Total Pageviews

Saturday, September 15, 2018

'देव चालले' : स्थित्यंतराची गोष्ट



‘चरैवेति, चरैवेति’ हे मनुष्यप्राण्याच्या प्रवासाचे सूत्र आहे. तो कुठून आला आहे याची त्याला एका मर्यादेबाहेर कल्पना नसते आणि पुढे कुठे चालला आहे याबद्दल नजिकचा भविष्यकाळ वगळता खात्रीही नसते. पण तो चालायचा थांबत नाही. इच्छा, नशीब, भावना, संकट, संधी यांपैकी कुठल्याही कारणांनी तो एकीकडून दुसरीकडे जात राहतो. जाताना सोबत आकांक्षा, स्वप्ने, नैराश्य, वासना, भावना, सवयी आणि यासगळ्या गोष्टी ज्यात बांधलेल्या आहेत ते संस्कृती किंवा परंपरा या नावाचं गाठोडं असतं. त्यात कुठेतरी त्याचा देवसुद्धा असतो.मध्येच कुठेतरी श्रांत होऊन विसावतो. शिदोरी उलगडतो. जागा सोयीची वाटली तर काही काळ (कधीकधी शे-दोनशे वर्षंसुद्धा) पथारी पसरतो. पुन्हा आधीच्यांपैकीच कुठल्यातरी कारणाने पायात वहाणा चढवून चालू लागतो. मागे सांडलेली काही शितं, काही आठवणी त्याला व्याकूळ करून सोडतात खऱ्या, पण त्याने तो जायचा थांबतोच असे नाही. दि.बा. मोकाशी लिखित ‘देव चालले’ हे अशीच एका स्थित्यंतराची गोष्ट आहे. कुटुंबाची आणि त्यांच्यासोबत नव्या दिशेने जाण्यासाठी निघणाऱ्या त्याच्या दैवताची.

दीर्घकथा म्हणता येईल असे या पुस्तकाचे स्वरूप. त्यातही घटना फार कमी. घालमेल आणि घुटमळणं मात्र बरंच. पळसगावात जोश्यांचं वडिलोपार्जित घर आहे. घरातले सगळेजण पोटापाण्यासाठी कधीच बाहेर पडलेत. अपवाद फक्त दोघांचा. एक काकू आणि दुसते तिच्या सोबतीला असणारे त्यांचे दैवत, नरसिंह – ज्याला ते सर्वजण नरहरी म्हणतात. त्यापैकी काकूला आता वयोपरत्वे देवाचे काहीच करणे शक्य होत नसल्यामुळे नरहरीसुद्धा आता प्रस्थान करणार आहे. नरहरीची मूर्ती घेऊन जायला काकूचा थोरला पुतण्या आबा त्याच्या बायकामुलांसह आलेला आहे. घरातले देवाचे शेवटचे कार्य म्हणून बाकीचे पुतणे रामू, नरू आणि जगूसुद्धा आलेत. देव घरातून हलण्यापूर्वीचे २ दिवस एवढाच विस्तार आहे या कथेचा.

विस्तार छोटा असला तरी चारही भावांच्या मानसिक आंदोलनांमधून त्यांच्या स्वभावाच्या छटा फार कुशलेतेने दाखवून दिल्या आहेत मोकाशींनी. आबा सश्रद्ध आहे, त्याने कष्टाने स्वतःचा शहरात जम बसवला आहे आणि तो गाठीशी चार पैसे साठवून आहे. नरूची भक्ती फक्त पैशावर आहे, इतकी की देवाच्या नावाचा उपयोगसुद्धा त्याने पैसे कमावण्यासाठी केलेला आहे. दोन दिवसापुरता आपल्या जुन्या घरात येऊनसुद्धा त्याचा श्वास गुदमरतो आहे. जगू नास्तिक आहे त्यामुळे देवाशी सख्य नसले तरी घराच्या जुन्या आठवणींमध्ये तो रमला आहे. रामू मात्र दीनवाणा आहे. खूप गरिबीत दिवस काढतोय. त्यातून वर येण्यासाठी सदैव भावडांकडून कृपेची अपेक्षा करतोय आणि मोकाशींच्याच शब्दात सांगायचे तर लोकांनी आपल्या गरिबीची कीव केल्याचा त्याला विकृत आनंदही मिळतो. तो कमालीचा देवभोळा आहे खरा, पण त्या भक्तीमागे देखील परतफेड म्हणून देवाच्या कृपेची वाट बघणे आहे.

काकू मात्र इथेच आहे.... कधीपासून .... नवरा कधीच निवर्तलेला.. बाकीचे आप्त कधीच दूर गेलेले.. आता तर नरहरी पण चाललाय. घराचे वासेच काय ते सोबतीला असतील आता ... पण मग तरीही ती का थांबतीये ? आबाने तिला सोबत घेऊन घरी जाण्याची तयारी दाखवूनही ती का जात नाहीये ? उत्तर नाही ... काही पाश तुटत नाहीत हेच खरे. मला तर या काकूचं गोनीदांच्या ‘पडघवली’ मधल्या अंबू वहिनीशी खूप गहिरं नातं वाटतं. दोघीही बदलत्या वाऱ्याला आणि कोसळत्या काळाला न जुमानता गावाशीच निष्ठा अभंग ठेवून शेवटी तिथेच विरघळून जातात.

