Total Pageviews

Saturday, September 15, 2018

अंधु जाहला दीपस्तंभु




आयुष्यात शैशव ते वार्धक्य असे विविध टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यात माणूस वेगवेगळे अनुभव घेत असतो. त्या त्या टप्प्यातल्या त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याचे अनुभवांचे आकलन वेगवेगळे असते. आकलन होत असताना त्याच्या मनात होणारी प्रत्येक नोंद त्याच्या अनुभवांची वही भरत जात असते. ही नोंद करण्यासाठी आपले सर्व अवयव, पंचेंद्रिये हे सर्वतोपरी प्रयत्न करत असतात.... ती जणू आपल्या अनुभव लेखनाची साधनेच असतात. जसजशी ही वही भरत जाते तसतसे तिला संदर्भ ग्रंथाचे स्वरूप येत जाते. मनुष्याच्या पुढच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्या आधीच्या अनेक नोंदींचे संदर्भ शोधले जात असतात. घटना घडत असतानाची मानसिक अवस्था आणि अनुभवांचे संदर्भ यांची सांगड घालून मनुष्य कृती करतो. दुर्दैवाने मनुष्याच्या जीवनक्रमात कधीकधी अशी भयंकर घटना घडते की नोंद वहीत नोंद करण्याचे त्याचे एखादे साधनच निकामी होऊन जाते. एखादा अपघात, आजार यामध्ये माणसाला काहीतरी गमवावे लागते. त्यामुळे नोंद घेण्याच्या प्रक्रियेमध्ये असंख्य अडचणी उभ्या राहतात. साहजिकच भविष्यात आपल्या अनुभवांच्या नोंदी अस्पष्ट असण्याची शक्यता असते. ज्याचा आपल्या पुढच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. “रडायचं की लढायचं ?” या प्रश्नाला “लढायचं” असं उत्तर देऊन जोमाने कामाला लागणारे लोक आपल्या अनंत अडचणींवर मात करून एवढं मोठं काम करून जातात की धडधाकट माणसांसाठीही ते पथदर्शी ठरतात. ह. भ. प. गणपत महाराज हे अशाच एका दीपगृहाचे नाव. ‘भगवंताचे नामस्मरण आणि अपमानाचे विस्मरण’ हे त्यांच्या आयुष्याचे सार. ते वाचायला सोपं असलं तरी जगायला अशक्यप्राय. जनार्दनासोबतच जनता जनार्दनाच्या सेवेचे व्रत हाती घेणाऱ्या या सुधारक संताची माहिती सर्वांनी जाणून घ्यायलाच हवी.


खडतर बालपण


गणपतचं बालपण विलक्षण कष्टमय होतं. ‘अन्नान्न दशा’ होणं म्हणजे काय हे त्यांच्या लहानपणीच्या आयुष्याकडे पाहिल्यावर कळून चुकतं. गणपतच्या घरी विलक्षण गरिबी. खरं म्हणजे त्यांच्या कुटुंबाची परंपरागत दीडशे एकर विस्तीर्ण शेती, शिवाय गोधनही भरपूर होतं. पण त्याचे वडील देवराम डोक्याने अर्धवट, त्यांना व्यवहार ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन गणपतच्या काकाने आणि खुद्द आजोबांनीही सगळी शेती. हडप केली. देवराम आणि त्याची बायको पुंजा यांना भावाने अक्षरशः नागवलं. त्यांना शेतात मजुरासारखं राबराब राबवून घ्यायचं आणि त्याबदल्यात काहीतरी मूठभर धान्य द्यायचं, अशा प्रकारामुळे गणपतच्या घरी लक्ष्मी कधी फिरकलीच नाही. गणपत आणि त्याची भावंडं यांना त्यांच्या आजारपणातही घरी ठेऊन पुंजाला शेतात जावं लागायचं. तशात गणपतला देवी झाल्या त्याचे उपचार करायला पैसे असणं तर दूरच पण त्याच्याकडे बघायला वेळ देणंही पुंजाला शक्य व्हायचं नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. डोळयांना फोड येऊन गणपतची दृष्टी गेली. “कुठल्या जन्माचे भोग भोगतो आहेस, त्यापेक्षा मारून गेला असतास तर या नरकातून सुटका तरी झाली असती”, असं उद्वेगाने म्हणण्यापलीकडे बिचारी आई काहीच करू शकत नव्हती.


