Total Pageviews

Saturday, September 15, 2018

‘धागे आडवे उभे’ : ..... शंभर धागे दुःखाचे




आपल्याला आवडणाऱ्या, आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये आपण अनेकदा एवढं गुरफटून जातो की त्या नादात अनेक हाका आपण कानामागे सारत असतो, अनेक दृश्यांकडे कानाडोळा करत असतो. आपण जे आयुष्य जगतोय तेच विश्व आहे असं वाटून घ्यायला आपल्याला फार आवडत असतं. अशाच अवस्थेत कधीतरी हातात पडतं 'धागे आडवे उभे' सारखं पुस्तक, जे आपल्याला थोबाडीत देऊन आपल्या गुलाबी स्वप्नांमधून जागं करतं. आपलं स्वतःमध्येच गुरफटून जाणं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या भीषणतेवर फक्त पांघरूण घालत राहणं आहे याची जाणीव करत जातं. ज्या गोष्टींमुळे अनिल अवचट स्वतः अस्वस्थ झाले त्यांची जाणीव इतरांनाही व्हावी आणि या अस्वस्थतेतून काही चांगलं निपजावं याच हेतूने हे पुस्तक लिहिलं गेलंय. प्रस्तावनेतच त्यांनी नमूद केलंय "….ज्यावेळी स्वतःच्या कर्तृत्वाविषयी विचार मनात येतात तेव्हा मी हे मानव-समूह नजरेसमोर आणतो आणि मला लाज वाटू लागते. एखाद्या यंत्रमाग कामगाराच्या पोटी जन्मलो असतो आणि वयाच्या पाचव्या वर्षांपासून कामाला जुंपलो गेलो असतो तर ? किंवा कामाठीपुऱ्यातल्या वेश्येच्या पोटी जन्मलो असतो तर ? अशा नखशिखान्त अस्वस्थतेतूनच हे लिखाण जन्माला आलं आहे” .

पहिल्याच प्रकरणातून वेश्यांचं हादरवून टाकणारं वास्तव आपल्यासमोर येतं. चार भिंतींमध्ये सुखाने नांदणाऱ्या पांढरपेशा वर्गाला याची कल्पनाही येणं अशक्य आहे. एखाद्या मोठ्या कारखान्याच्या कार्यपद्धतीवर आणि उत्पादन पद्धतीवर जसे कच्चा माल पुरवणारे लघुउद्योग अवलंबून असतात तसंच काहीसं स्वरूप वेश्यांच्या धंद्याचं आहे. मुख्य धंद्याच्या काही पटींनी जास्त इथले 'साईड बिझनेस' आहेत. रात्रीच्या वेळी गिऱ्हाईकांची 'सोय' करून देणारे टॅक्सीवाले, वेश्यांना कर्जपुरवठा करणारे छोटे-मोठे शेठ, खोल्या भाड्याने देणारे घरमालक, जेवण आणून देणारे खानावळवाले, पहिल्यांदाच ‘धंदा’ सुरु करणाऱ्या स्त्रीकडून एखाद्या प्रवेशशुल्कासारखा हप्ता आकारणारे पोलीस आणि सगळ्यात महत्वाचे भिडू - मुलींचा पुरवठा करणारे दलाल आणि धंदा चालवणाऱ्या 'आई' अशी ही एक प्रचंड मोठी परिसंस्थाच आहे. अवचटांनी या परिसंस्थेला अनेक चक्र असलेल्या यंत्राची उपमा दिली आहे. ते म्हणतात “… हे मोठं यंत्र चालतं ते या छोट्या चक्रांवर”. वाचून वाटतं, खरंच हे एक यंत्र आहे - जे चालत राहतं कित्येकांच्या वासनांच्या वंगणावर…. कित्येक अभागी जीवांच्या स्वप्नांना चिरडत... अव्याहतपणे....

अशा या अंधाऱ्या जगात अवचटांनीं धाडसाने डोकावून पाहिलं. अनेक दाहक अनुभव घेतले. धंदा करणाऱ्या बहिणीला प्रेमाने भेटायला येणाऱ्या भावाला दिवसभर बहिणीसोबत मनमोकळं बोलायचं असेल तर त्याला एका रात्रीचं 'भाडं' भरायला लावणारं हे एक क्रूर जग आहे, कारण शेवटी त्या दिवशी बहिणीला खाडा होऊन चालणार नसतो.... एकीकडे हा अनुभव तर दुसरीकडे या समस्येचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या अवचटांना एका वेश्येने भाऊ मानून 'भावाला रिकाम्या हाती कसं पाठवायचं' या भावनेने हातावर रुपया टेकवल्याचं गलबलून टाकणारं उदाहरणही आहे.