पुस्तकात एकेका पात्राच्या मनोवस्था, त्यांची आंदोलनं दि. बा. मोकाशींनी इतक्या प्रभावीपणे उभ्या केल्या आहेत की ते वाचताना माझ्या मनातही असंख्य तरंग उठत होते. ‘देव घरातून हलणे’ हे फक्त एक प्रतीक आहे. देवाला काय, आहे तिथे राहिल्यानेही फरक पडत नाही आणि बाहेर पाडूनही. पण खरेतर हे प्रातिनिधिक चित्र आहेत ते देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपास आपला गावगाडा सोडून नव्या क्षितिजांच्या शोधात निघालेल्या कुटुंबांचे आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या काही जणांच्या कालविसंगत वृत्तीचे देखील. गावात सहज फेरफटका मारायला निघालेल्या जगूला भेटणाऱ्या ‘गोविंदा’ या त्याच्या जुन्या परिचिताच्या पात्रामधून मोकाशी हे थोडक्यात पण नेमकेपणाने सांगून जातात. ‘कसेल त्याची जमीन’ या नव्या कायद्याने एका फटक्यात पांगळा झालेला हा गोविंदा स्वतःच्याच निष्क्रियतेने झालेल्या अवस्थेचे खापर सरकारवर फोडतोय. गावातून बाहेर पडणाऱ्या लोकांनीच आपल्यासाठी काहीतरी करायला हवे अशी त्याची ऐदी मानसिकता आहे. बोलताना जुन्या वैभवाच्या गप्पा करणारा पण आत्ता हातपाय हलवायचेही जीवावर आलेला गोविंदा एका अर्थाने रामूच्या दीनवाणेपणाशीच नाते सांगतो. वेळच्या वेळी नवे वंगण न घातल्याने कुरकुरत अखेर गंजून जाणाऱ्या अनेक कुटुंबांची हीदेखील प्रातिनिधिक कहाणीच.

कथानकाच्या शेवटी शेवटी घरात संन्यासी काकाचे पात्र एक वेगळेच वादळ निर्माण करते. संस्यासाश्रमात असूनदेखील कधी इतरांना आणि कधी स्वतःलाच फसवत वासनेच्या फेऱ्यातून मुक्ती न मिळालेला पडणारा विक्षिप्त काका एका अजब मनुष्यस्वभावाचे रूप उघडे करतो. पण अखेर ते एक पेल्यातले वादळच ठरते. सरोवराचा पृष्ठभाग कुणीतरी मारलेल्या एखाद्या खड्यामुळे डहुळला जावा आणि ते तरंग हळूहळू विरत जाऊन पुन्हा एकदा त्या सरोवराने धीरगंभीर मुद्रा धरण करावी तसे काकूचे आणि सोबतच्या त्या खिन्न वाड्याचे जगणे पुढच्या पानावर चालू राहते...

अशा प्रकारच्या पात्रयोजनेमुळे आणि प्रसंगयोजनेमुळे ‘देव चालले’ हे केवळ नॉस्टाल्जिया निर्माण करणारे कथानक राहत नाही तर ते मध्यमवर्गीय मूल्ये जपणाऱ्या कुटुंबांच्या स्थित्यंतराचे स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या प्रातिनिधिक डॉक्युमेंटेशन ठरते (त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आलेल्या महेश एलकुंचवारांच्या ‘वाडा चिरेबंदी’ने हेच काम अधिक विस्ताराने केले. त्यामुळे मला स्वतःला ‘देव चालले’ आणि ‘वाडा...’ चे गोत्र कायमच एक वाटत आले आहे).

पुस्तकाच्या अगदी शेवटच्या पानावर येणाऱ्या लोलकाच्या सप्तरंगी प्रकाशाच्या प्रसंगाचा आवर्जून उल्लेख केल्याशिवाय हा पुस्तक परिचय अपूर्ण राहील. केवळ काही ओळींचा हा प्रसंग खऱ्या अर्थाने cinematic आहे. एखादा श्रेष्ठ दिग्दर्शक चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात मास्टर स्ट्रोक खेळून आपल्या कलाकृतीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो तसंच या ठिकाणी दि. बा. मोकाशींनी केलेलं आहे.

आपल्या बहिणीचे जगूशी लग्न जुळवून देण्याचा प्रयत्न करणारी त्याची वहिनी – आबाची बायको – आणि त्यातून तिची बहिण आणि जगूमध्ये फुलू पाहणाऱ्या प्रेमाचे उपकथानक मात्र ठिगळ लावल्यासारखे वाटते. त्याने काही साध्य झाल्यासारखे वाटत नाही. पण ते वगळता अतिशय हृद्य अनुभव देणारे हे पुस्तक आहे. काळ वेगाने बदलत जात असताना काही जण योग्य तो मुक्काम सापडेल याची खात्री नसतानाही मिळेल ती गाडी पकडून पुढे निघून गेले आणि ज्या लोकांना हे जमलेनाही ते कवटाळून बसले जुन्या गोष्टींना....

कोण चुकला, कोण बरोबर हे आपण नाही सांगू शकत... ते ठरवणारे आपण कोण?

आणि ठरवणारे कदाचित कुणी असेलच तर तो नरहरीच !!!


देव चालले

लेखक: दि. बा. मोकाशी

पृष्ठे : ८९

आवृत्ती दुसरी

मॅजेस्टिक प्रकाशन




mahamtb.com वर पूर्वप्रकाशित : http://mahamtb.com//Encyc/2016/11/19/Book-Review-Dev-Chalale-Marathi-Book.html



No comments:

Post a Comment