Total Pageviews

Saturday, September 15, 2018

‘नकाशाच्या रेषांवरून चालताना’ : नकाशांचा आनंद, आस्वाद आणि आख्यायिका




एखाद्या अनोळखी चौकात उभं राहिलं आणि चौकातल्या एकाही रस्त्यावर तो रस्ता कुठे जातो हे लिहिलं नसेल तर आपल्याला गोंधळून जायला होतं. त्यातच दिशांचं ज्ञान व्यवस्थित नसेल तर मग संपलंच सगळं. ‘भूगोल’ या विषयाचं असंच आहे. आपण सगळेच तो शाळेत शिकत असतो, पण भूगोलाचे शिक्षक जर आपल्याला त्या विषयाचा अभ्यास भविष्यात कुठे घेऊन जाणार आहे हे नीट समजावून सांगू शकत नसतील तर अक्षांश-रेखांशांचे चौक आपल्याला निरर्थक आणि निरस वाटू लागतात. पालकांपासून शिकवण्यांशिक्षणव्यवस्थेपर्यंत सगळ्यांनी दुर्लक्षिलेल्या विषयांमधले तीन बिनीचे शिलेदार म्हणजे इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र! त्यातही पाठ्यपुस्तकातल्या इतिहासात तहाची कलमं आणि सनावळ्या यांचा जाच असला तरी शिवाजी महाराजांमुळे, स्वातंत्र्यलढ्यामुळे इतिहासाला एक रंजनमूल्य तरी असतं. पण भूगोलाच्या नशिबी तेही येत नाही. अंतिम गुणपत्रिकेत भूगोलाचे गुण आपल्याला कुठल्याच प्रकारचा टेकू देत नसल्याने असेल कदाचित, पण हा विषय कायम उपेक्षितच राहतो. त्यात भूगोल शिकवणारे शिक्षकही नीरसपणे शिकवत असतील तर भूगोलविषयक अनास्थेला पारावर उरत नाही. ‘काय’ पेक्षा ‘कसं’वर भर दिला असता अनेक विषय खरंतर रंजक होऊ शकतात. म्हणजेच घटना/परिस्थितीच्या तपशीलापेक्षा त्यामागचा कार्यकारणभाव सांगितला गेला की आपोआपच त्या विषयात रस निर्माण होतो आणि त्यातूनच मग कुतूहल निर्माण होऊन स्वतःहून विषयाचा अभ्यास करावासा वाटू शकतो.अशा वेळी वाटतं की भूगोल हा ‘नकाशाच्या वाटांवरून चालताना’ या पुस्तकाल्यासारखा असावा तो डॉ. प्रकाश जोशी यांच्यासारख्या कुणीतरी उलगडून दाखवावा. शीर्षकावरून पुस्तकाचा विषय कळत असला तरी नकाशांबद्दल सांगता सांगता एकूणच भूगोलाबद्दल आणि भूगोलाच्या इतिहासाबद्दल हे पुस्तक भरपूर काही सांगून जातं.


अनेक विषयांना स्पर्श


‘नकाशा : का आणि कसा?’ या पहिल्याच प्रकरणात डॉ. जोशी यांनी ‘साक्षरता’ म्हणजे काय याची थोडक्यात पण महत्वाची चर्चा केली आहे. ‘अक्षरओळख म्हणजे साक्षरता’ ही एक व्याख्या झाली पण वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधल्या गोष्टी समजून घेण्यासाठी त्या-त्या प्रकारची साक्षरता असावी लागते उदा. संगणक-साक्षरता, नकाशा-साक्षरता, जल-साक्षरता इ. अन्य प्रकारच्या साक्षरता. डॉ. जोशी साक्षरतेच्या उदाहरणांकडून सुरुवात करून भटकंतीपासून ते हवामानशास्त्र, जनगणना, आकाशदर्शन आदि विषयांसाठी अभ्यास करताना नकाशा साक्षरता कशी आवश्यक आहे या मुख्य विषयाकडे अलगदपणे येतात. अक्षांश-रेशांशांची निश्चिती कशी होत गेली, नकाशाच्या लांबी  रुंदीच्या प्रमाणाची निश्चिती कशावर होते, नकाशांचे प्रकार कुठले या गोष्टींबद्दल पहिल्याच प्रकरणात माहिती देऊन वाचकांचं कुतूहल थोडसं शमवत असतानाच नवं कुतूहल निर्माण केलं जातं. त्यामुळेच पुढची प्रकरणं वाचायची उत्सुकता आपोआपच वाढते. गोल आकाराच्या पृथ्वीचे सपाट आणि चौरसाकृती नकाशे कसे बनवतात या अतिशय मूलभूत प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एक संपूर्ण प्रकरण पुस्तकात आहे. पृथ्वीच्या भौगोलिक आणि चुंबकीय धृवांमधल्या फरकाचा शोध, तसेच गेल्या सहाशे वर्षांमध्ये अनेक साहसी दर्यावार्द्यांनी आणि प्रवाशांनी कुठल्या कुठल्या पद्धती, उपकरणे आणि संदर्भ वापरून आपल्या मोहिमा पूर्ण केल्या, नव्याने सापडलेल्या जगाचे आणि तिथपर्यंतच्या मार्गांचे नकाशे कसे बनवले यांच्या अत्यंत सुरस कहाण्या सांगितल्या आहेत.


