Total Pageviews

Saturday, September 15, 2018

इंदिरा गांधी, आणीबाणी व भारतीय लोकशाही






स्वातंत्र्योत्तर काळाच्या इतिहासाचा आपण तपशिलाने अभ्यास करतो तेव्हा केंद्रीय नेतृत्वाच्या शैलीत होत गेलेले बदल आपल्याला ठळकपणे जाणवतात. त्यातही शास्त्रीजींनंतर आलेल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाने ज्याला आपण ‘पॅराडाईम शिफ्ट’ म्हणू शकू. अशा प्रकारचा बदल राजकारणात घडवून आणला. टोकाच्या लोकप्रियतेपासून ते टोकाच्या असंतोषापर्यंत लंबक हलताना ज्यांनी अनुभवला. अशा या विलक्षण गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाची जन्मशताब्दी नुकतीच १९ नोव्हेंबरला सुरू झाली आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अधिक सूक्ष्म तपशील जाणून घ्यायचे असतील तर पी. एन. धर यांनी लिहिलेले ‘इंदिरा गांधी, आणीबाणी व भारतीय लोकशाही’ हे पुस्तक अजिबात चुकवता कामा नये. आणीबाणी व्यतिरिक्त बांगलादेश युद्ध, सिक्कीम विलीनीकरण इ. महत्वाच्या घटनांबद्दल यात तपशिलाने माहिती असल्याने याचे महत्व अनन्यसाधारण आहे.

१९७५ ते १९७७ या केवळ दोन वर्षांच्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार लाथाडले गेले, घटना, न्यायसंस्था या सर्वांपेक्षा व्यक्तिगत महत्वाकांक्षा उच्चासनावर बसवली गेली आणि या सर्व गोष्टींचे संपूर्ण देशावरच खोलवर परिणाम झाले. त्याविषयी आपण माहिती मिळवू तेवढे थोडे आहे. आतापर्यंत सर्व प्रसारमाध्यमे, पुस्तके, प्रबंध यांच्याद्वारे आणीबाणीविषयी बरेच काही मांडले गेले असताना ‘या पुस्तकाचे वेगळे महत्व काय’ असा प्रश्न पडू शकतो. हे वेगळेपण म्हणजे त्या गतिमान आणि मती कुंठीत करणाऱ्या घडामोडींचा ‘आंखो देखा हाल’च या पुस्तकात आहे. लेखक पी. एन. धर यांनी सगळे नुसते पाहिले आहे असे नाही तर त्यातल्या काही गोष्टींवर त्याचा स्वतःचा प्रभाव आहे आणि काही गोष्टींमध्ये स्वतःचा सहभागही आहे ! शिवाय इंदिरा गांधींसोबतच आसपासच्या इतरही महत्वाच्या व्यक्तींबाबत पुस्तकात बरेच अज्ञात तपशील आहेत जे अभ्यासले जाणे गरजेचे आहे.

पी. एन. धर हे इंदिराजींच्या सचिवालयाचे प्रमुख. मुळात कुशल अर्थतज्ञ असणाऱ्या धर यांच्यातील एक विचारी माणूस इंदिरा गांधींनी बरोबर हेरला. खुद्द तेही ‘इंदिरा गांधींनी सल्लागार म्हणून कशाच्या आधारावर निवड केली’ याबद्दल आश्चर्य व्यक्त करतात. सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये धर यांनी स्वतःविषयी व पंतप्रधान कार्यालयाविषयी माहिती दिली आहे. ज्यांना देशाचा कारभार सचिव, मंत्रालय, समित्या यांच्याद्वारे कसा चालतो याबद्दल कुतूहल आहे, त्यांच्यासाठी कार्यालयाविषयीचे लिखाण ‘मस्ट रीड’ असेच आहे. कदाचित सर्वसामान्य वाचकाला यातील बारकाव्यांमुळे आणि तपशीलवार वर्णनांमुळे हा भाग नीरस वाटू शकतो, पण एकंदर परिस्थितीची पार्श्वभूमी उभी करण्यासाठी हे प्रकरण अतिशय उपयुक्त आणि आवश्यक आहे.

‘बांगलादेशचा पेचप्रसंग’ या प्रकरणातून इंदिरा गांधीच्या स्वभावाची, निर्णयक्षमतेची आणि एकंदर व्यक्तिमत्वाची आपल्याला कल्पना येऊ लागते. कणखरपणा, चांगले ऐकून घेण्याची सवय, कामाविषयी आत्मीयता इ. अनेक महत्वाचे पैलू आपल्याला कळतात. इंदिराजींनी बांगलादेशातून येणाऱ्या लोंढ्यांकडे सुरवातीला मानवतेच्या चष्म्यातून पाहिले खरे पण तो प्रश्न अधिकच उग्र होऊन आपल्याला भेडसावू लागला तेव्हा मात्र त्यांनी तो चष्मा बाजूला ठेवून कणखरपणा आणि संयम व सामोपचार यांच्या विलक्षण मिश्रणातून संपूर्ण प्रश्न हाताळला.

