Total Pageviews

Saturday, September 15, 2018

'झोंबी' : दुर्दम्य आशावादाची कहाणी




ग्रामीण जीवनातल्या कष्ट, दारिद्र्याचा आणि अन्नाच्या दाण्यापासून ते शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आयुष्याशी कराव्या लागलेल्या झोंबाझोंबीचा जिवंत अनुभव म्हणजे आनंद यादव यांचे आत्मकथन ‘झोंबी’. साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवली गेलेली संघर्षगाथा. हे एका अर्थाने संपूर्ण ग्रामीण जीवनाचे प्रतिनिधित्व करणारे कथनच, कारण थोड्याफार फरकाने गावगाड्यातील असंख्य लोकांच्या वाटेला याच गोष्टी येऊन गेलेल्या आहेत आणि अजूनही येत असतात. अर्थात त्यातूनही तावून सुलाखून निघणारे आनंद यादवांसारखे विरळाच !

कष्टकऱ्यांच्या आयुष्यातल्या हालअपेष्टांची कल्पना शहरातल्या सुखवस्तू लोकांना येणे फारच अवघड आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वीची परिस्थिती अजूनच कठीण ! कारण शहरात चौकोनी कुटुंबात टुकीने राहणे वेगळे आणि पदरात पैसा असण्याची मारामार असताना खेड्यापाड्यात ढोरांच्या खिल्लारासारखे कुटुंब हाकणे वेगळे. पोरानं तालमीत अंग कसलं आणि परसात शेत कसलं म्हणजे ‘जल्माचं कल्यान झालं’ अशी समजूत असण्याच्या काळात आनंद यादव यांनी परिस्थितीशी झगडून चुकत माकत का होईना मॅट्रिक पास होऊन दाखवणे म्हणजे मोठीच कामगिरी म्हटली पाहिजे !

पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्याला झटके बसायला सुरुवात होते. आनंद यादवांच्या आईचं लग्न एक वर्षाची असतानाच झालेलं होतं. पोरगी जन्माला आल्यापासून तिच्या सासरी जायच्या दिवसापर्यंत दिवस मोजणं, ‘पोरगी वयात आल्यावर सासरीच जायची, तिला चांगलंचुंगलं खायला घालून करायचंय काय’ अशी भयानक विचारसरणी आपल्याला दिसायला लागते. यादवांच्या घरातले वातावरणही तसे गढूळच. आजोबांपासून भाऊबंदकी चालत आलेली. वडील रत्नाप्पा आणि आई तारा यांचं उभं आयुष्य कष्टातच गेलं. कुळाची शेतं कसता कसता हातातला थोडासा पैसा देखील गळत गळत गेला. पुढे तर कष्टाचे पैसेही मिळेनासे झाले. त्यात भर म्हणून घरात तब्बल डझनभर तोंडं ! ताराच्या पोटी अक्षरशः रतीबासारखी पोरं जन्माला आली. अवघ्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत आठ बाळंतपणं झेलून तारा अक्षरशः मेटाकुटीला आली होती. पण तरीही रत्नाप्पाची पोरं जन्माला घालायची हौस काही फिटत नव्हती. एवढ्या लेंढारात बुकं शिकला तो एकटा आनंद. पण शिकला तो असा शिकला की आई बापाच्या जन्माचं सार्थक झालं.

पण हे शिक्षण सहजसाध्य नव्हतं. रत्नाप्पाने आनंदाच्या शिक्षणात पदोपदी मोडता घालायचा प्रयत्न केला. पोरगा शिकल्याने काही चांगले होणार आहे हेच मुळी त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं. पोराला मळ्यावर राबराब राबवलं. स्वतःच्या जीवाला मात्र तोशीस लागू दिली नाही. थोडीशी जरी चूक झाली तर बायको-पोरांच्या हाडाची भुकटी करायला मागेपुढे रत्नाप्पा पहायचा नाही. पुस्तक वाचताना त्या माराची वर्णनं वाचायला अगदी नकोसं होतं. बायको म्हणजे काय आपली खाजगी मालमत्ताच अशीच बापाची समजूत. त्यामुळे बडवलं नि तुडवलं काय, बायकोला तोंड वर करून बोलायचा हक्क नाही. अशा हजारो तारा आजही अस्तित्वात आहेत ही जाणीव पुस्तक वाचत असतानाही मला अस्वस्थ करत होती. एकतर गावातलं आयुष्य खडतर. सगळेच कामाचा भर सोसणारे. पण बाईमाणूस त्यातही तळाशी. सगळ्या शरीराचा भार जसा पायावर होतो तसा हा समाजव्यवस्थेचा, अतिकष्टाचा भार स्त्रीवरच. तान्ह्या पोराचं दूध, धन्याची भाकरी, गोठ्यातल्या शेण्या अन् मळ्यातली कापणी.... सगळीकडे गुरापेक्षा जास्त राबायचं आणि वर नवऱ्याची मर्जी फिरली की तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा.

या पुस्तकात आणखी एक भयंकर प्रकार वाचायला मिळतो, तो म्हणजे माती खाऊन आयुष्याची माती झालेली आनंदाची भावंडं...  घरी खरोखर अन्नान दशा. जेवायला कुणालाच धड नाही. मग काहीतरी पोटात ढकलायचं म्हणून माती खायची सवय ! माती खाऊन खाऊन सगळ्यांची शरीरं सुजली, अशक्त झाली. हिरा नावाची एक बहिण तर पंधराव्या वर्षीसुद्धा माती खाई... हे वाचूनसुद्धा पोटात ढवळायला लागते.