हसत खेळत ज्ञान

डॉ. जोशी स्वतः संशोधक, गिर्यारोहक, नकाशातत्ज्ञ आणि छंदिष्ट प्रवासी आहेत. त्यांचे या सर्वच क्षेत्रातले अनुभव हे एकमेकांना पूरक आहेत आणि ते विषय मांडणीच्या ओघात पुस्तकामध्ये वरचेवर येत असल्याने पुस्तक अजिबात एकसुरी होत नाही. शिवाय विषय समजावून देण्याची त्यांची शैली लेखापेक्षा शिक्षकाप्रमाणे असल्याने आपण वाचन करत आहोत असं न वाटता एखादं उत्कंठावर्धक power point अनुभवत आहोत असं वाटतं. Power point चा उल्लेख इथे यासाठी केला की आपले मुद्दे अधिक स्पष्ट करण्यासाठी डॉ जोशी यांनी अनेक नकाशे, रेखाचित्रे, उपग्रह प्रतिमा दिल्या आहेत. विषयाच्या अनुषंगाने परंतु थेट संबंध नसलेल्या घटना, किस्से यांनी पुस्तक भरलेलं आहे, त्यामुळे विषय अधिक व्यवस्थितपणे पोचतो. शिवाय अधिक माहितीसाठी मासिकात असतात त्याप्रमाणे चौकटी पुस्तकभर विखुरलेल्या आहेत, ज्यातून दुर्बिणीच्या इतिहासापासून ते अलिबागच्या अद्वितीय चुंबकीय वेधशाळेपर्यंत अनेक चित्तवेधक गोष्टी आपल्याला कळतात (फक्त त्या चौकटींचे विषय आणि चौकटीचा आकार यांचे काही निश्चित निकष आहेत असं वाटत नाही. काही चौकटी आकार उण्यापुऱ्या ४ ओळींच्या असून काही चक्क पानभर आहेत. मजकूर वाचत असताना मध्येच पानभर चौकट आली की ती वाचून किंवा ओलांडून नव्या पानावर जाताना आपण जो मुद्दा वाचत होतो त्यातली सलगता खंडित होते). जोशी यांची लिखाणाची शैली काहीशी पसरट आहे त्यामुळे मूळ मुद्द्यापासून गाडी दूर जाऊन अनेक स्टेशनांना भेट देऊन येते असंही पुस्तकात बऱ्याच ठिकाणी दिसतं. अर्थात हेही तितकंच खरं आहे की सांगण्याची शैली खुसखुशीत असल्याने त्या अवांतर गोष्टीही कंटाळवाण्या होत नाहीत. उदा. साक्षरता म्हणजे काय आणि ती कशी सापेक्ष असते हे सांगताना त्यांनी एक किस्सा दिला आहे. “एका पार्टीत चाललेली मौजमजा. जोक्सचं इंग्लिश पुस्तक. पार्टीतला हरेक जण जोक्सच्या इंग्रजी पुस्तकातून एक एक जोक वाचून दाखवत होता. इतर जण मौज लुटत होते. बाबुरावाची पाळी आली. त्याची पंचाईत झाली. त्याला इंग्रजी येत नव्हतं म्हणून पार्टीतले उच्चभ्रू त्याची टर उडवत होते. बाबुरावानं मोडी लिपीतील मजकूर त्याच्यापुढे ठेवला आणि एका क्षणात त्यांना निरक्षर करून सोडलं. साक्षरता हे ज्ञान सापेक्ष आहे हे ज्ञान त्याने मला दिलं”. अशा किश्श्यांमुळे आपण विषयाशी चट्कन जोडले जातो. अशिवाय कविता, नाट्यगीते किंवा गाण्यांच्या ओळी, स्वानुभव यांची पेरणी पुस्तकात आहे त्यामुळे पुस्तक वाचणं ही एक आनंदयात्रा ठरते.


भूगोलात रस निर्माण करण्याची क्षमता

पुस्तक वाचताना हे सतत जाणवत राहतं की आपण यातल्या अनेक मूलभूत स्वरूपाच्या गोष्टी आपल्याला कधीच शिकवण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे भूगोलाकडे बघण्याची दृष्टी अगदीच कमजोर राहिली. हे पुस्तक वाचण्यासाठी सर्वात योग्य वेळ ही नववी ते बारावी दरम्यानची असतानाची आहे, कारण त्याच्यापुढच्या करिअर वाटा निश्चित करण्याचा तो कालखंड असतो आणि भूगोल हाही आपल्या करिअरचा विषय होऊ शकतो असा विश्वास निर्माण करण्याची ताकद या पुस्तकात नक्कीच आहे. अर्थात शिकण्यासाठी कुठलीही वेळ ही योग्य वेळच असते त्यामुळे तुम्ही कुठल्याही वयोगटात असलात तरी हे पुस्तक वाचायला हरकत नाही. एका परिचित विषयाकडे नव्या चष्म्यातून बघण्यासाठी म्हणून जरी हे पुस्तक हातात घेतलंत तरी हे पुस्तक तुमचं कुतूहल पुरेपूर चाळवेल एवढंच नाही तर मनोरंजनही करेल आणि संबंधित विषयातल्या अधिक सखोल पुस्तकांकडे तुमची आपसूकच पावलं वळतील यात शंका नाही.



पुस्तक : नकाशाच्या रेषांवरून चालताना

लेखक : डॉ. प्रकाश जोशी

प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स

पृष्ठं: ११०

किंमत : १७५ रु.

आवृत्ती : पहिली (१३ जून २०१२)

No comments:

Post a Comment