बांगलादेश प्रश्न हा मुळात उद्भवलेला होता तो पूर्व व पश्चिम पाकिस्तान यांच्यातील आपसातल्या संघर्षातून. पू. बंगालमधील (तेव्हाचा पू. पाकिस्तान) मुजिबुर रहमान विरुद्ध पश्चिम पाकिस्तानातील भुट्टो-याह्याखान अशा वाढत्या संघर्षातून पाकिस्तान सरकारकडून पू. पाकिस्तानात प्रचंड दडपशाही सुरु झाली. आधीच पाकिस्तानी नेते हिंदूंचा द्वेष करणारे, त्यात तुलेनेने मवाळ असलेल्या मुजिबुरला पू. पाकिस्तानातील हिंदूंचा पाठिंबा ! त्यामुळे त्यांनी हिंदूंना पू. पाकिस्तानातून हाकलून द्यायला सुरुवात केली. दिवसाला साठ हजार एवढ्या प्रचंड संख्येने निर्वासितांचे लोंढे भारतावर आदळत होते. त्यामुळे भारताच्या आधीच तोळामासा असलेल्या आर्थिक स्थितीला घरघर लागली. शेवटी मुजिबुरच्या ‘मुक्तीसेने’ला पाठिंबा देऊन इंदिरा गांधींनी पाकिस्तान तोडला. या यशामुळे इंदिरा गांधींना आपल्या धडाडीची परिणती कशात होऊ शकते याची पूर्णपणे जाणीव झाली. यातूनच त्यांच्या महत्वाकांक्षी वृत्तीला खतपाणी मिळाले, आत्मभाव कुरवाळला जाऊ लागला.

याच सुमारास आर्थिक सुधारणांचे मॉडेल तर आखले गेले होते पण परिपूर्ण अंमलबजावणी शिवाय भारताच्या आर्थिक विकासाची गाडी वेग घेत नव्हती. अशातच गुजरातेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आधीपासूनच ओरडणाऱ्या विरोधकांचा आवाज उंचावायला सुरुवात झाली. इथे लेखक म्हणतो की, आणीबाणी हा एकतर्फी किंवा तडकाफडकी घेतलेला निर्णय वाटत असला तरी त्याच्यामागे विचारांची (आणि कृतीचीही) प्रचंड साखळी होती. व्यक्तिगत महत्वाकांक्षेचा दर्प त्या निर्णयाला येत असला तरी विरोधकांची कृत्ये, वागणूक, विचारांची पातळी हीदेखील फार ‘दूध की धुली हुई’ नव्हती, असाच लेखकाच्या म्हणण्याचा सूर आहे.

आणीबाणीच्या काळातल्या बऱ्याचशा घटना जवळून पहिल्या असल्याने आणि त्याच्या आधीच्या-नंतरच्या घटना त्यांना माहित असल्याने धर यांना बऱ्याचशा घटनांचा अन्वयार्थ लावणे शक्य झाले आहे. संजय गांधी त्या काळात किती प्रबळ झाले होते आणि तरीही त्यांची आई त्यांना लगाम का घालू शकत नव्हती, असा सवाल त्यांनाही पडला आहे. संजयशी त्यांचे संबंध तणावपूर्ण असल्याचेही जाणवते. तसेच हळूहळू इंदिरा गांधींचा स्वभावही बदलत जाऊन आत्मकेंद्रित आणि सदैव असमाधानी झाल्याचे निरीक्षणही ते नोंदवतात. पण या कठीण काळातही सिक्कीम भारतभूमीला जोडून घेण्याची मुत्सद्दी कृती त्यांच्या राजकारणातल्या समर्पण भावाची प्रचीती देते. आज आपल्यापैकी ९९.९९ % जनतेला याची कल्पनाही नसेल की सुरुवातीला सिक्कीम हे राज्य भारतीय संघराज्याचा भाग नव्हते. बराचसा स्वायत्त असलेला हा प्रदेश आपल्या देशाचा एकसंध भाग बनला याचे संपूर्ण श्रेय इंदिराजींनाच द्यायला हवे.