इतक्या बिकट परिस्थितीतूनही आनंद शिकला. बापाचा मार अंगात मुरवतच शाळेत गेला. फाटके कपडे, मळकं अंग, घाण वास हे त्याचे कायमचे सोबती. पण त्यातही काही देवदूत भेटले. सणगरांचा आबाजी, शाळेतले जिव्हाळ्याचे मास्तर यांनी आनंदाची परिस्थिती जाणून त्याला मदत केली. पण पुढे हायस्कुलात मात्र फार कटू अनुभव आले. अनेकांनी परिस्थिती माहित करून न घेताच शिक्षा केल्या. तर काहींनी सगळे माहित असूनही केवळ आपलं वर्चस्व गाजवायचं म्हणूनही शिक्षा केल्या. एवढ्या दिव्यातून पार पडून, बैलागत काम करून आनंदा बापाशी भांडून घरातून पळून गेला आणि तरीही पुढे एसएसस्सीच्या परीक्षेच्या दिव्यातून पार कसा झाला आणि ऐपत असूनही फ्रीशिप पदरात पाडून घेणाऱ्या सहाध्यायींच्या नाकावर टिच्चून संस्कृत विषयात पहिला कसा आला याची रोमहर्षक कहाणी मुळातूनच वाचायला हवी.

पुस्तकात छोट्या छोट्या घटनांमधून लहान वयातल्या आनंदाचा विचारीपणा, समंजसपणा लिखाणात येत राहतो. गांधीजी आदर्श असूनही त्यांची हत्या हा गावातल्या ब्राह्मणांचा दोष नाही हे लक्षात घेण्याचा समजूतदारपणा आनंदमध्ये वयाच्या बारा-तेराव्या वर्षीच आला होता आणि त्यामागे निःसंशयपणे शिक्षणातून येत गेलेल्या शहाणपणाचा मोठा वाटा होता. वडिलांचा स्वभाव शिक्षणाला प्रतिकूल असूनही त्यांच्याबद्दल कडवटपणा लिखाणात जाणवत नाही. उलट लहानपणी बारीकसारीक चोऱ्या करायची सवय लागल्याचे कळल्यावर वडील ‘एके दिवशी दरोडेखोर होशील’ असे म्हणाले तेव्हा त्यावर तीव्र प्रतिक्रिया न देता त्यातून योग्य तो बोध घेऊन आनंदाने चोरणं बंद केल्याचही दिसून येतं.

पुस्तकात वापरलेली भाषा ही दोन पातळ्यांवरची आहे. आनंद यादवांनी आईबाप आणि भाऊबंदांचे संवाद, लहानग्या ‘आंद्या’च्या मनातले विचार यासाठी ग्रामीण ढंगाची भाषा वापरली आहे. त्यात शिव्यांचा सुकाळ आहे हे ओघाने आलंच. त्याचबरोबर त्या काळाची किंवा एखाद्या घटनेची यादव जेव्हा त्रयस्थाच्या भूमिकेतून नोंद घेतात तेव्हा तिथे प्रमाण मराठी वापरलेली आहे. परंतु यात कुठेही कृत्रिमता येत नाही किंवा जोडकाम केल्यासारखेही वाटत नाही. पुस्तकातली निवेदन शैली एकप्रकारचा कोरडेपणा आणि थंडपणा घेऊन येते. म्हणजे असं की अनेकदा घटनांचे वर्णन अगदी किरकोळीत येते आणि त्यामुळे ते जास्तच अंगावर येते. जणू इतके टक्के-टोणपे खाल्ल्याने भाषेलाही एक सुकट रापच चढलेला असावा ! वानगीदाखल सांगायचं तर ‘तीन पोरं घरात जगली’ किंवा ‘ताराचा भाऊ आईच्या मढ्यावरच दूध प्याला’ अशी वरवर निर्विकार भासणारी वाक्ये मणक्यातून थंडपणे सरकत जातात आणि कमालीचं हादरवून करून सोडतात.

अर्थात एवढ्या अडथळ्यांचे वर्णन असूनही पुस्तकात कुठेही दीनवाणेपणाचा सूर नाही. उलट एवढ्या घडामोडींनी भरलेले आनंद यादव यांचे बालपण वाचून संपवले तेव्हा मला सकारात्मक उर्जेने भारल्यासारखे वाटत होते.

आनंद यादव अगदी परवा परवाच आपल्याला सोडून गेले, पण जाताना मागे दुर्दम्य आशावादाची ‘पॉवर बँक’ ठेवून गेले आहेत. ती अनुभवायलाच हवी. याशिवाय ‘झोंबी’चं आणखी एक खास आकर्षण म्हणजे त्याला लाभलेली आपल्या लाडक्या पुलंची प्रस्तावना ! म्हणजे हा तर डबल बूस्टर झाला !

चला तर मग, झोंबी वाचून ‘चार्ज’ होऊया !


जाता जाता :

आनंदाच्या रोमहर्षक प्रवासाचे ‘झोंबी’च्या पुढचे टप्पेही नांगरणी, घरभिंती आणि काचवेल अशा तीन पुस्तकांच्या  रूपाने उपलब्ध आहेत. माझे ते वाचून झालेले नाहीत, पण तेही तितकेच चांगले असतील याबद्दल मला खात्री आहे.


मेहता प्रकाशन,

पृष्ठे ४०८, किंमत ३२०

आवृत्ती सतरावी

No comments:

Post a Comment