गणपतला शिकायची फार ओढ असल्यामुळे तो अंदाजानेच शाळेत जाऊन बसायचा. शिक्षक शिकवतील ते कान देऊन ऐकायचा. पण जग फार क्रूर असतं... स्वतः चांगलं करायचं नाही आणि दुसरा करत असलेलं बघवायचं अशा वृत्तीमुळे शाळेतही त्याची भयंकर हेटाळणी होऊ लागली. इतकी की त्याला शाळेत जाणं थांबवावं लागलं.


श्रवणभक्त गणपत


पण शाळेत जायची इच्छा मेली असली तरी शिकायची इच्छा जिवंत होती. गणपत मग देवळात जाऊन बसायला लागला. तिथे कथेकरी बुवांची कीर्तनं, हरीनाम सप्ताह, भागवत सप्ताह चालायचे ते तो लक्षपूर्वक ऐकायचा. एकपाठी असल्यामुळे तो चटकन ते आत्मसातही करायचा. गंगाधर बुवा जोशींकडून आणि मोहिते मास्तरांकडून पोथीवाचन, अभंग, संतरचना ऐकून सगळं गणपत सगळं साठवून घ्यायचा. भक्तीची वाटच त्याला उजेड दाखवू लागली. संतांची माया त्याच्यातही वसतीला आली. भेदाभेदाचे भ्रम गळून पडू लागले. अस्पृश्यांना स्वत:हून बोलवून आणू लागला आणि त्यांना अभंग, ओव्या, कथा, दृष्टांत ऐकवून भक्ती आणि भाव दोहोंच्या भुकेल्यांना तृप्त करू लागला. जेव्हा गावातल्या लोकांना त्याचं हे असं विटाळाला कुरवाळणं आवडलं नाही तेव्हा त्याने पुंजाचा आशीर्वाद घेऊन सरळ गाव सोडलं. पंढरपुरी जाऊन मनाच्या डोळ्यांनी विठ्ठलाला पाहिलं. भजनांना साथसंगत करून तबला, पखवाज, मृदुंग शिकला. आपण शिकलेलं लोकांना ऐकवलं की त्याबदल्यात तो त्यांच्याकडून पोथ्या ऐकायचा. त्यातून आणखी समृद्ध व्हायचा. आळंदीला येऊन त्याने गोऱ्हेकर मठात भिडे शास्त्रींकडून संस्कृतचे धडे घेतले. त्यांनी त्याला स्तोत्र-मंत्र, ब्राह्मकर्म, रामायण, महाभारत, विष्णुसहस्रनाम शिकवलं. गणपतला आता खजिनाच गवसला होता. त्याने मागे वळून पाहिलंच नाही. मौखिक ज्ञानासोबतच त्याने पेटीवादनही शिकून घेतले. लोक त्याला ज्ञानी माणूस म्हणून ओळखू लागले त्याला गावोगावी कीर्तन, भजन, निरूपणासाठी बोलावणी येऊ लागली. पाहता पाहता गणपतचा ह. भ. प. गणपत महाराज झाला.

एकीकडे ज्ञान वेचत असताना कौटुंबिक पातळीवर मात्र त्यांचा संघर्ष सुरूच होता. आता घरच्या भावनेखील त्रास द्यायला सुरुवात केली. स्वत:च्या वाटणीची जमीन मिळवायलाही महाराजांना प्रचंड संघर्ष करायला लागला. खटला घालावा लागला, पण खटला उभा राहिला तेव्हा भावाला तुरुंगात जावे लागेल म्हणून महाराजांना वाईट वाटलं. वाईटाबरोबरही चांगलंच वागायचं हे ज्ञानेश्वरीतच सांगितले आहे.


जो खांडावया घावो घाली

का लावणी जयाते केली

दोघां एकचि साऊली-वृक्ष जैसा देई

(जो तोडण्यासाठी घाव घालतो किंवा जो झाड लावतो त्या दोघांनाही वृक्ष सारखीच सावली देतो)

ते स्मरूनच भावालाही क्षमा केली. आपल्या वाणीतून, कृतीतून ते फक्त आणि फक्त प्रेम वाटत राहिले. या त्यांच्या विचारसरणीमागे अख्खी संतपरंपपराच उभी होती.


रत्नं ती उधळीत जावे ....