अर्थात या सगळ्या प्रतिकूल वातावरणातही अनेक सेवाभावी कार्यकर्ते झोकून देऊन वेश्यांसाठी काम करत आहेत. वेश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांना शिक्षणासाठी आनंदवनात पाठवणे अशा उपायांच्या माध्यमातूनन किमान पुढच्या पिढीला तरी या नरकातून बाहेर पडण्याची वाट सापडावी यासाठी झटत आहेत.

पुढच्या प्रकरणात अवचट आपल्याला वेश्यांच्या अंधाऱ्या जगातून एका खऱ्याखुऱ्या अंधाऱ्या जगात नेतात. हे जग आहे चित्रपटगृहाच्या अंधारात काम करणाऱ्या डोअरकीपरचं. या समस्या प्रामुख्याने निमशहरी व ग्रामीण भागातल्या आहेत. आज मल्टिप्लेक्स संस्कृतीला चटावलेल्या शहरी मंडळींसाठी यातले बारकावे आणि गांभीर्य समजणे अवघड आहे. प्रेक्षकांचे उपद्व्याप, तक्रारी, भांडणं, घाण करणं या सगळ्याला फक्त डोअरकीपर आणि त्याच्या हाताखालचा टॉर्चधारक यांना तोंड द्यावं लागतं. त्यांचे तुटपुंजे पगार, भविष्याबद्दल काहीही तरतुदी व्हायची शक्यता नसणं, चित्रपटाच्या बेभरवशाच्या कारभारावर बरंच काही अवलंबून असणं या गोष्टींचा आपण कधी विचारही केलेला नसतो. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी आणि त्यातून होत असलेली वाताहत यावर पुस्तकात आणखी दोन प्रकरणं आहेत आणि त्या समस्या डोअरकीपरच्या समस्यांपेक्षा खूप जास्त गंभीर आहेत. कारण त्या फक्त आर्थिक परिस्थितीपुरत्या मर्यादित नसून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे खालावलेल्या आरोग्याशीही संबंधित आहेत.

त्यापैकी पहिले आहे हळद कामगारांची हालत दाखवणारे 'जर्द-पिवळे जग'. हळदीचा बराचसा धंदा सांगलीपाशी एकवटलेला. देशभरातल्या हळदीपैकी महत्वाचा वाटा इथला असूनही इथल्या कामगाराला मात्र अक्षरशः कवडीचं मोल आहे. जमिनीखाली खोदून बनवलेल्या जागेतल्या प्रचंड उष्णतेत तासन्‌तास काढावे लागतात. वर येऊन बाकी काही करण्याचे त्राणही उरत नाही. सतत हळदीच्या धुराळ्यात काम केल्याने छातीत पाणी होणे, नजर अस्पष्ट होणे आदी समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांच्या सुरक्षेची मालकाने कुठलीही काळजी घेतलेली नसते.

एकीकडे हळदीने संपूर्ण फुफ्फुसं भरलेले कामगार अस्वस्थ करतात तर 'धागे आडवे उभे' या प्रकरणात धाग्यांनी संपूर्ण फुफ्फुसं भरलेले यंत्रमाग कामगार हलवून जातात. इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाचा सखोल परिचय यात करून दिला आहे. धोट्यांच्या कान किटवणाऱ्या आवाजात बारा तास काम, हक्काची रजादेखील नाही, अत्यल्प मोबदला आणि या सगळ्याच्या बदल्यात दृष्टिदोषापासून टीबीपर्यंत सर्व व्याधी भेट म्हणून मिळतात. हवेत उडणाऱ्या गुंजामुळे (बारीक बारीक सुतं) छातीचा पार लगदा होऊन जातो. दिवसभर सुताच्या सान्निध्यात असल्यामुळे एखाद्या भट्टीत बसल्याचा अनुभव येतो. या सगळ्यामुळे कामगारांच्या 'कुटुंब' या संकल्पनेलाच तडे जातात. कारण पाच-सहा वर्षांच्या पोरापासून सगळेच या कामाला जुंपले गेलेले असतात. घरी फक्त जेवायला आणि पाठ टेकायला जायचं, दुसऱ्या दिवशी उठलं की पुन्हा घाण्याला जुंपून घ्यायचं एवढंच त्यांच्या आयुष्यात शिल्लक असतं.


