(हा या ठिकाणी लेख ऑडिओ स्वरूपातही ऐकता येईल : https://soundcloud.com/user-978011594/audio-book-review)
नुकताच विशाल भारद्वाजचा 'रंगून' हा चित्रपट येऊन गेला. त्याची परीक्षणं उत्साहवर्धक नसली तरीही मला तो बघायची खूप इच्छा होती.... कारण रंगून आणि ब्रह्मदेशाबद्दल माझ्यामनात खूप कुतूहल आहे. 'मेरे पिया गये रंगून' सारखं गाणं ऐकायचो तेव्हा मला कायम प्रश्न पडायचा की भारतातली सगळी शहरं सोडून यात लांबचं कुठलंतरी रंगून कुठून आलंय? पुढे सिनेनटी हेलनही मूळची तिथलीच असल्याचं कळलं होतं. एकीकडे हे चित्रपटविषयक संदर्भ आणि दुसरीकडे आझाद हिंद सेनेने त्या आघाडीवर केलेला निकराचा संग्राम, त्या देशाचं नाव या गोष्टीही आपल्या इतिहासाशी आणि पुराणांशी नातं सांगाणाऱ्या, त्यामुळे इतक्या दूरच्या असणाऱ्या प्रदेशाशी भारताचं नक्की नातं काय असा प्रश्न नेहमी पडायचा. हा चित्रपट म्हणजे रंगूनचा इत्यंभूत इतिहास नाही हे माहित असले तरी निदान काही ना काही पदरात पडेल अशी अपेक्षा होती.. दुर्दैवाने चित्रपट बघायचा योग आला नाही. पण तो थिएटरमधून उतरल्यानंतर काही दिवसातच हे पुस्तक नजरेस पडले आणि आधीच कुतूहल असलेल्या प्रदेशाबद्दल आणखी काही वाचायला मिळतंय या आनंदात मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि या पुस्तकाने रंगूनच्या भूगोलासोबतच अल्पस्वल्प सांगतानाच इतिहासातल्या अत्यंत थरारक काळाचा अगदी जवळून परिचय करून दिला !
पुस्तक वाचताना लक्षात आले ते म्हणजे भारताच्या विविध भागांतून आलेल्या भारतीयांची ब्रह्मदेशात रंगूनसारख्या शहरापासून ते अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत सर्वत्र वस्ती होती. ब्रिटिशांनी तिथे उभ्या केलेल्या नानाविध उद्योगांमध्ये सहभाग असणारे अनेक भारतीय नोकरदार, कामगार तसेच व्यापारी यांनी ब्रह्मदेशात आपले बस्तान बसवले होते. लेखक रमेश बेनेगल हे अगदी जन्मापासून तिथलेच. वयाच्या चौदा पंधरा वर्षांपर्यंतचं आयुष्य चारचौघांसारखंच गेलं असलं तरी १९३९ पासून मात्र त्यावर दुसऱ्या महायुद्धाचं सावट पसरू लागलं. जपानी वायुदलाचे हल्ले कुठल्याही क्षणी व्हायच्या शक्यतेने प्रत्येक दिवस अनिश्चिततेचा ठरू लागला. वेळी-अवेळी वाजणाऱ्या भोंग्यांमुळे हातातलं काम टाकून जीव वाचवण्यासाठी तळघरात लपून बसण्याची वेळ सामान्य जनतेवर येऊ लागली. युद्धाचे ढग विरळ होण्याऐवजी दिवसेंदिवस गडदच होत चालल्याने तिथल्या काही भारतीयांनी आपली सगळी मालमत्ता तशीच ठेवून भारताकडे परतायला सुरुवात केली. पण बेनेगल यांच्या कुटुंबाने हा निर्णय घेण्याची घाई केली नाही आणि त्यामुळे त्यांचं सगळं भवितव्यच बदलून गेलं. १९४१ साली पर्ल हार्बरवर हल्ला झाला आणि जीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता पूर्ण मावळली कारण आता अमेरिकेने युद्धात उडी घेतली होती आणि जपानने त्यांना उत्तर देण्यासाठी अजूनच चवताळून जाऊन दोस्त राष्ट्रांच्या ताब्यातल्या भूभागावर हल्ले चढवायला सुरुवात केली. ब्रह्मदेश ब्रिटिशांच्या अंमलाखाली असल्याने तिथला धोका अजूनच वाढला. निर्वासितांचे लोंढे भारताकडे निघू लागले... जमीन, जल, वायू वगैरे मिळेल त्या मार्गाचा अवलंब करू लागले. रमेश बेनेगल यांची आई या धुमश्चक्रीतून बाहेर पडू शकली पण स्वतः रमेश आणि त्यांचे बंधू मात्र ब्रिटिश सैन्याच्या सेवेत असलेल्या काकांसोबतच ब्रह्मदेशातच अडकून पडले. पाहता पाहता जपानी फौजांनी रंगून ताब्यात घेतले आणि परिस्थिती अजूनच बिकट बनली.