याव्यतिरिक्त आणखीही काही रंजक गोष्टी आपल्याला या पुस्तकातून कळतात. पहिली महत्वाची गोष्ट : इंदिरा गांधी यांना आणीबाणीनंतर निवडणुका केव्हा घ्याव्यात याबद्दल सल्ला स्वतः पी. एन. धर यांनीच दिला होता. त्याप्रमाणे १९७७ साली निवडणुका घेतल्या गेल्या खऱ्या, पण त्यात इंदिरा गांधींचा प्रचंड पराभव झाला. धर यांच्यावर खजील व्हायची पाळी आली !! आणखी एक किस्सा असा : इंदिरा गांधी पंतप्रधानपदावरून पायउतार होतानाच्या त्यांच्या पत्राचा मसुदा धर यांनी तयार केला होता. पुढे मोरारजी सत्तारूढ होत असतानाही धर आधीच्याच पदावर असल्याने मोरारजींनी त्यांना इंदिरा गांधींच्या पत्राला उत्तर देण्यास सांगितले. अशा प्रकारे स्वतःच लिहिलेल्या पत्राला स्वतःच उत्तर देण्याची वेळ पी एन धर यांच्यावर वेळ आली !!

इंदिराजीच्या निकटच्या सहवासात दीर्घकाळ राहूनही त्यांचे मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे करण्यात पी. एन. धर यशस्वी झाले आहेत. पं. नेहरू व सुरुवातीच्या इंदिरा यांच्या व्यक्तिमत्वातील फरक आणि त्याच इंदिराजींचे पुढे जाऊन निर्णयक्षम पंतप्रधानपदात झालेले रूपांतर याबाबत त्यांचे निरीक्षण उल्लेखनीय आहे. “इंदिरा गांधींजवळ नेहरूंची बुद्धिमत्ता व ठराविक विचारसरणीची बांधिलकी नव्हती. पण निर्णय घेण्याची शक्ती व हिंमत यांच्या बळावर त्यांनी ती उणीव भरून काढली. १९७१चा बांगलादेश प्रश्न, १९७४चा आर्थिक पेचप्रसंग, सिक्कीम समस्या, अण्वस्त्र स्फोटाचा निर्णय या गोष्टी ज्या ठामपणे त्यांनी हाताळल्या तशा पंडितजींना हाताळता आल्या असत्या की नाही याबद्दल शंकाच आहे.” त्यांच्या मते नेहरूंसमोर तुलनेने सोपा कालखंड होता. ते लाडके नेते होते, स्वातंत्र्य आंदोलनाचे हिरो होते, शिवाय त्यांच्या पक्षालाही स्वातंत्र्यसंग्रमामुळे प्रतिष्ठा होती. उलट इंदिराजी  सत्तेवर आल्या तेव्हा पाक-चीन यांनी उच्छाद मांडला होता, अर्थव्यवस्था खिळखिळी होती, काँग्रेसचे नीतिधैर्य खच्ची होते, त्यांची स्वतःची प्रतिमाही फार उज्ज्वल नव्हती. पण प्रतिकूल परिस्थितीतच त्यांच्यातले गुण भट्टीतल्या सोन्यासारखे झळाळून निघाले.

पुस्तकाच्या शेवटी येणारे ‘उपसंहार’ हे प्रकरण अतिशय महत्वाचे आहे, कारण भारतीय लोकशाहीविषयी अतिशय अभ्यासपूर्ण निरीक्षणे यामध्ये आहेत. देशातील धार्मिक तणाव व त्यांच्यामागचे विविध प्रश्न, प्रादेशिक पक्षांची आवश्यकता, सद्यस्थिती, यशापयश तसेच आर्थिक परिस्थिती यांच्यासंदर्भात अतिशय उत्तम चर्चा आहे. त्यामध्ये कुठेही अभिनिवेश व दुराग्रह नाही. अर्थात हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत असेच आहे. असे म्हणण्याचे कारण असे की पी. एन. धर यांची सुसंस्कृतता, क्षमता, विद्वत्ता याविषयी इंदिरा गांधींपासून ते मोरारजी, अटलजी अशा वैचारिक मतभिन्नता असणाऱ्यांनीही प्रशंसोद्गार काढलेले आहेत.

पुस्तकाची भाषा स्वाभाविकपणे प्रशासकीय वळणाची आहे व त्यामुळे सर्वसामान्य वाचकाला किंचित क्लिष्ट वाटू शकते. परंतु धर यांनी सचिवालायात प्रदीर्घ काळ व्यतीत केल्यामुळे ती तशी असणे स्वाभाविकच समजले पाहिजे. अशोक जैन यांच्यासारखा कसलेला अनुवादक या मराठी आवृत्तीला लाभलेला असल्यामुळे वाचताना कुठेही अडथळे किंवा उपरेपणा जाणवत नाही. रोहन प्रकाशनच्या सर्वच पुस्तकांप्रमाणे हेही सुबक, ठसठशीत आहे हे वेगळे सांगायला नकोच.




रोहन प्रकाशन

पृष्ठे ३३५, किंमत २००रू.

आवृत्ती पहिली



- प्रसाद फाटक

-

No comments:

Post a Comment