रविवारची प्रसन्न सकाळ. तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासाच्या वेल्हे येथील मुलांच्या वसतिगृहाच्या परिसरात लगबग सुरू होती... आयोजक मंडळी माइक, खुर्च्या, स्टेज व्यवस्थेपासून ते न्याहारीच्या तयारीपर्यंत व्यवस्था लावण्यात मग्न... वसतिगृहापाठीमागेच धीर देत उभा असलेला खंबीर तोरणा किल्ला ! पुणे, सातारा, बारामती वगैरे ठिकाणाहून आलेले हितचिंतक, कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबीय यांचे स्वागत करण्यासाठी मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी फेटा बांधलेली आणि सुरवार-कुडता घातलेली शाळकरी मुले स्वागतासाठी सज्ज होती. निमित्त होते ते न्यासातर्फे बांधण्यात येत असलेल्या ग्रामविकासोन्मुख नूतन वास्तूचे भूमिपूजन.
अत्यंत उत्साहात सुरु झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशींच्या हस्ते भूमिपूजन, नंतर प्रास्ताविक व प्रसंगानुरूप वैयक्तिक पद्य सादर झाले व त्यानंतर भैयाजींचे 'सेवाकार्य' या अनुषंगाने छोटेखानी भाषण झाले. ‘प्रत्येक वेळेस सरकारी मदतीची अपेक्षा धरून निष्क्रिय बसण्यापेक्षा स्वतःहून पुढे होऊन कामाला लागणे कसे आवश्यक आहे’ हे त्यातले मुख्य सूत्र होते. “समाजाच्या उत्थानासाठी कार्य करायचे हा ध्यास घेऊन अनेक संघ स्वयंसेवक उभे राहिले. स्वयंवसेवकांचे गोत्र असते ते ‘डॉ हेडगेवार’ ! या गोत्रातील मंडळी जेव्हा सामाजिक कार्यात उतरतात तेव्हा ‘डॉ हेडगेवार’ या नावासोबत येणारी प्रतिष्ठा त्या संस्थेस प्राप्त होत असते. त्यामुळे दोन जबाबदाऱ्या येतात. एक म्हणजे समाजाचा विश्वास संपादन करणे आणि दुसरी म्हणजे समाजाची गरज लक्षात घेऊन काम करणे. उपेक्षित जीवन जगणारा भटका-विमुक्त वर्ग, दुर्गम भागात राहणारा वनवासी वर्ग आणि अपमानित जीवन जगणारा दलित वर्ग या सर्वांच्या उन्नतीचा विचार आपण करत नाही तोपर्यंत आपल्या मातृभूमीला परमवैभव प्राप्त होऊ शकत नाही" असे प्रतिपादन त्यांनी केले.
न्यासाचे वेल्ह्यातील काम तीस वर्षे जुने आहे पुण्यापासून अवघ्या ५० कि.मी. अंतरावर असणाऱ्या गावी मूलभूत सोयीसुविधांची वानवा होती. परंतु भैयाजींनी भाषणात म्हटल्याप्रमाणे फक्त सरकारी मदतीची वाट पाहत न बसता १९८६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांच्यातील विचारमंथनातून शिक्षण व स्वावलंबन या गोष्टी प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून 'तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासा'ची स्थापना झाली. तोरणा, राजगडाच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या गावांमध्ये चौथी किंवा जेमतेम सातवीपर्यंत शाळा. त्यामुळे त्यापुढे जाऊन मुले शिकत नसत. मग त्यांच्यासाठी वसतिगृह उभारण्याची योजना झाली (वेल्हे गाव तालुक्याचे असल्याने इथल्या जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती त्यातल्या त्यात चांगली आहे. शिवाय आता विद्या प्रतिष्ठानची बारावी पर्यंतची शाळादेखील आहे). मग गावांमध्ये जाऊन वसतिगृहाविषयी माहिती देऊन गावकऱ्यांना आपल्या मुलांना पाठवण्यासाठी राजी करण्याचे कठीण काम येथील कार्यकर्त्यांना करावे लागले. या सगळ्यामागे वसतिगृहाचे व्यवस्थापक श्री. रमेश आंबेकर यांचे विलक्षण कष्ट आणि समर्पण यांचा महत्वाचा वाटा आहे. रमेशजी मूळचे खेड तालुक्याचे. संघप्रचारक म्हणून काही काळ काम केल्याने वैचारिक बैठक पक्की. चारचौघांप्रमाणे नोकरी न करता त्यांनी स्वतःहून वसतिगृहाच्या कामाची जबाबदारी स्वीकारली आणि कुटुंबासह या गावी येऊन पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागले. मुलांकडून कुठलेही शुल्क आकारले न जाणारे हे वसतिगृह त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आज अतिशय व्यवस्थित चाललेले आहे एवढेच नाही तर इथले सत्कार्य वर्धिष्णू आहे.