पण अनेकदा असं होतं की संकटच संधी घेऊन येत असतं.
सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेणे जपानशी हातमिळवणी केलेली असल्यामुळे जपानणे ताब्यात घेतलेल्या रंगूनमध्ये आझाद हिद सेनेचा दबदबाही वाढू लागला. वय लहान असल्यामुळे प्रत्यक्ष आझाद हिंद सेनेत सहभागी होणे शक्य नसले तरी त्या सेनेला मदत करणारी भारतीय नागरिकांची तुकडी बनवली गेली त्यात बेनेगल यांनी प्रवेश मिळवला. तिथून पुढे ते आझाद हिंद सेनेच्या प्रचार पथकात सामील झाले. योग्य ठिकाणी योग्य वेळेस असले की नशीब कसे उजळते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बेनेगल यांच्या आयुष्यातल्या पुढच्या काही घडामोडी. प्रचार पथकात काहीच काम नसलेल्या बेनेगल यांनी अन्य काही कामासाठी वरिष्ठांकडे विचारणा केली. याच सुमारास काही कॅडेट्सना जपान मध्ये लष्करी प्रशिक्षणासाठी पाठवण्याची योजना खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस करत होते. बेनेगल यांची या लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली. खुद्द नेताजींशी भेट होण्याचं परमभाग्य बेनेगल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लाभलं. जपानकडे जाण्यासाठी त्या निवडक कॅडेट्सची कूच केले आणि सुरुवात झाली एका अत्यंत थरारक, जीवघेण्या, शारीरिक-मानसिक-भावनिक सर्व प्रकारची परीक्षा पाहणाऱ्या एक खूप लांबच्या प्रवासाची. हा प्रवास पुढची चार वर्षं अविरत चालणार होता. यामध्ये काय नव्हतं ? कुप्रसिद्ध ‘डेथ-रेल’ मधून केलेला भयंकर प्रवास होता, शत्रूच्या विमानांनी ऐन समुद्रात बेचिराख केलेल्या जहाजावरून समुद्रात घेतलेली उडी होती, अत्यंत खडतर लष्करी प्रशिक्षण होते, ४-४ दिवस भुकेलं राहणं होतं, कैद होती, अंधारकोठडी होती, अधनंमधनं सुखाचे चार दिवसही होते, पुन्हा नैराश्याचा अंधार होता आणि या सर्वांनां व्यापून वर उरणारं, घोंघावतं दुसरं महायुद्ध होतं. कुणाचं नशीब कशामुळे बदलेल हे सांगता येत नाही. हिरोशिमा-नागासाकीवरच्या ज्या बॉम्बफेकीमुळे जपानच्या पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त झाल्या, त्या घटनेमुळेच बेनेगल यांचे आयुष्य हळूहळू पण निश्चितपणे स्थैर्याकडे वाटचाल करू लागले.