अन्य दोन प्रकरणं ही कला आणि संस्कृती यांच्यात शिरलेल्या विकृतीचे चित्रण करतात. 'पैंजण नव्हे बेड्या' या प्रकरणातून तमाशाच्या दुनियेबद्दल खूप महत्वाच्या नोंदी केल्या आहेत. एकाच थिएटरला असणाऱ्या सात-आठ पार्ट्यांमुळे उत्पन्न विभागणं, छोट्या छोट्या कारणानं थिएटर मालकानं भाडं कापणं, गर्दी कमी जमली तर दौलतजादा कमी होणं या गोष्टींमुळे तमाशाचा व्यवसाय हा अतिशय अस्थिर असतो. त्याचा थेट परिणाम याच्याशी संबंधित सर्वांवर होतो. शिवाय यात काम करणाऱ्या बायकांना सोसावी लागणारी खूप वाईट गोष्ट म्हणजे जमलेल्या प्रेक्षकांच्या वखवखलेल्या नजरा ... तमाशाचा मुक्काम परगावी असेल तर मुली पळवण्यापर्यंत लोकांची मजल जाते. या सगळ्यामुळे तमाशाचं 'लोककला' हे मूळचं स्वरूप लयाला जाऊन अनेक ठिकाणी केवळ कमाईसाठीचा धंदा आणि मुलींचा पुरवठा इतक्या छोट्या पातळीपुरता तमाशा शिल्लक उरला आहे.

'देवाची माणसं'मधून संस्कृतीच्या नावाखाली चालणाऱ्या देवदासी प्रथेचं वास्तव आपल्याला वाचायला मिळतं. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘जोगवा’ या चित्रपटामुळे जोगतीण-जोगते यांच्या प्रथेबद्दल बऱ्याच लोकांना थोडीशी का होईना ओळख झाली. हा लेख त्याहीपूर्वी लिहिलेला आहे.१९३४ साली हे प्रकार थांबवण्यासाठी कायदा होऊनही हा लेख लिहीपर्यंत या कायद्याअंतर्गत एकही खटला दाखल झाला नव्हता. देवाच्या नावाने सोडलेल्या देवदासी स्त्रिया पुरुषांच्या शोषणाला बळी पडतात आणि वेश्याव्यवसायाकडे ओढल्या जातात. पुढे त्यांची कहाणी वेश्यांच्या समस्येसारखीच होत जाते. सुदैवाने त्यातल्या काही देवदासी स्त्रिया स्वतःहून पुढे येऊन बंधमुक्त होऊ पाहत आहेत.

इंग्रजीमध्ये ज्याला रिपोर्ताज म्हणतात त्या प्रकारचे हे लिखाण आहे. अनिल अवचट यांची शैली साधीसरळ आहे. खरंतर ते जे वास्तव मांडतात त्याला शब्दांच्या फुलोऱ्याची गरजही नाही. वास्तवाशी प्रामाणिक राहण्यामुळे ही कथनशैली मनाला भिडते. विलक्षण तन्मयतेने एकेका विषयाचा मागोवा घेणे, खोलात जाऊन निरीक्षण करणे, परिस्थितीविषयी उगीचच उमाळे न काढणे आणि तरीही आत्मियतेने प्रश्नाचे सर्व पदर उलगडून दाखवणे यामुळे पुस्तक वाचनीय बनलं आहे. हे पुस्तक समस्याप्रधान आहे, पण म्हणून ते न वाचणं म्हणजे वास्तवाकडे पाठ फिरवण्यासारखं आहे. आपण केवळ डोळे मिटले म्हणून समस्या संपत नाहीत. समाजाचा एक हिस्सा किती भयानक आयुष्य जगतो हे लक्षपूर्वक पाहिलं तरच आपण जमिनीवर राहू शकतो.

सुभाष अवचट यांची प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला असणारी सूचक रेखाचित्रं तसंच मुखपृष्ठ यांमुळे पुस्तक अधिकच गहिरं झालं आहे. पुस्तक समस्या मांडतं तसंच उपायही सुचवतं, हे अनिल अवचटांच्या आशावादी वृत्तीला साजेसंच आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, "जी दुःखं मनुष्यनिर्मित आहेत, त्यांचा तो निरासही करू शकतो". याच वृत्तीमुळे अनिल अवचट यांचं हे पुस्तकच नव्हे तर एकूणच लिखाण कायमच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारं वाटत राहतं .


पुस्तकाचं नाव : धागे आडवे उभे

लेखक : अनिल अवचट

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पृष्ठसंख्या : १५६

किंमत : १५०


- प्रसाद फाटक

No comments:

Post a Comment