कार्यक्रमाच्या वेळी दाखवलेल्या ध्वनिचित्रफितीमुळे न्यासाच्या कामाबद्दल अनेक चांगल्या गोष्टी कळल्या. न्यासाच्या पुढाकारातून या भागात आज बचतगट सुरु झाले आहेत. संपूर्ण पावसाळ्यात तुफान पाऊस कोसळत असूनही उन्हाळ्याचे चार महिने इथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असायचे त्यावर तोडगा म्हणून जलसंधारणाची कामे सुरु झाली आहेत. तोरणा-राजगड या स्वराज्याच्या मानबिंदूंची होणारी हेळसांड थांबवणे तसेच इथले गैरप्रकार रोखणे यासाठी दुर्गसंवर्धन समिती स्थापन झाली आहे. वसतिगृहातून शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांना पदवीपर्यंत शिक्षणासाठी मदतही केली गेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेता घेता त्या त्या गावी विद्यार्थी विस्तारक म्हणूनही काम केले, एवढेच नाही तर एक मुलगा शिक्षण संपल्यानंतर घरची परिस्थिती कठीण असूनही संघाचा प्रचारकही निघाला. त्यानंतर माहिती दाखवली गेली ती न्यासाच्या पुढाकाराने व कॉग्निझंट कंपनीच्या मदतीने सुरु झालेल्या भट्टी, केळद, पासली, कुंबळे इत्यादी दुर्गम गावांमधील विद्यार्थिनींसाठीच्या कॅबसेवेबद्दल. ते पाहिले आणि अतिशय आनंद झाला. मन आपोआप सहा-सात वर्षांमागे गेले आणि या कामासाठीच्या सर्वेक्षणात मीही सहभागी होतो त्यावेळच्या आठवणी ताज्या झाल्या.
माझा मित्र भूपेश महाले या वसतिगृहावर येऊन मुलांचा नियमितपणे अभ्यास घ्यायचा. वसतिगृहामुळे दुर्गम भागातल्या मुलांच्या शिक्षणाला चालना मिळाली असली तरी त्याच गावच्या मुलींच्या शिक्षणात तेच अडथळे होते. त्यामुळे त्यांच्यासाठी एखादी कॅब/बस सुरु केली तर त्या शाळेपर्यंत जातील तरी, अशा कल्पना त्याला सुचली. त्यासाठी कुठल्या गावी किती मुली आहेत, शिकणाऱ्या किती, कुणाच्या पालकांची मुलींना पाठवायची इच्छा आहे याचे आम्ही सर्वेक्षण केले होते व GPS वापरून कॅबसाठी अंतरासहित नकाशा तयार केला होता. रमेशजींचा सर्व गावांमध्ये दांडगा संपर्क. ज्या क्षणी तेच या कामात लक्ष घालत आहेत असे घरोघरच्या मंडळींना कळायचे तेव्हा त्यांच्या - विशेषतः स्त्रियांच्या - चेहऱ्यावर क्षणार्धात जे समाधान आणि विश्वास दिसायचे ते मी आजही विसरू शकत नाही. त्यावर्षी ती योजना काही सुरु होऊ शकली नव्हती. आज ती कॅबसेवा सुरु असल्याचे पाहून खूप आनंद होत होता.
इथे उल्लेख केलेल्या मंडळींशिवाय अनेकांचे हात या कार्याला लागलेले आहेत. त्या सर्वांची नावे विस्तारभयास्तव देणे शक्य नाही पण संघ प्रेरणेतून किती उत्तम कार्य उभे राहू शकते हे बघून भारावल्यासारखे होत होते. आता या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून इथे दुसरी इमारत उभी राहत आहे. विविध प्रकारच्या शिक्षणाचे केंद्र इथे सुरु करण्याची योजना आहे. वेल्डिंग, फिटिंग, इलेक्ट्रिशियन इ. चे ITI च्या धर्तीवरील प्रशिक्षण, याभागात मुबलकपणे उपलब्ध असलेल्या बांबू, हिरडा व अन्य वनस्पतींपासून उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. त्याचसोबत एका अनोख्या विषयाला हात घालण्यात येणार आहे. इथली अनेक गावे शिवाजी महाराजांनी वसवली आहेत, त्यामुळे त्याकाळात इथे पाण्याची चांगली व्यवस्था लावून दिलेली असल्याचे काही पुरावे अलीकडे सापडत आहेत. या नव्या केंद्राच्या माध्यमातून त्यविषयीही सखोल अभ्यास करण्याचा मानस आहे. साहजिकच अपेक्षा आहे ती आर्थिक व अन्य स्वरूपातील मदतीची. त्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत न्यासाच्या कार्याची महती पोहोचावी यासाठीच भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर लोकांना आमंत्रण दिले गेले होते आणि त्याला अनेक हितचिंतकांनी उपस्थित राहून प्रतिसादही चांगला दिला. फक्त खंत याचीच वाटते की त्या गर्दीत तरुणांचे प्रमाण ज्येष्ठ नागरिकांपेक्षा खूप कमी होते.
या लेखाच्या निमित्ताने वाचकांना पुन्हा एकदा आवाहन आहे की नवीन इमारतीच्या उभारणीसाठी अधिकाधिक मदत करावी. याशिवाय वसतिगृहावरील विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी सोडवण्यासाठी महिन्यातील काही दिवस आपण नक्की देऊ शकतो.
जाता जाता एका सुंदर पद्यातल्या चार ओळी उद्धृत कराव्याश्या वाटत आहेत -
कोटि आँखो से निरंतर आज आसू बह रहे हैं |
आज अनगिन बंधू दुःसह यातनाएं सह रहे हैं |
दुख हरे सुख दे सभी को एक यह आचार है |
शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है ||
कोटि आँखो से निरंतर आज आसू बह रहे हैं |
आज अनगिन बंधू दुःसह यातनाएं सह रहे हैं |
दुख हरे सुख दे सभी को एक यह आचार है |
शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है ||
अधिक माहितीसाठी संपर्क
अध्यक्ष : उमेश देशपांडे - ९८२२०८०२१४
सचिव : मंदार अत्रे - ९४२२००८०६८
सहसचिव : रमेश आंबेकर - ९४२१०५१८२२
सचिव : मंदार अत्रे - ९४२२००८०६८
सहसचिव : रमेश आंबेकर - ९४२१०५१८२२
No comments:
Post a Comment