पुस्तक तसे छोटेखानीच असल्यामुळे त्यात एकापाठोपाठ एक एवढ्या घटना आदळत राहतात की पुस्तक वाचताना अजिबात उसंत मिळत नाही. इतक्या स्तिमित करणाऱ्या घटनाक्रमातून जाणाऱ्या रमेश बेनेगल यांना मृत्युंजय सिद्धी प्राप्त होती का काय, असाच प्रश्न मला पडला. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मी उपसंहार वाचला. बेनेगल यांनी पुढे भारतीय वायुदलात सहभागी होऊन १९७१ पर्यंत आणखी मोठी कामगिरी केली. अगदी पाकिस्तानच्या भूमीवर घिरट्या घालून टेहळणी करण्याचे अग्निदिव्यही पार पाडले !! काहीवेळा एखादी व्यक्ती ‘Chosen One’ असते असाच विश्वास वाटायला लागतो. अण्णा हजारेंनी एक आठवण सांगितली होती की त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असताना त्यांनी विवेकानंदांचे पुस्तक वाचले आणि त्यांच्या मनाने पुन्हा उभारी घेतली. ते म्हणतात “ज्या अर्थी गोळ्यांच्या फैरींधून आणि युद्धाच्या धुमश्चक्रीतून मी वाचलो होतो त्या अर्थी माझ्याकडून अजून काहीतरी चांगले काम करवून घ्यायचे देवाच्या मनात असावे” आणि त्यातूनच त्यांना पुढे समाजकार्याची प्रेरणा मिळाली. दुसऱ्या महायुद्धाच्या जीवघेण्या धुमश्चक्रीतही रमेश बेनेगल यांचे तारू पैलतीरी लावण्यामागे नियतीचीही अशीच इच्छा असावी.
संध्या देवरुखकर यांनी पुस्तकाचा अनुवाद अतिशय चांगला केला आहे. कुठेही वाक्यरचना खटकत नाही आणि कृत्रिमताही जाणवत नाही . पुस्तकात फक्त एकच उणीव आहे तीम्हणजे यातले नकाशे. आपल्याला ज्या प्रदेशाची अजिबात माहिती नाही तिथले नकाशे इथे अतिशय छोट्या आकाराचे आणि अस्पष्ट असल्यामुळे अधिक जाणून घेताना अडचण येते आणि रसभंग होतो.
हा एकमेव दोष बाजूला ठेवला तर हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत रोमांच आणि साहस यांनी भरलेले आहे. शिवाय या पुस्तकामधून अनेक इंटरेस्टिंग ‘ट्रीव्हिआ’ कळतात. उदा. घनदाट जंगलातल्या ज्या ‘डेथ-रेल’ मधून बेनेगल यांनी अत्यंत खडतर प्रवास केला ती रेल्वे म्हणजे साधीसुधी रेल्वे नसून ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय’ या जगप्रसिद्ध चित्रपटातील रेल्वे होती, वरिष्ठांचे आदेश न जुमानता संकटात सापडलेल्या रंगून मधल्या भारतीय नागरिकांना भारतात सुखरूपपणे घेऊन येणारा तरुण वैमानिक म्हणजे पुढे ओरिसाचे मुख्यमंत्री बनलेले ‘बिजू पटनाईक’ होते वगैरे बरेच काही...
इतिहासातल्या एका अतिशय अल्पपरिचित पानावर प्रकाश टाकणारे आणि एकदा हातात घेतले की खाली ठेववणार नाही असे हे पुस्तक अजिबात चुकवू नका.
पुस्तकाचे नाव : आझाद हिंद सेनेसमवेत ब्रह्मदेश ते जपान
थरारक युद्ध स्मृती १९४१-१९४५
लेखक : एअर कमांडर रमेश बेनेगल
अनुवादक : संध्या देवरुखकर
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन
पृष्ठसंख्या: १५२
किंमत : १५०
हे पुस्तक ई-बुक स्वरूपात देखील उपलब्ध असून त्याची किंमत अवघी ३० रु. आहे. ई-बुकसाठी या लिंकवर क्लिक करावे :
http://www.bookhungama.com/index.php/aajhad-hind-senesamavet-brahamadesh-te-japan.html
- प्रसाद फाटक
mahamtb.com वर पूर्वप्रकाशित :
http://mahamtb.com//Encyc/2017/4/29/Bramhdesh-te-japan-thararak-yudha-smruti-book-review-by-prasad-phatak-.html
No comments:
Post a Comment