचं छापखाना ते संगणक असं होणारं माध्यमांतर, संगणकीकरणाचे मुद्रणक्षेत्रावर होणारे परिणाम अशा गोष्टींचंही पुस्तक लिहिताना भान राखलं गेलं आहे. म्हणूनच पुस्तकाच्या शेवटी लेखक लिहितो “मुद्रणपर्वाने जसा प्राचीन मुद्रणपद्धतींचा उपयोग करून घेतला तसाच मुद्रणपर्वातील मुद्राक्षररचनेचा डिजिटल तंत्रज्ञानाने उपयोग करून घेतला. कागद जाऊन संगणकाचा पडदा आला पण अक्षर मांडणीतलं आणि चित्रांमधलं सौंदर्यतत्व तेच राहिलं. मुद्रणयुगात लिखित भाषेला महत्व होतं, आज दृश्य प्रतिमांना अधिक महत्व आहे. म्हणूनच, रेने देकार्तचं प्रसिद्ध वचन थोडं बदलून असं म्हणावंसं वाटतं, “I see, therefore I am”.

प्रचंड अभ्यास, त्यावर केलेलं सखोल चिंतन, जटिल संकल्पना मोजक्या शब्दांमध्ये, मुद्देसूदपणे आणि ससंदर्भ मांडण्याची हातोटी यामुळे हे पुस्तक एक बौद्धिक मेजवानी ठरतं एवढं निश्चित. या पुस्तकदिनाच्या निमित्ताने छापील पुस्तकांचा कणा असणाऱ्या मुद्रणकलेचा उहापोह करणारं पुस्तक आपण अवश्य वाचायला हवं.



लेखक : दीपक घारे
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या : २३६
आवृत्ती : पहिली (जानेवारी २०१६)
किंमत : ३०० रु.





- प्रसाद फाटक

No comments:

Post a Comment