अनेक जण संतसाहित्य वाचून मोठे होतात. आत्मोन्नतीचा आणि मुक्तीचा मार्ग गवसला की तेवढ्यावरच समाधान मानून थांबून राहतात. महाराजांचे वैशिष्ट्य हे की इतरांच्या उन्नतीचा ही विचार केला. आपण श्रवणातून ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेतला परंतु प्रत्येक अंध व्यक्तीला एवढे पाठांतर शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी ब्रेल लिपीत ज्ञानेश्वरी आणण्याचे शिवधनुष्य उचलले, स्वतःच्या पदराला खार लावला, अनेकांचे टोमणे, पाय खेचणे यांना भीक न घालता चक्क तुरुंगाधीकाऱ्याच्या मदतीने कैद्यांकडून हा महाग्रंथ प्रत्यक्षात उतरवला. पाठोपाठ अनेक अध्यात्मिक ग्रंथ ब्रेलमध्ये आणले !!


गणपत महाराजांनी आपल्या कीर्तन-प्रवचनांनी आख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. अहिंसेचे महत्व, स्त्रीभ्रूण हत्येला, बळीप्रथेला, व्यसनाधीनतेला विरोध याद्वारे त्यांनी समाजाचे प्रबोधन केले आहे. त्यांच्या शब्दांच्या वजनाने व्यसनमुक्त आणि तंटामुक्त झालेली अनेक गावं आज महाराष्ट्रात आहेत.


अखंड ज्ञानयज्ञ


लहानपणी महाराजांना अंगावर घालायला कपडे नव्हते पण सगळे लक्ष शिकण्याकडे होते. तेव्हापासूनची त्यांची विद्यार्थीवृत्ती संपलेली नाही. लहानपणी चौथीदेखील शिकू न शकलेल्या या अचाट माणसाने वयाच्या चाळीशीनंतर बी.ए, एम.ए पूर्ण केले आहे. आणि वयाच्या साठीनंतर ध्यास लागला आहे तो पी.एच.डी चा !!

धडधाकट माणसासाठी कायमचं अपंगत्व हा अडथळा असतो. तसा तो गणपत महाराजांसाठीही होता. पण त्यांनी त्यावर अशी काही मात केली की वर नमूद केलेल्या शैशव ते वार्ध्यक्य या टप्प्यांमधला अंधत्व हाही फक्त एक टप्पा होऊन गेला. आपली नोंद वही समृद्ध करताना त्यांच्या डोळ्यांनी साठ सोडल्यावर त्यांनी कानांनाही डोळ्याचं काम सोपवलं आणि आपल्या नोंदी करत गेले. लेखिका लीला शहा यांनी महाराजांची नोंदवही सर्वांसाठी खुली केल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत. पुस्तकातली सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे गणपत महाराजांच्या परिस्थितीला आणि त्यावेळच्या त्यांच्या विचारांना अनुसरून त्यांनी अत्यंत चपखल अशा ओव्या, अभंग, दृष्टांत त्या त्या ठिकाणी योजल्या आहेत (वर दिलेली ओवी हे त्याचंच उदाहरण). त्यामुळे महाराजांचे जीवन आणि संतसाहित्य कायमच कसं हातात हात घालून प्रवास करत आलेलं आहे हे मनापासून जाणवत राहतं... यापूर्वी महाराष्ट्र भूमीत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज होऊन गेले. अंध असूनही सर्व ब्रह्मज्ञान मुखोद्गत असणाऱ्या त्या महान संतांचा वारसदार म्हणून गणपत महाराज शोभून दिसतात यात शंकाच नाही.


पुस्तकाच्या मांडणीत मात्र काही सुधारणांची गरज आहे. पुस्तकात मुद्रणदोष बरेच आहेत. त्यात अवतरणचिन्हाच्या चुका आहेतच तसेच काही ठिकाणी काही शब्दच गाळले गेले आहेत. त्यामुळे वाचनात सलगता येण्यात अडचण येते. शिवाय प्रत्येक नवे प्रकरण आधीच्या प्रकरणाखालीच सुरू करण्यापेक्षा नव्या पानावर सुरू केल्यास पुस्तकाला सुटसुटीतपणाही येईल. असो. या त्रुटी असल्या तरी इतक्या विलक्षण माणसावर हे छोटेखानी पण महत्वाचे पुस्तक काढल्याबद्दल प्रकाशकांना धन्यवादही दिले पाहिजेत.


पुस्तकाचे नाव : अंधु जाहला दीपस्तंभु

लेखिका : लीला शाह

प्रकाशक : व्यास क्रिएशन्स

पृष्ठसंख्या : ७२

किंमत : ८० रु


- प्रसाद फाटक




mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2017/7/3/book-review-by-prasad-fatak-andhu-jahla-deepstambhu-.html

No comments:

Post a Comment